लय आणि ताल या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पण आपल्या शरिरात व्यक्त होताना त्यांचा घनिष्ठ संबंधही आहे.
तालाबद्दल तात्यांनी लेख लिहिला, त्यात त्यांनी आठवण करून दिली हृदयाच्या ठोक्यांमधला ताल हा आपल्या सर्वांमध्येच असतो. पुढे या ठिकाणीच मी वसंतराव देशपांड्यांची एक ध्वनिफीत ऐकली, त्यात त्यांनी सांगितले की हृदयाच्या ठोक्यातून येणारी अचल लय असते, तिच्यातून बदलती लयकारी येऊ शकत नाही - कारण हृदयाची लय अचानक बदलली तर जीव घाबरा होतो, सौंदर्यानुभव येत नाही.
पण तरी तात्यांनी म्हटल्यासारखे हे खरेच जाणवते, की आपल्या शरिरात एकाप्रकारची लय असते. (येथे लय म्हणजे एक-दोन-एक-दोन अशी अविरत गती, इंग्रजीत टेंपो, किंवा स्पीड, हे अभिप्रेत आहे. वसंतरावांच्या व्याख्यानाच्या ध्वनिफितीतही त्यांनी यालाच "लय" म्हटले आहे.) दुसरी लयबद्ध गती म्हणजे चालणे. १७२२ सालच्या "स्वरमेळाबद्दल कृती" ग्रंथात जाँ फिलिप रामो म्हणतो "...चालणे, टाळ्या देणे, अनेक वेळा मान डोलवणे... या सर्वांमध्ये पहिल्या दोन हालचालींशी (म्हणजे पहिल्या दोन पावलांशी, किंवा पहिल्या दोन टाळ्यांशी) पुढच्या सर्व हालचाली समसमान असतात, केल्यास आपल्याला बदल मुद्दामून करावा लागतो."
म्हणजे ही ती दृश्य नैसर्गिक लय - आणि ही लय जीव घाबरा न होता गंमत म्हणून कमी अधिक करता येते. या लयीची शिस्तबद्ध ओळख मला शाळेत व्यायामाच्या वर्गात झाली. वाचकांपैकी कोणी एन.सी.सी. वगैरे वर्गात ऐकली असेल.
इथे कदमतालाची लय, अर्धी लय आणि एका मात्रेचे अनेक भाग करणारी तिप्पट लय आमच्या शाळेतल्या वर्गातली मला आठवते.
Get this widget | Track details | eSnips Social DNA
(गंमत म्हणजे "खाली" हा भारतीय तालातील अत्यंत महत्त्वाचा प्रकार इतक्या नैसर्गिकपणे येतो आहे. पी.टी. मास्तर त्याला "खाली" असे स्पष्ट म्हणत! कोणीतरी मला समजावून सांगायला हवे होते, की कदमतालातली "खाली" म्हणजेच तालातली "खाली" - मग त्याबद्दल जे कोडे मला वाटत राहिले, ते तसे राहिले नसते.)
कदमताल इतका नैसर्गिक असला तरी शाळेत टिवल्याबावल्या करीत असल्यामुळे त्यात कलात्मकता भरण्याची स्फूर्ती मला कधी झाली नाही. वर्गातल्या कोणालाच झाली नाही.
पायांबरोबर पूर्ण अंगाला ताला-लयीत झोकून देणारे हे पंडित बिरजू महाराज बघा, म्हणजे शारिर तालालयीचे सौष्ठव दिसू लागेल -
तालात शरीर झोकून न देणारे आपण लोकही तबल्याचे बोल तालमय म्हणून ओळखतो. इथे पंडित बिरजू महाराज चर्मवाद्यातून निघणारा ताल आणि नाचणार्या पायांतून निघणारा ताल समांतर कसा, ते दाखवून देत आहेत.
