दुसऱ्या दिवशी पाच वाजता आम्ही उठलो तेव्हा आम्हाला कळलं की आपण उगाच लवकर उठलो आहोत. सगळेजण डाराडूर झोपले असताना आम्ही फुकटच एक तास लवकर उठलो. खरं तर सहा वाजता उठायचं होतं. मग आम्ही मिळालेला तास तरी का सोडावा? लगेच झोपून गेलो. तो एकदम सव्वा सहा वाजता जागे झालो. तेव्हा आम्हा सगळ्यांना आमच्यातल्याच दोघा मित्रांनी उठवलं. आदल्या रात्री आमच्यातला एकजण पत्ते खेळायच्या आधीच झोपला होता. तोच आम्ही अजुनही बिछान्यावर रेंगाळत पडलेला पाहिला. जेव्हा सगळेजण 'फ्रेश' होऊन आलो, तेव्हाही त्याने फक्त दात घासून कप़डे बदलले होते. मी त्याला विचारलं, ""अरे फ्रेश होऊन आलास का?'' तर म्हणाला, ""मी पावणे सहा वाजताच फ्रेश झालो. आणि परत येऊन झोपलो.''
त्या दिवशी टीम बिल्डींग ऍक्टिविटीझ होत्या. प्लॅंक वॉक, टायटॅनिक, स्पायडर वेब, ट्रस्ट फॉल, आणि ब्लाइंडफोल्ड ट्रेक. मी आणि माझ्या ग्रुपने सगळ्यातच गटांगळ्या खाल्या. एकूण चार ग्रुपमधील आमचा ग्रुप सगळ्यांत बेकार होता. आणि त्या ग्रुपचा मी लिडर म्हटल्यावर सगळ्यांनी माझ्यावरच ताशेरे ओढले. प्रत्येक ग्रुपला कशाना कशात तरी एक्सिलेंट मिळाले. पण आम्ही आपले प्रत्येकात ऍवरेज, प्लॅंक वॉक मध्ये तर बिलो ऍवरेज. मला अगदीच मेल्याहून मेल्यासारखं झालं. पण त्याच वेळी आम्हा सर्वांच्या एक गोष्ट लक्षात आली, की भले आम्ही डोकं न लावता सगळे उपद्व्याप (ऍक्टिविटीझ)केले, तरी आमच्याच ग्रुपने सगळ्यात जास्त मजा केली.
प्लॅंक वॉक च्या वेळी आम्ही सगळ्यात जास्त वेळा पडण्याचा रेकॉर्ड केला. टायटॅनिक च्या वेळी (दोन दगडांवर एक ओंडका ठेवून त्यावर सात जणांनी कमीत कमी दहा सेकंदासाठी उभे राहायचे, जमीनीवर कोणताही अवयव लागता कामा नाही.) आम्ही तीन सेकंद तरी नीट उभे राहिलो असलो तर शप्पथ. वास्तविक आमच्या ग्रुपमध्ये जाडा एकच होता. तरी आम्हाला जमलं नाही.
ट्रस्ट फॉल म्हणजे ग्रुपमधील इतरांनी कापड ताणून धरायचे आणि एकाने पाय न वाकवता त्या कापडावर पडायचे. मी हा फॉल तीन वेळा केला. पण मला एकदाही पाय ताठ ठेवता आला नाही. आमच्यातल्या जाड्यालाही जमलं, ते मला जमलं नाही. पण मी ते लगेच विसरलो. असं पडायचा प्रयत्न घरी मी हजारदा केला आहे. पण एकदाही मला तो जमला नाही. स्पायडर वेब हा ट्रस्ट फॉलनंतरचा पहिला चांगला जमलेला उपद्व्याप. मी बारीक असल्याने दोन दोऱ्यांच्या मधनं जाणं मला कठीण नव्हतं. एका मित्राला तर आम्ही उचलून दोरीमधून दुसऱ्या बाजूला दिला. पण तरीही आम्हाला चांगला शेरा दिला नाही. ब्लाइंड ट्रेकला मी आंधळा झालो होतो. मला एका मुक्याने वाट दाखवायची असा त्या ब्लाइंड ट्रेकचा नियम. म्हणजे काय, तर तोंड बंद ठेवून डोळ्यावर पट्टी बांधण्याऱ्याला कुठे उतार, चढ, दगड, झाडी आहे, ते सुचवायचे. माझा माझ्या मुक्या सहकाऱ्यावर बिलकुल विश्वास नव्हता. म्हणून मी त्याला धरूनच चालू लागलो. मी धडपडलो, तर तो गाढव फिदीफिदी हसायचा. त्याची आंधळा होण्याची आणि माझी मुका होण्याची पाळी आली, तेव्हा मला त्याला ढकलून द्यावेसेच वाटत होते. बेफिकीरपणे कोणत्याही झाडीत घुसायचा. आम्ही ठरवलेल्या खाणाखुणा तो कधीच विसरून गेला होता. शेवटी एकदाचा तो छोटासा 'ट्रेक' संपला.
