स्मृतीगंध-५ " त्रिपुरी पौर्णिमा"

वामनसुत's picture
वामनसुत in जनातलं, मनातलं
16 Mar 2009 - 12:49 pm

स्मृतीगंध-१
स्मृतीगंध-२
स्मृतीगंध-३
स्मृतीगंध-४

दिवाळीच्या सुमारास पिके तयार होतात त्यामुळे सणाला घरात धान्यधुन्य भरलेले असे. फराळाला 'घरी कांडलेल्या' पोह्यांचा चिवडा, रव्याचे लाडू, करंज्या,शंकरपाळे आणि कडबोळी असत. चकल्या केलेल्या आठवत नाहीत. दिवाळीच्या पहाटे पाणचूल रसरसून पेटवत असू. अंगाला आई तेल लावत असे आणि घरातच तयार केलेले उटणे लावून अभ्यंगस्नान होई. त्याच दिवशी वासाचा एकुलता एक साबण ]हमाम' लावत असू. लक्स,मोती सारखे इतर सुवासिक साबण तर आम्हाला माहितीच नव्हते. इतर वेळी आंघोळीकरता रिंगे म्हणजे रिठे लावत असू. बायकामाणसे रिठे व शिकेकाईने नहात असत. नंतर देवाला नेवैद्य दाखवून फराळ केला जाई. दिवाळीच्या पहिल्या दिवसाला 'चावदिवस' असे तेथे म्हणतात.ह्याच दिवशी गावातील मुले,बायका,गडीमंडळी असे सारेजण पोहे मागावयास येत असत. त्यांना प्रत्येकी मूठ,मूठ पोहे देण्यात येत असत.पाटील व इतर गावकरी मंडळींना पंचपात्री भरुन पोहे देत असू. पोहे मिळाल्यावर आनंदित होऊन ते आपापल्या घरी जात असत. आता मात्र पोहे बाजारात उपलब्ध झाल्याने ही प्रथा जवळजवळ बंदच झाली आहे. फटाके म्हणजे बांबूची नळी करुन त्यात आपट्याची पाने घालायची आणि पिचकारीसारखे मागून दुसर्‍या काठीने ती पुढे ढकलली की आतील पाला फोर्सने बाहेर पडताना आवाज येत असे. आपट्यांच्या पानांसारखीच कधीतरी तिरफळेही घालत असू, त्यांचा आवाज पानांपेक्षा जोरात येत असे पण तिरफळांपेक्षा आपट्याची पानेच मुबलक उपलब्ध असत. हेच आमचे फटाके!

परंतु दिवाळीपेक्षाही व्हेळ आणि आसपासच्या गावांत दिवाळीनंतर येणार्‍या त्रिपुरारी पौर्णिमेचे महत्त्व फार! त्रिपुरी पौर्णिमेचा उत्सव जुगाईदेवीच्या देवळात आजही होतो.त्यास गावकरी 'टिपूर' असे म्हणतात. टिपरासाठी गावोगावहून आपल्या मूळाकडे लोक येतात. जुगाईच्या डोंगरावरच्या राईत पाषाणरुपी ब्रह्मदेव वसला आहे.ब्रह्मदेवाचे देऊळ कोठेच नसते. त्याविषयीची कथा सांगतात ती अशी , एकदा ब्रह्मा,विष्णु,महेश काही बोलत बसले असता ब्रह्मदेव खोटे बोलले. राग येऊन विष्णुने त्यांना शाप दिला,"तुझे कोठेही घर होणार नाही.तू असाच उन्हातान्हात राहशील." म्हणून ब्रह्मदेवाचे कोठेच देऊळ बांधलेले आढळत नाही. त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी दुपारी राईतील ब्रह्मदेवाजवळ समाराज्ञा होते. समाराज्ञा म्हणजे गावातील सर्व मंडळी ब्रह्मदेवाजवळ जमतात,सडारांगोळ्यांनी तेथील जागा सुशोभित करतात. उपाध्ये तेथील पाषाणरुपी ब्रह्मदेवाची पूजा करतात व एकादष्णीही होते. तेथेच बाजूला ब्रह्मदेवाच्या नावचे एक शेत आहे, त्यावर कोणाची मालकी नाही,देवच त्या शेताचा मालक. त्यात गावकरी भात पिकवतात व ते तांदूळ प्रसादाच्या जेवणासाठी वापरले जातात.

