श्रावण महिन्यातले रिमझिम पावसासोबत केलेले उपास,व्रतवैकल्य, मंगळागौरीचा घातलेला पिंगा, झिम्मा, फुगड्या संपल्या कि सगळ्यांना वेध लागतात ते गौरी-गणपतीचे महाराष्ट्रात बहुतांश घरात महालक्ष्मी-गौरी बसवल्या जातात. गणपती बसल्यानंतर गौरी च्या रूपाने माहेरवाशिणीच घरी येतात. त्या आल्यानंतर त्यांचं स्वागत मोठ्या जल्लोषात केल्या जातं. वऱ्हाडात त्यांना 'महालक्ष्मी' तर उर्वरित महाराष्ट्रात 'गौरी' नावाने ओळखतात,
तर कुठे त्याना जेष्ठा-कनिष्ठा सुद्धा म्हंटले जाते. महालक्ष्म्या जेव्हा घरी येतात तेव्हा जेष्ठ घरधनीण सवाष्णी तिला घरात आणते. पूर्वीच्या काळी नदी किंवा पाणवठ्याच्या ठिकाणावरून गौरी घरी आणल्या जात पण आता बदलत्या काळानुसार तुळशी पासून तिला घरात आणतात. या वेळी मुखवटे आणणारी मुख्य सवाष्णी "कोण आली?" असा प्रश्न विचारते तर इतर स्त्रिया "सोन्याच्या पावलांनी महालक्ष्मी आली" असे उत्तर देत. प्रथम देवघर नंतर इतर खोल्या करत ज्या ठिकाणी महालक्ष्म्या बसतात, त्या ठिकाणी यथासांग प्रतिष्ठापना करतात. बऱ्याच घरात वंशपरंपरागत चालत आलेले पितळेचे मुखवटे असतात, हल्लीच पिओपी चे मुखवटे मिळतात पण त्या पितळेच्या मुखवट्याना असलेलं तेज निराळंच असतं. या वेळी त्यांना विविध दागिन्यांचा आणि सुंदर साड्यांचा साजशृंगार नेसवतात. अशी हि दागिन्यांनी नटलेली गौराई पाहण्यारांचे मन वेधून घेते. काही ठिकाणी एक तर काही ठिकाणी दोन मुखवटे असतात.
गौरी म्हणजे पार्वती तर गौरी येतानाची माझ्या आजीने आईला आणि आईने मला सांगितलेली शंकर पार्वतीची एक लोककथा अजूनही आठवते. हिच कथा सरोजिनी बाबरांच्या श्रावण भाद्रपद मध्येही दिली आहे. गौराईला माहेरी जायची याच महिन्यात ओढ लागते. पण शंकराला मात्र गौराईचे माहेरी जाणे पसंत नसते. “तू गेलीस की मला करमणार नाही.” असे म्हणून शंकर तिला अडवतात. मग गौराई शंकराला म्हणते, “ मला माहेराला जाऊ द्या! तिथं माझे माहेरवाशिणीचे माझे लाड करतील, नवा शालू देतील. अलंकार घालतील. परंतु पुरुषांना आपल्या बायकोने कधीच माहेरी जावू नये असं वाटत असते गौराईला मात्र माहेराची ओढ लागली असल्याने, त्यामुळे ती पतीच्या नकाराला न ऐकताच माहेरी जाते . शंकरही तिच्या मागे मागे निघतात.
“मागं माग शंकर पुढं पुढ पार्वती
जन लोक हासती तुम्हा कैलासाच्या पती"
पण असे केल्याने लोक हसतील याची पर्वा न करता, तिचा विरह सहन न होऊन पार्वतीचा रथ पुढ चालला असतांना एवढे सांगूनही शंकर तिचा पिच्छा सोडीत नाही ! शेवटी एकदाची पार्वती माहेराला पोचते. ती पलिकडे गेली तरी तिची परत येण्याची वाट पाहत शंकर अलिकडे उभाच राहतो.
दुसऱ्या दिवशी महालक्ष्म्या १६ पदरांनी सुतावतात ( सुतावतात म्हणजे दोऱ्याने एकत्र बांधतात) आणि जेवतात, त्यासाठी ज्वारी पासून बनवलेली आंबील हा मुख्य नैवेद्य असतो, शिवाय फुलोरा केला जातो या फुलोऱ्यात अनारसे, करंज्या, साटोर्या असतात. महालक्ष्म्या उठल्या कि यांचा प्रसाद सगळीकडे वाटतात. जेवणामध्ये १६ प्रकारच्या भाज्या, १६ प्रकारच्या चटण्या कोशिंबिरी, पुरणपोळ्या असे बरेच पदार्थ असतात. या दिवशी बरीच जणांकडे मोठं मोठ्या जेवणावळी असतात आणि चुलबंद आवतण हि देतात. हे झालं कि तिसऱ्या दिवशी गौरी उठतात, कोकणात या वेळी बरीच सुंदर गाणी म्हंटली जातात त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या धान्य, फळं यांची नावं गुंफली जातात उदाहरणादाखल हे गीत पहा ना
वरी बाय वरी ग डांगरची वरी
आमची गौराय जाते सासरी
तिला सोन्याची सरी
नाचणी बाय नाचणी ग डांगरची नाचणी
आमची गोराय जाते सासरी
तिला सासरची काचणी
का ग बाय का ग डोंगरचं का ग
आमची गोराय जाते सासरी
तिला सोन्याचा भांग
जेष्ठागौरीचा हा सण महाराष्ट्राची कुळपरंपराच आहे. हे सण उत्सव आहेत म्हणून आपले जीवन सफल आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही
प्रतिक्रिया
25 Aug 2020 - 10:51 pm | Bhakti
बऱ्याच घरात वंशपरंपरागत चालत आलेले पितळेचे मुखवटे असतात, हल्लीच पिओपी चे मुखवटे मिळतात पण त्या पितळेच्या मुखवट्याना असलेलं तेज निराळंच असतं.
*आमच्याकडे मातीचे सुगड ओईल पेंटने रंगवलेले आहेत.६० वर्षांहून जूने, अजूनही अनोखे!
*गोष्ट माहित नव्हती.ती समजली.मस्त!