इसापाच्या गोष्टीत असतं तसं प्राण्यांचं एक आटपाट नगर होतं. तिथे अनेक प्रकारचे प्राणी अगदी गुण्यागोविंदाने रहात होते. प्रत्येक प्राण्याची आपली अशी वेगळी संस्कृती होती. “उतायचं नाही, मातायचं नाही आणि माणसांसारखं भांडायचं नाही” हे मुळी त्या नगराचं ब्रीदवाक्यच होतं. ह्या ब्रीदवाक्याला जागून होता होईल तेवढी सांस्कृतिक देवाणघेवाण करायची ह्यावर तिकडचे सगळेच नागरिक एकमत होते. ह्या नगरातल्या एका भागाचा हा क्रॉससेक्शन!
*****
ह्या वस्तीत तीन शेजारी रहात होते; कोल्हा, करकोचा आणि कावळा.
करकोचा दिसायला दौलदार आणि सडपातळ शरीरयष्टीचा होता. इतर पांढ-या प्राण्यांना जरी करकोच्याच्या पांढ-या रंगात पिवळसर झाक दिसली तरी स्वत: करकोच्याला मात्र तो स्वत: पांढराशुभ्र असल्याची खात्री होती. म्हणूनच दिवसातला त्याचा बराचसा वेळ आपले पंख चोचीने साफ करण्यात आणि बाकीचा वेळ घर साफ करण्यात जात असे. तसा तो फारच प्रेमळ आणि नम्र होता. एकटाच आपला पाण्यात तासनतास उभा राहून मासे पकडत असे. पण त्याला कोणी सामान्य पक्ष्यांच्या (विशेषतः कावळ्यांच्या) पंगतीला बसवले की त्याला ते मुळीच खपत नसे.
त्याचा शेजारी कोल्हा; तांबूस रंगाचा आणि झुपकेदार शेपटीचा. कोल्ह्याच्या घरावरचे गोल घुमट, घराची बांधणी ह्यावरूनच त्याच्या हुच्च राहणीचा कुणालाही अंदाज आला असता. कोल्ह्याच्या घरी अगदी पिढया दर पिढया जणु लक्ष्मी आणि सरस्वती जुळ्यानेच जन्माला येत होत्या. त्यामुळे अशा सर्वसंपन्न कोल्हासंस्कृतीत करकोच्याला विशेष रस होता.
तिसरं घर कावळ्याचं. कावळा दिसायला काळा पण अतिशय हुशार आणि मेहेनती होता. त्याच्या गबाळ्या घरावरून त्याच्या तल्लख बुद्धीची कल्पना कुणालाच आली नसती. म्हणा तसा कावळ्याला त्याने काही फरक पडणार नव्हता. कारण एक काडी जमवत जमवत त्याने बरीच पुंजी जमवली होती. वस्तीतल्या सगळ्यांनाच काकसंस्कृतीविषयी विलक्षण आकर्षण होतं. विशेषत: कावळ्यांचं जेवण जरी आजतागायत कोणी खाऊन पाहिलं नसलं तरी कावळ्यांची खाद्यसंस्कृती हा तिथल्या सांस्कृतिक चर्विच्चर्वणाचा विषय बनला होता.
*****
ह्याचाच फायदा घेऊन आपल्या शेजा-यांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करावेत ह्या हेतूने कावळ्याने एकदा करकोच्याला आपल्या घरी मेजवानीचं आमंत्रण दिलं. आता करकोच्याची झाली पंचाईत! सांस्कृतिक आदानप्रदानाचा झेंडा अखंड फडकवत ठेवतानाच कावळ्याला नकार कसा द्यावा ह्याचा तो विचार करायला लागला.
पण फार विचार करायची गरज पडली नाही. कारण कोल्ह्यानेही अगदी त्याच दिवशी त्याच वेळी त्याला आपल्या घरी येण्याचं आमंत्रण दिलं. निवड सोप्पी होती. लगेच कोल्ह्याकडे होकाराचे आणि कावळ्याकडे नकाराचे निरोप गेले. घेतला वसा टाकावा न लागल्यामुळे करकोच्याची मान एक इंचभर उंचावली.
