डुक्करताप, मी अन घबराट

प्रसन्न केसकर's picture
प्रसन्न केसकर in जनातलं, मनातलं
16 Aug 2009 - 3:24 pm

गेल्या महिन्यातल्या एका सुरम्य पहाटे (असे आपले म्हणायचे असते बरं का!) मी छान झोपलो होतो अन सगळे जग गदागदा हलत असावे तशी जाणीव झाली. आयला! काय भुकंप झालाय का? असा विचार अर्धवट झोपेत करेतो मोठमोठे आवाज कानात घुमायला सुरुवात झाली. काही सेकंदातच आवाजाची ओळख पटली अन तिकडे दुर्लक्ष करणे किती महागात पडु शकेल हे ही कळले. आवाज होता बायकोचा. अरे उठ! असा गजर करत ती मला गदागदा हलवत होती. डोळे उघडुन भिंतीवरच्या घड्याळात पाहिले तर फक्त साडेसहा वाजले होते. "काय आहे! जरा झोपु दे की," मी कुरकुरलो अन धडाम-धुडुम तोफखाना सुरु झाला.

"इकडे मुलाच्या शाळेत स्वाईन फ्ल्यु आलाय अन म्हणे झोपु दे. रात्री पण उशीरा आला घरी. बसला असेल कुठेतरी मित्रांबरोबर चकाट्या पिटत. पेपरात एवढी मोठी बातमी आलिये तरी रात्री बोलला का काही. तरी बरे पत्रकार आहे. पण मुलाची काही काळजी असेल तर ना?" एकदम खडबडुन जागा झालो. पहिले काम केले बायकोला सांगितले, "आज नको पाठवु त्याला शाळेत. दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल. मग बघु काय करायचे ते." अन मग बायको कामाला लागली. तिने मुलाच्या शाळेतल्या सगळ्या मित्र मैत्रिणींच्या आयाना लगेच फोन केले अन शाळेत स्वाईन फ्ल्यु आल्याने चिरंजिवांना शाळेत पाठवणार नसल्याचे जाहिर केले. मग सगळ्याच पालकांची धांदल उडाली. पत्रकाराची बायको मुलाला शाळेत पाठवणार नाही म्हणल्यावर आजुबाजुच्या तीस चाळीस मुलांच्या पालकांनी पण मुलांना घरीच ठेवण्याचा निर्णय घेतला. परिणामी आठ वाजता स्कूलबस आली तेव्हा त्यात पन्नास ऐवजी फक्त तीन्च मुले शाळेत गेली. त्यातल्या काही पालकांना बस निघुन गेल्यावर हा अपडेट मिळाला मग त्यांनी आपापल्या गाड्यांवरुन बसचा पाठलाग केला अन मुलांना परत घरी आणले. काही हवालदिल पालक शाळेत गेले तर तिथे सांगितले स्वाईन फ्ल्युची एक केस हायस्कुल मधे झाल्याने केजी पासुन सर्व वर्ग आठवड्याकरता बंद करण्यात आले आहेत. मग हवालदिल पालकांच्या नव्या नव्या काळज्या सुरु झाल्या - आता अभ्यास बुडेल ना? तो कसा भरुन काढायचा? मुलांना शाळेत पाठवायचे नाही ते ठीक पण एकमेकांशी खेळु द्यायचे का? एक ना दोन. पालक या विषयांवर डोकेफोड करत असताना त्यांचा चिंताविषय असलेली मुले मात्र मस्त खेळत, बागडत, आळीभर हुंदडत होती.

मग सुरु झाले घरीच अभ्यास घेण्याचे प्रयत्न. गल्लीत केजीतली किमान दहा तरी मुले-मुली. सगळे कायम एकत्र खेळणारे. पण आता ती जिथे जातील तिथे कुणी ना कुणी त्यांचा अभ्यास करुन घेऊ लागले. कोण ए,बी,सी घोका म्हणुन मागे लागतेय तर कोण वन, टु, थ्री च्या. कोण पोएम घोकुन घ्यायला दम भरतेय तर कोण डोमेस्टीक अ‍ॅनिमल सांगा म्हणुन दरडावतेय. पोरं एकदम हवालदिल, बिचार्‍यांना काय करावे कळेना. आमचा गोटी मात्र छान एंजॉय करत होता - बापाची फुस होती ना. नाही म्हणायला आईने घराबाहेर खेळायला बंदी घातली होती पण तिची नजर चुकवुन बाहेर पळायचाच. शिवाय तो घरी असल्याने बायकोचा फतवा होता मला लवकर घरी यायचा. त्यामुळे रात्री लवकर आल्यावर बाबा पण त्याच्याशी मस्ती करायचाच.

असा एक आठवडा झाला अन माझी साप्ताहिक सुटी आली. त्यादिवशी विचार केला, आठवडाभर घरात बसुन गोटी कंटाळला आहे अन त्याच्यावर रखवाली करुन बायको. अनायासे, सुट्टी आहे, पाऊसही कमी झालाय तर कुठेतरी फिरवुन आणु. अन सरळ मोटारसायकल ताबडली, बायकोला अन गोटीला घेऊन ते सरळ गाठले पानशेत. दिवसभर ऐश केली. पानशेतला जेवण, वरसगावला बोटींग, रस्त्यात कुठे थांबुन नदीचे पाणी बघ, कुठे थांबुन भातशेतीचा दरवळणारा वास छातीत भरुन घे, कुठे कुरणच्या घाटात थांबुन वेगवेगळ्या पक्षांचे आवाज ऐक अन उडणार्‍या फुलपाखरांच्या मागे धाव, कुठे पाने फुले गोळा कर अशी. संध्याकाळी दिवेलागणीला घरी परतलो तर गोटीची वाट बघत शेजारची मुले अंगणात खेळत होती. गोटी गाडीवरुन उतरला अन तिकडे धाव घेतली.

अन त्यानंतर थोड्याच वेळात बायकोच्या लक्षात आले की गोटी नाक ओढतो आहे अन थोडाथोडा खोकतो आहे. जवळ घेतले तर अंग कोमट होते. सगळ्या मुलांना मग घरी पिटाळले अन गोटीला घरात घेतले. दहा मिनिटातच त्याचे अंग बर्‍यापैकी गरम झाले अन तो टीव्ही बघता बघता आडवा झाला. कसे तरी क्रोसिन काढुन त्याला एक डोस दिला तोवर तो झोपीही गेला. तेव्हा जेमतेम साडेसात वाजले होते. रोज दहा वाजता मह्त्प्रयत्नांनी झोपणारा गोटी साडेसातलाच झोपला हे आम्हाला काळजीत टाकायला पुरेसे होते.
लगेच फॅमिली डॉक्टरना फोन केला अन सगळे सांगितले. ते म्हणाले क्रोसिन दिले आहे म्हणजे आता ताप उतरावा. पण दवाखान्यात ये, अजुन काही औषधे देतो. रात्री उठलाच तर गोटीला दे. नाहीतर उद्या सकाळी माझ्याकडे घेऊन ये. तसाच दवाखान्यात गेलो अन अजुन औषधे घेऊन आलो तर गोटीचा ताप कमी व्हायच्या ऐवजी शंभरच्या पुढे गेला होता. रात्री दोनच्या सुमाराला गोटी जागा झाला. अंगात अजुन ताप होताच, मग औषधे दिली, दुध पाजले अन झोपवला तसाच. तर सकाळी चार वाजताच परत उठला अन खिडकीवर चढुन बसला. बर्‍याच वेळाने उतरला, परत दुध-औषधे घेतली अन झोपला. सकाळी दहा वाजता परत डॉक्टरांकडे त्याला घेऊन गेलो तर तोवर ताप उतरला होता पण डॉक्टरांनी अ‍ॅन्टीबायोटीक्स पण सुरु केली.

त्या दिवशीच संध्याकाळी परत ताप चढायला लागला अन रात्री आठ वाजेपर्यंत परत शंभरवर गेला. दहा वाजता १०१ ताप होता अन अकरा वाजता थर्मामिटर १०१.७ दाखवत होता. गोटी तापाने फणफणुन पडलाय म्हणुन बायको, मी हवालदिल. कुठेतरी डुक्करतापाची भितीपण होतीच. शेवटी सगळी रात्र त्याच्या कपाळावर कोलनवॉटरच्या पट्ट्या ठेवत अन त्याला कोल्ड बाथ देत काढली. तरी ताप काही कमी होईना. मग पहाटे निर्णय घेतला सकाळीच त्याला त्याच्या जन्मापासुन तपासणार्‍या बालरोगतज्ञांकडे न्यायचे.

सकाळी दहा वाजताच बालरोगतज्ञांच्या दवाखान्यात गेलो तर तिथे आधीच चाळीस पन्नास मुलांना घेऊन पालक आलेले, सगळ्यांची लक्षणे अन अवस्था सारखीच. पण गोटी मात्र सावरला होता अन दवाखान्यातल्या खेळण्यांशी खेळत होता. अंगात ताप होताच. होता होता साडेअकराच्या सुमाराला आमचा नंबर आलो आणि आम्ही डॉक्टरांसमोर गेलो त्यांनी गोटीला तपासले अन एक्स्-रे काढुन यायला सांगीतले. चिंतेचे कारण नाही ना या प्रश्नाला उत्तर, "तसे काही नाही. साथ सुरुच आहे तापाची पण एक्स्-रे काढुन या मग बघु" असे मोघम. अर्ध्या तासात एक्स्-रे घेऊन आमची वरात परत डॉक्टरांपुढे.

डॉक्टरांनी एक्स्-रे पाहिला अन त्यांचा चेहरा थोडा गंभीर झाल्याचे आम्हाला वाटले. "त्याला स्वाईन फ्ल्यु तर नाही ना? त्याच्या शाळेत आधिच एक केस झालीय," माझा धास्तावलेला प्रश्न. डॉक्टरांनी मग एक्स रे आम्हाला दाखवला, "हे बघा ही इथे लंग्ज आहेत. ही ब्रॉन्की. हे पांढरे दिसतेय ना ते इफ्नेक्शन आहे. संपुर्ण ब्रॉन्की भरलीये अन दोन्ही लंग्जवर पण थोडेसे पसरलेय. ही ब्रॉन्कोन्युमोनियाची सुरुवात आहे. मला वाटते तुम्ही त्याला इथे आज अ‍ॅडमिट करावे," डॉक्टर. पण मी एव्हढा धास्तावलो होतो की काही कळतच नव्हते. तरी बरे क्राईम रिपोर्टिंगच्या निमित्ताने बर्‍याच डॉक्टरांशी संबंध आलाय अन मेडीकल सायन्स, फोरेन्सिक, फार्माकॉलॉजी यातले दोन शब्द कानावरुन गेलेत.

लगेच अ‍ॅडमिट करुन टाकले. एकतर स्वाईन फ्ल्यु ची भीती अन अ‍ॅडमिट केल्यावर गोटीची प्रतिक्रिया काय असेल म्हणुन चिंता. त्यामुळे दिवसाला तीन हजार रुपये भाडे देवुन शेवटी प्रायव्हेट रुम घेतली. पण रुम मधे शिरलो अन पैसा वसुल अशी मनस्थिती झाली. तो हॉस्पिटलचा वॉर्ड कमी अन फाईव्ह स्टार हॉटेलची रुम जास्त होती. सगळे इंटीरियर चकाचक, पलंगांवरच्या गाद्या एकदम गुबगुबीत, शिवाय बसायला सेटी, खुर्च्या, एक टेबल, फोन, फुल्ल साईझ फ्लॅट स्क्रीन टीव्ही अन व्हीसीडी प्लेअर, मस्त एसी, सामान ठेवायला चार पाच कपाटे सगळे झायलिंग. तोवर बातमी कळली होती म्हणुन गोटीचे आजोबा आले अन अवाक होऊन बघतच राहिले सगळा थाटमाट. तोवर गोटी बेड इन्क्लाईन्-डिक्लाईन करायला शिकला होता अन त्याच्याशी खेळत होता. तेव्हढ्यात नर्स आली अन तिनं टीव्ही वर कार्टुनचे चॅनेल पण लावले.... गोटी खुष!

मग सुरु झाली दवाखाना, घर अन ऑफिस सांभाळण्याची कसरत. स्वाईन फ्ल्यु मुळे बातम्यांचा ताण, अन त्यात दोन बातमीदार आजारपणाच्या रजेवर. नशिब दवाखाना ऑफिसपासुन जवळच होता. मग दोन बातम्या लिहिण्यामधे एक छोटा ब्रेक घेऊन दवाखान्यात चक्कर मारायची. बायकोचा तर मुक्कामच दवाखान्यात. शिवाय कुणी ना कुणी नातेवाईक कायम दवाखान्यात बसलेले असायचे.

गोटीला अ‍ॅडमिट केले त्याच दिवशी रिदा शेख चा मृत्यु झाला. तिलाही सुरुवातीला न्युमोनियाचीच ट्रीटमेंट दिली होती त्यामुळे सगळ्या मित्रांना गोटीबाबत प्रचंड काळजी. मग सुरु झाले फोन सल्ला द्यायला. लोक फोन करायचे धीर द्यायला पण बोलायचे ते धीर खचवणारेच. सगळ्यांचा सल्ला एकच, "ताबडतोब मुलाला नायडुला ने." अरे पण का? या डॉक्टरना मी ओळखतो, खूप चांगले डॉक्टर आहेत, गोटीच्या जन्मापासुन त्याला ते बघताहेत, त्यांना गरज वाटली तर सांगतील ना टेस्ट करायला. नायडुमधे खरेच यापेक्षा चांगले उपचार मिळु शकतील? तिथले डॉक्टर एव्हढी आस्था दाखवतील? ते एव्हढे क्वालिफाईड असतील? असतील तर मग त्यांनी असेच हॉस्पीटल उघडुन खोर्‍याने पैसा का नाही ओढला? अन तिथे गेल्यावर नसलेला विषाणुसंपर्क होणार नाही याची काय खात्री? शिवाय स्वाईन फ्लु खरेच एव्हढा जीवघेणा आहे? मग अमेरिकेत, इंग्लंडमधे त्याबाबत लोकांना आता निर्धास्त का रहायला सांगताहेत? अन त्यावर म्हणे एकमेव औषध म्हणजे टॅमी-फ्ल्यु. हे म्हणजे वंडर ड्रग झाले..... आला एव्हीयन फ्लु की घे गोळी, आला सार्स की घे गोळी, आला स्वाईन फ्ल्यु की घे गोळी. स्वाईन फ्ल्यु जर माणसात आत्ताच आला असेल तर त्यावरचे औषध आधीपासुन बाजारात कसे? अन मग ह्या मॅजिकल रेमेडीचा उल्लेखही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या वेबसाईटवर का नाही? त्याच्यावर अनेक देशात बंदी का आहे? की अनेकजण म्हणतात तसे भारत ही टेस्टींग लँब अन भारतीय गिनिपिग आहेत या फार्माकंपन्यांना... एक ना दोन अनेक प्रश्न.

पण हे ऐकुन कोण घेणार? गोटीच्या शाळेत आधीच एक केस झाल्याने आम्ही ही घाबरलेलो. मग विचार केला नायडुमधेच विचारावे म्हणुन तिथे फोनवर चौकशी केली तर त्यांनी सांगितले जर तुमचा मुलगा परदेशात जाऊन आलेला असेल किंवा त्याचा संपर्क स्वाईन फ्ल्युच्या पेशंटशी आला असेल तर लगेच स्वॅब घेतो नाही तर वाट बघा. पण पेपरमधे तर आवाहन आलेय मनपा अन सरकारचे की लगेच सरकारी दवाखान्यात जाऊन टेस्ट करुन घ्या म्हणुन. आता काय करायचे?

त्यात सगळ्या मित्रांचे, नातेवाईकांचे फोनवर फोन. सगळे घाबरलेले. काही पत्रकार मित्र तर परस्पर गोटीला नायडुत न्यायच्या तयारीत. अहो पण मी बाप आहे त्याचा.... मला नाही तशी गरज वाटत, उतरलाय आता त्याचा ताप. पण ते ऐकायला तयार नाहीत. रिदाचे काय झाले माहिती आहे ना? त्या दिवशी म्युनिसिपल कमीशनर काय म्हणाले, आमच्याकडे आणले असते तर ती मेली नसती ऐकले ना? मग चल त्याला घेऊन नायडुला. आपल्याला कळते म्हणुन इगो इश्शु करु नकोस. शेवटी मुलाच्या जिवाचा प्रश्न आहे.... एका मित्राने तर सरळ हेत्वारोपच केला. असा संताप झाला म्हणुन सांगु, "अरे मी त्याचा बाप आहे. तु नाही," असे ठणकावावे असे वाटले.

या सगळ्यात आशादायक वाटत होता तो गोटीवर उपचार करणार्‍या डॉक्टरांचा आत्मविश्वास. बाकी सगळे डॉक्टर पेशंटना सरस़कट नायडुला पाठवत होते पण त्या आमची समजुत काढत होत्या. "अहो तुम्ही काळजी करु नका. त्याला स्वाईन फ्ल्यु नक्कीच झालेला नाही. निदान चुकणे शक्यच नाही. त्याची प्रकृती आम्हाला माहिती आहे आणि आमचा अनुभव, टेस्ट पण तेच दाखवत आहेत. आम्ही तुमची मनस्थिती समजतो पण मुलाच्या मनस्थितीचा पण आपण विचार करु. तो छान रिकव्हर होतोय आणि आत्त्ता त्याच्यावर कोणतीही नवी टेस्ट आवश्यकता नसताना घेणे योग्य नाही. तुम्ही काळजी अजिबात करु नका," डॉक्टर सांगत होत्या. त्यांचे सगळे सहकारीपण तसेच म्हणत होते. आणि एक दिवस त्यांनी कमालच केली. गोटी जेवत नाहीये म्हणुन आम्ही सांगितले तर त्यांनी गोटीलाच विचारले तुला काय आवडते म्हणुन. "सॅन्डविच, ज्युस अन कॅडबरी," तो उत्तरला. तासाभरात डॉक्टरांकडुन चार चीज ग्रील्ड सॅन्डवीच, एक टंपासभर ज्युस आणि एक भला मोठ्ठा कॅडबरीबार आला. अन गोटीने ते सगळे मिटक्या मारत संपवले. परत दुसर्‍या दिवशीच्या नाश्त्यात डॉक्टरांनी सांगितले म्हणुन त्याने आक्खा वाडगाभर मॅगी खाल्लं, नंतर ग्लास भर दुध पिले, अर्ध्या तासाने परत ज्युस घेतला. अन शिवाय पोटभर जेवलाही.

