माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉगस्पॉट डॉट कॉम या संकेतास्थळावरील लेखांक ८२ मधील संपादित सारांश . . .
आता मी ज्या गावामध्ये पोहोचणार होतो ते अर्धे गाव मध्य प्रदेश मध्ये आहे आणि अर्धे महाराष्ट्रात आहे . मध्यप्रदेश मधील गावाला खारिया भादल किंवा खारा भादल असे म्हणतात . इथे नक्कर सिंग सोलंकी नावाचा एक मामा परिक्रमावास्यांची सेवा करतो . याच्या घरापाशी मी पोहोचलो . गावातील ज्या घरामध्ये दुकान आहे किंवा पिठाची गिरणी आहे ते घर सर्वात श्रीमंत मानले जाते . याच्याकडे दुकानही होते आणि पिठाची गिरणी देखील होती . घर अतिशय साधे होते परंतु त्यातील विटा नक्षीदार पद्धतीने बाहेर काढून त्रिमितीय नक्षी तयार करण्यात आली होती . घराला सुंदर असा रंग देखील देण्यात आला होता . आतून शेणाने सारवलेल्या खोल्या भिंती ऐवजी गवताच्या तट्ट्यांनी शेकारल्या होत्या . कौलांमुळे उन्हाचा दाह कमी होत होता . अंगणामध्ये गाई म्हशी शेळ्या कोंबड्या होत्या . मी दारात उभा राहून नर्मदेहर असा आवाज दिला . नकरसिंग ची आई दारात आली एका झोपडीकडे हात करून तिथे आसन लावायला सांगितले . स्वतः नक्करसिंग आणि त्याचा भाऊ सेमलेटची होळी खेळायला गेले होते . खेळायला म्हणजे स्वतः भुत्या म्हणून तिथे नक्करमामा चा तो भाऊ नाचत असे . नक्कर सिंगची पत्नी पाणी देऊन गेली
. मी उतरलो होतो त्याच खोलीमध्ये यांची आटा चक्की होती . जाता जाता तिने मला धान्याकडे लक्ष ठेवायला सांगितले . मला तेव्हा त्याचा अर्थ कळाला नाही परंतु काही वेळाने जेव्हा बाहेरच्या शेळ्या कशा चटकन आत मध्ये येऊन धान्य किंवा पीठ खाऊन जातात हे पाहिले तेव्हा राखण करण्याचे महत्त्व कळाले . यातली एक काळी पांढरी शेळी तर एवढी हुशार होती की कितीही अडवले तरी ती पीठ खाऊनच जायची ! शिवाय एक मारकुटी म्हैस देखील होती . तिच्याशी देखील मी खूप खेळलो . ती अत्यंत तापट होती .
याची आई म्हातारी होती परंतु खंबीर व करारी होती . सर्व घरावर तिचा वचक आहे असे मला जाणवले . घरातील सर्वजण भंगुरई बघण्यासाठी सेमलेटला गेलेले होते . सासु सुना दोघीच घरात होत्या . त्यामुळे दोघींचा वावर थोडासा मुक्त होता . मला देखील त्यांनी फारशी बंधने घातली नाहीत . उलट मला त्यांच्याशी गप्पा मारायला त्यांच्या अंगणात बोलवले . अंगणामध्ये एक बाज ठेवलेली होती . त्याच्यावर घरातील मुख्य पुरुष झोपायचा . एका बाजूला पिण्याच्या पाण्याचा रांजण जमिनीपासून वर बांधलेल्या लाकडी टेबलावर मातीत गाडून ठेवला होता . ही पद्धत इकडे सर्वत्र आढळते . या दोघींकडून मला आदिवासी प्रथा परंपरां बद्दल बरीच माहिती कळली . त्यांनी मला आधीच कल्पना देऊन ठेवली की येणारी सर्व माणसे प्रचंड दारू पिऊन आलेली असतील त्यामुळे मी त्यांच्याशी बोलू नये . किंवा मोजकेच बोलावे . माझा स्वभाव बोलका आहे हे म्हातारीच्या लक्षात आले ! एकंदरीत आदिवासी कुटुंबामध्ये स्त्रियांचा फार मोठा वाचक असतो असे मला जाणवले . म्हातारीची सुनेपुढे अक्षरशः दहशत होती . म्हातारीला चार शब्द वाकडे बोलले की इथल्याही सुनेला लगेच आनंद व्हायचा ! सुनेची चूक दाखविताच म्हातारी खुश व्हायची ! घरोघरी मातीच्या चुली ! इतक्यात डोंगर उतारावरून यात्रा संपवून येणारी माणसे दिसू लागली . सूर्य पश्चिमेला मावळत होता आणि हा डोंगर पूर्वेला होता त्यामुळे सूर्याच्या उजेडामध्ये उंच च उंच माणसे डोंगर उतरताना दिसू लागली ! ही माणसे चमचम चमकत होती ! नक्की काय प्रकार आहे कळत नव्हते . सर्वच जण थोडे जवळ आल्यावर लक्षात आले की त्यांनी आपल्या डोक्यावर मोठ्या मोठ्या टोपल्यांच्या साह्याने मोरपिसे बांधलेली होती . शिवाय त्याला लटकवलेले आरसे चमकी वगैरे चमकत होते .
