मिलपिटास येथील चटपटीत कट्टा - वृत्तांत

धनंजय's picture
धनंजय in जनातलं, मनातलं
1 May 2009 - 1:04 am

गेल्या आठवड्यात उत्तर कॅलिफोर्नियामध्ये जाण्याचा योग आला. निघण्याआधी मी "मिसळप्रेमी तितुका मेळवावा" वचनाला अनुसरून चौकशी सुरू केली. आणि सान-होसे बे-एरिया भागातील लोकांनी त्याचवेळी कट्टा आयोजित केला.

पहिला खुलासा : सनीव्हेल-सानहोसे म्हणजे अगदी नारायणपेठ-नवसह्याद्री आहे असे म्हणतात, ते खोटे आहे. खडूसपणाची खूणही खरवडून खरवडून सापडली नाही. त्यामुळे लोकहो, सदाशिव पेठेतले घर सोडून इथे येण्याचा विचार खोडा. त्रास होईल. चार पैसे जास्त लागले, तरी आपले कोथरूडच बरे.
दुसरा खुलासा : पुढील चित्रांमध्ये "चित" होऊन चेष्टा करणारे सर्व प्रौढ लोक आहेत. फळांचा रस घेऊन शहाण्यासारखी वागणारी ती लहान मुले. उगाच घोटाळा व्हायला नको.
तिसरा खुलासा : स्पॉयलर अलर्ट. या नाटकातली नायिका वारुणी आणि नायक पडला चाट (चित्रात मिरच्यांनी चाटची जागा घेतली आहे). त्या दोघांचेही बाकीच्या पात्रांनी शेवटी नामोनिशाण ठेवले नाही, म्हणजे ही शोकांतिका आहे.

- - -

कट्टा संध्याकाळी ५-६ वाजेस्तोवर सुरू झाला. बबलू यांनी घर सजवून ठेवले होते. कोणी ऐरेगैरे येऊ नयेत म्हणून कॉलनीच्या फाटकापाशी संकेताक्षर टंकावे लागते. ते संकेताक्षर मला (ऐरागैरा असल्यामुळे) माहीत नव्हते. स्टियरिंग-चक्रधर बेसनलाडू यांचे कुशल सारथ्य होते म्हणून बरे. संकेताक्षराविना आम्ही शिताफीने आत घुसलो. महाराजांच्या गडांवरती हे असे चालले नसते. मावळ तो मावळ मिलपिटास तो मिलपिटास.

पाहुणे असे कोणी नव्हतेच - सगळेच मिसळपाव-घरचे मित्रलोक. तरी बबलू अतिशय लक्षपूर्वक अतिथ्य करत होते. या चित्रात त्यांच्या पेल्यात साक्षात टेकीलाचा सूर्य उगवतो आहे, पण त्यांचे डोळे वर "सगळ्यांचे ठीक चालू आहे ना?" असे भिरभिरत आहेत.

हा सूर्योदय कसा अनुभवायचा ते नाटक्या यांनी आपल्याला सांगितलेच आहे (दुवा). इथे त्यांचा सढळ हात दिसतो आहे.

नंतर भेळ आली. बेसनलाडू यांचे लक्ष हातातल्या भेळेकडे नव्हते (उणे ५ गुण) पण कॉकटेल बनवण्याच्या कृतीकडे होते (+५ गुण) :

आतावर ज्या ओळखी झाल्या होत्या त्या तुम्ही-कुठचे-आम्ही-कुठचे अशा गोग्गोड. काहीतरी झणझणीत आणि कडक असल्याशिवाय तिखटामिठाच्या ओळखी होणार नाहीत, असे श्री. व सौ. नाटक्या यांना माहीत होते. म्हणून "हॉट टेकीला" हा प्रकार बनवला गेला.

लिंबाचा रस, टेकीला आणि मिरच्या! ग्लासचा मुका घेतला तर आधी जिभेला लागते ते मीठ आणि लाल तिखट.

त्यातही सांगायचे म्हणजे सौ. नाटक्यांचे कॉकटेलांबद्दल ज्ञान भरपूर असले, तरी त्यांची आवड मॉकटेलांचीच. त्यामुळे सर्वांच्या डोळ्यांसमोर रंगमंच फिरता असला तरी सौ. नाटक्या यांचे सूत्रसंचालन तल्लखपणे चालू होते.