असे तीन दिवस चालले. गोटीचा ताप आता पुर्णपणे उतरला होता. तो हॉस्पीटलभर खेळत होता. डॉक्टर-सिस्टरबरोबर राऊंडला जात होता. कॅफेटेरियातुन मिळणारे चमचमीत पदार्थ सगळ्या स्टाफ च्या कृपेने दिवसभर खात होता. अन मी मात्र त्याला स्वाईन फ्ल्यु आहे काय या चिंतेत होतो. तेव्हढ्यात एक डॉक्टर मित्र भेटला अन त्याने तर नवीनच बॉम्ब टाकला. तो म्हणाला, "जरी त्याला स्वाईन फ्ल्यु झाला असला तरी आता टेस्ट करुन काय फायदा? त्याला बरे वाटतेय ना? मग झाले. तु कश्याला त्या एच्१एन१ ची काळजी करतोस?" मग नवीनच भुंगा डोक्यात शिरला, "जर विषाणु अंगातच राहिला तर?"

तीन दिवसांनी गोटीला दवाखान्यातुन डिस्चार्ज मिळाला. त्याचे बिल भरत होतो तर दुसर्‍या एका मुलाला त्याचे आईवडील अ‍ॅडमिट करत होते. जुलाब होत होते म्हणे त्याला. त्याच्या वडिलांनी रुमचार्जेस विचारल्यावर आधी सेमी प्रायव्हेट वॉर्ड मधे ठेवा असे सांगितले पण आई एकदम उसळली, "स्वाईन फ्ल्यु आलाय शहरात माहिती आहे ना?" या वाक्याचा परिणाम झाला अन तो मुलगा लगेच प्रायव्हेट रुम मधे अ‍ॅडमिट झाला.

डिस्चार्ज मिळुन आता आठवडा होऊन गेलाय. गोटी आता घरी परत आलाय अन मजेत आहे. पण त्याची शाळा अजुन सुरु झालेली नाहीये अन अजुन त्याला थोडा खोकला असल्याने बाहेर जाऊन खेळता येत नाही. त्याचे मित्र मैत्रिणी पण घरी त्याच्याशी खेळायला येत नाहीत. रोज परगावच्या नातेवाईकांचे फोन येतात. ते बातम्या वाचुन्-पाहुन चिंतेत असतात. ते आग्रह धरतात की आम्ही पुण्याबाहेर त्यांच्याकडे रहायला जावे. इथे परिस्थिती काय आहे ते विचारतात.

मी त्यांना सांगतो, "शैक्षणिक संस्था, मॉल, मल्टीप्लेक्स बंद केल्याने इथे अ‍ॅ़क्टीव्हिटी बर्‍याच कमी आहेत. शिक्षण्-नोकरीकरता इथे आलेले बरेच लोक पुण्याबाहेर गेलेत अन पुणे परत पेन्शनरांचे शहर झालेय. बस स्टॅन्ड, एअरपोर्ट, रेल्वे स्टेशनवर कुणीच तपासत नसल्याने काही लोक अंगात विषाणु घेऊन मुळगावी गेलेत अन तिथे साथीचा इमाने इतबारे प्रसार करताहेत. पण पुण्याला साथीचे बरेच फायदे झालेत. लोक शक्यतो फिरत नसल्याने सगळे रस्ते मोकळे आहेत आणि ट्रॅफिक जॅम होत्त नाहीत. लोक एकदम गुणी बाळासारखे वागतात. हॉटेलींग वगैरे लोकांनी बंद केले आहे त्यामुळे हॉटेलात वेटींग नसते. शिवाय रात्री लवकर सगळी हॉटेले, दुकाने बंद होतात अन दहा अकरा वाजेपर्यंत पुणेकर शहाण्या मुलांसारखे गुडुप झोपतात!!!" तरीही त्यांचा विश्वास बसत नाही मग मी गोटीकडे फोन देतो. तो सांगतो, "सांगु का? इकडे स्वाईन फ्ल्यु आलाय म्हणजे ताप, सर्दी - खोकला, न्युमोनिया होतो. पण तो बरा होतो. मला डॉक्टरांनी सांगितलंय. पण मज्जा खुप येते. शाळा बंद आहे अन मी खूप कार्टून बघतो. तुम्हीच इकडे या ना. आपण धमाल करु."

कथाऔषधोपचारविनोदवाङ्मयमुक्तकविडंबनसमाजजीवनमानमौजमजाप्रकटनविचारलेखअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

दशानन's picture

16 Aug 2009 - 3:33 pm | दशानन

छान पध्दतीने तुमचा अनुभव लिहला आहे तुम्ही... !

मुलगा ठीक आहे हे वाचून हायसे वाटले.. मुलांची काळजी घ्या.

***

तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !

प्रसन्न केसकर's picture

16 Aug 2009 - 3:57 pm | प्रसन्न केसकर

मी जात होतो तेव्हाच दुसर्‍या एका धाग्यावर (अभिज्ञ यांनी सुरु केलेल्या) श्रावण मोडक यांनी आणि मी ही प्रसारमाध्यमांची याबाबतची भुमिका, राजकारणी आणि नोकरशहांनी केलेली विधाने हा भंपकपणा आहे अश्या अर्थाची विधाने केली होती आणि त्यावर बरीच चर्चाही झाली. तेव्हाच याविषयावर एकदा लिहायचेच असे ठरवले होते पण मुलाच्या प्रकृतीमुळे त्याला उशीर झाला एव्हढेच.

खरेतर या भयगंडाचा अनुभव मला कमी तीव्रतेने येणे अपेक्षित होते पण मी स्वतः त्याकाळात प्रचंड घाबरलो होतो. त्यामागे मेडीयामधुन दिसणार्‍या बातम्या, जबाबदार पदावरच्या व्यक्तींची (मला जी बेजबाबदार वाटली ती) विधाने, सर्वच पातळींवर मिळणारी परस्परविरोधी माहीती अशी अनेक कारणे होती. WHO च्या वेबसाईटवर, टॅमिफ्ल्यु च्या वेबसाईटवर जी माहिती होती ती भारतात सर्व स्त्रोतांकडुन मिळणार्‍या माहितीपेक्षा वेगळीच होती. इथे जी भीतीदायक माहीती प्रसृत होत होती, तिचा आधार काय हे कुठेच स्पष्ट होत नव्हते (अजुनही होत नाहीये. दोन दिवसांपुर्वी स्पष्ट झाले की या साथीने पुण्यात मेलेल्या कुणाचेच शवविच्छेदन झाले नाही किंवा कुणाच्याच डेथ सर्टिफिकेटमधे स्वाईन फ्ल्यु किंवा एच्१एन१ असा स्पष्ट उल्लेख नाही. जर गळफास घेऊन मरणार्‍या माणसाच्या डेथ सर्टिफिकेटवर death due to asphexia due to strangulation असा स्पष्ट उल्लेख असतो तर या केसेस मधे death due to ARDS as a result of H1N1 infection/ swine flu असा उल्लेख का नसावा हे अजुनही मला कळलेले नाही. कदाचित हे समजण्याची पात्रताच माझ्यात नसावी.)

परंतु कितीही भयानक रोग असेल व कितीही तीव्र साथ असेल तरीही या बाबत खाजगी दवाखान्यांना ज्याप्रकारे लक्ष केले गेले ते अयोग्य होते असे वाटते. या रोगाची प्राथमिक लक्षणे इतर अनेक सामान्य रोगांप्रमाणेच आहेत. ती दिसणार्‍या हजारो लोकांना तपासण्याची क्षमता स्थानिक संस्था किंवा शासनाकडे नाही हे पुण्यात नायडु रुग्णालयात ज्या रांगा लागल्या त्यावरुनच दिसुन आले. मग अश्या वेळी ही परिस्थिती तज्ञ खाजगी डॉक्टरना वेळीच विश्वासात घेऊन परिणामकारकरित्या हाताळता आली नसती का हा प्रश्न पडतो. जेव्हा पुणे-सातार्‍यात साथ रोग प्रतिबंध कायदा जारी केला तेव्हाच खाजगी डॉक्टरांची मदत घेऊन प्रवास करणार्‍या लोकांची तपासणी केली असती तर या रोगाचा फैलाव कमी झाला असता का हा प्रश्नही उरतोच.

---

Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

विजुभाऊ's picture

17 Aug 2009 - 5:18 pm | विजुभाऊ

जर गळफास घेऊन मरणार्‍या माणसाच्या डेथ सर्टिफिकेटवर death due to asphexia due to strangulation असा स्पष्ट उल्लेख असतो तर या केसेस मधे death due to ARDS as a result of H1N1 infection/ swine flu असा उल्लेख का नसावा


ते तसे लिहिले तर त्याची जबाबदारी कल्याणकारी शासनावर येऊन पडते.
बहुतेकदा पोलीस स्टेशनातही असेच घडते. पाकीट मारल्याची तक्रार घेऊन गेलो तर पाकीट गहाळ झाले असा पंचनामा करतात.
तपास कोणी करायचा?
हॉ वील गार्ड द गार्ड्स असा एक प्रश्न आहे
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

तिमा's picture

16 Aug 2009 - 4:04 pm | तिमा

तुमचा हा अनुभव अतिशय जिवंत व विचार करायला लावणारा वाटला. माझ्यासारख्या चिंतातुर जंतुवर अशी वेळ आली असती तर मी माझ्यासकट सगळ्या घरादाराला उदास करुन त्रास दिला असता. तुम्ही हे फारच धीराने हाताळले आहे.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

ज्ञानेश...'s picture

16 Aug 2009 - 5:34 pm | ज्ञानेश...

आपला लेख, अनुभव मांडण्याची पद्धत आणि एकंदरच आपण हा प्रसंग ज्या पद्धतीने हाताळला ते अतिशय कौतुकास्पद आहे. त्याबद्दल सर्वप्रथम तुम्हाला दाद देतो.

काही गोष्टी मात्र खटकल्या. त्यावर लिहिणे क्रमप्राप्त आहे.

नायडुमधे खरेच यापेक्षा चांगले उपचार मिळु शकतील?
कदाचित नाही मिळू शकले असते. पण जी साथ सध्या सुरू आहे तिच्यावरील उपलब्ध उपचार फक्त त्याच ठिकाणी असतील, तर चांगले- वाईट हा मुद्दाच तिथे गैरलागू आहे. तुमच्या मित्रांनी दिलेला सल्ला अगदीच वायफळ नव्हता, एवढेच सांगू इच्छितो.

तिथले डॉक्टर एव्हढी आस्था दाखवतील? ते एव्हढे क्वालिफाईड असतील? असतील तर मग त्यांनी असेच हॉस्पीटल उघडुन खोर्‍याने पैसा का नाही ओढला?
हे प्रश्न प्रचंड गैरलागू, आणि अपमानकारक वाटले. "स्वतःचे हॉस्पिटल उघडून खोर्‍याने पैसा ओढणारा डॉक्टर हुशार आणि सरकारचा पगारी डॉक्टर सुमार कुवतीचा" ही मांडणी मनाला प्रचंड क्लेश देऊन गेली. मी या व्यवस्थेत काम केले आहे आणि मला येथील डॉक्टरांच्या अडचणी माहिती आहेत. त्याबद्दल विस्ताराने लिहिले असते, पण विषयांतर होईल. (कदाचित तुम्हाला थेट असाच अर्थ अपेक्षित नसावा, करेक्ट मी इफ आय एम राँग)

अन तिथे गेल्यावर नसलेला विषाणुसंपर्क होणार नाही याची काय खात्री?
हा मुद्दा समजण्यासारखा आहे. पण काळजी घेता आली असती.

शिवाय स्वाईन फ्लु खरेच एव्हढा जीवघेणा आहे? मग अमेरिकेत, इंग्लंडमधे त्याबाबत लोकांना आता निर्धास्त का रहायला सांगताहेत?
हे ही पटले. आपल्याकडे फोबिया पसरला आहे काही प्रमाणात.

अन त्यावर म्हणे एकमेव औषध म्हणजे टॅमी-फ्ल्यु. हे म्हणजे वंडर ड्रग झाले....
यात काय चुकीचे आहे, कळले नाही.

स्वाईन फ्ल्यु जर माणसात आत्ताच आला असेल तर त्यावरचे औषध आधीपासुन बाजारात कसे? अन मग ह्या मॅजिकल रेमेडीचा उल्लेखही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या वेबसाईटवर का नाही?
रोग नंतर औषध आधी, असे काहीही झालेले नाही. रोग (पक्षी: व्हायरस) जुनाच आहे. टॅमिफ्लु (ओसेल्टामिविर) हे अँटीव्हायरल आहे. तशी अनेक औषधे आहेत. पण या व्हायरसवर हे औषध गुणकारी असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यात शंका घेण्यासारखे काय आहे?
ड्ब्ल्यु एच ओ च्या वेबसाईटवर तुम्हाला हे दिसले नाही? आश्चर्य आहे. जागतीक आरोग्य संघटनेचे निर्देश आहेत माझ्याजवळ. हवे असल्यास तुम्हाला ई मेल करू शकतो मी.

खटकलेल्या मुद्द्यांबद्दल, आणि तेसुद्धा लोकांचे गैरसमज होवू नयेत म्हणून मी हे सर्व लिहिले. कृपया पर्सनली काहीही घेऊ नये.

"Great Power Comes With Great Responsibilities"

एकलव्य's picture

16 Aug 2009 - 6:02 pm | एकलव्य

पुनेरी यांच्या मुलावर काही गंडांतर आले नाही हे वाचून आनंद झाला. पण काही डॉक्टरांशी बोलणे केल्यानंतर समजले की स्वाईन-फ्ल्युच्या टोकाला गेलेल्या बहुतेक केसेसमध्ये हल्गर्जीपणा, अंगावर काढणे किंवा मला काहीही होत नाही ही फुशारकी यांचा भाग होता असे समजते.

ज्ञानेश यांनी मांडलेले मुद्देही पटले.

बाकी पुण्याच्या रस्त्यांवर सध्या रहदारी नाही हे मान्य... पण दहीहंडी, १५ ऑगस्ट आणि गणपती यांच्या गर्दीमुळे तुडुंब भरलेले रस्ते पहायला मला जास्त आवडले असते.

- एकलव्य

प्रकाश घाटपांडे's picture

16 Aug 2009 - 5:58 pm | प्रकाश घाटपांडे

केवळ अ‍ॅन्टीव्हायरल उपचारामुळे व डॉक्टरवरील विश्वासामुळे चिंतेचा व्हायरस पुनेरी यांनी पसरु दिला नाही. अशा वेळी निर्णय घेणे खुपच अवघड असते. विवेक व भावना यांचे द्वंद्व चालु होते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

स्वाती२'s picture

16 Aug 2009 - 6:30 pm | स्वाती२

लेक ठीक आहे वाचून हायसे वाटले. काळजी घ्या. माझ्या मुलाला गेल्या वर्षी फ्ल्यू आणि त्यातच ब्रॉन्कोन्युमोनिया झाला होता त्याची आठवण झाली. या वर्षी न्युमोनियाची वॅक्सिन देणार आहोत.

