रसग्रहण : सुन्या सुन्या मैफलीत माझ्या.

अनंता's picture
अनंता in जनातलं, मनातलं
5 May 2009 - 11:42 am

नमस्कार!
चांगले, समृद्ध करणारे, ऐकावे असे काही! मध्ये सुन्या - सुन्या मैफिलीत माझ्या ...ऐकण्याचा योग आला. वाचून अगदीच राहवेना.
गाणं ऐकून कधी समाधी लागली तेच कळलं नाही! सुरेश भटांची सुरेख शब्दरचना, पं. हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत, स्मिता पाटीलचा जिवंत अभिनय आणि दीदींच्या सुरांचे नक्षीदार कोंदण! केवळ अप्रतिम.हजार ऑस्कर एका पारड्यात नि हे गीत एका पारड्यात! समाजातील उपेक्षीतांसाठी झटणार्‍यांच्या वैयक्तीक आयुष्यात जेव्हा वादळ उठते,
तेव्हाच्या मनोवस्थेचं वर्णन भटसाहेबांनी अचूक पकडलेय. पहा.

सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या, तुझेच मी गीत गात आहे,
अजूनही वाटते मला की अजूनही चांदरात आहे.

उगीच स्वप्नात सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू?
दिलेस का प्रेम तू कुणाला तुझेच जे अंतरात आहे?

कळे न पाहशी कुणाला? कळे न हा चेहरा कुणाचा?
पुन्हा पुन्हा भास होत आहे, तुझे हसू आरश्यात आहे!

उगीच देऊ नकोस हाका, कुणी इथे थांबणार नाही,
गडे, पुन्हा दुरचा प्रवास कुठेतरी दूर जात आहे!

सख्या तुला भेटतील माझे, तुझ्या घरी सूर ओळखीचे,
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे!


एकीकडे प्रगल्भ सामाजिक जाणीवा आणि जात्याच बंडखोरपणा यांचं वारं पिऊन, प्रवाहाविरुद्ध मार्गक्रमण करणारी नायिका- स्मिता पाटील. अंतर्बाह्य कोलमडून पडते, जेव्हा स्वत:चं लेकरू तिच्या आईपणाचा दर्जा हिरावून घेते. यातून येते एक प्रकारची उद्विग्नता. मनाला भूतकाळात रमवणे हाच एकमेव उपाय. आठवणींचा स्मृतीपट अल्बमच्या रुपाने उलगडला जातो. आयुष्य तरी किती वळणावळणाचं? स्मृतिपट निदान उलट फिरवता तरी करता येतो. आयुष्याचं काय? वास्तवाचे कालचक्र कुणाला उलट फिरवता आलंय म्हणा! कुटूंबाबरोबरचे साठवलेले चार क्षण आठवून स्वत:शीच कसंनुसं हसते. अर्थात तिथे असतंच कोण तिच्याशिवाय? आपला निर्णय चुकलाय याची तिला आताशा पुसटशी जाणीव होऊ घातलीय. सुखाने ओतप्रोत भरलेल्या संसाराला - नव्हे एका सजलेल्या मैफिलीला आपण मुकलोय याची कल्पना आहे. मात्र बंडखोर व अहंकारग्रस्त मन काही बधत नाही.
दुसरीकडे, अभिनयाच्या आघाडीवर, मानसिक द्वंद्वाचं स्मिता पाटीलने नितांतसुंदर अभिनय-दर्शन घडवले आहे. स्वत: निवडलेल्या मार्गावरून चालताना लागलेल्या खाचखळग्यांना, काट्याकुट्यांना तोंड देण्याशिवाय तिच्या हाती तरी काय होते म्हणा! आणि त्यासाठी दोष तरी कुणाला देणार? गतकाळाच्या आठवणीत रमणे इतकेच हाती उरते. सशक्त कथानक , सुरेश भटांचे अर्थवाही शब्द, सोबतीला पं.हृदयनाथांची भावस्पर्शी चाल आणि लतादिदींचा काळीज चिरणारा स्वर. गाण्याचा शेवट होताना स्मिता पाटीलचे पाण्याने भरलेले डोळे काही केल्या पिच्छा सोडत नाहीत!! हे पाणी भरले डोळे पाहून ज्याच्या डोळ्याच्या कडा पाणावत नाहीत , तो माणूसच नव्हे!!! एकदोन मोडणारे संसार या गाण्याने नक्कीच सांधले असणार, निदान माझा तरी तसा ठाम विश्वास आहे!!!

