दवाखान्यातल्या दाई, इतर रुग्ण आणि त्यांचे नातलग या सा-यांना नवल वाटत होतं, की या कारणासाठी सुद्धा कुणाला इतका आनंद होऊ शकतो! तिच्या सासर-माहेरची सगळी मंडळी मात्र अगदी आनंदात होती. कारणही तसंच होतं, तिला पहिलंवहिलं कन्यारत्न झालं होतं. तिच्या सासरी माहेरी दोन्हीकडे मुलांच प्रमाण जास्त होतं, मुलगी ही एकटीच! त्यामुळेच अवघ्या दोन दिवसांचं ते इवलंसं गोंडस पिलू खूप कौतुकाचं होतं. त्याच्यासाठी काय करू आणि काय नको अशी चढाओढ सुरू होती सगळ्यांची! तिलाही अगदी जग जिंकल्याचा आनंद झाला होता. दिवसभर सासूबाई आणि रात्री आई दोघी चिमुरडीची काळजी घेत, त्यामुळे तिला निवांत आराम मिळत असे. तशी ती चिमुरडी नुसतीच सुन्दर आणि गोंडस नाही, तर हसरी पण होती. रडणं तर खूप कमी!
जेवण करून लौकरच ती झोपी गेली. आई पण चिमुरडीला थोडा वेळ खेळवून झाल्यावर कुशीत घेऊन झोपली.
"डॉक्ट्..................र................" एक भयानक किंकाळी त्या दवाखान्याच्या भिंती चिरत गेली. पटापट सगळीकडचे दिवे लागले, सगळे खडबडून जागे झाले. पहाट फुटायला थोडाच वेळ होता. धावत पळत डॉक्टर आल्या. काय होतंय, काय चाललंय कुणालाच कळत नव्हतं. ती पण जागी झाली. आई कानोसा घेऊन बाहेर गेली. थोड्या वेळानं आई परत आली. तिनं आईला विचारलं, "काय झालं ग आई? कोण किंचाळत होतं?" " काही नाही ग, रोजचंच काहीतरी चालू रहातं दवाखाना म्हटल्यावर! तू झोप निवांत की उठून बसतेस थोडा वेळ?" आईनं विचारलं, पण काहीतरी टाळलं हे तिच्या लक्षात आलं.
सगळं आवरून दुपारी आई घरी गेली आणि सासूबाई येऊन थांबल्या. तिचं जेवण झालं. चिमुरडी मस्त झोपली होती. सासूबाईंच्या बारशाच्या तयारीबद्दल गप्पा सुरू होत्या. नाव काय ठेवायचं, कुणी काय नावं सुचवली, काय काय आणायचं, याची इत्थंभूत माहिती त्या उत्साहानं देत होत्या, पण तिचं लक्षच नव्हतं. वरवर तर ती हो ल हो करत होती, पण तिच्या डोक्यातून ती किंकाळी अजून गेलीच नव्हती. "झोप आता जरा वेळ. ओल्या बाळंतिणीनं जास्त वेळ नाही बसू." सासूबाई बोलल्या. तिनं पडत्या फळाची आज्ञा प्रमाण मानली. तिला झोपलेली पाहून त्या बाहेर गेल्या.
लादी पुसायला आलेली बाई स्वतःशीच बडबडत होती काही. तिनं विचारलं, "कोण किंचाळत होतं बाई पहाटे? काय झालं?"
"का बोलावं माय आता! कोन मेला मसन्या वानाचा राकूस होता काय ठावं? तीन वर्साचं लेकरू बी ज्याला कमी पडलं!" बरंच काही बडबडत तिनं लादी पुसली आणि बडबडतच ती निघूनही गेली. ती सुन्न! काय घडलं असेल, याचा थोडासा अंदाज तिला येत होता!
