मराठी विकिपीडिया आणि त्याचे विकिस्रोत, विकिबुक्स, विकिक्वोट इत्यादी प्रकल्पांच्या माध्यमाने इतर भाषातील माहिती आणि ज्ञान मोठ्या प्रमाणात मराठीत अनुवादीत करून आणण्याची क्षमता आहे. यात चपखल आणि सुलभ मराठी शब्दांचा उपयोग व्हावा म्हणून शब्द संग्रहाची मोठीच गरज भासते. इतर ऑनलाईन शब्दकोश उपलब्ध असलेतरी शब्दांच्या सखोल अर्थछटा आणि सविस्तर व्याकरण विषयक माहिती आंतरजालावर अपवादानेच उपलब्ध असते. ऑनलाईन इतर शब्दकोशांची मराठीस उपलब्धता आहेच त्यामुळे मराठी विक्शन्ररी या शब्दकोश बंधूप्रकल्पात केवळ शब्दार्थांपेक्षा सखोल अर्थछटा आणि सविस्तर व्याकरणाचा आंतर्भाव करता आल्यास इतर मराठी विकिप्रकल्पांना आणि मराठी भाषेस अधिक फायदा होईल असा एक विचार आहे. मराठी विकिपीडियाच्या माध्यमातून भाषाशास्त्र आणि व्याकरण या बाबतीतील प्रगत आणि अद्ययावत माहिती उपलब्ध व्हावी असाही विचार आहे.
याची सुरवात 'मी' या प्रथमपुरुषी सर्वनाम आणि सर्वनाम या लेखा पासून करू इच्छितो.
१) सर्वनाम हा मराठी विकिपीडियावरील लेख वाचा आणि समीक्षा करून सुधारणा सुचवा.
२) मराठी भाषेतील "सर्वनामांचा विभक्तिविचार" या बद्दल माहिती सांगा
३) मराठी भाषेच्या बोलीभाषातील सर्वनामांची माहिती द्या (जसे की : मराठवाडी, मालवणी, झाडीबोली, नागपूरी, अहिराणी, तावडी, चंदगडी, वऱ्हाडी, देहवाली, कोल्हापुरी, बेळगावी, कोकणी, कोकणस्थी, आगरी, तंजावर, जुदाव, लेवा, चित्पावनी)
४) भारतातील आणि जगातील इतर भाषातील सर्वनामे या बद्दल तौलनिक वैशिष्ट्ये सांगा
५) मराठी विक्शनरी या ऑनलाईन शब्दकोशात 'मी' या प्रथमपुरुषी सर्वनाम असलेल्या लेखाची समीक्षा करून सुधारणा सुचवा.
६) "बाहेर थंडी 'मी' म्हणत होती", यातील मी या शब्दछटेचा अर्थ सांगा; मीपण तें बुडालें यातील मीपण या अर्थछटेचा अर्थ सांगा
७) 'मजला' या शब्दरूपाची विभक्ती द्वितीया असेल का ?
८) 'माझिया' या शब्दरुपाची विभक्ती शष्टी असेल का ?
९) मी या शब्दास वर नमुद केलेल्या मराठी बोली भाषांमध्ये इतर काही समानार्थी शब्द आहेत का ?
१०) इंग्रजी विक्श्नरी प्रकल्पातून जगातील इतर भाषातील समानार्थी शब्द उपलब्ध होतात पण ते त्यांच्या त्यांच्या लिपीत असतात, तुम्हाला माहित असलेल्या भारतीय अथवा आंतरराष्ट्रीय भाषांमधील 'मी' शब्दा करता समानार्थी शब्दांचे देवनागरी मराठीतील अक्षरांतरण उपलब्ध करा.