त्यांच्यासह जो हासरा स्त्रीवृंद होता त्यांच्यापैकी येथे दिसतात सौ. अमोल, सायली आणि दिपाली पाटील.

दिपाली पाटील यांच्या वडापावाच्या दणदणीत लोकप्रियतेमुळे, कॅमेरा आणेपर्यंत पाव हातोहात गायब होत होते, म्हणून येथे पावांच्या पाकृचाच दुवा घ्या. पाणीपुर्‍या भरताच तोंडात जातात, म्हणून त्यांचा फोटो नाही. रगडा पॅटिसचा फोटो का नाही, याबद्दल सुद्धा काहीतरी सबब होती, पण मी ती विसरलो आहे.

नंतर रंगीत ओळखीचा कार्यक्रम झाला. म्हणजे नाव-गाव नव्हे तर छंद-फंद. प्रत्येक जण ओळख सांगत होते, आणि मग श्री किंवा सौ. नाटक्या त्यांची मिष्किल "छुपी" ओळख करून देत होते.

श्री. नाटक्या यांची मिष्किल ओळख त्यांच्या चिरंजीवाने करून दिली. चि.(क्र२) नाटक्या यांच्या शर्टावर "जसा बाप, तसा लेक" असे लिहिले होते. खेटरांनी आरती कशी ओवाळावी त्याचे प्रात्यक्षिक ते दाखवत आहेत. श्री. नाटक्या (हिरवा शर्ट) कौतुकाने बघत आहेत, तर श्री. अमोल यांचे लक्ष पुढील चित्रातील चि. अमोल कडे आहे.

चि.अमोल :

श्री अमोल यांच्याहीपेक्षा अधिक गृहकर्तव्यदक्षता श्री. सायली व श्री. दिपाली यांची खासियत आहे. सायली व दिपाली मिसळपाव संकेतस्थळावर जाऊ लागल्यानंतर आता त्यांना घरातले "सगळे-सगळे" करायला जमू लागले आहे. असे सांगताना हे श्रीयुत-द्वय येथे दिसत आहेत :

अधूनमधून "तुमच्या कट्ट्यातले ग्लास रिकामेच फार" अशी कुरकुर दस्तूरखुद्द धनंजय श्री. नाटक्यांपाशी करत होता :

शेवटी ही आग आगीनेच विझवायची असे जाणून श्री नाटक्या यांनी "फायर अँड आइस" नावाच्या कॉकटेलला पेटवूनच दिले :

आता चिंब पेटलेली महफिल काव्य-शास्त्र-विनोदात गुंतत चालली. दिलखुलास विनोद आणि मद्यार्काचे रसायनशास्त्र आधीच होते. त्यात श्री. बेसनलाडू यांनी गझलेच्या आस्वादाबद्दल मुद्देसूद चर्चा सुरू केली. श्री. व सौ. नाटक्या, श्री अमोल यांनी नाटक बसवण्याबद्दल अनुभव सांगितले. संगीतात तर आकर्ण डुंबलेले तिथले बहुतेक लोक होते. (सौ. अमोल यांना गाण्याची फर्माईश पूर्ण करण्यापूर्वी घरी जावे लागले, ही चुटपुट मला लागून आहे.) त्या कानसेनांच्या सभेमध्ये संगीत शिकताना आपल्या झालेल्या पचक्याचा दु:खद किस्सा धनंजयने सुनावला. "रडू नकोस, ही कॉफी पी", असे म्हणत श्री नाटक्या यांनी कॉफीचीच कॉकटेल बनवून धनंजयचे सांत्वन केले.

अशा करुण अनुभवाने कट्ट्याची सांगता होऊ नये, म्हणून बबलू यांनी आपल्या सी.डी.पोतडीतून भैरवीचे दोन अप्रतिम नमुने शोधून काढले, आणि सर्वांना सुनावले, सुखावले.

या जिंदादिल मंडळींचे कट्टे पुन्हा-पुन्हा होत राहाणार आहेत, आपण इथे मात्र या एकाच कट्ट्याला हजेरी देऊ शकणार, हा विचार सर्वांना विदा देताना माझ्या मनात येत राहिला...