"डॉक्ट्..................र................"पुन्हा एक भयानक किंकाळी ! खूप आरडाओरडा, रडारड, गोंधळ. काही समजत नव्हतं. खोलीत ती एकटीच. पिलू झोपलेलं. तिनं खिडकीतून खाली पाहिलं, शववाहिकेत कुणीतरी डोकं बडवत, रडत ओरडत बसलेली, कदाचित त्या मुलीची आई, हतबल आणि मूक झालेले तिचे बाबा असावेत! स्ट्रेचरवरून पांढ-या चादरीखाली झाकलेलं कलेवर! मागे मागे जाणारे सुन्न नातेवाईक असतील कदाचित.
तिला आठवलं तिचं आयुष्य. बालपणापासून आजतागायत आलेले सगळे विचित्र अनुभव भोवती पिंगा घालून नाचायला लागले भुताच्या सावल्यांसारखे. नकळत झाल्यासारखे वाटणारे सहेतुक घाणेरडे स्पर्श, कामूक नजरा, विचित्रशी अनाकलनीय भाषेतली वक्तव्ये, शिकवणीच्या सरांनी काहीतरी केलं म्हणून आत्महत्या करणारी मैत्रिण! स्त्री असण्याचा शाप? नात्यांमध्येही वासनांची वारंवार येणारी प्रत्यंतरं, लग्नानंतर देखिल आपल्या मनाचा विचार न करता हवं तसं हवं तेव्हा हक्कानं लुबाडणारा नवरा! एक व्यक्ती म्हणून विचारात न घेतलं जाता केवळ एक मादी म्हणून झालेली गणना!
"डॉक्ट्..................र................"ही किंकाळी होती तिच्या सासूबाईंची आणि नुकत्याच घरून आलेल्या आईची! धावत धावत डॉक्टर आल्या, सगळा दवाखाना आता तिच्या खोलीपुढे जमा झाला. एक क्षण काहीही न सुचलेल्या डॉक्टरनी तिच्या मांडीवरची उशी उचलली. दोन दिवसांचं गोंडस पिलू निपचित पडलं होतं आपल्या जन्मदात्रीच्या मांडीवर! ती शून्यात पहात गोठलेल्या नजरेनं! तिला गदागदा हलवलं डॉक्टरांनी, अचानक झोपेतून जागी झाल्यासारखी ती बाळाकडे पहात निस्तेज आवाजात बोलली, "डॉक्टर, मी वाचवलं तिला!" आणि ती कोसळली!
प्रतिक्रिया
25 Apr 2009 - 9:35 pm | चकली
छान असे नाहि म्हणू शकत. परिणामकारक आहे. पण मूळ विचार पटला नाही.
चकली
http://chakali.blogspot.com
25 Apr 2009 - 9:57 pm | यशोधरा
हे असं वाचवण्यापेक्षा अश्या जगात हिंमतीने, ताठ मानेनं जगायला सबल बनवून वाचवू शकली असती ना! :(
25 Apr 2009 - 10:05 pm | क्रान्ति
चकलीताई आणि यशोधराताई, मला स्वतःलाही शेवट मनापासून पटला नाहीय, पण जेव्हा वृत्तपत्रात ती बातमी वाचली, त्यावेळी ताबडतोब मनात आलेली ती प्रतिक्रिया होती, जिला मी कथारूप दिलं. मलाही हे पटतं, की आपण अबला व्हायचं की सबला, हे आपल्याच हातात आहे, आणि हा मार्ग पळपुटेपणाचा आहे. त्यामुळे तुम्हा दोघींच्या मताशी मी सहमत आहे, अगदी १००%!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
26 Apr 2009 - 12:09 am | प्राजु
क्रांती..
वाचवणं. ...! हे अशाप्रकारे?? नाही गं पटत.
तिला वाचवायचं तर.. तर ती जन्मतःच तीला "खूब लढी मर्दानी, वो तो झांसी वाली रानी थी.." हे ऐकवणं. तीच गरज आहे .
शेवट सुन्न करून गेला पण आवडला नाही.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
27 Apr 2009 - 11:23 am | विसोबा खेचर
शेवट सुन्न करून गेला पण आवडला नाही.
हेच म्हणू पाहतो..
तात्या.
