स्मृतीगंध-१
स्मृतीगंध-२
स्मृतीगंध-३
स्मृतीगंध-४
स्मृतीगंध-५
स्मृतीगंध-६
स्मृतीगंध-७
प्रभाकर मॅट्रीक झाल्यावर तो ही नोकरीच्या शोधात मुंबईस आला. अण्णाकडेच आम्ही राहत होतो. त्या दोन खोल्यात अण्णा,वहिनी ,तीन मुले राहत असल्याने माझ्याबरोबरच प्रभाकरही गॅलरीत अथवा गच्चीत झोपू लागला. पुढे पावसाळा आला तरी प्रभाकराच्या नोकरीचे काही जमेना. कोकणात शेतीची कामे अडली होती आणि इकडे ग्यालरीत पावसामुळे झोपायची पंचाईतच होत असे. त्यामुळे त्यास कोकणात परत पाठवून दिले आणि नोकरीचे काही जमले की त्याने परत येण्याचे ठरले. इकडे बाळही मॅट्रीक झालेला होता. त्यामुळे राजापुरातले कानेटकर मास्तर काही दिवसांनी त्यास घेऊन मुंबईत आले. आले ते अण्णाकडेच. प्रभाकराऐवजी आता बाळ आणि मी राहू लागलो. मास्तर त्याच्या नोकरीची खटपट करत होते. शॉर्टहँड टाइपिंगसाठी त्यालाही बर्व्यांच्या क्लासात घातला. दोघेही ग्यालरीत नाहीतर गच्चीवर झोपत असू. गिरगावात ४ वाजता नळ येत असे. त्यामुळे साडेचारच्या सुमारास उठून,आवरुन कपडे धुवून वाळत घालीत असू. साडेपाचच्या सुमारास वहिनी चहा देई.तो घेऊन सहाला मी जो बाहेर पडत असे तो बर्व्यांचा क्लास, बॅंक सारे करुन रात्री काळ्यांच्या गजानन भोजन गृहात जेवून नवाच्या सुमारास घरी परतत असे.
बाळचा टाइपिंग क्लास आणि नोकरीची खटपट चालू होती. अशातच तो तापाने फणफणला. ताप काही उतरेना. टायफॉइडचे निदान झाले.नवलकर डॉक्टरांचे औषध सुरू केले. अण्णाच्या त्या २ खोल्यातील एका खोलीत हा निजून असे. तापाने त्याची शक्ती पूर्ण गेली होती. मोसंबीचा रस आणि दूध याखेरीज दुसरे काही त्यास द्यायचे नसे. मी मध्येच येऊन त्यास रस काढून देई. १४व्या दिवशी ताप काढला. अंगाखालील गादी घामाने चिंब भिजली आणि बाळ अंग दुखते म्हणून रडत असे. मी सकाळ,संध्याकाळ त्याचे अंग पुसत असे. रस देत असे. हळूहळू त्यास पेज देण्यास सुरुवात केली. वहिनी दुपारी पेज करुन देत असे. पाच सहा दिवसांनी तो चालायला लागला. नंतर तो माझ्याजवळ सारखे भूक,भूक करत असे परंतु त्यास पेज,पातळ भात याखेरीज दुसरे इतक्यात देऊ नका असे सांगितल्यामुळे पंचाईत होत असे. अण्णावैनीकडे काही मागायला नको वाटत होते. ते आमच्यासाठी करत होते तेच खूप होते. एक दिवस तो माझेबरोबर काळ्यांच्या भोजनगृहात आला. इतक्यातच तो टायफॉइडमधून उठला आहे असे समजल्यावर काळ्यांनी त्याला पोटभर पातळभात खायला दिला. मग दुपारी काळ्यांच्या खानावळीत त्याचे पथ्याचे जेवण सुरू झाले. १५,२० दिवसात त्याची तब्येत सुधारली. त्याच्या नोकरीच्या शोधास आम्ही परत सुरुवात केली.