नेमक्या अशाच प्रकारे शरिराच्या लयबद्ध हालचालीतून ताल आणि तुकडे निर्माण करायची स्फूर्ती जगाभरातल्या नर्तक-नर्तकींना होते. परंतु या सर्वांमध्ये सांधलेले दुवे बघायला-ऐकायला मिळायची संधी आपल्याला क्वचितच मिळते. ही संधी मला श्रीमती गौरी जोग यांनी दिली. गौरी ही माझी आप्तस्वकीय आहे. आणि ही नवीन दृष्टी दिल्याबद्दल मी तिचा आभारी आहे. गौरीने मिशेल नास्सिमेंतो या फ्लॅमेन्को नर्तकीबरोबर नृत्य बसवले, त्याची झलक येथे देत आहे. पुन्हा आपल्याला दिसते, की लयीच्या मात्रांमध्ये अधिकाधिक नेमक्या हालचाली बसवणे, पदन्यासाने ताल धरणे आणि तुकडे प्रस्तुत करणे, हे दोन्ही नृत्यशैलींमध्ये सामायिक आहे. सामायिक आहे, म्हणजे काही दोन्ही नृत्यशैली एकच आहेत असे नव्हे. (कुठले तुकडे दोघींना सवाल-जवाबात देता येतील, याबद्दल दोघींना विचार करावाच लागला. पण असा सवाल-जवाब शक्य तरी आहे, याच्याकडे आपण लक्ष देऊया.) पहिल्या मिनिटात आवाज अंधुक आहे, क्षमस्व.
पहिल्या १:४५ मिनिटात आपल्याला लक्षात येते, की फ्लॅमेन्को आणि कथक, दोन्हींमध्ये शारिर लय चक्कर (गिरक्या) देऊन प्रदर्शित होते. यातील सुरुवातीचे संगीत फ्लॅमेन्को शैलीचे आहे. १:४५-२:१५ मध्ये एकत्र चार मात्रांची आवर्तने दोघी त्यांच्या दुहेरी शैलीत एकत्र सादर करतात. २:३० ते ३:३० सवाल-जवाब ऐका. ३:३० ते ४:३० मध्ये हस्तमुद्रा आणि पूर्ण शरीर लय दाखवते. त्यापुढे एकत्र शेवटापर्यंत भारतीय संगीताच्या बरोबर टिपेला जाणे...
सांगायचे हे - मुद्रा वेगळ्या, अदाकारी वेगळी. पण शरिराला तालबद्ध लय द्यायची उर्मी तीच.
याच श्रीमती मिशेल नास्सिमेंतो यांनी रेजियो मॅकलॉक्लिन या अमेरिकन टॅप डान्सरबरोबर जुगलबंदी चित्रित केली ती येथे देत आहे. (यातील ध्वनी मागील फितीपेक्षा उंच आहे - कृपया आवाज कमी करणे.) लक्ष देऊन बघितले, तर लगेच दिसेल की स्पेनमधल्या फ्लॅमेन्कोचे हावभाव वेगळे, आणि अमेरिकन टॅपचे हावभाव वेगळे. मिशेल यांचे हात कोपरांपासून बाहेर विक्षेप करतात, मनगटांपासून हातांची फुले थोडी आत येतात. रेजियो यांचे हात बहुधा शरिराच्या जवळ राहातात, कोपरे बाहेर होऊन बाहूंनी गोलाकार आकृती तयार होते.
पण पुन्हा किती का फरक असेना, मात्रांची अत्यंत रंजक विभाजने करून शरिरातून तालबद्ध लय व्यक्त करण्याची पद्धत आपल्याला दोघांमध्ये दिसते. मुख्य म्हणजे दोन वेगवेगळ्या शैलीत नृत्य करणार्या या दोन कलाकारांनी जगाभोवती हातात हात धरून साखळी बांधायला आपल्याला मदत केली आहे.
साखळीची शेवटची कडी आहे टॅप मध्ये नाट्य मिसळलेल्या फ्रेड अॅस्टेर यांची.
पहिली दोन मिनिटे काही प्रमाणात नृत्य असले तरी मुख्य विनोदी गाणे आहे. (हॉलिवुडमध्ये प्लेबॅकची पद्धत नसल्यामुळे या "ब्लू स्काइज" चित्रपटातल्या या गाण्यात आवाजही फ्रेड अॅस्टेर यांचाच आहे.) २:०० ते ३:३० मिनिटांपर्यंत धीम्या लयीत अॅस्टेर वेगवेगळे खेळ खेळतात. नंतर लय खूपच वाढते आणि वेडीपिशी होते! फ्रेड अॅस्टेर यांना २०व्या शतकातील अमेरिकेतील सर्वोत्तम नर्तक म्हणतात (किंवा सर्वांत चमकत्या तार्यांपैकी एक) ते फुकट नव्हे.
