चुलीवरच्या मिसळीची पाककृती

निनाद's picture
निनाद in जनातलं, मनातलं
9 Jan 2020 - 8:50 am

चुलीवरच्या मिसळीची पाककृती

"तुम्च्या मिसळीची पाककृती आमाला पायजेल" अशी विचारणा आल्याने ही कृती देत आहे. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने यात बदल करून घ्यावेत.
---
गरम असा दिवस पाहून ठेवावा. मग सर्वात आधी दुकानात जाऊन आवडती बियर बाटल्यांची एक थंडगार केस आणावी. आपल्या आवडीचे धम्माल मित्र-मैत्रिण लोक घरी बोलवावेत. मस्त बियर पीत गप्पा हाणता हाणता अगदी रंगात आल्या की, 'चला चुलीवरची मिसळ करायची का?' असे पिल्लू सोडावे. ही कल्पना बहुदा सर्वांना आवडतेच!
मग चूल पेटवण्याचे प्रयत्न सुरू करावेत. या वेळा पर्यंत सर्वांची 'किमान बियर पातळी' गाठलेली असेल तर उत्तम असते. कारण आपल्याच घरातले काय काय सामान चुलीत जाळले जाउ शकते याची उत्तम माहिती या काळात आपल्याला होऊ शकते. कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात आणून ठेवलेले फर्निचर वगैरे असे न जाळण्याचे साहित्य बाजूला काढून घरात परत योग्य त्या ठिकाणी नेऊन ठेवावे!

मग सर्वसाधारण सर्वात आधी जाळले जाऊ शकेल असे खरोखर जाळण्यायोग्य लाकडे वगैरे साहित्य एकत्र करून मागील दारी चूल पेटवण्याच्या कामाला लागावे. आपल्या सोबत जे अतिउत्साही लोक असतील ते हे कार्य आधी हातात घेतात. मग धूर डोळ्यात जाऊ लागला की आपापली बियर शोधत परत येतात. मग आपण आधीच शोधून ठेवलेला गॉगल डोळ्यावर चढवावा आणि कार्य हातात घेउन चूल पेटवावी. आपल्यापेक्षा अधिक भारीतले लोक चूल पेटवणार असतील ते कार्य त्यांना करू द्यावे.

घरात योग्य त्या व्यक्तीला विचारून, खात्री करून, परत एकदा विचारून, मग एखाद्या साक्षिदारासमोर विचारून चुलीवर कोणते भांडे ठेवायचे निश्चित करावे. कारण हे भांडे खालून भयंकर काळे होणार असते!
एव्हाना ज्यांची ज्यांची बियर संपली असेल त्यांना परत एक एक बाटली द्यावी. भांडे निश्चित करे पर्यंत बहुदा चूल पेटली असेल. त्यावर आपण जाऊन भांडे ठेवावे आणि पहिला फोटो इन्स्टाग्रामला टाकावा.

तोवर कागद आणि पुठ्ठे वगैरे जोरात जळायला लागल्याने भांडे पण चांगले तापतेच. या तापलेल्या भांड्यात वरून सढळ हाताने तेल ओतु लागावे. कुणी तरी "अरे किती हे तेल !? बास बास!" असे किंचाळले की अजून ३ सेकंदांनी तेल ओतणे थांबवावे. मग जोरात ओरडावे - 'अरे मोहरी कुठे आहे?' आजूबाजूला थोडी चलबिचल होऊन बघ्यांच्या गर्दीतून कुणीतरी मसाल्याचा डबा आपल्या पर्यंत पोहोचवेल. (हा डबा वेळेत न आल्यास उठून सर्व बियरच्या बाटल्या गायब कराव्यात!)

मग परत अरे कांदा लसूण कुठाय असे ओरडावे. कुणी तरी कांदा चिरायला घेते. परत एकदा 'कांदा बारीक हवा' असे ओरडावे. हा क्वालिटी चेकचा ओरडा योग्यवेळी केल्यामुळे संपुर्ण कांद्याचे तीन चार तुकडे करून मिळण्या ऐवजी खरोखर चिरलेला कांदा मिळण्याची शक्यता तयार होते. परत एकदा 'लसूण सोला! लसूण सोला!!' असे जोरात ओरडावे. सोललेला लसूण आला की हा बाजूला ठेऊन द्यावा. तेलात घालू नये! तोवर आपण हिरव्या मिरच्याचा एक ठेचा करून हळूच बाजूला ठेवावा. एव्हाना कागद जळून गेले असतात. आणि लाकडे जळायला लागतात. चूल खरोखर पेटते!

