स्मृतीगंध-१२ "व्हेळ ते फ्रांकफुर्ट : एक प्रवास"

वामनसुत's picture
वामनसुत in जनातलं, मनातलं
23 Mar 2009 - 2:14 am

स्मृतीगंध-१
स्मृतीगंध-२
स्मृतीगंध-३
स्मृतीगंध-४
स्मृतीगंध-५
स्मृतीगंध-६
स्मृतीगंध-७
स्मृतीगंध-८
स्मृतीगंध-९
स्मृतीगंध-१०
स्मृतीगंध-११

मोठा मुलगा बी. कॉम झाल्यावर त्याने काँप्युटरचा कोर्स केला. शेजारच्या वसंत शेजवलकरांनी ऍप लॅबमध्ये त्यास नोकरीला लावले. १९८९ साली ही हृदयविकाराने आजारी पडली आणि तिला नोकरीची दगदग झेपणार नसल्याने वैद्यकीय कारणामुळे तिने स्वेच्छानिवृत्ती घेतली. ती. वहिनीचीही तब्येत खालावत चालली होती. तिची आजारपणे सुरू झाली होती. वर्षातून २,३ वेळा तरी तिला हास्पीटलाची वारी करावी लागत असे. ती गमतीने त्याला माहेरपणाला जाते असे म्हणत असे. अखेरीस ९१च्या डिसेंबरमध्ये दत्तजयंतीच्या दिवशी तिला देवाज्ञा झाली. आमचा मोठाच आधार हरपला.

१९९२ साली जमिनीचे भाव बरेच वाढले होते. घैसरची शेती करणेही दिवसेनदिवस जिकिरीचे होत होते आणि चांगली किंमत आल्यामुळे ती जमिन मी विकली. ती. आईही आता थकली होती.कोकणात एवढ्या लांब तिने एकटे राहणे गैरसोयीचे होऊ लागले म्हणून तिला इकडे आणली आणि कोकणातले नांदते घर बंद करावे लागले. मुलांच्या सुटीत मात्र आम्ही आवर्जून तेथे जात होतो. परंतु १०,१२ तासाचा प्रवास करुन व्हेळास जाणे,बंद घरात 'हाती धरुन झाडू..' सारी सफाई करणे यातच २,३ दिवस जात असत. मोठा नोकरीला,धाकटा इंजिनिअरींगला तर मुलगी कॉलेजात असल्याने एकाच वेळी सर्वांना सुटी मिळणेही अवघड होऊ लागले. तशातच वहिनी गेल्यामुळे घर बंद ठेवून जाणे अशक्य होऊ लागले. येथे जवळच कोठेतरी जमिन घेऊन लहानसे घर बांधावे म्हणजे सुटीत तेथे राहता येईल असा विचार करुन मी कर्जत, पनवेल,पळस्पे,तळेगाव अशा ठिकाणी जमिन वा घर घेण्यासाठी प्रयत्न करू लागलो पण यश येत नव्हते.

याच वर्षी धाकटा बी.ई. तर मुलगी बी.ए. झाली. पुढे तोही नोकरीसाठी प्रयत्न करु लागला तर मुलीने एम ए ला ऍडमिशन घेतली.९४ च्या ऑगस्ट मध्ये ती एमए होऊन तिला लेक्चररची नोकरी मिळाली ,नोकरीबरोबरच तिने पीएचडीचा अभ्यास सुरू केला तर धाकटा जे.के सोडून क्रॉम्टनग्रीव्हजमध्ये गेला. १९९४ च्या मे महिन्यात १९ तारखेला मोठ्या मुलाचा विवाह झाला आणि १९९५ मध्ये त्यास कन्यारत्न झाले. आईला पणती झाली. याच सुमारास आई अर्धांगाच्या झटक्याने आजारी पडली. १९९५ च्या मार्चपर्यंत म्हणजे वयाच्या ६२ वर्षापर्यंत व्होल्टासमध्ये मी नोकरी करत होतो. त्याचवर्षी श्रावणात आम्ही उभयंतानी व्रतांचे उद्यापन केले. मुले मार्गाला लागली होती तरी आता मला स्वतःला एंगेज ठेवण्यासाठी व्होल्टास सोडली तरी वकिल &सन्स मी चालूच ठेवली होती. विसाव्याचे दोन क्षण आता कुठे येत होते. १९९७च्या मार्च महिन्यात आम्ही दोघे,धाकटा मुलगा आणि मुलगी वैष्णोदेवीला जायचे ठरवले. हिमालयाचे परिसरात आम्ही प्रथमच जात होतो. तेथील निसर्गसौंदर्य डोळे भरुन पाहिले आणि देवीचे दर्शनही घेतले.

१९९८ च्या फेब्रुवारीत धाकट्या मुलाच्या हाताला मोठा अपघात झाला. मशिन दुरुस्त करत असताना एका कामगाराच्या चुकीने त्याचा हात मशिनखाली आला. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच त्याचा हात वाचला. हाताच्या ट्रीटमेंटसाठी त्यास ४,५ महिने रजा मिळाली होती. त्या रजेचा सदुपयोग करुन त्याने सॅप कनस्लटंटच्या सर्टीफिकेशनचा कोर्स पूर्ण केला. १९९९ च्या जूनमध्ये त्याचा विवाह झाला. पुढे क्रॉम्टन सोडून एका मोठ्या मल्टिनॅशनल कंपनीत तो जॉइन झाला. त्याच सुमारास मुलगी डॉक्टरेट झाली. इकडे ती. आईचे आजारपण जवळपास ५ वर्षे चालू होते. ती आता खूप थकली होती. ४ नातवंडांची लग्ने तिने पाहिली. पंतवंडांना मांडीवर खेळवले. तिच्या कृतार्थ जीवनाची २०००च्या फेब्रुवारीत अखेर झाली. त्याच्या अगोदर केवळ महिनाभरच आधी वत्सु पार्किन्सन्सच्या आजाराने स्वर्गवासी झाली. असा उनपावसाचा खेळ चालू होता. पुढे २००२च्या दिवाळीत आम्ही सर्व भावंडांनी काशी,प्रयाग,गया ही त्रिस्थळी यात्रा केली. नंतर गंगापूजन व गोदान केले. याहीवेळी आम्ही खरी सवत्स धेनु दान केली.

धाकट्याला कंपनीच्या कामासाठी परदेशी धाडले. त्याने नवी झेप घेण्याचा आनंद होताच पण त्याचवेळी तो दूरदेशी जाणार ह्याने मनात कालवाकालव होत होती. पण फोन आणि इंटरनेटच्या माध्यमातून आम्ही त्याच्या सतत संपर्कात होतो. निवांतक्षणी कधीतरी मुंबईबाहेर लहानसे घर घेण्याचा विचार परत डो़कं वर काढत होता. आमचे उपाध्ये श्री. नाखरे यांच्या ओळखीने निळुभाऊ बोडस आणि श्री.गणेश कानडे यांचेशी परिचय झाला. त्यांनी मला जांभूळपाडा आणि आसपासच्या गावातील काही जागा दाखवल्या. तोपर्यंत जांभूळपाडा म्हणजे १९८९च्या पुरात वाताहात झालेले गाव एवढेच माहिती होते. खोपोली पासून अगदी जवळ पालीमहडच्या रस्त्यावर वसलेले हे टुमदार गाव मला आवडले. आनंदाश्रम आणि स्नेहबंधन असे दोन वृध्दाश्रम ह्या गावात आहेत सिध्दलक्ष्मी गणपतीचे सुंदर देवस्थान आहे शिवाय मुंबईपासून २ तासाच्या अंतरावर आणि डोंबिवलीतून तर थेट एसटीची सोय आहे हे समजल्यावर तर अजूनच बरे वाटले. एस टी स्टँडपासून अगदी पाचच मिनिटे चालत अंतरावरची कानड्यांनी दाखवलेली जागा आम्हाला आवडली ती जागा गावठाणात येत असल्याने एन ए वगैरे करावयाची गरज नव्हती. २००५च्या एप्रिल महिन्यात आम्ही ती जागा विकत घेतली. धाकटा व सून परदेशी असल्याने अक्षय्य्यतृतीयेच्या दिवशी भूमिपूजन करून घर बांधायला सुरुवात करायची व वास्तूशांत ते दोघे इकडे आले की करायची असे ठरले. धाकट्या सुनेच्या आर्किटेक्ट बहिणीने घराचा प्लॅन काढून दिला. ग्रामपंचायतीतून तो पास करवून घेऊन पाण्याचे कनेक्शन देखील घेतले आणि घराचे बांधकामास सुरुवात केली. माझ्या जांभूळपाड्याला अनेक खेपा होऊ लागल्या.जून उजाडला तरी आम्ही बांधकाम चालूच ठेवले होते. जूनच्या १४ तारखेला मोठ्या मुलाला पुत्ररत्न झाले. आमची सौ. रात्रंदिवस बाळालाच घेऊन बसलेली असे. १२ व्या दिवशी थाटात बारसे केले.

