माझं खोबार... भाग ८

बिपिन कार्यकर्ते's picture
बिपिन कार्यकर्ते in जनातलं, मनातलं
13 Mar 2009 - 5:11 am

माझं खोबार... भाग १ , ... भाग २ , ... भाग ३ , ... भाग ४ , ... भाग ५ , ... भाग ६ , ... भाग ७ , ... भाग ८

*************

असं सगळं असलं तरी, सौदीतल्या कट्टरपणाबद्दल, विशेषतः अरब मुसलमानांच्या कट्टरपणाबद्दल नुसतं ऐकलंच होतं. एक ते 'देहांत शासन' प्रकरण सोडलं तर तसा धार्मिक कट्टरपणा आणि अतिरेकी वागण्याचा प्रत्यक्ष कधीच त्रास झाला नव्हता.

पण एकदा काय झालं....

*************

मित्रहो, मागच्या भागात मी मला भेटलेल्या काही पाकिस्तानी मित्रांबद्दल लिहिले. अभारतिय मुसलमान व्यक्तींशी इतक्या जवळून आलेला हा पहिलाच संबंध. पण तो तसा संमिश्र असाच अनुभव म्हणावा लागेल. किंबहुना काही तुरळक अपवाद वगळता, बव्हंशी चांगलेच अनुभव आले. पण व्यक्तिशः असे असले तरी, सामाजिक जीवनावर, हिंडण्या फिरण्यावर एक हलकी का होईना पण वेगळी छाप पडलीच होती. मी पुढे काही अनुभव देणार आहे, जे अगदी पूर्णपणे नाही तरी बर्‍याच प्रमाणात प्रातिनिधिक आहेत.

*************

सौदी अरेबिया मधली एक प्रसिद्ध ज्युसचा ब्रँड बनवणारी कंपनी आमची कस्टमर होती. माझे तिथे नेहमी जाणे येणे असे. तिथले सगळेच लोक मला चांगले ओळखायला लागले होते. माझा संबंध तिथे विशेषकरून तिथल्या अकाउंट्स / फायनान्स डिपार्टमेंट मधे येत होता. त्या डिपार्टमेंटला तीन माणसं आणि तिघेही इजिप्शियन (स्थानिक भाषेत 'मसरी', अरबीत इजिप्तला 'एल मिस्र' असे म्हणतात.), त्यामुळे एकंदरीत सगळाच घोळ होता. पूर्ण अरब जगात इजिप्शियन्स हे चक्रम आणि सणकी म्हणून ओळखले जातात. मला या तिघांनी हे अगदी व्यवस्थित पटवून द्यायचे असाच जणू काही चंग बांधलेला होता. ;) कोणतीही गोष्ट धडपणे होऊ देत नव्हते. पण हळू हळू त्यांच्याशी नीट ओळख वाढवून वातावरण जरा सुसह्य केले. एखादी गोष्ट कशी समजावली तर त्यांना समजेल याचा अंदाज आला. त्यांचा मुख्य होता अश्रफ आणि अजून एक होता नासर. (या नासरची भली मोठी दाढी होती. नेहमी मला धार्मिक गप्पा मारायला उद्युक्त करायचा. एकदम कट्टर होता. एक दिवस हा पठ्ठ्या दाढी सफाचट करून आला. कारण विचारलं तर म्हणे स्किन वर रॅश आली. नंतर कळलं की त्याला अमेरिकन व्हिसा साठी अर्ज करायचा होता. दाढी वगैरे असल्याने त्याला वाटले की एखाद वेळेस व्हिसा मिळणार नाही, म्हणून मग धर्म गेला उडत आणि दाढी झाली गायब. ;) ) तिसर्‍याचं नाव विसरलो. हळू हळू चांगली मैत्री झाली त्यांच्याशी. पण धार्मिक बाबतीत जरा कडवटपणा जाणवायचाच. कंपनीचा मुख्य अधिकारी इशफाक नावाचा एक पॅलेस्टिनियन होता. हा म्हणजे धर्मात जे जे करू नका असे सांगितलेले ते सगळे करणारा. दर विकेंडला स्वारी बाहरीनमधे मुक्काम ठोकून असायची. हा साहेब आणि ती मसरी गँग एकदम ३६चा आकडा. मी मध्यममार्गी धोरणाने कोणत्याही भानगडीत न पडता आपले काम कसे उरकेल त्या प्रमाणे रहायचो. इथेच माझा एक भारतिय मुस्लिम सहकारी पण येत असे.

एकदा आम्ही दोघंही तिथे एकदम पोचलो. काही काम चालू होतं. तेवढ्यात दुपारच्या प्रार्थनेची वेळ झाली. अश्रफ एकदम सगळे काम सोडून उभा राहिला. निघाला प्रार्थनेला. माझ्या सहकार्‍याला म्हणाला "चल. आपण प्रार्थना उरकून घेऊ आणि मग पुढचे काम करू." (इस्लामच्या शिकवणुकीप्रमाणे स्वतःच्या प्रार्थनेचं पुण्य, सव्वाब, मिळतंच पण दुसर्‍यांना प्रार्थनेला उद्युक्त केलं तर त्यांच्या पुण्यातला काही हिस्सा पण मिळतो. त्यामुळेच लोक एक दुसर्‍याला ओढत असतात प्रार्थनेची वेळ झाली की.) माझा सहकारी म्हणाला की "तू हो पुढे, मी एवढी चर्चा संपवून आलोच." अश्रफ हातपाय धुवायला गेला. (प्रार्थनेच्या आधी हातपाय धुणे आवश्यक असते. त्याला वदू (उर्दूत वझू) असे म्हणतात.) तो ते करून आला तरी माझा सहकारी माझ्या बरोबर चर्चा करतच होता. त्याला १-२ वेळा आठवण करून अश्रफ गेला. तेवढ्यात नासरने पण तसेच केले. मागे लागून लागून शेवटी तो पण गेला प्रार्थनेला. दोघेही प्रार्थना संपवून परत आले तरी आमची चर्चा चालूच. माझा सहकारी धार्मिक असला तरी एखादी चर्चा किंवा काम अर्धवट टाकून प्रार्थना करणे वगैरे त्याला चूक वाटायचे. जरा वेळाने हे दोघं परत आले आणि आमचे बोलणे चालूच आहे हे पाहून, अश्रफला वाटले की मीच त्याला प्रार्थनेला जाण्यापासून रोखतो आहे. माझ्या सहकार्‍याला तो मोठ्या दिमाखात म्हणाला, "हे बघ, हा देश आपला आहे. इथे तुला एखाद्या काफिराचे म्हणणे ऐकायची अजिबात गरज नाही. आधी प्रार्थना करून ये." हे ऐकून मी आणि माझा सहकारी काही क्षण अक्षरशः सुन्नच झालो. माझ्या बाबतीत असे पहिल्यांदाच घडले होते. पण मी त्यातून सावरायच्या आधीच माझा सहकारी एकदम उसळून त्याच्या अंगावर ओरडला, "गप्प बस. काहीही बरळू नकोस. प्रार्थना कधी करायची, करायची की नाही ही, मी आणि अल्ला, आमच्या मधली खाजगी बाब आहे. त्यात तुला दखल द्यायची काहीही गरज नाही. आणि माझ्या मित्राला असं काही बोलशील परत तर याद राख. वाट लावून ठेवेन तुझी. तू अतिशय उद्धटपणे बोलून त्याचा अपमान केला आहेस, आधी क्षमा माग."

