आज ऑफिस कामातून कम्पलसरी सुट्टी घ्यायची होती. लॉकडाउन काळात एम्प्लॉयी वर्क फ्रॉम होम करीत असल्यामुळे, सुट्टीच घेत नाही, हे मॅनेजमेंटच्या लक्षात आले. तेव्हा एक दिवस कम्पलसरी सुट्टीचा नवीन नियम लागू झाला. हे कंपल्शन एम्प्लॉयी, की एम्प्लॉयर कोणच्या हिताचे, यावर फाटे पाडल्यापेक्षा, दोघांनाही एक दुसऱ्यापासून, एक दिवस मुक्ती, आराम, एक दुसऱ्यासाठी बाळगलेली काळजी, असे समजून "इट्स विन विन सिच्युवेशन फॉर बोथ" असे मानायला हरकत नाही. मग आजचा दिवस काही मार्गी लागतो की नाही ते बघायला हवे.
मध्यन्तरी "लॉकडाउन सुरु आहे" हा लेख, त्याचे शेवटचे २ अंक डेक्सटॉप पीसी मध्ये सेव्ह केले असतांना, मुलगी जवळ येत घाबरट आवाजात
"बाबा पी सी चालू होत नाही."
हम्म..... हेच ते काही क्षण जेव्हा "शांत गदाधारी भीम शांत" किंवा "कंट्रोल उदय कंट्रोल" हे नामसमरण कामात येत.
"बर, बघतो मी." छोट पण वाक्यपूर्ण करणारे ते काही शब्द. ते ही संयमाने आणि शांततेच्या स्वरात निघताच, मुलीचा जीव भांड्यात पडला.
माझ्याकडे शेवटच्या दोन्ही अंकांची आणखी कुठेही कॉपी नव्हती. जाऊ देऊ का? पण यार जे काही थोडेबहुत का असेना माझे वाचक, श्रोते, त्यांनी पुढच्या अंकाबद्दल विचारले तर? परत लिहायच्या मेहनती पेक्षा "वेळ मिळत नाही यार" हा मनाचा एक्सक्युज. काहीतरी करून मी पीसीला सेफ मोड मध्ये सुरु केला आणि लगेच "लॉकडाउन सुरु आहे" चा अक्खा फोल्डर पेन ड्राईव्ह मध्ये कॉपी केला. मला आणि मुलीला सुटलो बाबा एकदाचे "जाण बची लाखो पाये." असे वाटले.
आज पीसी रिपेअर करून आणूया. काही जण घरी येऊन पण पीसी रिपेअर करतात, पण अशा परिस्थितीत कोणाला घरात घेणे नको रे बाबा. तसेच मी पीसी संबंधी काही पण काम असो, माझ्या एका ठरलेल्या दुकानातच जातो. कारण प्रत्येकाला कोणावर तरी विश्वास असतो. त्याचाकडे गेले के आपले काम फत्तेच होणार, अशी शंभर टक्के खात्री असते. "बाळाचे कान सोनारानेच टोचावे." तसा माझा पीसीचा सोनार त्याचाकडे जायचे मी ठरविले.
बायको ऑफिस कामात व्यस्त, तर मुलगी अभ्यासात, हीच संधी साधून मी पीसी बॅग मध्ये ठेवला. सोबत आणखी एक बॅग, काहीतरी शॉपिंग करता येईल म्हणून घेतली. मास्क, हॅन्ड ग्लोव्हस आणि हेल्मेट घालत चुपचाप घराबाहेर पडलो अन बाईक काढून निघालो थेट ठाणे स्टेशनच्या दिशेने. वातवरण थोडे ढगाड होते. पावसाच्या रिमझिम सरी मस्त अंगावर घेत, आज तब्बल दोन किंवा तीन महिन्यानंतर, मी ठाणे मेन मार्केटकडे निघालो होतो. रस्ते एक्दम सुमसाम, कुठे वर्दळ नाही, गडबड नाही. हे तेच गजबजलेलं ठाणे शहर आहे का? माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.
मी पीसी रिपेअच्या दुकानात पोहचलो. दुकानासोमोर मोठा बाक, जो मला आणि दुकानाला कमीत कमीत पाच फूट दूर ठेवत होता. एक जण हॅन्ड ग्लोव्हस घालून दुकानातील नवीन आलेल्या एका एका पॅकिंग मालावर, स्यानिटाईझर स्प्रे करती क्लीन करीत होता. माझा पीसी बाकावर ठेवताच त्याने त्यावर स्प्रे मारला आणि स्यानिटाईझ केला.
"क्या करे सर, कहा कहा से माल आता है. हमे तो जादा केअर लेना पडता. कुछ हुवा, तो हमारी जिंदगी खतरे मै और दुकान बंद करावा देंगे वो अलग. दोनो साईड से नुकसान हमारा.”