गझलप्रकटनआस्वादसमीक्षाविरंगुळा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

5 May 2009 - 11:46 am | विसोबा खेचर

हजार ऑस्कर एका पारड्यात नि हे गीत एका पारड्यात!

लाख रुपये की बात!

अनंता, सुरेखच रसग्रहण केलं आहेस रे! जियो...!

तात्या.

परिकथेतील राजकुमार's picture

5 May 2009 - 12:07 pm | परिकथेतील राजकुमार

असेच म्हणतो.
जियो ... गाण्या येव्हडेच अप्रतिम रसग्रहण.

प. रा. रेहमान
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

अवलिया's picture

5 May 2009 - 1:04 pm | अवलिया

हेच म्हणतो

--अवलिया

अश्विनि३३७९'s picture

5 May 2009 - 11:58 am | अश्विनि३३७९

वाचतनाच अंगावर काटा आला ...

दशानन's picture

5 May 2009 - 12:02 pm | दशानन

स्मिता पाटीलचे पाण्याने भरलेले डोळे काही केल्या पिच्छा सोडत नाहीत!!

१००% सहमत.

थोडेसं नवीन !

नंदन's picture

5 May 2009 - 12:08 pm | नंदन

हे गाणं अप्रतिम आहे, यात काही वादच नाही. लताबाईंच्या अनेक इतर गाण्यांसारखंच हे (सामान्य श्रोत्यांना) ऐकायला सोपं वाटतं, पण इतर कुणी गायचा प्रयत्न केला की किती अवघड काम आहे याची थोडी तरी कल्पना येते. भटसाहेबांच्या शब्दसामर्थ्याबद्दल काय बोलावं? शेवटच्या ओळींत अंगणी उभा असलेला स्वरांचा अबोल पारिजात त्यांच्याच एका दुसर्‍या कवितेतील या ओळींची याद दिलवून जातो -

मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मनिष's picture

5 May 2009 - 1:39 pm | मनिष

मस्त लिहिले आहेस!! भट साहेबांना सलाम...हा सिनेमा राहूनच गेला बघायचा! :(

अवांतर - नंदन, तू काय, काय आणि किती वाचतोस रे? अख्ख्या लायब्ररीचे रेफरन्स सेक्शन तुझ्या डोक्यात भरले आहेत का अशी रास्त शंका येते बर्‍याच वेळा! :)

नंदन's picture

5 May 2009 - 2:13 pm | नंदन
सहज's picture

5 May 2009 - 12:14 pm | सहज

सुंदर गाणे, चांगला चित्रपट, उत्तम रसग्रहण.

प्रमोद देव's picture

5 May 2009 - 12:20 pm | प्रमोद देव

सुंदर रसग्रहण!

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

स्वाती दिनेश's picture

5 May 2009 - 12:37 pm | स्वाती दिनेश

रसग्रहण आवडलेच,
परत एकदा चित्रपट पहावाच लागणार आता, त्याशिवाय चैन पडणार नाही आणि सिनेमा पाहून अजून बेचैनी येईल ती निराळीच..
स्वाती

धनंजय's picture

5 May 2009 - 9:48 pm | धनंजय

रसग्रहण छानच आहे, आणि आता चित्रपट पाहावा लागणार.

पाषाणभेद's picture

5 May 2009 - 1:36 pm | पाषाणभेद

"सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या, तुझेच मी गीत गात आहे,"
हेच माझ्या अगदी आवडीचे गीत आहे.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

प्रशु's picture

5 May 2009 - 2:06 pm | प्रशु

सुरेश भट अप्रतिम

दिपक's picture

5 May 2009 - 2:34 pm | दिपक

सुंदर रसग्रहण ! खुप आवडले :)

गाणे अप्रतिम.. गाण्याचा प्रेमात पडावे अशी शब्दरचना.. लतादिदींच्या रेशमी आवाजात जेव्हा हे गाणे "सुन्या-सुन्या.." ह्या शब्दांने सुरु होतात तेव्हा अंगावर शहारा येतो..