गावातील मंडळी तेथे चर खणतात. म्हणजे जमिनीत लांबटसर खोदून त्यावर मोठाली तपेली,पातेली ठेवून,चरात लाकडे लावून विस्तव पेटवतात व भात,उडदाचे वरण, भोपळ्याची भाजी, तांदूळ+ उडीद घालून दळलेल्या पिठाचे वडे व घारगे हा स्वयंपाक दुपारी करतात. त्यासुमारास भाजीचे भोपळे जवळपास सगळ्यांच्याच परसात येतात आणि गावजेवणासाठी पुरवठ्याला येणारी भाजी म्हणून कदाचित भोपळ्याची भाजी करत असावेत. तसेच उडीदाचे पिक त्याभागात जास्त आणि तूर,मूग नाहीतच ,म्हणून मग उडदाचे वरण करीत असावेत. आजही गावातील मंडळीच स्वेच्छेने तेथे सेवा म्हणून स्वयंपाक करतात. कोणालाही आमंत्रण नसते तर सारे घरचेच कार्य समजून हजर राहतात. आपल्या जवळ असलेले दही,दूध,ताक,लोणचे,मिरची ,भाजीचे भोपळे असे जे असेल ते घेऊन ब्रह्मदेवाच्या पायाशी जातात. दुपारी दीडच्या सुमारास देवाला वरणभात,वडे,घारगे, भोपळ्याची भाजी असा नेवैद्य दाखवला जातो. तद् नंतर केळीच्या पानावर पंगत बसते. गावातले उत्साही स्त्रीपुरुष आपणहून वाढपाचे काम करतात. किती सुटसुटीतपणे आजही ही गावजेवणाची प्रथा चालू आहे. थाटमाट नाही, केटरर, आचारी नाही की ताटवाट्यांचा पसारा नाही. तेथेच उपलब्ध असलेली केळीची किंवा करंबेळाची पाने जेवावयास वापरतात तर तांब्याभांडे ज्याचेत्याने आपापले आणावयाचे असते. २ ते ३ हजार पान त्यावेळी सहज जेवते. तेथील जेवणाला एक वेगळाच रुचकरपणा असतो आणि कितीही वडे खा,बाधत नाहीत.वडे वाढताना एक,दोन असे न वाढता पाच पाच वडे एकदम वाढतात,त्यास पाचुंदा म्हणतात. एकमेकांना किती पाचुंदे खाल्ले अशी विचारणा केली जाते आणि जास्तीत जास्त पाचुंदे खाण्यासाठी पैजा लागतात. तरीही कधी जेवण कमी पडत नाही.

जेवणे झाल्यावर ब्रह्मदेवाची प्रार्थना करुन गार्‍हाणे घातले जाते. "जय देवा,ब्रह्मदेवा,म्हाराज्या.. सगळ्या बाळगोपाळांनी तुझ्याकडे येऊन ,तुला नेवैद्य दाखवून प्रसाद घेतला आहे.तरी आमचा सर्व प्रकारे जीवजीवडेपासून्,चोराचिलटापासून्,रोगराईपासून सांभाळ कर आणि अशीच सेवा दरवर्षी करुन घेत जा... होय देवा,म्हाराज्या.. " अशा प्रकारचे ते गार्‍हाणे असते.गार्‍र्‍हाणे घालून झाल्यावर नारळ फोडतात आणि प्रसाद घेऊन आपापल्या घरी जातात.