श्रावण मोडक's picture

16 Aug 2009 - 8:00 pm | श्रावण मोडक

पुनेरी, हे लिहून माझी मुख्य लेखातून सुटका केल्याबद्दल धन्यवाद.
लिहिण्याजोग्या बऱ्याच गोष्टी आहेत. पण काही ठळक देतो.
१. तुमच्या अनुभवासारखाच, पण पूर्णपणे विरोधी टोकाचा अनुभव मी घेतला आहे. भाच्याला ताप आला. डॉक्टरकडे गेला. बीपी पाहिला. ताप पाहिलाही नाही. गोळ्या दिल्या. संध्याकाळी कळवा असं सांगितलं. त्या दिवशी सकाळी अकरा ते संध्याकाळी सहापर्यंत तापाची ४ ते १ अशी चढउतार होती. मी चकीत. मी त्याचे पोट पाहिले, घट्ट. कडक अगदी. मलावरोध हे नक्की. डॉक्टरांनी पोट तपासलंच नव्हतं. तापाचे स्वरूप ऐकून बाकी काही न बोलताच संध्याकाळी डॉक्टरांचा सल्ला, अॅडमिट करा. चिठ्ठी वगैरे दिली. मी ऐकलं नाही. भाच्याला त्याच दिवशी दुपारी मी लॅक्झेटिव्ह दिल्या होत्या. मध्यरात्रीनंतर पोट साफ झालं. दुसऱ्या दिवशी ताप थेट ९७-९८ वर. मी डॉक्टरांनाही दोष देणार आहे. कारण त्यांनी फी घेतली, पण रुग्णाची प्राथमिक तपासणीही न करता हॉस्पिटलायझेशनचे सल्ले दिले आहेत. पण दुसरीकडे तेही पॅनिक झाले हा मानवी स्वभावाचा भाग धरता येईल. पण मग डॉक्टर होऊ नका अशा वेळी. निर्णय सामान्य माणसांसारखे घ्यायचे असतील ना तर ती फी घेण्याचाही अधिकार नाहीये. समाजानं काय करावं वगैरे लांबच.
२. महापालिका आयुक्तांचं ते विधान मीही वाचलं आहे. मी मिडियावर अभिज्ञ यांच्या धाग्यात टीका केली. ती पटली नाही काहींना. त्या टीकेचं कारण इथं आहे. ही विधाने छापून आली आहेत. आयुक्त तसे म्हणाले आहेतच. पण समोरचे काय करत होते? त्यांचा "एक नायडू ४० लाखाच्या शहराला पुरे होते?" अशा आशयाचा एक तरी प्रतिप्रश्न का नाही त्यापैकी कोणत्याही वृत्तामध्ये? मीही त्याच क्षेत्रातील आहे. अगदी आता औपचारीक नसलो तरी, माझी मुळं तिथंच आहेत. त्या अधिकारानं ही माझी माझ्यावरचीच टीका आहे.
३. पुनेरी यांच्या मनात नायडूच्या संदर्भात आलेले प्रश्न अगदी रास्त आहेत. असे प्रश्न येतातच. ज्ञानेश तुम्हीही वैयक्तिक घेऊ नका. स्पष्ट बोलतो - स्वाईन फ्ल्यूसाठी तुम्हीही टॅमिफ्ल्यू सांगताहात. तुम्हाला ओझे(किंवा से)ल्टाविमिर फॉस्फेट (Oseltamivir) म्हणायचे आहे की, टॅमिफ्ल्यू? टॅमिफ्ल्यू गोळीचे नाव आहे माझ्या माहितीप्रमाणे (Oseltamivir Phosphat असते ना तीमध्ये?). या व्हायरसवर प्रभावी ठरले आहे ते ओझेल्टाविमिर. डब्ल्यूएचओ (या संघटनेला मी प्रमाण मानत नाही, पण इथे उदाहरण आल्याने लिहितोय) या संघटनेनेही टॅमिफ्ल्यूचा उल्लेख केलेला मला तरी दिसला नाही. मजकूर खूप असल्याने माझ्या नजरेतून निसटला असे मानू. तरीही ही संघटना एका गोळीचा नंगेपणाने प्रसार करेलसे वाटत नाही. कारण एवीतेवी छुपेपणाने करून काम भागते आहेच. मग नंगेपणाने का करा?
४. टॅमिफ्लू हे प्रभावी आहे स्वाईन फ्ल्यूवर? ओह्ह. ग्रेट. http://www.tamiflu.com/ ही या गोळीशी संबंधित वेबसाईट आहे. या साईटवर मला आत्ता दहा मिनिटांपर्यंत Swine Flu आणि H1N1 या दोन्ही स्ट्रिंगसाठी शोध घेतला आलेली उत्तरे अशी आहेत -
Swine Flu
Your search - Swine Flu - did not match any documents.
No pages were found containing "Swine Flu".
Suggestions:
* Make sure all words are spelled correctly.
* Try different keywords.
* Try more general keywords.
H1N1
Your search - H1N1 - did not match any documents.
No pages were found containing "H1N1".
Suggestions:
* Make sure all words are spelled correctly.
* Try different keywords.
* Try more general keywords.
याचा अर्थ काय घेऊ? या कंपनीचे संस्थळही काही भारतीय सरकारी संस्थळांसारखे आहे असा घेईन. एनआयव्हीच्या संस्थाळवरही स्वाईन फ्लू किंवा H1N1 दिसत नाही. एकाला झाकावं दुसऱ्याला काढावं. अर्थात, असं म्हणणं हा पुन्हा त्या एका व्यवस्थेचा अवमान ठरेल ना? असो, मी काही माफी वगैरे मागणार नाही.
५. डब्ल्यूएचओ (याविषयी परत खुलासा मघाचाच) या संघटनेच्या वेबसाईटवर गेलो आहेच. रोज जातोय सध्या. ही वाक्यं पहा - "This is a new influenza A(H1N1) virus that has never before circulated among humans. This virus is not related to previous or current human seasonal influenza viruses." हे आहे ११ जूनचे अपडेट. ज्ञानेश आपण म्हणता की व्हायरस जुना आहे. मी तर हल्ली या व्हायरसचा उल्लेख होताना नॉव्हेल हा शब्द आवर्जून वापरलेला पाहिला. हा स्वाईनशीच संबंधित आहे की आणखीही काही? डब्ल्यूएचओ तर आत्ता काहीही बोलणार नाही हे नक्की.
६. वर उल्लेख केला ओझेल्टामिविरचा. त्यासंबंधात डब्ल्यूएचओची साईट काय म्हणते? "...current new H1N1 viruses are sensitive to neuraminidase inhibitors." या neuraminidase inhibitors प्रकारातच ओझोल्टामिविरचा समावेश होतो. पुढच्याच प्रश्नाला डब्ल्यूएचओचे उत्तर आहे - "Resistance can develop to antiviral drugs used for influenza. Therefore, WHO and its partners are monitoring antiviral drug resistance."
अर्थ काय घ्यायचा? टॅमिफ्लू खा, स्वाईनफ्लू घालवा? नक्कीच नाही ना? मग प्रश्न येतो लेव्हल ६ अलर्टचा अर्थ काय? फ्लूचे लक्षण दिसले की टॅमिफ्लूचा मारा का केला गेला? आणि रेझिस्टन्स तयार झाला तर काय करायचं? डब्ल्यूएचओचा हवाला देत झालेल्या उपाययोजना आहेत ना या? चोर कोण आणि दरोडेखोर कोण आहे? म्हणजे, करा मारा टॅमिफ्लूचा. रेझिस्टन्स झाला तर आम्ही मॉनिटर करतो. रेझिस्टन्सचा अर्थ हा व्हायरस आणखी भयंकर होत प्रसार पावेल. त्यावर मात करण्यासाठी फार्मा कंपन्यांना संधी मिळेल असेच का? नाही तरी फार्मा कंपन्यांशी रुग्णांचे घनिष्ट (क्लोजली हा शब्द वापरू का?) नाते नसतेच ते असते ते डब्ल्यूएचओ वगैरेंचे. तेही रुग्णांच्या सेवेसाठीच!!!
७. आता प्रश्न येतो लसीचा. "Once the first doses of pandemic influenza A(H1N1) vaccine become available, national health authorities will decide how to implement national vaccination campaigns." आणि तरीही आता या लशीच्या चाचण्या होण्याआधीच वापर करण्याचा फतवा डब्ल्यूएचओ काढते आहे. कुणाची धन करण्यासाठी? लशीच्या चाचण्या का झाल्या नाहीत, जर याविषयी डब्ल्यूएचओ २००७ पासून काही करत होती तर... हेही माझे म्हणणे नाही. त्याच संघटनेच्या संकेतस्थळावर आहे असं लिहिलेलं. जुलैमध्ये एका कंपनीची लस येणार होती, त्याच काळात स्वाईन फ्लूची वावटळ येते. या प्रकरणात पूर्वी वाचलं होतं की, ऑस्ट्रेलियातून कुणी तरी डब्ल्यूएचओवर दावाही केला आहे. तपासून घ्याल का सारेच एकदा?
८. पुनेरी यांनी वर एक उल्लेख केला आहे. डेथ सर्टिफिकेटचा. काय आहे त्याचा खुलासा? काय आहे त्या मृत्यूचे कारण? अगदी नायडू असो, ससून वा इतर कोणतीही बडी खासगी रुग्णालये... मृत्यूचे कारण असते ना?
बरेच मुद्दे आहेत. वेळ कशासाठी घालवायचा इतकाच प्रश्न आहे. सरकारी डॉक्टर सुमार, खासगीवाले भारी असे कोणीही म्हणू नये हे आदर्श झाले. तत्व म्हणून मलाही मान्य आहे. पण ती डब्ल्यूएचओच अशी असेल आणि महापालिका आयुक्त, त्यांच्याआधी देशाचे आरोग्यमंत्रीच असे काही बोलत असतील तर का सरकारी डॉक्टरांविषयी शंका येणार नाहीत? त्या येऊ द्यायच्या नसतील तर हे असले आयुक्त आणि तसले मंत्री यांच्याविषयी हेच डॉक्टर उभे राहिले पाहिजेत ना? त्यांच्या अडचणी असतील, त्या सोडवण्यासाठी वर कोणी असेल ना? आरोग्य खात्यातील संचालक वगैरे वैद्यकीय शिक्षणप्राप्त आणि म्हणूनच आमच्यालेखी डॉक्टरच असतात ना? असो. मी फक्त विसंगती टिपतोय असंही कोणी म्हणेल. त्या का येतात याचे उत्तर प्रत्येकाने तपासून घ्यावे.
एक अवांतर प्रश्न - सार्स, एव्हिअन फ्लू अचानक गायब झाला की काय? वर्षानुवर्षे फ्लू आहे. पण हे नवे मात्र साले पटकन बेपत्ता होताहेत हे खरे. जुन्या खोडांवर माणूस मात करू शकत नसावा. नवे सगळे भ्रूण किंवा अर्भकहत्येसारखे सोपे जात असावेत.
फक्त व्यवस्था वगैरेंकडे बोटे दाखवून या प्रश्नांची उत्तरे टाळता येतील.

दशानन's picture

16 Aug 2009 - 8:08 pm | दशानन

टाळ्या... =D>

सुंदर प्रतिसाद व योग्य मुद्दे !

***

तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !

एकलव्य's picture

16 Aug 2009 - 9:26 pm | एकलव्य

सुंदर प्रतिसाद व योग्य मुद्दे !

प्रसन्न केसकर's picture

16 Aug 2009 - 8:35 pm | प्रसन्न केसकर

सविस्तर प्रतिक्रिया दिलाबद्दल धन्यवाद मोडक साहेब.

तुमच्या प्रतिक्रियेतील पहिला मुद्दा खाजगी डॉक्टर बाबतचा. मी सर्वसकट खाजगी डॉक्टर चांगले असे म्हणतच नाही. पण ज्या डॉक्टरची ट्रिटमेंट आधीपासुन सुरु आहे ती का बदलावी? तर केवळ महापालिका आयुक्त किंवा राज्याचे कोणीतरी मंत्री सांगतात म्हणुन? कोण ते? काय आहे त्यांचे ज्ञान? माझ्या मुलाला खाजगी डॉक्टरची ट्रिटमेंट मी बंद केली तर त्याला उपचार देणारच असे आश्वासन तरी ते देतात काय? अन मग असे उफराटे सल्ले सर्व जनतेला त्यांनी का द्यावेत? अन पेशंट मेला की खाजगी दवाखाने जबाबदार, मग बाबासाहेब मानेंच्या नातेवाईकांनी त्यांची तपासणी नायडुमधे नीट केली गेली नाही असा आरोप केल्यावर मग मुग गिळुन का गप्प बसले सगळे? खाजगी दवाखाने जबाबदार असतीलही कदाचित पण मग त्याची चौकशी चौकशी करायची, कारवाई करायची की मृताच्या नातेवाईकांनी कारवाई करायचे ठरवले तर त्यांना सर्व मदत करु असे घोषित करायचे? मला तर सर्वच घोळ दिसतोय.

एव्हढे होऊनसुद्धा काही लोक मरण पावलेच. खरे तर मृतांचा आकडा पहिल्या मृत्युनंतर झपाट्याने वाढला असे दिसते. एव्हढे लोक मरतात म्हणल्यावर ते जरी याच रोगाने मरत असले तरी रोगाचा परिणाम शरिरावर कसा होतो याचा अभ्यास करायला तरी पोस्ट्मार्टेम करायला नको? का नाही कुणावरच केले? अन जर नातेवाईक ते करु देत नसतील तर त्यांना का एखादे आवाहन केले सहकार्याचे?

पल्स पोलिओ असेल किंवा फॅमिली प्लॅनिंग, किंवा आजपर्यंत आलेल्या अनेक साथी असतील, किती वेळा खाजगी डॉक्टर बेजबाबदार, हलगर्जी असतात त्यांच्याकडे जाऊ नये असे आजपर्यंत सुचवण्यात आले? आजपर्यंत आल्या त्या सगळ्या साथी काय लुटुपुटीच्या होत्या की याचवेळेस सरकार एकदम कार्यक्षम झाले अन खाजगी डॉक्टर अकार्यक्षम. बरे सरकार कार्यक्षम म्हणण्यास मी तरी अजुन धजावत नाही. रिदा शेख च्या मृत्युनंतर मग साथ रोग प्रतिबंधक कायदा अमलात आणला तेव्हाच पुण्यातुन बाहेर जाणार्‍या लोकांना तपासुन त्यातले कोणी संशयित रुग्ण आहेत की नाही हे का नाही तपासले? हा कार्यक्षमतेचाच पुरावा समजायचा का?

नायडु मधील डॉक्टर कदाचित त्यांच्या क्षेत्रातले तज्ञ असतील नव्हे तसे ते असणेच अपेक्षित आहे. पण नायडु मधे किती डॉक्टर होते अन रुग्णांच्या संख्येशी त्यांचे गुणोत्तर तरी काय होते? मग अश्या ठिकाणी प्राथमिक तपासणी करण्यासाठी खाजगी डॉक्टर वापरावेत की त्यांच्याबाबत लोकांमधे संशय तयार करावा?

आणि जर हा रोग कोणत्याही औषधाने पुर्ण बरा होत असेल, विषाणु नष्ट होत असेल तर मग एन आय व्ही तील तज्ञांचा हवाला देऊन ज्यांना आत्ता हा रोग झाला त्यांना परत त्रास होणार नाही किंवा झाला तरी कमी होईल अश्या बातम्या आल्या त्यांचा नक्की अर्थ काय होतो?

या सर्व गोंधळाला मिडीया तर मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेच. ती जबाबदारी नाकारणे पुर्णपणे अयोग्य आहे. पण ही सर्व गोंधळ वाढवणारी विधाने मिडीयाने खोटी छापली का? आणि तसे असेल तर त्यांचा इन्कार का झाला नाही? की मिडीयाचा वापर करुन गोंधळ निर्माण होईल अशी परिस्थिती उत्पन्न करण्याचे प्रयत्न हेतुपुरस्सर सुरु होते?

गेले दोन दिवस सगळीकडे सर्व ठीक आहे, परिस्थिती परत सुरळीत झाली आहे असे चित्र निर्माण होते आहे. ही परिस्थिती अचानक परत सुरळीत झाली तरी कशी? हा ही प्रश्नच आहे.

Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

विकास's picture

17 Aug 2009 - 9:09 pm | विकास

वेळे अभावी अजून हा धागा संपुर्ण वाचलेला नाही. एकंदरीत योग्य चर्चा आहे असे वाटले.. वरील प्रतिसाद पण अधिक (नीट) वाचून सुचल्यास जास्त उत्तरे देईन. येथे काही त्रोटक मुद्दे:

स्वाईन फ्लू अथवा h1n1 वरून टामी फ्लूच्या संकेतस्थळावर खालील दुवे मिळाले:

  1. http://www.tamiflu.com/ (मधल्या भागात वरतीच h1n1 चा उल्लेख आहे)
  2. या पिडीएफ मधे पृष्ठ क्रमांक १६ वर.

H1N1 हा व्हायरस नवा नाही पण त्याचा स्ट्रेन (जात) नवीन आहे ज्याबद्दल काळजी वाटत आहे. फ्लूच्या व्हायरसबद्दल पण असेच असते. त्याचा स्ट्रेन बदलत असतो/बदलू शकतो. एकतर व्हायरससाठी पूर्ण उपाय काही नसतो, अँटीव्हायरलने त्यावर थोडाफार उपाय होऊ शकतो. तेच टॅमीफ्लू करत असावी.

बाकी अजून नंतर लिहीन...

स्वाती दिनेश's picture

16 Aug 2009 - 8:22 pm | स्वाती दिनेश

लेख वाचताना सारखे एंडरिझल्ट कडे लक्ष होते, गोटीची प्रकृती चांगली आहे हे वाचल्यावर हुश्श झाले,
स्वाती

ऋषिकेश's picture

17 Aug 2009 - 2:17 pm | ऋषिकेश

लेख वाचताना सारखे एंडरिझल्ट कडे लक्ष होते, गोटीची प्रकृती चांगली आहे हे वाचल्यावर हुश्श झाले

असेच म्हणतो.. त्याची काळजी घेत असालच .. त्याचा थोडासा खोकलाही लवकर(शाळा सुरू व्हायच्या आत) बरा होवो :)

ऋषिकेश
------------------
दूपारचे २ वाजून १७ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक नवनाट्यगीत "ज्याचा शेवट गोड ते सारेच गोड...."

धनंजय's picture

17 Aug 2009 - 9:48 pm | धनंजय

मुलगा पुन्हा बागडायचा लागला वाचून हुश्श म्हटले.

अनुभवकथन तर उत्तमच आहे. चर्चासुद्धा वाचतो आहे.

प्रभाकर पेठकर's picture

16 Aug 2009 - 10:52 pm | प्रभाकर पेठकर

पोटच्या पोराच्या आजारपणात आई-वडिलांची मानसिक अवस्था अत्यंत नाजूक, अस्थिर आणि भयाकुल असते. अशा वेळी मन आणि मेंदू शांत ठेवून काही योग्य आणि धाडसी निर्णय घेणे 'अवघड' ह्या शब्दाच्या पलिकडे असते. परंतु पुनेरी ह्यांनी तसे निर्णय घेवून परिस्थितीला अत्यंत धीराने तोंड दिले आहे. त्यांचे हार्दीक अभिनंदन.
त्या प्रसंगात त्यांच्या मनांत उद्भवलेले विचार हे मन चिंती ते वैरी न चिंती स्वरूपातले आहेत. मित्र-नातलगांच्या भावनिक दबावातही खंबीर राहून आपल्या मुलासाठी योग्यतोच निर्णय त्यांनी घेतला.
अशी दुर्दैवी परिस्थिती पुन्हा: त्यांच्यावर तसेच इतर कोणावरही न येवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.

रेवती's picture

17 Aug 2009 - 2:45 am | रेवती

सध्याच्या परिस्थितीत धीर धरल्याबद्दल अभिनंदन!
आपल्या मुलाला बरे वाटल्यामुळे आम्हालाही फार बरे वाटले. पेशंटच्या आईवडीलांची मनस्थिती वेगळी असते, ती सगळेजण समजू शकतात असे नाही. आम्हीही नेमके त्याच वेळेस पुण्यात आलो व 'रिदा शेख मृत्यू' मुळे लोकांच्या मनावर आलेला ज्वराचा ताण जाणवला. आमचा मुलगा त्यावेळी आजारी पडला व दहा दिवस १ च्या आसपास ताप येतजात होता. गेली तीनपेक्षा जास्त वर्षे ज्या डॉ.चे औषध त्याला लागू पडत होते त्यांचीच ट्रीटमेंट चालू ठेवली. 'नायडूमध्ये' जाणे म्हणजे नसलेले इन्फेक्शन घरी आणणे असे वाटल्याने गेलो नाही. डॉ. नी खूप धीर दिला; फक्त प्रवासाला निघण्याआधी त्यांनी 'संजीवनला' पाठवून त्यांचे मित्र असलेल्या डॉ. कडून काही तपासण्या करवल्या. मुंबई विमानतळावर एकही तपासणी झाली नाही अथवा प्रश्न विचारले नाहीत. त्याचे मात्र आश्चर्य वाटले.

रेवती

एकलव्य's picture

17 Aug 2009 - 5:09 pm | एकलव्य

रेवतीताई,

आपल्या मुलाला नेमके या कठीण काळात पुण्यात ताप आल्याने एकूण मनःस्थिती कशी झाली असेल याची कल्पनाही करणे अवघड आहे.

मी सध्या सहकुटुंब पुण्यात आहे... साधा तापही येऊ न देणे टाळणे हा मुख्य अजेन्डा आहे. असो!

मुंबई विमानतळावर काहीही तपासणी होत नाही. एक लांबलचक फॉर्म भरून घेतला जातो की तुम्हाला काही संसर्ग नाही वगैरे वगैरे. आम्हालाही आश्चर्य वाटले.

एक शंका - अमेरिकेत परतल्यावर पुण्याहून आल्याने काही तपासण्या/ चौकशा असे काही झाले काय?

- एकलव्य

रेवती's picture

17 Aug 2009 - 6:12 pm | रेवती

अमेरिकेत आल्यावर कोणताही प्रश्न आजारपणाबाबत विचारला नाही. इमिग्रेशन ऑफिसरने आणलेल्या गोष्टींमध्ये फूडबद्दल प्रश्न मात्र विचारले व पुढेही एका ऑफिसरने गाठून तेच प्रश्न विचारले.
भारतात आल्यावर आम्ही दिल्लीत आधी उतरलो तेथेही हिरव्या रंगाचा फॉर्म भरला व तपासणी अधिकार्‍यांनी जुजबी प्रश्न विचारले. पुण्यात तर मी आजारी मुलाबरोबर घरी व नवरा सासूबाईंबरोबर हॉस्पीटलमध्ये अशी परिस्थिती होती. नातेवाईकांना मुद्दाम जाउन भेटणे शेवटी शेवटी टाळले. निघण्याआधीचे दोन दिवस फक्त घरात बसून होतो. आम्हाला लोकांनी मुंबई विमानतळावर (न )होणार्‍या तपासणीबद्दल सांगून जरा टेन्शन दिले होते पण तसे काही झाले नाही.