बहुतेक वाघाला मोठा प्राणी समोर उभा आहे असे वाटावे म्हणून हा वेष तयार झाला असावा असे वाटते कारण दुरून पाहताना खरोखरच सात-आठ फूट उंचीची माणसे येत आहे तसे वाटत होते .बांबूच्या मोठ्या मोठ्या कामठ्या वापरून मजबूत अलंकार तयार केले होते . आणि ते उत्कृष्ट सजवले होते . या सर्वांच्या कमरेला विशिष्ट आकाराचे वाळवलेले भोपळे होते व त्याचा आवाज खूप दूरपर्यंत घुंगरासारखा ऐकू यायचा . शिवाय मोठी मोठी घुंगरे होती ती वेगळी . अंगावर पांढऱ्या रंगाचे पट्टे व गोल काढून गळ्यात उंबराच्या माळा घातल्या होत्या .हातात काठ्या ,भाले ,तलवारी , धनुष्यबाण , फाल्या अशी हत्यारे होती . काही पुरुष स्त्रीच्या वेषामध्ये देखील नटले होते . काहींनी अंगावर रंगीबेरंगी चिन्ध्या गुंडाळल्या होत्या . सोबत धीर गंभीर वाजणारे ढोल , ढोलकी व थाळी अशी वाद्ये होती . एकाच रंगाच्या घागरा चोळ्या व चांदीचे ठसठशीत दागिने घातलेल्या स्त्रिया होत्या . मुलांच्या गळ्यात साखळ्या होत्या . उतरणारे सर्व लोक आमच्यासमोरूनच जात होते . मी उठून सर्वांना सामोरा गेलो . आणि येणाऱ्या लोकांशी भरपूर चर्चा केली , गप्पा मारल्या . काही उत्साही तरुणांनी माझ्यासोबत फोटो काढले . मी त्यांच्यासोबत ढोल वाजवला . त्यांचे ताल आत्मसात करून घेतले . इथे प्रत्येक गोष्ट आदिवासी लोक आपल्या स्वतःच्या हाताने बनवितात . अगदी ढोला साठी लागणारे कातडे देखील स्वतः मिळविले व कमविले जाते . केवळ चारच छिद्रे व पाचवे तिरके छिद्र असलेली सुंदर व एक सू री वाजणारी बासरी देखील यांच्याकडे होती . ती देखील वाजवून पाहिली . तिच्यावर वाजणारी विवक्षित धून आणि ढोलाचा धीर गंभीर खर्जातला आवाज थेट ध्यानामध्ये घेऊन जाई ! इथे तरुणांनी माझ्यासोबत जे फोटो काढले ते माझ्या मित्राच्या क्रमांकावर त्यांनी पाठवून दिले . नर्मदा मातेची असीम कृपा कशी आहे पहा ! या आदिवासी लोकांना त्यांच्या मूळ स्वरूपामध्ये पाहण्याचे भाग्य मला लाभले ! नाहीतर आजकाल हे सर्व लोक आधुनिक पेहराव करतात ! परंतु आजही महत्त्वाच्या सणासमारंभाला आपला पारंपारिक वेष ते पुन्हा धारण करतात . या आदिवासी पेहरावाचा आनंद सर्वांनी घ्यावा !
इतक्यात नकरसिंह आणि त्याचा भाऊ तिथे आले . भाऊ भुत्या झाला होता . मी माझा परिचय त्याला करून दिला आणि त्याच्या घरी आज मुक्कामी असल्याचे सांगितले . त्याला फार आनंद झाला . आणि त्याने सांगितले की सणाच्या नियमानुसार आज तो घरी झोपायला येऊ शकत नाही . आज हे सर्व तरुण जंगलामध्ये चिकन मटन शिजवून खातात आणि दारू पिऊन झोपी जातात . असे सांगेपर्यंत सर्वजण गोल करून मोहाची दारू प्यायला बसले सुद्धा ! उद्या होळी होईपर्यंत हे लोक आपले कपडे बदलणार नव्हते आणि आपल्या घरी देखील जाणार नव्हते . हे सर्व पावरी आदिवासी किंवा भिल्ल लोक आहेत .त्यांची भाषा पावरी . आडनाव लावताना सोळंकी पावरा अशी आडनावे लावतात .आणि जात लिहिताना डावरा किंवा दावरा अशी जात लिहितात . होळी हाच यांचा प्रमुख सण आहे . हेच लोक पूर्वी लुटालूट करायचे . परंतु आता चित्र बदलले आहे . आता यांच्या मदतीशिवाय हा टप्पा पार करता येणे अशक्य आहे ! एक पिढी पूर्वीपर्यंत हे लोक केवळ लंगोटीवर फिरायचे . आणि स्त्रिया फक्त अर्धा घागरा घालायच्या .उपवस्त्र देखील नेसत नसत . आता हे लोक अंगभर कपडे घालतात . यूट्यूबर लोकांनी जगातल्या अनेक प्रांतातील पेहराव बदलून दाखवले आहेत त्याचे हे एक उदाहरण ! प्रत्येक गोष्ट कॅमेऱ्यामध्ये पकडण्याच्या त्यांच्या अट्टहासामुळे लोकांनी आपले नैसर्गिक राहणीमान बदलून टाकले आहे ! या लोकांची याहा मोगा नामक एक देवी आहे .जी गुजरातमध्ये वडफळी जवळ आहे .तिलाच हे मानतात . मध्यप्रदेश गुजरात आणि महाराष्ट्रातील नंदुरबार या भागामध्ये सर्वत्र हे लोक फक्त पावरी भाषाच बोलतात . यांच्या गाडीवर याहा मोगा किंवा जय आदिवासी असे लिहिलेले असते .हे लोक चिवट , तापट परंतु परिक्रमावासींसाठी मात्र उपकारक आहेत .नवीन मुले थोडीशी विद्रोही झाल्यासारखी वाटतात . हे लोक लहान मुलांनाही खुशाल दारू पाजतात . दारू पिणे इथे सन्मानाचे आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते . मोहाची दारू औषधी देखील असते . पोट साफ करण्याचे काम ही दारू करते . अर्थातच योग्य प्रमाणात घेतली तर . प्रस्तुत लेखक व्यक्तिगत जीवनात अपेयपान व सुरापानाचा कडक निषेध करतात याची कृपया नोंद घ्यावी . ही सर्व माहिती आपणा करता जशी आहे तशी देत आहे इतकेच .