दुसर्‍याच दिवशी सौ.ला थोडा ताप आला. बारशाची दगदग असेल असे वाटून तिने विश्रांती घेतली. प्रभाकराच्या दुसर्‍या मुलाचे लग्न ग्वाल्हेरला होते. आम्ही सर्व त्याच गडबडीत होतो पण सौ.ला एक दिवस एकदम चक्कर आली . मुले लग्नासाठी ग्व्हालेरला गेली पण मुलगी मात्र घरीच थांबली होती. डॉक्टरांकडे नेऊन सर्व तपासण्या करण्याचे ठरले. आपल्या पाटल्याबांगड्या तिने काढून मजजवळ दिल्या आणि माझ्या काळजात चर्र झाले. मी काही न बोलता त्या कपाटात ठेवल्या. स्वतः जिना उतरुन ती रिक्षात बसली आणि तिला दवाखान्यात नेले. रात्री तिची शुगर अचानक एकदम डाऊन झाली. सलाइन लावल्यावर ठीक झाली. धाकट्या मुलाचा फोन आल्यावर बरी होऊन पुढच्या महिन्यात त्याच्याकडे येणार असल्याचे सांगितले. तसेच पासपोर्ट हातात आल्याचेही सांगितले. प्रभाकराकडचे लग्न पार पडले व वर्‍हाड डोंबिवलीला परत आले. एक दिवस बरा गेला आणि तीची शुगर २००च्या वर गेली. तिची शुगर ४५ पासून ३०० पर्यंत झोके घेऊ लागली. डॉक्टरांचे प्रयत्न चालू होते. तिला आयसीसीयूत हलवले.सारेजण येऊन तिला भेटून गेले. धाकटा मुलगा आणि सुनेला बोलावून घेतले. दुसर्‍याच दिवशी तातडीने ती दोघे आली. जणू त्या दोघांना भेटण्यासाठीच ती थांबल्यासारखी होती. तिला लगेचच ४० एक मिनिटातच व्हेंटिलेटरवर घ्यावे लागले आणि दुसर्‍याच दिवशी सायंकाळी तिची प्राणज्योत मालवली. जांभूळपाड्याचे घर आम्ही पूर्ण केले. पण ती काही ते पाहू शकली नाही. आज तिन्ही मुले चांगल्या नोकर्‍यांमध्ये उच्चपदावर आहेत पण हे सारे वैभव पहायला आज सौ. नाही ही खंत आहे. धाकट्या मुलाकडे परदेशात जायचे सौ.चे स्वप्न अपुरेच राहिले म्हणून मी त्याच्याकडे त्याच वर्षी गेलो. व्हेळसारख्या नकाशावरही नसलेल्या खेडेगावातून येऊन युरोपवारी करण्यापर्यंत मजल कशी गेली याचे आज विचार करता नवल वाटते. हे आईवडिल आणि वहिनीच्या आशीर्वादांचेच संचित.

दोन्ही मुलगे आणि मुलगी तसेच नातीने सार्‍या आठवणी लिहून काढण्याचा आग्रहच धरला पण लिहायला मुहुर्त लागत नव्हता. पण ह्याखेपेला युरोपात आल्यावर मात्र चार निवांत क्षण मिळाले आणि त्या लिहून काढण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता शाळा सुटल्यानंतर आईला लिहिलेल्या पत्रांव्यतिरिक्त माझा लेखनसराव शून्य. तसेच माझ्या जीवनाचा आलेख पाहता त्यात नाट्यमय असे काहीच नाही. चारचौघांसारखेच सर्वसामान्य जीवन! असे असतानाही आपण देत असलेले भरघोस प्रतिसादच मला पुढील लेखनास उद्युक्त करत होते. त्यामुळेच आजवरचा व्हेळ ते फ्रांकफुर्ट हा प्रवास शब्दबध्द करणे शक्य झाले आणि इंटरनेटच्या माध्यमातून हे सर्व लिहिताना धाकट्या सुनेचे ( मिपाकर स्वाती दिनेश )टंकलेखन व लेखांच्या जुळणीकरता सहाय्य घेतले आणि हा स्मृतीगंध आपणासमोर आणला.

परत पुन्हा असेच कधीतरी स्मृतींचे कण घेऊन आपल्या भेटीला येईन. तो पर्यंत आपले लिखाण वाचून प्रतिसाद देण्याचा मानस आहे. खरडवही व पोस्टहापीसची सुविधा सुरु झाल्यावर आलेल्या खरडींना जरूर उत्तरे देईन. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद !!!

राहणीअनुभव

प्रतिक्रिया

स्वाती दिनेश's picture

23 Mar 2009 - 2:18 am | स्वाती दिनेश

संध्याकाळी गप्पा मारताना नाना (वामनसुत)त्यांच्या लहानपणच्या आठवणी सांगत होते. त्यांना आम्ही त्या लिहून काढण्याचा आग्रह धरला. २,३ दिवसांनी त्यांनी लिहायला सुरुवात केली. ४,५ पाने लिहून झाल्यावर मला वाचायला दिली. मी त्यांना मिसळपाववर लेखांच्या स्वरुपात प्रकाशित करु असे सांगितले तोपर्यंत त्यांना मिपा किंबहुना मराठी संस्थळे आणि त्यावर लिहिले जाणारे लेखन यांची माहिती नव्हती. ते आपलं मला नाउमेद करायचं नाही म्हणून म्हणाले कर तुला हवे तर प्रकाशित. त्यांच्या नावचा वेगळा आयडी काढून मुद्दामहूनच त्यांची आयडेंटीटी उघड न करता मी 'व्हेळातले दिवस'टंकले.पहिल्याच लेखाला आलेले प्रतिसाद पाहून त्यांना आश्चर्य वाटले आणि हळूहळू त्यांची ह्या माध्यमाशी आणि मिपाशीही ओळख होत गेली आणि आलेल्या प्रतिसादांनी हुरुप येऊन ते पुढचे भाग लिहित गेले,आपल्या लेखाचे प्रतिसाद किती झाले आहेत? ह्याची चौकशी माझ्याकडे करु लागले आणि मग आम्ही रोज १ भाग प्रकाशित करुन स्मृतिगंध ते जर्मनीत असेपर्यंत पूर्ण करण्याचे ठरवले. जशी आपणा सर्वांना स्मृतीगंध वाचण्याची चटक लागली होती तशी त्यांना प्रतिसाद पाहण्याची ,
१५ दिवस त्यांच्याबरोबर मीही टाइममशिनमध्ये बसून ७०,७५ वर्षे मागे गेले. स्मृतीगंध पूर्ण होताना पाहणे हा माझ्यासाठीही एक आनंददायी अनुभव होता, आपणा सर्वांच्या प्रेमाने, कौतुकाने आम्ही भारावून गेलो आहोत,असाच लोभ असू द्या.
स्वाती व दिनेश