११) मी हा शब्द आणि जागतीक भाषातील समानार्थी शब्द लक्षात घेऊन प्रोटो हिस्टॉरीक शब्द व्युत्पत्ती आणि उच्चारणांबद्दल तुमचे काही विचार असल्यास त्यांचे स्वागत असेल. (जागतीक भाषांच्या व्युत्पत्तींचे डाटाबेस संकेतस्थळ दुवा)
* मराठी विकिपीडियावरील सर्वनाम लेखाचा दुवा
* मराठी विक्शनरी शब्दकोशातील 'मी' या शब्दकोशीय लेखाचा दुवा
* जे शब्द आणि वाक्ये सर्वनाम आणि मी या लेखात आहेत अथवा जाणार आहेत; शुद्धलेखन सुधारणा तेवढ्यापुरतीच सुचवाव्यात.
* आपले प्रतिसाद मराठी विकिप्रकल्पात वापरले जाण्याची शक्यता असल्यामुळे आपले या धाग्यावरील प्रतिसाद लेखन प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जाईल याची नोंद घ्यावी.
* आपल्या प्रतिसादांसाठी आणि शब्दकोश, भाषाशास्त्र आणि व्याकरणेतर विषयांतरे टाळण्यासाठी धन्यवाद.
प्रतिक्रिया
25 Jun 2014 - 1:50 pm | माहितगार
वर बोली भाषांच्या यादीत 'कोकणस्थी' एवजी 'चित्पावनी' वाचावे. धन्यवाद
25 Jun 2014 - 2:07 pm | माहितगार
२००७ मध्ये मराठी विक्श्नरीवरील "'मी' या शब्दलेखावर" काम करताना मी (स्वतः) एकाच शब्दाचे एकाचवेळी अनेक भारतीय भाषालिपीतील लेखन उपलब्ध होत असे जसे मराठी देवनागरीत 'मी' असे लिहिले की एका झटक्यात 'मी' उचारणाचे लेखन पुढीलप्रमाणे सर्व लिपीत मिळत असे. नंतर केवळ कॉपी पेस्टचे काम असे. (इंग्रजी (English):me; उर्दू : می ; कन्नड : ಮೀ, मल्याळम: മീ ; गुजराथी : મી ; तमिळ : மீ ; तेलुगू :మీ ; पंजाबी :ਮੀ ;संस्कृत :मी ; हिंदी : मी ; बंगाली: মী) हि सुविधा एका मराठी भाषक व्यक्तीचा ब्लॉग अथवा संकेतस्थळावरून वापरत होतो त्यांच्या आणि संकेतस्थळाच्या नावाचा नंतर विसर पडला. कुणास ठाऊक असल्यास त्या संकेतस्थळाची माहिती द्यावी.
धन्यवाद
25 Jun 2014 - 2:27 pm | कलंत्री
या लेखाचे आणि त्यामागील असलेल्या भावनांचे मी स्वागत करतो.
25 Jun 2014 - 9:05 pm | माहितगार
प्रतिसादासाठी धन्यवाद
27 Jun 2014 - 10:08 pm | पैसा
मजला: ही द्वितीया किंवा चतुर्थी असू शकेल. तो शब्द कसा वापरला ते पहावे लागेल.
माझिया: षष्ठी आहे.
मालवणीमधे मी = मियां चित्पावनीमधे मी = मे कोंकणीत मी = हांव (हांव सरळ संस्कृत अहं वरून आलेला आहे) मराठीतला आम्ही अहं ला जवळचा दिसतो. अहं च्या विभक्ती रूपांमधे मयि, मम, मह्यं "मी" दिसतो. वयं हा we ला जवळचा वाटतो.
मालवणीत कोंकणीप्रमाणे मला च्या ऐवजी माका, तर तुला ऐवजी तुका वापरले जाते.
आणखी आठवेल तसे लिहिते.
28 Jun 2014 - 1:20 pm | माहितगार
सर्वनामेही भाषेत कमी असली तरी कोणत्याही भाषेची खरी ओळख असतात म्हणे कारण, सर्वनामे दुसर्या भाषेतील शब्दांनी रिप्लेस करून भाषेतून संवाद साधणे कठीण असते असे भाषाशास्त्रात कुठेतरी वाचले आहे म्हणून सर्वनामांनी सुरवात केली. या मालिकेत बरेच धागे काढण्याचा मानस असूनही प्रतिसादांच्या अभावाने साशंक झालो होतो. तेवढ्यात या धाग्याकरता आपला समर्पक आणि माहितीपूर्ण प्रतिसाद आल्याने चांगले वाटले.