आता कोल्ह्यासारख्या कला-साहित्य-शास्त्रसंपन्न घरात मोकळ्या हाती कसं जायचं म्हणून करकोच्याची तयारी सुरु झाली. मिसेस करकोच्यांनी अस्सल करकोची खाद्यपदार्थ जातीने तयार केले, बाळ करकोच्यांनी बाळ कोल्ह्यांसाठी आपल्या बाळहातांनी चित्रे काढली, भेटकार्डे तयार केली. अशाप्रकारे जय्यत तयारीनिशी करकोचा कोल्ह्याकडे रवाना झाला.
कोल्ह्याने दारातच करकोच्याची स्तुती आणि स्वागत केलं. करकोचाही त्यात मागे राहिला नाही. कोल्हासंस्कृतीविषयी त्याला वाटणारी तळमळ तो भेटींच्या स्वरूपात बरोबर घेऊन आलाच होता. ती त्याने कोल्ह्याकडे सुपूर्त केली. कोल्ह्याने कोणतेही आढेवेढे न घेता त्या सर्व भेटींचा सादर स्वीकार केला. आणि सगळे जेवणाच्या टेबलाकडे रवाना झाले.
त्या टेबलावर कोल्हासंस्कृतीतले अनेकोत्तम पदार्थ मांडले होते. झालंच तर पेले, वाट्या आणि ताटल्यादेखील कोल्हासंस्कृतीच्या उच्चपणाची ग्वाही देत होत्या. गालिचे, रुमाल टेबलक्लॉथ ह्यावर देखील कोल्हा संस्कृतीची छाप जाणवत होती. करकोच्याला ताटलीतल्या कोल्हासंस्कृतीचा आस्वाद घ्यायचा होता. पण ताटलीच्या पसरट आकारामुळे तो आपली चोच ओली करण्यापलिकडे तो काहीही करू शकला नाही. अर्थात, तरीही त्या पदार्थांच्या न घेतलेल्या चवीची तारीफ करायला तो विसरला नाही.
शेवटी निरोपाची वेळ आली. करकोच्याकडून मिळालेल्या भेटीची परतफेड म्हणून कोल्ह्याने आपल्या संस्कृतीचा ठसा असलेल्या ताटल्या आणि वाडगे भेट दिले. अशाच सांस्कृतिक भेटी घडत राहिल्या पाहिजेत असा निर्धार करूनच करकोचा घरी परतला.
*****
आजकाल कावळा इतर प्राण्यांना कोल्हा आणि करकोच्यांच्या संस्कृतीवर भाषणे देत फिरत असतो. आणि घरी कावळ्याची मुलंबाळं करकोच्याकडून मिळालेल्या कोल्हासंस्कृतीय ताटवाटयातून कोल्ह्याकडून मिळालेल्या करकोचासंस्कृतीय पदार्थांचा आस्वाद घेत असतात. असं इतर प्राणी ऐकून आहेत.
*****
वरील गोष्ट हे रूपक आहे ही गोष्ट लक्षात आली असेलच. इथे कुठल्याही संस्कृतीवर दोषारोप करण्याचा उद्देश नाही. पण कुठल्याही संस्कृतीचे घटक असलेल्या मनुष्यस्वभावाची झलक दाखवण्याचा प्रयत्न मात्र आहे.
इथे जपानात मी इंग्रजी तर शिकवतेच पण त्याचबरोबर जपानी मुलांना माझ्या देशाची ओळख करून देणे हादेखील माझ्या कामाचाच एक भाग आहे. म्हणूनच माझे जपानी विद्यार्थी आणि त्यांच्याच वयाचे भारतीय विद्यार्थी यांच्यात पत्रमैत्री घडवून आणली तर? अशी एक कल्पना मी शाळेत मांडली. असा प्रकल्प आधी कुणी केला नसल्याने त्याला बजेट नाही. त्यामुळे पोस्टेजचा खर्च उचलण्याचीही मी तयारी दाखवली. पण माझ्या शाळेतल्या फक्त तीन मुलींनी प्रत्येकी पाच ओळींची पत्र लिहिण्याएवढाच उत्साह दाखवला. बरोबरच आहे म्हणा…आपण ज्यांना बाटल्यांची बुचं आणि पैसा पाठवतो अशा मुलांशी मैत्री करण्यात इथल्या मुलांना अजिबात रस नव्हता. मरा म्हटलं!
