तसे पाहिले तर आमचे कुटुंब ना श्रीमंत ना गरीब. मध्यमवर्गीयच म्हणा ना! घरात आई,वडिल, मी,प्रभाकर,वत्सु आणि बाळ अशी आम्ही ४ भावंडे. तसेच कै.सावत्र भावाची पत्नी ती. गं. भा. आनंदीवहिनी आमच्याकडेच. वहिनी आमच्या आईपेक्षा २ वर्षांनी मोठी. वडिलांची खोती आणि शेती. खोती म्हणजे मामलेदाराने ठरवून दिलेली ठराविक रक्कम कुळांकडून वसूल करुन मामलेदार कचेरीत भरणा करायची. त्याच्या मोबदल्यात भरलेल्या रकमेच्या १/४ सरकारकडून मिळत असे. गावचा पट १२०० रु.चा आणि ३ खोतात विभागलेला,म्हणजे आमचा हिस्सा ४००रुपयांचा. सरकारदरबारी ३० जूनपूर्वी दरवर्षी ४०० रु भरणा कुळांकडून वसूली करुन करायचा असे. तो जर वेळेवारी झाला नाही तर घरावर जप्तीचे सावट! कितीतरीदा द्यायला कुळांकडे पैसे नसत. कोण २रु, कोण ५रु भरे तर कोणी भाताचे पोते अंगणात आणून टाके. कोणी २/४ दिवस गडी म्हणून कामाला येई. ठरलेली रक्कम तर सरकारला भरावीच लागे,मग कितीतरीदा पदरमोड करुन भरणा केला जाई.
खोतीचा मोबदला म्हणून मिळालेले साधारण १०० रु घरचा खर्च भागवित असत. राजापुराहून गुळाची १ ढेप,मिठाचे पोते, तिखट कांडण्यासाठी सुक्या लाल मिरच्या, ५/५ शेर तूरडाळ आणि हरबरे, गोडेतेलाचा १ डबा आणि कडूतेलाचा डबा समई आणि लामणदिव्यासाठी येत असे. गुळाची ढेप राजापूरातून आली की पडवीत ठेवलेली असे. भेली (गुळाची ढेप) फोडून देवाजवळ २ खडे ठेवून मग घरात वापर करायचा अशी प्रथा असे आणि आम्ही भावंडे ती कधी फोडतात याची वाट पाहत असू. शेवटी न राहवून भेलीचेच चावे घेत असू मग मात्र 'चांगलीच' विचारपूस होई. वीज गावातच काय पण राजापुरातही नव्हती. म्हशी आणि जोताच्या बैलांसाठी पेंडीचे १पोते एवढे सामान वर्षातून एकदा भरले जात असे. घरच्या शेतीचे भात साधारण वर्षाला पुरेल एवढेच. भातानंतर उडदाचेही पिक घेत असू. त्यामुळे तूरडाळ सणावारी आणि एरवी उडदाचे वरण, कुळथाचे पिठले असेच असे. भात ,तांदळाची भाकरी,परसातल्या भाज्या,लोणचे मिरची असे जेवण! गव्हाची पोळी तर माहितीच नव्हती. चहा फक्त आई आणि वहिनी घेत. बाकी आम्ही सारे दूध घेत असू. म्हैस घरात होती ती कधी जास्त दूध देई तर उन्हाळ्यात आटे. नेमका तेव्हाच लहान प्रभाकर भांडे भरुन दूध हवे म्हणून हटून बसे. सफरचंदे,चिकू,अननसासारख्या फळांची माहितीसुद्धा नव्हती. दारातला फणस, करवंदे, जांभळे,रायवळ आंबे हा मेवा मात्र असे. फणसाचे गरे,भाजी,सांदणे असे अनेक प्रकार होत असत कारण एकेका झाडाला ४०/४० ,५०/५० फणस लगडत. सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सारे फणसमय असे. पण हे फक्त उन्हाळ्यात.
त्या काळी गावात शाळा नव्हती. गावात ब्राह्मणाची ८ घरे,त्यातील एका कुटुंबाची मुले तालुक्याच्या ठिकाणी शिकत. आमच्या घरी आम्ही भावंडं आणि चुलतभाऊ वगैरे मिळून ५/७ लहानमोठी मुले होती. नाटेकर नावाचे मास्तर जेवणावारी शिकवायला ठेवले होते. घरच्या ओटीवरच शाळा भरे. गावातली इतर मुलेही ह्या ओटीवरच्या शाळेत येत असत. अंगात सदरा, चड्डी नाहीतर लंगोटी आणि डोईवर टोपी असा पोषाख! सकाळी उठल्यापासून साधारण १२ वाजेपर्यंत आणि नंतर जेवणानंतर साधारण २ पासून संध्याकाळपर्यंत अभ्यास चालत असे. यत्ताबित्ता काही नव्हते. मुळाक्षरे,बाराखड्या,मोडीलिपी ,बे ते ३० पाढे. पावकी पासून औटकीपर्यंत तसेच अकरकी,एकोत्रीही शिकवित असत. मणाला ४०रु तर अडीच शेराचे किती? असले हिशेब असत आणि त्याकरता शेर,मणाची कोष्टके पाठ करावी लागत. तसेच पुस्ती काढण्यावर भर असे. खुरमांडी घालून,पुष्टीपत्रावर कागद ठेवून,शाईत बोरु बुडवून पुस्ती काढावी लागत असे. रोज तास दोन तास पुस्तीचा तास चाले. "श्रीमंत सकलगुणालंक अखंडित त्रिकाल चरणी मस्तक ठेवून कृतानेक शिर साष्टांग नमस्कार.." अशा मायन्याने सुरुवात करुन मोडी पत्रलेखन चाले. बोरुसाठीचे बारीक बांबू तासून लेखणी तयार करत असत आणि शाई तयार करायला ताह्मनात पाणी ओतून त्यात हरडे फोडून टाकायचे आणि लोखंडी खिळा टाकून उन्हात ठेवून आटवायचे की त्याला काळा रंग येत असे. तीच शाई!