* कादोडी/सामवेदीत मी ला म्ये म्हणत असावेत का ? (या दुव्यावर वाचून वाटले. याच दुव्यात मे महिन्याचे उच्चारणही म्ये दिसते त्यामुळे दुजोरा मिळणे म्हत्वाचे असेल. )
(सामवेदी बोलीबाबत सदस्य सूडही चर्चेत भाग घेऊ इच्छित होते तेव्हा त्यांच्या अधिक प्रतिसादांचीही प्रतिक्षा असेल.)
* मजला हा शब्द गद्यापेक्षा पद्यात अधीक आढळतो असे दिसते. गूगलवर खालील प्रमाणे उपयोग आढळले. अनेक देतो आहे कारण मजला या विक्शनरी लेखाची सामुग्रीही या निमीत्ताने जमेल. (मजला शब्द इमारतीचा मजला या अर्थानेही येतो)
**आज सर्व कही कसे काय झाले, मजला उमगलेच नाही!
** मजला ठाऊक नाही
** तु मजला बोलावू नकोस.
**कर कर करंजी मजला आवडते.
पद्यात
**दत्ता मजला प्रसन्न होसी जरि तूं वर देसी ।
**तूं सांडशील मजला जरि हो निदानीं । योगेश्वरी.
**तूं दूरदर्शि जननी तुज कां कळेना. मी अल्पबुध्दि मजला मन आकळेना ।
** स्वामी समर्थ माझे आई मजला ठाव द्यावा पायी।
**जे वेड मजला लागले,
**ऐकण्याला कोणि नाही वाटते मजला भिती.
** दिसते मजला सुखचित्र नवे -अनुराधा पौडवाल
** कुठलेच फूल आता मजला पसंत नाही
** देई सद्बुध्दी मजला
** विरहे सुकल्या कल्पुनि मजला चित्री रेखाटिता
** त्याची मजला भ्रांत नसे
** विसरणार होतीस मला तर, दिलेस का मग रुकार मजला?
** ये मजला नेयाला तू पंचमी सणाला तू पंचमी सणाला.
प्रतिसादासाठी पुन्हा एकदा धन्यवाद
1 Jul 2014 - 9:51 pm | सूड
>>कादोडी/सामवेदीत मी ला म्ये म्हणत असावेत का ?
हो 'म्ये' हा शब्द मी साठीच वापरलेला दिसत आहे एका लेखात. आपण बनवलेल्या सामवेदीच्या पानासंदर्भात संबंधितांशी इमेल तसेच दूरध्वनीद्वारे संपर्क केलेला आहे. त्यासंदर्भात अधिक माहिती मिळाली की अर्थातच या बोलीसंदर्भात माझ्याही ज्ञानात भर पडेल आणि सर्वांच्या माहितीसाठी एक पानही तयार होईल विकीपीडियावर!!
28 Jun 2014 - 2:17 pm | माहितगार
इतरही काही शब्दात ल चा क होतो का वरील उदाहरण अपवादात्मक आहे. (अवांतर : तुकाराम/ तुकाबाई/ तुकोजी अशी विशेषनामे मराठीत वापरात दिसतात. यातील तुका हा शब्द तु आणि का ? या दोन शब्दांच्या समासातून बनण्या पेक्षा कोकणी भाषेच्या प्रभावातून तुला ते तुका आला असण्याची काही शक्यता वाटते का ?)
