टोलनाक्यावर...
मी टोलनाक्यावर उभा असतो.
हौसेने नाही राहात.
टोलनाक्यावर उभं राहणं हाच माझा जॉब.
मुष्किलीने लागलाय. दोन वर्षं गेली तिसरंही जाईल.
उभं राहूराहू पायाच्या नळ्या दुखतात.
पण मी टोलनाक्यावर उभा असतो.
..
तसा मी ब्राह्मणाचा.
अण्णाआईसोबत चांगला होतो.
अण्णा गांजा भरुन सिगरेट ओढायचे अन मग तासनतास शांत.
आई नुसती तडतडत रहायची.. कढल्यात जळलेल्या मोहोरीसोबत.
मोहरी करपली, तडतड थांबली..
मला शाळेच्या पुस्तकांनी ओकारी यायची. अण्णा म्हणायचे, कशाला शिकतोस.. व्यर्थ आहे सगळं.
अण्णा एकदम अध्यात्मिक. महिनामहिना घराबाहेर.
 
        