हा सगळा प्रकार अक्षरशः काही सेकंदात घडला. मी भानावर यायच्या आत माझ्या मित्राने अक्षरशः त्याच्या नावाने शंख करायला सुरूवात केली. ४-५ लोक गोळा झाले. प्रकरण वाढलं आणि इशफाकसाहेब त्यांच्या केबिनमधून बाहेर आले. त्यांना अंदाज आला आणि तिथल्या तिथे त्यांनी स्वत: कंपनीच्या वतीने माझी माफी मागून प्रकरण मिटवले. आता अपमान करणारे मुसलमान, माझ्या बाजूने भांडणारा मुसलमानच आणि माझी माफी मागणारा पण मुसलमानच (तो सुद्धा अभारतिय) आणि मी 'काफिर'. किती फरक वागण्यात!!!

असाच अजून एक प्रसंग मला आठवतोय. माझ्या बाबतीत नाही घडलेला, पण एका चांगल्या स्नेह्यांच्या बाबतीत घडला होता. हे एक मराठी गृहस्थ, खोबारच्या (धाहरान) विमानतळावर एअर इंडियाचे एअरपोर्ट मॅनेजर म्हणून काम करत होते. खोबारला बदलून आले होते. त्यांचा एक सहायक होता, अजय म्हणून. पोरगा दिल्लीकडचा. एकदा एअर इंडियाचं विमान आलं होतं ते सुटायला काही तरी तांत्रिक कारणाने उशिर होत होता. माझे स्नेही तेव्हा नेमके दुसरीकडे होते. त्यांच्या खालोखाल म्हणून अजय सगळी धावपळ करत होता. त्या गडबडीत तो सुरक्षापरवाना गळ्यात घालायला विसरला. तसाच तो टर्मिनल बिल्डिंगच्या बाहेर पडला टारमॅकच्या दिशेने जायला. मोजून ४ पावलं गेला नसेल तर त्याला तिथल्या रक्षकाने अडवले. परवाना गळ्यात नाही म्हणून. हा म्हणाला परवाना आहेच, मी परत माझ्या केबिनमधे जाऊन परवाना घेऊन येतो. पण त्या रक्षकाने त्याला सरळ अटकच केली. हा हातापाया पडत राहिला की अरे अटक करायची तर खुशाल करा, हे एवढं फ्लाईट जाऊ दे. पण काही उपयोग झाला नाही. बाकीच्या स्टाफने हे माझ्या स्नेह्यांना कळवले. ते तातडीने आले आणि त्यांनी परिस्थिती सांभाळली. अजयला पण सोडवले. पण त्यांनी त्या रक्षकाविरूद्ध त्याने काही असभ्य भाषा वापरली म्हणून तक्रार केली. एअरपोर्टच्या मोठ्या साहेबाकडे प्रकरण गेले. सुनावणीच्या वेळी त्याने त्या रक्षकाला विचारले की काय काय घडले. त्याने सोयिस्कर कथन केले. मग अजयने त्याचे म्हणणे मांडले. पण शेवटी, "एका काफिराच्या सांगण्यावर विश्वास ठेवून एका मुसलमानाला शिक्षा करता येणार नाही" असा निवाडा होऊन त्या रक्षकाला 'बाइज्जत बरी' करण्यात आले. माझे स्नेही अक्षरशः संतापाने लाल झाले होते मला हा प्रसंग सांगताना पण.

पण असे प्रसंग आणि अनुभव घडणे नविन नसले तरी तितकेसे सर्रास पण नसे हेही नमूद केले पाहिजे.

सौदी अरेबियाची अजून एक खास पैदास म्हणजे 'मुतव्वा'. हे प्रकरण इस्लामी धर्मशास्त्राशी संबंधित असलं तरी आख्ख्या मुस्लिम जगात फक्त सौदी अरेबियातच बघायला मिळतं. आपण खोबार भाग २ मधे बघितलंच आहे की राजसत्ता (अब्द्'अल अझिझ) आणि धर्मसत्ता (शेख अब्द्-अल वहाब) अरबस्तानाच्या एकीकरणासाठी एकत्र आल्या होत्या. त्यातच सत्तेची वाटणी झाली होती. त्याचंच प्रत्यक्ष रूप म्हणजे मुतव्वा. या वाटणी प्रमाणे एक धर्ममार्तंडांची समिती स्थापन झाली. तिचे इंग्रजी नाव 'कमिटी फॉर द प्रपोगेशन ऑफ व्हर्च्यू अँड प्रिव्हेंशन ऑफ व्हाइस'. इतकं जबरदस्त नाव असलेल्या कमिटीचे धंदे पण एकदम जबरदस्तच. या समितीचे सदस्य हे काही विशिष्ट धार्मिक अभ्यासक्रम पूर्ण केलेले असतात. त्यांना व्यवस्थित पगार मिळतो. त्यांना पोलिसांसारखे काही अधिकार असतात. कुठेही इस्लाम विरूद्ध वर्तन होताना आढळलं तर त्या व्यक्तींवर तात्काळ आणि कडक कारवाई करायची त्यांना मुभा असते. कायद्या प्रमाणे त्यांच्या बरोबर एक पोलिस असणं बंधनकारक असलं तरी बहुतकरून तसं दिसत नाही. त्यांना कोणालाही अडवून कागदपत्र वगैरे तपासायचे अधिकार बहुधा नसावेत पण हाही नियम धाब्यावर बसवला जातो. याचं कारण म्हणजे त्यांच्या बद्दल असलेली आपल्यासारख्या सामान्य बाहेरच्यांना वाटणारी भिती. एखादा मुतव्वा समोर आला कीच अर्धं अवसान गळतं. इतकी त्यांची दहशत. त्यामुळे आजूबाजूला असे कोणी दिसले की लोक निमूटपणे रस्ता बदलून जातात.

हे मुतव्वा लोक साध्याच कपड्यात असतात. पण त्यांना ओळखणं अगदी सोप्पं असतं. त्यांचा गाऊन बर्‍यापैकी आखूड असतो. डोक्यावर रिंग नसते. आणि ती परिचित खूण.... भली मोठ्ठी दाढी... इंग्रजीत अनट्रिम्ड म्हणतात तशी. सहसा त्यांच्या हातात छडी असते. साधारण पणे २-२ च्या जोडीत फिरतात. नजर भिरभिरती. अजून एक खूण म्हणजे भली मोठ्ठी काळ्या काचा असलेली 'जीएमसी' गाडी. हातातली छडी खूप बोलते. विशेषतः प्रार्थनेची वेळ झाली, अजान झाली की सगळ्यांना प्रार्थनेला जाणे भाग पाडायला ही छडी एकदम पटाईत आहे. अश्या वेळी तुम्ही मुसलमान नसाल आणि तुम्हाला एखादा मुतव्वा प्रार्थेनला जायची सक्ती करतो तेव्हा तर प्रसंग फारच गंभीर होतो. आपण सांगावं की मी मुसलमान नाही आणि तो अतिशय आश्चर्याने तुमच्याकडे एखादा विचित्र प्राणी बघावा तसं बघून अगदी स्वाभाविकपणे विचारतो, "का?" !!! आता का काय? काय सांगणार, कप्पाळ? पण नाही, मग तिथेच भर रस्त्यात ऊन्हातान्हात इस्लाम वरचे एक अगम्य प्रवचन ऐकायला मिळते. आपण आपला भार एकदा या पायावर एकदा त्या पायावर टाकत निमूटपणे ऐकत राहणे एवढेच करू शकतो. म्हणली तर गंभीर म्हणली तर विनोदी अवस्था. मग त्याचे समाधान झाले की तो सोडून देतो. आणि एखादा मुसलमान सापडला तर पायावर छडीचे फटके हाणून जबरदस्तीने जवळच्या मशिदीत बोळवण होते त्याची.