असमीज मध्ये मी ला মই (मइ- इ र्हस्व?) असा दिसतो उच्चारण हिंदीतील मै ला जवळचे वाटते. बेगांलीत = আমি (आमि)
*इंग्रजीतील me सर्वांना परिचयाचा आहेच
**Finnic भाषागट Ingrian: miä; Karelian language mie;
**Kazakh: мен (kk) (men)
** Kurdish: Kurmanji: min (ku)
** Lydian: amu (प्राचीन अॅनातोलीयन आताच्या तुर्कस्थानातील प्रदेश);
** Komi-Zyrian: ме (me) (रशीयन प्रांतातील युरालीक भाषागट)
**Ligurian (उत्तर इटालीयन प्रदेश) : mi
** Swahili: mimi (आफ्रीका अर्थात त्यांच्या भाषेत मीमी हा शब्द भारताशी व्यापाराचा परिणाम होताकी नाही सांगणे कठीण आहे साऊथ आफ्रीकन झुलूत Zulu: mina; नामिबीयन ǃKung: mi आणि उत्तरपश्चिमी आफ्रीकी Yoruba: mo, n, mi, असे उच्चारण दिसते. तसेच आफ्रीकन भाषांवर युरोपीय भांषांचा प्रभाव प्रचंडच असल्याने सांगणे कठीण) पण इंग्रजी विक्शनरीतील संदर्भ तपासले तर मध्य आशीया आणि आजूबाजूच्या प्रदेशात मी किंवा जवळीक असणारी उच्चारणे अधीक दिसतात.
दक्षीण भारतात मी म्हणण्यासाठी तमील, कन्नड आणि मल्यालम मध्ये नान असा शब्द आहे तर तेलगूत नेनु असा शब्द आहे असे दिसते. (सौजन्य इंग्रजी विक्शनरी चु.भू.दे.घे.)
28 Jun 2014 - 4:55 pm | पैसा
ल चा क असं नाही ते. कारण 'सगळ्यांना' याचं कोंकणी/मालवणीत 'सगळ्यांक' देवाला = देवाक त्यांना = तांका अशी रूपे आहेत. हे काही प्रत्यय स्वतंत्रपणे विकसित झाले असावेत. पूर्वीही कधीतरी मी लिहिले होते की ज्ञानेश्वरीतील मराठी ही कोंकणीला जास्त जवळची वाटते. त्याच दरम्यान कोंकणी स्वतंत्रपणे विकसित होऊ लागली असावी. नंतर पोर्तुगीज अमंलात गोवा कोकणापासून वेगळा पडत गेला. १५६० नंतर. तेव्हा ही प्रक्रिया अधिक वेगाने झाली असावी. याबाबत काही ठामपणे बोलण्यासाठी शौरसेनी आणि महाराष्ट्री प्राकृतबरोबर मराठी, मालवणी आणि कोंकणी यांची तुलना करावी लागेल.
इ.स. १५२६ मधलं कृष्णदास शामा या गोव्यातल्या लेखकाच्या पुस्तकाचं एक पान (आंतरजालावरून साभार) बघा. त्या काळात गोव्यात बोलल्या जाणार्या भाषेचा नमुना इथे दिसेल. जुनी मराठी, गोव्यातली कोंकणी आणि मंगलोरकडची कोंकणी या तिनांचे मिश्रण वाटते.
तुकाराम, तुकाई, इ. विशेषनामे आहेत. त्यांच्या उत्पत्तीबद्दल काही माहिती किंवा अंदाज नाही. कदाचित प्राकृत्/संस्कृतचे अपभ्रंश किंवा काही पूर्ण स्थानिक संदर्भ असू शकतात.
28 Jun 2014 - 9:14 pm | माहितगार
आपला प्रतिसाद वाचून "कृष्णदास शामा" गूगलवर शोधले तर योगायोगाने बहुधा आपण म्हणताहात त्याच धाग्यावर (आमचें गोंय - भाग ११ - कोंकणी भाषा – इतिहास आणि आज) पोहोचलो. कोकणी भाषेची सगळीच माहिती माझ्या करता नवीन आहे. शोधतो आणि वाचतो आहे.
28 Jun 2014 - 9:24 pm | माहितगार
अनुषंगीक अवांतर: लोकसत्ताच्या या लेखात कृष्णदास शामांबद्दलचा उल्लेख आढळला
1 Jul 2014 - 3:26 pm | पिशी अबोली
'क' चा फॉर्म असणारा द्वितीयेचा प्रत्यय इंडो-आर्य भाषांमधे एकमेव नाही. हिंदीमधे 'उसको', 'रामको' यातही तो दिसतोच ना.. कोंकणी भाषेचा विकास काही नेहमीच मराठीवर अवलंबून नव्हता, त्यात काही स्वतंत्र गोष्टीही होत्या असे मान्य करायला हरकत नसावी.