इथली लहान मुले एक जात शूर , भित्री , बुजरी व नागडी उघडी असतात .
एखादा परिक्रमावासी दिसल्याबरोबर जीवाच्या आकांताने एक दीड किलोमीटर दूरवरून डोंगरावरून पळत खाली येतात .यांना पडण्याचे , घसरण्याचे ,आपटण्याचे जणू भयच नसते . हलकीफुलकी मुले टणाटण उड्या मारत खाली येताना पाहून मला भीती वाटायची . एका गोळीसाठी हा सर्व आटापिटा ! या भागातील मुलांना पुण्या मुंबईकडच्या परिक्रमावासींनी बिघडवले आहे असे पालकांचे स्पष्ट मत आहे . सतत गोळ्या खाऊन इथल्या मुलांचे दात कधी नव्हे ते किडू लागले आहेत . त्यामुळे यांना शक्यतो चॉकलेट गोळ्या दिल्या नाही पाहिजेत . परंतु असे जरी असले तरी देखील तुम्हाला बघून ही एक दीड किलोमीटर पळत येणार हे निश्चित आहे . त्यामुळे त्यांना काहीतरी खाऊ द्यावाच लागतो . मी इतके सूत्र पाळले की प्रत्येक मुलाला चॉकलेट देताना प्लास्टिक पर्यावरणासाठी कसे घातक असते हे समजावून सांगितले आणि प्लास्टिक माझ्याकडे जमा करून घेतले आणि मगच गोळी खायला सांगितली . ठराविक अंतराने एखाद्या चुलीमध्ये मी ते प्लास्टिक नष्ट करायचो .
आता हळूहळू या भागामध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत . सोलरची वीज देखील घरोघरी आलेली आहे . साध्या विजेचे जोडदेखील प्रत्येक गावात पोहोचले आहेत . इथले लोक अतिशय निर्भय आहेत हे मात्र अगदी खरे . राहून राहून असे वाटते की ही लढाऊ जमात पोलीस लष्कर किंवा निमलष्करी दलामध्ये पाहिजे . तेच त्यांच्यासाठी योग्य स्थान आहे . असो .
ती रात्र अतिशय संस्मरणीय अशी गेली . हा माझा ७३ वा मुक्काम होता . संध्याकाळपर्यंत घरातील सर्वजण परतले . खूपच मोठे कुटुंब होते . भरपूर लहान मुले होती . कोण कोणाचे कोण आहे हे कळणार नाही इतकी माणसे होती . नकरसिंगचा जो भाऊ भुत्या बनला होता त्याच्या हातामध्ये एक वडिलोपार्जित अप्रतिम अशी तलवार होती . माझ्या काही शस्त्रविद्या पारंगत मित्रांमुळे या शस्त्रांचे थोडेफार ज्ञान मला झालेले आहे. त्यानुसार ही एक अप्रतिम तलवार होती . हिचा धातू देखील अप्रतिम होता आणि बऱ्यापैकी वापर देखील झालेला होता . ही तलवार घेऊन तो झोपण्यासाठी खाली गावामध्ये निघून गेला . एक तरुण भाऊ जो काहीच बनला नव्हता तो मात्र घरी थांबला . प्रचंड दारूच्या नशे मध्ये असलेला हा घराच्या आत मध्ये ठेवलेला ढोल काढून वाजवू लागला . आपण गणपती मध्ये जो गजाढोल बघतो त्यापेक्षा थोडासा आकाराने मोठा आणि लाकडाच्या खोडापासून बनवलेला अतिशय जड परंतु अतिशय अप्रतिम असा हा ढोल असतो . तो ठेवण्यासाठी लाकडाचे एक मेज बनवलेले असते. आदिवासींच्या नियमानुसार कोणीही अचानक येऊन वाद्य वाजवू शकत नाही . त्यातले ज्ञान आहे अशीच व्यक्ती हात लावू शकते . हा डोळे मिटून धीर गंभीर ढोल वाजू लागला . मी एक ढोलक उचलून त्याला हळूहळू साथ देऊ लागलो . माझा ताल पक्का आहे आणि तो जो ताल वाजवतो आहे तो मला कळलेला आहेत हे लक्षात आल्यावर आमची चांगली जोडी जमली . आम्ही दोघांनी हे वादन चालू केले आणि उत्स्फूर्तपणे घरातील लहान मोठ्या मुली मुले आणि सर्वच जणांनी हातात हात घालून आमच्या भोवती फेर धरला . आणि आदिवासी नृत्य करायला सुरुवात केली . हे सर्व अतिशय धीर गंभीर शांत आणि स्वाभाविकपणे उत्स्फूर्तपणे घडलेले होते . यात कुठलाही दिखावा भपका अजिबात नव्हता ! मैयाची निर्मळ भावंडे ! मामालोक ! तास