अडनिडी मुलं-४
आज सकाळी सकाळी ९:०० च्या दरम्यान बेल वाजली. आज कचरा घेणारी बाई लवकर आली कि काय म्हणत मी कचऱ्याच्या दोन्ही बादल्या घेवूनच दरवाजात धावले आणि दार उघडताच काळजात धस्स झाले. माझ्या घरी पूर्वी काम करणाऱ्या आणि माझ्या अडीनिडीला धावून येणाऱ्या मावशी दारात उभ्या होत्या. घरात पावूल कि दारात पावूल त्यांनी रडायला चालू केल. मलाही राहवले नाही. दोघी एकमेकींच्या गळ्यात पडून रडू लागलो. मावशी तर धायमोकलून रडू लागल्या. मी गपा मावशी गपा एवढेच बोलत होते आणि त्या कशी गप्प बसू ओ मी म्हणून रडत होत्या. माझ्या टीनाने असा काय गुन्हा केला असेल ओ, काय म्हणून माझ्या लेकराला अशी शिक्षा म्हणून अजूनच रडू लागल्या.