""कालचक्र""

मृगनयनी's picture
मृगनयनी in जे न देखे रवी...
22 Nov 2008 - 4:42 pm

रम्य एक संध्या
कोमल गंधार,
कुसुंबी किनार
क्षितिजाला...

तेजस्वी रवीची
किरणे सोनेरी,
लाली गालावरी
संध्येच्या का !?!

मुग्ध प्रियतमा
संध्या ती आरक्त,
का 'रवी' आसक्त
'निशे'वरी !

दुखावली 'संध्या'
हळवा गंधार,
का क्षितिजापार
गेला सखा.....

हवेत गारवा
नभी चंद्र तारे,
मादक इशारे
निशेचेही...

आसुसला 'रवी'
निशेच्या छायेला,
कौमुदी कायेला
चंद्र साक्ष...

मिठीत 'रवी'च्या
'निशा'ही उन्मुक्त,
प्रकाश अव्यक्त
अंधारला...

मेघाचा मल्हार,
कित्येक प्रहर,
प्रणय कहर,
आसमंत.....

पहाट भैरवी
तिमिर छेदून,
गगन भेदून,
झंकारली.

उषेचे मांगल्य,
रक्तिम अवनी
श्यामल रजनी,
निस्तेजली...

देखण्या रवीचे,
चढू लागे तेज
परमोच्च ओज,
माध्यान्हीचे.

हळूहळू 'रवी'
झुके पश्चिमेला,
'संध्ये'ला भुलला,
सखा तिचा...

'रवी' अव्याहत,
तीच 'संध्या', 'निशा'...
हे कालपुरुषा...
तूचि धन्य!!!

-> रवि(वार) वर प्रेम करणारी
"मृगनयनी"

कविताप्रकटनविचारप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

जैनाचं कार्ट's picture

22 Nov 2008 - 4:55 pm | जैनाचं कार्ट (not verified)

कालचक्र आवडली ~!

तु कविता मात्र छान करतेस हे नक्की :)

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

ए नयने .. ही कविता मी वाचलेली ना पुर्वी ... :)
बेष्ट आहे गं ...

मिठीत 'रवी'च्या
'निशा'ही उन्मुक्त,
प्रकाश अव्यक्त
अंधारला...

मेघाचा मल्हार,
कित्येक प्रहर,
प्रणय कहर,
आसमंत.....

टाळ्या .... जबरान ...

- लाळझन

दत्ता काळे's picture

22 Nov 2008 - 5:15 pm | दत्ता काळे

फार सुरेख

प्रकाश अव्यक्त
अंधारला...

हे ++१

घाटावरचे भट's picture

22 Nov 2008 - 5:45 pm | घाटावरचे भट

मस्त कविता...

आनंदयात्री's picture

23 Nov 2008 - 9:35 am | आनंदयात्री

सुंदर कविता आहे.

सोनम's picture

3 Dec 2008 - 10:22 am | सोनम

कविता सु॑दर आहे. कविता करणे आवडते का? तर मग अजून अशीच छान कविता करा.

कृष्णलीला's picture

10 Jul 2019 - 1:57 am | कृष्णलीला

मस्त. सुंदर कविता.

राघव's picture

17 Jul 2019 - 1:46 pm | राघव

आवडली!

जालिम लोशन's picture

16 Jul 2019 - 5:28 pm | जालिम लोशन

सुंदर

श्वेता२४'s picture

17 Jul 2019 - 2:28 pm | श्वेता२४

.

प्रचेतस's picture

17 Jul 2019 - 2:32 pm | प्रचेतस

अप्रतिम रचना