मगाशी म्हणलं तसं त्यांच्या बद्दल वाटणारी जरबच आपल्याला गप्प बसवते. परत आपल्याला तिथली भाषा वगैरे काही कळत नाही त्यामुळे चेहरा जमेल तितका निरागस ठेवून निभावून न्यावं लागतं. मला स्वतःला कधी छडी खावी लागली नाही पण हा अनुभव घेतलेले बरेच होते माहितीतले. या मुतव्वांची अजून एक खासियत म्हणजे एखादी स्त्री काही चूक करताना आढळली तर ते तिच्याशी बहुतेक सरळ बोलणार नाहीत. तिच्या बरोबर जो कोणी पुरूष असेल त्याच्याशी बोलतात, म्हणजे त्यांची छडी बोलते आधी आणि मग ते बोलतात. :) आणि स्त्रिया एकट्या पडतच नाहीत बाहेर. कमीत कमी एखादा पुरूष असतोच बरोबर. नाहीतर घोळक्याने म्हणजे ७-८ जणी एकदम बाहेर पडायच्या.

एकदा मी बायकोमुळे छडी खाता खाता वाचलो. माझ्या बायकोला मुतव्वा बघायची फार उत्सुकता लागली होती. मी तिला म्हणायचो पण, काय तुझी महत्वाकांक्षा... पण नाही. आणि खोबार हे तेलव्यापाराचे केंद्र, खूप गोरे लोक तिथे असल्यामुळे सौदी अरेबियामधले सगळ्यात लिबरल शहर होते, त्यामुळे मुतव्वांची पकड बरीच ढिली होती. त्यामुळे मुतव्वा बघायचा योग वर्षातून ५-६ वेळाच. पण एकदा आलाच तो योग तिच्या नशिबात. आणि असा आला की परत तीने नाव नाही काढले.

झालं असं की एकदा तिला बरं नव्हतं, म्हणून आम्ही हॉस्पिटलमधे गेलो. मी गाडी पार्क केली आणि आम्ही हॉस्पिटलच्या मुख्य इमारतीकडे निघालो. तिथल्या रितीप्रमाणे तिने काळा गाऊन चढवलाच होता. डोक्यावर केस झाकले जातील असा स्कार्फही घेणं आवश्यक असतं. तेही केलं होतं. चालता चालता तो स्कार्फ खांद्यावर पडला. तेवढ्यात समोरून एक बिनारिंग, आखूड गाऊन घातलेली दाढी येताना बघितली मी. हळूच बायकोला म्हणलं, "तुला मुतव्वा बघायचा आहे ना? हळूच तिकडे बघ, तो जो आहे ना तो मुतव्वा." ती पण 'आजिं म्या परब्रह्म पाहिले'च्या आनंदात तल्लीन होऊन बघत होती. तेवढ्यात ते परब्रह्म आमच्याच दिशेने यायला लागलं. मला वाटले की आम्ही त्याच्याविषयी बोललो ते त्याला कळले वाटते. हलकासा घाम फुटला. तो अगदी माझ्या समोर येऊन उभा ठाकला.

पण काही बोलायच्या आधी सभ्यपणे हसला, मग म्हणाला, "शी युवर वाइफ?"

मी, "हो". (क.. क.. क.. क.. किरण स्टाईल मधे).

तो, "कॅन यू प्लीज आस्क हर टू कव्हर हरसेल्फ प्रॉपरली?"

हुश्श!!! माझ्या लक्षात आलं की काय बिघडलं होतं. लगेच सुधारणा झाली. मी त्याला हसून दाखवलं. तो पण हसला आणि गेला बिचारा आपल्या वाटेने. त्या दिवशी माझा डॉक्टरचा खर्च फुकटच गेला, औषध न घेताच बायको खडखडीत बरी झाली. ;)

तर असे हे मुतव्वे... खास सौदी प्रॉडक्ट. पण, परत तेच, मानवाला लागू पडणारं महान तत्व त्यांनाही लागू पडतं. म्हणजे... माणूस तो माणूसच... अरे ला कारे केलं की अर्धी अरेरावी संपते. हेच मुतव्व्यांच्या बाबतीत पण सत्य आहे. आपली चूक नसेल आणि अरबी मधे थोडा शाब्दिक लढा देता आला तर त्रास कमी होतो. माझ्या पाहण्यात आलेल्या उदाहरणावरून मला हे चांगलेच कळले. झालं काय की...

सौदी मधे सगळ्या रेस्टॉरंट्स मधे 'फॅमिली' आणि 'इतर' अशी द्विवर्ण्य व्यवस्था असते. 'फॅमिली' म्हणजे स्त्रिया किंवा स्त्रिया बरोबर असलेली कुटुंबं. आणि सडे / एकटे पुरूष असतील तर 'इतर' ... सौदी भाषेत बॅचलर्स. फॅमिली भागात अश्या बॅचलर्सना सक्त मनाई. माझे बॅचलर मित्र आमच्या बरोबर फिरायला वगैरे यायला एकदम तय्यार असायचे. कारण माझी बायको बरोबर असल्याने, त्यांना फॅमिली सेक्शन मधे बसायला मिळायचं. ;)

तर आमच्या एका कस्टमरकडचा एक सुदानी अकाऊंटंट एका मॉल मधल्या रेस्टॉरंट मधे गेला. सोबत त्याची बायको होतीच. हा गडी एकदम बिन्धास्त. सुदान म्हणजे पूर्णपणे अरबी झालेले आफ्रिकेतले राष्ट्र. मातृभाषा अरबीच त्याची. फॅमिली एरियात जागा नसल्याने हा बायकोबरोबर 'इतरां'साठी ठेवलेल्या भागात बसला. थोड्यावेळाने एक मुतव्वा येऊन त्याच्या अंगावर ओरडायला लागला. त्याला फॅमिली भागात जायची सक्ती करू लागला. हा खमक्या, तो उलट वाद घालू लागला. थोड्या वेळाने तो मुतव्वा कंटाळला. त्याने विचारलं, "अरे इथे सगळे पुरूष तुझ्या बायकोकडे बघतील ना , तुला चालेल?" आमचा मित्र बायकोकडे वळून म्हणाला "का गं? तुला चालेल?" ती पण अमेरिकेत वगैरे शिकलेली. तिला राग होताच असल्या प्रकाराचा. ती तडक म्हणाली, "मला काही फरक पडत नाही." हे ऐकून त्या मुतव्व्याला बहुतेक फेफरं आलं असेल. बाईला प्रॉब्लेम नाही, दादल्याला पण नाही, ती व्यवस्थित अंग झाकून होती, शांतपणे दोघं जेवत होते. त्यामुळे मुतव्व्याची पंचाईतच झाली. त्यांच्या नावाने शिव्याशाप घालत गेला बिचारा. आमचा मित्र ही गोष्ट सांगताना पण जाम हसत होता.