उमेश__'s picture

5 May 2009 - 4:15 pm | उमेश__

या गाण्यासाठी कितीही मोठी प्रतिक्रिया दिली तरी कमीच...........

शुभान्कर's picture

5 May 2009 - 7:03 pm | शुभान्कर

अप्रतिम कविता.. सुरेख चाल .. स्वर्गीय सूर ..

प्राजु's picture

5 May 2009 - 7:40 pm | प्राजु

खूपच सुंदर रसग्रहण.

सख्या तुला भेटतील माझे, तुझ्या घरी सूर ओळखीचे,
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे!

या ओळी ऐकताना तर अंगावर काटा येतो.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

क्रान्ति's picture

5 May 2009 - 7:57 pm | क्रान्ति

रसग्रहण खूप आवडले. शब्द, संगीत, गीताची पार्श्वभूमी, स्मिताचा अभिनय कोण अधिक सरस आहे ठरवणं कठीण आहे! काळजाला हात घालणारं गाणं आहे, जेवढं ऐकेल तेवढं कमीच!

क्रान्ति
{तापलो रामराया!}
अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो!
www.mauntujhe.blogspot.com

मुक्तसुनीत's picture

5 May 2009 - 8:32 pm | मुक्तसुनीत

मूळ लेखातल्या , वरच्या सर्व प्रतिक्रियातल्या भावनांशी सहमत.

काही गोष्टी आपल्या आरपार गेलेल्या असतात. या गाण्याचे शब्द , त्यांचा अर्थ , ते शब्द लिहिणारा कुणी वेडा फकीर , गाण्याची चाल ,ती चाल लावणारा अवलिया , त्यातील पार्श्वसंगीत , गाणारा आवाज, गाण्याचे चित्रिकरण, त्या चित्रपटातला गाण्याचा संदर्भ , तो चित्रपट, ती भूमिका , ती अभिनेत्री, तिचे चटका लावून जाणारे निघून जाणे ...आणि हे सगळे एका गाण्यामुळे आठवणारा, त्यामुळे एकच वेळी आनंदणारा आणि व्याकूळ होणारा मी.

काही ठिकाणी शब्द उपरे होतात. एक ठिकाण म्हणजे हे गाणे.

स्वामि's picture

5 May 2009 - 9:12 pm | स्वामि

फक्त या गाण्यासाठी तब्बल तीनशे रुपये मोजून उंबरठ्याची सी.डी.घेतली.

चतुरंग's picture

5 May 2009 - 10:05 pm | चतुरंग

अतिशय उत्तम रसग्रहण केलं आहेत अनंतराव! धन्यवाद.
स्मिता पाटिलचा अभिनय म्हणजे मंत्रमुग्ध करणारा असाच आहे. दीदींच्या आवाजाबद्दल काय बोलावे? हे तो देवाचे देणे!
आणि सुरेश भटांच्या प्रतिभेला तर स्वर्गातल्या पारिजाताची फुलं आली आहेत!

(मला असे वाटते (चूभूदेघे) की ह्याच गाण्याबद्दल हृदयनाथांनी सुरेश भटांची एक आठवण सांगितली होती. ह्या सिनेमाच्या गीतलेखनासाठी भट साहेबांना पाचारण झाले. भटांसारख्या मुक्त आणि बंडखोर कवीला सिनेमातल्या प्रसंगाबरहुकूम गाणे लिहिणे जमेना. त्यांच्या स्वभावाच्या विरुद्ध हा प्रकार होता. तुम्ही कृपया गाणी दुसर्‍या कोणाकडून लिहून घ्या असे सांगत त्यांनी निर्मात्याचा निरोप घेतला आणि निघतो म्हणाले. खोलीमधून हॉटेलच्या स्वागतिकेत आल्यावर अचानक ते थांबले स्वागतकक्षातल्या टेबलावरचा एक कागद घेतला आणि बसल्या बैठकीला एकटाकी हे गाणे लिहून दिले! इतके जबरदस्त शब्दसामर्थ्य बघून तिथल्यातिथे त्यांना एक लाखाचा धनादेश सुपूर्त केला गेला. तेव्हा मी माझी प्रतिभा विकणार नाही हे गाणं तुम्हाला माझ्यातर्फे भेट आहे असं म्हणून भटसाहेब तिथून गेले!)