एक दिवस एका सरकारी कचेरीत कारकून भरती करणेकरता अर्ज मागवत असल्याची जाहिरात त्याने आणली. पण बाळ त्यांच्या नियमात अंडरएज होता. प्रभाकर मात्र त्या रिक्वायरमेंटमध्ये बरोब्बर बसत होता, पण तो तर कोकणात! चर्चगेटच्या त्यांच्या ऑफिसातून मी फॉर्म आणला आणि प्रभाकराच्या नावाने भरुन त्याची सही ठोकून अर्ज पाठवूनही दिला. पुढे दोन महिन्यांनी परीक्षेला बसण्याचे पत्र आले. परीक्षा त्याच रविवारी सिडनेहॅम कॉलेजातच होती. त्याकाळी फोनबिन काही नव्हते. दोनच दिवसाच्या अवधीत व्हेळात प्रभाकरास हा निरोप देणार तरी कसा? चालून आलेली संधी घालवायला जीव होईना, काही सुचेना. शेवटी परीक्षेच्या दिवशी त्याच्या नावचे पत्र घेऊन मीच सिडनेहॅम कॉलेजात परीक्षेला बसलो. त्याकाळी पत्रावर नुसता सीट नंबर असे. फोटो बिटो काही नसे, त्यामुळे ते चालून गेले. संध्याकाळी घरी आल्यावर अण्णाने रविवार असून दिवसभर कोठे होतास अशी विचारणा केली. तेव्हा पत्र दाखवून प्रभाकराच्या नावे परीक्षा देऊन आल्याचे सांगितले. अण्णा,वैनी दोघेही आनंदाने हसू लागली. पण अण्णा म्हणाला,"बाहेर कुठे बोलू नकोस,कुठे समजले तर पकडून नेऊन फिर्याद करुन तुरुंगात घालतील." मी जरा घाबरलो पण रोजच्या रहाटगाडग्यात ती बाब मागे पडली. पुढे चार, आठ दिवसातच बाळला चर्चगेटच्या फिलिंजर ह्या घड्याळ कंपनीत ५०रु पगारावर स्टेनो म्हणून नोकरी लागली.
अशातच एक दिवस प्रभाकराच्या नावे पत्र आले. लेखी परीक्षेत पास होऊन त्यास मेडिकलसाठी बोलावले होते, मध्ये १०,१२ दिवसांचा अवधी होता म्हणून लगेचच व्हेळात पत्र धाडून त्यास बोलावून घेतले. भायखळ्याच्या सरकारी हॉस्पीटलात मेडिकल परीक्षा होती. मी अर्ज भरतेवेळी वजन,उंची अंदाजानेच लिहिले होते, त्यात बराच फरक पडला होता. आम्ही जरा मनातून घाबरलोच होतो. पण तशी काही अडचण न येता १५ दिवसातच त्यास नेमणूक केल्याचे पत्र आले. आम्ही आता खरच आनंदलो ,परंतु एखाद्या निवांत क्षणी कांदिवलीच्या 'इंडियन प्लास्टीक'चे दिवस आठवत. अण्णा मे महिन्यात कोकणात गेला की मी गोरेगावला नानाकडे बेलवलकरवाडीत रहायला जात असे. त्यावेळी तळवलकरांच्या खानावळीत मी जेवत असे. दुपारच्या डब्यासाठी पोळी आणि गूळ ते मजला देत असत. त्यावेळी गोरेगावात पाण्याचा फार तुटवडा होता. वाडीत पाण्याची मोठी विहिर होती पण उन्हाळ्याच्या मध्यावर विहिरीचे पाणी तळ गाठू लागे. काढण्याने पाणी काढणे जिकिरीचे होत असे. मग मी विहिरीत उतरुन भांड्याने पाणी काढण्यात भरत असे आणि नाना ते वर ओढून घेत असे. रोजंदारीवरचे ते १रु १०आणे सुध्दा तेव्हा आधार वाटत. त्या दिवसांपेक्षा आता खूपच बरे दिवस आले होते.