त्याच सुमारास इटालीच्या एका शाळेकडूनही अशीच ऑफर आली. आणि काय गम्मत! जादूची कांडी फिरवल्यासारखी अख्खी शाळा कामाला लागली. व्हिडिओ तयार केले, चित्रं काय काढली, पत्रं काय लिहिली (एवढी पत्र आली की शेवटी निवड करावी लागली! ती निवडक पत्र तपासून सुधारणा मीच करून दिल्या!) ते सगळं इटालीला पाठवून जपानी मुलं उत्तराच्या अपेक्षेत होती.
आणि उत्तर आलं. तिथल्या मुलांनी काढलेली काही चित्र आणि काही पत्र होती. सगळे विद्यार्थी शाळेच्या हॉलमधे जमा झाले आणि मुख्याध्यापकांनी मोठ्या अपेक्षेने एक पत्र उघडलं. आणि त्यांचा चेहराच पडला. ती सगळी पत्र चक्क इटालियन भाषेत लिहिलेली होती. जपानी मुलांना इटालियनमधून लिहिलेली पत्रे वाचता येणार नाहीत हा साधा विचारही कोणाच्या मनात येऊ नये ह्याचं मला प्रचंड आश्चर्य वाटले. ह्यापेक्षा आमच्या शाळेतल्या मुलांना पत्रे पाठवली असतीत तर त्याचे तुम्हाला कळेल अशा भाषेत नक्कीच उत्तर आले असते असे सांगावेसे वाटले पण सांगून काही उपयोग होईल असं वाटलं नाही म्हणून शांत बसले.
इटालीहून मिळालेल्या मिठाया खाल्ल्याच, झालंच तर त्या सगळ्या पत्रांचे आधी इंग्रजीत आणि नंतर जपानीत भाषांतरही केले , इटालीला पाठवायचे व्हिडिओ काढण्याच्या निमित्ताने ठिकठिकाणी फुकटात फिरून आले आणि इथून इटालीला पाठवलेल्या सगळया व्हिडिओजच्या कॉप्या करून घेतल्या. न जाणो पुढेमागे जपानी शाळांवर बोलायची, लिहायची वेळ आलीच तर त्यांचा मला चांगलाच उपयोग होईल.
प्रतिक्रिया
16 Jul 2009 - 12:25 pm | सहज
आपला अनुभव फार बोलका आहे.
:-)
16 Jul 2009 - 12:31 pm | दिपाली पाटिल
आणि फार सुंदर काम आहे तुझं...बाकीच्या गोष्टी प्रगत-अप्रगत किंवा प्रगतिशील देश म्हणुन होत असाव्यात बहुतेक,हा फरक बर्याच ठिकाणी दिसुन येतो तसा...
दिपाली :)
16 Jul 2009 - 12:31 pm | यशोधरा
छान लिहिलं आहेस.
16 Jul 2009 - 12:38 pm | श्रावण मोडक
छान. खुसखुशीत. लिहा, अजून लिहा सांस्कृतिक देवाण-घेवाणीवर.
16 Jul 2009 - 12:55 pm | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
17 Jul 2009 - 11:37 am | नंदन
सहमत आहे. बोधकथेत अनुभव गोवण्याची कल्पकता आवडली.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
16 Jul 2009 - 12:58 pm | Nile
वा! मस्त रुपक जमलंय!
मजा आली वाचुन! येउद्या अजुन असेच खुसखुशीत. :)
16 Jul 2009 - 8:41 pm | प्राजु
अनुभव फार बोलका आहे. अजून येऊदेत. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
16 Jul 2009 - 8:42 pm | प्राजु
अनुभव फार बोलका आहे. अजून येऊदेत. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
16 Jul 2009 - 5:59 pm | मदनबाण
सुंदर कल्पना आणि उत्तम लेखन.