चतुरंग

मुक्तसुनीत's picture

5 May 2009 - 10:18 pm | मुक्तसुनीत

चतुरंग , किस्सा लई भारी.
मी याच गाण्याबद्दल वर्षा भोसले यांच्या लिखाणात वाचलेला किस्सा : हे गाणे लिहून आले आणि चाल लावायची होती. हवी तशी चाल लागेना. त्या सुमारासच बातमी आली होती की एलिझाबेथ टेलर चा पुन्हा एकदा डिव्होर्स झाला आहे. भोसलेबाई असे लिहितात की , टेलरबाईंच्या संदर्भातल्या बातमीचा काहीतरी निराळाच अर्थ हृदयनाथांना गवसल्यासारखा वाटला. त्यानंतर अचानक चाल लावण्याचा संदर्भात "ब्रेक थ्रू" मिळावा तसे झाले.

दोन्ही किस्सेच. आणि दोन्ही शक्य कोटीतलेच वाटत आहेत.

बेसनलाडू's picture

5 May 2009 - 10:33 pm | बेसनलाडू

वरील चतुरंगांनी सांगितलेल्या आठवणीत एक छोटीशी सुधारणा. हे गाणे 'उंबरठा' चित्रपटासाठी लिहिण्यासाठी नव्हे, तर जयश्री गडकर-बाळ धुरी निर्मित-दिग्दर्शित एका चित्रपटासाठी लिहिण्यासाठी भट साहेब आले होते. ते ज्या हॉटेलात उतरले होते तेथील खोलीचे भाडे (त्या काळी) दिवसा रु. १०० की असेच काहीतरी होते. बर्‍याच दिवसांनंतरही गाणे तयार होत नसल्याने हृदयनाथ, जयश्रीताई, बाळादादा या त्रयींची अस्वस्थता वाढू लागली होती; त्यात हॉटेलचा खर्च होताच. अशा सगळ्या परिस्थितीतही शेवटी हे गाणे भटांनी परतीची गाडी पकडण्यासाठी निघताना टॅक्सीत बसून एका बैठकीत/एकटाकी लिहिले. पुढे हा चित्रपट सपशेल बारगळला आणि गाणे 'उंबरठा' मध्ये घेतले गेले.
ही आठवण खुद्द एच्च. मंगेशकरांनी नुकत्याच पार पडलेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनात 'भावसरगम' कार्यक्रमादरम्यान सांगितली. सुदैवाने तेथे उपस्थित असल्याने ऐकायला मिळाली; नि आज या लेखनाच्या निमित्ताने टंकायला. तपशिलातील चू. भू. द्या. घ्या.
(स्मरणशील)बेसनलाडू

श्रावण मोडक's picture

5 May 2009 - 11:48 pm | श्रावण मोडक

हा किस्सा आत्ता 'झीमराठी'वर सारेगमपमध्ये सांगून झाला. अमृता गायली हे गाणं. मूळ घटनेच्या तपशीलानुसार बेला म्हणतात त्याप्रमाणे हे गाणं जयश्री गडकरांच्या चित्रपटासाठी लिहिलं गेलं. त्यासाठी भट मुंबईत आले होते. हॉटेलचं भाडं ५०० रुपये दिवसा. गीतकाराचं एका गीताचं मानधन २००० रुपये. भटांचा आठेक दिवसांचा मुक्काम झाला तरी गाणं झालं नाही. पण निघतांना काऊंटरवरून (बिलाचा) कागद घेऊन त्याच्या पाठीमागे एकटाकी गाणं लिहिलं. ते पाहून बाळ धुरींनी पंधरा हजाराचा चेक भटांना दिला. मी माझी प्रतिभा विकत नसतो, असं सांगून भटांनी तो परत केला. गाण्यातील "पुन्हा पुन्हा भास होत आहे, तुझे हसू आरश्यात आहे" ही ओळ 'उंबरठा'तील प्रसंगानुसार बदलण्यात आली. हा बदल सुचवला शांताबाई शेळक्यांनी.
हॉटेलचे बिल भरण्यासंबंधात हृदयनाथांनी केलेले वर्णन मात्र बापच. बाळ धुरी हॉटेलचे बिल भरणार होते, तेव्हा भटांनी त्यांना थांबवले. 'मी इथे राहिलो आहे. हे माझे मित्र आहेत ते भरतील,' असे काहीसे भटांनी हृदयनाथांचा निर्देश करीत सांगितले. हृदयनाथांसोबत अरूण दाते होते. हृदयनाथ म्हणाले, 'हे तुमचे मित्रही आहेत सोबत. आम्ही दोघे भरतो.' नंतर भटांनी पंधरा हजाराचा चेक परत केला तेव्हा आम्हाला वाईट वाटले, असेही मिश्कीलपणे हृदयनाथ सांगून गेले.