रेवती

एकलव्य's picture

18 Aug 2009 - 10:39 am | एकलव्य

धन्यवाद! :)

पुनेरी ह्यांचा स्वानुभवावरील आधारित लेख व नंतरची टिपण्णी, दोन्ही त्यांच्या इतर लिखाणाप्रमाणेच नेमके व संयत आहे; आवडले.

मोडकांच्या अभिज्ञंच्या धाग्यावर मीडिया-राजकारणी-सरकार ह्यांच्या निषेध- निषेध-निषेध मोर्चाचे पुढील स्थानक बहुद्देशीय कंपन्या आणि WHO असणार हे वाटलेच होते, आणि वरील विस्कळीत प्रतिसादात ते तिथपर्यंत आले आहेत.

मी ह्या विषयातील तज्ञ्य नाही, तरीही त्यांनी उपस्थित केलेल्या काही प्रश्नांविषयी येथे टिपण्णी करणे आवश्यक वाटते.

'लेव्हल ६ अलर्टचा अर्थ काय? फ्लूचे लक्षण दिसले की टॅमिफ्लूचा मारा का केला गेला?'

सर्वप्रथम 'टॅमी फ्ल्यू' हे काही आताच्या स्वाईन फ्ल्यू (AH1N1) वरील उपाय म्हणूनच अस्तित्वात आलेले औषध नाही. ते आतपर्यंत माहिती असलेल्या सर्वच प्रकारच्या फ्य्लूंवर उपयोगात आणता येते. (माझ्यावरच एका बेजबाबदार डॉक्टरने त्याचा प्रयोग ४ १/२ वर्षांपूर्वी केला होता. तेव्हा मला कसलाही फ्ल्यू झालेला नसल्याने त्याचा काहीच फायदा झाला नाही, तो भाग वेगळा). म्हणजे हे औषध तसे नवीन नाही. मात्र ते जालिम असावे, इतर साधी औषधे जे करू शकत नाहीत, ते करण्याचे सामर्थ्य (म्हणजे जीवाणूंना मारण्याची क्षमता अंगात घडवण्याचे) त्याच्यात आहे. पण त्याचे साईड इफेक्ट्सही आहेतच. म्हणून त्याचा सर्रास वापर कुणी करीत नाही.

WHO ही संस्था कसलेही फतवे काढत नाही. तसे करण्याएव्हढी तिची पॉवर नाही (she is a toothless body). देशोदेशींच्या सरकारची स्वत:ची आरोग्य खाती आपापल्या देशात काय करावे ह्याचे नियोजन करतात व ते अंमलात आणतात. ही संघटना यूनोमध्ये ज्या देशांचा सहभाग आहे, त्यांच्या आरोग्यविषयक कार्यात एकसूत्रीकरण आणण्याचा प्रयत्न करते. तसेच जागतिक पातळीवर संदर्भांची देवाणघेवाणही ती करते.

फ्ल्यूच्या संसर्गाची मोजमाप करून त्याची जगभर वाढण्याची क्षमता कितपत येऊन पोहोचलीय, हे दर्शवण्यासाठी ह्या संस्थेने पॅंडेमिकच्या सहा लेव्हल्स कल्पिलेल्या आहेत. तिच्या निकषांनुसार जेव्हा एकाद्या फ्य्लूचा प्रादुर्भाव होतो व पसरत जातो, त्याप्रमाणे ही संस्था 'आता ही पॅंडेमिक अमुकतमुक लेव्हलवर येऊन पोहोचली आहे' असे जाहीर करते. ज्यायोगे देशांना आपालल्या प्लॅनिंगमध्ये बदल करता यावेत. WHO 'तुम्ही आता टॅमि फ्ल्यू (एक ब्रँड नाव) घ्यायला सुरू करा', असे लेवल ६ करून सुचवत नाही. तसा त्या लेवल्सचा काही उघड अथवा सुप्त उद्देश नाही.

फ्य्लूच्या एखाद्या स्ट्रेनवर काही विवक्षीत उपाययोजना (जशी टॅमि फ्ल्यू) सातत्याने केली गेली की त्या जीवाणूंची प्रतिकारशक्ति बदलते, ते म्युटेटही होतात, त्यांचे गुणाधर्म बदलतात, नव्या प्रकारचे जीवाणू निर्माण होतात इ. इ. हे सगळे काही अगदी पुण्यात लोकांनी आठ पंधरा दिवस टॅमि फ्ल्यू घेतले आणि लगोलग असे घडून आले इतक्या तात्काळ होत नाही. त्याला (माझ्या अंदाजाप्रमाणे) अजून काही कालावधी जावा लागतो. कितपत कालावधी जावा लागतो, हे कदाचित तज्ञ सांगू शकतील. पण हे बदल मॉनिटर करत रहाणे हे कार्य प्रत्येक देशातील/ जागेतील प्रयोगशाळा करतात, व WHO त्यांच्या संशोधनांच्या माहितीचे सुसूत्रीकरण करते. ती स्वतः ह्यात कदाचित सक्रीय सहभागीही होत असेल. हे बदल सातत्याने मॉनिटर करत रहाणे जरूरीचे आहे, कारण जीवाणू अधिक शक्तिमान होत रहाणार, त्यांचे म्ञुटेशन होणार वगैरे. तेव्हा त्यासंबंधित WHOचे नक्की काय 'चुकले' हे मलातरी कळले नाही.

प्रश्न राहिला तो ह्या दुष्टचक्राचा. फ्ल्यूची साथ आली, की माणसे त्यातून बरी होण्यासाठी औषधे घेणार-- तसे करतांना ती अतिरेक करणार, ह्या महत्वाच्या मुद्याकडे मी येतोच आहे--- , त्यामुळे जीवाणू बदलणार, नवे फ्ल्यू, नवे इलाज... हे दुष्टचक्र आहे. ह्यात औषधी कंपन्यांचा हात आहे, तसेच बेजबाबदार डॉक्टर्सचा हात आहे, असे म्हणून सगळे खापर त्यांच्या डोक्यावर फोडणे टाळ्या घेणारे आकर्षक असले तरी मूळ समस्येचे सुलभीकरण आहे. असे पहा, ६० -७० च्या दशकात, अगदी ८० च्या दशकातही माणसे फ्ल्यू झाला आहे हे नक्की निदान झाल्यावर खुशाल चार चार- पाच पाच दिवस घरी राहून साधे उपचार करून बरी होत व मग कामावर रुजू होत. माझी एक आत्या अगदी कोमट पाणी घेऊनच ताप अंगावर काढी व मग तो ओसरला की मग कामावर जाई. आजच्या वेगवान युगात हे कुणाला कितपत शक्य आहे? आज एकाद दुसरा दिवस कामापासून दूर रहाता येते. म्हणजे तात्काळ रोगमुक्त व्हावयाची निकड सर्वांनाच आहे आज ती ह्या जीवनाच्या रेट्यामुळे. मी तरी आजकाल फ्ल्यू झाला की असेच काही डॉक्टरकडून 'जालिम' इलाज असलेले औषध घेऊन बरा होऊन कामाला लागतो. हे मानव जातीच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने साफ चुकिचे आहे, हे पूर्णपणे माहित असूनही. अशा परिस्थितीत ज्यांना हे दुष्टचक्र स्वतःपुरते मोडावेसे तीव्रतेने वाटल असेल, त्यांनी आपला जीवनक्रम पार बदलून खुशाल करावे.

सध्याच्या AH1N1 फ्ल्यूवरील लशीचे अद्याप संशोधन पूर्ण झालेले नाही. (तिचे टेस्टिंग सुरू आहे, असे वाचनात आले) त्यानंतर तिचे प्रॉडक्शन सुरू होईल, हे होईपर्यंत २०१० उजाडेल असे म्हटले जाते. ह्याविषयी WHO ने 'Once the first doses of pandemic influenza A(H1N1) vaccine become available, national health authorities will decide how to implement national vaccination campaigns.' असे लिहील्याचे मोडक सांगतात, 'आणि तरीही आता या लशीच्या चाचण्या होण्याआधीच वापर करण्याचा फतवा डब्ल्यूएचओ काढते आहे.' हे त्यांनी कुठे वाचले हे कळले नाही. हे जे वाक्य ते इथे उर्धृत करत आहेत, त्यातून कसलाही फतवा वगैरे अभिप्रेत होत नाही, सर्वसाधारण कुठल्याही ट्रेडच्या स्टँडर्डस बनवणार्‍या संस्था ह्या विषयी जसे लिहीतात तसे हे निरूपद्रवी वाक्य आहे.

भारतात सरकारने प्रथम कसलीली सुसूत्र कारवाई केली नाही. प्रकरण हाताबाहेर जात आहे, हे समजल्यावर मात्र काही पाउले उचलली गेली (थिएटर्स बंद ठेवणे, ऑफिसे, शाळा, कॉलेजे बंद ठेवणे इत्यादी) त्यांचा परिणाम होऊन फ्य्लूचा प्रादुर्भाव आटोक्यात येत आहे, असे दिसून येते. माझ्या एका मित्राने पुण्यातील वातावरणाचे वर्णन कळविले की 'घाबरून कर्फ्यू' असल्यासारखी परिस्थिती आहे, रस्त्यांवर शुकशुकाट आहे. ह्या 'क्वारंटीन' मुळे साथ आटोक्यात येऊ लागली आहे.

श्रावण मोडक's picture

17 Aug 2009 - 1:37 pm | श्रावण मोडक

खरं तर, माझ्या दोन्ही प्रतिक्रियांचा एकूण सूर नीट पाहिला आणि येथे प्रदीप यांनी केलेले लेखन त्यासंदर्भात वाचले तर वास्तवात मी प्रतिक्रिया देण्याची गरजच नाहीये. तरीही काही गोष्टी स्पष्ट करणे आवश्यक आहे म्हणून करतो.
"सर्वप्रथम 'टॅमी फ्ल्यू' हे काही आताच्या स्वाईन फ्ल्यू (AH1N1) वरील उपाय म्हणूनच अस्तित्वात आलेले औषध नाही....सर्रास वापर कुणी करीत नाही." (मधल्या वाक्यांसह)
क्या बात है!!! मी आणखी काही लिहिण्याची गरज निश्चितच नाही. नेमका टॅमिफ्ल्यूचा हा सर्रास वापर झाला आहे. त्याचे काय करायचे, एवढाच प्रश्न आता शिल्लक राहतोय. टॅमिफ्लू (तुमच्या पद्धतीने मी त्याला ब्रँडनेम न म्हणता एका गोळीचे नाव म्हटले आहे हा फरक) ही गोळी रामबाण का मानली गेली मग या फ्ल्यूसाठी? अगदी इतकं की, सरकारसुद्धा या गोळीतील घटकाचे नाव घेण्याऐवजी या गोळीच्या नावाचाच (ब्रँडनेमचाच) पुरस्कार करीत राहिले? टॅमिफ्ल्यूच्या मी उल्लेखलेल्या वेबसाईटची मालकी रोश लॅबोरेटरीजकडे आहे असे दिसते. या रोशचा आणि टॅमिफ्ल्यूचा संबंध काय असावा?
"WHO ही संस्था कसलेही फतवे काढत नाही. तसे करण्याएव्हढी तिची पॉवर नाही (she is a toothless body)... जागतिक पातळीवर संदर्भांची देवाणघेवाणही ती करते." (मधल्या वाक्यांसह)
फतवा हा माझा शब्द मागे. तुमचा मुद्दा रास्त आहे. मी लिहिण्याच्या भरात लिहून गेलो. चूक झाली. रेकमेंडेशन किंवा शिफारस असं म्हणूया.
बाकी माझा मुद्दा येथेच संपतो. या 'टूथलेस बॉडी'च्या नावाचा जप करीत जे काही झाले ते एकदा तपासावेच लागेल आता तर. अहो, पत्रकारदेखील, लेव्हल सिक्स अलर्ट का जारी करीत नाही, असे विचारत होते आणि आमचे अधिकारी, मंत्री, लोकप्रतिनिधी, त्याची गरज कशी नाही, हे सांगत होते. हा हास्यास्पद प्रकार असल्यानेच मी माझ्या मूळ प्रतिसादात लेव्हल ६ विषयीचा प्रश्न केला होता. तुम्ही त्याविषयी जे संदर्भ दिले आहेत ते उत्तम. अनेकांच्या ज्ञानात प्रकाश खचितच टाकतील. फक्त आणखी एक संदर्भ मिळत असेल तर पहा कुठेही. म्हणजे तो आहे की नाही हे ठाऊक नाही मला. पण असावा. प्रत्येक लेव्हलवर काय स्वरूपाची उपाययोजना करावयाची असते याची काही मार्गदर्शक तत्वे असावीत. त्याशिवाय प्रत्येक देशातील, राज्यातील सरकारांना नियोजन करता येत नसावे. तेही संदर्भ मिळणे महत्त्वाचे. मीही शोधतो आहेच.
"फ्य्लूच्या एखाद्या स्ट्रेनवर काही विवक्षीत उपाययोजना (जशी टॅमि फ्ल्यू) सातत्याने केली गेली की त्या जीवाणूंची प्रतिकारशक्ति बदलते,...अजून काही कालावधी जावा लागतो. कितपत कालावधी जावा लागतो, हे कदाचित तज्ञ सांगू शकतील." (मधल्या वाक्यांसह)
कालावधी कळू द्या. मग बोलतो.
"पण हे बदल मॉनिटर करत रहाणे हे कार्य प्रत्येक देशातील/ जागेतील प्रयोगशाळा करतात, व WHO त्यांच्या संशोधनांच्या माहितीचे सुसूत्रीकरण करते.... तेव्हा त्यासंबंधित WHOचे नक्की काय 'चुकले' हे मलातरी कळले नाही." (मधल्या वाक्यांसह)
ओह्हो... माझा मुद्दा आहे तो ओझेल्टामिविरशी संदर्भित. हा घटकच, (टॅमिफ्लू म्हणत नाही) या नव्या विषाणूला कब्जात ठेवतो असे म्हणत उपचार चालले आहेत. यासंदर्भात रेझिस्टन्सचा धोका आहे हे ठाऊक असूनही पॅडेमिकच्या स्थितीत फ्लूच्या लक्षणांनाही या घटकाचा सर्रास वापर झाला आहे. इथे मॉनिटरिंग म्हणजे काय? मला तरी त्या मॉनिटरिंगचा स्केल काय आहे याचा अंदाज येत नाहीये. या मॉनिटरिंगला 'पोस्ट-मार्केटिंग मॉनिटरिंग' म्हणावे काय? तसे म्हटलेले नाही कुणी, ही माझ्याच मनातील शंका आहे. पोस्ट मार्केटिंग मॉनिटरिंगचे महत्त्व मी नाकारत नाहीये. गैरसमज नकोत. ते करावेच लागेल यातही शंका नाही. फक्त माझा मुद्दा स्केलशी संबंधित आहे हे ध्यानी घ्यावे ही विनंती.
"प्रश्न राहिला तो ह्या दुष्टचक्राचा... ज्यांना हे दुष्टचक्र स्वतःपुरते मोडावेसे तीव्रतेने वाटल असेल, त्यांनी आपला जीवनक्रम पार बदलून खुशाल करावे." (मधल्या वाक्यांसह)
तुमचे बहुतांश विश्लेषण फ्लूविषयी आहे. स्वाईन फ्लू या नॉव्हेल ए एच१एन१ विषयीचे वाटत नाही. त्यामुळे काय बोलू? "औषधी कंपन्यांचा हात आहे, तसेच बेजबाबदार डॉक्टर्सचा हात आहे, असे म्हणून सगळे खापर त्यांच्या डोक्यावर फोडणे टाळ्या घेणारे आकर्षक असले तरी मूळ समस्येचे सुलभीकरण आहे." हा तुमचा आक्षेप आहे, पण माझ्या लेखनात या 'दुष्टचक्रा'ला मी या मंडळींना जबाबदार धरलेलं नाही. कारण तसं करणं म्हणजे एक प्रकारे या नव्या फ्ल्यूचं अस्तित्त्वही नाकारण्यासारखं होईल. इतका मूर्खपणा मी करणार नाही. हा नवा फ्लू आहे. त्याचा सामना करावा लागेल. तो करावयाचा कसा इतकाच माझा मुद्दा आहे. इथं ही मंडळी जबाबदार आहेत आणि त्यांनी तेथे त्यांचे काम जबाबदारीने केलेले नाहीये, असा निष्कर्ष काढण्याजोगी स्थिती आत्ता आहे. हा निष्कर्ष चुकीचा ठरवला गेला तर माझे सर्व शब्द मागे.
"सध्याच्या AH1N1 फ्ल्यूवरील लशीचे अद्याप संशोधन पूर्ण झालेले नाही... हे निरूपद्रवी वाक्य आहे." (मधल्या वाक्यांसह)
फतवा यासंदर्भात मी वरच लिहिले आहे. रेकमेंडेशन म्हणूया.
" The following recommendations were provided to the WHO Director-General:
* All countries should immunize their health-care workers as a first priority to protect the essential health infrastructure. As vaccines available initially will not be sufficient, a step-wise approach to vaccinate particular groups may be considered. SAGE suggested the following groups for consideration, noting that countries need to determine their order of priority based on country-specific conditions: pregnant women; those aged above 6 months with one of several chronic medical conditions; healthy young adults of 15 to 49 years of age; healthy children; healthy adults of 50 to 64 years of age; and healthy adults of 65 years of age and above.
* Since new technologies are involved in the production of some pandemic vaccines, which have not yet been extensively evaluated for their safety in certain population groups, it is very important to implement post-marketing surveillance of the highest possible quality. In addition, rapid sharing of the results of immunogenicity and post-marketing safety and effectiveness studies among the international community will be essential for allowing countries to make necessary adjustments to their vaccination policies.
* In view of the anticipated limited vaccine availability at global level and the potential need to protect against "drifted" strains of virus, SAGE recommended that promoting production and use of vaccines such as those that are formulated with oil-in-water adjuvants and live attenuated influenza vaccines was important.
* As most of the production of the seasonal vaccine for the 2009-2010 influenza season in the northern hemisphere is almost complete and is therefore unlikely to affect production of pandemic vaccine, SAGE did not consider that there was a need to recommend a "switch" from seasonal to pandemic vaccine production.
WHO Director-General Dr Margaret Chan endorsed the above recommendations on 11 July 2009, recognizing that they were well adapted to the current pandemic situation. She also noted that the recommendations will need to be changed if and when new evidence become available."
(http://www.who.int/csr/disease/swineflu/notes/h1n1_vaccine_20090713/en/i...)
(लक्षात ठेवायची बाब ही की, स्वाईन फ्लू म्हणून जे काही झाले त्यात डब्ल्यूएचओचाही संदर्भ दिला जात होताच. जबाबदार सरकारे आहेत, महापालिका आहेत, लोकही आहेत आणि मिडियाही आहे. आता लसीविषयीही तसेच होणार आहे का?)
यात 'सेज' हा जो इंग्रजी लघुरूपातील शब्द (काय पण शब्द आहे?, हीही एक अंधश्रद्धा म्हणूया का?) आहे तो पुरेसा ठरावा. पुरेसा ठरावा म्हणजे संदर्भ तपासण्यासाठी. दुसरे काही नाही. वरचा इंग्रजी मजकूरच बाकी गोष्टी बोलेल. १३ जुलै २००९ ही तारीख आहे.
मृत्यूच्या कारणांविषयी खुलासा करू द्या सरकारला. मरणोत्तर चाचण्या का केल्या नाहीत त्याचाही खुलासा करू द्या. रिदा शेखनं ८० जणांना स्वाईन फ्लू दिला याचा पुरावा देऊ द्या सरकारला. ती नायडूत आली असती तर गेली नसती हेही नंतरच्या संदर्भात सिद्ध करू द्या. मग आपण बोलूया पुन्हा.
"बहुद्देशीय" असे तुम्ही शीर्षकात व पुढेही लिहिले आहे. हा शब्द मी बहु + उद्देशीय असा घ्यावा की, बहु + देशीय असा घ्यावा हा पेच आहे. ते जाऊ द्या. तुम्हाला बहुराष्ट्रीय म्हणावयाचे आहे का? बहुराष्ट्रीय वगैरे फुटकळ बाबी आहेत. कंपनी कंपनीच्या पद्धतीने चालते. स्केल बदलतो इतकेच. कोणी डब्ल्यूएचओकडून काही गडबडी करवून घेईल, कोणी महापालिकेकडून इतकाच फरक असतो.