प्रकाश घाटपांडे's picture

23 Mar 2009 - 10:33 am | प्रकाश घाटपांडे

१५ दिवस त्यांच्याबरोबर मीही टाइममशिनमध्ये बसून ७०,७५ वर्षे मागे गेले. स्मृतीगंध पूर्ण होताना पाहणे हा माझ्यासाठीही एक आनंददायी अनुभव होता, आपणा सर्वांच्या प्रेमाने, कौतुकाने आम्ही भारावून गेलो

स्वातीताई आपण नानांना लिहित केलत कारण हा अनुभव आपल्या मिपाकरांनीही शेअर करावा अशीच आपली इच्छा असणार! आम्हालाही खुप आनंददायी वाटल. स्मृतीगंध असाच दरवळत राहो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

श्रावण मोडक's picture

23 Mar 2009 - 12:21 pm | श्रावण मोडक

एक मोठे काम केले आहेत तुम्ही. ते अर्धवट ठेवू नका. अकरा भागांमध्ये (तेही इंटरनेटच्या हिशेबातले) एकूण एका पिढीचा कालखंड बसवण्याची कसरत काय असते ती ठाऊक आहे.
हे सारे लेखन वाचनीय जरूर झाले आहे. तसे मी वेळोवेळी लिहिलेही आहे. पण त्याहीपलीकडे हे लेखन अपूर्णतेची हुरहूर लावून जाते. ते त्याचे यश जरूर आहे. पण अपूर्णतादेखील इतकीही नको. आणखी काही स्मृतिचित्रे असतील. नेमके प्रसंग असतील, घटना असतील. किंवा कदाचित आत्ताच्या लेखनातही अशा घटना, प्रसंग दृष्टीतक्षेप टाकल्याच्या स्वरूपात आली असतील. त्यांचा विस्तार होऊ शकतो. जरूर विचार करा.
चांगले लेखन वाचायला दिल्याबद्दल कृतज्ञ.

अन्वय's picture

23 Mar 2009 - 6:50 pm | अन्वय

नाना, सर्व लेख वाचले. माझ्या वडिलांच्या आयुष्याचा पट डोळ्यासमोर आला. आयुष्यभर वणवण करून "संध्याकाळी' कृतार्थ जीवन जगत आहात, हे वाचून अत्यानंद झाला. आपण खरेच खडतर आयुष्य जगला आहात. मात्र, हार न मानता झुंजत राहिलात म्हणूनच जिंकलात. हे लेख म्हणजे केवळ तुमच्या आयुष्याची माहिती नाही, तर माझ्यासारख्या असंख्य तरुणांना कष्टाला पर्याय नाही, हे ठासून सांगणारे पाठ आहेत, असे वाटते. आमची पिढी बरीच सुखावह आहे. तुमच्यासारखे कष्ट, दोन-दोन, तीन-तीन नोकऱ्या कराव्या लागत नाहीत. किंबहुना केल्यास चांगलेच; पण कुणाला त्याची गरज वाटतेच असे नाही. असो. लिखाण खूप ओघवते आहे. तुमच्या आयुष्यात आणखी काही नाट्यपूर्ण प्रसंग घडले असतील. ते एकत्रित बांधून त्याचे आत्मचरित्रपर पुस्तक करावे, असे वाटते.
यापुढेही असेच कृतार्थ जीवन जगा. आपल्याला दीर्घायुष्य लाभो, ही ईश्‍वरचरणी प्रार्थना!

मयुरा गुप्ते's picture

23 Mar 2009 - 2:39 am | मयुरा गुप्ते

शब्दच नाहीत...काय लिहु आणि काय प्रतिसाद देऊ.... खुप खुप सुंदर.

विकास's picture

23 Mar 2009 - 2:49 am | विकास

फारच छान! असेच आम्हीपण आमच्या वडिलांना लिहीण्यासाठी उद्युक्त केले आहे.

आधीच्या पिढ्यांनी वास्तवीक असे नक्की लिहून ठेवावे. तो केवळ कुटूंबासाठीच नाहीतर काही अंशी समाजासाठी साठा आहे. कारण त्यातून अनेक गोष्टी, संस्कार, संस्कृती, त्यातील बदल आपल्याला कळू शकतात. विशेष करून स्वातंत्र्याच्या आधी आणि जवळपास जन्माला आलेल्या पिढीने बरेच बदल पाहीले आहेत: बैलगाडीपासून ते विमानापर्यंत, जगाशी नाते नसलेल्या खेड्यापाड्यापासून ते शहर-परदेशापर्यंत, चौकात जाऊन गांधीहत्येनंतरचे भाषण एकाच रेडीओवर सगळ्या गावाने ऐकण्यापासून ते स्वतःच्या बेडरूममधे मुलांकडून आंतर्राष्ट्रीय फोनवरून लॅपटॉप आणि इंटरनेट वापरण्याच्या सुचना घेई पर्यंत, एकत्र कुटूंबापासून एकाकीपणा अनुभवेपर्यंत आणि अर्थातच स्वातंत्र्याच्या पहाटे आदर्शांच्या स्वप्नांपासून ते अनेक अर्थाने त्या स्वप्नभंगापर्यंत...

प्राजु's picture

23 Mar 2009 - 3:00 am | प्राजु

प्रतिसाद खूप आवडला तुमचा.
खरंच आधीच्या पिढ्यांनी हे लिहून ठेवायलाच हवं.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्राजु's picture

23 Mar 2009 - 2:50 am | प्राजु

काय बोलू आणखी??
स्वातीताई, वामनसूत तुझे सासरे असणार याची साधरण कल्पना आली होती. पण काही बोललो नाही कोणालाच.
असो... लेखन समाप्त नको.. चालू राहुदे.
काकांना... धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

नंदन's picture

23 Mar 2009 - 3:13 am | नंदन

तुमचे लेखन, विशेषतः हा शेवटचा भाग वाचताना सारखं 'जाहल्या काही चुका अन् सूर काही राहिले, तू दिलेले गीत माझे आवडीने गायिले' आठवत होतं. तीच नम्र कृतार्थतेची भावना. लेखमाला संपली म्हणून एखादी सुरेल मैफल संपल्यासारखं थोडं वाईट वाटतं आहे, पण हे लेख वाचायला मिळाले याचा आनंदही मोठा आहे. आमच्यापर्यंत ही लेखमाला पोचवल्याबद्दल स्वातीताईचे विशेष आभार.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

लवंगी's picture

23 Mar 2009 - 6:32 am | लवंगी

ही लेखमाला कधीच संपू नये असे वाटत होते.

भाग्यश्री's picture

23 Mar 2009 - 6:42 am | भाग्यश्री

सहमत..
मी प्रत्येक भागाला प्रतिसाद दिला नाही परंतू उत्सुकता लागून राहीली कायम.. आता काय होणार.. ?
लेखमाला संपू नये असेच वाटले..

पिवळा डांबिस's picture

23 Mar 2009 - 3:38 am | पिवळा डांबिस

जणू प्रभातचा एखादा सुंदर चित्रपट पहात आहोत असे वाटले....
लेखकाचे हार्दिक अभिनंदन!!

आता लिहायला सुरवात केली आहे तर ते या मालिकेनंतर खंडित होऊ नये ही प्रार्थना!!!
पुढील लेखनासाठीही शुभेच्छा!!

