अगदी सकाळची वेळ, अंदाजे साडेपाच ते पावणेसहा. मला जाग आलेली होती, पण अंथरुणात लोळत, परत एकदा अनावश्यक सुलतानी झोपेच्या प्रतिक्षेत होतो. तेवढ्यात कानावर खड्या, खणखणीत आवाजात घराच्या बाहेरून एक लकेर ऐकू आली.
अबीर गुलाल उधळीत रंग
नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग
भजन ओळखीचे होते, पण लावलेली चाल ओळखीची नव्हती आणि भजनाला दिमडीचा ठेका धरलेला होता. मी बिछान्यातून ताडकन उठून कोण गातंय, बघायला बाहेर आलो तर शेजारच्या सोसायटीच्यासमोर एक नाथपंथी जोगी भजन म्हणंत उभा होता. हातात बारीकशी दिमडी, अंगात भगवी कफनी, चेहरातर, पहाणार्याला जरब बसावी इतका उग्र, कपाळावर भस्माची आडवी तीन बोटे, त्याच्या मधोमध शेंदराचा ठळक ठिपका. काजळ घातलेले, तरतरीत,पाणीदार डोळे, दोन्ही बलदंड दंडावर भस्माच्या रेघोट्या. खांद्यावर एक लांबलचक झोळी लटकलेली. दोन्ही हातांच्या बोटात किमान तीन-तीन अंगठ्या, असे व्यक्तीमत्व.
अजूनही कालबाह्य झालेल्या कलेच्या साधनावर जगणार्या ह्या फिरस्त्याला पाहून मला आश्चर्याचा किंचित धक्का बसला. त्यातून वाचनाच्या माहितीतून आलेला, पुण्यात कर्वेनगर मुक्कामी असताना बर्याचवेळा श्रावणात दिसलेला पिंगळा ( जुन्या काळी पिंगूळ म्हणंत ) आणि नाथपंथी जोगी ह्यांचे मिश्रण भासावे अशी हि व्यक्ती होती.
कर्वेनगरला रहात असताना, अगदी पहाटे म्हणजे साडेचार ते पाचच्या सुमारास हातातली दिमडी कडकड वाजवित पिंगळे येत असंत. त्यापाठोपाठ कुत्र्यांच्या भुंकण्याचा कालवा चाललेला असे. पण हे पिंगळे ठराविक घरीच जात असंत. त्या घरातून मग अर्धा ते पाऊण तास पहाडी आवाजातील, टिपेच्या स्वरातील भजने ऐकू येत. घरातून निघताना, घराला, घरधन्याला, मुलाबाळांना आशिर्वाद देऊन तसेच मिळेल तो जोंधळा, पैसे घेऊन ते जात.
हा जोगी कुणी दिली तर भिक्षा, पैसे घेणारा असावा. मी त्याला जवळ बोलावून त्याला पैसे देण्यासाठी खिशात हात घातला, तोवर तो भजन थांबवून त्याच्या ओघवत्या भाषेत बोलू लागला,
" महाराज, तुमी लै मोट्ट्या मनाचं. दारामागे मुंजा आहे पन नवसाला पावंत नाय. सगल्यांच केलं तुमी, मोट्ट्या मनानं केल, पन तुमाला कोनी इचारत नाही. तुमी शिंव्हाच्या छातीचं, पन काळीज तुमचं लोन्यावानी . तुमाला कायबी कमी पडनार नाय. तुमाला येक उपाय सांगतो. आमुश्याला एकवार तुमी . . ...." हे ऐकताच त्याची डेक्कन क्वीन थांबवून मी म्हटलं
"ते उपाय-बिपाय काही सांगू नका, हे पैशे घ्या आणि मला परत एकदा अबीर गुलाल म्हणून दाखवा".
तो म्हणाला "महाराज, आमी पैशे घेत नाय, आमच्यापाशी रुपाया खोटा, कायी जोंधळा आसंल तर द्या".
मी घरातून रोळीभरून गहू घेऊन आलो, ते पहाताच म्हणाला " जोंधळा, बाजरी, धान काय बी चालंल, ह्ये न्हायी खात आमी".
मी घरातून तांदूळ घेऊन आलो. तोवर त्यानं एक काळया गंडात बांधलेला ताईत काढून ठेवलेला होता. मी त्याला कडक शब्दांत म्हणालो -"हे असलं काही इथ काढायचं नाही, नाहीतर तांदूळसुध्दा देणार नाही आणि मला तुझं गाणंही नको". त्यानं हसत हसत ताईत परत ठेऊन दिला. तांदूळ घेतल्यावर मला म्हणाला" न्हायी देत तावीज तुमाला, दिला ठिवून, पन, महाराज मी तुमाला सांगतो, कि तुमच्या सारक्यांच्या घरातलीच मानसं आमाला बलिवत्यात आन् उपाय ईचारतात" असं म्हणून त्यानं माझ्या प्रतिक्रियेची वाट न पाहता परत खणखणीत आवाजात "अबीर गुलाल . . . . सुरू केलं. आत्ता तर तो फारंच मन लावून म्हणंत होता.
गाणं झाल्यावर परत एकदा म्हणून गेला "तुमाला कायबी कमी पडनार नाय".
खरं काय नी खोटं काय.
पण मला राहून राहून आश्चर्य वाटत होतं की त्याने पैसे कां घेतले नाहीत.
कदाचित मिळाणार्या पैशाच्या तुलनेत नुसते धान्य जास्तीचे बसत असावे.
प्रतिक्रिया
26 Jul 2009 - 3:39 pm | सहज
छान प्रकटन. :-)
27 Jul 2009 - 2:49 am | मृदुला
मस्त वर्णन. आवडले.