26 Apr 2009 - 12:54 am | टारझन
अवघड आहे !!! प्रभू बाबा ... एक केस घ्या हो अजुन ;)
हे असं वाचवणं चालू राहिलं तर मलाही एक फिक्शन लेख लिहावा लागेल ... त्यात स्त्रिया ह्या भुतकाळात गेलेल्या असतील @!!
26 Apr 2009 - 8:51 am | विनायक प्रभू
स्त्री मुक्ती चळ्वळीचा विजय असो.
26 Apr 2009 - 11:37 am | मनीषा
ही कथा हे एक वास्तव आहे ... हे बदलायला पाहिजे .
अशा प्रकारे संकटे टाळून "असल्या" वाईट प्रवृत्तींना विरोध करु शकणार्यांची संख्या कमी होईल, नाही का?
मला वाटतं अशा प्रवृत्तींचा विरोध करण्यास आपल्या मुलींना सक्षम बनवणे आणि मुलाला 'असा' होण्यापासून परावृत्त करणे म्हणजेच त्यांना खर्या अर्थाने 'वाचवणे' होइल .
तुमच्या कविते प्रमाणेच हे गद्य लेखनही दर्जेदार आहे . कविते इतकेच कथा आणि इतर गद्य लेखनही तुम्ही प्रभावीपणे करु शकाल असे वाटते .
26 Apr 2009 - 11:53 am | देवदत्त
:S :|
26 Apr 2009 - 12:02 pm | ऋषिकेश
कथानक नेमक्या मर्मावर बोट ठेवतं
सगळ्या प्रतिक्रियांवरून कथानकाने नेमका परिणाम साधलेला दिसतोय.. शेवटी कथा म्हणजे लेखिकेची मते नसून एखादी घटना (मग सत्य असो वा कल्पित / चांगली असे वा वाईट) सशक्तपणे समोर मांडणे. त्यामुळे कथेतील व्यक्तीने "वाचवले" असे म्हणणे हे नागवे सत्य तश्याच उघडपणे लिहिल्याबद्दल लेखिकेचे कौतुक
मला एक कथा म्हणून आवडली. एक परिणामकारक कथा.
ऋषिकेश
26 Apr 2009 - 5:36 pm | संकेतजी कळके
हा पर्याय होउच शकत नाहि..
26 Apr 2009 - 5:45 pm | दशानन
अरे मित्रांनो !
वरिल लेखिकेने एका बातमी वरुन कथा लिहली आहे ;)
तुम्ही सत्य समजून असहमत असहमत करत बसलात तरी काही फायदा नाही, हा पण असे होऊ नये ह्यासाठी तुम्ही काय करु शकता व सरकारवर आपल्या मतअधिकाराचा वापर करुन दबाव आणू शकता का नाही हे पहा !
* सरकार मला अपेक्षित असलेले काम मी १८ वर्षाचा झाल्यापासून करत आहे हे मला कधीच दिसले नाही त्यामुळे मी मतदानावर बहिष्कार टाकला आहे !
माझी अपेक्षीत कामे जी सरकार ने करावयास हवी होतीत त्यामध्ये स्त्री सुरक्षा व शिक्षण हमी ह्या देखील एक मुद्दा आहे.
* ब्लॉग वर मनसे विरुध्द, क्रॉगेस विरुध्द, भाजपा विरुध्द, इतर पक्षाविरुध्द लिहले तर त्याची दखल घेतली जाते आजकाल असे चित्र आहे तर आम्ही मतदान करणार नाही असे लिहले तर कमीत कमी काही पक्ष तरी व्यक्तिगत पातळीवरील हल्ले सोडून मुख्य मुद्द्यावर (देशाच्या भल्यावर) येईल ही आशा.
मी मतदान केले नाही तर सरकार येणार नाही निवडून असे काही नाही पण कमीत कमी मला समाधान भेटेल की मी एक मत वाचवले नालायकांना सत्तेपासून दुर साखण्यासाठी !
थोडेसं नवीन !