अशा तर्हेने आपण वर्तुळ पूर्ण केले आहे. सुरुवातीला पंडित बिरजू महाराजांनी ताल-लयात अभिनय मिळवला होता, हे आठवावे.
शरिराच्या माध्यमाने लय आणि ताल व्यक्त करणे हे मनुष्याला नैसर्गिक आहे. उत्तम कलाकार आपल्या शैलीच्या दृष्टीने शुद्ध आणि परिपूर्ण प्रशिक्षण घेतात. त्या घराण्याच्या पद्धतीने जसे नृत्य करतात, ते दुसर्या कुठल्याही घराण्यापेक्षा वेगळे असते. पण जेव्हा कलाकार एकत्र येतात, भेटतात तेव्हा "आमच्या कोकणातले पानगे श्रेष्ठ की आमच्या देशावरची पुरणपोळी श्रेष्ठ" अशा फालतू फरकांमध्ये आडकत नसावेत. एकमेकांत वेगळ्याच तर्हेने प्रकटणारे जगन्मायेचे दशावतार कौतुकाने पूजत असावेत.
(मी स्वतः क्वचितच डिस्कोमध्ये उतरतो. तेव्हा बुडणार्याने ओंडका धरून ठेवावा तशी एक-एक सम गच्च धरून राहातो. आणि मग पावलांना ती चुकते म्हणून मुकाट बाहेर पडतो!) पण पोचलेल्या कलाकारांचे पाय, हात, शरिरे मिळून लय आणि तालाचे जे आविष्कार करतात, त्यांनी मी मंत्रमुग्ध होतो. जगाच्या भोवती फेर धरून नाचणार्या या रंगील्या नृत्यगणाने माझ्याच भोवती फेर धरला आहे. आणि मी नकळत जागच्या जागी डुलतो आहे.
"गणराज रंगी नाचतो, नाचतो!"
प्रतिक्रिया
30 Jun 2009 - 12:52 pm | श्रावण मोडक
ही चीज घाईत वाचण्याची नाही. सवडीने वाचून प्रतिसाद नोंदवतो. पण चांगल्या विषयाला हात घातल्याबद्दल धन्यवाद.
30 Jun 2009 - 2:16 pm | विसोबा खेचर
सवडीने वाचून प्रतिसाद नोंदवतो. पण चांगल्या विषयाला हात घातल्याबद्दल धन्यवाद.
हेच म्हणतो..
विषय बरच मोठा आहे. सवडीने लिहितो...
तात्या.
30 Jun 2009 - 2:16 pm | प्रकाश घाटपांडे
परेडच्या वेळी हॅहॅहॅ केल कि आमचा कवटी मास्तर (प्रशिक्षणार्थी सहकार्यांनी पाडलेले नांव) आम्हाला रगडून काढीन अशी धमकी कायम देत असे. वायरलेसवाले स्वतःला जास्ती शाने समजतात काय? तेज चल ला ताल व धीरे चल ला लय चुकली की आमच्या शिक्षणाचा उद्धार करण्याची संधी मास्तर सोडत नसे. ग्राउंडच्या टोकापर्यंत तेज चल करुन शेवटच्या क्षणी पिछे मूड खाली ,एक, दो ,तीन, चार... असे असंख्य वेळी करुन आमचा रगडा तो करीत असे. शिरोमणी परेड (सेरिमोनिय परेड) च्या वेळी धीरे चल च्या वेळी बँड वरील म्युजिक आणी विंग्रजी पिक्चर च्या बॉल डान्स च्या वेळी असलेल्या म्युजिक यात कमालीचे साम्य आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
30 Jun 2009 - 4:14 pm | दिगम्भा
फ्रेड अॅस्टेअर ची अप्रतिम लयकारी येथे दाखविल्याबद्दल धन्यवाद.