(लहानपणी ठकठक मधली दिपू द ग्रेट ही गोष्ट आवडीने वाचणारा)
मदनबाण.....
Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa
16 Jul 2009 - 7:45 pm | तिमा
रुपककथा कोणावर बेतली आहे ते कळले नाही फक्त तुम्ही जपान मधे इंग्रजी शिकवता येवढंच कळलं.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
17 Jul 2009 - 9:50 am | सुबक ठेंगणी
परत परत वाचा...कळेपर्यंत वाचा..
मग कळेल कदाचित! :))
16 Jul 2009 - 7:52 pm | रेवती
खुसखुशीत लेखन!
खरं सांगायचं तर ती इटालियन पत्रे आल्याचं वाचताच एक आसूरी आनंद वाटला. 'बरं झालं, त्यांची जिरली' असं वाटून गेलं.
रेवती
16 Jul 2009 - 10:49 pm | पिवळा डांबिस
पण एक प्रश्न शिल्लक रहातोच....
त्या जपानी मुलांनी इटलियन मुलांना कोणत्या भाषेत पत्रे पाठवली होती?
:W
17 Jul 2009 - 2:04 am | शाहरुख
खि..खि..
आणि मला वाटत होते की जपान हा इटलीच्या तुलनेत कोल्हा आहे !!
17 Jul 2009 - 10:05 am | सुबक ठेंगणी
कोणाला काय वाटतं हा तर ज्याचा त्याचा प्रश्न.
ह्या गोष्टीपुरतं बोलायचं तर्...स्पष्ट्च आहे ;)
17 Jul 2009 - 10:00 am | सुबक ठेंगणी
अरे जपानी मुलांनी पत्रे इंग्रजीतून पाठवली होती...
आता इटालियन मुलांना इंग्रजी कळत नव्हतं असं म्हणावं तर आधीचा सगळा पत्रव्यवहार इंग्रजीतूनच झाला होता.
आता बोला!
16 Jul 2009 - 8:28 pm | नरेंद्र गोळे
सुबक ठेंगणी, सरस आणि ठोस विचारांची पुरस्कर्ती आहे हे वाचून आनंद झाला. जपानी शाळांबाबत आमचे प्रबोधन त्या चित्रफितींच्या आधारे करायला मात्र विसरू नकोस ही अर्जी.
गोष्ट बाकी सुरस आणि छान लिहीली आहेस. आवडली.
16 Jul 2009 - 8:43 pm | परिकथेतील राजकुमार
पॉशच लिहिले आहे हो !
©º°¨¨°º© परकोचा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य
16 Jul 2009 - 8:48 pm | बिपिन कार्यकर्ते
सुठें ... नेहमीप्रमाणे छान, खुसखुशीतच लिहिलंय. पण त्याहीपेक्षा, ही कहाणी अवस्थ करून गेली. माणसाच्या मनातला उच्चनीचची भावना कधी कुठे कशी वर येईल काय सांगावं?
रेवती म्हणतात तसं, इटालियन भाषेत पत्र आली तेव्हा थोडा असुरी आनंद झालाच मात्र.
बिपिन कार्यकर्ते
16 Jul 2009 - 8:49 pm | llपुण्याचे पेशवेll
हम्म्म्म्म्..छान बोलका अनुभव. :|
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
16 Jul 2009 - 8:57 pm | धमाल मुलगा
भारतीय नाऽऽ? ते तसलेच! त्यांना काय एव्हढी किंमत द्यायची?
आणि मग इटालियनमधली पत्रं बसा अक्षरं लावत आणि डिक्शनर्या धुंडाळत!
च्यायला, राग राग नाही का हो झाला तुमचा हे असं पाहताना? :(
आजही अशी सापत्नभावाची वागणुक मिळते आपल्याला आणि मारे आपण मिरवतो "सॉफ्टवेअर सेवाक्षेत्रामधली जागतीक महासत्ता" म्हणुन!
च्छ्या! डोकंच सरकलं हा अनुभव वाचुन.
असो, माझं बापड्याचं हे वैयक्तिक, कोत्या बुध्दीतून आलेलं मत आहे. माफ करा जर ह्यामुळं रसभंग होत असेल तर.