बेसनलाडू's picture

6 May 2009 - 12:00 am | बेसनलाडू

तपशिलांत इकडचे-तिकडचे फरक (हृदयनाथांच्या आठवणींबरहुकूम!) असले तरी एकंदर किस्सा मात्र जोरदारच आहे.
(प्रभावित)बेसनलाडू

श्रावण मोडक's picture

6 May 2009 - 12:20 am | श्रावण मोडक

किस्सा जोरदारच. शंकाच नाही. कलांच्या प्रांतातली उंच मंडळी ही सगळी. पूर्ण सहमत तुमच्याशी. असे काही ऐकायला मिळेल याचसाठी हा कार्यक्रम पाहतो.
ज्ञानेश्वरांची विराणी ही माहितीसाठ्यातच भर होती. आजवर हा प्रकार ठाऊक नव्हता. ज्ञानेश्वरांची नाममुद्रा, त्या विराणीचे निरुपण... या माणसाची व्याप्ती तशी गवसत नाही पटकन.

दि ग्रेट आदेश बांदेकरा नी होममिनीस्टर मध्ये एका वहिनींना विचारल तुमच आवडत गाण कुठल?
वहिनी म्हणाल्या... सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या.
बांदेकरांचा वहीनी बद्द्लचा आदर प्रचंड वाढ्ला.. काहो वहीनी हेच गाण का?
वहिनी उत्तरल्या त्यात मझ्या मिस्टरांच नाव आहे.. सुन्या.. सुन्या.
बांदेकराची बोलती बंद.

मुक्तसुनीत's picture

6 May 2009 - 8:21 pm | मुक्तसुनीत

अगायायायायायायायायाया !
सुरेश भट/स्मिता पाटील यांचे आत्मे तळमळले असतील ! लईच्च भारी किस्सा ! =))

हर्षद बर्वे's picture

6 May 2009 - 12:11 am | हर्षद बर्वे

मोडक साहेब...अगदी बरोबर...मी सुद्धा आत्ता सारेगमप मधेच हा किस्सा ऐकला...
तरी पण...

मुळच्या गाण्यात "पुन्हा पुन्हा भास होत आहे, कुणीतरी आरश्यात आहे"
असे होते....शांताबाई शेळक्यांनी तुझे हसू असे शब्द सुचवले..

एच.बी.

अनंता's picture

6 May 2009 - 12:14 am | अनंता

अजून एक दुवा, देवकी पंडित यांच्या आवाजात!
http://www.youtube.com/watch?v=2k7thJxDDr4

आपण केलेलं रसग्रहणं आवडलं पण पुर्णतः पटलं नाही.

आपण केलेली काही विधानं उदा.
"आपला निर्णय चुकलाय याची तिला आताशा पुसटशी जाणीव होऊ घातलीय. " " मात्र बंडखोर व अहंकारग्रस्त मन काही बधत नाही."
"एकदोन मोडणारे संसार या गाण्याने नक्कीच सांधले असणार"
मला खटकली. म्हणून ह्या गाण्याविषयी इथे माझे काही विचार माडांवेसे वाटतात.

हे गाणं माझ्याही फार आवडीचं आहे. पण त्याचा मला लागलेला अर्थ बराचसा वेगळा आहे आणि इतरांना तो तसा लागेलचं असं नाही, ह्याचीही मला पूर्ण जाणिव आहे.