अजून एका परिस्थितीत या मुतव्व्यांचा एकदम शक्तीपात व्हायचा. ते म्हणजे पाश्चिमात्त्य. मुख्यत्वे अमेरिकन्स आणि इतर गोरी जमात. त्यांच्या समोर अगदीच शेपूट घालून असत. पण एक मात्र खरं की मी असतानाच हे मुतव्वे हळूहळू सौदी सरकारला डोईजड झाले होते. अफगाणिस्तानात गेलेले बहुसंख्य लोक याच पंथातले होते. त्यातले बरेच लोक सोविएत पाडावानंतर परत पण आले. पण मग त्यांना बर्‍याच गोष्टी अगदी मानवेनात. संघर्ष वाढले. पेरलं तसं उगवायला लागलं. असंतोष वाढू लागला आणि त्यातूनच एकदम मोठ्ठा स्फोट होऊन बाहेर पडला 'ओसामा बिन लादेन' नावाचा राक्षस. तो तर सौदी सरकारच्याच गळ्याला नख लावायला निघाला. त्यामुळे त्याला हद्दपार केलं आणि नंतर काय घडलं हा इतिहास जगासमोर आहेच. त्या वेळेपासून सरकार पण खूप सावध झालं. सगळ्यात मोठ्ठी धरपकड मुतव्व्यांचीच झाली. अशी बातमी होती की रियाध शहराबाहेर या मुतव्व्यांच्या 'पुनर्वसना'साठी खास 'केंद्रं' स्थापण्यात आली होती. नुकतंच असंही कळलं की सरकारने काही नविन कायदे लागू करून त्यांच्या कारावायांना अजून खूपच आळा घातला आहे. पण हा संघर्ष इतका सहजासहजी संपणारा नाही. या संघर्षाचा शेवट आपण अजून नक्कीच बघितलेला नाहीये. सर्वसामान्य सौदी माणसाला हिंसा नकोही असेल पण धर्माचा पगडा पण इतकाच आहे की धर्माच्या नावाने लढणारे तथाकथित 'धर्मयोद्धे' कुठे तरी जवळचे वाटतात. तेलावर असलेली राजघराण्यातल्या मूठभर लोकांची पकड आवडत नाही. गोर्‍या लोकांचे मुक्त वावरणे नकोसे वाटते. आणि करू तर काहीच शकत नाहीत. धुमसण्याशिवाय. लोकशाही नाहीच. सामाजिक उन्नतीच्या संधीही तश्या कमीच. पण नविन राजा बराच उदार आहे असे म्हणतात. बायकांना ड्रायव्हिंग करायला परवानगी मिळणे हे आता वास्तवाच्या कक्षेत, अगदी दूर क्षितिजावर का होईना, आले आहे. खोबार तर नक्कीच बदलतंय. माझ्या परवाच्या ट्रिपमधे मी एक दोन बायका बिना बुरख्याच्या पण बघितल्या. अगदी ५ वर्षांपूर्वी ही एक अगदी अशक्य अशी गोष्ट होती. विश्वास नाही बसत. कालाय तस्मै नमः हेच खरं.

पण असं सगळं असलं तरी तिथलं आमचं जीवन अगदीच रंगहीन किंवा कळाहीन असं मात्र अजिबात नव्हतं. बंधनं असली तरी आपण काहीतरी मार्ग काढतोच. आमचा बर्‍याच लोकांचा एक चांगला ग्रुप होता. आम्ही सणासुदीला एकत्र भेटायचो. धमाल करायचो. गाणी वगैरे व्हायची. एखाद्याचं घर मोठं असेल तर मस्त दांडिया वगैरे पण खेळायचो, नवरात्रीला. माझ्याच घरी चांगला १० दिवस दणकून गणपती पण बसवला होता. रोज गर्दी व्हायची आरतीला. आयुष्यात कधी देवासमोर हात जोडले नसतील असे लोक पण हौसेने येऊन उभे रहायचे आरतीला. बंधनात जगताना बंडखोरीचा आनंद मिळत असावा बहुतेक त्यांना. एरवी सुद्धा एकत्र भेटून धमाल चालयची. तासनतास गप्पा मारणे हा पण एक ठरलेला कार्यक्रम. विशेषतः विकेंडला. या गप्पातून वेगवेगळे मजेशीर किस्से ऐकायला मिळायचे. सौदी माणसांबद्दलचे / देशाबद्दलचे विनोद तर खूपच आहेत. त्यातले काही देतो इथे:

सौदी माणसं एका बाबतीत विलक्षण प्रसिद्ध. अतिशय जिगरबाज ड्रायव्हिंग. कुणाच्या बापाला भीत नाहीत. १२-१२ वर्षांची पोरं पण बिन्धास्त गाड्या उडवतात. त्यातून तिथले स्थानिक टॅक्सीवाले तर विचारूच नका... एकदम उडन खटोला. त्याचा हा किस्सा. एक गोरा एकदा रियाध विमानतळावर उतरतो आणि टॅक्सीत बसतो. टॅक्सी निघते. थोड्या वेळाने रेड सिग्नल येतो. टॅक्सीवाला शिस्तीत सिग्नल क्रॉस करून जातो. गोरा घामाघूम. अजून एक रेड सिग्नल. परत तेच. गोरा टाईट. तिसर्‍यांदा परत तेच. रेड सिग्नल, गाडी सुसाट. गोरा जवळ जवळ बेशुद्ध. तेवढ्यात अजून एक रेड सिग्नल येतो आणि टॅक्सीवाला क्रॉस करनार एवढ्यात सिग्नल ग्रीन होतो. टॅक्सीवाला जीवाच्या आकांताने ब्रेक मारून थांबतो. गोरा आधी टॅक्सीच्या बाहेर उडी मारतो. आणि मग त्या टॅक्सीवाल्याला विचारतो. "बाबारे, हा काय प्रकार आहे. सगळे रेड सिग्नल तोडलेस. इथे मात्र ग्रीन असून सुद्धा कचकचून ब्रेक मारलास. का?" टॅक्सीवाला म्हणतो... "मग, उजवीकडून एखादा टॅक्सीवाला येत असेल तर." !!!!!

अजून एक विनोद म्हणजे सौदी मधली व्हिसा सिस्टिम. तिथे व्हिसावर हा माणूस काय कामासाठी आला आहे हे लिहिलेले असते. त्याला प्रोफेशन म्हणतात. प्रत्येक कंपनीला व्हिसाचा कोटा प्रोफेशन प्रमाणे आणि राष्ट्रियत्वाप्रमाणे ठरवून दिलेले असतो. सगळी नोकरभरती त्यात बसवावी लागते. त्यामुळे असे होते की घ्यायचा आहे भारतिय मॅनेजर पण कंपनीकडे भारतिय मॅनेजरचा व्हिसा नाहीये मग दुसरा जो काही भरतिय व्हिसा उपलब्ध असेल तो घ्यायचा माणसाला आणायचं. त्या मुळे बरेच वेळा व्हिसा प्रोफेशन एक आणि माणूस काम भलतंच करतोय असं दिसायचं. माझ्या ओळखीचा एक जण एका कंपनीत जी.एम. होता पण व्हिसा होता कूकचा. त्यामुळे त्याला बायकोला तिकडे नेताना त्रास झाला. कारण तो जरी जी.एम असला तरी सरकारदरबारी तो 'लेबर कॅटेगरी' असल्याने बायकोला आनता येत नव्हते. तर असाच किस्सा....

एकदा रियाध झू मधे एक नविन वाघ आणला. पहिल्या दिवशी त्याला जेवायला केळी दिली गेली. वाघ बेक्कार वैतागला. पण बिचारा प्रवासातून दमून भागून आला होता म्हणून जे मिळालं ते खाल्लं. दुसर्‍या दिवशी परत तेच. समोर हाऽऽऽ केळ्यांचा ढीग. वैतागला बिचारा. पण असेल काही स्थानिक पद्धत म्हणून गप्प बसला. तिसर्‍या दिवशी मात्र असं झालं आणि हा चवताळला. मोठमोठ्याने डरकाळ्या फोडायला लागला. तिथला कीपर धावत आला. "काय रे, काय झालं तुला ओरडायला?" वाघ म्हणाला, "अरे मी वाघ आहे वाघ. मला केळी कसली देतोस?" कीपर शांत पणे म्हणाला, "तू असशील वाघ... पण तुझा व्हिसा माकडाचा आहे. तुला केळीच मिळतील." !!!!!

