स्मृतीगंध-३ "वाकेडची शाळा"

वामनसुत's picture
वामनसुत in जनातलं, मनातलं
14 Mar 2009 - 11:17 am

स्मृतीगंध-१
स्मृतीगंध-२

आजोबा म्हणजे आईचे वडिल,आई आणि वहिनी यांनी मला पाचवीत घालायचे ठरवले पण गावात पुढे शाळाच नव्हती. राजापुरास सातवीपर्यंत आणि पुढची इंग्रजी शाळा होती पण घरापासून २० मैल दूर,मुलाला कोणाकडे ठेवणार? पुढे कसे करायचे ह्यावर आई आणि वहिनीची बोलणी होत असत पण मला त्यात काही फार रस नव्हता. मी आपला गुरेवासरे आणि गडीमाणसे यात रमलेला असे. पुढे एक दिवस गं .भा. बयोआत्ते आमच्याकडे आली असताना म्हणाली ,"नारायणास वाकेडला गोदीकडे ठेवा.तिथे मराठी सातवीपर्यंत शाळा आहे." वाकेड गाव घरापासून ४ मैलांवर, चालत जायला तासदिडतास सहज लागत असे. मी गोदीआत्त्याकडे वाकेडास राहू लागलो. तिचे यजमान आबा पाध्येंनी राजापुराहून मला ५ वीची पुस्तके आणून दिली आणि माझी रेग्युलर शाळा सुरु झाली. सकाळी ७ते १० आणि दुपारी ३ ते६ अशी शाळेची वेळ ,मध्ये जेवणाची सुटी. मी शाळेत जात होतो पण मन रमत नव्हते. सकाळ संध्याकाळ शाळेत जात असे एवढेच, अभ्यास तर मुळीच होत नव्हता. घराची,गुरावासरांची आठवण व्याकूळ करत असे. पुढे दिवाळीची सुटी लागल्यावर मी घरी आलो तो परत वाकेडला शाळेत जाण्याची इच्छाच झाली नाही. ते वर्ष वायाच गेले.

ती.आई आणि ती. वहिनीस मात्र आम्ही मुलांनी शिकावे असे वाटे म्हणून मग पुढच्या वर्षी वाकेडास बिर्‍हाड केले. ती. आबांनी आम्हाला १ खोली दिली तिथे मी, प्रभाकर आणि आई किवा वहिनी पैकी एक जण असे राहत असू. वत्सु आणि बाळ अजून लहान होते त्यामुळे बरेचदा आई व्हेळात त्या दोघांना घेऊन तेथील शेती इ. पहायची आणि वहिनीबरोबर आम्ही दोघे वाकेडास शाळेसाठी राहत असू. आबा आम्हाला ताक देत असत पण २ पैशांचे दूध मात्र वहिनी त्यांचेकडून विकत घेत असे. प्रभाकर आणि वहिनी जवळ असल्याने आता वाकेडात मन रमू लागले होते. त्या आमच्या पाचवीच्या वर्गात ११ मुले होती . वार्षिकपरीक्षेत आम्ही दोघेही पास झालो आणि माझा दुसरा नंबर आला. ६वी आणि सातवी ह्या दोन्ही यत्ता वाकेडातच पूर्ण केल्या.

सकाळची शाळा संपली की जेवणासाठी आम्ही घरी येत असू आणि नंतर ५/६ दोस्तमंडळी जवळच असलेल्या राम आणि विठोबाच्या देवळाच्या आवारात हुतूतू,खोखो,लंगडी असे खेळ खेळत असू. विठोबाच्या देवळात एका कोनाड्यात गणपती आणि दुसर्‍या कोनाड्यात मारुती होता. एकदा वसंताला खेळता खेळता काय लहर आली, त्याने गणपतीस कोनाड्याबाहेर काढले आणि नाचवायला लागला. दुसर्‍याने मारुतीला बाहेर काढले आणि तोही नाचवायला लागला. मी वसंताकडून गणपती घेतला आणि नाचवू लागलो एवढ्यात एक गृहस्थ देवळात आले. समोरचे दृश्य पाहून आम्हाला ओरडू लागले. आम्ही चुपचाप ऐकून घेऊन मुकाट्याने शाळेत पळालो ,मनात जरा धास्ती होतीच. संध्याकाळी जणू काही घडलेच नाही असे घरी आलो. दुसर्‍या दिवशी नेहमीप्रमाणे शालेत गेलो असता ९ वाजायच्या सुमाराला ते कालचे गृहस्थ,देवळाचे पुजारी आणि आबा पाध्ये शाळेत आले. त्यांना पाहिल्यावर आपले पुढे काय होणार? ते कळून चुकले. मास्तरांनी वसंता आणि मला ५/५ छड्या मारल्या आणि घरी आईला हकिगत कळल्यावर दुपारीही उपाशी ठेवण्यात आले.