प्रवासवावरराहणीबातमीअनुभव

प्रतिक्रिया

टारझन's picture

1 May 2009 - 1:16 am | टारझन

फोटू आणि वृत्तांत ... आवडले ....
मस्त आहे .. आम्हीच अजुन कोणत्या कट्ट्याला उपस्थिती लाऊ शकलेलो नाही!!!

घाटावरचे भट's picture

1 May 2009 - 1:51 am | घाटावरचे भट

झकास वृत्तांत.

धनंजय,
लिहिलेला सचित्र वृत्तांत खुमासदार , मनोरंजक. काहीकाही विनोद, कोपरखळ्या अगदी सुरेखच. सान होजेला जाऊन आलास म्हणजे अमेरिकेतली पंढरी घडली की .
मजा आली वाचताना !

बेसनलाडू's picture

1 May 2009 - 2:05 am | बेसनलाडू

दणदणीत बातमी दिलीत राव! खरेच शनिवारची संध्याकाळ मजेत गेली.
(कट्टेकरी)बेसनलाडू

प्राजु's picture

1 May 2009 - 2:09 am | प्राजु

धनंजय,
कोपरखळ्या, विनोद आणि खुमासदार भाषा, यांनी नटलेला कट्टा वृत्तांत आवडला.
सान होजेचे फोटो आणि तिथले प्रवास वर्णनही येऊद्या पाठोपाठ.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

पिवळा डांबिस's picture

1 May 2009 - 9:01 am | पिवळा डांबिस

कोपरखळ्या, विनोद आणि खुमासदार भाषा, यांनी नटलेला कट्टा वृत्तांत आवडला.
आम्हालाही!!!!

रेवती's picture

1 May 2009 - 4:39 am | रेवती

वरील कट्ट्याला तरंगता कट्टा असे म्हणायला हवे.;)
फोटू व वर्णन छान!

रेवती

चित्रा's picture

1 May 2009 - 7:12 am | चित्रा

चपखल वर्णन, रेवती!
हॉट टकिलासमोर हात टेकायचे बाकी आहेत. बाकी कट्ट्याचे वर्णन खुमासदार.

आणि खडूसपणाच शोधायचा असला तर तो तिथे कशाला, त्यापेक्षा बनीला सफर काढायला सांगा योग्य ठिकाणाची..

बबलु's picture

1 May 2009 - 6:25 am | बबलु

धनंजयशेठ,

सहीच लिहिलाय कट्टा वृत्तांत. कट्टयावरच्या त्या पाणिपुरी/भेळेसारखाच चटपटीत आणि जोरदार !!!

(बाय द वे.... नाटक्याशेठ्च्या "सनराईझ"ची चव अजूनही जिभेवर रेंगाळतेय).

....बबलु

श्रीयुत संतोष जोशी's picture

1 May 2009 - 8:23 am | श्रीयुत संतोष जोशी

कट्टा झक्कासच झालेला दिसतोय.
वृत्तांत पण अगदी खुसखुशीत.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

संदीप चित्रे's picture

1 May 2009 - 8:43 am | संदीप चित्रे

चटपटीत कट्टा आणि तसाच वृत्तांत आवडला.
नाटक्याशेठला इस्ट कोस्टला बोलवायला पाहिजे एकदा साग्रसंगीत कट्ट्यासाठी.

नंदन's picture

1 May 2009 - 8:47 am | नंदन

वृत्तांत आणि फोटो झकास! हॉट टकिला आणि फायर अँड आईस खासच.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

पिवळा डांबिस's picture

1 May 2009 - 8:52 am | पिवळा डांबिस

नंदनरावांशी १००% सहमत....
हॉट टकिला आणि फायर ऍन्ड आईस जबरदस्तच!!!
कट्टावर्णनही जबरदस्त आहे, धनंजयराव!!!
जियो.....

सँडी's picture

1 May 2009 - 2:08 pm | सँडी

वृत्तांत आणि फोटो मस्तच!

हॉट टकिला आणि फायर अँड आईस बद्दल शब्दात सांगणे अवघड! :)

विसोबा खेचर's picture

1 May 2009 - 9:12 am | विसोबा खेचर

धन्याशेठ,

हा सचित्र लेख लिहून आम्हाला जळवायचे तुझे प्रयोजन कळले नाही! :)

असो, धमाल कट्टा! :)

आपण सर्व मंडळी "मिपाधर्म वाढवावा" या श्रीसंत तात्याबांच्या वचनाला जागता आहात हे पाहून आनंदाचे भरते आले! :)

तात्या.