दोन तास वादन झाले . त्यानंतर मला नकर सिंग च्या बायकोने भाकरी आमटी आणून दिली . भोजनप्रसाद झाल्यावर मी पुन्हा ढोलावर गेलो . रात्री बारा वाजेपर्यंत मी अखंड ढोल वाजवत होतो . मंडला दिंडोरी भागातील आदिवासी लोकांचे जे ताल आहेत त्याच्यात आणि इथल्या तालामध्ये खूप साधर्म्य होते . लय देखील एकसारखी ठाय होती . जोवर जागे आहेत तोवर घरातील सर्व नृत्य करत राहिले . हा त्या वाद्याचा मान असतो . ते वाद्य वाजत आहे आणि तुम्ही लोळत पडले आहात असे कोणी करत नाही . नकरसिंगच्या बहिणी उत्तम शिवणकाम करत . आता देखील अख्या गावाचे कॉस्च्युम्स त्यांनीच शिवलेले होते . त्यांचे एका बाजूला शिवणकाम सुरू होते . घरामध्ये खोल्या फारशा नसतात . आम्ही ढोल वाजवत होतो ती एक पातळी . फुटभर उंचीच्या पायरीच्या पातळीत सारे घर . त्याला मध्ये एक लांबच लांब आडवी भिंत . आत स्वयंपाक घर . बाकी झोपायला सर्वजण अंगणामध्ये येत .
त्या ढोलाचा धीर गंभीर आवाज इतका जबरदस्त होता की त्याने मी अक्षरशः ध्यानावस्थेमध्ये गेलेलो होतो . एकच एक ठेका एकच एक ताल तुम्ही सलग दोन-तीन तास अतिशय ठाय लयी मध्ये अखंड वाजवत राहिलात तर तुम्हाला उन्मनी अवस्था निश्चितपणे प्राप्त होते . तसेच आमचे झाले होते . अखेरीस तो भाऊ वाजवता वाजवता ढोलावरच झोपला . मग मात्र मी भानावर आलो आणि वादन थांबवले . आणि ताबडतोब झोपायला निघून गेलो . एक परिक्रमावासी वाद्यवादन करत आहे त्याचा सन्मान म्हणून मला कोणीही थांबवण्याची सूचना वगैरे केली नाही ,उलट मला साथ दिली ,त्याचे मला फार कौतुक वाटते . अतिथी देवो भव या वचनाचे याहून सुंदर पालन ते काय असू शकते !
त्या ढोलाच्या तालाने माझ्या मनाला एक संथपणा आणला होता . पडल्या पडल्या माझ्या कानामध्ये तो ताल वाजत राहिला . हा ताल ओळखीचा वाटत होता . डोळे मिटल्या-मिटल्या माझ्या डोळ्यासमोरून काही दृश्य झरझर सरकू लागली . परिक्रमेतून उलटा चालत मी जबलपूर ला पोहोचलो . तिथून उलटी दृश्य पहात पहात हळूहळू लहान झालो . बालपणीचा माझा अवतार पाहता पाहता तान्हे लेकरू झाला . आणि त्यानंतर माझ्या जन्माचा प्रसंग आठवला .एका क्षणामध्ये मी एका द्रवामध्ये तरंगतो आहे असे दिसू लागले . आणि माझ्या लक्षात आले की मी माझ्या आईच्या गर्भामध्ये आहे . आणि आता पुन्हा एकदा तोच ताल मला ऐकू येऊ लागला ! हा ताल होता माझ्या आईच्या हृदयाची धडधड ! तो ताल आणि हा ताल यात खूप साम्य होते ! नव्हे नव्हे हाच तो ताल ! नर्मदा मातेच्या उदरामध्ये अतिशय खुशाल पणे पडलेल्या एका लेकराच्या कानावर पडणारा नर्मदा मातेचा हृदय नाद होता तो ताल ! परिक्रमा म्हणजे जणू गर्भवासच ! गर्भाला जसे अन्न पाणी सर्वकाही आईकडून मिळते तसेच परिक्रमा वाशीला सर्व काही नर्मदा माई देते . गर्भारमाता जिथून जशी जाईल तिथून तिथून गर्भाला जावेच लागते परंतु मातेची सोबत असल्यामुळे आणि तिच्याशी नाळ जुळलेली असल्यामुळे त्याच्या जीवाला कुठलाही धोका होत नाही . तसेच परिक्रमेमध्ये परिक्रमावासीचे होते . नर्मदा माता जिथून कुठून जाईल तिथून फक्त आपण जात राहायचे . बाकी सर्व चिंता तिला असते . आपण फक्त साक्षी भावाने पहात राहायचे . या परिक्रमे नंतर प्रत्येक माणसाचा आवर्जून पुनर्जन्म होतो ! पूर्वजन्मीचे संस्कार , वासना , ईषणा , अहंकार , विचार सारे सारे नष्ट होऊन जाते . उरते ते फक्त एक तान्हे बालक .