माझ्यामते, एका स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या स्त्रीने आपल्या प्रियकरा/नवर्‍याविषयी व्यक्त केलेली प्रेमभावना ह्या गाण्यात दिसून येते. त्यात विरह भावना नक्कीच आहे पण पश्चाताप आहे, असं मला वाटत नाही. मुळात आपला निर्णय चुकलाय असं तिला का वाटावं? चित्रपटाच्या संदर्भात पहायचं, तर हे गाणं येतं ते नायिकेची आपल्या नवर्‍याविषयीची ओढ दाखवताना. ती बंडखोर असेल पण अहंकारग्रस्त का वाटावी?

गाण्याच्या ,
"उगीच देऊ नकोस हाका, कुणी इथे थांबणार नाही,
गडे, पुन्हा दुरचा प्रवास कुठेतरी दूर जात आहे!"
ह्या ओळींमधून ती स्वतंत्र आहे आणि आपलं स्वत्व शोधते आहे, हेच इथे अधोरेखीत होतं. ती आपलं स्वतंत्र अस्तित्व व्यक्त करते, पण ह्यात तीचा अहंकार कुठे दिसतो?

तसचं,
"सख्या तुला भेटतील माझे, तुझ्या घरी सूर ओळखीचे,
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे!"
ह्या ओळींमधून ती त्याच्यावरचं आपलं अव्यक्त प्रेमचं व्यक्त करते.

बाकी सुरेश भटांच्या लेखणीतून उतरलेल्या अनेक अजरामर गाण्यांपैकी ह्या एका गाण्याबद्दल लिहावे तेव्हढं थोडचं आहे!

मला वाटतं की हा चित्रपट ज्या काळात आला, त्यावेळी आजच्यापेक्षा फार वेगळी परिस्थिती होती . त्यावेळी, कुटूंबाला सोडून आपल्या 'करियर' ला महत्व देणार्‍या स्त्रियांच्या वाटेला येणार्‍या अडचणींविषयी समाजाला जाणीवही नव्हती. या चित्रपटात हाताळलेल्या निराधार स्त्रियांच्या प्रश्णांविषयी तर आजही परिस्थिती फारशी वेगळी नाही. पण तो आपल्या लेखाचा विषय नसल्याने इथेच थांबतो.

मुशाफिर.

विकास's picture

6 May 2009 - 2:13 am | विकास

सर्वप्रथम अनंतांनी केलेले रसग्रहण चांगले आहे मात्र मलादेखील मुशाफिर यांनी म्हणल्याप्रमाणे अर्थ वेगळा वाटतो.

उंबरठा हा चित्रपट आला त्या नंतरच्या काळात एकदा स्मीता पाटील एका मुलाखतीत या अर्थाचे म्हणाली होती, "सुलभा महाजन (नायिका) ही कुठल्या अवस्थेतून जात आहे अथवा तीची नक्की भुमिका काय आहे हे कळायला अजून वीस वर्षांनंतरची पिढी यावी लागेल." थोडक्यात चित्रपटाचा विषय हा काळाच्या बराच पुढे धावणारा होता असे तीला म्हणायचे होते.

हे गाणे शेवटी परत दाखवताना, तीला कोणी घराबाहेर काढले नसते तर ती स्वतःहून ते मान्य करते. अर्थातच म्हणूनच आपण (अनंताने) म्हणल्या प्रमाणे: "सुखाने ओतप्रोत भरलेल्या संसाराला - नव्हे एका सजलेल्या मैफिलीला आपण मुकलोय याची कल्पना आहे. मात्र बंडखोर व अहंकारग्रस्त मन काही बधत नाही." फक्त त्यात अहंकारापेक्षा बंडखोर आणि स्वतःचे आदर्श/तत्व वगैरे (मुशाफिर यांनी म्हणलेल्या निव्वळ करीयरच्या ओढीपेक्षा थोडे वेगळे) असलेला स्वभाव कारणीभूत असतो असे मला वाटते.

तिची अपेक्षा असते की मी जशी आहे तसा माझ्या सख्याने (नवर्‍याने) स्विकार करावा. म्हणूनच शेवटी, "दिलेस का प्रेम तू कुणाला, तुझ्याच जे अंतरात आहे" हे शब्द चपखल बसतात.