26 Apr 2009 - 5:58 pm | यशोधरा
मत फुकट घालवलेत! :(
26 Apr 2009 - 6:03 pm | दशानन
सगळेच चोर
एकावर एक शिरजोर
कुणाला देऊ मत मी
रणभुमीत एकला
अभिमन्यु मी :)
थोडेसं नवीन !
26 Apr 2009 - 6:28 pm | यशोधरा
अभिमन्यूचे व्रत हे खडतर
कर्तव्यावर त्याचा तर भर
नाव तयाचे सांगसी तू जर
कार्यासी कसा ढळला?
:(
माफी :) रागवू नये.
26 Apr 2009 - 5:56 pm | वेताळ
टारझन्याच्या डाग्तर लेखा वरुन परत हे वाचले....पुरा मेलो मी हे वाचुन ,मस्त कथा ,मस्त विचार आवडले आपल्याला.लेखिकेचा विचार पुढे नेला तर सर्व स्त्रीयाना पारतत्र्यांतुन मुक्ती मिळेल.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
26 Apr 2009 - 6:49 pm | शितल
क्रान्ती,
कथा लिहिली छान आहेस.
पण एक आई असे करेल असे मनाला ही पटले नाही.
26 Apr 2009 - 7:10 pm | सुनील
शेवट फारसा पटला नाही पण कथा आवडली.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
26 Apr 2009 - 7:55 pm | प्रदीप
कथा आवडली.
26 Apr 2009 - 10:34 pm | आंबोळी
फर सुन्न क्रुन गेलि क्था. सेवत ब्द्ल्ता येतोक बगा ज्रा.
शेव्त पत्ला नहि.
प्रो.आंबोळी
26 Apr 2009 - 10:49 pm | काळा डॉन
आम्बोल्या तु तुजा कन्द्लिल घेउन दव्क्खानायात ग्लेला नव्ह्तास ना...?
डॉक्ट...........र!
26 Apr 2009 - 11:00 pm | क्रान्ति
कथा वाचून अगदी मनापासून प्रतिसाद देणा-या सर्व मिपाकरांची मी आभारी आहे. कथेचा शेवट बदलणं किंवा न बदलणं फारसं महत्त्वाचं नाही, कारण तो शेवटी काल्पनिकच आहे. पण प्रत्यक्षात शेवट खूप वेगळा होऊ शकतो, हे सगळ्या प्रतिक्रियांवरून कळून येतंय. अजूनही मनं जीवंत असल्याचं ते लक्षण आहे. स्त्रीजातीचं भविष्य उज्वल आहे, असा संकेत त्यातून मिळतोय. धन्यवाद!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
27 Apr 2009 - 5:29 am | नंदन
कथा आवडली. टोनी मॉरिसन या लेखिकेने अशाच एका सत्यघटनेभवती 'बिलव्हेड' ही कादंबरी लिहिली आहे. गुलाम म्हणून आणि एक स्त्री म्हणून जे दुहेरी अत्याचार स्वतःला भोगावे लागले, ते आपल्या मुलीलाही भोगावे लागू नयेत म्हणून तिचा जीव घेणार्या एका कृष्णवर्णीय गुलाम स्त्रीची कहाणी यात आहे. मार्गरेट गार्नर हे त्या स्त्रीचे नाव. जवळपास दोनशे वर्षांनीही अशीच बातमी वाचायला मिळणे हे दुर्दैव.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
27 Apr 2009 - 10:53 am | परिकथेतील राजकुमार
बातमीवरुन फुलवलेली कथा म्हणुन कथा ठिक आहे क्रांतीतै, पण कथा लिहिताना तु त्यात नकी बदल करु शकली असतीस असे वाटते. काव्यातुन आयुष्याचे येव्हडे सुंदर सुंदर रंग समोर आणणारी तु, असा शेवट करशील ही अपेक्षा न्हवती. बाकी कथेचा शेवट हा वादाचा मुद्दा झालेला आहेच त्यामुळे त्यावर जास्ती भाष्य करत नाही. पहिलाच गद्य प्रयत्न आवडला.
खोलगट टिकाकार
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य