आज शिवजयंतीच्या निमित्ताने शिवरायांच्या चरणी मी हे काव्य विनम्र भावाने अर्पण करतो...
पुलवामा निषेधे कॅन्डल लावून आलो | “उरी” पाहताना, “जय हिंद” म्हणालो ||
पण, बलोपासनेची, महती विसरलो | असे षंढ आम्ही कैसे निपजलो ||
सायंकाळी हवी आम्हा दारूची बाटली | संडे टू संडे खातो मटणाची ताटली ||
पोहणे धावणे नव्हे, चालाणेही विसरलो | असे षंढ आम्ही कैसे निपजलो ||
स्वराज्य गुढी रोविली, शिवबाने | स्फुलिंग जे चेतले, जिजाउने ||
स्मार्टफोन लेकरांच्या, हाती देऊन बसलो | असे षंढ आम्ही कैसे निपजलो ||
ज्ञानातुकयाची, शिकवणी व्यर्थ गेली | स्वार्थाने आमुची, मती अंध केली ||
आम्ही बाजीरावाची, जात शोधित बसलो | असे षंढ आम्ही कैसे निपजलो ||
स्त्रियांना फिगरची, फिकर जास्त आहे | मेकप मागे आपूले, वय लपवू ती पाहे |
लक्ष्मीबाईचे तेज, आम्ही विसरलो | असे षंढ आम्ही कैसे निपजलो ||
जर पुन्हा एकदा, जाहला सव्विस अकरा | खचित पुन्हा आमुचा, होणार बकरा ||
प्रतिकार कैसा, ते करणे विसरलो | असे षंढ आम्ही कैसे निपजलो ||
आम्हावर उद्या कोणी, चालून आले | परतवू तया कैसे, नाही ठरवले ||
मानगूट वाळूत, खुपसूनी बसलो | असे षंढ आम्ही कैसे निपजलो ||
बलोपासना जिम मध्ये, होत नाही | हाती शस्र येताच, थरकाप होई ||
नाठाळा माथी काठी, हाणणेही विसरलो | असे षंढ आम्ही कैसे निपजलो ||
कराटे पोहणे आणि, फुटबॉल खेळा | सुर्यनमस्कारही, दररोज घाला ||
पोलादी जाहली जर, मनगटे क्रांती साठी | षंढ म्हणाण्याची नाही, कुणाचीच छाती||
यावर काही विचार झाला तर भरून पावले
जर नुसते दिवा स्वप्नच ठरले तर?
पण हे कसे ठरवणार? तर....
काव्य वाचिता आम्हा, बहु स्फुरण चढले | त्वरेने व्हॉट्सपी, त्यासी फॉरवर्ड केले ||
क्षणार्धात नव्या, मेसेज कडे वळालो | तर म्हणा षंढ आम्ही ऐसे निपजलो ||
पैजारबुवा,
प्रतिक्रिया
19 Feb 2019 - 9:38 am | डँबिस००७
जबरदस्त!!
19 Feb 2019 - 9:49 am | चिनार
माउली... जबर्दस्त !!
प्रतिसाद देऊन कर्तव्य केले | अन लगेच काथे कुटाया घेतले |
टोमणे अन चिमटे रोजचेच आम्हा | हेच आमुचे शस्त्र अन हाच अमुचा बाणा |
"चालू" घडामोडी हीच आमची भाकर | त्यांनाच देतो शिव्या अन त्यांचेच आम्ही चाकर |
काय विचारता आम्हा षंढ कैसे निपजले | इथं पेरले वेगळे अन रोपटे भलंतेच उगवले
19 Feb 2019 - 10:04 am | चिनार
माऊली..ह्याच विषयावर काही नवीन सुचले आहे..तुमच्या कवितेचा आधार घेऊन काही नवीन लिहिण्याची परवानगी द्यावी..
19 Feb 2019 - 11:19 am | ज्ञानोबाचे पैजार
लिहिण्यासाठी परवानगी ती कसली. जर माझ्या लिहिण्यामुळे कोणी विचार करण्यास उद्युक्त झाला तर तेच माझ्या लेखणीचे यश म्हणायचे.
टिकात्मक, विरुध्द बाजूच्या लिखाणाचे किंवा विडंबनाचेही मनापासून स्वागतच आहे.
लिहीताना कोणताहि मुलाहिजा न बाळगता खुशाल लिहा, मुक्त पणे लिहा.
पैजारबुवा,
19 Feb 2019 - 10:28 am | यशोधरा
बुवा, उत्तम लिहिलेत.
19 Feb 2019 - 12:47 pm | खिलजि
जबराव जबराव जबराव
खत्रूड म्हणजे एकदम खत्रूड
मस्तच है , पै बु काका
19 Feb 2019 - 1:02 pm | विनिता००२
वास्तव :(
सुरेख लिहीलेत __/\__
19 Feb 2019 - 1:04 pm | डॉ सुहास म्हात्रे
:( दुर्दैवाने हे खरे आहे.
19 Feb 2019 - 1:21 pm | पलाश
मर्मभेदक!! _/\_
19 Feb 2019 - 10:11 pm | अनन्त्_यात्री
आरसे दाखवलेत!
19 Feb 2019 - 11:10 pm | नाखु
ह्या षंढपणाला "सर्वधर्मसमभाव चे लेबल लावून का मानवतावाद वेष्टणात गुंडाळून ठेवू, नाहितर अहिंसा परमोधर्म याच्या कागदात पुडी बांधू,असं करतो थेट उच्च भारतीय अनाक्रमण परंपरेच्या बेगडाने रंगवतो.
म्हणजे मी पुढच्या ढकलपत्रात शोकसंदेशात जळजळीत इशारे द्यायला मोकळा!!
मायबापा रामदासा व्यर्थ तू भांडला, तुझी जात शोधता अर्थ तो सांडला!!
वाटूनी संत हते आम्ही घेतले!!इतीहासातून वेचले सोयीचे दाखले!
पैजारा नका दाखवू आरसा,चालवू आम्ही (शुंभ) वारसा!!
शुंभासमान ढकलपत्रात आलेला नाखु पांढरपेशा
20 Feb 2019 - 10:18 am | ज्ञानोबाचे पैजार
शुंभ घडवण्याची फॅक्टरी | लावीली आहे घरोघरी |
शिक्षणाचे बजारी | यांची नसे उणीव ||
बाप म्हणे शिकवणी लावू | मायम्हणते ताजेच खाउ |
खेळायला नको जाउ | धडपडशील कुठे तरी ||
लहान पोरे जणू हत्तीची पिले | बर्गर पिझा खावोनी माजले |
घरच्या भोजनास नाक मुरडीले | शेण खावोनी बाहेरी ||
हाती घेवोनी स्मार्ट फोन | हत्ती हलेना सोफ्या वरुन |
टिव्ही पाहती रात्री जागून | तेच डोक्यात भरलेले ||
पैजारबुवा,
7 Mar 2019 - 9:20 pm | अभ्या..
केवळ सत्य माऊली, केवळ सत्य.
भाषा अगदी टँकर लावतीय तुमच्या दारात.
20 Feb 2019 - 3:19 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
उत्स्फुर्त !!
7 Mar 2019 - 8:54 pm | हणमंतअण्णा शंकर...
इरावती कर्व्यांचे "युगांत" च्या अंताचे महावाक्य आठवले. बाकी असो.