आणि हा मला सगळ्यात जास्त आवडलेला.... एक जण दुसर्‍याला म्हणतो... "सौदी अरेबिया इज द सेकंड बेस्ट प्लेस इन द वर्ल्ड." दुसरा हैराण. "व्हिच इज द बेस्ट प्लेस देन?" पहिला म्हणतो... "रेस्ट ऑफ द वर्ल्ड" !!!!!

*************

मंडळी, खोबारने मला खूप काही दिलं. आयुष्यात पहिल्यांदा दूर भिरकावून दिल्यासारखा झालो होतो, मला आधार दिला. आसरा दिला. आप्तस्वकियांच्या आधाराशिवाय जगायला शिकवलं. माझी बायको आणि मुलगी तिथे आले तेव्हा कुटंबाची जबाबदारी पूर्णपणे आपल्यावर असणे म्हणजे काय हे दाखवून दिलं. निरनिराळे लोक भेटले, नाना देशीचे नाना तर्‍हा असलेले नमूने बघितले, आपल्या स्वभावाला शक्य आणि आवश्यक तेवढी मुरड घालून त्यांच्याशी कसं जमवून घ्यायचं ते कळलं. एक नविन संस्कृती / भाषा जिच्याबद्दल लहानपाणापासून सुरस आणि चमत्कारिक कथा ऐकून एक वेगळीच प्रतिमा मनात निर्माण झालेली असते, तिच्याबद्दल खूप काही शिकायला मिळालं. आणि सगळ्यात महत्वाचं.... माणूस नावाचा अनाकलनिय आणि अतुलनिय प्रकार हा एका विशिष्ट पातळीवर सगळीकडे सारखाच असतो हे थोडंफार समजलं.

तर मंडळी असं हे माझं खोबार. वेगवेगळ्या रंगांचं. मला जे दिसले त्यातले जमले तेवढे रंग तुमच्या पुढे ठेवायचा प्रयत्न केला. जमलं की नाही हे तुम्हीच ठरवा. मी मात्र माझ्यासाठीच लिहित होतो. माझ्या मनात घर करून बसलेल्या खोबारचं ऋण उतरायचं होतं. कोणाबरोबर तरी वाटायचं होतं. ते झालं. खरं तर खोबार हे एक रूपक आहे, प्रत्येकाच्याच आयुष्यात असं एक खोबार येतं. कोणाला ते आपल्या राहत्या घरीच सापडतं... कोणाला कॉलेजच्या हॉस्टेलवर, तर कोणाला घरापासून हजारो मैल दूर परक्या देशात परक्या मातीत. पण आपापलं खोबार सापडणं हे महत्वाचं. मला ते 'अल खोबार' नावाच्या गावात सापडलं. तुम्हाला?

ऐकायला आवडेल मला...

सफळ संपूर्ण.

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

प्राजु's picture

13 Mar 2009 - 5:51 am | प्राजु

इतक्या प्रवाही भाषेत, इतकं आत्मियतेनं तुझ्या खोबारला आमच्यासमोर उभं केलंस की, आम्ही तिथेच तुझ्या शेजारीच होतो सगळ्या प्रसंगात असंच वाटायला लागलं होतं.
हे खोबार म्हणजे खरंच एक अध्याय आहे. एका वेगळ्या खास करून कट्टर मुस्लिम देशाबद्दल जी काही खरी-खोटी माहीती असते, त्यावर बराच प्रकाश पडला या लेखमालिकेमुळे.
खूपच सुंदर.
बिपिनदा, हे तुझे लेख तू पैलतीर ला पाठव. प्रत्येक आठवड्यात एक याप्रमाणे. लोकं डोक्यावर घेतील खोबारला.
खूप खूप सुंदर मालिका.
अभिनंदन!
आणि.... ________/\___________

:)

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

रेवती's picture

13 Mar 2009 - 6:03 am | रेवती

अनुभव वाचून ज्ञानात भर पडली असेच म्हणावे लागेल.
इतक्या सुंदर रितीने खोबार आमच्या समोर उभं केलत त्याबद्दल धन्यवाद!
ही मालिका संपणार आहे हे विसरायला लावलेत यातच सर्व काही आले.

रेवती

भाग्यश्री's picture

13 Mar 2009 - 6:08 am | भाग्यश्री

अप्रतिम !! मस्त झालाय हा भाग... संपवू नकोस ना प्लीज... ही मालिका फार छान वाटतेय वाचायला..
सुफळ संपूर्णचा प्रचंड राग आला ! >:P

आता एक बावळट प्रश्न... मला पहीला जोक कळलाच नाही !! :( ( बहुतेक खोबार मधे उजव्या साईडने गाडी चालवतात की डाव्या ही माहीती नसल्यामुळे झाले असेल.. कोणीतरि समजवा!!)

http://bhagyashreee.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Mar 2009 - 6:14 am | बिपिन कार्यकर्ते

अगं.... तो ड्रायव्हर ग्रीन सिग्नलला थांबला कारण उजव्या बाजूने म्हणजे इंटरसेक्शनच्या (रस्त्याच्या नव्हे) उजव्या बाजूने... ज्या बाजूच्या लोकांना रेड सिग्नल असेल तिथून रेड सिग्नल जंप करणारा एखादा टॅक्सीवाला येईल ना सुस्साट्ट.... म्हणून हा ग्रीन सिग्नल असूनही थांबला.

बिपिन कार्यकर्ते

भाग्यश्री's picture

13 Mar 2009 - 6:22 am | भाग्यश्री

ओह.. अच्छा.. :)
जोक समजावून सांगायला लागणे म्हणजे अगदी फ्लॉपच शो ना! :(

http://bhagyashreee.blogspot.com/

मृण्मयी's picture

13 Mar 2009 - 6:29 am | मृण्मयी

आधीच्या सगळ्या भागांइतकाच सुरेख!

वाघाला केळी... !!!! सही जोक!!

नंदन's picture

13 Mar 2009 - 6:31 am | नंदन

ही लेखमाला संपू नये, असं वाटत होतं. हा भाग छान उतरला आहे. किस्से आणि विनोद रंजक आहेत. अलीकडेच न्यू यॉर्क टाईम्समध्ये सौदीतल्या बेदरकार ड्रायव्हिंगचे कारण तिकडे इतर जवळपास सर्व गोष्टींवर असणारी जाचक बंधने आहेत हे सांगणारा एक लेख वाचला होता, तो आठवला.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

बेसनलाडू's picture

13 Mar 2009 - 6:40 am | बेसनलाडू

शेवटही रंजक. माहितीपूर्ण म्हणावासा!
(वाचक)बेसनलाडू

धनंजय's picture

21 Mar 2009 - 2:06 am | धनंजय

उशीरा वाचला, पण हुकला नाही म्हणून बरे वाटत आहे.

सूर्य's picture

13 Mar 2009 - 6:45 am | सूर्य

अहो बिपीनभाऊ, आठच तर भाग झाले आहेत. इतक्यात कुठे संपवता.;)
लेखमाला मस्तच झाली. खोबारबद्दल बरेच काही कळले. अजुन लेख येउद्यात.

- सूर्य.

वैशाली हसमनीस's picture

13 Mar 2009 - 6:54 am | वैशाली हसमनीस

बिपिनदा,सर्वच भाग अप्रतिम झाले आहेत.एखादी सुंदर कादंबरी वाचल्यासारखे वाटते आहे.वेगळा देश, वेगळे अनुभव,त्यातही सुंदर लेखनकौशल्य,त्यामुळे वाचताना मजा आली.मीही एका प्रगत मुस्लिम देशातच राहते,पण माझे अनुभव फारच वेगळे आहेत.