केशवसुमार's picture

23 Mar 2009 - 3:43 am | केशवसुमार

ति.नाना, अप्रतिम लेखमाला.. =D>
जवळ जवळ ५० वर्षाच्या काळखंड अगदी चित्रमय उभा केलात...नतमस्तक..
फ्रांकफुर्ट मध्ये तुम्हाला २-३ वेळा भेटलो पण पत्ता लागू दिला नाहीत.. आणि स्वाती आणि दिनेश त्यांच्याकडे मी नंतर बघतो X( ....
'व्हेळ' हे नाव दिनेश कडून ऐकल होते पण लक्षात नाही आले ~X( .... आजच्या लेखात "फ्रांकफुर्ट''आले तेव्हा जरा शंका आली.. :W 'जे.के सोडून क्रॉम्टनग्रीव्हजमध्ये' वाचल्यावर खात्रीच झाली.. #o L)
अतिशय अप्रतिम लेखमाला हे परत परत सांगावेसे वाटते.. =D> =D> =D> आणि आपल्याला भेटता आले आणि आपल्याशी गप्पा मारता आल्या या बद्दल मी स्वत।ला नशिबवान समजतो..
(नशिबवान)केशवसुमार <:P

बाकी स्वाती आणी दिनेश.. आपण पाळलेली गोपनियता धन्य आहे!!
अवांतरः ति.नाना, आता मला खायला मिळालेल्या तुमच्या हातच्या लोणच, भरल्या मिरच्या आणि मसाल्याची आमटी या पाककॄती सर्व मिपाकरांना निदान वाचायला द्या.... सर्व मिपाकरांना टूकटूक.. :P
(पुन्हा नशिबवान)केशवसुमार <:P

सुक्या's picture

23 Mar 2009 - 4:11 am | सुक्या

अगदी भारावुन गेलो. काय लिहु तेच सुचत नाही. अगदी पहिल्या भागापासुन या लेखमालिकेने वेड लावलं होतं. अगदी साध्या सोप्या ओघवत्या शैलीत आपल्या जिवनाचा पट उलगडुन दाखवला. लिखाणातही तोच साधेपणा. अगदी सुरेख. लोकांना वेड लावायला काहीतरी भव्यदिव्यच लागते असे मुळीच नाही.
तुमचे अनुभवाचे बोल अजुन येउद्यात.

(नतमस्तक) सुक्या (बोंबील)

मदनबाण's picture

23 Mar 2009 - 4:15 am | मदनबाण

---
मदनबाण.....

"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

समिधा's picture

23 Mar 2009 - 4:52 am | समिधा

सगळे भाग खरच अप्रतिम्,तुमचे लेखन थांबु नये असे वाटते.
आजुन लिहीत रहा. =D>

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

घाटावरचे भट's picture

23 Mar 2009 - 5:17 am | घाटावरचे भट

मला काही इथे आलेल्या भारी प्रतिसादांसारखं लिहिता येत नाही, तस्मात् सध्या '+१' एवढेच म्हणतो.

अवलिया's picture

23 Mar 2009 - 8:56 am | अवलिया

हेच म्हणतो.

--अवलिया

शितल's picture

23 Mar 2009 - 6:01 am | शितल

एवढेच केवळ शब्द आहेत आपल्या लेखमालेला.
तुम्हाला आमचा नमस्कार. :)
स्वाती ताई तु ही ग्रेट आहेस. :)
मिपावर स्वातीताईंच्या रेसिपी आणि प्रवासवर्णनांनी मिपाकरांना आपले केले आणी तुम्ही तुमचा जीवन वृत्तांत साध्या सोप्या भाषेत आम्हाला सांगितलात आणि आम्हा मिपाकरांशी असलेली आपुलकीची नाळ अजुन घट्ट केलीत.
तुमच्या ह्या सुंदर लेखमालेसाठी तुम्हाला धन्यवाद . :)

सहज's picture

23 Mar 2009 - 7:01 am | सहज

केवळ अप्रतिम!

उत्कृष्ट लिखाण. लिखाणातुन जवळचे वाटत असलेले नाते प्रत्यक्षातही तितकेच जवळचे निघाले आम्ही मिपाकर खरोखर भाग्यवान आहोत.

छोटा डॉन's picture

23 Mar 2009 - 7:09 am | छोटा डॉन

सहजरावांशी शब्दशः सहमत आहे ...

>>उत्कृष्ट लिखाण. लिखाणातुन जवळचे वाटत असलेले नाते प्रत्यक्षातही तितकेच जवळचे निघाले आम्ही मिपाकर खरोखर >>भाग्यवान आहोत.
+++++++++++++++१, हेच म्हणतो ...

आंतरजालावरची एक अत्यंत नितांतसुंदर लेखमाला म्हनुन मी ह्याचा अवश्य उल्लेख करेन ...
खुपच रोचक आणि गतीशील लिखाण होते, जणुकाही आम्ही एखाद्या निवांत संध्याकाळी जेवण झाल्यावर "आजोबांच्या गोष्टी" ऐकत आहोत असेच वाटत होते.
महत्वाचे म्हणजे काळ इतका जुना असुनसुद्ध त्यातले डिटेल्स आहे तसे अगदी तारखेनिशी लिहल्याने फारच "क्लास" झाले आहे लिखाण ...!

बाकी आख्ख्या लेखमालेतुन कधीच स्वातीताई आणि दिनेशदादा ह्यांचा चुकुनसुद्धा "उल्लेख" आला नाही हे लिखाणाचे यश म्हणावे लागेल, अगदी शेवटच्या भागात हा सुखद धक्का दिलात ....

आजोबा, आता इथे थंबु नकात ....
ही लेखमाला संपली तर संपुद्यात, अजुन दुसरे असेच काहीतरी हाती घ्या ...
आम्हाला तुमचे लिखाण आवडते, अजुन असेच येऊद्यात ...

------
( वामनसुतांचा फॅन ) छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

दशानन's picture

23 Mar 2009 - 9:00 am | दशानन

आता थांबू नका काका !

खुप सुंदर !

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Mar 2009 - 11:05 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आजोबा, आजपर्यंत रोज व्यसन लागल्यासारखंच तुमचं लिखाण, नव्हे कथन, वाचत होते. आता रूखरूख लागली आहे की रोज तुमचं लिखाण वाचता येणार नाही. पण तुम्ही आम्हा नातवंड, पोरा-सोरांना नाऊमेद करणार नाहीत अशी आशा आहे. तुमचं आणखी जास्त लिखाण वाचायला आवडेल.

अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

परिकथेतील राजकुमार's picture

23 Mar 2009 - 7:36 pm | परिकथेतील राजकुमार

सहमत.
सगळे भाग वाचुन मगच प्रतिक्रीया देणार होतो, पण येव्हडे सुंदर सुंदर प्रतिसाद पाहुन काहि लिहायचा धिर होइना.

"आंतरजालावरची एक अत्यंत नितांतसुंदर लेखमाला म्हनुन मी ह्याचा अवश्य उल्लेख करेन ..." ह्या वाक्याशी पुर्णपणे सहमत आणी ह्या लेखमालेचा वाचक व्हायला मिळाले हे माझे भाग्य :)

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

घाशीराम कोतवाल १.२'s picture

24 Mar 2009 - 11:20 am | घाशीराम कोतवाल १.२

बाकी आख्ख्या लेखमालेतुन कधीच स्वातीताई आणि दिनेशदादा ह्यांचा चुकुनसुद्धा "उल्लेख" आला नाही हे लिखाणाचे यश म्हणावे लागेल, अगदी शेवटच्या भागात हा सुखद धक्का दिलात ....

आजोबा, आता इथे थंबु नकात ....
ही लेखमाला संपली तर संपुद्यात, अजुन दुसरे असेच काहीतरी हाती घ्या ...
आम्हाला तुमचे लिखाण आवडते, अजुन असेच येऊद्यात ...

डान्याशी १०००१% सहमत

(वामनसुत आजोबांच्या लिखाणाचा पंखा )घाशीराम कोतवाल
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

रेवती's picture

23 Mar 2009 - 7:40 am | रेवती

फारच सुंदर वर्णन.... आयुष्याच्या प्रवासाचे.
आपण भरपूर कष्ट केलेत तरी इतकं साधं, सुंदर वर्णन..... कुठेही कटुता नाही.
खरंतर प्रतिक्रियेसाठी शब्द जुळवावे लागताहेत.