----------------------------------------------------------------------------------------
एक गदारोळ प्रसवे ती स्वाक्षरी | गदारोळाचे कारण ते एक स्वाक्षरी ||
रे मना ऐसा खेळ ना करी | ज्या योगे वितंड मुळ धरी ||
ऐश्या कारणे रे धमु ना करावी स्वाक्षरी || सच्चिदानंद ! सच्चिदानंद !!
16 Jul 2009 - 9:25 pm | ऋषिकेश
असेच म्हणतो..
मात्र अनुभव लिहिलाय मस्त
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
17 Jul 2009 - 6:52 pm | सुबक ठेंगणी
अगदी अस्साच संताप झाला होता रे!
पण इटालियनांनी परस्पर काम केलं माझं... ;)
16 Jul 2009 - 9:29 pm | चकली
रूपक कथा लिहण्याची कल्पकता सहिच!
चकली
http://chakali.blogspot.com
16 Jul 2009 - 9:42 pm | टारझन
बेष्टं !! सुबक ठेंगणी.. लेखण आवडले हो :)
(जंगलातील कोल्हा) टारकोचा
नको करू कुटाळक्या || धर पंथ हाय्,हॅलोचा ||
टार्या म्हणे आता || आय.डी.घे संत एकनाथाचा ||
16 Jul 2009 - 9:44 pm | क्रान्ति
मस्तच! अनुभव मात्र अस्वस्थ करून गेला.
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी
16 Jul 2009 - 10:00 pm | चतुरंग
तुमची चिडचिड झाली असणं स्वाभाविक वाटतं.
भारतीय (आणि त्या भूखंडाच्या आसपास म्हणजे पाकिस्तानी, बांगला, श्रीलंकन इ.) माणसांकडे बघण्याचा इतरांचा दृष्टिकोन हा एक मोठा विषय आहे. पश्चिमेकडून आलेलं सगळं चांगलं हा गंड घालवणे हाही एक मोठा अडसर आहे.
परंतु तुम्हाला वाटलेली सखेदाआश्चर्याची, सात्विक संतापाची भावना इतक्या छान रूपकातून मांडण्याचं तुमचं कसब आणि सकारात्मक विचार मला आवडले! त्याबद्दल तुमचं खास अभिनंदन!! :)
(जरा अवांतर - मागे काही वर्षापूर्वी ग्रीन हाऊसचे काम करीत असताना हॉलंडचे इंजिनियर्स आले होते त्यांच्या ऑटोमेशन सिस्टिममधले प्रॉब्लेम्स मी सोडवून दिल्यावर ते असेच आश्चर्याने बघत राहिले की भारतासारख्या 'यःकश्चित देशातही' डोक्याने बरी माणसे असतात तर ;) ! मग तो सगळा ऑटोमेशनचा प्रॉजेक्ट मीच पूर्ण केला! :) )
चतुरंग
16 Jul 2009 - 11:01 pm | लिखाळ
चतुरंगांशी सहमत आहे.
भारत सॉफ्टवेअर क्षेत्रात अग्रेसर आहे, महासत्ता बनायची स्वप्ने बघत आहे वगैरे बाबी इतर देशातल्या सामान्य माणसाच्या गावी असतातच असे नाही. आपल्या कडच्या सामान्याला इतर विकसनशील देशांबद्दल जितपत माहिती असेल तशीच त्यांना आपल्याबद्दल.
आपल्याकडच्या आकर्षक बाबी पर्यटन-व्यवसाय या दृष्टीने इतरांसमोर मांडणे याबाबत आपले सरकार गेल्या पन्नास वर्षांत कमी पडले असावे असेही असेल. मला कल्पना नाही.
-- लिखाळ.
17 Jul 2009 - 10:13 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
चतुरंग आणि लिखाळ यांच्याशी सहमत आहे.
सुबक, मलाही आसुरी आनंद झाला इटालीयन पत्रं आली हे वाचून!