प्राची's picture

13 Mar 2009 - 7:26 am | प्राची

मिपावर आल्यावर पहिलाच लेख "माझं खोबार" बघितला आणि पटकन वाचायला घेतला.वेड लावलंय तुमच्या खोबारने.आताचा लेखही खूप छान झाला. =D> =D> =D>
>>निरनिराळे लोक भेटले, नाना देशीचे नाना तर्‍हा असलेले नमूने बघितले, आपल्या स्वभावाला शक्य आणि आवश्यक तेवढी मुरड घालून त्यांच्याशी कसं जमवून घ्यायचं ते कळलं. एक नविन संस्कृती / भाषा जिच्याबद्दल लहानपाणापासून सुरस आणि चमत्कारिक कथा ऐकून एक वेगळीच प्रतिमा मनात निर्माण झालेली असते, तिच्याबद्दल खूप काही शिकायला मिळालं. आणि सगळ्यात महत्वाचं.... माणूस नावाचा अनाकलनिय आणि अतुलनिय प्रकार हा एका विशिष्ट पातळीवर सगळीकडे सारखाच असतो हे थोडंफार समजलं.

सौदी अरेबियासारख्या कट्टर मुस्लिम देशात तुम्हाला आलेल्या चांगल्या-वाईट अनुभवांचं चित्रण आम्हालाही बरच काही शिकवून गेलं.
अहो बिपिनदा,पण इतक्यातच "सफळ संपूर्ण." :O
ठीक आहे,अशीच तुमच्या अनुभवांची गाठोडी आम्हाला यापुठेही उघडून दाखवा ही विनंती. :) :) :)

विंजिनेर's picture

13 Mar 2009 - 7:32 am | विंजिनेर

तुमचे अनुभव ८ ही भागात छान उतरले आहेत.
सगळे अनुभव - काही बरे, काही घुसमटवणारे असले तरी खोबारला "माझं" खोबार म्हणावं ह्याचं थोडं आश्चर्य वाटलं.
तुम्हाला उद्विग्न करणारे अनुभव आल्यानंतर "गड्या आपुला गाव बरा" असं कधी वाटलं होतं का?

दशानन's picture

13 Mar 2009 - 9:09 am | दशानन

हाच प्रश्न मनात आला !

* सुंदर लेख माला !

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

शुभान्गी's picture

13 Mar 2009 - 7:38 am | शुभान्गी

बिपिनभाऊ,
मस्तच झाले लिखाण..........बिपिनभाऊ हे अनुभव तर पहिल्या १/२ वरीसचे हाय...... नन्तरच्या २/३ वरीस चे अनुभव वाचण्यास उत्सुक आहोत ईतक्यात सान्गता नका करु......

चतुरंग's picture

13 Mar 2009 - 8:35 am | चतुरंग

सौदी अरेबियासारख्या मुस्लिम राज्यकर्ते आणि संस्कृती असलेल्या देशाचं जीवन असं जवळून बघताना, तिथल्या रोजच्या जीवनाशी एकरुप होऊन तिथले बारकावे टिपताना तू इतका समरस झालेला होतास की ह्या लेखमालेत तू आम्हाला तुझ्याबरोबर घेऊन गेलास. प्रत्येक प्रसंग, घटना ही जणू तुझ्याबरोबर बघत आहोत इतकी जिवंत वाटत होती.
लिखाणातला नर्म विनोदी भाव, अभिनिवेश नसलेली साधी, सोपी, गप्पा मारल्यासारखी भाषा ह्याने मी अतिशय आनंदित झालोय.

शेवटच्या भागातले तीनही किस्से एकदम हटके आहेत! आपल्याकडे सरदारजी स्पेशल जसे असतात ना तसे तुझे हे सौदी स्पेश्शल आहेत! :) :)
वाघाला केळी हे तर जामच फिट्ट!! ;)

तुझ्या मनातलं खोबारचं हे मलईदार खोबरं असं अल्लाद हातानं उकलून आम्हाला आस्ते आस्ते भरवत होतास आणि साठा उत्तराची कहाणी आठा उत्तरात संपवलीस ही बाब मात्र मनाला जाम चुटपुट लावणारी ठरली! कोणत्याही छान गोष्टीलाही शेवट हा असतोच ह्या न्यायाने आम्ही मनाची समजूत घातलीये खरी पण आता तू पुढची अनुभवांची संदूक उघडायची तयारी सुरु करशील ह्या बोलीवरच!! :)

चतुरंग

छोटा डॉन's picture

13 Mar 2009 - 9:00 am | छोटा डॉन

रंगाशेठशी शब्दशः सहमत ...
अजुन वेगळं काय बोलु ? खोबार हे खरोखरच अप्रतिम झाले होते. अगदी पहिल्या भागापासुन ते आत्ता वाचलेल्या अखेरच्या ओळीपर्यंत एकदाही कंटाळवाणे, जडबंबाळ अथवा अतर्क्य असे वाटलेच नाही कधी ...

आत्तापर्यंत मी वाचलेल्या सर्वोत्तम आंतरजालीय लेखमालेंमधली ही एक नक्कीच आहे.
असेच लिहीत रहा ...
पुढच्या भागाची म्हणाणार नाही मात्र पुढच्या "शिदोरी"ची वाट पहातो आहे.

आणि हो, मुलाखत कधी देताय ह्या निमीत्ताने ?
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Mar 2009 - 10:26 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

चतुरंग आणि डॉन्याशी सहमत.

खूपच सुंदर आणि ओघवत्या भाषेत लिहिलं आहेस.

आणि हो, तू ओसामा बिन लादेनला ओळखतोस असं अल्-जवाहिरी म्हणाला मला काल! ;-)

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

आनंदयात्री's picture

13 Mar 2009 - 11:37 am | आनंदयात्री

सहमत. या दिवसात अत्यंत आवडलेली लेखमाला. एका वेगळ्या जगाची करुन दिलेली नविन ओळख.
लिखाण म्हणजे निव्वळ अस्सल .. कुठलाही चोथा नाही. प्रचंड आवडलेले.

अवांतरः
माझा एक आंतरजालिय मित्र मसंस वरच्या संपादकांना मुतव्वे म्हणतो .. त्याची अन इथे दिलेल्या मुतव्व्यांच्या घटनांची सांगड घालुन अंमळ मजा आली. त्यातल्या त्यात त्यांच्या पुनर्वसन क्यांपाबद्दल वाचुन तर अजुनच :)

छोटा डॉन's picture

13 Mar 2009 - 11:42 am | छोटा डॉन

माझा एक आंतरजालिय मित्र मसंस वरच्या संपादकांना मुतव्वे म्हणतो .. त्याची अन इथे दिलेल्या मुतव्व्यांच्या घटनांची सांगड घालुन अंमळ मजा आली. त्यातल्या त्यात त्यांच्या पुनर्वसन क्यांपाबद्दल वाचुन तर अजुनच

=)) =)) =))
अगदी अगदी ...
माझ्या मनात अगदी हेच आले होते व मी लिहणारही होतो , पण म्हटले कशाला ?
असो. आंद्यायात्री आणि आमची दोस्ती कशाच्या पायावर बांधली गेली आहे हे आज पुन्हा समजले.
चालायचेच ...

मात्र आंद्याने दिलेला संदर्भ अतिशय जबरा आहे. खल्लासच ...!!!