रेवती

चित्रा's picture

23 Mar 2009 - 4:24 pm | चित्रा

कुठेही कटुता नाही.

कौतुक वाटते. ही लेखमाला संपली तरी लिहायचे सोडू नका. हे लेख आमच्यापर्यंत आणण्याबद्दल स्वातीचेही अनेक आभार.

काय प्रतिसाद देऊ असं झालंय.शब्दच उरले नाहीत.
स्वाती ताई यांचे आभार.
वामनसुत यांना साष्टांग दंडवत ___/\___
आपण आपल्या अशाच लेखांनी मिपाला आणि मिपाकरांना समृद्ध करावे. =D> =D> =D>

प्रमोद देव's picture

23 Mar 2009 - 8:13 am | प्रमोद देव

नारायणराव, आपली मैफल मस्त रंगली. तिची समाप्तिही आपण तितक्याच समर्थ भैरवीने केलीत.
पण आता इथेच थांबू नका. अशाच वेगवेगळ्या मैफिली सादर करत चला.
पुढील लिखाणासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

यशोधरा's picture

23 Mar 2009 - 8:46 am | यशोधरा

अतिशय सुरेख अशी लेखमाला होती ही. सगळे भाग संपल्यावरच प्रतिसाद देऊ म्हणून थांबले होते, पण ही लेखमाला सुरुच रहावी असे वाटत होते, हे मात्र खरे. अतिशय साधे सुधे पण मनापासून केलेले प्रांजळ लिखाण खूप भावले. अजूनही काही जरुर लिहा. वाचायला खूप आवडेल.

स्वातीताई , तू सगळे भाग टंकून आमच्यापर्यंत पोहोचवलेस याबद्दल तुझेही खूप खूप आभार.

सखी's picture

23 Mar 2009 - 6:54 pm | सखी

अगदी असेच म्हणणार होते. अजूनही काही जरुर लिहा. वाचायला खूप आवडेल.
शेवटच्या भागातील रहस्यभेद खासच!

llपुण्याचे पेशवेll's picture

23 Mar 2009 - 9:21 am | llपुण्याचे पेशवेll

सुंदर लेखमाला. आपल्या या संपूर्ण लेखमालेला हा माझा एकमेव प्रतिसाद. आपले एकामागोमाग एक नोकर्‍या, व्यवसाय बदलणे आणि प्रत्येक नवीन व्यवसायात यश संपादन करणे हे माझ्यासारख्या तरुणाला एक आदर्श आहे. आपल्यासारखे सरळमार्गी, उद्यमी व्यक्तीमत्व माझ्यासाठी कायमच प्रेरणादायी आहे.
आपल्याला लिहीते केल्याबद्दल स्वातीताईंचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.
(प्रभावित)
पुण्याचे पेशवे

संजय अभ्यंकर's picture

23 Mar 2009 - 9:24 am | संजय अभ्यंकर

एका कर्तृत्ववान व्यक्तीच्या जीवनाचा प्रवास, त्याच व्यक्तीच्या शब्दात वाचून धन्य झालो.
स्वतःच्या जीवना बद्दल इतक्या तटस्थपणे इतके उत्तम लेखन केलेत.
फार आवडले!

श्रीकृष्ण सामंत व आपण अशी बुजुर्ग माणसे मिपावर वावरत रहावीत.

धन्यवाद!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

दिपक's picture

23 Mar 2009 - 10:03 am | दिपक

एका कर्तृत्ववान व्यक्तीच्या जीवनाचा प्रवास, त्याच व्यक्तीच्या शब्दात वाचून धन्य झालो.
हे लिखाण आम्हा सर्व युवा वाचकांना मार्गदर्शक ठरेल. धन्यवाद :)

अतिशय सुंदर लेखन. स्वातीताई तुमचे आभार मानाचे तेवढे थोडेच. अप्रतिम कथन. लेखमाला कधीच संपु नये असे वाटत होते. वामनसुत आम्ही आपले पंखे.

(वामनसुतांचा पुढील लिखाणांच्या प्रतिक्षेत)दिपक.

जृंभणश्वान's picture

23 Mar 2009 - 10:21 am | जृंभणश्वान

फार छान होती लेखमाला

मराठीप्रेमी's picture

23 Mar 2009 - 10:37 am | मराठीप्रेमी

केवळ अप्रतिम !

मैत्र's picture

23 Mar 2009 - 10:49 am | मैत्र

नंदनने म्हटल्या प्रमाणे :
लेखमाला संपली म्हणून एखादी सुरेल मैफल संपल्यासारखं थोडं वाईट वाटतं आहे, पण हे लेख वाचायला मिळाले याचा आनंदही मोठा आहे. आमच्यापर्यंत ही लेखमाला पोचवल्याबद्दल स्वातीताईचे विशेष आभार. स्वाती ताइने लिहिल्या प्रमाणे टाइम मशीन मधून ७०-७५ वर्ष मागे नेलं सगळ्या मिपाकरांना.

ही पूर्ण लेखमाला, आजोबांचा जीवन प्रवास आणि सगळ्या गोष्टी विलक्षण सहजतेने लिहिणं.
काय प्रतिसाद देणार यावर. खरं तर रोज लहान सहान गोष्टींनी मनाला - स्वतःला आणि इतरांना खूप त्रास करुन घेतो आम्ही आत्ताच्या पिढीतले सर्व. तुमच्या दशांशाने सुद्धा कष्ट, त्रास किंवा अडचणी आल्या नसतील. तुमच्या कृतार्थ आयुष्याकडे पाहून आमचे त्रास आणि आकांक्षा फार लहान वाटायला लागल्या. काही निराळाच झटका देऊन गेला हा अनुभव.

तुमचं लिहिणं तर अप्रतिम आहेच. पण त्यातली सहजता आणि दिसून येणारी एक शांत विचारधारणा ही अत्यंत परिणामकारक आहे.
सगळी लेख माला इतकी भावली मिपाकरांना याचं महत्त्वाचं कारण त्यातून दिसणारं तुमचं व्यक्तिमत्व काही विशेष आहे, वेगळं आहे.
सर्व विचारांचे, लिखाणाचे इतके 'क्लिशे' तयार झालेले असताना हा एक सुखद धक्काच होता.

आजोबा - एकच विनंती. आता काही तुम्हाला योग्य वाटेल, आवडेल अशा गोष्टींवर जास्त तपशील वार अजून लिहा.
इतकी हुरहुर चांगली नव्हे.
तुम्हाला आम्ही धन्यवाद काय देणार ... इथल्या किती तरी नातवंडांना खूप आनंद दिलात तुम्ही...

स्मिता श्रीपाद's picture

23 Mar 2009 - 10:57 am | स्मिता श्रीपाद

सगळे भाग संपले की शेवटच्या भागातच प्रतिक्रिया द्यायची असे ठरवले होते...
अप्रतिम लेखमाला...
इतक्या प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन तुम्ही आयुष्याच्या या टप्प्यावर पोचला आहात..हा सगळा प्रवास आम्हा सर्वांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे....
तुमची लेखणी अशीच चालु राहुदेत...

इंटरनेटच्या माध्यमातून हे सर्व लिहिताना धाकट्या सुनेचे ( मिपाकर स्वाती दिनेश )टंकलेखन व लेखांच्या जुळणीकरता सहाय्य घेतले आणि हा स्मृतीगंध आपणासमोर आणला.

हा रहस्यभेद खासच... :-)
हॅटस ऑफ टु यु ... आणि स्वातीताई :-)

-स्मिता श्रीपाद.

विसोबा खेचर's picture

23 Mar 2009 - 11:00 am | विसोबा खेचर

नानासाहेब,

मिपा हे संस्थळ काढून किती कृतकृत्य वाटलं हे शब्दात सांगू शकत नाही. आपल्यासारख्या वडिलधार्‍यांचा मिपावर असाच नेहमी कृपाशीर्वाद रहावा एवढीच नम्र विनंती...