अण्णाच्या त्या लहानशा जागेत आम्ही तिघे भाऊ आणि त्याची ३ मुले ,अण्णावैनी राहत होतो.पण आता अण्णाला किती त्रास द्यायचा असे सारखे वाटू लागले. गिरगावात तर जागा घेणे शक्य नव्हते. गोरेगाव,मालाडसारख्या ठिकाणी नाना,काकांच्या मदतीने जागा पाहू लागलो पण डिपॉझिट साठी १०००रु, कुठून आणणार? पैसे उभे कसे करायचे ही चिंता परत भेडसावू लागली. आमचे मामा त्यावेळी कल्याणला कवडीकरांकडे राहत होते. डोंबिवलीत जागा असल्याची बातमी त्यांनी आणली. स्टेशनपासून चालत १० मिनिटाच्या अंतरावर २ खोल्यांची जागा होती.जरी लाइट,नळ नव्हते,विहिरीचे पाणी शेंदून घ्यायचे होते तरी जागा बरी वाटली. अर्थात दुसरा पर्याय तरी कोठे होता? ३५रु, भाडे दरमहा आणि डिपॉझिट म्हणून तीन महिन्यांचे भाडे त्यांनी सांगितले तेव्हा लगेचच १०५रु आठल्यांना देऊन आम्ही जागा ताब्यात घेतली. मामांनी थोडी भांडी आणून दिली. स्टोव्ह आणला आणि आम्हा भावांचे बिर्हाड सजले. आई व वहिनीस पत्र पाठवून राजापूरचे बिर्हाड बंद करून वत्सु आणि वहिनीस डोंबिवलीत आणले.
त्या दोघी डोंबिवलीत आल्याने आम्हाला आता घरचे जेवण मिळू लागले होते. सारेजण एकत्र आल्यामुळे त्या बिर्हाडाला घरपण आले होते,आईच तेवढी व्हेळात राहून शेती पाहत होती.
वत्सु १०वी झाली तरी तिच्या नोकरीचे काही कुठे जमत नव्हते. आता तिच्या लग्नाचेही पहायला हवे होते. त्यातच अण्णा आणि वैनीने माझ्यासाठी मुली पहायला सुरुवात केली. त्यांनी एकदा मला फसवून मुलगी पहायला नेले. एकुलती एक मुलगी आणि तिचे वडिल रिटायर्ड झाले होते. हिचे लग्न झाले की मुंबैतील जागा मुलगी आणि जावयास देऊन ते गावी जाणार होते. अण्णा वैनीला हे स्थळ अगदी पसंत होते. मुलगीही चांगली होती, शिवाय मुंबईतील जागा,खरोखरच कुठेही नाव ठेवायला जागा नव्हती. पण मनात विचार आला, हिच्याशी लग्न करून मुंबईत रहावयास गेलो तर घरातल्या इतर सर्वांकडेच दुर्लक्ष होईल. शिवाय वत्सुचे लग्न नोकरी नसल्याने जमायला अवघड जात होते. आठ दिवस विचार केला आणि शेवटी ,वत्सुचे लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही असे आण्णा, वैनीस सांगितले. अण्णा वैनी दोघेही माझ्यावर हातची चांगली संधी घालवली म्हणून वैतागले. पुढे अनेक दिवस दोघेही माझ्याशी बोलणे टाळत असत. ते माझ्या हिताचेच पाहत होते आणि मी घराचे हित!
प्रतिक्रिया
19 Mar 2009 - 12:21 pm | श्रावण मोडक
टिपिकल संघर्ष. सोप्या वाक्यांत टिपला आहे. वाचतो आहे...
19 Mar 2009 - 12:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
वाचत आहे, पुढचा भाग उद्या येणार याची खात्री आहेच.
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
19 Mar 2009 - 2:34 pm | अवलिया
हा ही भाग उत्तम उतरला आहे
--अवलिया
19 Mar 2009 - 6:12 pm | शितल
सहमत. :)
19 Mar 2009 - 6:28 pm | छोटा डॉन
असेच म्हणतो ...
नेहमीप्रमाणे पुढच्या भागाची वाट पहात आहे.