बाकी इंडो-युरोपीय भाषांमधे सर्वनामांचे फॉर्म्स सारखे सापडणं अगदीच शक्य आहे. मात्र आफ्रिकन वगैरे भाषांमधे इं.यु. भाषांच्या प्रभावामुळे हे घडण्याची शक्यता अगदीच नगण्य आहे. दोन वेगवेगळ्या भाषांमधे सारखे फॉर्म्स सापडले म्हणून त्यांचा संबंध असेलच असं नाही. केवळ योगायोग म्हणून अजिबात संबंध नसलेल्या भाषांमधे सारखेपण असल्याची असंख्य उदाहरणे आहेत. त्यातही अशा इतक्या दूरच्या भाषांमधे सर्वनामे बदलण्याइतका भाषांचा प्रभाव असावा हे तर अगदीच अशक्य.
29 Jun 2014 - 6:41 am | माहितगार
अवेस्तन भाषेत मी शब्दा करता azǝm हा शब्द दिसतो यातील ǝ हे अक्षर AVESTAN LETTER AE ला मॅच करते (ǝ ए आणि ऐ च्या मधले अजून एक उच्चारण असेल ?) (संदर्भ: इंग्रजी विक्शनरी; इंग्रजी विकिपीडिया) azǝm हे उच्चारणे अझॆम असे काही होत असेल संस्कृत अह्म् शी जवळचे वाटते का ? (चुभूदेघे)
28 Jun 2014 - 5:37 pm | चौथा कोनाडा
स्तुत्य उपक्रम ! आपल्या प्रकल्पास मनापासून शुभेचछा !
28 Jun 2014 - 9:15 pm | माहितगार
आपणही आवडी आणि सवडीनुसार चर्चेत सहभागी होत रहाल अशी आशा करतो. प्रोत्साहन आणि प्रतिसदासाठी धन्यवाद.
1 Jul 2014 - 3:29 pm | पिशी अबोली
या धाग्यावर मिपावरील लोकांना अवगत असणार्या मराठीच्या/ मराठीशी संबंधित बोलींमधील सर्वनामांच्या विभक्तींचे संकलन झाले तरी खूप फायदा होईल.
2 Jul 2014 - 3:54 pm | माहितगार
सहमत, ९०००च्यावर हिट्स असूनही त्या मानाने प्रतिसाद संख्या कमी असल्याने हिरमुसल्यासारखे वाटते आहे. (९००० हिट्स देणार्यांना आपापल्या बोली भाषा नाहीत असे कसे होईल ?) त्यातच आलेले आपले प्रोत्साहनात्मक प्रतिसाद पाहून आशा बाळगून आहे.
खरे म्हणजे शब्दचर्चा जेवढी पुढे जाईल तेवढी रोचक होईल असे वाटते.
4 Jul 2014 - 9:44 am | प्रभाकर पेठकर
९००० हिट्स मध्ये माझीही एक हिट आहे. एकतर ९००० हिट्स म्हणजे ९००० 'जणांनी' वाचन केले की ९००० 'वाचने' झाली? ह्यात एकाच सदस्याची २-२, ४-४ वाचने असू शकतात. दूसरे असे, भाषेविषयी तुम्हा सर्वांइतका अभ्यास नसल्याकारणाने पण धागा वाचनिय असल्यामुळे मी वाचनमात्र आहे.
माझा कडून कणभर माहिती म्हणजे मस्कतच्या अरेबिकात (आखातात प्रदेशप्रदेशात अरेबिक भाषा किंचित बदलते) 'मी' ला 'अना' हा शब्द वापरतात तर 'तू' साठी 'एन्ते' हा शब्द वापरतात पण त्यात परत ज्या व्यक्तीशी आपण बोलत असतो ती जर 'स्त्री' असेल तर 'तू' साठी 'एन्ती' हा शब्द येतो.
