असेच भेटत राहू आता पत्रांमधुनी
सुखदु:खाच्या सांगत गाथा पत्रांमधुनी
"फुले मिळाली?" विचारले, अन् पुढे म्हणालिस,
"फुलांसवे जर गंधहि जाता पत्रांमधुनी!"
वळवाची सर जशी झरावी तसे भेटलो
जालावरती येता जाता पत्रांमधुनी
खुळ्यासारखे रुसवे-फुगवे, भांडण-तंटे,
नको उगाळू त्या कटु वार्ता पत्रांमधुनी
मनावेगळ्या मनात जपलेले क्षण हळवे
कधी फिरुन येतिल का हाता पत्रांमधुनी?
हळूच भिजल्या पापण्यांतला चंद्र हासला,
पुन्हा तुझे प्रतिबिंब पहाता पत्रांमधुनी
तुला वाचले, तुला जाणले, भरुन पावले!
चित्र नको, तू ये ना आता पत्रांमधुनी!
अवांतर :-या गझलचं सगळं श्रेय चुचुताईला!
प्रतिक्रिया
30 May 2009 - 6:43 pm | निशिगंध
सुरेख गजल....
खुप आवडली...
30 May 2009 - 6:48 pm | मीनल
इंदिरा संतांची ही सुरेख कविता वाचली. ती इथे देत आहे.
विषय `पत्र`च आहे. आपल्याला आवडेल असे वाटते.
शिर्षक :पत्र लिही पण
पत्र लिही पण नको पाठवू
शाईमधुनी काजळ गहिरे
लिपीरेषांच्या जाळीमधुनी
नको पाठवू हसू लाजरे
चढण लाडकी भुवयीमधली
नको पाठवू वेलांटीतून
नको पाठवू तिळ गालीचा
पूर्णविरामाच्या बिंदूतून
नको पाठवू अक्षरातुनी
शब्दामधले अधिरे स्पंदन
कागदातुनी नको पाठवू
स्पर्शामधला कंप विलक्षण
नको पाठवू वीज सुवासिक
उलगडणारी घडीघडीतून
नको पाठवू असे कितीदा
सांगितले मी: तू हट्टी पण...
पाठविसी ते सगळे सगळे
पहिल्या ओळीमध्येच मिळते
पत्र पुढचे त्यानंतर पण
वाचायाचे राहून जाते
-इंदिरा संत ('रंगबावरी')
मीनल.
30 May 2009 - 6:56 pm | श्रावण मोडक
प्रयत्न.
केसु, चतुरंग वगैरे मंडळींनो - गात्रांमधुनी?
30 May 2009 - 6:58 pm | पाषाणभेद
"फुलांसवे जर गंधहि जाता पत्रांमधुनी!"
अवांतरः आजकाल सुगंधी पत्रे मिळतात व जाणकार त्याचा उपयोग पण करतात.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
30 May 2009 - 9:43 pm | चन्द्रशेखर गोखले
नेहमीप्रमाणे अप्रतिम कविता! मीनलताईनी इंदिरा संताची दिलेली कविताही खूप अवडली . आपल्या या कवितेवरून मीनलला इंदिरा संतांची कविता आठवली यातच आपली कविता कशी आहे ते कळतं !!
30 May 2009 - 10:03 pm | अनामिक
सुंदर गझल!
मीनलताईंनी दिलेली इंदिरा संतांची कविताही सुरेख!!
-अनामिक
30 May 2009 - 10:10 pm | पोलिसकाका_जयहिन्द
तुमची कविता खूप आवडली.
इंदिरा संताची कविताही अप्रतिम....
"Why to worry and have wrinkles when you can smile and have dimples."
My blog .... just to spread smiles...
http://ulta-pulta-jokes.blogspot.com/
30 May 2009 - 11:25 pm | प्राजु
अप्रतिम गझल..!!
इतकी लयबद्ध आणि हळूवार गझल आहे ही..! क्या बात है!
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
31 May 2009 - 7:55 am | विसोबा खेचर
नेहमीप्रमाणेच क्लासिक..!
तात्या.
31 May 2009 - 11:38 am | सायली पानसे
+१
मस्त!
31 May 2009 - 12:01 pm | मदनबाण
हळूच भिजल्या पापण्यांतला चंद्र हासला,
पुन्हा तुझे प्रतिबिंब पहाता पत्रांमधुनी
मस्तच...
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
31 May 2009 - 12:19 pm | जयवी
अहा...क्या बात है रे.....!! पत्रांमधून बरीच काही देवाण घेवाण होतेय ;) लगे रहो :)