------
( वामनसुतांचा फॅन)छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
19 Mar 2009 - 8:41 pm | प्राजु
+५
मस्तच. उद्याच वाचायला मिळेल पुढचा भाग ही खात्री आहे.
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
19 Mar 2009 - 12:28 pm | घाशीराम कोतवाल १.२
ते माझ्या हिताचेच पाहत होते आणि मी घराचे हित!
हे मात्र पटल मला
शेवटी परीक्षेच्या दिवशी त्याच्या नावचे पत्र घेऊन मीच सिडनेहॅम कॉलेजात परीक्षेला बसलो.
वामनसुत साहेब काय आपलि डेअरिंग ओ चक्क भावाच्या नावे पेपर लिहिलात मान गये !
भायखळ्याच्या सरकारी हॉस्पीटलात मेडिकल परीक्षा होती. मी अर्ज भरतेवेळी वजन,उंची अंदाजानेच लिहिले होते, त्यात बराच फरक पडला होता. आम्ही जरा मनातून घाबरलोच होतो.
बाकि त्याकाळी एव्हडा काटेकोरपणा नव्हते पाहत ना कारण लायक उमेदवार फार कमीच असत चांगले शिकलेले
(वामन सुतांचा फ्यान )घाशीराम कोतवाल
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
19 Mar 2009 - 12:32 pm | मदनबाण
व्वा...
आप लिखिंग तो हम पढिंग....
अगले भाग की वाट पाहिंग. :)
(वाचक)
मदनबाण.....
"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
19 Mar 2009 - 12:42 pm | दिपक
हाही भाग उत्तम !
शेतातल्या एखाद्या झाडाखाली बसुन आजोबा त्यांचा जिवानुभव सांगताहेत आणि आम्ही सर्व भान विसरुन ऎकत आहोत असे वाटतेय.
मस्तच :)
20 Mar 2009 - 6:13 am | लवंगी
माझी आजी असच तिचे अनुभव सांगत असे. त्याची आठवण होते.
19 Mar 2009 - 2:33 pm | मनिष
थोडा निवांत वेळ मिळाला म्हणून आज आठही भाग वाचले, आणि सरळ, सोपे आणि वेगळ्या अनुभवविश्वाचे लिखाण आवडले.:)
पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत आहे.
19 Mar 2009 - 3:16 pm | सहज
वाचत आहे. :-)
सध्या १२ ते १ दुपार भारतीय वेळ जमवत आहात. सवय झाली आहे. उद्या भेटूच वेळेवर.
19 Mar 2009 - 6:02 pm | स्वाती२
वामनसुत, तुमची लेखमाला खूप आवडली. भाषा सोपी असल्याने माझ्या मुलालाही वाचायला मजा येतेय आणि बरेच काही शिकायला मिळतेय.
19 Mar 2009 - 7:31 pm | प्रकाश घाटपांडे
उत्कंठावर्धक लेखन
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
19 Mar 2009 - 7:40 pm | चित्रा
वेगळ्या काळात घेऊन जाणारे आत्मकथन. लिहीण्याची साधीसरळ पद्धत आवडते आहे.
19 Mar 2009 - 8:28 pm | सुक्या
इतक्या कष्टानंतर तुम्ही आता सुखाने राहायला लागला हे पाहुन जरा बरे वाटले.
इतक्यातच तो टायफॉइडमधून उठला आहे असे समजल्यावर काळ्यांनी त्याला पोटभर पातळभात खायला दिला. मग दुपारी काळ्यांच्या खानावळीत त्याचे पथ्याचे जेवण सुरू झाले.
हे मात्र खास.
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
19 Mar 2009 - 9:24 pm | लिखाळ
छान.. हा भाग सुद्धा आवडला.. पुढे वाचण्यास उत्सुक !
-- लिखाळ.
19 Mar 2009 - 10:10 pm | क्रान्ति
सहमत!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
20 Mar 2009 - 3:22 pm | वामनसुत
सर्व प्रतिसादकांना मनःपूर्वक धन्यवाद.
21 Oct 2013 - 7:21 am | स्पंदना
स्मृतीगंध-९ " शुभमंगल"