त्याच रात्री डोंगरावरील जुगाईदेवीच्या देवळात त्रिपुरीपौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो. बरोब्बर रात्री १२ वाजता भटजी दीपमाळेची पूजा सांगतात. प्रथम देवळातील तुळशीचे लग्न लावले जाते. नंतर ब्रह्मदेव,ढोपरोबा,गांगोबा ह्या राईतील देवांजवळ पणत्या लावल्या जातात. नंतर सर्व देवांची नावे घेऊन 'त्रिपुराच्या पूजेला या 'असे आवाहन केले जाते. नंतर टवळ्याची पूजा केली जाते. टवळे म्हणजे मोठा तेलाचा दिवा,त्यात जवळजवळ २ लिटर तेल मावते. तो पेटवून दीपमाळेवर सर्वात उंच ठेवायचा असतो. ही पूजा सोवळ्याने केली जाते, ह्या दीपमाळेच्या पूजेचा मान आमच्या घराण्याकडे आहे. माझे चुलतबंधू ती. अच्युतदादा कोठेही असले तरी ही पूजा करावयास तेथे हजर असत. आजही आमच्या घराण्यातील कोणीतरी ह्या पूजेसाठी मुद्दाम तेथे जातातच जातात. टवळे दीपमालेवर ठेवल्यानंतर प्रत्येक मानकरी दीपमालेवर चारही बाजूंनी वरपासून खालपर्यंत पणत्या लावत येतात. ह्या पणत्या लावण्यांवरुन गावकर्‍यांमध्ये मानापमान नाट्य कधीकधी रंगते.

ह्यानंतर देवळात पालखीसमोर धूप घातला जातो. सर्वजण हातात तेलाचे पेटते काकडे घेऊन,पालखी नाचवित, ढोलताशाच्या गजरात 'हरी बोला हरी बोला' असे म्हणत देवळाभोवती ५ प्रदक्षिणा घालतात. ह्या प्रदक्षिणा घालताना पालखी नाचवण्याच्या मानासाठी अहमहमिका लागते. पहाटेचे पाच साडेपाच होईपर्यंत पालकी नाचवली जाते. गावचे २ ते ३ हजार लोक ह्या कार्यक्रमात भाग घेतात. ह्या निमित्याने गावातले सारेजण हेवेदावे विसरून एकत्र येतात आणि मग कधीतरी मानापमानावरुन नवीन हेवेदावे निर्माण होतात जे सोडवण्यात कधीकधी पुढचे वर्षही सरत असे. परंतु कोर्टाची पायरी न चढता सारे एकत्र बसून प्रश्न,भांडणे सोडविली जात असत.पूर्वी रेडिओ ,टीव्ही अशी करमणुकीची साधने नसल्याने असे उत्सव हीच मोठी करमणूक असे.

ह्या प्रदक्षिणा पूर्ण होईपर्यंत टवळ्याचा दिवा तेवता राहिला पाहिजे असा संकेत आहे. त्याआधी दिवा गेल्यास गावावर काहीतरी संकट येणार असे समजले जाते. त्यामुळे टवळ्याचा दिवा तेवतो आहे ना ह्याकडे सर्वांचेच लक्ष असते. पाच प्रदक्षिणा संपल्यानंतर पालखी परत देवळात जाते आणि सोहळा संपतो. सारेजण मग आठवणी जागवित आपापल्या घरी जातात.

राहणीअनुभव

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

16 Mar 2009 - 1:25 pm | मदनबाण

मस्त...
केळीच्या पानावर पंगतीत जेवायची मजा काही औरच आहे... :)

मदनबाण.....

"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

विंजिनेर's picture

16 Mar 2009 - 1:32 pm | विंजिनेर

वडे वाढताना एक,दोन असे न वाढता पाच पाच वडे एकदम वाढतात,त्यास पाचुंदा म्हणतात. एकमेकांना किती पाचुंदे खाल्ले अशी विचारणा केली जाते आणि जास्तीत जास्त पाचुंदे खाण्यासाठी पैजा लागतात. तरीही कधी जेवण कमी पडत नाही.