चन्द्रशेखर गोखले's picture

1 May 2009 - 9:23 am | चन्द्रशेखर गोखले

सहमत ..च्यायला यांना जळवायला आपण हि एक फुल्टू कटा भरवू या का पुन्हा..?

चन्द्रशेखर गोखले's picture

1 May 2009 - 9:23 am | चन्द्रशेखर गोखले

सहमत ..च्यायला यांना जळवायला आपण हि एक फुल्टू कटा भरवू या का पुन्हा..?

सहज's picture

1 May 2009 - 9:13 am | सहज

वर्णन, फोटु, द्रव्ये सगळेच भारी!!

मजा आली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 May 2009 - 10:04 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वृत्तांत वर्णन अन् फोटो लै भारी !

-दिलीप बिरुटे

स्वाती दिनेश's picture

1 May 2009 - 11:09 am | स्वाती दिनेश

मस्त वृत्तांत,
कोपरखळ्या, विनोद आणि खुमासदार भाषा, यांनी नटलेला कट्टा वृत्तांत आवडला.
प्राजुसारखेच म्हणते.
स्वाती

परिकथेतील राजकुमार's picture

1 May 2009 - 11:10 am | परिकथेतील राजकुमार

सुंदर सचित्र वृतांत !

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

माधुरी दिक्षित's picture

1 May 2009 - 1:18 pm | माधुरी दिक्षित

सहीच आहे वृतांत !
असा कट्टा पुणेकर मिपा करतात का? :?

या चित्रात त्यांच्या पेल्यात साक्षात टेकीलाचा सूर्य उगवतो आहे,
हे वाक्य मी सुरुवातीला साक्षात सूर्य टेकीला आला आहे...असं वाचलं! ;)

बेलाच्या चेहेर्‍यावरची एकाग्रता बघून नाटक्याच्या हातातला टकीलाचा ग्लास खळ्ळकन फुटणार की काय असे वाटते आहे!
पुढच्या चित्रातली 'हॉट टकीला' म्हणजे खल्लास फोटू आलाय!
'फिरता रंगमंच'ही खासच! :D
कोपरखळ्या, चिमटे यांनी सजलेला वृत्तांत झकास!

(खुद के साथ बातां : रंगा, नाटक्याला एकदा ईस्टकोस्टाला हायजॅक करायला हवे! ;) )

चतुरंग

शितल's picture

1 May 2009 - 6:00 pm | शितल

सुरेख कट्टा वर्णन आणि फोटो ही खास. :)

क्रान्ति's picture

1 May 2009 - 8:00 pm | क्रान्ति

वृत्तांत आणि फोटो लाजवाब!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

नाटक्या's picture

1 May 2009 - 11:46 pm | नाटक्या

धनंजयराव,

छानच खुसखुशीत वर्णन केले आहेत हो. आणि आमची अगदी फाटे पर्यंत (तोंड!!!) स्तुती करण्याची काय गरज हो. बरं एव्हढं लिहून स्वतः बद्दल एक चकार शब्द नाहीत लिहीला.

मंडळी धनंजयरावांमध्ये देखील फार छुपे गुण आहेत बरं का! "माझे संगीत शिक्षण" आणि त्यांचे कवितेचे ज्ञान पाहून आम्हीही अवाक झालो. (आमचा धन्या अगदी पहिल्या पासून अस्साच हुशार हो - इति धन्याची आई, फुकट लोकांची स्तुती करुन चढवण्यात - इति आम्ही).

श्री अमोल यांच्याहीपेक्षा अधिक गृहकर्तव्यदक्षता श्री. सायली व श्री. दिपाली यांची खासियत आहे. सायली व दिपाली मिसळपाव संकेतस्थळावर जाऊ लागल्यानंतर आता त्यांना घरातले "सगळे-सगळे" करायला जमू लागले आहे. असे सांगताना हे श्रीयुत-द्वय येथे दिसत आहेत :

असं आहे होय. मला वाटलं श्री. सायली (का नाही? जर सौ. अमोल/सौ. नाटक्या चालते तर हे का नाही?) हे श्री. दिपालींना सांगतात आहे - या नाटक्याला डाव्या हाताने कानफटात मारली पाहीजे. तुला कॉकटेल दिली माझा ग्लासच देत नाहीए.