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

मनिष's picture

13 Mar 2009 - 10:44 am | मनिष

बिपिनदा - ये दिल अभी भरा नही! :)
तू जमल्यास थोडी अजूण भर घालून ह्याचे पुस्तक प्रकाशित कर ना!

विसोबा खेचर's picture

13 Mar 2009 - 8:38 am | विसोबा खेचर

बिपिनभावजी,

वरील सगळ्यांशी सहमत. तुमच्या ह्या लेखमालिकेने मिपाला खूप खूप श्रीमंत केलं आहे..

सगळे म्हणतात त्याप्रमाणे खरोखरच एक पुस्तक काढा. लोकांना ते अतिशय आवडेल.

'मिपा प्रकाशन' ह्या पुस्तकाच्या प्रकाशनाची जबाबदारी घ्यायला आनंदाने तयार आहे! :)

तात्या.

विनायक प्रभू's picture

13 Mar 2009 - 12:49 pm | विनायक प्रभू

असेच म्हणतो.
आता किती वेळा असेच म्हणायचे

अवलिया's picture

13 Mar 2009 - 9:34 am | अवलिया

संपलय? :(

लेखमाला सुरेख !!!

--अवलिया

परिकथेतील राजकुमार's picture

13 Mar 2009 - 11:52 am | परिकथेतील राजकुमार

सहमत.
अप्रतीम लेखमाला बिपिनदा. हय लेखमालेनी एक वाचक म्हणुन खुप समृद्ध केले. धन्यवाद.

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

भडकमकर मास्तर's picture

13 Mar 2009 - 9:53 am | भडकमकर मास्तर

बिका,
येकदम झकास झाली लेखमालिका...
अर्र, संपली वाटतं... अशी प्रतिक्रिया झालीच शेवटी... हेच लेखमालेचे यश... :)

______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

अभिज्ञ's picture

28 Mar 2009 - 3:15 pm | अभिज्ञ

अगदि हेच म्हणतो.
बिका,
अभिनंदन.

अभिज्ञ.

घाटावरचे भट's picture

13 Mar 2009 - 9:57 am | घाटावरचे भट

का हो असं लवकर संपवलत बि३का? आम्हाला वाटलं हळूहळू का होईना पण खोबारचे खूप सारे भाग वाचायला मिळतील.

ढ's picture

13 Mar 2009 - 10:05 am |

सुरेख!अप्रतिम!खूप आवडलं तुमचं खोबार!

बिपिन भौ,

माझं खोबार ही लेखमाला संपल्याचं वाईट वाटतंय. अतिशय सुरेख लेखन आहे आपलं. खोबार जरी तुम्हाला गवसलं असलं तरी आणखी खूप काही वाचायला आवडेल तुमच्याकडून. वरती प्राजू यांनी म्हटल्याप्रमाणे खरंच पाठवा ही लेखमाला पैलतीर ला.

मैत्र's picture

13 Mar 2009 - 10:08 am | मैत्र

बिका, तुमची लिहिण्याची शैली झकास आहे. आणि तिथली परिस्थिती, तुमचे अनुभव, तुमची मतं, बदल, वेगवेगळे किस्से ... असं मस्त सजवलंय पूर्ण लेखांना.
ह्या लेखमालेत तू आम्हाला तुझ्याबरोबर घेऊन गेलास. प्रत्येक प्रसंग, घटना ही जणू तुझ्याबरोबर बघत आहोत इतकी जिवंत वाटत होती.
लिखाणातला नर्म विनोदी भाव, अभिनिवेश नसलेली साधी, सोपी, गप्पा मारल्यासारखी भाषा ...

चतुरंगांनी एकदम बरोब्बर वर्णन केलं आहे...

पण इतक्यात समारोप करू नका. अजून लिहा. तुमचा अनुभव मोठा आहे. अजून लिहिण्यासारखं पुष्कळ असेल या बुरख्यामागच्या देशाबद्दल.

मेघना भुस्कुटे's picture

21 Mar 2009 - 12:43 pm | मेघना भुस्कुटे

अगदी अगदी. मैत्रनी म्हटलंय तशी अभिनिवेश नसलेली, गप्पा मारल्यासारखी भाषा. पण निरीक्षणं किती मार्मिक.
लिहा, अजून लिहा.

संजय अभ्यंकर's picture

13 Mar 2009 - 10:10 am | संजय अभ्यंकर

सगळे भाग फार उत्तम लिहिलेत!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

मदनबाण's picture

13 Mar 2009 - 10:52 am | मदनबाण

छ्या... लेखमाला संपली? अजुन अनेक भाग आले असते तरी त्यात तेव्हढीच गोडी वाटली असती हे मात्र नक्की.. :)

बाकी वो बंदरवाला जोक भारी है| :)

मदनबाण.....

"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

शेखर's picture

13 Mar 2009 - 11:01 am | शेखर

१ नंबर मालिका.
बिपीनभाई , आता दुबई येऊ द्यात.....

लवंगी's picture

14 Mar 2009 - 7:02 am | लवंगी

दुबईतले अनुभव वाचायला आवडतील.

सहज's picture

13 Mar 2009 - 11:16 am | सहज

बिपिनदा ही लेखमाला अतिशय आवडली. अजुन हवीहवीशी वाटताना संपणे यात या मालीकेचे जबरदस्त यश आहे.

खोबार, धर्म, संस्कृती, माणसे, अतिशय मनोरंजक किस्से पेरत पेरत बिपिनदा तुम्ही एक फार सुंदर रंगबिरंगी कलाकृती निर्माण केलीत.

गोष्टीवेल्हाळ बिपिनदांची मिपाकरांना झालेली ओळख, जुळलेले नाते हे या मालीकेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य!

स्वाती दिनेश's picture

13 Mar 2009 - 2:29 pm | स्वाती दिनेश

सहजरावांशी सहमत रे बिपिन, 'तुझं खोबार' फार फार आवडलं,
स्वाती

ऍडीजोशी's picture

13 Mar 2009 - 11:49 am | ऍडीजोशी (not verified)

भारी भारी भारी भारी :) :) :)

खोबार एकदम १ नं.

सायली पानसे's picture

13 Mar 2009 - 11:49 am | सायली पानसे

बिपिन दादा.
मस्त झाला आहे लेख... सगळे भाग खुप छान झाले...

पुढच्या लेखमालेच्या प्रतिक्षेत.... सायली.

प्रकाश घाटपांडे's picture

13 Mar 2009 - 1:28 pm | प्रकाश घाटपांडे

बेष्ट ब्वॉ यकदम जंक्शन. काही मान्स काळा गाउन घालत्यात तर काही ढवळा घालत्यात. मुतव्वा सोडुन बाकी मान्सांना रिंग घालने कंपल्सरी हाये का? तिथ मरनाचा उकाडा हाय त मंग काळी कापड का घालत्यात ते?
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

वाहीदा's picture

13 Mar 2009 - 1:53 pm | वाहीदा

Hey बिप असे कसे तू ईतक्या लवकर सगळं संपवलेस ?? Not fair !! प्रत्येक लेख मालेत तू आम्हाला घेऊन चाललास अन आता ही ले़खमाला संपली ? ओह नो ! :-(
माझ्या मनात घर करून बसलेल्या खोबारचं ऋण उतरायचं होतं. कोणाबरोबर तरी वाटायचं होतं. ते झालं
आता तू दुबई बद्धल लिह अन आफ्रीका अजून बाकी आहे ना ??
~ वाहीदा

वाहीदा's picture

13 Mar 2009 - 2:04 pm | वाहीदा

अजून २ लेख माला हव्या आहेत !! बाबा अन मी बोलले होतो की तुला १० लेख माला लिहायला लावू अन त्यानंतर पुस्तक प्रकाशना बाबतीत बघु पण तु तर ८ मध्येच संपवलेस सगळे ?? THIS IS NOT FAIR ...तू मूड OFF केलास
BIIIIIIP THIS IS REALLY NOT FAIR

THIS CAN NOT BE END

~ वाहीदा

सुमीत भातखंडे's picture

13 Mar 2009 - 2:51 pm | सुमीत भातखंडे

अप्रतिम लेखमाला.
तुमचं खोबार आता कायमचं मनात घर करून राहणार.