सकाळची शाळा सुटल्यावर जसे विठोबाच्या देवळात खेळायला जात असू तसेच कधीतरी जवळच्या राईत सुध्दा जात असू. एकदा मी,प्रभाकर,वसंता,त्याची बहिण इंदू असे राईत खेळायला गेलो होतो. वसंताने आबांच्या चंचीतून चोरुन तंबाखू आणला होता. कुड्याच्या पानात तंबाखू घालून आम्ही त्याची विडी वळली आणि ओढून पाहिली. आम्हा दोघांना काहीतरी मोठ्ठे साहस केल्यासारखे वाटले. घरी आल्यावर प्रभाकराने आईस हा पराक्रम सांगितल्यावर मार तर खावा लागलाच पण दुपारी जेवणही मिळाले नाही. तसाच उपाशी,रडतरडत शाळेत गेलो, पण आईच्या तेव्हाच्या शिक्षेचा परिणाम म्हणजे आजतागायत विडी,पान,सिगरेट,तंबाखूला हात लावायला धीर होत नाही.

सातवीचे वर्ष सुरु झाले. वर्गात आम्ही ६ मुले होतो . वाकेडात शाळेची मराठी ७वीची परीक्षा होत असे पण लोकल बोर्डाच्या व्हर्नाक्युलर फायनल परीक्षेसाठी मात्र रत्नागिरीस जावे लागत असे. व्ह. फा. पास असले तर मास्तराची नोकरी मिळत असे. मी नुसते मराठी ७वी पास न होता व्ह. फा. व्हावे असे आईस वाटत होते. लोकल बोर्डाच्या परीक्षेसाठी आम्ही सर्व मुले वाघुमल्हाराच्या बैलगाडीतून रत्नागिरीस गेलो. आमच्या बरोबर आमचे शेजारी शंकर श्रीधर उर्फ दादा होते. रत्नागिरीला सगळ्या मुलांची वेगवेगळ्या घरातून रहावयाची सोय आपापल्या घरूनच केलेली होती. दादा आणि मी वासु चहावाल्यांच्या घरी गेलो. तेथे माझे जेवणखाणे आणि राहणेची सोय परीक्षेसाठी केलेली होती. दुपारचे जेवण झाल्यावर परीक्षेचे सेंटर पाहण्यासाठी विचारत विचारत निघालो तेव्हा एका गॄहस्थांनी व्ह. फा. ची परीक्षा पटवर्धन शाळेत असल्याचे सांगितल्यावर ते हायस्कूल शोधून तेथे नाव,नंबराच्या यादीत नाव हुडकून काढले.वासू चहावाल्यांच्या घरी येईपर्यंत संध्याकाळचे साडेसहा वाजून गेले होते.

वासूच्या बायकोनेही माझी विचारपूस करुन जेवायला घातले व माडीवर माझी झोपण्याची व्यवस्था केली. त्यांची मुलगी, तिला मी ताई म्हणत असे ती बी. ए. च्या वर्गात होती. सकाळी ताईनेच मला उठवले, आंघोळीस पाणी दिले आणि नंतर अभ्यासास बसवले. बरोबर ९ वाजता आम्हा दोघांना जेवायला वाढले. ताईनेच मला पटवर्धन शाळेत सोडले. रोज दोन पेपर असत. १ला पेपर १० ते १ आणि दुसरा २ ते ६ अशी ३ दिवस परीक्षा चालत असे. संध्याकाळी त्यांचे घरी गेल्यावर पोहे खायला देऊन,पेपर कसे गेलेची विचारपूस करुन परत अभ्यासास बसवित असत. मला पेपर्स चांगले गेले होते. परीक्षा संपल्यावर दादांबरोबर मी व्हेळात परतलो. मे महिन्याची सुटी गुरावासरात, शेतातली किरकोळ कामे करण्यात गेली.