प्रिकॉशन इज बेटर द्यान कुयर म्हणतात ते हे. दुसऱ्याने पीसी चेक केला.
"सर विंडोज फॉरमॅट कर के नया इन्स्टॉल करणा होगा. आ जाओ आधे एक घंटे मै."
"ठीक है. भैय्या जरा स्यानिटाईझर मेरे ग्लोव्हस पे भी मार दो." म्हणत मी पण हाथ सॅनिटाईज करून घेतले. आता अर्धा एक तास काही तरी शॉपिंग किंवा मार्केट बघूया, म्हणून बाईक काढली.
गेस्ट रूम मधील पंखा पण बिघडला आहे, म्हूणन मी इलेक्ट्रिक गल्लीत गेलो. नवीन पंख्याची चोकशी झाली. जातांना नेऊया मनात ठरल. तेवढ्यात पावसाने जोर धरला. थोडा वेळ वाट बघणे, हाच पर्याय होता. घाईघाईत निघाल्यामुले रेनकोट पण आणलेला नव्हता. थोडा पाऊस कमी होताच बाईक काढली आणि मार्केटमध्ये आलो, तर पावसाने परत जोर धरला. बाईक रोडच्या साईडला पार्क करून, धावतच एका दुकानाच्या शेड मध्ये आसरा घेतला. पाऊस जोरात सुरु झाला होता. रोडच्या एक साईडची दुकानेच उघडी होती. रोज एक साईडची दुकाने उघडी, तर दुसरी साईडची बंद, असा नवीन नियम होता. फार कमी वर्दळ रोडवर होती.
शेड मध्ये उभे असतांना लक्षात आले, एका आजीबाईने रोडवर बाकावर लिंबू, मिरची, कडीपत्ता, पुदिना या मसाल्याचा वाटा लावला होता. शेड मधेच बाजूला, ती आणि एक बाई बसली होती. कोणी एक वक्ती जो पावसापासुन बचावासाठी शेड मध्ये आसरा घेऊन उभा होता. तो आजी सोबत बोलत होता. त्याचे काही बोल माझ्या कानांवर पडताच, माझे लक्ष तिथे केंद्रित झाले.
"बाबूजी बोहोत खराब दिन चल रहे. दो महिना पहिले तो पुरा बंद कर दिया, तो खाणे के वांदे हो गये थे. कुछ आमदनी नही थी. क्या पकाये? बच्चो को क्या खिलाये, समझ मै नही आता था. हम भिकारी नही, लेकिन क्या करे, ऐसे मजबुरी मै मॉल, या कही कुछ मांग के खाना पडा. कितने दिन मांग के खाने का? अच्छा नही लगता. अब थोडी राहत मिली हैं, तो ये जो कुछ हैं बेचने बैठे हैं. उतना पब्लिक नही है और बारिश भी शुरु हो गयी, ऐसे मै कहा कुछ बिकता बाबू."
मनात फार वाईट वाटायला लागले. आपल्याला अशा गोष्टीची झळपण लागत नाही. किती लकी ना आपण? किती चांगले आयुष्य दिले ना देवाने आपल्याला? लॉकडाउन मध्ये तर उलट जास्तच खाणे झाले. बाहेरचे चमचमीत खाणे बंद झाल्यापासून, घरी काय काय नाही बनवले. जीभेजे काय काय लाड नाही पुरविले. लिंबू, मिरची, कडीपत्ता, पुदिना शिवाय भाजीत मजा नाही, म्हणून कधीनव्हे ते दोनशे रुपये किलो कडीपत्ता आणि अंशी रुपयाची कोथिंबीर गड्डी, तरी सुद्धा तीस चाळीस रुपयाच्या चार पाच काड्या. दहा रुपयाला दोन निबू. बापरे कोणी लुट सुरु केली? की आपणच लुटायला तयार झालो?
"आजी कसा दिला वाटा?"
"कोई भी वाटा लो भैया, दस रुपया और दस रुपये के दस निंबू."
अरे ही वेडी तर नाही? मार्केटमध्ये काय भाव चालू आहे, हिला माहीत नाही का? भाज्या किती महाग आहेत? किंवा असेतर नाही? की भाज्या महाग नाही, म्हणजे त्याची क्वालिटी खराब असा समाजच आपण करून घेतलाय? असो काही गोष्टीवर चर्चा, म्हणजे वादाचा विषय बनायला वेळ लागत नाही. आपल्याला काय पटते ते करायचे.
"आजी मला सगळे वाटे एक एक दे" म्हणत मी चाळीस रुपयात सगळे वाटे घेतले. पावसाने अजूनही मला मुदाम थांबविले होते. परत विचार आला, इतके स्वस्त आहे, चला आपण आजीची मदत करूया का? आजीला शंभर रुपये आणखी दिले.