आणि आता या बाळाला माहिती असते की काहीही हवे असेल तर फक्त आईला हाक मारायची !
नर्मदेssssss हर !
अधिक वाचनासाठी पहा
mazinarmadaparikrama.blogspot.com
प्रतिक्रिया
2 Apr 2024 - 2:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नर्मदे हरचा हा भाग वाचनीय होता. वरीजनल आणि संधी मिळाली होती तर, मोहाची घ्यायला हवी होती. उन्मनी अवस्थेत ढोल अजून तालात वाजला असता.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
-दिलीप बिरुटे
2 Apr 2024 - 4:18 pm | निनाद
फार छान सिद्धहस्त लेखणी आहे. नर्मदामाते सह सरस्वतीमातेचा ही आशिर्वाद आहे तुम्हावर हे नक्की!
हा भागपण चित्रदर्शी झाला आहे. वाचतो आहोत असे वाटतच नाही. डोळ्यासमोर चित्रपट चालू लागतो...
असेच लेखन करत रहा हीच विनंती.
3 Apr 2024 - 12:15 pm | प्रसाद गोडबोले
एक एक करुन सर्व भाग वाचत आहे / ऐकत आहे. काल - तुम्हाला जिथे नर्मदेश्वर शिवलिंग प्राप्ती झाली त्या भागापर्यंत पोहचलो.
तुम्ही युट्युब वरे केलेल्या रेकॉर्डिंग्समुळे खुप सोयीचे झाले आहे.
मनःपुर्वक धन्यवाद :)
3 Apr 2024 - 12:39 pm | गवि
लेखन ओघवते आहे. चित्रदर्शी आहे.
इतकी दीर्घ परिक्रमा, सर्व नियम पाळून चालत करणे हे साधे सोपे काम नव्हे. फार थोड्या लोकांना ते जमते.
अनेक नर्मदा परिक्रमा वर्णने वाचून, (आणि त्यात मिपाकर यकुचे अनुभव देखील आठवणे अपरिहार्य ठरते), असे मत झाले आहे की या परिक्रमेत ती अनुभवणाऱ्या व्यक्तीत आपोआप एक सश्रद्धता निर्माण होऊन वाढत जाते. नंतर नंतर काही बाबतीत पॅरानॉर्मल घटना, भांग गांजा चिलीम, साधू, बाबा महाराज, गूढ अनुभव, चमत्कारांवर विश्वास बसत जाणे असे अपरिहार्यपणे सर्वच परिक्रमींच्या बाबतीत थोड्या फार फरकाने घडताना दिसते. हे खरे आहे का? की परिक्रमा पूर्ण करून देखील कोणताही गूढ अनुभव न आलेले लोकही आहेत?
ही लेखमाला अजून सुरुवातीच्या स्टेजमध्ये आहे. रोचक आहे.
पुढील भागांची उत्सुकता असेल. धन्यवाद आणि शुभेच्छा..
4 Apr 2024 - 9:44 am | Narmade Har
इतकी दीर्घ परिक्रमा, सर्व नियम पाळून चालत करणे हे साधे सोपे काम नव्हे. फार थोड्या लोकांना ते जमते.
> > बहुतेक सर्व लोक बहुतांश नियम पाळत परिक्रमा यशस्वीपणे करतात . जितके अवघड वाटते तितके अवघड नंतर ते राहत नाही . सवयीचे होऊन जाते .
असे मत झाले आहे की या परिक्रमेत ती अनुभवणाऱ्या व्यक्तीत आपोआप एक सश्रद्धता निर्माण होऊन वाढत जाते. नंतर नंतर काही बाबतीत पॅरानॉर्मल घटना, भांग गांजा चिलीम, साधू, बाबा महाराज, गूढ अनुभव, चमत्कारांवर विश्वास बसत जाणे असे अपरिहार्यपणे सर्वच परिक्रमींच्या बाबतीत थोड्या फार फरकाने घडताना दिसते. हे खरे आहे का?
> > मुळात श्रद्धा बलवान असेल तोच मनुष्य परिक्रमा उचलू शकतो . सर्वांच्याच बाबतीत वरील प्रमाणे घडते असे नाही . जसा त्याचा विवेक जितका जागृत आहे तसे अनुभव / आकलन तो घेतो .