अवांतरः जे आता लिहीत आहे ती खरी घटना नाही, निव्वळ कल्पना विलास, दोन्ही चित्रपटांचे विषय आणि त्यातील कॅरेक्टर्स पूर्ण भिन्न आहेत याची मला कल्पना आहे :-)

सुरेश भटांचे गीत, हृदयनाथचे संगीत, ज्यात विरह, प्रेम, आर्तता, कुठेतरी गतकाळातील सुखाच्या आता बोचर्‍या झालेल्या आठवणी असलेले सुरेल गाणे आपल्याला गायला मिळाले नाही म्हणून आशाताईंना वाईट वाटले. त्यांचा हा खट्टूपणा दूर करण्यासाठी म्हणून की काय, गुलझारचे शब्द आणि आरडी बर्मनचे संगीत असलेले इजाजत मधील असेच सुरेल गाणे आशाताईंना गायला मिळाले आणि त्यावर बक्षिस ही मिळाले - मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है....

मुशाफिर's picture

6 May 2009 - 8:19 pm | मुशाफिर

>>फक्त त्यात अहंकारापेक्षा बंडखोर आणि स्वतःचे आदर्श/तत्व वगैरे (मुशाफिर यांनी म्हणलेल्या निव्वळ करीयरच्या ओढीपेक्षा थोडे वेगळे) असलेला स्वभाव कारणीभूत असतो असे मला वाटते.

सहमत आहे. मलाही तीला फक्त निव्वळ करीयरची ओढ आहे, असं म्हणायचं नाही. 'करियर' विषयीचे वाक्य एका विशीष्ट संदर्भात आले आहे. म्हणूनच पुढे "ती स्वतंत्र आहे आणि आपलं स्वत्व शोधते आहे, हेच इथे अधोरेखीत होतं. ती आपलं स्वतंत्र अस्तित्व व्यक्त करते, पण ह्यात तीचा अहंकार कुठे दिसतो?" हेही मी म्हटलं आहे.

>>तिची अपेक्षा असते की मी जशी आहे तसा माझ्या सख्याने (नवर्‍याने) स्विकार करावा. म्हणूनच शेवटी, "दिलेस का प्रेम तू कुणाला, तुझ्याच जे अंतरात आहे" हे शब्द चपखल बसतात.

पूर्णतः मान्य!

मुशाफिर.

अनंता's picture

6 May 2009 - 12:37 am | अनंता

प्रत्येकाला कुठलं काव्य कशा पद्धतीनं गवसेल , काही सांगता येणार नाही. मते-मतांतरे असायचीच!
मात्र इथे 'ती' करिअरसाठी नव्हे तर समाजसेवा करण्यासाठी घराचा उंबरठा ओलांडते आहे.कुणाचंही न ऐकणारी नायिका, लेकराने झिडकारलेली माता
आताशा अंतर्बाह्य कोलमडते. आपला निर्णय चूक की बरोबर हे ठरवण्याचे भान तिने निदान या क्षणी तरी गमावल्याचे दिसते. यातून काही सन्मानजनक तोडगा
निघेल या वेड्या आशेवर तिची भिस्त आहे!

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन असतात ;)

>>प्रत्येकाला कुठलं काव्य कशा पद्धतीनं गवसेल , काही सांगता येणार नाही. मते-मतांतरे असायचीच!

एकदम मान्य!

>>मात्र इथे 'ती' करिअरसाठी नव्हे तर समाजसेवा करण्यासाठी घराचा उंबरठा ओलांडते आहे

ती समाजविज्ञान शाखेची पदवीधर असते, आणि सासूंने चालवलेल्या ट्र्स्ट/संस्थेसाठी काम करण्याऐवजी स्वतंत्र कार्य करू पाहाते, म्हणजे स्वतंत्र 'करियर' नव्हे काय?

हे गाणं तीच्या अंतर्बाह्य कोलमडण्यापेक्षा, तीला जाणवणारा विरह व्यक्त करते, हे माझं मत आहे.

बाकी, आपल्यात मतांतरे असू शकतात ह्यावर आपलं एकमत असल्याने अजुन काय लिहू? :)

मुशाफिर.