आजही अनेक युरोपीय लोकांना भारत म्हणजे उंटा-हत्तींचा देश वाटतो नाहीतर झोपड्यांचा. पर्यटनाच्या क्षेत्रात आपले सरकार कमी पडले असे मलाही वाटते. चिटुकल्या देशांची इत्थंभूत माहिती इंटरनेटवर उपलब्ध असते आणि "आय.टी. किंग" म्हणवणार्या आपल्या देशाबद्दलची किती माहिती आंतरजालावर उपलब्ध आहे?
17 Jul 2009 - 12:07 pm | विंजिनेर
असेलही. पण सगळ्या फारिनरला नान/तंदुरी-चिकन आणि ताजमहाल हमखास माहिती असतो.
एकदा हैदराबाद मधे माझा तैवानी सहकारी २ दिवसांकरता(च) आला. तो ताजमहाल बघुन यायला किती वेळ लागेल असं विचारत होता =))
असो.
सु.ठें - शिक्षण क्षेत्रातला हा अनुभव भारतीयांकरता नवीन नाही.
त्याला कारणीभूत त्यांचे पालक असतात असं मला वाटते. अजून एक ह्या क्षेत्रातील अनुभवः
उत्तम इंग्रजी केवळ सोनेरी केसांच्या, निळ्या डोळ्यांच्या पाश्चिमात्य मुलींनाच शिकवता येतो अशी इतकी पक्की समजूत असते या लोकांची की त्याला हसावे की रडावे तेच कळत नाही.
अशा तरूण-तरूणींना (भले त्यांना शिक्षकी पेशाचा गंधही नसेल) पौर्वात्य देशात हसत हसत नोकरी मिळते.
मी कित्येकवेळा बातम्या वाचल्या आहेत की कृष्णवर्णीय लोकांना या देशांतील मुले घाबरतात म्हणून (इंग्रजी)शिक्षकांच्या नोकर्या डावलल्या जातात.
असो. पुलेशु.
----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही
18 Jul 2009 - 6:04 am | सुबक ठेंगणी
आजही जेव्हा मला माझे विद्यार्थी "तुम्ही हत्तीवरून शाळेत जात होता का?" किंवा "तुम्ही गॅसऐवजी शेण वापरता का?" असं विचारतात तेव्हा हरते मी!
आजकाल तर कोणी जपानी मला "मी स्लमडॉग मिलिओनेर बघून आलो" असं म्हणाला/ली की काळजात धस्स होतं.
इथे विंजिनेर म्हणतोय तेव्हढा त्रास होत नाही. पण उद्या जर गो-या कातडीचा माणूस आणि काळ्या कातडीचा ह्यातून निवड करायची वेळ आली तर मात्र नक्कीच गो-या कातडीला प्राधान्य मिळेल.
मला शाळेतली मुलं तर चक्क विचारतात,"तुझा रंग एवढा काळा कसा?" तेव्हा मी लगेच "देव कुणाला गोरा रंग देतो कुणाला डोकं देतो" असं उत्तर देते :D
16 Jul 2009 - 10:17 pm | धनंजय
खुसखुशीत शैलीत अनुभव लिहिला आहे. मस्त.
(पण रूपककथा इसापाच्यासारखी मितभाषी झाली असती तर अधिक मजा आली असती.)
17 Jul 2009 - 10:14 am | सुबक ठेंगणी
धन्यवाद!
थोडी लांब झाली असेल गोष्ट...कारण आधी फक्त तेच लिहून माझा अनुभव लिहायचा नाही असं ठरवलं होतं. नंतर विचार केला की त्या अनुभवामुळे गोष्ट अधिक भावेल.
(अवांतरः गोष्ट इसापनगरीत असतं तशा प्राण्यांच्या गावात घडलेली असली तरी गोष्ट इसापनीतीतली आहे असं कुठे म्हटलंय! :W )
16 Jul 2009 - 10:29 pm | दशानन
छान. लेखन सुरेख.. अनुभव... काय बोलू ह्या विषयी वरील सर्व प्रतिसाद माझ्याच मनातील भावना आहेत असेच समजा... असुरी आनंद मला ही झाला ;)
17 Jul 2009 - 2:40 am | स्वाती२
छान अनुभव आणि रुपकही.