परिक्रमा पूर्ण करून देखील कोणताही गूढ अनुभव न आलेले लोकही आहेत?
> > खूप लोक आहेत . मुळात ज्याला आपण गूढ अनुभव म्हणत आहात , तो त्या व्यक्तीला गूढ वाटेलच असे नाही . कुठल्याही गोष्टीचा कार्यकारणभाव लक्षात आला की तो चमत्कार वाटत नाही . मला असेही लोक भेटले दोघेजण जे परिक्रमे नंतर नास्तिक झाले . मुळात प्रत्येकाला अनुभव आलाच पाहिजे असे थोडीच आहे ? त्याचे झाले असे आहे की जगन्नाथ कुंटे यांना अश्वत्थामा भेटल्यामुळे आता प्रत्येकाला तो भेटलाच पाहिजे असे काहीसे गृहीतक लोकांनी मनात धरलेले आहे . हे चुकीचे आहे असे मला वाटते . खुल्या मनाने समोर जे घडते आहे ते पाहत राहावे . प्रत्येक गोष्टीत काहीतरी कार्यकारण भाव शोधलाच पाहिजे असे नाही . तुका म्हणे उगीच राहावे होईल ते सहज पाहावे । हेच उत्तम .
4 Apr 2024 - 11:29 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मनापासुन आवडला.
-दिलीप बिरुटे
4 Apr 2024 - 12:51 pm | गवि
सहमत..
4 Apr 2024 - 2:04 pm | अहिरावण
सहमत
3 Apr 2024 - 4:04 pm | नचिकेत जवखेडकर
खूप छान ओघवते लिखाण! निनाद यांच्याशी सहमत. वाचतो आहोत असे वाटत नाही, तर एखादा चित्रपट बघतोय असे वाटते!
3 Apr 2024 - 4:08 pm | प्रचेतस
दुर्दैवाने हा धागा क्लिकबेटसारखा वाटला.
3 Apr 2024 - 10:08 pm | रामचंद्र
आपण म्हणताय त्यात नक्कीच तथ्य आहे पण या मार्गामुळेच एवढ्या मोठ्या वाचकवर्गाला या लेखनाची माहिती झाली हेसुद्धा तितकंच खरं.
4 Apr 2024 - 9:52 am | Narmade Har
आपण म्हणत आहात ते बरोबर आहे . परंतु इतके सर्व लेख इथे लिहिणे सोयीचे नाही असे लक्षात आले . शिवाय चित्रे व्हिडिओ लेखामध्ये घालणे फारसे सोयीचे नाही असे जाणवले . त्याच्यामध्ये प्रचंड वेळ वाया जात होता . म्हणून दुर्दैवाने इथे सारांश प्रकाशित केलेला आहे . त्यावरून कोणास वाटले तर ब्लॉग वाचन शक्य आहे . प्रत्येकाने ब्लॉग वाचावाच असा अट्टाहास कदापि नाही . आपल्याच एका वाचकांनी आग्रहपूर्वक मिसळ पाव बद्दल सांगून त्यावर लिखाण करण्यास प्रवृत्त केले . म्हणून हे घडले तरी . असो . त्या निमित्ताने क्लिकबेट हा नवीन शब्द कळला ! त्याबद्दल आपले आभार !
4 Apr 2024 - 8:02 pm | चक्कर_बंडा
आपण जो कन्टेन्ट देताय तो पाहता क्लिकबेट संबंधित प्रतिक्रियांची फिकीर करण्याची अजिबातचं गरज नाही. व्यासपीठ कुठलेही असो, सर्वसामान्य वाचकांसाठी उत्तम साहित्य वाचायला मिळणे हेच महत्वाचे असते, मिपावरील तुमच्या पहिल्या लेखाने अनेकांसाठी त्यांपर्यंत पोहोचणे सुकर झाले असं म्हणणे वावगं ठरणार नाही.
7 Apr 2024 - 7:34 pm | प्रचेतस
तुम्ही लेख लिहिलेच आहेत तर ते थेट इथे कॉपी पेस्ट करणे अजिबात अवघड नाहीये, तसेच चित्रेही ब्लॉगवर तुम्ही टाकलेली आहेत तेव्हा त्यांचा दुवा इथे लेखात संपादित करून टाकणे कष्टदायी न ठरावे, त्यातून काही अडचण असल्यास मिपाकर हर प्रकारे मदतीला तयार असतातच, फक्त सर्व लेख इथे द्यावेत ही विनंती.
7 Apr 2024 - 11:38 pm | Narmade Har
ते तितकेसे सोयीचे नाही असे मला जाणवले . विशेषतः मोबाईल वरून हे सर्व करणे खूप अवघड जाते . आपणासारख्या विद्वज्जनांचा नेत्रस्पर्श पामाराच्या लिखाणास एकवार तरी झाला यातच त्याची सार्थकता आहे . नर्मदे हर !