मिपावरील आपल्या लेखनाची ही एक टर्म संपली असं म्हणायला हरकत नाही. परंतु यापुढेही आपले असेच स्वान्तसुखाय लेखन मिपावर सुरू रहावे एवढीच विनंती..

इथूनच नमस्कार करतो..

स्वातीचेही आभार...

आपला,
(कृतकृत्य) तात्या.

अन्वय's picture

23 Mar 2009 - 6:58 pm | अन्वय

तात्या, ग्रेट!

विसोबा खेचर's picture

23 Mar 2009 - 11:03 am | विसोबा खेचर

खरडवही व पोस्टहापीसची सुविधा सुरु झाल्यावर आलेल्या खरडींना जरूर उत्तरे देईन.

नानासाहेब, ही सुविधा आपल्याकरता सुरू करायची राहिली त्याबद्दल क्षमस्व. आता ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. तरीही काही अडचण आल्यास कृपया मला अवश्य कळवा.

तात्या.

बामनाचं पोर's picture

23 Mar 2009 - 11:57 am | बामनाचं पोर

फारच सुरेख.. आयुष्य म्हणजे आजवरच्या श्वासांची बेरीज न्हवे तर ; श्वास विसरयला लावणारया , रोखून धरलेल्या क्षणांची बेरीज..

आपल्या आयुष्यातील अशा क्षणांच्या स्मृती व त्यांचा स्मृतीगंध फारच भावला... पुढील लेखनासाठी शुभेच्छा

जाता जाता इतकेच म्हणेन..

भले बुरे जे घडून गेले,
विसरुन जाऊ सारे क्षणभर
जरा विसावू या वळणावर..

कसे कोठूनी येतो आपण
कसे नकळता जातो गुंतून
उगाच हसतो, उगाच रुसतो
क्षणात आतूर, क्षणात कातर
जरा विसावू या वळणावर..
.....

सुप्रिया's picture

23 Mar 2009 - 1:28 pm | सुप्रिया

सुरेख लेखमाला ! !
संपली म्हणून खूप वाईट वाटले.
तुम्हाला आणि स्वातीताईंना अनेकानेक धन्यवाद.

(देहरुप गावाहून रामरुप गावाच्या प्रवासात रामनाम हीच उत्तम शिदोरी होय.)

बापु देवकर's picture

23 Mar 2009 - 1:51 pm | बापु देवकर

आजोबा...
आपल्या लेखातील साधेपणा खुप आवडला...

कुंदन's picture

23 Mar 2009 - 2:33 pm | कुंदन

अप्रतिम लेखमाला....

विसुनाना's picture

23 Mar 2009 - 3:02 pm | विसुनाना

लेखमाला संक्षिप्त झाल्याने चुटपुट लागली आहे.तरीही आपले अनुभव नव्या पिढीसमोर मांडल्याबद्दल आभार.
इतर सर्व प्रतिसादकांप्रमाणेच मलाही लेखकाच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटना वेगळ्या काढून अधिक विस्तारपूर्ण लिहिल्यास वाचायला खूप आवडेल.
(लेखकाशी जवळचे नाते असूनही त्रयस्थ दृष्टीकोन बाळगून टंकन केल्याबद्दल टंकलेखिकेचे कौतुक आणि आभार)

श्रावण मोडक's picture

23 Mar 2009 - 3:35 pm | श्रावण मोडक

लेखकाशी जवळचे नाते असूनही त्रयस्थ दृष्टीकोन बाळगून टंकन केल्याबद्दल टंकलेखिकेचे कौतुक आणि आभार
सहमत.

मन्जिरि's picture

23 Mar 2009 - 4:05 pm | मन्जिरि

अप्रतिम लिहिल आहे रोज वाचायचि सवय झालिय .किति विविधता आहे,एकाच आयुश्यात.म्हटल तर सरळ ,पण खाचखळग्यानि भरलेल.स्वातिचे॑ हि अभिनन्दन .रोज पाटपूर्‍रावा केल्याबद्द्ल्.पुन्हा एकदा अभिनन्दन

अभिरत भिरभि-या's picture

23 Mar 2009 - 4:20 pm | अभिरत भिरभि-या

साध्या ओघवत्या शैलीमुळे गेले दहा बारा दिवस रोज हपिसात आल्यावर पहिले ताजा भाग आला का हे बघत असे.
तुम्ही आणखी लिहावे असे वाटते.
लेखनिकेचे खास आभार !

लिखाळ's picture

23 Mar 2009 - 4:24 pm | लिखाळ

फार सुंदर लेखमाला झाली. या आधीचे तीन भाग अजून वाचायचे राहिले आहेत, ते लवकरच वाचतो. शेवटचा भाग उत्सुकतेने आधीच वाचला.
वरील प्रतिसादांतील सर्वांशी सहमत आहे. विशेषकरुन नंदन, विकास आणि सहज यांच्या प्रतिसादाला अजूनच सहमत :)
सहज म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही जवळच्या ओळखीचे निघाल्याचे पाहून सुखद धक्का बसला. आनंद झाला.

हे आईवडिल आणि वहिनीच्या आशीर्वादांचेच संचित.

ज्यांच्याप्रति आयुष्यभर कृतज्ञ राहावे अशी माणसे आयुष्यात लाभणे ही सुद्धा श्रीमंतीच आहे असे मला वाटते.

प्रत्येक भाग वाचनीय होता आणि यापुढे सुद्धा आपले लेखन वाचायला आवडेल. आम्ही सर्व वाट पाहू.

स्वातीताईने मिपावर हे सर्व लेखन आणले यासाठी तिचे सुद्धा आभार.
-- लिखाळ.

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Mar 2009 - 4:37 pm | बिपिन कार्यकर्ते

काका, अतिशय मजा आली वाचताना. तुमच्या जिद्दीचे, मेहनतीचे आणि नाविन्यपूर्ण विचार करण्याच्या वृत्तीचे खूपच कौतुक वाटले. इतक्या सगळ्यातून जाताना तुमचा दृष्टीकोण बव्हंशी सकारात्मक असला पाहिजे असे वाटते. आणि म्हणूनच तुम्ही हे लिखाण केले पण त्यात कुठेही थोडीही कटुता दिसली नाही. (कटुता येण्या सारखे प्रसंग घडले असतील तरीही). तुम्ही म्हणता तसे ' हे अगदी सर्वसामान्य जीवन' आहे, पण त्यातही मजा आली ती शैली मुळे.

आता तुम्ही तुमच्या अजूनही काही गंमतीदार किंवा इतर अनुभवांबद्दल वगैरे लिहा. आम्ही वाट बघतो आहोतच. आणि स्वातीताई म्हणते तसे, तुम्हालाही प्रतिसादांची चटक लागली आहेच. ;) तर मग होऊन जाऊ दे... आता थांबू नका.