'वास्तवात मी प्रतिक्रिया देण्याची गरजच नाहीये' असे म्हणूनही
' तरीही काही गोष्टी स्पष्ट करणे आवश्यक आहे म्हणून करत' हे म्हणून तुम्ही माझ्यासारख्या पामराच्या लेव्हलला आता उतरलात, ह्याबद्दद्ल आभार मानावे तेव्हढे थोडेच! धन्यवाद.

नेमका ह्याचवेळी टॅमीफ्ल्यू (हे रोशचे उत्पादन आहे, हे बरोबर आहे. त्यासाठी त्यांची टॅमीफ्ल्यू.कॉम ही वेगळी साईट का आहे, हे माहिती नाही) चा वापर नाईलाजाने करणे भाग पडत आहे, कारण इतर कमी इफेक्टिव्ह औषधे गुण देत नाहीत, म्हणून.

'हा घटकच, (टॅमिफ्लू म्हणत नाही) या नव्या विषाणूला कब्जात ठेवतो असे म्हणत उपचार चालले आहेत. यासंदर्भात रेझिस्टन्सचा धोका आहे हे ठाऊक असूनही पॅडेमिकच्या स्थितीत फ्लूच्या लक्षणांनाही या घटकाचा सर्रास वापर झाला आहे. इथे मॉनिटरिंग म्हणजे काय? ...... या मॉनिटरिंगला 'पोस्ट-मार्केटिंग मॉनिटरिंग' म्हणावे काय? ..... हे ध्यानी घ्यावे ही विनंती.'

तुम्ही जसे नवनवे औषधोपचार करत जाता, तसे जीवाणू त्यांना संवयीने स्वतःचा रेझिस्टन्स निर्माण करतात. तेव्हा प्रत्येक औषधाच्या संदर्भात कधी ना कधी तरी त्यांची प्रतिकारशक्ति वाढेल , अथव त्यांचे म्युटिकरण झालेले असेल (व म्हणून नव्या गुणधर्माचे जीवाणू अस्तित्वात आलेले असतील) हे नेहमीच माहिती असते, ते ह्याचे वेळी नव्याने झालेले ज्ञान नाही. पण म्हणून ह्यातून मार्ग काय उरतो? इलाज न करणे, माहिती असलेल्या जालिम औषधाचा वापर न करणे व रोग्यास मृत्यूच्या द्वारात नेऊन उभे करणे हे एका बाजूस, ज्याच्या उपयुक्ततेविषयी बर्‍यापैकी* खात्री आहे, (पण ज्याचे साईड इफेक्ट्स माहिती आहेत) हे दुसर्‍या. [* काही केसेसमध्ये तो इतके साईड इफेक्ट्स तात्काळ दाखवतो, की दुसरी उपाययोजना करावी लागते-- तीही बर्‍यापैकी प्रभावी आहे, असे ऐकून आहे]. ' मॉनिटरींग'चा अर्थ ज्याने त्याने घ्यायचा तसा घ्यावा. आताच आमच्या येथील लॅबने आमच्या येथील काही केसेस मध्ये दुसर्‍या प्रकारचे, म्हणजे म्युटेट झालेले जीवाणू दिसून आले असे दर्शवले आहे. त्या संशोधनात तथ्य किती आहे, आणि त्यामुळे कुठल्या औषधी कंपनीचा फायदा होईल, हे ज्याने त्याने आपापल्या दृष्टिकोनांतून ठरवावे.

'तुमचे बहुतांश विश्लेषण फ्लूविषयी आहे. स्वाईन फ्लू या नॉव्हेल ए एच१एन१ विषयीचे वाटत नाही. त्यामुळे काय बोलू? ' हे समजले नाही, स्वाईन फ्ल्यू, हाही एक प्रकारचा फ्ल्यूच आहे. 'साध्या फ्य्लू' पासून सुरूवात होऊन आता आपण मानवजात, सार्स, अनेक प्रकारचे अ‍ॅव्हियन फ्ल्यू असे करत करत येथपर्यंत येऊन पोहोचले आहोत. ह्याचा अर्थ ते सगळे मागचे आता गेले एकदाचे असेही नाही. त्यांचीही नवी रूपे निर्माण होत असतीलच. हे दुष्टचक्र आहे, असे त्यासाठीच म्हटले.

तुमचे इतर अनेक आक्षेप भारतातील राजकारणी व नोकरशाहांच्या अंदाधुंदीच्या संदर्भातील आहेत. जसे :

*पत्रकारदेखील, लेव्हल सिक्स अलर्ट का जारी करीत नाही, असे विचारत होते आणि आमचे अधिकारी, मंत्री, लोकप्रतिनिधी, त्याची गरज कशी नाही, हे सांगत होते. हा हास्यास्पद प्रकार असल्यानेच मी माझ्या मूळ प्रतिसादात लेव्हल ६ विषयीचा प्रश्न केला होता

*मृत्यूच्या कारणांविषयी खुलासा करू द्या सरकारला. मरणोत्तर चाचण्या का केल्या नाहीत त्याचाही खुलासा करू द्या. रिदा शेखनं ८० जणांना स्वाईन फ्लू दिला याचा पुरावा देऊ द्या सरकारला. ती नायडूत आली असती तर गेली नसती हेही नंतरच्या संदर्भात सिद्ध करू द्या.

ह्या सर्व आक्षेपांविषयी मी काहीही टिपण्णी केलेली नाही, कारण त्यांविषयी मला फार काही माहिती नाही, (मी भारतात रहात नाही). पण ते कसे चालले असेल ह्याविषयी संपूर्ण कल्पना आहे. मृत्यूच्या चांचण्या का केलेल्या नाहीत, आणि ते तसे होत नाही तोपर्यंत नक्की किती जण ह्यामुळे गेले हे कसे समजणार? एका दुर्दैवी मुलीने इतर ८० जणांना स्वाईन फ्ल्यू दिला असे अत्यंत उर्मट विधान आपल्या येथील सरकारी अधिकारी अथवा/आणि राजकारणी करू शकतात, हे माझ्या तेथील अनुभवावरून मलाही माहिती आहे.

'बहुद्देशीय': माझी चूक होती, मला बहु राष्ट्रीय म्हणायचे होते.

हे जे काही चालले आहे, ते कुठच्या तरी स्थानिक अथवा आंतरराष्ट्रीय संस्थेने षडयंत्र रचवून चालवले आहे, ह्या कॉन्स्पिरसी थेयरीशी मी सहमत नाही. माझ्या मते ही आहे मानवजातीची, जगण्याच्या (असह्य) रेट्याबरोबर आलेली दुर्दैवी फरफट. ते तसे सगळे असूनही त्याच चक्रात तसेच चालत रहायचे, आणि त्या जीवाणूंप्रमाणेच आपली धडपड सुरू ठेवावयाची. तेही जीवाणूच आम्हीही जीवाणूच. ही बॉटमलाईन. (चला आता, जी. ए. अपरिहार्यपणे आठवले).

श्रावण मोडक's picture

17 Aug 2009 - 3:14 pm | श्रावण मोडक

या विषयावरील चर्चेत हा माझा शेवटचा प्रतिसाद.
'वास्तवात मी प्रतिक्रिया देण्याची गरजच नाहीये' असे म्हणूनही...
वास्तवातच्या अलीकडे काही शब्द आहेत. तेही घ्या. त्यांचा संदर्भ चोख आहे. त्यासह वाचल्यानंतरच मुद्दे स्पष्ट होतील. नुसते 'वास्तवात' पासून सुरवात केलीत तर पामर वगैरे वाटू लागतेच. तेव्हा धन्यवाद, आभारांची गरज नाहीये.
इलाज न करणे...साईड इफेक्ट्स माहिती आहेत) हे दुसर्‍या.
औषधोपचार करण्यास मी हरकत घेतलेली नाही. सर्रास या शब्दाच्या संदर्भात माझे मुद्दे आहेत. फ्लू झाल्यावर आजही अनेक जण अंगभूत शक्तीच्या जोरावरही त्यावर मात करतातच. त्याऐवजी सरसकट टॅमिफ्लू दिल्या गेल्या. हा एकूण आपण दिलेल्या प्रतिसादाचा प्रश्न आहे.
'तुमचे बहुतांश विश्लेषण फ्लूविषयी आहे. स्वाईन फ्लू या नॉव्हेल ए एच१एन१ विषयीचे वाटत नाही. त्यामुळे काय बोलू? ' हे समजले नाही...
'साधा फ्लू' असेल तर टॅमिफ्लूच दिली जाते का? इतरही उपचार होतात. तुम्ही केलेलं कोमट पाणी वगैरे पद्धती अगदी तशाच नसल्या तरी आजही वेगवेगळ्या पद्धतीने वापरून फ्लूवर मात होतेच. इथे तसा फ्लू असतानाही टॅमिफ्लूचा सर्रास वापर झाला आहे. त्यामुळे तुमच्या उपचारांबाबतच्या दाखल्यांवर मी काही लिहित नाहीये.
राजकारणी, नोकरशहा वगैरेंची अंदाधुंदीच स्वाईन फ्लूच्या संदर्भात अधिक झाली आहे. म्हणूनच मग मृत्यूची कारणे अधिकृतपणे दिली जात नाहीत. हे काही आजचे नाही हेही तुम्हाला ठाऊक आहेच. या स्वाईनफ्लूसंदर्भातील अंदाधुंदीचे इतर असंख्य दाखले आहेत. देत बसत नाही. पुरावे नाहीत हा एक भाग आहेच. म्हणून मी नेहमी म्हणतो, चोर-दरेडोखोर परवडले. त्यांच्याकडून हमखास पुरावे मागे राहतात. या सरकारचे, पुढाऱ्यांचे, अधिकाऱ्यांचे काय करायचे? हुशार इतके की पुरावेही मागे रहात नसतात.
कॉन्स्पिरसी थेयरीशी तुम्ही असहमत आहात. ठीक आहे ना. मतभेद असू शकतातच. बाकीचे प्रश्न कायम राहतात. मीही ती थेयरी बाजूलाच ठेवतो. पण म्हणून घोळ थोडाच सुटतो. तो तर तसाच आहे. त्यामुळेच मी थेयरीचा थेट आरोप केला नाही. मी म्हटलं होतं, हे तपासून घेऊया.
चालायचंच.
जीवाणू (विषाणू) म्युटेट झाल्याचे लिहिले आहे तुम्ही. स्वाईन फ्लूचेच?

प्रदीप's picture

17 Aug 2009 - 5:56 pm | प्रदीप

"औषधोपचार करण्यास मी हरकत घेतलेली नाही. सर्रास या शब्दाच्या संदर्भात माझे मुद्दे आहेत. फ्लू झाल्यावर आजही अनेक जण अंगभूत शक्तीच्या जोरावरही त्यावर मात करतातच. त्याऐवजी सरसकट टॅमिफ्लू दिल्या गेल्या. हा एकूण आपण दिलेल्या प्रतिसादाचा प्रश्न आहे."

आणि पुढे "...इथे तसा फ्लू असतानाही टॅमिफ्लूचा सर्रास वापर झाला आहे".

एक साधा हायपोथेटिकल प्रश्न विचारतो, हे वैयक्तिक वाटले तर सोडून द्यावे. प्रश्न असा आहे, समजा तुम्हाला अथवा तुमच्या अगदी जिवलग नात्यातील कुणालातरी स्वाईन फ्ल्यू झाल्याचे कन्फर्ड निदान झाले आहे. आता अशा वेळी तुम्ही स्वतः काय उपाययोजना करायची, हे ठरवू शकता -- म्हणजे जी काही उपाययोजना करावयाची त्यास तुमची संमति जरूरी आहे,असे मानून चालू. तेव्हा तुम्ही काय कराल? साधेच उपचार (म्हणजे टॅमि फ्ल्यू सोडून) कराल? का टॅमि फ्ल्यू वापरण्यास डॉक्टरांना संमति द्याल?

"जीवाणू (विषाणू) म्युटेट झाल्याचे लिहिले आहे तुम्ही. स्वाईन फ्लूचेच?"

नक्की ठाऊक नाही, परंतु H2N1 नावाचे दुसरे काहीतरी आहे त्याचेही असू शकेल. स्वाईन फ्ल्यूचा असला तरी हे माहिती असूं की आमच्या येथे ह्याची पहिली केस २ मे रोजी झाली. आतापर्यंत ७,००० कन्फर्मड केसेस झालेल्या आहेत. आणि त्यातील ६ किंवा ७ मृत्यू पावले.

श्रावण मोडक's picture

17 Aug 2009 - 6:46 pm | श्रावण मोडक

वैयक्तिक आहे म्हणूनच उत्तर देतो.
"...अगदी जिवलग नात्यातील कुणालातरी स्वाईन फ्ल्यू झाल्याचे कन्फर्ड निदान झाले आहे. ... तुम्ही काय कराल? साधेच उपचार (म्हणजे टॅमि फ्ल्यू सोडून) कराल? का टॅमि फ्ल्यू वापरण्यास डॉक्टरांना संमति द्याल?"
हे विचारण्याआधीच्या मजकुरात माझी वाक्ये तुम्ही दिली आहेत. त्यातील "तसा फ्लू" हे शब्द 'साधा फ्लू' अशा अर्थाचे आहेत. कारण मुळातील तो अख्खा परिच्छेद त्याच अर्थाने लिहिलेला आहे. त्याविषयी गोंधळ झाल्याने हे वैयक्तिक आले असावे.
कन्फर्म्ड निदान झाल्यावर (म्हणजे इथे एनआयव्हीचा अहवाल वगैरे ना?) टॅमिफ्लू देण्यास संमती देईन.
कन्फर्म्ड निदान न करताही टॅमिफ्लू देण्यास माझा विरोध होता, आहे.
साधी गोष्ट आहे. टॅमिफ्लूची एक स्ट्रीप (१० गोळ्या) २८० रुपयांना मिळते आणि केंद्राने अशा एक कोटी गोळ्या आत्तापर्यंत संपवल्या आहेत. आणखी १ कोटी गोळ्या खरेदी केल्या जात आहेत. हे सारे टॅमिफ्लूचेच. दुसऱ्याही गोळ्या भारतात तयार केल्या जातात. अगदी त्या निर्यातही केल्या जातात (त्याचा एक सूचक दाखला म्हणून आजच्या इंडियन एक्स्प्रेसमध्ये (सुदैवाने इंटरनेटवर ती नाही, मुद्रित माध्यमात आहे) आलेल्या बातमीचा उल्लेख करतो. त्यात भारतीय उत्पादक या गोळ्या स्वस्तात कशा देता येतील हे सांगताहेत वगैरे तपशील आहेत). त्यांचा काहीही उल्लेख न करता जेव्हा सरकार सरधोपटपणे टॅमिफ्लू म्हणते तेव्हा शंका येतेच. ओझेल्टामिविर न म्हणता टॅमिफ्लू म्हणायचे हे इतके सरळ आहे?
पुण्यात काय झाले? नंतर - नंतर कन्फर्म्ड निदानासाठीची चाचणीही बंद केली गेली. ती न करताच टॅमिफ्लू द्या ही रीत होती. (अवांतर - आता ही चाचणी बंद झाल्यानंतरच (झाल्यामुळे असं मी म्हणत नाही) पुण्यात साथ आटोक्यात येत गेली असे कालानुक्रमे दिसते. यावरून 'झाल्यामुळे'चा निष्कर्ष काढायचा का?)
माझ्या बहुतांश लेखनात हे असे सगळे संदर्भ असेच्या असे आलेले नाहीत, ते माझ्या डोक्यात पार्श्वभूमीवर आहेत. त्यापुढे मी निष्कर्ष काढत लिहीत गेलो आहे. त्यामुळे मी जे लिहितोय त्यातील मूळ मुद्याबाबत संभ्रम निर्माण झाला असेल तर तो या लेखनशैलीचा दोष आहे. स्वाईन फ्लूला भारतीय संदर्भात दिला गेलेला प्रतिसाद (सरकारचा, निमसरकारी संस्थांचा, खासगी क्षेत्राचा वगैरेंसह जनतेचाही) कसा होता? त्याचे आधार काय आहेत? साध्य झाले?
तुमच्या येथील म्युटेशनचा संदर्भ क्षणभर बाजूला ठेवू. सीडीसीनं जाहीर केलेली काही माहिती इथं आहे - http://www.cdc.gov/mmwr/preview/mmwrhtml/mm58d0814a1.htm तीही पुरेशी बोलकी मानण्यास हरकत नसावी.

प्रदीप's picture

17 Aug 2009 - 7:00 pm | प्रदीप

'कन्फर्म्ड निदान न करताही टॅमिफ्लू देण्यास माझा विरोध होता, आहे'
...'.'पुण्यात काय झाले? नंतर - नंतर कन्फर्म्ड निदानासाठीची चाचणीही बंद केली गेली. ती न करताच टॅमिफ्लू द्या ही रीत होत'

हे सर्व प्रथमच तुम्ही येथे लिहीत आहात. त्यामुळे प्रथमच तुमचा टॅमि फ्ल्यूस विरोध का, हे येथे येत आहे. आतपर्यंतच्या तुमच्या सर्व लिखाणात हे उल्लेख कुठे आलेच नाहीत. हे जर अगोदरच स्पष्ट लिहीले असतेत तर इतकी उलटसुलट चर्चा झाली नसती

(लेवल ६ च्या संदर्भातही असाच गोंधळ झाला. तुमचे त्या उल्लेखाच्या आजूबाजूचे सर्व लिखाण डब्ल्यू. एच. ओ. विषयीचे होते. साहजिकच मला (व बहुतेक इतर वाचकांनाही) तुमचा लेवल ६ चा प्रश्न त्या संस्थेच्या संदर्भात आहे असे वाटले होते).