4 Apr 2024 - 9:53 am | Narmade Har
आपण म्हणत आहात ते बरोबर आहे . परंतु इतके सर्व लेख इथे लिहिणे सोयीचे नाही असे लक्षात आले . शिवाय चित्रे व्हिडिओ लेखामध्ये घालणे फारसे सोयीचे नाही असे जाणवले . त्याच्यामध्ये प्रचंड वेळ वाया जात होता . म्हणून दुर्दैवाने इथे सारांश प्रकाशित केलेला आहे . त्यावरून कोणास वाटले तर ब्लॉग वाचन शक्य आहे . प्रत्येकाने ब्लॉग वाचावाच असा अट्टाहास कदापि नाही . आपल्याच एका वाचकांनी आग्रहपूर्वक मिसळ पाव बद्दल सांगून त्यावर लिखाण करण्यास प्रवृत्त केले . म्हणून हे घडले तरी . असो . त्या निमित्ताने क्लिकबेट हा नवीन शब्द कळला ! त्याबद्दल आपले आभार !
4 Apr 2024 - 9:53 am | Narmade Har
आपण म्हणत आहात ते बरोबर आहे . परंतु इतके सर्व लेख इथे लिहिणे सोयीचे नाही असे लक्षात आले . शिवाय चित्रे व्हिडिओ लेखामध्ये घालणे फारसे सोयीचे नाही असे जाणवले . त्याच्यामध्ये प्रचंड वेळ वाया जात होता . म्हणून दुर्दैवाने इथे सारांश प्रकाशित केलेला आहे . त्यावरून कोणास वाटले तर ब्लॉग वाचन शक्य आहे . प्रत्येकाने ब्लॉग वाचावाच असा अट्टाहास कदापि नाही . आपल्याच एका वाचकांनी आग्रहपूर्वक मिसळ पाव बद्दल सांगून त्यावर लिखाण करण्यास प्रवृत्त केले . म्हणून हे घडले तरी . असो . त्या निमित्ताने क्लिकबेट हा नवीन शब्द कळला ! त्याबद्दल आपले आभार !
7 Apr 2024 - 3:14 pm | शाम भागवत
प्रचेतसजी,
तुमचे लेखकाबद्दलच मत कसही असलं तरी ८३ नंबरचा भाग जरूर पहा. त्यात अगदी दुर्मीळ मंदिरांबद्दल माहीती व फोटो आहेत.
तसेच जे महाराष्ट्रप्रेमी आहेत किंवा जे मराठीप्रेमी आहेत त्यांनाही या भागातील काही भाग वाचायला नक्कीच आवडेल.
7 Apr 2024 - 4:06 pm | रामचंद्र
अरे वा, नवीन भाग आला.
7 Apr 2024 - 7:31 pm | प्रचेतस
आक्षेप लेखकाबद्दल आणि लेखनाबद्दल अजिबात नाही, (तसे ध्वनित होत असल्यास क्षमस्व) किंबहुना लेखन अप्रतिमच आहे. मात्र आधी पहिला लेख टाकून इथे थेट ८२ वा लेख तोही सारांश स्वरूपात टाकणे हे वाचकाला भुलवून ब्लॉग साईटवर नेण्यासारखे वाटले.
7 Apr 2024 - 9:08 pm | शाम भागवत
तुम्ही मांडलेला हा मुद्दा पटण्यासारखा आहे. त्यामुळे तुम्हाला आलेली शंका बिलकूल अनाठायी नाही.
मात्र ब्लॉगवरचे जसेच्या तसे येथे आणणे खरेच कष्टाचे आहे असे वाटते. ऑडिओ रुपातील लेख येथे आणणे पण अवघड वाटते.
असो.
8 Apr 2024 - 9:59 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत.
-दिलीप बिरुटे
9 Apr 2024 - 5:46 pm | शाम भागवत
आत्तापर्यंतच्या ८४ भागात लेखकाला अनेक प्रकारचे अनुभव आलेले आहेत. पण त्या सर्वांमधे उच्च दर्जाचा म्हणजे ध्यानावस्थेचा अनुभव ८२ व्या भागात आला आहे असे दिसते. हा भाग लेखकासाठी विशेष आहे अशी माझी समजूत आहे. त्यामुळे मोबाईलवरून येथे लेखन करणे अडचणीचे असूनही हा भाग लेखकाने इथे टाकला असावा.
(लेखकाकडे लॅपटॉप अथवा डेस्कटॉप नाही. त्यांच्या सततच्या भ्रमंतीत त्याचे लोढणेच जास्त होते.)
आपल्या ब्लॉगची जाहिरात व्हावी इतक्या फालतू कारणाने लेखक असे करत असावा असे वाटत नाही. मला तरी लेखक प्रामाणिक वाटतात. ताकाला जाऊन भांडे लपवत असतील असे वाटत नाही.
प्रत्येक वेळेस दिसते तसे नसते.
असो.
माझी लेखकांस विनंती आहे की एखादा भाग खरोखरच महत्वाचा आहे असे वाटल्यास तो सारांश रुपाने येथे जरूर टाका. तुम्हाला काय महत्वाचे वाटते याचेच मला व आणखी जणांना महत्वाचे वाटते.
याबाबत फक्त या संकेतस्थळाचे प्रशासकांनी सूचना केली तरच लक्ष द्या बाकी कोणाला काय वाटते याकडे लक्ष देऊ नका.