आता तेल तापले असेल तर मोहरी घालावी. तोवर कांदा येईलच. हा कांदा तेलात सोडावा आणि दुसरा फोटो इन्स्टाग्रामला टाकावा. आता पर्यंत उगाच इकडे तिकडे चुलीचा जाळ पाहात बसलेला एक कार्यकर्ता आपल्या नजरेत भरलेला असतो. त्याला आपला गॉगल द्यावा आणि हा कांदा परतायला बसवावे. आणि "कांदा चांगला सोनेरी व्ह्यायला हवा "असे सांगावे. आता आपली बियर ची बाटली शोधावी आणि मजेत दोन घोट घ्यावेत. ही वेळ बियर आणि चुल यांचा दोन्हीचा एकत्रित फोटो काढायचा प्रयत्न करण्याची असते. समजा आलाच फोटो तर तोही फोटो इन्स्टाग्रामला टाकावा. आधीच्या फोटो ला किती लाईक्स येत आहेत याचा अंदाज घ्यावा.
- लेखक निनाद कट्यारे
आता बसल्या बसल्या 'अरे, चुलीत बटाटे भाजायचे का?' असे नवीन पिल्लू सोडावे. ही कल्पना आवडणारे असतातच. बटाट्या बरोबर भाजायला कांदे पण आपोआप येतात. पण हे भाजण्यासाठी चुलीतला जाळ योग्य नसतो! मग एक
माहीतगार माणूस ही चुल व्यवस्थितपणे लावून देतो. आता जाळ पण योग्य होतो आणी कांदे बटाटे टाकायला चुलीत जागापण तयार होते.

कांद्यावर दूरूनच डोळा असू द्यावा. थोडा रंग बदलला की, 'अरे आले कुठे आहे?' असे ओरडावे. ' आले आणताना किसून आणा रे!' अशी एक जास्तीची हाक द्यावी. किसणी शोधणे आणि आले किसून येणे याचे टायमिंग महत्त्वाचे आहे. या वेळी मघाशी करुन ठेवलेला हिरव्या मिरच्याचा ठेचा कुणी काही पाहण्याच्या आणि बोलण्याच्या आत शिताफिने या तापलेल्या तेलात टाकून द्यावा. "या बाबौ!! इतक्या मिरच्या!?" असे उद्गार आले तर मिरच्यांचे प्रमाण योग्य आहे असे समजावे. मिरच्या घातल्यावर योग्य प्रमाणात मिठ घालावे.

किसलेले आले आधी तेलात पडले तर ते जळून जाते त्यामुळे कांदा सोनेरी होत आला की त्यात हे किसून आलेले आले घालावे. कार्यकर्ते उत्साहाच्या भरात भरपुर आले किसून देण्याची शक्यता असते. तेव्हा आवश्यक तेव्हढेच घालावे आणि उरलेले 'चहात घालायला म्हणून थोडे हवे' असे सर्वाना ऐकु येईल असे पुटपुटत परत पाठवून द्यावे. मघाशी बाजूला ठेवलेला लसूणही आता तेलात घालावा. हे जिन्नास उशीरा घातल्याने जळत नाहीत आणि चव पण राहते.

आता हळद वगैरे घालावी, मसाले असल्यास ते घालावेत. आणि तिखट घालायला घ्यावे. तिखट मोठ्या चमच्यात घेऊन सगळ्यांना दाखवून विचारावे इतके पुरे का!? आधीच्या मिरच्या आणि हे तिखट पाहून " बापरे! येवढे नको नको" असे उद्गार आले की त्याच्या दिडपट तिखट कुणाला काही समजण्याच्या आत या तेलात टाकून द्यावे आणि भरपुर परतावे.

चूल चांगली ढणाढणा पेटलेली असते. काजळी लागलेली असते. ज्वाला सगळ्या बाजून येत असतात. आणि त्या धुराचा आणि एव्हाना तो सुंदर मसाल्याचा वास दरवळायला लागला असतो. दोन बियर पण झालेल्या असतात आणि चुरचुरत्या डोळ्यंमुळे कार्यकर्ते बेसावध असतात. या बेसावध क्षणी पटकन चुलीवरच्या भांड्याकडे बोट दाखवत " हे भांडे तू घासणार ना!? " असा करार सर्वांसमक्ष करून घ्यावा. एकुणच खमंग वासाच्या नशेमध्ये भुकेले कार्यकर्ते बेसावधपणे 'हो' म्हणतातच. "बघ बरं! नंतर तक्रार चालणार नाही" असे म्हणून खुंटा बळकट करावा.