भारतिय भाषांमध्ये मल्याळम भाषेत 'मी'ला 'न्याम' हा शब्द वापरताना ऐकले आहे. गुजराथी भाषेत 'मी' साठी 'हूं' शब्द वापरतात तर 'तू' साठी 'तू'च वापरतात तसेच 'तुम्ही' साठी 'तमे' शब्द वापरतात.
2 Jul 2014 - 10:37 pm | मधुरा देशपांडे
विदर्भात सगळीकडे नाही, पण ग्रामीण भागात वापरले जाणारे काही शब्द/सर्वनामे
मला - मपल्याला
तुला - तुपल्याला
माझी - मपली, माही, माह्या (माझ्या भावाला - माह्या भावाला)
तुझी - तुपली
आम्हाला - आम्हास्नी
तुम्हाला - तुम्हास्नी
ज्यांनी - ज्यास्नी
त्यांना - त्यास्नी
अजून आठवेल तसे लिहीत जाईन.
3 Jul 2014 - 6:38 pm | माहितगार
अवश्य. बाकी पण वैदर्भीय मंडळी चर्चेत सामील होतील अशी आशा करूयात. झाडीबोली आणि वर्हाडी चर्चा बरीच वाचण्यात असते पण झाडीबोली अद्याप वाचण्यात आली नाही. कुणी झाडीबोलीचाही शब्द संग्रह आणि नमूना लेखन दुवा दिल्यास स्वागत असेल.
3 Jul 2014 - 7:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
झाडीबोलीचं पुस्तक होतं आत्ता सापडत नैये. :(
ग्रंथालयात आहे उद्या शोधतो.
-दिलीप बिरुटे
4 Jul 2014 - 11:51 am | पिशी अबोली
मस्त मधुराताई.. अजून आठवेल तसे प्लीज लिही.. :)
3 Jul 2014 - 6:30 pm | माहितगार
कोकणात बर्याच बोली आहेत. या दुव्यावर मला एक लेखन आढळले. या लेखन कोणत्या बोलीभाषेत मोडते कसे ओळखावे ?
3 Jul 2014 - 7:05 pm | सूड
कोंकणी दिसतां!!
कॉलिंग पैकाकू, प्रीमो!!
3 Jul 2014 - 8:57 pm | पैसा
गोव्यातली कोंकणी आहे ती.
4 Jul 2014 - 8:54 am | सुनील
भाषा दर दहा कोसांवर बदलते असे म्हणतात. त्यात थोडेफार तथ्यदेखिल आहे. परंतु, हा सूक्ष्मपणे होत राहणारा बदल एका वेगळ्या बोलीत परिवर्तित होण्यासाठी केवळ अंतर (उदा १० कोस) हाच एकमेव निकष नसतो.
महाराष्ट्रातील इतर भागांपेक्षा कोकणात अधिक बोली आहेत याचे प्रमुख कारण आहे भौगोलिक. कोकणात सलग ५ मैल सपाट प्रदेश नाही! एकादा डोंगर-दरी वा टेकाड अथवा खाडी आडवी येणारच! साहजिकच अगदीच आवश्यकता भासल्यासच मंडळी आपला पंचक्रोश ओलांडून बाहेर जाणार. उभे आयुष्य एखाद्या पंचक्रोशीतच घालवलेल्यांची संख्यादेखिल काही कमी नाही. आता दूर-दूरच्या प्रदेशांशी फारसा संपर्क-संवाद नसल्यामुळे बोलींचे संख्या वाढते. (पूर्वीच्या काळी, जेव्हा दळणवळणाची साधने फार नव्हती तेव्हा)
हे देशावर तितक्या प्रमाणावर घडत/घडले नाही. काहीशा सपाट, पठारी प्रदेशामुळे दूरदूरच्या प्रदेशांशे सतत संपर्क येत राहतो आणि बोली/शब्दांची आदान-प्रदान होत राहते. साहजिकच, बोलींची संख्या थोडी कमी राहते.