अवांतर : खरं तर पहिल्याच भागानंतर अगदी अपघातानेच तुमची खरी ओळख कळली होती. :)

बिपिन कार्यकर्ते

भडकमकर मास्तर's picture

23 Mar 2009 - 5:08 pm | भडकमकर मास्तर

उत्तम लेखमाला...
रहस्यभेदही छान...
..
आता इतरांसारखेच म्हणतो की अजूनही काही आठवणी येउद्यात...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

चतुरंग's picture

23 Mar 2009 - 5:32 pm | चतुरंग

आयुष्यातल्या सर्व ठळक घटनांचे तटस्थ राहून केलेले वर्णन वाचताना इतका गुंगून गेलो होतो की अचानक शेवटचा भाग आल्याचे पाहून जरासा धक्का बसला!
अजून वाचायचे आहे असे राहून राहून वाटते आहे. तुमच्या आयुष्यातल्या सर्व घटनाक्रमाकडे बघता "ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असो द्यावे समाधान!" ही उक्ती तुम्ही सार्थपणे जगला आहात असे वाटते.
कडू-गोड अनुभवातून प्रगतीच्या वाटा धुंडाळण्यासाठी लागणारी मनाची ताकद टिकवून ठेवण्याचे सामर्थ्य तुमच्या तटस्थतेत आणि विचारसरणीत आहे असे वाटते.
तुमची वहिनी ही तर तुम्हा भावंडांची दुसरी आईच जणू. एका स्त्रीने स्वतःचे दु:ख असे काळाच्या उदरात चिणून टाकून पुढच्या पिढीसाठी जीवन झिजवणे परिकथेतले वाटते! तसेच तुमची आई. पुरुष माणूस घरात नसताना एकहाती एवढा मोठा संसार रेटणे येरागबाळ्याचे काम नाही. जिद्द, कणखरपणा, भविष्यात मुलांनी खितपत पडायचे नसेल तर पुढे जायलाच हवे ही महत्वाकांक्षा, धन्य आहे!
तुमची वहिनी आणी आई ह्या दोघींसमोर मी नतमस्तक आहे!
तुमच्या कष्टांचे तुमच्या मुलामुलींनी चीज केले. तुमच्या आयुष्यातल्या चढउतारांचे ओझे तुम्ही त्यांच्या खांद्यावर टाकले नाहीतच उलट तुम्ही त्यांना स्फूर्तीदाते बनलात हे पाहून आपलेही कौतुक वाटते.
तुम्ही लिहिते रहा. आणखी आठवणींचा खजिना घेऊन या. मला खात्री आहे जगभरात मिपाकर वाट पहाताहेत!

तुम्हाला लिहायला लावून आणि त्या आठवणी आमच्यापर्यंत पोचवून देणार्‍या स्वाती-दिनेश ह्या दोघांचेही खास आभार. एक अप्रतिम लेखमाला वाचायला मिळाली ह्याबद्दल मी धन्य आहे!
"व्हेळ ते फ्रँकफुर्ट" असे शीर्षक बघताक्षणीच तुम्ही स्वाती आणि दिनेशचे बाबा आहात हे लक्षात आले (तशीही स्वातीताईची एकही प्रतिक्रिया ह्या लेखमालेत नव्हती तेव्हाच मनात शंकेची पाल चुकचुकली होती! ;) )

चतुरंग

संदीप चित्रे's picture

23 Mar 2009 - 7:18 pm | संदीप चित्रे

मनापासून लिहिले की लेखन किती ओघवतं होतं ह्याचं ही लेखमाला उत्तम उदाहरण आहे.
स्वातीताईंनाही स्पेशल धन्स -- ही लेखमाला मिपावर आणण्यासाठी.

क्रान्ति's picture

23 Mar 2009 - 7:28 pm | क्रान्ति

अत्यंत अप्रतिम लेखमाला! स्वातिताईचे आभार मानावे तेवढे थोडेच! इतकी सुंदर कलाकृती वाचायला मिळाली की शब्द नाहीत अभिप्राय द्यायला!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

केवळ_विशेष's picture

24 Mar 2009 - 2:47 pm | केवळ_विशेष

पावरबाझ लिहिलं आहे...
बोलतीच बंद!
:)

वामनसुत's picture

24 Mar 2009 - 10:07 pm | वामनसुत

आपणा सर्वांच्या उदंड प्रतिसादांनी भारावून गेलो आहे. पुनश्च सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद.
आता खरडवही आणि पोस्टहापिसाची सुविधा तात्यांनी चालू केली आहे, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद, आपल्या प्रश्नांची उत्तरे लवकरच देईन.

मुशाफिर's picture

26 Mar 2009 - 2:29 am | मुशाफिर

मी संपूर्ण लेखमाला वाचून प्रतिसाद द्यावा, असे ठरवले होते. त्यामुळे बरेचदा तुमचं सुंदर कथन वाचुन प्रतिसाद द्यायचा असुनही मोह आवरला. खरंतरं मी तुमच्या लेखनाबद्दल तुमचं अभिनंदन करणं किंवा तुमचं कौतुक करणं, हे वावगं ठरेल. कारण तेव्हढं माझं वय नाही आणि पात्रताही! पण, जुन्या काळातील लोकांनी पुढच्या पिढीच्या भल्यासाठी (वैयक्तिक पातळीवर का होइना) किती खस्ता खाल्ल्या? हे तुम्ही तुमच्या अनुभव कथनातुन आजच्या पिढीला दाखवून दिल आहे. त्याबद्दल आपले शतश: धन्यवाद! हे लेखन वाचून आमंच जीवन कितीतरी सहजं आणि सोपं आहे ह्याची जाणीव झाली. आपण मि.पा. वर असेच लिहितं राहाल अशी अपेक्षा.

मुशाफिर.

योगी९००'s picture

26 Mar 2009 - 2:36 am | योगी९००

प्रतिकुल परिस्थितीत कष्ट करून आपली परिस्थिती सुधारणार्‍या आपल्यासारख्या लोकांबद्दल मला नेहमीच आदर वाटत राहिला आहे.

एक सुंदर कथन..

आपले शतश: धन्यवाद !!

आपल्यापासून सध्या जवळच्याच देशात आहे. जर जर्मनीत आलो तर आपली भेट घ्यायला नक्कीच आवडेल मला.

खादाडमाऊ

सुधीर कांदळकर's picture

26 Mar 2009 - 7:10 pm | सुधीर कांदळकर

त्या काळीं कर्ज काढून घर बांधणें, एकाचीं तीन घरें करणें, नोकरी सोडून फंडातून कर्जफेड करणें ही उद्योगशीलता असामान्यच म्हणायची.

फक्त लागलें एवढेंच कीं प्रकृतीची योग्य ती काळजी घेतलेली दिसत नाहीं. असो. पण त्या काळीं तेवढा हेल्थ कॉन्शसनेस नव्हता. कर्तृत्त्व असामान्यच.

स्वातीताईंनीं नात्याचें गुपित जपलें तेंहि योग्यच.

झकास. मजा आली.

सुधीर कांदळकर.

बबलु's picture

6 Apr 2009 - 2:36 pm | बबलु

वामनसुत काका....
आजच स्मृतीगंधचे १ ते १२ भाग सलग वाचून संपवले. [मिपा वरची "वाचनखुणा साठवून" ठेवायची सोय उत्तम आहे (तात्या, धन्यवाद) ].

काका... काय सुंदर रीतिनं लिहिलंय !! हिमपर्वतातून उसळणारा पांढराशुभ्र ओढा खळाळत जातो तसं ओघवत्या शैलीतलं लेखन आपल्याला फार आवडलं.
तुमचा हा ओढा व्हेळया मध्ये उगम पावून राजापूर/गिरगाव/गोरेगाव/डोंबिवली/फ्रांकफुर्ट असा खळाळत जातोय. दरम्यान अनंत अडचणी आल्या. त्या तुम्ही समर्थपणे पार केल्यात. धन्य होय !!

ही लेखमाला संपूच नये असं वाटतं.

(लेखकाशी जवळचे नाते असूनही त्रयस्थ दृष्टीकोन बाळगून टंकन केल्याबद्दल टंकलेखिकेचे कौतुक).

....बबलु

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Apr 2009 - 7:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्मृतीगंध काय आहे म्हणून उचकले आणि सर्वच भाग आजच वाचून काढले. हा भाग वाचल्यावर प्रतिक्रिया काय लिहावी असा प्रश्न पडला. आपला जीवनपट उलगडून दाखवतांनांचा सहजपणा आणि आपले अनुभव वाचून आम्ही वाचक संपन्न झालो इतकेच म्हणावेसे वाटते.

अजून खूप लेखन येऊ द्या ! मिपावर भेटत राहू !!!

-दिलीप बिरुटे

नंदन's picture

20 Oct 2013 - 2:38 pm | नंदन

आज पुन्हा पहिल्यापासून शेवटपर्यंत बाराही भाग सलग वाचून काढले. एखादी साधी, अनलंकृत पण ठाव घेणारी दीर्घ कथा वाचावी तसा पुनर्वाचनाचा अनुभव पुन्हा एकदा मिळाला. काही नवीन सदस्यांच्या वाचनातून सुटले असेल म्हणून हे किंचित उत्खनन.

