अभियांत्रिकीचे दिवस-३.. सबमिशन्स
पहिल्या वर्षाच्या शेवटच्या परीक्षेच्या तडाख्यात, निम्मी-अर्धी जनता जबर जखमी व्हायची. पण कसेतरी बॅकलॉग घेऊन, रडत खडत दुसऱ्या वर्षाचा जुगाड लागायचा. उरलेली जी जनता गचका खायची त्यांची व्हॅकन्सी डिप्लोमाच्या पोरांनी भरून काढली जायची.
ज्याप्रमाणे घरात नवीन आलेल्या सुनेला तिची सासू वेगवेगळ्या आयडिया काढून, घरात मिसळून घ्यायची टाळाटाळ करते, त्याच प्रकाराची एक आवृत्ती रेग्युलरची पोरं ह्या डिप्लोमाच्या पोरांच्या बाबतीत सादर करायची.
"आम्ही तुमच्या आधीपासून इथं आहोत. त्यामुळं इथल्या सगळ्या रिसोर्सेसचा लाभ घेताना आधी आम्हाला विचारलं गेलं पाहिजे", असा ह्या रेग्युलर पोरांचा दावा असायचा.