संदीप चित्रे: नाटक्याशेठला इस्ट कोस्टला बोलवायला पाहिजे एकदा साग्रसंगीत कट्ट्यासाठी.
चतुरंग: (खुद के साथ बातां : रंगा, नाटक्याला एकदा ईस्टकोस्टाला हायजॅक करायला हवे! )

हे बघा तुम्ही ईस्टकोस्ट वाल्यांनी एकदा काय ते ठरवा सन्मानाने बोलवायचे की पळवून न्यायचे ते (कभी चतुर कभी घोडा? येक को पकडके रक्को). तसा दोन्हींचा मला अनुभव नसल्याने मला कोणाचा तरी एकदा त्या बाबत सल्ला घेता येईल (म्हणजे सन्मानाने बोलावले तर जरा भारदस्त पणे कसे वागायचे आणि पळवून नेले तर काय करायचे वगैरे वगैरे वगैरे). बाकी अंदरकी बात म्हणजे या उन्हाळ्यात आमचा ईस्टकोस्टचा दौरा होण्याची शक्यता आहे.

हे सगळं मी तरंगत्या अवस्थेत लिहील्यामुळे आपणही हलकेच घ्याल.

- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)

एक's picture

2 May 2009 - 12:34 am | एक

दोन्हीही झकास.

आमच्या ज्युनियरने लास्ट वॉर्निंग दिल्याने (ते नेहमीच लास्ट अँड फायनल वॉर्निंग देतात) म्हणून लवकर कटावं लागलं.
त्यामुळे धनंजय चा गाणं शिकायचा किस्सा ऐकायला मिळाला नाही. खूप ऐकायचा होता कारण गाण्याशी रिलेटेड वन-वे ट्रॅफिक (गाणं फक्त कानातून आत जातं.. तोंडातून बाहेर नाही! नाही!! नाही!!!) असणारा कोणीतरी भेटला याचा जाम आनंद झाला होता.
धनंजय ला भेटण्याचा दुसरा आनंद म्हणजे "मेट्रीक्स" आवडू शकेल अशी ही व्यक्ति आहे. मेट्रीक्स चा मित्र तो आमचा मित्र. धनंजय, प्लीज लवकर मेट्रीक्स बघ. पुढच्या कट्ट्याला आपण लोकांना त्यावर एक प्रवचन देवू :)

एक जबरद्स्त संध्याकाळ!
पाव नावाची वस्तू नुसती सुद्धा झकास लागू शकते हे त्या दिवशी कळालं. वडा-पाव च्या बेतात आम्ही आधी पाव खाल्ले आणि सवडीने नंतर वडे खाल्ले.

विसोबा खेचर's picture

2 May 2009 - 1:43 am | विसोबा खेचर

धन्याशेठच्या, नाटक्याच्या, रंगाच्या तसेच मिपावर खरोखरच प्रेम करणार्‍या काही मंडळींच्या सांगण्यावरून वरील धाग्यातील काही प्रतिसाद आता उडवले आहेत व माझाही मूळ प्रतिसाद संपादित केला आहे..

तात्या.

नाटक्या's picture

2 May 2009 - 1:50 am | नाटक्या

मिपाधर्म वाढवावा...

- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)

प्राजु's picture

2 May 2009 - 1:52 am | प्राजु

प्रतिसाद उडवलेत त्याचप्रमाणे मनातला किंतुही उडवून लावावा ही विनंती. :)
जय हो!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

दशानन's picture

2 May 2009 - 1:54 am | दशानन

किंतू-परंतू ला परतून लावा ही विनंती दोघांना पण !

थोडेसं नवीन !

विसोबा खेचर's picture

2 May 2009 - 1:58 am | विसोबा खेचर

प्रतिसाद उडवलेत त्याचप्रमाणे मनातला किंतुही उडवून लावावा ही विनंती.

तेवढं जमणार नाही. च्यामारी, मुंबईच्या फोरासरोडवर दुनियादरी शिकलेल्या तात्याला माणसं बरोब्बर कळतात!

असो, बाकी चालू द्या.

उत्तम वृत्तांत! सर्व मिपाप्रेमी(!) कट्टेकरींचे मनापासून अभिनंदन..

तात्या.