१जूनला रिझल्ट लागला आणि मी ५८% मार्क मिळवून व्ह. फा. पास झालो. त्याकाळी ५८% म्हणजे भरपूर मार्क मिळाले असे समजत,त्यामुळेच आई,वहिनी आणि आजोबांना अस्मान ठेंगणे झाले.

राहणीअनुभव

प्रतिक्रिया

व्यंकु's picture

14 Mar 2009 - 11:24 am | व्यंकु

सुंदर लिखाण मजा आली वाचताना

अवांतर: वामनसुत महोदय आपली खरडवही पाहत जावा
अवांतरबद्दल माफी

प्रकाश घाटपांडे's picture

14 Mar 2009 - 11:39 am | प्रकाश घाटपांडे

त्याकाळात घेउन जाणारे लेखन!
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

नंदन's picture

14 Mar 2009 - 11:54 am | नंदन
घाशीराम कोतवाल १.२'s picture

14 Mar 2009 - 11:45 am | घाशीराम कोतवाल १.२

वामनसुत खरच मस्त लिहित आहात तुम्ही आजपासुन आपण तुमचे फ्यान
खरच मस्त
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

प्रदीप's picture

14 Mar 2009 - 11:58 am | प्रदीप

मला वाटते आतापर्यंतच्या लिखाणाचा काळ हा सुमारे १९३०-४० च्या दरम्यानचा असावा. तसे पाहिले तर ह्या जीवनचित्रणात अद्यापतरी काहीही नाट्यमय अथवा डोळे दिपवणारे झालेले नाही. पण तरीही ह्या लेखमालिकेचे महत्व लक्षणीय ह्यासाठी आहे, की एक भूतकाळात गेलेला कालखंड तिच्यात शब्दचित्रीत होत आहे. कोंकणातील तत्कालिन मध्यमवर्गीय ब्राम्हण कुटुंबातील एका सर्वसामान्य पण सुजाण व्यक्तिची ही जीवनकहाणी रोचक आहे. जे काही घडले ते तसेच्या तसे सांगितले जात आहे. त्यात कसलाही अभिनिवेष नाही. तसेच हे अचूक व मोजक्या शब्दात बंदिस्त करून आमच्यासमोर आणल्याबद्दल लेखनिका(के)चेही ॠण मान्य केले पाहिजे.

पुढील भागांच्या प्रतिक्षेत आहोत.

मुक्तसुनीत's picture

15 Mar 2009 - 8:49 am | मुक्तसुनीत

हेच म्हणतो. लेखन अतिशय दर्जेदार वाटले. काळ तीसच्या दशकातला अंदाजसुद्धा मला बरोबर वाटतो आहे.

शब्दयोजना , शैली याबाबत प्रदीप यांच्याशी सहमत आहे. मात्र या व्यतिरिक्त मला जाणवलेली एक गोष्ट : त्यात दिसणारी एक प्रकारची स्टॉईक वृत्ती. (मराठीतल्या "निर्विकारपणा" या शब्दाला काहीशा उद्धटपणाची छटा आहे ; जी मला इथे अभिप्रेत नाही. ) लेखनातले अनेक संदर्भ जिव्हाळ्याच्या व्यक्तींबद्दलचे आहेत. (उदा. दिवंगत वडील.) , वर्णिलेले प्रसंग एकूण आयुष्याला नवनवी वळणे देणारे (वाकेडला यावे लागणे , घरच्या आठवणीपाई वर्ष वाया जाणे) . आणि हा काळ लेखकाच्या बालपणीचा अगदी धामधुमीचा आहे - अनपेक्षित घटनांमुळे अचानक आयुष्याचा सांधा बदलणे.