खरं तर मला स्वतः थोडेसे भारतीय / शास्त्रीय संगीत सोडल्यास इतर कोणत्याही संगीतात गती नाही.
पण मला तुमचा वसुधैव कुटुंबकम् हा हिंदू दृष्टिकोन आवडतो व कौतुकास्पद वाटतो.
(त्याविरुद्धच्या मुस्लिम दृष्टिकोनाबद्दल लिहायला हात शिवशिवतायत पण जाऊदे - तुमच्या लेखाखाली ते शोभणार नाही)
- दिगम्भा
30 Jun 2009 - 4:19 pm | विसोबा खेचर
(त्याविरुद्धच्या मुस्लिम दृष्टिकोनाबद्दल लिहायला हात शिवशिवतायत पण जाऊदे - तुमच्या लेखाखाली ते शोभणार नाही)
स्वतंत्र लेख लिहावा ही विनंती, वाचायला आवडेल!
तात्या.
30 Jun 2009 - 5:45 pm | कपिल काळे
मुखपृष्ठावरील शीर्षक वाचून हा लेख सामंतकाकांचा असेल असे वाटले होते. पण तो निघाला धनंजयचा.
वेगळ्या विषयावरचे छान लेखन!!
30 Jun 2009 - 6:34 pm | श्रावण मोडक
प्रतिक्रिया देत नाही, कारण लेख उत्तम यापलीकडे काहीही प्रतिक्रिया उमटली नाही. त्याचे एक कारण आहे. ताल, ठेका यात मी मुळातच अज्ञानी.
काही वर्षांपूर्वी सातपुड्याच्या पहिल्या पुड्याच्या (महाराष्ट्रात) पायथ्याशी गेलो होतो. होळी होती. रात्री नृत्य स्पर्धा होती. ढोलांची स्पर्धा होती. तेव्हा ताल, ठेका असाच मनात घुसला होता. त्यावेळी तिथल्या काही वयोवृद्धांशी चर्चा केली होती. चर्चा म्हणजे त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न. या तालाची, ठेक्याची प्रेरणा काय? माझा प्रश्न त्यांना उमजला नाही. त्यांच्या भाषेत तो मांडण्याची माझी पात्रताच नव्हती. कारण, त्या नाचात असलेला ठेका, स्पंदनं यांनीच मोहवला गेलो होतो. त्यानंतर तो प्रयत्न पुन्हा केलाच नाही. पण धनंजय, तुझ्या या लेखाने पुन्हा तो विषय जागा केला. आता निघालो आहे तिकडेच. यावेळी पाहू काही उत्तर मिळते का? उत्तर म्हणण्यापेक्षा माझ्या आकलनात काही भर पडते का पाहू.
1 Jul 2009 - 12:46 am | अन्वय
लय आणि ताल या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
तात्या, हे बरोबर आहे का?
समजवा आम्हाला बुवा.
1 Jul 2009 - 12:49 am | विसोबा खेचर
तात्या, हे बरोबर आहे का?
बरोबर..!
ताल हे लयीचं मीटर आहे. ठराविक मात्रांमध्ये, वजनामध्ये लयीला जो बांधतो तो ताल!
तात्या.
1 Jul 2009 - 7:43 am | सहज
लेख नक्की काय सांगतो कळले नाही (सर्व धर्म सारखे सोडून) पण वेगवेगळ्या फिती बघायला मजा आली.
तासनतास एक से बढकर एक नृत्य करु शकणार्या कलाकारांबद्दल आदर आहेच.
>मग पावलांना ती चुकते म्हणून मुकाट बाहेर पडतो
हे गाणे पाहून/ऐकून सरावाने नृत्य जमावे :-)
1 Jul 2009 - 10:26 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यासेठच्या व्यासंगाला, त्याच्यातल्या त्या अभ्यासकाला आपला बॉ नमस्कार आहे. नृत्याच्या चित्रफिती पाहिल्या, त्यातील बारकावेही पाहिले. पण समजून घ्यायला जडच जात आहे, तरी पुन्हा-पुन्हा वाचून विषय समजून घेत आहे.
-दिलीप बिरुटे