दिवसाच्या सुरुवातीला ज्यांनी मला न विचारता माझं नाव लीडर पदासाठी घेतलं होतं, ते आता लीडर बदलायच्या गोष्टी करु लागले, तेही माझ्या तोंडासमोर. तू आमची वाट लावलीस, असं बिनधास्त बोलत होते. मी काहीही उत्तर दिलं नाही. आम्हाला विश्रांतीसाठी वेळ दिला होता तेव्हा मी टेबलटेनिस खेळायला गेलो. तिथे तिघे चौघे जण होते. वास्तविक टेबल टेनिसबद्दल मी अडाणीच. पण तिथे हजर असलेले रथी महारथी माझ्याहून अधिक पंक्चर झालेले होते. तेव्हा मीच जिंकायला लागलो.
संध्याकाळी आम्हाला नैनीताल दाखवायला बाहेर आणलं. एक जागा ठरविली, आणि दोन तासांनी तिथे भेटायचं ठरलं. आम्हाला आधीच सांगण्यात आलं होतं, की इतक्यात शॉपिंग करू नका. शेवटच्या दिवशी तुम्हाला तीन तास देऊ, त्या वेळेत हवं ते घ्या. त्यामुळे मी पाकिट हॉटेलवरच ठेवून फिरायला निघालो होतो.
नैनीताल शहर तसं बघायला गेलं तर स्वच्छ आहे. त्यामुळे यांच्यातलेच लोक मुंबईला येऊन घाण करतात, की ती घाण मराठमोळीच असते, असा प्रश्न पडतो. तिथे शाळांच्या वेळा काही वेगळ्याच असतात. एप्रिलचा पहिला पंधरावडा उलटला होता, तरीही शाळा कॉलेजातील मुलं दिसत होती.
आम्ही नैनी तलावात चांगलं तासभर बोटिंग केलं. तलावात कृत्रिम शुद्धीकारक जागोजागी बसवलेले होते. त्यामुळे पाणी तसं शुद्धच होतं. तरीही लोकांनी फेकलेला कचरा, झाडांच्या सुकलेल्या पाना-फांद्यांचा गाळ, यांनी तलावात उपस्थिती लावलेलीच होती. बोटिंग नंतर आम्ही माल रोड (किंवा असंच काहीतरी नाव आहे) ला फिरायला गेलो. तिथे पार टोकापर्यंत जाऊ नका, परतायला उशीर होईल, असे सांगितलेले असतानाही आम्ही पुढेपुढे चाललो होतो. रस्त्यात कोल्ड्रिंक आणि आईसक्रीमवर आम्ही ताव मारला. परत आल्यावर आमच्यापैकी अनेकांना भरमसाठ सर्दी झाली होती. एकजण तर परतल्या परतल्या झोपायलाच गेला.