मात्र हे सगळे वर्णिताना लेखन कुठेही भावनाविवश झालेले दिसत नाही. पोरकेपणापायी झालेल्या दु:खाबरोबर आणि एकूण आर्थिक संकटाबरोबर सामाजिक कलंकही आलेला असणे , त्यापायी महिना-महिना बाहेर पडायला लाज वाटणे हा भाग मला फार वेदनादायक वाटला. मात्र लेखात एकही उद्गारचिन्हही या पायी (किंवा कुठल्याही गोष्टीपायी) येत नाही.

माझ्यामते या शैलीचा परिणाम जास्त खोलवर होतो. "हा काळ असा होता; जगताना माणसे असे जगत असत; अनपेक्षितपणे घरातली वडिलधारी माणसे देवाघरी निघून जात; नंतर आयुष्य बदलत असे" अशी ही त्या काळची बखर वाटते.

तर हा निर्विकारपणा काळाचे पाणी वर्षानुवर्षे वाहिल्यामुळे येत असेल काय ? की हे सगळे व्यक्तीसापेक्ष आहे ? आज या काळाबद्दल इतके वस्तुनिष्ठपणे कसे पहाता येत असेल ?असे प्रश्न हे सगळे वाचताना पडत राहिले.

mamuvinod's picture

14 Mar 2009 - 12:13 pm | mamuvinod

मा वामनसुतजी,

लिखानाचा वेग खुपच चागला, बाकि लेख अगदिच छान आहेत.

असेच रोज नवनविन वाचायला मिळुदे.

धन्यवाद

योगी९००'s picture

14 Mar 2009 - 1:21 pm | योगी९००

मी आजपासून आपला पंखा..

लहानपणी खुपच खोडकर होता असे दिसते.

पहिल्या ३ लेखातच तुम्ही सर्व मि.पा. करांची मने जिंकली आहेत..

खादाडमाऊ

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Mar 2009 - 2:13 pm | बिपिन कार्यकर्ते

काका!!!

लिखाण सुंदरच आहे. तुम्ही पुढचे भाग पटापट टाकत आहात. त्यामुळे संगति नीट लागून वाचायला अजून मजा येत आहे. मला जाणवलेले वैशिष्ट्य म्हणजे, तुमच्या लिखाणात जुने शब्द वस्तुवाचक म्हणून तर येतातच (बोरू, पुस्ती वगैरे) पण तुमची वाक्यरचना वगैरे पण जुन्या भाषेची आठवण करून देते. (जात असू, करत असू वगैरे). एका वेगळ्याच दुनियेत नेता.

अजून एक जाणवलेले असे - तुमचा हा प्रवास पूर्णपणे सुखकर तर नक्कीच झाला नसणार. घरची काही फार श्रीमंती नसावी, खाऊन पिऊन सुखी असाल, त्यातच वडिल गेले. त्या काळात घरातले पुरुष माणूस गेले तर काय काय परिणाम होत असत त्याची कल्पना आहे. शिवाय तुम्हाला त्या लहान वयात वडिल गेले त्याचे जे काही वाटले असेल ते निराळेच. पण आत्ता तुम्ही इथे हे सगळे मांडताना कुठेही थोडाही कडवटपणा अथवा तत्सम भावनेची छटा पण येऊ दिली नाहीत.

मजा येत आहे वाचायला. वरती प्रदीप म्हणतात तसे, कुठलेही नाट्यमय प्रसंग अथवा भव्य दिव्य असे न मांडता सुद्धा, वाचकाला खिळवून ठेवत आहात. ताकद आहे ही. असेच लिहित रहा. तुमचे वेगवेगळे अनुभव मांडत रहा, आमचे अनुभव विश्व (आम्ही ते अनुभव न घेताही) समृद्ध करत रहा.

बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Mar 2009 - 6:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मला जे म्हणायचं होतं त्यासाठी योग्य शब्द सुचत नव्हते. बिपिनने ते काम केलंय. तुम्ही छानच लिहित आहात, वाचताना डोळ्यांसमोर चित्रं उभं रहातं.

