ज्योतिषशास्त्र हा ज्यांचा आवडीचा विषय आहे त्यांना,
कृष्णमुर्ती ही ज्योतिषपध्दती नक्कीच परिचयाची किंवा निदान ऐकून तरी नक्की माहिती असेल.
कोण होते हे कृष्णमुर्ती? काय योगदान होतं त्यांचं ज्योतिषशास्त्रात?
या कृष्णमुर्ती पध्दतीचे जनक प्रोफेसर के.एस. कृष्णमुर्ती यांची ही त्यांच्या आजच्या १०८ व्या जयंतीनिमित्य थोडक्यात ओळख.
प्रो.के एस कृष्णमुर्ती यांचा जन्म तमिळनाडू राज्यातील तंजावर जिल्ह्यात असणार्या "कुथुर" या गावी १ नोव्हेंबर १९०८ रोजी झाला.
त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले.त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते त्रिचीच्या सेंट जोसेफ्स महाविद्यालयात दाखल झाले.
तेथील शिक्षण संपवून ते मद्रास इलाख्यात किंग्ज इन्स्टीट्युटमध्येत जल परिक्षण विभागात आरोग्य निरिक्षक म्हणून काम करु लागले.त्यावेळच्या मद्रास इलाख्यात तमिळनाडू व आंध्रप्रदेशाचा काही भाग समाविष्ट होता.
कामासाठी त्यांना बर्याचदा लांबचा प्रवास करावा लागे.अशावेळी तो वेळ कारणी लागावा म्हणून त्यांनी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास सुरु केला. त्यांना काही सरकारी,गैरसरकारी कचेर्यांना भेटही द्यावी लागे.तिथे एकाच संस्थेत विविध स्तरांवर काम करणार्या लोकांना पाहून त्यांना विस्मय वाटत असे.
कुतुहल आणि छंदापोटी त्यांनी तिथल्या लोकांच्या जन्मपत्रिका जमवायला सुरुवात केली;त्या पत्रिकांचा अभ्यास करायला सुरुवात केली.त्यामध्ये काही पत्रिका या जुळ्या व्यक्तींच्या होत्या.दोघांच्या जन्मवेळेत अगदी जेमतेम फरक असूनही त्यांच्या कामाच्या स्वरुपांमध्ये बराच फरक होता.यामुळे त्यांचे कुतूहल जागृत झाले.
या पत्रिका घेऊन ते त्यांचे काही मित्र जे पाश्चात्य पध्दतीने ज्योतिष पहात; त्यांच्याकडे घेऊन गेले.
मित्रांसोबत त्या पत्रिकांचा अभ्यास करताना त्यांच्या लक्षात आले की; या जुळ्या व्यक्तींच्या पत्रिकांमध्ये भावारंभ (cusp) व ग्रहांमध्ये फरक आहे.यामुळेच जुळ्या जातकांबाबतीत एकाच ठिकाणी काम करुनही कामाचे स्वरुप आणि स्तर वेगळा आहे.याला त्यांनी नक्षत्र ज्योतिष (stellar astrology)असे नाव दिले.
1951 साली त्यांनी मद्रास येथे या पध्दतीच्या संशोधनासाठी संस्था स्थापन केली.बर्याच तरुणांना,विद्यार्थ्यांना त्यांनी या पध्दतीच्या संशोधनासाठी संस्थेमार्फत प्रोत्साहन दिले.
11 सप्टेंबर 1961 पासून त्यांनी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन ज्योतिष प्रसाराला उर्वरीत आयुष्य समर्पित करण्याचे ठरवले.याच्या प्रसारासाठी मार्च 1963 पासून त्यांनी astrology and athrishta हे नियतकालीक सुरू केले.
आपली ही पध्दती त्यांनी; जे ही पध्दत शिकू इच्छितात त्यांच्यासाठी मद्रास शहराच्या मैलापुर भागातील P S High school व ट्रिप्लीकेन येथे मोफत शिकवायला सुरुवात केली.
जोडीला त्यांचा वेदीक ज्योतिषाचा तसेच पाश्चात्य ज्योतिषाचाही अभ्यास सुरुच होता.
हा अभ्यास सुरु असतानाच काही पत्रिकांचे विश्लेषण करत असताना त्यांच्या असे लक्षात आले की प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये दिलेले काही योग वापरून भाकीत केले असता तसेच फक्त दशा व ग्रहांच्या राश्यांतरावरून केलेली काही भाकिते चुकतात;अपेक्षित फल तेही अपेक्षित वेळेला मिळत नाही.
त्यांनी अधिक संशोधन सुरु केले.त्यावेळी त्यांना पारंपारिक ज्योतिष पध्दतीत काही त्रुटी,मर्यादा जाणवल्या.राजयोग असणार्या काही व्यक्ती बेताचे,हलाखीचे जीवन जगत असल्याचे लक्षात आले.