चुलीवरचे मिश्राण आता चांगले झालेले असते. आता मोड आलेली मटकी यात घालावी. आणि रस्सा करण्यासाठी भरपुर प्रमाणात पाणी घालावे. एव्हाना मघाचा उत्साही कार्यकर्ता काहीच काम न मिळाल्याने जरा निराश व्हायला लागलेला असतो. त्याला आपला गॉगल द्यावा आणि "ही मिसळ जरा व्यवस्थित हलव" असे सांगावे आणि आपली जागा त्याला द्यावी. आपली बियर शोधून दोन घोट घ्यावेत.
- लेखक निनाद कट्यारे

आता पाव वगैरे योग्य प्रमाणात आहेत का याची चाचपणी करण्यासाठी, अरे! इतकेच पाव? पुरतील ना? असे जोरात विचारावे. पावाचा डाँगर डोळ्यासमोर असला तरी मिसळीच्या वासाने धुंद झालेले दोन जण गाडी काढून पाव आणायला सुसाट निघायच्या आधी परत एकदा अंदाज घ्यावा.

आता पर्यंत आधी झालेल्या दोन तीन बियर्स आणि लागलेली भूक याचा विचार करून किती पाव सर्व जण खाऊ शकतील याचा ताळा घ्यावा. आणि आता त्या गाडीवाल्या दोघांना आता पावा ऐवजी कोथिंबिर आणि लिंबु आणायला पिटाळावे.

आता मघाशी मिरच्या आणि तिखटाचे प्रमाण पाहून काही कार्यकर्ते खरोखरच डिप्रेशन मोड मध्ये जाण्याच्या काठावर आलेले असतात. ते ही धमाल मिसळ खाऊ शकणार नाहते, म्हणून त्यांच्यासाठी हळूच कानात "दही आणुन ठेवले आहे" असे सांगुन दही दाखवून ठेवावे म्हणजे यांचा मुड पण शेवट पर्यंत चांगला राहतो. टेबलावर भाजलेल्या बटाट्यांसाठी मिठ आणि मीरपूड दिसतील असे काढून ठेवावे.

एव्हाना वाफाळता रस्सा उकळलेला असतो. भुक आणि वास सहन होण्या पलिकडे पोहोचलेले असतात. कार्यकर्त्यांनी कोथिंबीर आणि लिंबु आणून चिरून घेतलेला असतो. आणि आपल्याला काही न विचारताच मिस्सळ सर्व्ह व्हायला सुरुवात होते. जोडीला खमंग भाजले गेलेले कांदे आणि बटाटे मिठ आणि मीरपुड घालून येतात. आता सजवून आपल्या हातात आलेल्या डिशचा शेवटचा फोटो इन्स्टाग्रामला अपलोड करावा आणि मित्र मंडळींसोबत हास्स हुस्स करत हास्य विनोदात मिसळीचा आस्वाद घ्यावा!

- निनाद

(फोटो टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. न जमल्यास 'वाट्टेल ते' या व्हत्सॅप समुहावर पाहायला मिळू शकतात.)

पाकक्रियाउपहाराचे पदार्थशाकाहारीमौजमजालेखविरंगुळा

प्रतिक्रिया

दुर्गविहारी's picture

9 Jan 2020 - 9:36 am | दुर्गविहारी

पाककृती आवडली ! पण तयार करणे परवडणारे नाही. :-)
असच चूलीवरचे आईस्क्रीम येऊ देत. ;-)

mrcoolguynice's picture

9 Jan 2020 - 10:15 am | mrcoolguynice

लेख छान, आवडला...

बाकी या प्रोसेस मधील एक मुख्य जिन्नस, तुम्ही कुठला वापरता ?
ब वा, हे, मि, किं फी, नॉ आ, ट्यु, का...

निनाद's picture

9 Jan 2020 - 10:41 am | निनाद

नॉ

टवाळ कार्टा's picture

13 Jan 2020 - 5:17 am | टवाळ कार्टा

नुकतीच स्वहस्ते मिसळपाव करण्यात आलेली आहे (बियरचे घोट घेता घेता....त्यामुळे पाकृ परफेक्त आहे अशी पोचपावती फाडण्यात येत आहे ;)

टक्कुमक्कुशोणू भावा, बर्याच दिवसांनी तुझी प्रतिक्रिया वाचायला मिळाली.

मुक्त विहारि's picture

13 Jan 2020 - 8:07 pm | मुक्त विहारि

तोंपासु

भारीये! लेखन खूप आवडले!

अवांतरः ते मधूनच "लेखक निनाद कट्यारे" असं का बरं लिहिलं असेल ब्वॉ?

महासंग्राम's picture

18 Jan 2020 - 3:49 pm | महासंग्राम

बियर पिल्यानंतर आठवण राहत नाही, मग असं नाव लिहावं लागतं मधून

तळीराम भट्टीवाले
मालक संत्रा मदिरा मंडळी