एकदा असाच पुस्तीचा तास चालू असताना माझा चुलत भाऊ म्हणाला,"मास्तर,माझा बोरु मोडला." "गाढवा,लेखणीस बोरु काय म्हणतोस? तुझ्या मनगटास गाढवाचं xxx म्हटले तर चालेल काय?" सगळे मोठ्याने हसलो म्हणून प्रत्येकाला २/२ रट्ट्यांचा प्रसाद मिळालाच. नाटेकर मास्तर मारायचे,ओरडायचे पण घरात तक्रार करायची सोय नव्हती. एकतर घरातच शाळा असल्याने आई,वहिनीचे लक्ष असेच आणि मास्तर मुलांच्या भल्यासाठीच ओरडतो,मारतो ह्यावर दृढ विश्वास! एकदा नेहमीसारखीच ओटीवर शाळा भरली होती. मास्तर शिकवत होते म्हणजेच पावकी,निमकी घोकणे चालू होते इतक्यात मास्तरांच्या डोक्यावर अभिषेक झाला. गडबडीने मास्तर उठून म्हणाले, " वरतून मांजरु मुतले वाटते." वरुन आवाज आला," मांजरु नव्हे, मी मुतलो,तुम्ही मला मारलेत म्हणून.." आम्ही सारे हसू दाबत ,मनातून खूष होऊन ५-६ वर्षाच्या प्रभाकराची करामत अवाक होऊन पाहत होतो. पुढे मग ही ओटीवरची शाळा बंद होऊन गावात शाळा सुरु झाली. नाटेकर मास्तर जाऊन खामकर मास्तर आले.
प्रतिक्रिया
13 Mar 2009 - 12:05 am | नंदन
मिपावर स्वागत. सुरूवात उत्तम झाली आहे. पुढील भागांची वाट पाहतो.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
13 Mar 2009 - 12:05 am | प्राजु
हा पहिला भाग आवडला. येऊद्या आणखी.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
13 Mar 2009 - 12:09 am | भडकमकर मास्तर
वामनसुत ,
लेखन आवडले.
खूप जुन्या काळातल्या कोकणातले वर्णन छान,..
अजून लेख येउद्यात..
पुलेशु
..
व्हेळा म्हणजे काय?
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
13 Mar 2009 - 12:10 am | प्राजु
व्हेळा.. व्हेळे.. बहुतेक हे गावाचं नाव असावं.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
13 Mar 2009 - 12:53 am | व्यंकु
गावाचे नाव व्हेळ आहे हे गाव रत्नागिरी जिल्ह्यात आहे लांजा तालुक्याच्या जवळ
13 Mar 2009 - 12:56 am | व्यंकु
लेख आवडला पुढचा भाग लवकर येऊ द्या
13 Mar 2009 - 1:02 am | बिपिन कार्यकर्ते
दमदार सुरूवात. खूप सराईतपणे लिहिलं आहे तुम्ही.
जुना काळ तंतोतंत उभा केलात डोळ्यासमोर. काळाच्या ओघात एकेकाळी अगदी सर्वसामान्य असणार्या गोष्टी कशा नाहीश्या होतात... बोरू, लेखणी, मोडी. आणि शाई घरच्या घरी बनवायची पद्धत... भारीच.
पुढचे भाग पटापट लिहा. वेळ नका घालवू अजिबात.
बिपिन कार्यकर्ते
13 Mar 2009 - 1:35 am | पक्या
मस्त लेखन. कोकणातील जुना काळ डोळ्यासमोर छान उभा केलात. पुढचे ही भाग येऊ द्यात लवकर.
13 Mar 2009 - 3:08 am | लवंगी
परत परत वाचल. डोळ्यापुढे जुन्या काळातील गाव उभे रहीले. पुढच्या भागाची वाट पाहातेय.
13 Mar 2009 - 3:11 am | शितल
मस्त लेखन.
लवकर पुढचा भाग ही लिहा.