4 Jul 2014 - 11:49 am | पिशी अबोली
पोर्तुगीज इन्क्विझिशन च्या काळात कोंकणीतील ग्रंथसंपदा जवळपास पूर्णपणे नष्ट झाली. बोलीभाषा म्हणूनही तिच्यावर अनेक मर्यादा आल्या. तरीही ती टिकून राहिली आणि तिला पर्याय नाही हे ओळखून पोर्तुगीजांनी शेवटी धर्मप्रसारासाठी तिचा स्वीकार केला. त्यातून पुढे मिशनरी व्याकरणे तयार झाली.
भाषेचे प्रमाणीकरण होण्यासाठी त्यात नियमितपणे तयार होणारे आणि वाचले जाणारे साहित्य असावे लागते. या काळात कोंकणी साहित्याची जी काही दुर्दशा झाली, त्यामुळे पुढे होऊ शकणार्या प्रमाणीकरणावरसुद्धा मर्यादा आल्या. पण निरनिराळ्या ठिकाणच्या आणि जातींच्या बोलींचा विकास तर होतच गेला. आणि मराठीच्या बाबतीत जसा पुण्यातील बोली तेवढी श्रेष्ठ आणि बाकीच्या अशुद्ध असा भाषकांचासुद्धा दृष्टिकोन आहे, तसा कोंकणीमधे फारसा आढळत नाही. या आणि इतर अनेक कारणांमुळे एक प्रमाण अशी कोंकणी तयार होण्याची प्रक्रिया फार हळू झाली/होत आहे.
या धाग्यावर 'कोकणी' असा जो मराठीच्या बोलींमध्ये उल्लेख आहे, तो गोव्याच्या 'कोंकणी' भाषेसंदर्भात नसून, केवळ भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्रात येत असल्याने 'मराठीच्या बोली' गणल्या गेलेल्या कोकणातील बोलींचा असावा असे मी गृहीत धरते. गोव्यातील कोंकणीला बोली म्हणायचेच असल्यास किमान 'मराठीची बोली' असे म्हणू नये अशी अपेक्षा आहे.
4 Jul 2014 - 12:15 pm | माहितगार
या धाग्यासाठी अंशतः अवांतर आहे पण आपण मुद्दा काढला आहेत तेव्हा धागा लेखक म्हणून माझ अल्प स्पष्टीकरण. मी प्रमाणभाषांचा अहंकार जपत नसल्याने भाषिक उतरंडींचे वर्गीकरण व्यक्तीगत पातळीवर माझ्यादृष्टीने गौण मुद्दा आहे. भावनिक दृष्टीने गोवा माझ्यासाठी महाराष्ट्रराज्याचा अविभाज्य भाग आहे. (म्हणून गोवन कोकणी महाराष्ट्रीय-मी बृहन शब्द सुद्धा वापरत नाही- भाषा आहे महाराष्ट्रात जी भाषा बोलली जाते ती सर्व मराठीच अशी माझी मराठीची आग्रही व्याख्या आहे.) आणि अखिल भारतातील सर्वच भाषा आणि बोलींसाठी देवनागरी लिपीच्या वापराचा मी आग्रही पुरस्करताही आहे.
अशा विषयांवर भूमिका व्यक्तीपरत्वे विभीन्न असू शकतात त्यांच्याशी सहमती असेलच असे नाही पण आदर असेल, माझी भूमीका कुणाला दुखावणारी असल्यास क्षमस्व. पण मुद्दा या धाग्यासाठी गौण असल्याने आपला मनमोकळा सहभाग चालू ठेवावा अशी प्रार्थना आहे. प्रतिसादासाठी धन्यवाद
4 Jul 2014 - 12:26 pm | पिशी अबोली
व्यक्तिगत मतांचा इथे संबंध नाहीच आहे. भारतीय घटनेच्या 8th schedule मधील मान्यता मिळालेली कोंकणी ही भाषा आहे. संबंधित उपक्रम विकिपिडियाशी संबंधित असल्यामुळे कोंकणीला मराठीची बोली गणली गेल्यास ते घटनेशी कॉट्राडिक्टरी ठरेल. या ठिकाणी तुमचे व्यक्तिगत मत आड येऊ नये असे वाटते.