आमच्या इथे जपानी गाड्याना सप्लाय करणार्या छोट्या मोठ्या बर्याच जपानी कंपन्या आहेत. त्यामुळे transfer होऊन आलेल्या जपानी लोकांचे एक तरी मुल माझ्या मुलाच्या वर्गात असते. असे मूल माझ्या मुलाशी शक्यतो बोलतही नाही मात्र गोर्या मुलाशी मैत्री करायला धडपडते. मात्र preschool पासून माझ्या मुलाबरोबर असलेले त्याचे मित्र हा प्रकार लक्षात येताच त्या मुलाला एकटं पाडतात. गेल्या वर्षी असं वागणार्या एका जपानी मुलीला माझ्या मुलाच्या मैत्रिणीने खुप छळले.
या उलट प्रकार कंपन्यांतून. देशी असाल तर अगदी डोक्यावर घेतात. त्यातून metallurgist असाल तर बघायलाच नको.
17 Jul 2009 - 10:07 am | सुबक ठेंगणी
तुझा अनुभव वाचून तर मला अशा मैत्री करायला धडपडणा-या लोकांची अजूनच दया आली.
या उलट प्रकार कंपन्यांतून. देशी असाल तर अगदी डोक्यावर घेतात. त्यातून metallurgist असाल तर बघायलाच नको.
आनंद झाला! :)
17 Jul 2009 - 4:10 am | मुशाफिर
फारच सुंदर रूपक आहे. वर दिलेल्या प्रतिक्रियामध्ये म्हटल्याप्रमाणे आणि तुमच्या लेखात व्यक्त केल्याप्रमाणे जपान्यांच्या (सगळया नाही, पण बराचश्या) भारताविषयीच्या भावना पाहून वाईट वाटलं.
ह्या ठिकाणी उदाहरणं देउन काही मुद्दे मांडावेसे :
१. 'जिओपार्डी' हा कार्यक्रम एका स्थानिक वाहीनीवर कालच पाहात होतो. लहान मुलांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमात त्यांना काही व्यक्तिगत प्रश्ण विचारले गेले. त्यातली एक मुलगी चिनी भाषा (खरेतर, 'मंदारिन' ) शिकते, हे ऐकल्यावर सुत्रधाराने त्याच कारण विचारलं. त्यावेळी "मागचं शतक अमेरिकेचं होत आणि हे शतकं चीनचं असेल, असं माझे वडिल म्हणतात", हे तीचं उत्तर होतं.
२. 'येल' विद्यापिठाच्या अध्यक्ष्यांची मुलाखत पाहण्याचा कालच योग आला. त्यावेळी, 'येल' आता चीनमध्येही शि़क्षण देणार आहे, हेही(व्यक्तिस्वातंत्र्य आणि मुक्त विचार स्वातंत्र्याचा उदोउदो करत का होइना?) त्यांनी मान्य केलं. म्हणजेच, इतर देश चीनकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत.
मला वाटतं, ह्यात चीनी लोकांच्या उद्योगीवृतीचा आणि समाज/राष्ट्र म्हणून एकसंध राहण्याचा फार मोठा हात आहे (साम्यवादाशी ह्याचा काही संबंध नाही). भारतीयांनी जर मोठी उद्दिष्ट ठेवून ती साध्य केली तर आपल्यालाही कोणी दुर्लक्षीत करणार नाही. एक समाज आणि राष्ट्र म्हणून आपण नक्कीच ह्यात कुठेतेरी कमी पडलो आहोत.
अवांतरः सॉफ्टवेअर उद्योगात महासत्ता होण्यासाठी भारताला अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. २०१५ पर्यंत जागतिक पातळीवर ५०० बिलियन डॉलरच्या एकूण उलाढालीत भारताचा वाटा ९.५ ते १२ बिलीयन पर्यंत वाढेल, असा 'नॅसकॉम' चा अंदाज आहे. चीनचा आजच्या घडीला ह्या क्षेत्रातला वाटा १० बिलीयनपेक्षा जास्त आहे. तेव्हा 'दिल्ली बहोत दूर है!' असेच म्हणावे लागेल.