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

श्रावण मोडक's picture

14 Mar 2009 - 2:21 pm | श्रावण मोडक

लिखाण सुंदरच आहे. तुम्ही पुढचे भाग पटापट टाकत आहात. त्यामुळे संगति नीट लागून वाचायला अजून मजा येत आहे. मला जाणवलेले वैशिष्ट्य म्हणजे, तुमच्या लिखाणात जुने शब्द वस्तुवाचक म्हणून तर येतातच (बोरू, पुस्ती वगैरे) पण तुमची वाक्यरचना वगैरे पण जुन्या भाषेची आठवण करून देते. (जात असू, करत असू वगैरे). एका वेगळ्याच दुनियेत नेता.
हेच म्हणतो. प्रामुख्याने दुसरे वाक्य महत्त्वाचे.

अवलिया's picture

14 Mar 2009 - 2:25 pm | अवलिया

मस्त. :)

--अवलिया

प्रमोद देव's picture

14 Mar 2009 - 2:34 pm | प्रमोद देव

नारायणराव, आपण इथल्या सगळ्यांची मनं अल्पावधीत जिंकलीत.
आपले लेखन अगदी सहजसुंदर आहे.
आपल्या आठवणींचा काल पाहता आपण माझ्या आधीच्या पिढीतले असाल असे वाटतेय.

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

क्रान्ति's picture

14 Mar 2009 - 3:02 pm | क्रान्ति

वाचताना 'श्यामची आई'ची आठवण येतेय! खूपच छान.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

लवंगी's picture

14 Mar 2009 - 3:14 pm | लवंगी

श्याम डोळ्यापुढे उभा राहिला

प्राची's picture

14 Mar 2009 - 3:17 pm | प्राची

क्रान्ति आणि लवंगी यांच्याशी एकदम सहमत.

अन्वय's picture

14 Mar 2009 - 10:46 pm | अन्वय

बालपण देगा देवा म्हणतात ते खरेच आहे.... ओघवते लेखन. विलक्षण आवडले. गावात घालविलेले बालपण आठवले. गावाकडची माती, माणसे किती निर्भेळ आणि प्रेमळ असता ना! आताच्या सिमेंटच्या जंगलात गावाकडचा अस्सलपणा हरवत चाललाय, याचे वाईट वाटते.

समिधा's picture

15 Mar 2009 - 12:11 am | समिधा

खुप मस्त वाटतय. बाकी बिपीनदाच्या म्हणण्याशी सहमत आहे.
=D>

शितल's picture

15 Mar 2009 - 1:58 am | शितल

सुंदर लिखाण .
हा भाग ही सुंदर जमला आहे :)

सुक्या's picture

15 Mar 2009 - 2:09 am | सुक्या

वामनसुत. . . खुप छान. कधी कधी काही वाचले की काय प्रतिक्रिया द्यावी असा प्रश्न पडतो. वाचल्यानंतर एका वेगळ्या विश्वात गेल्यासारखे वाटते.
खुप छान. अजुन येउद्या. .

सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

अजय भागवत's picture

15 Mar 2009 - 8:14 am | अजय भागवत

लेख वाचुन लहानपणीच्या आठवणींचा पट उलगडला गेला.

विसोबा खेचर's picture

15 Mar 2009 - 8:20 am | विसोबा खेचर

स्मृतींचा दरवळ सुरेखच..!

वामनसुतराव, अजूनही लिहा. अगदी भरभरून..!

आपला,
(फ्यॅन) तात्या.

जृंभणश्वान's picture

15 Mar 2009 - 9:36 am | जृंभणश्वान

फार सुंदर आहेत स्मृतीगंध

वामनसुत's picture

15 Mar 2009 - 2:16 pm | वामनसुत

आपणा सर्वांना प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद.
व्यंकोबा, खरडवही पाहिली परंतु आपणास व इतरांसही प्रतिसाद देण्यास गेलो असता You are not allowed to post in this guestbook. असे दिसते. इंटरनेटचे माझे ज्ञान स्वल्प आहे. याबाबत कोणी मदत करु शकेल तर बरे होईल.
असो. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद.

मदनबाण's picture

15 Mar 2009 - 2:47 pm | मदनबाण

ह्म्म.. वामराव वाचतोय बरं .... :)

मदनबाण.....

"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.