"आजी मला लिंबू, कडीपत्ता, मिरच्याचे आणखी वाटे दे"
पुदिना आणि कोथांबीर एक एक वाटच शिल्लक होती.
"बाबू पुरा सौ रुपयेका लोंगे?"
"हा आजी सब दे दो" आजी खुश झाली.
आजीच्या घरला भीक न घालता तिच्या मेहनतीच्या कामासाठी माझ्याकडून छोटी का होईना पण मदत.
मदत??? पण कोणी कोणाला मदत केली?
मी आजीला? की आजीने सगळ्या महागाईचा मसाला एवढ्या स्वस्तात मला दिला, तर मलाच केलेली मदत?
तर मग मदत म्हणून उपकार भाव बाळगण्यापेक्षा, दोघांनी एकमेकाशी केलेला हा सुखद व्यवहार, हॅपी शॉपिंग हेच योग्य. म्हणजेच दोघांसाठी पण "विन विन सिचुवेशन."
पाऊस ओसरला, आजीच्या चेहऱ्यावर समाधान बघत, मी लगेच तिथून आनंदात निघत, आणखी अशीच थोडीफार हॅपी शॉपिंग करीत पंख्याच्या दुकानात आलो. खरंतर अमेझॉन, फ्लीपकार्ट वर मला पंखा मिळाला असता. पण या दोन महिन्यात, माझे घर खऱ्याअर्थाने चालविले, ते याच छोट्या दुकानदारांनी. पुढे किती काळ माझा असा मूड राहील माहीत नाही, पण आजतरी मी अशाच दुकानांतून पंखा घेणार आणि तो ही हॅपी शॉपिंग म्हणजेच दोघांसाठी पण "विन विन सिचुवेशन." दुकानदाराने काळजीपूर्वक पंख्याला प्लास्टिकने कव्हर तर केलेच, पण बाईकला सुध्दा नीट बांधून दिला. त्याचा वागण्यात किती आपुलकी होती.
शेवटचा स्टॉप, माझा पीसी रेडी झाला होता.
"साब सॉफ्टवेअर भी डाल के दिया है. आपका सब डेटा जैसे के वैसे है." हा तर यार पीसी रिपेअर मधला एम डी डॉक्टर.
"अरे याद आया, मेरे को ऑफिस लॅपटॉप का ऍडॉप्टर भी चाहिये." त्याने लगेच मला दिला. परत सगळ्या वस्तू सॅनिटाईझ करत मी बॅग मध्ये ठेवल्या.
“पीसी भिग जायेगा साहब” म्हणत त्याने एका प्लास्टिकने पीसीला मस्त कव्हर करून दिले. मी बिलाची रक्कम दिली असता सगळ्या नोटावर त्याने स्प्रे मारला आणि मला पण स्प्रे मारलेले कडक नोट परत केली. एकदा अजून हॅन्ड ग्लोव्हसवर सॅनिटाईझर मारत मी हात साफ केले. पावसाच्या रिमझिम सरी मस्त अंगावर घेत हॅपी शॉपिंगचा एन्ड करीत, मी माझी बाईक घरच्या दिशेने पळवायला सुरु केली.
धन्यवाद.
प्रतिक्रिया
22 Jun 2020 - 6:12 pm | सामान्यनागरिक
आम्ही असेच पीसी रिपेरचे दुकान चालवितो. आणि सगळ्म अस्संच करतो. एकदम आपण आमच्याच दुकानांत आल्यासारखे वाटले. धन्यवाद.
22 Jun 2020 - 10:22 pm | श्रीकांतहरणे
धन्यवाद.
22 Jun 2020 - 11:16 pm | रीडर
छान लेख आणि विचार
23 Jun 2020 - 10:11 am | श्रीकांतहरणे
धन्यवाद.
23 Jun 2020 - 11:23 am | अभ्या..
उगीच संवादांना बोल्ड करीत जाऊ नका. अवतरण चिन्हे पुरेशी असतात.
असा मजकूर वाचायला डोळ्याला त्रास होतो.
अगदी शीर्षक किंवा उपशीर्षक ठळक करण्याचे सोडून सलग मजकुरातले मुद्दे ठळक करायला हे पीपीटी नाही.
बाकी लेखन मस्त.
शुभेच्छा.
23 Jun 2020 - 11:17 pm | श्रीकांतहरणे
धन्यवाद. बर लक्षात ठेवील ह्या गोष्टी.
23 Jun 2020 - 12:10 pm | प्राची अश्विनी
स्तुत्य विचार. आवडला लेख.
23 Jun 2020 - 11:19 pm | श्रीकांतहरणे
धन्यवाद.
23 Jun 2020 - 12:34 pm | सौंदाळा
छानच लिहिलंय
23 Jun 2020 - 11:20 pm | श्रीकांतहरणे
धन्यवाद.