पाश्चात्य ज्योतिष पध्दतीच्या मर्यादाही त्यांच्या लक्षात आल्या.
वेदिक,पाश्चात्य,ब्लॅक मॅजिक,शकुनशास्त्र असा त्यांचा बराच अभ्यास त्यावेळी सुरु होता.
बराच काळ संशोधन करुन त्यांनी आपली Advanced stellar astrology अर्थात सुप्रसिध्द अशी कृष्णमूर्ती ज्योतिष पध्दती अस्तित्वात आणली.ही पध्दत अधिक अचूक,स्पष्ट अशी होती.
या पद्धतीमध्ये मुलत: मोठा फरक म्हणजे की, पारंपारिक पद्धतीमध्ये ग्रहांच्या गुणधर्मांना जास्त महत्त्व दिले जाते तर या पद्धतींमध्ये जास्त महत्त्व ग्रह ज्या भावांमध्ये, नक्षत्रांमध्ये, उपनक्षत्रांमध्ये आहे. या नुसार त्या ग्रहाचे फल ठरते.
उपनक्षत्र स्वामी हा श्री कृष्णमुर्तींनीं लावलेला अनन्यसाधारण महत्त्वाचा शोध मानला जातो. पारंपारिक मध्ये प्रत्येक राशीमध्ये नक्षत्रांचे नऊ चरण असतात. तर कृष्णमुर्ति पद्धतीमध्ये प्रत्येक नक्षत्रांचे आणखी नऊ विभागांमध्ये विभाजन केले आहे. आणि ते विभाजन त्या-त्या ग्रहांच्या महादशा वर्षांच्या प्रमाणात आहे. यांनाच उपनक्षत्र असे म्हणतात. या उपनक्षत्रांचे पुढे आणखी प्रत्येकी नऊ विभागांत विभाजन केल्यास त्यांना पुढे उप-उप नक्षत्रे असे म्हणले जाते. कृष्णमुर्ति यांनी लिहिलेल्या सहा रिडर्सवरुन आजही ही कृष्णमुर्ति पद्धती शिकणे शक्य होऊ शकते. कृष्णमुर्ति पद्धतीचा आणखी मोठा फरक म्हणजे त्यांनी भावारंभ पद्धत वापरण्यास सुरुवात केली. त्याआधी पारंपारिकमध्ये भावमध्य पद्धतीने कुंडली मांडली जात होती.
अनेकांना या पध्दतीचं आकर्षण वाटत होतं.आता कृष्णमूर्तींना असं वाटू लागलं की या पध्दतीचा प्रसार,प्रचार झाला पाहिजे.यासाठी त्यांनी भारतभर तत्संबंधाने व्याख्याने द्यायला सुरुवात केली.यावर काही विज्ञानवादी लोकांनी आक्षेपही घेतले.वाद-प्रतिवादही झाले.
केवळ भारतातच नव्हे तर श्रीलंका आणि सिंगापूर येथेही त्यांनी आपल्या stellar astrological research संस्थेच्या शाखा स्थापन केल्या. त्याद्वारे कृष्णमुर्ती पध्दतीचा प्रसार केला.
त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार पदव्या मिळाल्या.
के एस कृष्णमुर्ती यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान
कृष्णमुर्ती यांच्या कार्यावर प्रभावित होऊन डॉ. के. एस. मुन्शी यांनी भारतीय विद्याभवन मध्ये ज्योतिष या विषयासाठी अध्यासन सुरु केले.इथेच 1964 साली महाराष्ट्राचे राज्यपाल पी.व्ही.चेरियन यांनी कृष्णमुर्तींना ज्योतिष मार्तंड या पदवीने सन्मानितही केले.
१९७० साली कृष्णमुर्तींनी मलेशियाचा दौरा केला.मलेशियाच्या दूरदर्शनवरून त्यांची मुलाखतही प्रसारीत करण्यात आली.या दौर्याच्या शेवटी 29 जुन १९७० रोजी त्यांना सोतिदा मन्नन(ज्योतिषराज)हे नामाभिधान Malay astrological society तर्फे टी. शिवप्रसागम यांनी दिले;तसेच एक सुवर्णपदकही देण्यात आले.
श्रीलंकेच्या दौर्यात त्यांना नवीन वराहमिहिर नावाने गौरवण्यात आले.
त्यांनी आपले हे संशोधन सहा खंडांमध्ये पुस्तकरुपाने मांडले आहे.
दि. २९ मार्च १९७२ रोजी रात्री २ वाजता ते दिवंगत झाले.
अशा या महान ज्योतिष संशोधकाला आज १०८ व्या जयंतीनिमित्य विनम्र अभिवादन.
वरील माहितीच्या संकलनासाठी आंतरजाल आणि काही ज्योतिषविषयक पुस्तकांचा संदर्भ घेतला आहे.