टॅमि फ्ल्यू हे सध्या जरी ह्या फ्ल्यूवरील 'रामबाण' इलाज असले, तरी ते चित्र आज ना उद्या बदलेल हे माहिती आहे. म्हणूनच त्या त्या देशांतील संस्थांनी 'मॉनिटरींग' केले पाहिजे. किती केसेस झाल्या म्हणजे चित्र बदलले असे म्हणायचे वगैरे प्रश्नांची उत्तरे तज्ञ देऊ शकतील.

ज्ञानेश...'s picture

17 Aug 2009 - 1:25 pm | ज्ञानेश...

श्रावण मोडक साहेब आणि पुनेरी..
तुम्ही दखल घेतलीत, आभारी आहे.

@मोडक साहेब,
तुम्ही अनेक वेगवेगळे मुद्दे एकत्र मांडले आहेत. मला समजले तसे लिहितो.

१)तुमच्या भाच्याचा ताप- अशा घटना घडणे शक्य आहे. डॉक्टर्स चुकतात. डॉक्टर्स भ्रष्ट असू शकतात. डॉक्टर्स पेशंटचा मारही खातात. ही कथा सदर विषयाशी संबंधित नसल्याने त्यावर फार लिहित नाही.

२)महापालिका आयुक्तांचे विधान, तुमची त्यावरील टीका, अभिज्ञ यांचा धागा वगैरे मला माहित नाही. त्यामुळे नो कमेंट्स.

३)'ओसेल्टामिविर' हेच त्या औषधाचे नाव आहे, ज्याबद्दल आपण बोलतो आहोत. त्याचेच ब्रँड नेम टॅमिफ्लु आहे, हेही तुम्हाला माहिती आहे असे दिसतेय. त्यासंदर्भातल्या तीन चार वाक्यांचे प्रयोजन कळत नाही. ड्ब्ल्यू एच ओ ला तुम्ही प्रमाण मानता किंवा नाही, याने काही फरक पडत नाही. ही संघटना या गोळीचा छुपेपणाने प्रसार करते असे तुम्हाला वाटते. फाईन. हरकत नाही.
पण एकीकडे स्वतःच टॅमिफ्लूच्या सरकारी धोरणावर टीका करतांना जागतिक आरोग्य संघटनेने या औषधाचा उल्लेख केला नसल्याचा हवाला द्यायचा आणि नंतर तसा उल्लेख केला आहे म्हटल्यावर त्या संघटनेचे औषध कंपनीशी साटेलोटे असल्याचा संशय व्यक्त करायचा, हा विरोधाभास नाही का? तुमच्या या संशयाबद्दल मी पुरावे वगैरे मागणार नाही, पण तुमच्याकडे ते असतील अशी आशा करतो.

४)टॅमिफ्लू नावाचे संस्थळ मी पाहिले नाही. मला तशी गरज वाटली नाही कारण इंटरनेट हा माझ्या माहितीचा एकमात्र सोर्स नाही. प्रत्येक गोष्ट इंटरनेटवर दिसलीच पाहिजे ही अपेक्षाच चुकीची आहे.. खास करून उपचारासंदर्भात! कुठलीही जबाबदार संघटना "अमुक आजारावर तमुक औषध गुणकारी" असे गावठी सल्ले देत नाही. तुम्हाला माहिती मिळाली नाही म्हणजे ती माहिती अस्तित्वातच नाही असे वाटत असेल,तर याबद्दल फार बोलायलाच नको.
तुम्ही किंवा पुनेरी यांनी माफी वगैरे मागावी असे मी कुठेच म्हटले नाही. माझा तो अधिकारही नाही. त्यामुळे त्या वाक्याचे(ही) प्रयोजन शून्य आहे. (टाळ्या मिळू शकतात!)

५)व्हायरस जुना आहे. म्युटेशन मुळे नव्या फॉर्ममधे सामोरा आला आहे.
विकिपेडीयावर 'स्वाईन फ्लु' टाकून पहा.
१९१८ च्या स्पॅनिश फ्ल्यू बद्दल वाचा.

६)याचे उत्तर प्रदीप यांनी दिलेच आहे. तुम्हाला नक्की काय म्हणायचे ते मला नीट कळले नाही. डब्ल्यु एच ओ चे घनिष्ट संबंध वगैरे म्हणायचे असेल तर त्यासंबंधी पुरावे असतीलच मघाशी म्हटल्याप्रमाणे.. तेव्हा पूर्णविराम.

७)जागतिक आरोग्य संघटनेचा फतवा? असेल असेल.
आम्हाला अन्य काही पर्याय नसल्याने सध्या तरी आम्ही तिथल्या एक्सपर्ट्सच्या मतांवर विसंबून आहोत.
तपासून घ्याल का सारेच एकदा?
जरूर जरूर.

८)डेथ सर्टिफिकेटबद्दल- याबद्दल मला जे माहिती आहे तेवढे सांगतो.
अशा केसेस मधे 'मृत्यु' हा न्युमोनिया, त्यातून होणारे काँप्लिकेशन्स, रेस्पायरेटरी डिस्ट्रेस् वगैरे मुळे होतो. त्यामुळे शवविच्छेदनाच्या अहवालात अशी कारणे येत असावीत. पोस्ट मॉर्टममधे व्हायरस सापडत नसतो. व्हायरस लॅबमधे सापडतो. अशा केसेसच्या "डायग्नोसिस" मधे स्वाईन फ्ल्यू हे निदान असते. पोस्ट मॉर्टममधे तसे नसेल, तर त्यात शंका/संशय घेण्यासारखे काही वाटत नाही.
समजा, उद्या एखाद्याचा अपघात झाला, मेंदूत रक्तस्राव झाला आणि मृत्यु झाला तर शवविच्छेदनाच्या अहवालात मेंदूतील रक्तस्राव हे मृत्युचे कारण दिले जाईल, 'अपघात' हे कारण दिले जाणार नाही!

तुम्ही म्हणता त्याप्रमाणे बरेच प्रश्न आहेत. गुंतागुंतीचे आहेत. मी काही सरकारी डॉक्टरांचे वकिलपत्र घेऊन वादविवादात उतरत नाहीये.

पुनेरी यांनी आपल्या मुलाला सरकारी दवाखान्यात न नेण्याची जी कारणे सांगीतली, त्यातले एक प्रश्नार्थक विधान मला खटकले आणि मी तसे लिहिले. याचा अर्थ मी सर्व सरकारी व्यवस्थेचा कैवार घेऊन वादासाठी उभा आहे असा घेतला गेला. कदाचित माझे शब्द चुकले असतील. कदाचित नसतील. आता मी पुरेसा खुलासा केला आहे असे मला वाटतेय.

मुळात व्हायरस काय असतो? तो कसा वाढतो? कुठलेही व्हायरसरोधी औषध मानवी शरीरावर नेमके कशा प्रकारे काम करते? जागतिक आरोग्य संघटना कशी काम करते? तिला पैसे कुठून मिळतात? औषध कंपन्यांचे हितसंबंध कुठे कुठल्या मर्यादेपर्यंत गुंतलेले असतात? एक समाज म्हणून आपण कुठल्याही संकटाला कसे सामोरे जातो.. अशा बर्‍याच विषयाचा सखोल अभ्यास केल्यावर कुठलेही आरोप धाडसाने करता येतात असे मला वाटते. इंटरनेटवर वाद घालण्यासारखी सोपी गोष्ट कुठली नाही. कारण आपल्या कुठल्याच विधानाला सिद्ध करण्याची जबाबदारी आपल्यावर नसते.
मला जेवढे कळते (असे मला वाटते) त्यावर मी लिहितो. आक्षेप असू शकतात. त्यामुळे वरील चर्चेबद्दल मी पूर्ण समाधानी आहे.

सर्वच मंडळींचे आभार मानून तूर्त थांबतो.

"Great Power Comes With Great Responsibilities"

ज्ञानेश यांची वरील प्रतिक्रियेखेरीज मला एक खरड ही पाठवली. ती अशी:
प्रेषक : ज्ञानेश..., सोम, 08/17/2009 - 12:16
नथिंग पर्सनल अ‍ॅट ऑल..

तुमच्या मतांचा आदर आहेच. फक्त काही विषयांची गल्लत होते आहे इतकेच.
असो.

फार मोठा विषय आहे. सविस्तर सांगेन तसा वेळ मिळताच.

गोटी कसा आहे? माझ्या शुभेच्छा पोचवा त्याला!

ज्ञानेश यांच्या मतांचा मी ही आदर करतो पण त्यांची काहीतरी गल्लत होते आहे असे वाटले म्हणुन मी त्यांना खरडवहीत उत्तर दिले होते. त्यांनी इथेही परत मुद्दे उपस्थित केल्यामुळे मी ते उत्तरच इथे देतो. ते असे:

माझी गल्लत होते आहे असे अजुनही मला वाटत नाही. व्यवसायानिमित्त माझा अनेक सरकारी, निमसरकारी तसेच खाजगी डॉक्टरांशी संबंध यापुर्वीही आला आहे आणि तिथली परिस्थिती काय असते हे मला चांगले माहिती आहे. मी सरसकट सर्व खाजगी डॉक्टर सर्व सरकारी डॉक्टर पेक्षा चांगले असे ध्वनित करु इच्छित नाही किंवा लोकांनी काळजी घेऊ नये असेही.

प्रश्न आहे तो या सर्व प्रकरणात सरकार, मनपा सारख्या स्वायत्त्त संस्था, सरकारी दवाखाने आणि मिडीया यांच्या रोलबाबत. घबराट पसरली ती मिडीयातल्या वृत्तांमुळे हे तर सत्य आहेच. पण एकंदरच मिडीयातली परिस्थिती पाहता ते स्वतः परिस्थितीचे विष्लेशण करण्याच्या परिस्थितीत नाहीत, त्याकरता आवश्यक असलेली तांत्रिक माहिती त्यांच्याकडे नाही. हे लक्षात घेता सरकार, निमसरकारी नोकरशहा आणि सरकारी, निमसरकारी दवाखान्यांची भुमीका जास्तच महत्वाची ठरते.

गेले काही आठवडे पुण्यामधे सीझनल फ्ल्यु, सर्दी-पडसे, डेंग्यु, न्युमोनिया, मलेरिया अश्या अनेक साथी सुरु आहेत. शिवाय ब्रॉन्कॉयटीस, टॉन्सीलायटीस, अस्थमा अश्या रुग्णांच्या लक्षणात भर पडली आहे. सध्याच्या हवामानाचा विचार करता ते साहजिकच आहे. त्यातच स्वाईन फ्ल्यु ची ही साथ पसरली.

अश्या परिस्थितीत, विषेशतः स्वाईन फ्ल्युची प्राथमिक लक्षणे वर दिलेल्या यादीपैकी बहुतेक रोगांशी जुळतात हे लक्षात घेता, जी परिस्थिती निर्माण होऊ शकते तिची कल्पना करण्यास फार कष्ट पडतात असे कुणीच समजु नये. सुरुवातीला स्वाईन फ्ल्यु चे रुग्ण शाळांमधे निघाले आणि मग पालकांनी मुलांना शाळेत पाठवणे बंद केले होते. तरीही सार्वत्रिक घबराट नव्हती. ती निर्माण झाली रिदा शेख च्या मृत्युनंतर ज्या बातम्या छापुन आल्या त्यानंतर. अन त्यातला सर्वात आक्षेपार्ह भाग होता महापालिका आयुक्त, कलेक्टर, आरोग्य मंत्री आणि मुख्यमंत्री यांची जहांगिरने सरकारला माहिती दिली होती का आणि खाजगी दवाखान्यांनी कशी हलगर्जी केली याविषयीची विधाने आणि खाजगी दवाखान्यात जाऊ नका, नायडुला जा अशी आवाहने.

ही विधाने प्रेस कॉन्फरन्स मधे केल्यामुळे त्यांना मोठी प्रसिद्धी मिळणे अपेक्षितच होते आणि तशी ती मिळालीही. तेव्हा मिडीयातही घबराट होती (अजुनही आहे. पुण्यात सुमारे १५-१६ पत्रकार स्वाईन फ्ल्यु टेस्टला पोझिटिव्ह निघाल्याची पत्रकार जगतात चर्चा आहे.) शिवाय या घटना अनपेक्षितपणे घडत गेल्याने पत्रकारांना अभ्यास करण्यासही वेळ नव्हता.

दुसर्‍या दिवशीपासुनच नायडु मधे रोज हजारो लोक तपासणीस धडकले त्यांना तपासण्यास तिथे डॉक्टर होते अवघे दहा. (नंतर संख्या वाढवुन ती बारा केली.) त्यांच्या आवाक्यातले हे काम नव्हतेच. त्यामुळे अगदी कमी लोकांचे स्वॅब घेणे (जे परदेशात जाऊन आलेले असतील ते किंवा जे स्वाईन फ्ल्यु रुग्णांच्या प्रत्यक्ष संपर्कात आलेले असतील ते), काही जणाचे समुपदेशन करणे आणि बहुतक सर्वाना तुमच्या तपासणीची गरज नाही परत जा असे सांगणे सुरु झाले.

दरम्यान सर्व नोकरशहा आणि मंत्र्यांकडुन खाजगी डॉक्टरवर टीका सुरुच होती. काहीनी तर खाजगी रुग्णालये बेजबाबदार पणे उपचार करतात पण सरकार स्वतः त्यांच्याविरुद्ध कारवाई करणार नाही, तरीही जर रुग्णाच्या नातेवाईकांनी कारवाई करायचे ठरवले तर त्यांना सर्व मदत केली जाईल अशी विधाने करण्यापर्यंत मजल मारली. रिदा शेखच्या मृत्युचे प्रत्यक्ष निदान, तिचे शवविच्छेदन झाले अथवा नाही, हे मात्र गुलदस्त्यात राहिले. साहजिकच खाजगी डॉक्टरांमधे असुरक्षिततेची भावना पसरली आणि त्यांनी रुग्णांना इलाज करण्याऐवजी नायडुकडे पाठवणे सुरु केले. तिथे अर्थातच सर्वांवर उपचार होणे शक्य नव्हते.

नंतर तर या उपचार करणार्‍यापैकी काही डॉक्टरांनी व पॅरानी स्वतःच वृत्तपत्रांना रोज मुलाखती देणेही सुरु केले होते. एका बाजुला सतत होणार्‍या आरोपांनी खाजगी डॉ़क्टर-रुग्ण संबंध ताणावले होते त्यामुळे खाजगी डॉक्टर कोशात जात होते तर दुसरीकडे शासन, निमशासकीय संस्था स्वाईन फ्ल्यु कसा धोकादायक आहे, आम्ही `प्राणपणाने' कसा त्याचा मुकाबला करत आहे आणि खाजगी डॉक्टर कसे बेजबाबदार आहेत असा जोरदार प्रचार करत होते. त्यामुळे गोंधळ अजुनच वाढत होता. त्यातच मेक्सीकन मॉडेल वगैरे चर्चा सुरु झाल्या अन घबराट अजुनच पसरली.

दरम्यान एपीडेमीक्ट अ‍ॅक्ट लागु झाला होता अन शैक्षणिक संस्था वगैरे बंद झाल्या होत्या. अनेक लोक घाबरुन पुणे सोडुन जात होते आणि विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड अश्या ठिकाणी कोणतेही चेकिंग होत नसल्याने या स्थलांतरीतांमार्फत विषाणुचा सर्वदुर प्रसार होण्याचा नवाच धोका उत्पन्न झाला. त्यावरही शेवटपर्यंत काहीच कारवाई झाली नाही. स्वाईन फ्ल्यु टेस्टचे निकाल मिळण्यास सुद्धा बराच वेळ लागत होता. (हे ही साहजिकच होते.) पुण्यात असे दिसत होते की सगळे हवालदिल आहेत आणि सरकार मात्र स्वतःचीच पाठ थोपटुन घेत आहे. या सर्व काळात स्वाईन फ्ल्यु म्हणजे काय, त्याची लक्षणे काय, प्रतिबंधात्मक उपाय काय, मास्क कुठले वापरावे, ते कसे वापरावे, एक मास्क किती वेळ वापरावा, त्याची विल्हेवाट कशी लावावी याबाबत मात्र माहिती देण्याचे प्रयत्न जवळपास होत नव्हतेच. अन मास्कचा काळाबाजार सुरु होता.

त्यानंतर ससुनमधे क्वारंटाईन वॉर्ड तयार झाला अन तिथे दाखल झालेले रुग्ण पटापट मरायला लागले (साधारण दिवसाला दोन हे प्रमाण होते.) त्यातले बहुतांश रुग्ण ससुनमधे नायडु मधुन आले होते अन तीन्-चार दिवस तेथे उपचार घेत होते. पण त्यांचेही शवविच्छेदन झाले का, मृत्युचे नक्की कारण काय हे गुलदस्त्यातच राहिले. (हे प्रश्न विचारले पण अधिकार्‍यांनी टेबलवरच्या फायली दाखवुन त्या कागदांना जंतुसंसर्ग झाला आहे, ते हाताळणे धोकादायक आहे असे शुक्रवारी - १४ तारखेस - सांगितले असे एक पत्रकार सांगतो.)

इएसआय हॉस्पिटलमधे तर अजुनच विचित्र प्रकार होता. तेथे प्राथमिक तपासणी केंद्रात जाण्यासाठी एकदा क्वारंटाईन वॉर्ड मधे पोहोचुन तपासणी करण्यासाठी एकदा क्वारंटाईन वॉर्ड ओलांडावा लागत होता तर नंतर रिपोर्ट घेण्यासाठी एकदा.

अश्या परिस्थितीत मी जे प्रश्न उपस्थित केले ते मनात येणे साहजिकच होते. अन हे प्रश्न मी आत्तापर्यंत उपस्थित केले नाहीत याचे कारण आळस हे नाही तर यासाठी योग्य वेळाची वाट बघणे हे होते. साथ भरात असताना असे प्रश्न शक्यतो उपस्थित करु नयेत असेच माझे मत आहे. गेले काही दिवस साथ आटोक्यात असल्याचे सांगितले जात आहे, कदाचित पाऊस थांबला अन सुर्यप्रकाश पडु लागला किंवा लोक बाहेर पडत नसल्याने संसर्ग कमी झाला किंवा प्रत्यक्ष/ अप्रत्यक्षरित्या विषाणुशी संपर्क आला (माईल्ड क्रॉस इन्फेक्शन झाले) आणि लोकांमधे इम्युनिटी तयार झाली अशी कारणे त्यामागे असतील (मी तज्ञ नाही.) पण आत्ता या सर्व बाबिंचा सांगोपांग विचार करणे आवश्यक आहे या धारणेतुन मी काल लिहिले.

Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

श्रावण मोडक's picture

17 Aug 2009 - 2:37 pm | श्रावण मोडक

१) - भाच्यावर (खरं तर रुग्णावर) स्वाईन फ्लूचे उपचार झाले असते. ते टळले. डॉक्टर काय असतात वगैरेत मी पडत नाही. खूप चांगले डॉक्टरही मी अनुभवले आहेत. खूप भ्रष्ट, न-नैतीक डॉक्टरही पाहिले आहेत.
३) - मला इतकेच म्हणायचे आहे की, डब्ल्यूएचओनेदेखील टॅमिफ्लूची वकिली केलेली नाही. टॅमिफ्लू गोळीचे नाव आहे, औषधी घटकाचे नव्हे. माझ्या मुद्दा ३ मध्ये मी कुठंही डब्ल्यूएचओ आणि औषध कंपनीचे (येथे टॅमिफ्लूची निर्माती) साटेलोटे असल्याचे म्हटलेले नाही.
४) - इंटरनेट हा स्रोत आहे इतकेच. टॅमिफ्लूच्या किती लाख गोळ्यांचा साठा, तेच एकमेव औषध वगैरे आपले सरकार बोलत होतेच. त्यांना गावठी कसे म्हणू? माफी तुम्ही मागितलेलीच नाही. त्या व्यवस्थेचा अवमान होईल तरीही मी माफी मागत नाही असे माझे त्या मुद्द्यातील म्हणणे आहे.
५) - १९१८ चे वाचले आहे. विकीचेही आणि इतरही बरेच. आणखीही काही संदर्भ आहेत. स्वाईन, एव्हिअन करीत आत्ताचा एच१एन१ कसा झाला वगैरे. पण तेही इंटरनेटवरच, म्हणून आता तपशिलात पडत नाही.
६) - प्रदीप यांच्या मुद्यांवर लिहिले आहे. डब्ल्यूएचओ ज्यांना पार्टनर म्हणते त्या संस्था कोणत्या हे आता शोधतो जरा.
७) - फतवा हा शब्द मागे. बाकी रेकमेंडेशन्स वगैरे वर प्रदीप यांच्या प्रतिसादावरील उत्तरात दिली आहेत. पण हे पुन्हा इंटरनेट आहे बरं. त्यामुळं धोका आहे, खुद्द माझ्याही माहितीला.
८) - मृत्यू प्रमाणपत्र बाजूला ठेवू क्षणभर. सरकारला असे म्हणू द्या की, "पुण्यात जे काही मृत्यू झाले त्यापैकी अमूक इतके मृत्यू हे इतर कोणतीही लक्षणे नसताना केवळ स्वाईन फ्लूची लक्षणे असताना झाले असल्याने ते स्वाईन फ्लूचेच मृत्यू आहेत." मध्येच एक बातमी आली होती, की त्या मृत्यूंपैकी तिघांमध्ये स्वाईन फ्लूचा रिपोर्ट निगेटीव्ह होता. तसंच थोडं बाकीच्यांचंही काय ते पक्कं होऊ द्या. सरकार आहे ते शेवटी. आम्ही त्यावर भरवसा ठेवायचा असतो. मग या सरकारने दुष्काळ न म्हणता दुष्काळसदृष्य म्हटलं की ते मान्य करावं लागतं. दुष्काळ म्हटलं की करमाफी वगैरे द्यावी लागते, म्हणून त्याला दुष्काळसदृष्य म्हणायचं; तशा या साथी अशा जाहीर न करता धोका आहे म्हणून उपायांची चर्चा करायची, गोळ्यांची नावं घ्यायची वगैरे बाबी आपण विसरून जाऊ क्षणभर. कारण स्वाईन फ्लू महत्त्वाचा आहे. त्याचा सामना करायचा आहे.
तुम्ही सरकारी डॉक्टरांचा कैवार घेतलेला आहे असं कुठं आहे? मी तर दिलेल्या रुग्णाच्या दाखल्यातील डॉक्टर खासगीच आहेत. पुनेरी यांचा चांगला अनुभव खासगी डॉक्टरांचा आहे. सरकारी डॉक्टरांच्या अडचणींचा उल्लेख तुम्ही केलात, त्यावरचे माझे रोखठोक उत्तर मी दिले. ते थोडे संयत भाषेतही मांडता आले असते हे खरे. मी ते केले नाही. कारण उघड आहे. मला त्या मुद्यात मुळातच दम वाटलेला नाही. अडचणी वगैरे असतील तर त्या सोडवायच्या कोणी? असो.
गुंतागुंत? यासाठीच तर आधीपासून या भूमिकेत होतो की अशी चर्चा उपयोगाची नसते. संदर्भ इकडून तिकडून प्रत्येकाला काढता येतात. इंटरनेटवरचा वाद वगैरे तर ध्यानीच होतं, म्हणून अभिज्ञ यांच्या धाग्यापर्यंत या विषयात लिहिलंही नव्हतं. पण जेव्हा बेधडक विधानं होऊ लागतात याच इंटरनेटवर, तेव्हा इतरही काही सांगावं लागतं.
जागतीक आरोग्य संघटना, औषध कंपन्यांचे हितसंबंध वगैरे थोडं लांबच ठेवूया तूर्त. त्याचे पुरावे वगैरे नंतर गोळा करू. सध्यापुरतं तरी ही संघटना नेमकं काय करते आहे हेच एकदा तपासून घेऊ या. मग कोणतीही पळवाट न काढता हे करूया. आणि ती टूथलेस बॉडी असेल तर तिचे किती आणि काय घ्यायचे हेही ठरवू.
आता माझी शैली अनेकदा उपरोधाच्या अंगानं जाते, आणि थेट मुद्दा आणि उपरोध अशीही होते. आपल्या या वादात ते झालं आहे. माझे काही मुद्दे आणि तुमचे मुद्दे एकाच स्तरावर आहेत. काहींत मतभेद आहेत. मी एकूण लिहितोय ते एकट्या प्रदीप, ज्ञानेश, पुनेरी किंवा अभिज्ञ यांना उद्देशून नाही. प्रदीप यांचे बरेच मुद्दे मी जे म्हणतोय त्याच अंगानं जातात. डब्ल्यूएचओला मी का मानत नाही याचं कारण ती टूथलेस बॉडी आहे हे तर एक आहेच. आता या साऱ्याची गोळाबेरीज न करता इथंच मीही थांबतो.

कळुन चुकले की सर्व आणी सर्वमान्य सावळा-गो॑ध़ळ आहे हा !!!

सू हा स...

अत्यंत योग्य असेच होते अस्से म्हणावे लागेल.
अहो खाजगी इस्पितळात सुद्धा आपल्याला डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते तर सरकारी इस्पितळांची बातच सोडा. सर्व दवाखान्यात शिकाऊ डॉक्टर्स, हाताखालचा स्टाफ, नर्सेस, दाया ह्यांच्यामार्फत जवळजवळ ७० ते ८०% कामे पार पाडली जातात आणी ते अपरिहार्य आहे कारण पेशंट्सची संख्या बघता फक्त डॉक्टर्स अपुरे पडणार.
अगदी ताजा अनुभव माझ्या आईला ३ ऑगस्टला अ‍ॅडमिट केले ते प्रचंड थकवा, उच्च रक्तदाब, मधुमेह ह्यासाठी. रक्त, लघवी, अल्ट्रासाऊंड, कलर डॉपलर सगळ्या तपासण्या आधी झालेल्या असूनही पुन्हा करायला घेतल्या. अल्ट्रासाऊंड ज्या डॉक्टरांनी त्यांच्या खाजगी दवाखान्यात केलेले होते त्याच डॉक्टर इथेही अ‍ॅटॅचमेंटमध्ये होत्या. २ आठवड्यात त्यांनीच केलेल्या आधीच्या तपासणीत काय फरक पडणार? मी ती तपासणी करायची नाही म्हणून हटून बसलो. मोठे डॉक्टर आले. त्यांच्याशी बोललो. आधीचे रिपोर्ट दाखवले. त्यांनाही मी पटवून दिले की ती तपासणी गरजेची नाही. आणि हेही नम्रपणे सांगितले की "मी तपासण्यांच्या आड येत नाही पण कोणतीही तपासणी का करायची आहे ह्याचे संयुक्तिक कारण समजेपर्यंत मी कन्सेंट देणार नाही." हा माणूस विरोधात जातो म्हटल्यावर सगळे डॉक्टर्स मला वचकून होते. हाताखालच्या स्टाफकडून सलाईन चालू-बंद कसे करायचे हे मी शिकून घेतले "रात्री-अपरात्री तुम्हाला का उठवा?" असे कारण त्यांना सांगितले. खरे कारण 'सलाईन आउट' गेले तर बंद करता यायला हवे हे होते. पुढल्या दोन दिवसात सगळ्या तपासण्या व्यवस्थित पार पडून निदानापर्यंत डॉक्टर पोचले. प्रत्येक विजिटला सिनिअर डॉक्टर आपणहोऊन मला सर्व गोष्टी सविस्तर समजावून देत होते. योग्य उपचार सुरु झाले. एका आठवड्यात आई घरी परतली!
सांगायचा मुद्दा हा की डॉक्टर्स म्हणतात म्हणून दबावाखाली न येता तुम्ही योग्य प्रश्न विचारायला काहीच हरकत नसते. उत्तरांसाठी झगडा. योग्य तिथे विरोधात जायला घाबरु नका. शेवटी डॉक्टरांनाही त्यांची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडायची असतेच.

चतुरंग

झाल्या. शेवटी माझा मुलगा आजारी असेल तर बाप म्हणुन माझी प्राथमिक काळजी त्याला चांगल्या डॉक्टरकडुन योग्य उपचार होतात की नाही अन तो लवकर बरा होतो की नाही हीच असणार.

माझ्या मुलाला नक्की काय आजार होता हे समजण्याएवढे मेडीकल सायन्स मला येत नाही. त्याला काय औषधे देताहेत ते कळण्याएव्हढी फार्माकॉलॉजी सुद्धा मला येत नाही. स्वाईन फ्ल्यु हा नवीन आजार आलाय हे मला कळते पण त्यातुन बरे झालेले अनेक पेशंट आहेत हे ही मला कळते. स्वाईन फ्ल्यु बर लस किंवा रामबाण औषध नाही हे देखील सांगितले जाते. मनपा किंवा राज्यसरकार अशी लक्षणे असलेल्या सर्वांनाच उपचार देवु शकत नाही हेही मान्य आहे. मग एका दवाखान्यावर आरोप झाले तर त्याबाबत चौकशी करायची की सरसकट सगळ्यांना सरकारी दवाखान्यातच जा असे सांगायचे? अन तिथे गेल्यावरसुद्धा उपचार होतीलच याची खात्री काय? उलट तिथे उपचार झाले नाहीत तर खाजगी डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातल्या विश्वासाला आधीच तडा गेल्याने कुठेच उपचार मिळण्याचीच शक्यता जास्त.

अन नेमका इथेच प्रश्न येत होता. परिस्थिती अशी निर्माण केली जात होती की हाच भरवसा रहात नव्हता. सामान्यतः एखादा कुटुंबिय आजारी असेल तर आपण जे करतो: जसे डॉक्टरकडे जाणे, त्याच्यावर विश्वास ठेवुन उपचार घेणे, त्याने सांगितलेल्या तपासण्या करुन घेणे अन त्याने सांगितलेली औषधे घेणे हेच करणे अशक्य होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्याला कारण होती काही जबाबदारीच्या पदांवरच्या व्यक्तींकडुन होणारी गोंधळात टाकणारी विधाने. आणि जे लोक अशी विधाने करत होते त्यांच्याकडे माझ्या प्रश्नावर कोणतेही उत्तर नव्हते. मग अशी परिस्थिती हेतुपुरस्सर निर्माण केली जात आहे असा कोणाचाही समज का होऊ नये? आणि तो जर झालाच तर या सर्वामागे काहीतरी मोठे राजकारण शिजते आहे असे का वाटु नये?

---

Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

विकास's picture

18 Aug 2009 - 5:08 am | विकास

(बॉस्टन)मॅसेच्युसेट्स मधे आज २६ वर्षाचा एक मुलगा H1N1 virus infection ने गेला. ही येथील ११ वी दुर्घटना आहे. पण या विशिष्ठ घटनेचे महत्व अशा साठी की आधीच्या सर्व केसेस मधे प्रत्येक रुग्णामधे काही ना काही वैद्यकीय कमतरता (preexisting medical condition) होती. मात्र या रुग्णामधे तसे काही नव्हते. म्हणून सरकार जरा घाबरले आहे.

अमेरिकेत हा आजार सप्टेंबर मधे वाढण्याची शक्यता आधीपासूनच वर्तवण्यात येत आहे आणि त्यामुळे शक्य तितकी लसटोचणी करण्याचे प्रमाण वाढवण्याचा उपक्रम आहे असे म्हणले जात आहे. खरे काय होते आहे ते लवकरच कळेल...

श्रावण मोडक's picture

13 Jan 2010 - 9:13 pm | श्रावण मोडक

आज येथे एक नोंद करतो आहे.
स्वाईन फ्लू ज्यावेळी गाजत होता तेव्हा त्यावरील चर्चाही गाजत होती. संस्थळेही अशा चर्चांना अपवाद नाहीत. ही चर्चा त्याचाच एक भाग आहे.
आज एक बातमी नव्याने समोर आली. दोन माध्यमांमध्ये ही बातमी दिसते - टाईम्स ऑफ इंडियाची पुणे आवृत्ती आणि सीएनएन आयबीएन वाहिनीचे संस्थळ.
सीएनएन आयबीएनच्या संस्थळावरील बातमीचा दुवा -
http://ibnlive.in.com/news/who-exaggerated-h1n1-to-benefit-
टाईम्समधील बातमी टाईम्सच्या संकेतस्थळावर ई-पेपरच्या दुव्यात पुणे आवृत्तीत पान १ वर पाहता येते. तिचा वाढावा पान १४ वर आहे.
बातमीचा संक्षेप असा -
स्वाईन फ्लूच्या काळात ही साथ असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने द्यावा अशी शिफारस ज्या गटाने केली, त्या गटातील सदस्यांचा औषध कंपन्यांशी थेट संबंध आहे. हा संबंध आर्थिक व्यवहाराच्या स्वरूपात (अर्थातच, प्रकल्पांच्या माध्यमातून) आहे. या गटाने दिलेल्या सल्ल्याविषयीच आता प्रश्न उपस्थित झाले आहेत. टाईम्सची बातमी मुळातून वाचण्यासारखी आहे. अर्थातच, ही बातमी मूळ डेन्मार्कमध्ये आली आहे. तेथील पत्रकारांनी केलेले काम.
या धाग्यावर मी प्रतिसादात लिहिलेले बरेच मुद्दे अधिक स्पष्ट व्हावेत.
याच विषयावरील इतर एका धाग्यावरही माझ्या मतांविषयी साधक-बाधक चर्चा सदस्यांनी केली होती. तो धागा अभिज्ञ यांचा होता. त्याही धाग्याच्या संदर्भात ही बातमी उपयुक्त ठरावी.
तुमचे काय मत आहे?

श्रावण मोडक's picture

13 Jan 2010 - 9:42 pm | श्रावण मोडक

आयबीएनच्या वेबसाईटवर दुपारपासून असलेली ही बातमी आत्ता गायब झाली आहे. टाईम्सच्या मुद्रित अंकात मात्र ही बातमी आहे.
आयबीएनवरील प्रकाराबाबत मी त्यांच्या संपादकांना ईमेल पाठवले आहे. काही खुलासा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करीत!

अक्षय पुर्णपात्रे's picture

13 Jan 2010 - 10:00 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री मोडक, रॉयटर्सवर ही बातमी सापडली. यात जागतिक आरोग्य संघटना लक्ष घालणार असल्याचे म्हटले आहे. बातमीतून:

In the latest complaint about the way authorities have dealt with the pandemic, the Council of Europe, a political forum of most European countries, is to determine whether drug companies influenced public health officials to spend money unnecessarily on stockpiles of H1N1 vaccines.

काही देश लशीची मागणी मागे घेण्याबाबत विचार करत असल्याचेही म्हटले आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Jan 2010 - 10:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वाईन फ्लूची साथ नव्हतीच असे म्हणायचे आहे का ?

रुग्ण आणि रोगाची दहशत होती, हे तर खरे आहे ना !

-दिलीप बिरुटे

श्रावण मोडक's picture

13 Jan 2010 - 11:24 pm | श्रावण मोडक

आत्ता कुठं एक बाब पुढे आली आहे. आणखी काही येतील. धीर धरूया.
एण्डेमिक, पॅण्डेमिक वगैरे शब्दांच्या व्याख्या, तीत व्यक्त होणारी व्याप्ती, त्याची सांख्यिकी या संदर्भात डब्ल्यूएचओला थोडे बोलण्याची संधी देऊया. त्यानंतर साथ होती की नाही याचा फैसला करूया. साथ होती असे तिचे तरी म्हणणे आहेच. तिला यासंदर्भात सल्ला देणारे मंडळ होते. 'सेज' (काय पण लघुरूपी शब्द आहे) असे त्या स्थायी मंडळाचे लघुरूप नाव आहे. त्यातील सदस्यांचे लागेबांधे औषध कंपन्यांशी आहेत. त्या संदर्भात म्हणे काही हितसंबंधांचा संघर्ष होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना होतीच असा जागतिक आरोग्य संघटनेचा दावा आहे. तेव्हा असे दावे, काही सांख्यिकी अजून येणे बाकी आहे.
अक्षय यांनी दिलेल्या दुव्यानुसारच्या बातमीत विविध देशांमध्ये आता स्वाईन फ्लूवरचा उपाय म्हणून घेतलेल्या किंवा मागणी नोंदवलेल्या औषध-गोळ्यांचे काय करायचे याचा एक मुद्दा निर्माण झाल्याचे दिसून येते आहेच. तिथंही काही देश चौकशी करणार आहेत. त्याचाही अहवाल येऊ देऊया.
भारतात स्वाईन फ्लूचा व्हायरस म्युटेट झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होतेच, नंतर त्याचाही "तसे काही नाही" वगैरे खुलासा झाल्याचेही वृत्त होते. पुण्यात अगदी अलीकडेपर्यंत स्वाईन फ्लूने रुग्ण दगावल्याचे वृत्त आले आहेच. तो शतकी बळी असल्याची सांख्यिकी आली आहे. ही आणि अशी सांख्यिकी एकदा स्पष्ट झाल्यानंतर साथ होती की नाही हे कळेलच. थोडी वाट पाहूया. बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील.
येथे काही सांख्यिकी आहे. ताजी १३ जानेवारी म्हणजे आजपर्यंतची. ती पहा -
http://pib.nic.in/release/release.asp?relid=56911
तिथेच खाली एक दुवा आहे, तोही जतन करून ठेवावा.