यशोधरा's picture

20 Oct 2013 - 2:44 pm | यशोधरा

नंदन, बेष्ट काम केलेस.

चतुरंग's picture

21 Oct 2013 - 5:04 am | चतुरंग

मी ही पुन्हा वाचले. फारच छान.
याव्रुन मला कर्मयोगी! मालिकेची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही!

-रंगा

नंदनचे या उत्खननाबद्दल लैच आभार.

योग्य शब्द सापडले की मग प्रतिक्रिया देतो. तोपर्यंत फक्त _/\_

मीही पुन्हा एकदा ही मालिका वाचून काढली. आणखी एकदोनदा तर वाचली जाईलच. एकच भाग वाचायचा असे ठरवून सगळी मालिका वाचत बसले.
अश्या लेखनासाठी ती. वामनसुतांचे आभार.
नंदनने धागा वर आणून छान काम केलय.

खटपट्या's picture

21 Oct 2013 - 9:00 am | खटपट्या

सर्व भाग एकाच वेळी अधाश्यासारखे वाचून काढले.
एक सुंदर चित्रपट बघितल्यासारखे वाटत आहे.

सुबोध खरे's picture

21 Oct 2013 - 10:46 am | सुबोध खरे

+ १११११११११११.........

राघवेंद्र's picture

23 Oct 2013 - 9:31 pm | राघवेंद्र

+ १११११११११११.........

मृत्युन्जय's picture

21 Oct 2013 - 12:55 pm | मृत्युन्जय

खुपच सुंदर लिहिले आहे. गरम गरम वरण भात, मीठ, लिंबु आणि वर साजुक तुपाची धार आणि तोंडी लावायला लिंबाच्या लोणच्याची फोड या साध्याश्या जेवणात जो कमालीचा आनंद मिळतो तसाच आनंद मिळाला.

स्वातीतै आणी नंदनचे आभार.

@स्वातीतै: लेखमाला आवडली हे नानांना आवर्जुन सांगा

अर्धवटराव's picture

24 Oct 2013 - 12:22 am | अर्धवटराव

शिवाय हे जेवण अत्यंत आपुलकीच्या, मायेच्या हातांनी भरवलं असं काहिसं वाटतय.

विजुभाऊ's picture

21 Oct 2013 - 4:56 pm | विजुभाऊ

सुंदर लिखाण. पुन्हा वाचतान तीच मजा अनुभवली. एका तृप्त व्यक्तीचे सरळ साधे निवेदन भावले.

स्पंदना's picture

22 Oct 2013 - 4:42 am | स्पंदना

काल बसून ही सगळी लेखमाला वाचुन संपवली.
वामनकाका तुम्ही माझ्या वडिलांच्या पिढीचे म्हणुन काका म्हणायचा अधिकार घेतेय.
एक अतिशय महत्वाचा पैलु जाणवला या लेखनात अन तो म्हणजे एका स्त्रीचा दुसर्‍या स्त्रीच्या प्रति असणारा आदर,अन श्रद्दा! तुमच्या आई, चार मुलांच्या आई होत्या. त्यांनी आयुष्यात पतिसुख अनुभवल, पण वयाने २ वर्षे मोठ्या असलेल्या सावत्र सुनेवर त्यांनी जो विश्वास दाखवला, किंवा त्यांना जो तुमची आई होण्याचा अधिकार दिला, तो शब्दातीत आहे. शेतीवाडी तुमच्या वैनींना करायला देउन त्या आपली मुले घेउन त्यांच्या शिक्षणासाठी बाहेर राहु शकत होत्या. पण त्यांनी ते काम तुमच्या वैनींना दिलं. आपली मुले इतक्या विश्वासाने दुसर्‍या व्यक्तीच्या हातात सोपवली अन तो विश्वास तुमच्या वहीनींनी सार्थ ठरवला. हा नात्यांचा सुरेख गोफ उलगडणे हे तुमच्या लिखाणाचे सार्थक आहे. लिहायला बसले तर या नात्याचे अनेक पैलु सामोरे येतील. पण येथेच थांबवते. फार भिडल तुमच साध सोप लिखाण. अगदी हळव करुन गेलं.

श्री. वामनसुत यांच्या परवानगीने मी या अतीव सुंदर आत्मकथनाचे सात भाग ध्वनिमुद्रित करून मिपावर दुवे दिले होते, आणि प्रतिसादांवरून तो उपक्रम वाचक-श्रोत्यांना आवडलाही होता असं वाटतं:

मनकर्णिका १
मनकर्णिका २
मनकर्णिका ३

दुर्दैवाने ज्या खाजगी मालकीच्या सर्व्हरवर ते टाकले होते ती सुविधा गायब झालेली दिसते आहे :-( . असो, हे लिखाण इतकं उच्च प्रतीचं आहे की पुन्हा एकदा ध्वनिमुद्रण करण्यासाठी वेळ काढण्याची माझी तयारी आहे, इतर कुणी सहभागी होऊन मदत केली तर स्वागतच आहे!

रेवती's picture

24 Oct 2013 - 6:03 am | रेवती

एरर येतीये हो. काय करावं?

खटपट्या's picture

24 Oct 2013 - 7:05 am | खटपट्या

युजर आणि परवलीचा शब्द द्या

बहुगुणी's picture

24 Oct 2013 - 5:53 pm | बहुगुणी

सॉरी, मंडळी, मी वर लिहिल्याप्रमाणे, दुर्दैवाने ज्या खाजगी मालकीच्या सर्व्हरवर ते ध्वनिमुद्रण टाकले होते ती मोफत सुविधा गायब झालेली दिसते आहे. (आणि डोमेन नेम ही वेगळे आहे, बहुतेक ती मूळची साईट विकली गेली असावी.) माझ्याकडे लॉगिन सुविधा नाही.

तेंव्हा नव्याने पुन्हा ध्वनिमुद्रण करून मी "मनकर्णिका" सुरू करू शकेन. इथेच मिपावर दीर्घ ध्वनिमुद्रण टा़कायची सोय झाली तर अत्युत्तम!

मेघनाद's picture

25 Oct 2013 - 1:07 am | मेघनाद

नाना आजोबा, अहो काय मस्तच लिहील आहात हो तुम्ही. १ ते १२ हे सर्व भाग एका दिवसात वाचून काढले मी, अगदी ट्रेन मध्ये बसलो असताना मोबाईल वरती वाचल.

माझ पण आजोळ राजापूर जवळ मिठगवाणे येथे आहे, त्यामुळे आपल्या लेख मालिकेतील सर्वच ठिकाणे डोळ्यासमोर येत होती.

तुमच्या अश्याच लेख मालिका वाचायला आवडतील. वाट बघतोय आम्ही सर्व मिपाकर……

प्यारे१'s picture

25 Oct 2013 - 3:39 am | प्यारे१

अतिशय सुंदर मालिका. १ ते १२ भाग सलग वाचले.
नंदन शेठचे उत्खननाबद्दल आभार.
जुन्या काळातल्या एका अत्यंत धडपड्या स्वभावाच्या व्यक्तीची जीवनगाथा.
त्या त्या कालाचा तटस्थपणे अ‍ॅज इट इज घेतलेला आढावा.
विशेष भावलं ते म्हणजे प्रत्येक वेळी ज्येष्ठ व्यक्तीचा केलेला आदरार्थी उल्लेख.
तीर्थस्वरुप नाना यांचे सेवेसी चरणी नतपर दासानुदासाचे दोन्ही कर जोडून त्रिकालचरणी मस्तक ठेवून शिरसाष्टांग नमस्कार ही विज्ञापना. (भाग २ मधलाच मायना वापरलाय)
ती. स्वाती दिनेश ह्यांना सविनय नमस्कार