हा मुद्दा धाग्यासाठी गौण नाही असं मला वाटतं. तुमच्या यादीतील 'कोकणी' या शब्दाचा अर्थ तुम्हाला काय अभिप्रेत आहे ते कृपया स्पष्ट करावे.
4 Jul 2014 - 12:28 pm | बॅटमॅन
ठ्ठो =)) =)) =))
शांत भाषाधारी अबोली, शांत =))
4 Jul 2014 - 12:51 pm | पिशी अबोली
माझ्या अनेक अस्मिता अचानक दुखावल्या गेल्याने प्रतिसाद जाम गंडला.. :(
4 Jul 2014 - 12:58 pm | बॅटमॅन
हम्म, ते आहेच म्हणा. किमान गोव्यातली कोकणी ही वेगळी भाषा असल्याचे लक्षात आले तरी बास आहे.
4 Jul 2014 - 1:01 pm | माहितगार
*शांत भाषाधारी अबोली, शांत या बॅटमनरावांच्या मताशी मी सहमत आहे. माझा प्रतिसाद इतरांना देताना द्विधा मनःस्थिती झाली नसती अबोलीताईंना प्रतिसाद द्यायचा म्हणजे मी दुसर्यांदा विचार केला होता हे खरे.
बाकी अबोलीताईंची काही ठिकाणी गल्लत होतीए. प्रथमत: संबंधित उपक्रम विकिपिडियाशी संबंधित असल्यामुळे हे वाक्य जरा संबंधित उपक्रम मराठी विकिपिडियाशी संबंधित असल्यामुळे अस वाचाव.
२) मराठी विकिपीडिया हा शासकीय प्रकल्प नव्हे. मराठी विकिपीडीया शासकीय धोरणांची नोंद घेतो पण शासकीय धोरणांशी बांधील असून फक्त शासकीय भूमीकाच मांडतो असे नव्हे. इतरही भूमीका मांडतो.
३) तुम्ही शासकीय धोरणांचा हवाला दिला असला तरी राजकीय आणि विशीष्ट पूर्वग्रहातून प्रभावीत मते म्हणून व्यक्तीगत आहेत आणि माझी व सोबत इतर अनेकांची मते वेगळी असू शकतात. आणि म्हणूनच हे सर्व धाग्याशी विषयांतर आहे हे मी मगाशीच स्पष्टही केले आहे या अर्थानेही अबोलीताईंचे मुद्दे जरासे गैर लागू ठरतात.
४) कोणत्याही चर्चेतील माझी व्यक्तीगत मते मी मराठी विकिपीडिया लेखात लादत नाही (खूप दक्ष असतो) पण इतरांच्या उल्लेखनीय मतांची समतोल दखल घेत असतो. या चर्चा धाग्यांमधून केवळ मजकुर गोळा केला जातो आहे, मराठी विकिपीडियातील लेखातील मजकुर काय असावा याची चर्चा संबंधीत लेखाच्या चर्चा पानावर होऊन मराठी विकिपीडियातील संपादक मंडळी सामुहीक (लोकशाही नव्हे) निर्णय घेतात. तुम्हाला जेवढ्या तातडीने प्रतिक्रीया दिली तेवढ्या तातडीने मराठी विकिपीडियावरील चर्चा पानांवर मी सहसा प्रतिक्रीया देत नाही आणि माझी तटस्थता पाळत असतो इतरांची पुरेशी चर्चा झाल्या शिवाय सहसा हस्तक्षेप करत नाही त्या बद्दल चिंता नसावी.
५) पण शेवटी मराठी विकिपीडिया मराठी लोकांसाठी आहे आणि मराठी उत्कर्षार्थ जर चौकटीच्या बाहेर जाऊन काम करावे लागले तर तेही करतो. पण मुख्य म्हणजे या सर्वातून घेण्यासारखा मुद्दा मराठीची व्याख्या मी व्यापक ठेवतो संकुचीत ठेवत नाही हा सकारात्मक भाग तुम्हाला आणि सर्वांना आवडेल असा विश्वास आहे.