प्रदीप's picture

16 Jan 2010 - 9:45 am | प्रदीप

टाईम्समधील बातमी मी वाचलेली नाही. पण 'अल जझी़रा'ने ११ तारखेस हीच बातमी दिलेली आहे. दोन्ही बातम्यांचा उगम एकच असावा.

'अल जझी़रा'च्या बातमीचा सारांश असा की वूल्फगँग वोडार्ग ह्या 'कॉन्सिल ऑफ यूरोप'च्या स्वास्थसमितीच्या प्रमुख असलेल्या व्यक्तिने आरोप केला आहे की एच १ एन १ ह्या रोगाच्या साथीचा (बातमीतील मूळ शब्द outbreak) औषधी कंपन्यांनी स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी अवास्तव (अप)प्रचार केला. त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की ह्या रोगावरील लशी बनविणार्‍या कंपन्यांनी जागतिक आरोग्य संस्थेस ही साथ 'पँडेमिक' आहे असे जाहीर करण्यास भाग पाडले.

कौन्सिल ऑफ यूरोप ही यूरोपातील ४७ देशांची सामायिक संस्था मुख्यत्वे मानवी हक्कांच्या जागरूकीबद्दल कार्यरत असते.

ह्या कॉन्सिलच्या संस्थळावर ह्याविषयी पाहू गेले असता, ह्या आरोपांविषयी काहीही आढळले नाही. ह्या संबंधात इतकाच ओझरता उल्लेख तेथे आहे की २५- २९ जानेवारीला त्या संस्थेच्या हिवाळी अधिवेशनात 'खोटे पँडेमिक्सः (सामाजिक) स्वास्थ्यावर घाला' ह्याविषयी चर्चा होईल.

म्हणजे वोडार्ग ह्यांनी संस्थेच्या व्यासपीठावरून हे आरोप अद्यापि केलेले नाहीत. ह्या आरोपांमागे त्यांचा काय अभ्यास आहे ह्याविषयी अजून काहीही माहिती नसल्याने ह्याविषयी अद्याप काहीही टिपण्णी करणे शक्य नाही.

काही निरीक्षणे इथे नोंदवतो:

* साथ सुरू झाली एप्रिल ०९ मध्ये. तिची लस तेव्हा तयारच नव्हती असे वाचले/ऐकले आहे. ती प्रयोगशाळेत तयार होऊन, पुरेश्या चाचण्या होऊन बाजारात आली ती सुमारे एक- दोन महिन्यांपूर्वी (म्हणजे नोव्हे. ०९ च्या सुमारास).

* आता ही लस फारसे कुणी टोचून घेत नाहीत कारण साथ तूर्तास तरी मंदावली आहे आणी तिचा मृत्यूदर सुरूवातीस होता तितका राहिलेला नाही. ह्यामुळे अनेक सरकारांनी लशीची पूर्वनियोजित व कमिटेड खरेदी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. ह्यामुळे लशीच्या उत्पादकांचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता दिसते. लंडनहून प्रसिद्ध होणार्‍या फायनॅन्शियल टाईम्सने ११ ता. लाच ही बातमी दिली होती. ह्या बातमीनुसार ब्रिटीश सरकारने बॅक्स्टर ह्या अमेरिकन कंपनीस दिलेल्या पुढील ऑर्डरी रद्द केल्या आहेत. त्यांना हे करता आले कारण करारात 'ब्रेक क्लॉज' होता. पण जी. के. एस. आणी सॅनोफी-अ‍ॅव्हेंटिस इ. कंपन्याच्याअ करारांत ही शक्यता नाही, तरीही (ब्रिटीश व इतर) सरकारांच्या दबावापूढे त्यांना नमते घ्यावे लागेल असे दिसते.

* चीनने जागतिक आरोग्य संस्थेस कधीच फारशी भीक घातलेली नाही. सार्ससारखी अत्यंत घातक व झपाट्याने फैलावलेली साथ असो, अथवा वारंवार वेगवेगळ्या 'स्वरूपात' येणारे बर्ड-फ्ल्यू असोत, चीनमधे काय चालले आहे, हे समजण्यास जा. आ. सं. चे अधिकारी 'दाताच्या कण्या' करीत तेव्हा कुठे थोडीफार माहिती त्यांना दिली जाई. पण ह्यावेळी मात्र त्यांनी स्वतःच लस शोधून काढणे व ती वापरात आणणे हे झपाट्याने केले. चीनने बाहेरून लस आयात केलेली नाही.

जाता जाता, उगाच एक शंका मनास चाटून गेली की अमेरिकन व यूरोपिय कंपन्याच्या शीतयुद्धाचा तर हा नवा प्रचार एक भाग नाही ना? अर्थात असे म्हणणे हेही एक स्पेक्युलेशन आणि काँसिरसी थियरीच होईल! (Nesting of conspiracy theories!)

श्रावण मोडक's picture

16 Jan 2010 - 8:18 pm | श्रावण मोडक

श्री. प्रदीप,
१. डेन्मार्कच्या वृत्तपत्रांनी पुढे आणलेल्या बातमीचा खुलासा जाआसंने अद्याप केलेला नाही.
२. जाआसंने एक खुलासा केल्याचे वृत्त आहे. त्यात स्वाईन फ्लूने जगभरात आत्तापर्यंत १३००० (+) मृत्यू झाल्याचा उल्लेख आहे. शिवाय बाधितांची संख्याही आहेच. पण या स्वाईन फ्लूच्या आकडेवारीची तुलना थोडी नेहमीच्या फ्लूशीही केली पाहिजे. अशा एकूण व्यवहारात सांख्यिकी मांडणारे 'एक्सेलशीट तज्ज्ञ' इथे कमी पडलेले दिसतात.
३. तुम्ही कौन्सील ऑफ युरोपसंदर्भातील उल्लेख केला आहे. त्याच संस्थळावरील माहिती खालीलप्रमाणे -
Strasbourg, 12.01.2010 – “Faked pandemics: a threat to health” will be one of the major themes of the next plenary session of the Parliamentary Assembly of the Council of Europe (PACE), to be held in Strasbourg from 25 to 29 January. The PACE Social Affairs Committee has proposed the holding of an urgent debate on this subject. If the Assembly agrees when it adopts its agenda on the opening day, the debate is likely to be held on the morning of Thursday 28 January.
The committee will be holding a closed hearing on the same subject on Tuesday 26 January at 8.30 am, attended by representatives of the World Health Organisation (WHO), the European pharmaceutical industry and experts on the subject.

यातील ठळक शब्द मी केले आहेत. या अर्जन्सीचे किंवा क्लोज्ड हिअरिंगचे कारण देण्याची रीत यासारख्या संस्था-संघटना जेव्हा सुरू करतील तेव्हा त्यांच्या यासंदर्भातील कारभाराच्या गुणवत्तेवर बोलता येईल. इथे 'दाखवलं कमी, झाकलं खूप' असा प्रकार आहे.
४. वोडार्ग यांचा आरोप काय आहे हे दिसतेच आहे आणि तो आरोप असल्याने त्याविषयी बोलण्यात मला तरी आत्ता अर्थ दिसत नाही. माझा मुद्दा डेन्मार्कच्या वृत्तपत्रांनी उघड केलेल्या तपशिलांविषयी आहे. जाआसंच्या त्या सेज नावाच्या मंडळावर जी मंडळी होती, त्यांचा फार्मा इंडस्ट्रीशी आर्थिक हितसंबंध होता. त्यावर जाआसंचे म्हणणे केवळ तत्वाच्या स्वरुपाचे आहे. त्याचा आशय इतकाच की, आमच्याकडे पुरेशी पात्रता-सुरक्षा आहे. पण नावानिशी जे स्पेसिफिक सांगितले गेले, तेही माहितीच्या अधिकाराखाली मिळवलेल्या माहितीच्या आधारे, त्यावर जाआसं चूप आहे. अ या व्यक्तीविषयी झालेला आरोप साफ खोटा आहे, असे साधार म्हणा किंवा आरोपात तथ्य दिसते हे कबूल करून कारवाईची दिशा स्पष्ट करा, असे दोनच पर्याय असताना ते न करणाऱ्या जाआसंचे काय करायचे?
५. लस नोव्हेंबरच्या सुमारास तयार झाली किंवा कसे याविषयी तपशील पहावा लागेल. पण तुमचे म्हणणे सध्या मान्य! प्रश्न आता शिल्लक राहतो तो ओझेल्टामिविरच्या गोळ्यांचा. त्यातही टॅमिफ्लूचा.
फार्मा कंपन्यांचं युद्ध वगैरे मुद्दे माझ्यालेखी गैरलागू आहेत. मी याआधी म्हटल्याप्रमाणे कंपनीज विल बी ड्रिव्हन बाय प्रॉफिट मोटिव्ह्ज. त्यानुसार त्यांचा कारभार चालू राहणार. त्यात युद्ध असेल, नसेलही. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे हितसंबंध युरोप आणि अमेरिका अशा संदर्भात चालत असतील असे मला वाटत नाही. युरोप आणि अमेरिका ही संदर्भचौकट तेथे केवळ अस्तित्त्वाच्या अंगाने येत असावी. कंपन्यांमध्येही विभागांची, खात्यांची मारामारी असतेच.
मर्यादित मुद्दा इतकाच - जाआसं सारे काही स्पष्ट करेल, तेही साधार?

प्रदीप's picture

17 Jan 2010 - 9:47 am | प्रदीप

श्री. श्रावण मोडक,

डेन्मार्कच्या वर्तमानपत्राने उघड केलेल्या माहितीची बातमी टाईम्स ऑफ इंडियाच्या संस्थळावर जाऊन पाहिली. इथे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचा आरोप आहे. जाआस. ने अजून ह्याविषयी काहीही उत्तर दिले नाही अशी आपली तक्रार आहे. कुठल्याही प्रगल्भ संस्थेत, तिच्या पदाधिकार्‍यांवर आरोप झाले, की तात्काळ त्याविषयी जाहीर भाष्य केले जात नाही, ह्याविषयी माझी काही तक्रार नाही, तुमचीही नसावी. एकतर त्यांनी टाईम्स्ला का उत्तर द्यावे? कारण ही बातमी मूळात टाईम्सच्या पत्रकारांनी स्वतःहून उघडकीस आणलेली नाही. तेव्हा इथे जर जाआसंला उत्तर द्यायचे झाले -आणि ते तसे व्हावे--ते मूळ डॅनिश "इन्फर्मेशन' ह्या वर्तमानसंस्थेस द्यावे. त्याला थोडा अवधि लागेल, आपण वाट पाहू या. (त्या वर्तमानपत्राच्या संस्थळावर जाऊन पाहिले, सर्व डॅनिशमधे असल्याने नक्की काही समजले नाही पण ही बातमी २२ डिसें. च्या आवृत्तीत आली आहे असे दिसते). एव्हढ्या मोठ्या संस्थेस कॉर्पोरेट गवर्नन्सची जाणीव असावयास व्हावी तेव्हा त्यांना उत्तर देणे भागच आहे असे मला वाटते. कारण नुसतेच वरवरचे स्पेक्युलेटिव्ह आरोप इथे नाहीत, तर काही स्पेसिफिक माहितीवर आधारित आरोप केले गेलेले आहेत.

कॉन्सिल ऑफ यूरोप ही मला तर सरळसरळ साम्यवादी संघटनांशी संबंधित संस्था वाटते. त्यांचे व जाआसचे साटेलोटे असणे कठीण आहे असे मला वाटते.

कंपन्या बहुराष्ट्रीय असल्या तरी त्यांचे इंकॉरपोरेशन ज्या देशात असते, तेथील त्या समजल्या जातात. आणि त्यांना अर्थातच तेथील सरकारांचा पाठिंबा असतो. त्यांच्यातील युद्धे ही राजकिय स्तरावरील असतात, निव्वळ कॉर्पोरेट स्तरावरील नव्हेत. अशी युद्धे सर्वच क्षेत्रातील कंपन्यांच्या संदर्भात खेळली जातात- विमाने व कार्स बनविणार्‍या कंपन्यांच्या बाबतीत तर हे जाहीरच आहे, औषधी कंपन्यांच्या व हेल्थ केयरच्या क्षेत्रात तसे असले तर आश्चर्य वाटणार नाही.

श्रावण मोडक's picture

17 Jan 2010 - 1:22 pm | श्रावण मोडक

१. जाआसंचा खुलासा 'टाईम्स ऑफ इंडिया'साठी यावा असे मी म्हटलेले नाही, तसे सूचीत करण्याचे कारण नाही.
२. जाआसंने काहीही उत्तर दिलेले नाही, असे माझे म्हणणे नाही. जाआसंने दिलेल्या उत्तरात कळीचे मुद्दे नाहीत, इतकेच माझे म्हणणे आहे. हे म्हणणे याआधीच्या जाआसंच्या स्पष्टीकरणांवर आधारित होते. आता, १४ जानेवारीला एक खुलासा देण्यात आला आहे.
या १३ पानी निवेदनात कोठेही मूळ आरोपांवर दिलेला खुलासा दिसत नाही. विशिष्ट तज्ज्ञांची नावे मूळ वृत्तामध्ये होती. त्यावर स्पष्टीकरण या खुलाशात नाही. त्याऐवजी, काय केले जाते, याची फक्त सुरेख चर्चा आहे. पुरेसे बोलके.
आधीच्या प्रतिसादात मी म्हटले होते: "अ या व्यक्तीविषयी झालेला आरोप साफ खोटा आहे, असे साधार म्हणा किंवा आरोपात तथ्य दिसते हे कबूल करून कारवाईची दिशा स्पष्ट करा, असे दोनच पर्याय असताना ते न करणाऱ्या जाआसंचे काय करायचे?" ताज्या निवेदनात आम्ही एक रिव्ह्यू करणार आहोत वगैरे गप्पा छान मारल्या गेल्या आहेत. तो रिव्ह्यू ताज्या संदर्भात होत असेल तर, त्याचा अहवाल खुला केला जाईल का, असे विचारण्यात आले; त्यावर, आत्ताच सांगता येत नाही, असे उत्तर मिळाले आहे. हे प्रगल्भ म्हणूया!
३. डेन्मार्कच्या ज्या वृत्तपत्रांतील बातम्यांच्या आधारे हे सारे सुरू आहे, त्या बातम्या नोव्हेंबरच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्याच्या आसपास आल्या असाव्यात (इथे मलाही डॅनीश भाषेची अडचण आहे). कारण, त्यानंतरच्या काळात त्या बातम्यांच्या आधारे वाद-चर्चा घडल्याचे दाखले आहेत. आता, एखाद्या प्रगल्भ संस्थेला परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी इतका काळ लागत असेल तर मी फक्त 'प्रगल्भ' हे विशेषण त्या संस्थेला लावण्यास हरकत घेईन. बाकीच्या बाबी म्हणजे त्या संस्थेला किती मानायचे आणि किती नाही याविषयीच्या माझ्या आधीच्याच मतांना पुष्टी ठरतील. जाआसं असल्याने तसे घडू नये, हे माझे (विशफुल थिंकिंग) आहे.
४. कौन्सील ऑफ युरोप साम्यवादी असेल तर असो बापडी. मला साम्यवादाशी किंवा त्या संस्थेशीही काहीही देणेघेणे नाही (मी साम्यवादाविषयी किंवा या संस्थेविषयीही काहीही लिहिले नव्हते. माझ्या ताज्या, अन् सर्वात नव्या प्रतिसादातील चौकशीचा मुद्दा काही देश अशा संदर्भात आहे); हे सारे अमेरिकन आणि युरोपियन फार्मा कंपन्यांतील युद्धाचा परिपाक आहे किंवा नाही याच्याशीही मला देणे-घेणे नाही; या वादाबाबतचा खुलासा 'टाईम्स'मध्ये येतो की डेन्मार्कच्या वृत्तपत्रात येतो याच्याशीही नाही.
(कौन्सील ऑफ युरोपच्या संदर्भात तर मी वर दिलेल्या प्रतिसादात काही शब्द ठळक केले आहेतच. नुसतेच नाही तर त्यासंबंधात त्यांनीही काय केले पाहिजे हे लिहिले आहे. अर्थात, ही प्रगल्भता असू शकते त्या-त्या संस्थांची. तसे असेल तर माझे शब्द मागे.)
जिच्या नावाचे कुंकू लावून पातिव्रत्याचा आव आणला गेला त्या जाआसंच्या व्यवहाराविषयी हा मुद्दा आहे. कारण तिच्याच नावाने सारा काही उद्योग झाला आहे. ही संस्था बिनदाताची वाघ आहे असे माझे आधीचे म्हणणे होते. पण एकूण तिच्याचभोवती (माझ्यावर टीका करतानाही) फोकस राहिल्याने ती वाघ आहे, असे दिसून येतेय. त्यामुळे आता फक्त हा वाघ नरभक्षक झालेला आहे किंवा कसे इतकाच प्रश्न शिल्लक राहिला आहे.
५. कंपन्यांच्या युद्धाविषयी "कंपन्या कंपन्यांच्याच पद्धतीने चालणार" हे माझे मत आधीच नोंदवलेले आहेच.

१४ जानेवारीच्या पत्रकार परिषदेत लशीच्या खरेदी केलेल्या साठ्याविषयीचा एक प्रश्न आहे. त्यावरचे उत्तर अगदी गायडिंग आहे. त्या प्रश्नांतील सांख्यिकी पहावयाची. जाआसंच्या अधिकाऱ्याच्या उत्तराचा आशय असा आहे की, या खरेदीबाबतच्या व्यवहारात जाआसं नसते. मान्य. ती असूही नये. त्यामुळे त्या साठ्याचा दोष जाआसंकडे जात नाही. पण तो साठा ज्या आधारावर झाला त्या आधाराचे काय इतकेच उत्तर जाआसंने द्यावे. बाकी साठ्याचा विषय त्या देशातील मतदार पाहून घेतील. तिथले सरकार किमान त्या मतदारांना उत्तरदायी आहे. ही जाआसं कुणाला उत्तरदायी आहे? तपासावे लागेल एकदा. जे लसीचे तेच ओझेल्टामिविर असलेल्या टॅमिफ्लूचे!

सुधीर काळे's picture

17 Jan 2010 - 8:41 pm | सुधीर काळे

लेख आवडला पण प्रतिक्रिया वाचून-वाचून मात्र बराच गोंधळलो.
एकदा प्रतिक्रिया यायच्या थांबल्या कीं एक "समारोप" थाटाचा लेख लिहावा अशी पुनेरीसाहेबांना (कीं पुणेरी?) विनंती.
------------------------
सुधीर काळे (जाम चलने लगे, दिल मचलने लगे, चेहरे-चेहरेपे रंग-ए-शराब आ गया")