त्या दिवशी रात्री साडे नऊ पर्यंत आम्हाला स्लाईड शो दाखवण्यात आले. स्नाऊट ऍडवेन्चर्स आणि युथ हॉस्टेलच्या विविध ट्रेक आणि गिर्यारोहणाच्या वेळी केलेली फोटोग्राफी दाखवण्यात आली. सुरुवातीला मजा वाटली, पण नंतर सगळेच जांभया देऊ लागले. मलासुद्धा कंटाळा आला होता, पण त्याच दिवशी बेकार लिडरशीपवरून मी कितीतरी टोमणे ऐकले होते, त्यामुळे मी हा स्लाईड शो लक्षपूर्वक पाहिला. त्या रात्री आम्ही बाहेरच्या एका बाकावर टोमॅटो सूप पित गप्पा मारत बसलो होतो. थोड्या वेळाने आम्हाला आमच्या डॉर्मिटरींमध्ये पिटाळण्यात आले. सर्वजण दिवसभरातील ऍक्टिविटीझमुळे थकलेले होते, म्हणून लवकर झोपायला गेले. पण आमचा ग्रुप, ज्यांनी कोणतीच ऍक्टिविटी नीट केली नव्हती, तो थकलाच नव्हता. इतर ग्रुपमधील काहीजणांना आम्ही जबरदस्तीने पत्ते खेळायला लावले. थोड्या वेळाने तेही थकवा विसरून खेळायला लागले. निशाद फणसे नावाच्या मित्राने आम्हांला पत्त्यांतला जजमेंट हा खेळ शिकवला. एक प्रकारचा जुगारच तो. पण नाहीतरी पत्ते म्हटले की जुगार हा आलाच. तेव्हा आम्ही जजमेंट खेळलो. त्या खेळात मला काही विशेष मजा नाही आली, कारण त्यात मी एखाद-दुसरा डावच जिंकलो असेन. थोड्या वेळाने परत एक सर आले, आणि त्यांनी आम्हाला झोपायला सांगितले. अशा प्रकारे नैनीतालमधील आमची दुसरी रात्रही संपली.
प्रतिक्रिया
14 May 2009 - 4:21 pm | विसोबा खेचर
बहोत बढीया..!
आपला,
(डलहौसी प्रेमी) तात्या.
14 May 2009 - 8:19 pm | संदीप चित्रे
दोन्ही भाग वाचले...
नैनिताल पाहण्याचा योग्य अजून आला नाहीये !
तुम्ही कुठल्या ट्रेकबरोबर वगैरे गेला होतात का?
14 May 2009 - 9:01 pm | प्राजु
दोन्ही भाग आवडले.
खूप छान. फोटोही मस्त आहेत.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
15 May 2009 - 7:31 am | सहज
हेच म्हणतो.
15 May 2009 - 7:14 am | अवलिया
वा ! सुरेख !!!!
--अवलिया
15 May 2009 - 7:31 pm | लिखाळ
दोन्ही भाग वचले.. छान आहेत.. आवडले..
पु ले शु
-- लिखाळ.
15 May 2009 - 7:57 pm | सँडी
खुपच छान!
एकदा अवश्य भेट देईल!
15 May 2009 - 8:18 pm | हेरंब
नैनिताल फारच सुंदर आहे. तिथे जायला सोईचा मार्ग म्हणजे जुन्या दिल्ली स्टेशन वरुन रात्रीच्या गाडीने 'काठगोदाम' या शेवटच्या स्टेशनला जावे. तिथून खाजगी टॅक्सीने नैनिताल फक्त ३६ किमी. आहे. उत्तरांचल च्या या भागात आणखीही बघण्यासारखे बरेच आहे. पिठोरागड, मुन्शिआरी, कसौनी, रानीखेत ही गांवे फारच सुरेख आहेत. तिथून मग 'जिम कॉर्बेट' पार्क ला जाऊन परत नैनितालला येऊन खाली यावे व काठगोदाम वरुन दिल्लीमार्गे परत यावे. 'जिम कॉर्बेट' ला आत रहाण्यासाठी दिल्लीहून परवानगी लागते. ती उत्तरांचलच्या कुठल्याही टुरिस्ट ऑफिस मधे मिळते. तसे जर आत राहिले अणि हत्तीची राईड भल्या पहाटे घेतली तरच वाघाचे दर्शन होते.
15 May 2009 - 8:44 pm | प्रमोद देव
प्रवासवर्णन आणि छायाचित्रं...दोन्ही मस्त आहे.
येऊ द्या अजून.
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!