जागु's picture

6 May 2009 - 1:18 pm | जागु

कविता अप्रतिम आहेच. तुम्ही रसग्रहणही खुप सुंदर केले आहे.

प्रदीप's picture

6 May 2009 - 1:33 pm | प्रदीप

अनंता ह्यांचे रसग्रहण सुंदर आहेच. तसेच त्यानिमीत्ताने झालेली चर्चा, त्यावरील प्रतिक्रियाही आवडल्या.

आता माझा थोडा विसंवादी सूरः

ह्या गाण्यात सगळेच विलोभनीय आहे-- त्यातील जब्बारांनी केलेले (माझ्या मते) कल्पनाशून्य चित्रण सोडून. खूप वेळ नुसते स्लो- मो मध्ये नायिका, नायक व त्यांचे मूल दाखवले आहे. चांगले गीत डोळे मिटून (अथवा त्याचे चित्रीकरण न पहाता) कधीकधी बघायचे असते ते ह्यासाठीच!

विकास's picture

6 May 2009 - 4:40 pm | विकास

>>>त्यातील जब्बारांनी केलेले (माझ्या मते) कल्पनाशून्य चित्रण सोडून.

एकदम अचूक निरीक्षण! पटले!

तिमा's picture

6 May 2009 - 7:36 pm | तिमा

स्लो मोशन मधे गिरीश कर्नाड आणि स्मिताला फिल्मी स्टाईल ने धावायला लावून या गाण्याची उंची चित्रपटात कमी झाली आहे.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

भडकमकर मास्तर's picture

7 May 2009 - 12:19 am | भडकमकर मास्तर

चला , आता या निमित्ताने जब्बार मुळातच तसा सुमार दिग्दर्शक अशी चर्चा करायला घेऊयात... =))
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

विकास's picture

7 May 2009 - 6:48 am | विकास

चला , आता या निमित्ताने जब्बार मुळातच तसा सुमार दिग्दर्शक अशी चर्चा करायला घेऊयात...

तसे असते (जब्बार सुमार असते) तर हे दृश्य खटकले नसते.

विकास's picture

7 May 2009 - 6:48 am | विकास

चला , आता या निमित्ताने जब्बार मुळातच तसा सुमार दिग्दर्शक अशी चर्चा करायला घेऊयात...

तसे असते (जब्बार सुमार असते) तर हे दृश्य खटकले नसते.

मराठी_माणूस's picture

7 May 2009 - 8:11 am | मराठी_माणूस

तसे असते (जब्बार सुमार असते) तर हे दृश्य खटकले नसते.

प्रतिसाद आवडला

मनीषा's picture

6 May 2009 - 4:45 pm | मनीषा

आणि रसग्रहण सुंदर ..
एखाद्या गाण्याचे, कवितेचे अनेक अर्थ होउ शकतात. उदा.
ती येते आणिक जाते ... येताना कधी कळ्या आणिते ...
हे गाणे ऐकताना श्रोत्यांना हे गाणे कवीने प्रेयसीला उद्देशून लिहिले असावे असे वाट्ते
पण प्रत्यक्षात कवीने ते आपल्या काव्य्-प्रतिभेला उद्देशून लिहिले आहे .

चित्रा's picture

7 May 2009 - 2:31 am | चित्रा

आठवण करून दिल्याबद्दल आभार..
पण रसग्रहण पटले नाही. गाण्याचे चित्रीकरण इथे पहा.
http://www.youtube.com/watch?v=erwswClblgY&feature=related

फोटोंमध्ये मुलीला बघून झाल्यावर डोळ्यात पाणी आलेले आहे. ते पश्चात्तापाचे नाही, तर मुलीचे सुख हरवल्याचे वाटले.
त्यातील सर्व तपशील आता आठवत नाहीत, नाहीतर चित्रपटाचेच परिक्षण केले असते.. !

रसग्रहण आवडले आणि इतक्या सुंदर गाण्याची पुन्हा एकदा आठवण करून दिल्याबद्दल अनेक आभार...
एकच अगदी छोटा खडा -
कळे न पाहशी कुणाला? कळे न हा चेहरा कुणाचा?

हे बहुधा गाण्यात असं आहे -
कळे न मी पाहते कुणाला? कळे न हा चेहरा कुणाचा?

बाकी उत्तमच..