17 Jul 2009 - 6:36 pm | सुबक ठेंगणी
भारतीयांनी जर मोठी उद्दिष्ट ठेवून ती साध्य केली तर आपल्यालाही कोणी दुर्लक्षीत करणार नाही. एक समाज आणि राष्ट्र म्हणून आपण नक्कीच ह्यात कुठेतेरी कमी पडलो आहोत.
हे मात्र मलाही पटतं. पण आपल्या देशाचं आकारमान, विविधता, आपल्यावर वेळोवेळी झालेली इतर संस्कृतींची आक्रमणे पहाता ही गोष्ट कठीण नक्कीच आहे.
17 Jul 2009 - 11:27 am | सुप्रिया
छान अनुभवलेखन !
तुम्हाला असा अनुभव आल्यावर फक्त चिडचिड करून सोडून न देता
रूपकामध्ये शब्दबद्ध केल्याबद्दल कौतुक वाटलं.
-सुप्रिया
देहरुप गावाहून रामरुप गावाच्या प्रवासात रामनाम हीच उत्तम शिदोरी होय.
17 Jul 2009 - 11:29 am | विसुनाना
जपान्यांना वेगळे कशाला गणायचे?
मानवी स्वभावावर प्रकाश टाकणारी रूपक कथा आवडली. व्यक्तिगत पातळीवर काय किंवा देशपातळीवर काय? 'खोबरं तिकडं चांगभलं'!
आपण भारतीय तरी कुण्या टांझानिया किंवा इथियोपियाच्या लोकांशी स्वतःहून मैत्री करण्यासाठी धडपडतो? (हे देशपातळीवर, व्यक्तिगत ज्याचे त्याने पहावे...;)) आपल्यालाही अनुक्रमे सौदी, कुवेत, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, युरोपीय देश आणि संयुक्त अमेरिका या देशांना चढता प्राधान्यक्रम द्यावा असे वाटते. ब्राझील, रशिया, अर्जेंटिना हे देशही अजून आपल्या फेवरेट लिस्टमध्ये नाहीत.
तेव्हा घरोघर मातीच्याच चुली.
17 Jul 2009 - 6:42 pm | सुबक ठेंगणी
आपण म्हणता ते खरं आहे. पण मग "इतर संस्कृती जाणून घ्यायच्या आहेत हो!" असा आव कशाला आणायचा?
17 Jul 2009 - 12:37 pm | अभिज्ञ
सहा एक महिन्यांपुर्वीचीच गोष्ट.
मी दोहा,कतार इथे होतो.
माझी तिथे बरिच मोठी आंतर्राष्ट्रीय टिम तयार झाली होती.
ब्रिटिश, अमेरिकन,युरोपिअन,अरबी, फिलिपाइन्स,चीन, मलेशिया
असे बरेच जण होते.
अर्थात भारत पाहिलेला तिथे एकजण पण नव्हताच.
मी सुट्टिकरीता भारतात परत येणार होतो.
अशाच गप्पा रंगल्या होत्या अन मी सहजच प्रश्न टा़कला की
तुमच्या करीता भारतातून येताना काय आणू?
तिघांकडून उत्तर आले
" येताना आमच्या करीता "साप" घेउन ये"
मी क्षणभर अंतर्मुख झालो.
अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
17 Jul 2009 - 1:17 pm | ऋषिकेश
आता काळजी नको.. पाऊसवेडीताई हैत की! :) ;)
देतील त्या साप पकडून
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
17 Jul 2009 - 7:02 pm | सुबक ठेंगणी
प्रतिसादांबद्दल, आपले बरेवाईट अनुभव इथे सांगितल्याबद्दल, आणि महत्वाचं म्हणजे माझी चिडचिड, उद्वेग काही अंशी हलका केल्याबद्दल धन्यवाद!
आता कसा (ब्रिटिशच्या मिथन्यावानी) मोकलं मोकलं वाट्ताय! ;)
18 Jul 2009 - 3:35 am | मृदुला
ताटवाट्यांचे रूपक आवडले. अगदी चपखल.
असे अनुभव घडोघडी येतात, आणि आपण सावध नसलो तर आपल्या हातूनही घडू शकतात हा धडा प्रतिक्रियांतून शिकले. :-)