हे बाकीचेही त्यांची मते प्रामाणिकपणेच मांडत आहे हे विसरू नका. प्रचेतसजी निव्वळ विरोधासाठी विरोध करणाऱ्यांपैकी नाहीत. हे लक्षात ठेवल्यास तुमच्या लेखनात विक्षेप न येता ते चालू राहील.
नर्मदे हर
🙏
9 Apr 2024 - 7:19 pm | अहिरावण
सहमत आहे. नर्मदे हर !!!
10 Apr 2024 - 6:53 am | Narmade Har
आपले आकलन चोख व सूचना मौलिक आहेत . तसेच करू . नर्मदे हर
3 Apr 2024 - 5:40 pm | कर्नलतपस्वी
गरूडेश्वर,नानी मोटी पनौती या ठिकाणी मैय्याचे मनमोहक दर्शन घडले. एकवार मनात जरुर परिक्रमा करावी ही इच्छा जागृत झाली.
जबलपूरला असताना भेडा घाटात मैय्याचे अद्भुत रुप व लोक मान्यता ऐकावयास मिळाल्या.
परम पुज्य मामा देशपांडे (आजोबा) यांच्या कडून लहानपणी ऐकले होते. करोनाच्या आगोदर मुलीच्या सासूबाईंची परिक्रमा पुर्ण झाली त्यांचे अनुभव सुद्धा ऐकले.
अद्भूत आहे.
13 Apr 2024 - 1:05 pm | शाम भागवत
3 Apr 2024 - 6:42 pm | कंजूस
अवघड आहे परिक्रमा.
4 Apr 2024 - 9:46 am | Narmade Har
अजिबात अवघड नाही ! एकावेळी एकच पाऊल टाकायचे . पुढच्या पावलाचा विचार करायचा नाही . यापेक्षा सोपे या जगात काय असू शकते !
3 Apr 2024 - 10:29 pm | मुक्त विहारि
हर हर नर्मदे
4 Apr 2024 - 11:02 am | अहिरावण
ओ ! इथे असे संक्षिप्त भाग टाकण्यात वेळ घालवण्यापेक्षा तिकडे पटापट लिहा बरं !!
नंतर बसा इथे तिथे भाग टाकत... आमचं काही म्हणणं नाही.
आधी तिकडचं पुरं करा.... नर्मदे हर !!
4 Apr 2024 - 6:15 pm | रामचंद्र
सहमत. इकडं तर लिहाच पण तिकडं आधी चांगलं सविस्तर लिहून पूर्ण करा. More the merrier!
4 Apr 2024 - 7:33 pm | चक्कर_बंडा
ब्लॉगवरील आजपर्यंत प्रकाशित सर्व ८२ लेख वाचून नुकतेच पुर्ण झाले. अद्भुत असा वाचनानुभव दिला तुम्ही, मनापासून आभार !
प्रत्येक लेखात नर्मदामाईचे चित्र शब्दांमधून डोळ्यांसमोर साकार झाले. नर्मदामाता परिक्रमा अक्षरक्ष: "Virtually" अनुभवायला मिळाली. रामदासबाबा, मोहन साधू, अमरकंटकच्या जंगलातील मुक्कामावेळी रात्री जेवण घेऊन येणार तरुण, संत मीरामाई, इंद्रावती नदीत वाचवणारा लहान मुलगा, शिव्या-शाप देणारा यवन व त्यावेळी नावेत घेऊन नदी पार करवणारा केवट, नर्मदाकाठी झोपडीतील मुकी मुलगी व तिचा परिवार या व इतरही अनेकांची व्यक्तिचित्रे डोळ्यांसमोर शब्दशः उभी राहीली.
याशिवाय, लेखांमधुन नैसर्गिकपणे समोर येणारी वेगवेगळ्या क्षेत्रांतील तुमची मनस्वी मुशाफिरी, अनेक कला आणि विद्या यांवर असलेलं प्रभुत्व, उदयोग-व्यवसायातील वैविध्य, गुणी लोकसंग्रह, आश्चर्याने तोंडात बोट घालायला लागावे इतकं विविध विषयांसंबंधी असलेलं सखोल ज्ञान, सगळंच अद्भुत !
पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार !
5 Apr 2024 - 2:04 am | Narmade Har
सगळ करणे जगदीशाचे ।
आणि कवित्वची काय मानुष्याचे । (कवित्व म्हणजे कौतुक )
ऐशा अप्रमाण बोलण्याचे ।
काय घ्यावे ॥
नर्मदे हर !
5 Apr 2024 - 8:28 am | कंजूस
आताच्या सरदार सरोवर धरणाच्या बाजूस शूलपाणिश्वराचे डोंगर आहेत. तिथली बोरे वेगळीच आणि छान आहेत.
6 Apr 2024 - 10:10 pm | शाम भागवत
अप्रतीम.
_/\_
ताल व नाद आणि त्याच्या जोडीला नाम असेल तर ध्यानावस्थेचा अनुभव येणारच. ह्या स्थितीत सत्गुरूंचे सान्निध्य असेल तर निर्विचार स्थिती प्राप्त होणे हेही शक्य आहे.
10 Apr 2024 - 3:49 pm | विवेकपटाईत
लेख आवडला.