(बहुदा कोकणातच) तेलच्या(तांदुळाचे घावन?) आणि गुळवणीचे(गुळ+दुध) जेवण असल्यावर, तेलच्या वाढतानासुद्धा अशाच ५-५ एकदम वाढतात. त्यालाही पाचुंदा म्हणतात

सहज's picture

16 Mar 2009 - 4:33 pm | सहज

अतिशय अप्रतिम मालीका. वाचतो आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Mar 2009 - 4:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पुढचा भागही असाच लवकर टाका.

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

अवलिया's picture

16 Mar 2009 - 5:27 pm | अवलिया

हेच म्हणतो

--अवलिया

शितल's picture

16 Mar 2009 - 7:51 pm | शितल

सहमत. :)

किट्टु's picture

17 Mar 2009 - 3:53 am | किट्टु

सहमत!!!

प्रमोद देव's picture

16 Mar 2009 - 5:25 pm | प्रमोद देव

सहजसुंदर आणि प्रवाही लेखन/निवेदन.
छान चाललंय नारायणराव,येऊ द्या अजून.

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

प्राजु's picture

16 Mar 2009 - 10:07 pm | प्राजु

एकेक प्रसंग डोळ्यापुढे उभा राहतो आहे.
येऊद्या अजून.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

क्रान्ति's picture

16 Mar 2009 - 10:17 pm | क्रान्ति

खूप मस्त वर्णन केलय प्रत्येक गोष्टीच. खरच एकेक प्रसंग प्रत्यक्षात पहातोय अस वाटत.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

भडकमकर मास्तर's picture

16 Mar 2009 - 10:22 pm | भडकमकर मास्तर

चांगले वर्णन...
आपला टंकनाचा वेगसुद्धा चांगला आहे...
असेच भराभरा भाग येउद्यात...
वाचत आहे...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

लिखाळ's picture

16 Mar 2009 - 10:27 pm | लिखाळ

वा.. फार सुंदर.. वाचत राहावे असे..
अजून लिहा...
-- लिखाळ.

सुक्या's picture

17 Mar 2009 - 6:09 am | सुक्या

खुप छान खुलवला आहे भाग. एका वेळेस पाच वडे वाढण्याची पद्धत आवडली. केळीच्या पानावर जेवण काही वेगळीच मजा देउन जाते. जळगाव कडे आजही लग्नकार्यात कधी कधी केळीच्या पानावर पंगत होते. मलाही १/२ दा वरणपोळी , वांग्याचे भरीत असा बेत असलेल्या लग्नात जेवण्याचा योग आला. अंगणात मांडी ठोकुन केळीच्या पानावर उठवलेल्या पंगतीची तुलना टेबलावर बसुन वाढण्याआधी चार वेळा 'वाढु का?' म्हणुन विचारनार्‍या केटरर च्या पंगतीशी कधीच होउ शकत नाही.

माझ्या गावात हरीनाम सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी अशीच गावपंगत उठते. शहरीपणाची झुल भिरकावुन चप्पलेवर बसुन मनसोक्त लापशी हादडण्यातली मजा ती खाणार्‍यालाच माहीत . :D

(गावपंगतीचे आमंत्रण नसतानाही हादड्णारा) सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

स्वाती's picture

17 Mar 2009 - 10:34 pm | स्वाती

सारे भाग वाचले, आवडले. जुन्या कोकणाचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते.

वामनसुत's picture

17 Mar 2009 - 10:36 pm | वामनसुत

सर्व प्रतिसादकांना मन:पूर्वक धन्यवाद.

चित्रा's picture

18 Mar 2009 - 7:03 am | चित्रा

स्मृतीगंध खराच की.
लेखन खूपच आवडले.

खटपट्या's picture

21 Oct 2013 - 7:47 am | खटपट्या

मी तर माझ्याच गावचे वर्णन वाचतो आहे असे वाटतेय.

माझ्याही गावात गाव देविबरोबर ब्राह्मण देवाचे देऊळ आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे ते ब्रह्मदेवाचे असू शकते.

त्रिपुरा पौर्णिमेचा प्रसंग तर तंतोतंत उभा केलात काका.