13 Mar 2009 - 10:13 am | मुक्ता २०
पुढ्चे भाग लवकर येउ द्या..! :)
14 Mar 2009 - 2:32 pm | वैशाली हसमनीस
तुम्ही आणि लेख------! अरे बाप रे !मी धक्क्यातून अजून सावरले नाही.पण मनातून खूप बरेही वाटले.तुमच्या आठवणी अशाच शब्दबध्द करुन ठेवल्यात तर पुढील पिढ्यांना त्या वाचायला खूप आवडतील. तेरी माकासे !(धन्यवाद)
13 Mar 2009 - 1:02 pm | घाशीराम कोतवाल १.२
आम्हाला म्हनजे माझ्या पिढीला माहित नसलेल्या काहि गोष्टी समजल्या
जसे पावकि निमकि बोरु किवा शाई कशी बनवायची हे
अजुन येउ द्यात खुप वाचयला मिळेल
पु ले शु
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
13 Mar 2009 - 1:02 pm | सहज
सुरवात आवडली. पुढले भाग लवकर येउ दे.
13 Mar 2009 - 1:29 pm | शैलेन्द्र
खुपच सहजं, सुंदर आणि खरे लेखन..
अजुन वाचायला आवडेल(खरंतरं थोड असं जगायलाही आवडेल)
13 Mar 2009 - 1:57 pm | प्रकाश घाटपांडे
येउं द्या आमच्यासारख्या घाटी मान्सांना कोकन चे वर्नन वाचताना मज्जा येते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
13 Mar 2009 - 3:15 pm | मदनबाण
वामनराव एकदम मस्त लिहले आहे...अजुनही वाचावयास आवडेल...:)
मदनबाण.....
"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
13 Mar 2009 - 3:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
छान लेखन, आवडलं.
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
13 Mar 2009 - 4:04 pm | वामनसुत
व्हेळ हे लांजा तालुक्यातले छोटेसे खेडे आहे, तिथल्या दिवसांच्या ह्या आठवणी!
माझ्या पहिल्याच प्रयत्नाला तुम्हा सर्वांची मिळालेली दाद वाचून बरे वाटले.
धन्यवाद.
13 Mar 2009 - 8:14 pm | प्रमोद देव
वामनसुतराव लेखन अगदी सहजसुंदर झालंय.
येऊ द्या अजून.
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
13 Mar 2009 - 9:38 pm | चतुरंग
कोकणातला जुना काळ ऐकूनही फारसा माहिती नाही तो डोळ्यांसमोर उभा केलात.
आजच्या शहरीकरणाच्या काळात अशा आठवणी आपल्या मुळांशी असलेलं नातं पुन्हा जागं करतात.
बोरु, घरगुती शाई, पुस्ती हे स्गळे मनोरंजक वाटते! पुढे वाचायची खूप उत्सुकता आहे लिहिते रहा.
(पुस्ती जोडणे हा वाक्प्रचार ह्या पुस्तीवरूनच आला असावा का?)
चतुरंग
13 Mar 2009 - 9:50 pm | अवलिया
वा! मस्त लेखन !!!
--अवलिया
14 Mar 2009 - 2:04 am | हुप्प्या
साधारण कुठल्या वर्षीची ही हकीकत आहे? ३०-४० वर्षे की ५०-६० वर्षे?
14 Mar 2009 - 6:49 am | सुक्या
मस्त हो वामनसुत . . छान सुरुवात झाली. पुढचे भाग येउदेत लवकर.
बाकी मी लहान असताना आजोबांनी अक्षर सुधारण्यासाठी बोरुने बरेच लिहुन घेतले होते. माझे आजोबा म्हणजे हाडाचे शिक्षक. तुमचा लेख वाचुन त्यांची आठवण आली.
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
14 Mar 2009 - 9:15 am | विसोबा खेचर
वामनसुतराव,
वरील सर्वांशी सहमत. उत्तम, सहजसुंदर लेखन! कृपया आमचीही दाद स्विकारा..
अजूनही खूप खूप लिहा आणि स्मृतीगंध असाच दरवळू द्या, ही विनंती...
तात्या.
14 Mar 2009 - 11:38 am | पर्नल नेने मराठे
माझी आईचे लहानपण भु गावात गेलेय. तिच्या तोण्दुन राजापुर, लान्जा ही गावे ऐकली आहेत.
चुचु
21 Oct 2013 - 7:21 am | खटपट्या
अरे हे भू गाव तर माझ्या गावाच्या शेजारचे गाव !!!
14 Mar 2009 - 2:17 pm | शक्तिमान
छान आहे...
पुस्ती म्हणजे काय ते नक्की समजले नाही. कृपया खुलासा करावा...
(अंदाजे मी "लिहीण्याचा सराव करणे" असा अर्थ लावला आहे...)
17 Mar 2009 - 12:46 am | संदीप चित्रे
आधीच तुम्ही वर्णन केलेला काळ जुना, त्यात सगळं गावाकडचं आयुष्य.
आमच्यासारख्या शहरात वाढलेल्या आणि 'मोडी' लिपीबद्दल फक्त ऐकून असलेल्या पिढीला ही लेखमाला खूप उपयोगी होईल.
21 Oct 2013 - 6:37 am | स्पंदना
स्मृतीगंध-२ "व्रतबंध"