सुनील's picture

13 Mar 2009 - 3:21 pm | सुनील

लेखमाला खूप आवडली. छान लिहिलयं.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

शाल्मली's picture

13 Mar 2009 - 5:11 pm | शाल्मली

अप्रतिम लेखमाला!!
पण ८च भागात संपवली हे काही आवडलं नाही. :(
आम्हाला तुमच्या खोबारची सफर घडवल्याबद्दल अनेक आभार!!

<<तू असशील वाघ... पण तुझा व्हिसा माकडाचा आहे. तुला केळीच मिळतील.<<
हाहा... खूप हसले.

आता पुढची लेखमाला कधी सुरु करणार??

--शाल्मली.

स्वाती२'s picture

13 Mar 2009 - 5:30 pm | स्वाती२

कार्यकर्ते, लेखमाला फार आवडली. छान पुस्तक होईल.

श्रावण मोडक's picture

13 Mar 2009 - 5:36 pm | श्रावण मोडक

हा भाग जमून आलाय. छान.
इतर भागांतील भ्रमंतीही येऊ द्या (मध्यंतरी आफ्रिकेतले लिहिले होते तुम्ही). अशा तीन-चार लेखमालातून एक प्रवासवर्णन तयार होईल छानपैकी. पुस्तकाच्या रुपात.

शितल's picture

13 Mar 2009 - 5:49 pm | शितल

बिपीनदा,
गप्पा मारत बोलाव तशी तुझी ही लेखमाला आहे.
मस्त किस्से,जोक आहेत ह्या भागात. त्या ड्रायव्हरचा आणी वाघाचा तर काही विचारू नकोस. :)

मन्जिरि's picture

13 Mar 2009 - 5:56 pm | मन्जिरि

अस कस? अजुन लिहायला हव होतत.मि तर इत्कि जाहिरात केलि आहे खोबारचि.आता पुस्तक येउद्यात .बेस्ट लक.

शशिधर केळकर's picture

13 Mar 2009 - 11:19 pm | शशिधर केळकर

खोबार संपले?
अरे भाऊ ही तर सुरुवात आहे! आता बखर सुरू करा.
ह.ना. आपटेंची होती ना - स्वराज्यावरील कादंबरीमाला - स्वराज्याचा श्रीगणेशा, स्वराज्याचा संकल्प, स्वराज्यावरील संकट, स्वराज्यातील दुही - वगैरे ८ भागात, किंवा पेशवाईचे ३० भाग - वगैरे, तसे हे ८ झाले, बखरीचे १०, मग डुबईचे १०, मधूनच एकादा काव्यसंग्रह, मग ....!

बिपिनभाऊ तुमच्या लेखणीचा सुवर्णकाळ आहे, उदंड लिहा; रसिक वर्ग वाट पाहतो आहे.

सुक्या's picture

13 Mar 2009 - 11:54 pm | सुक्या

बिपीनभो . . लै झ्याक.

संपुर्ण लेखमाला आवडली. खास म्हणजे अरब देशांविषयी माझे असलेले बरेच गैरसमज दुर झाले. तुझ्या लेखनी अशीच बहरत राहो.
बाकी तो टॅक्सी / रेड सिग्नल चा जोक खासच. माझ्या मॅनेजरने मला त्याचा बँगलोरचा किस्सा सांगितला होता. त्याला अजुनही तो प्रसंग आठवला की फेफरं येतं :-). थ्रिल राइड घेण्यासाठी डिस्नेलँड पेक्षा बँगलोर का जावे असे तो नेहेमी म्हणतो. :-)

सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

शक्तिमान's picture

14 Mar 2009 - 1:07 am | शक्तिमान

अजूनही खोबार मधेच आहात का?

हुप्प्या's picture

14 Mar 2009 - 2:02 am | हुप्प्या

खूपच आवडले हे अनुभवकथन. नुकतेच कारमेन बिन लादेनचे पुस्तक वाचले. नकळत त्याच्याशी तुलना केली गेली. ती बाई बिन लादेन घराण्यातली असल्यामुळे कट्टर इस्लामी बंधनांचा तिला सामना करावा लागला.
मला एक प्रश्न आहे. खरोखर इस्लाम इतका जुलमी आहे का? इतका टोकाचा असहिष्णू आहे का?
याचे उत्तर नाही असे असेल तर ज्या भाषेत तो सांगितला गेला, ज्या भाषेत लिहिला गेला आणि जे स्वतः ती भाषा बोलत आहेत ते त्याचा चुकीचा अर्थ कसा काढतात?
हा धर्म आधुनिक युगात कधी वावरू लागेल?

समिधा's picture

14 Mar 2009 - 6:14 am | समिधा

खुपच मस्त आहे तुझ खोबार.....
पण अजुन का नाही लिहीणार? :(
८ ही भाग खुप सुंदर लिहीले आहेस ,अजुन काही अनुभव असतील तर नक्की लिही. =D>

अनिल हटेला's picture

16 Mar 2009 - 10:34 am | अनिल हटेला

बिपीनदा !! सिंपली ग्रेट !!! :-)

कित्तीदा वाचलं तुझं खोबार ,पण मन काही भरलेलं नाय बघ !!

आता मालिका संपवलीस म्हणतोयेस ,पण असेच आलेले वेगवेगळे अनुभव टंकत रहा ,आम्ही वाचत राहु !!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

बन्ड्या's picture

20 Mar 2009 - 4:34 pm | बन्ड्या

बिपिनराव मस्तच....सिंपली ग्रेट !!!
.....बन्ड्या

अबोल's picture

20 Mar 2009 - 8:46 pm | अबोल

व्वा , कार्य़कर्तॅ तूम्हि तर मुस्लिम देषांच्या अब्रुचे खोबरे करुन टाकले.
आणी इनोद पन ..... झक्कासच.

कृपया खोबार ही मालीका पुर्ण वाचा . :-) LITTLE knowledge is always DANGEROUS !!

स्पा's picture

22 Jul 2011 - 5:26 pm | स्पा

जबर्या

बिपीन दा लय भारी एका दमात वाचून काढले सर्व भाग :)

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Jul 2011 - 5:30 pm | बिपिन कार्यकर्ते

धन्यवाद!

स्मिता.'s picture

22 Jul 2011 - 11:01 pm | स्मिता.

आजच सर्व भाग एका मागे एक वाचून काढले. लेखमाला खूपच छान जमून आलीये.

सौदी अरेबिया आणि तत्सम देशांबद्दल बरेच कुतुहल असते. या लेखमालेतून त्याबद्दल बरीच माहिती मिळाली.

काल ऑफिसात आणि आज घरी मिळून सगळे भाग वाचून काढले. पूर्वीच्या प्रतिसादात लोकांनी म्हटलेले अगदी योग्य आहे तुम्ही नक्की ह्यावर एक पुस्तक काढा.
तुमच्या दुबई आणि आफ्रिकेच्या काही लेखमाला आहेत काय मिसळपावावर ?

सोत्रि's picture

24 Jul 2011 - 5:24 pm | सोत्रि

बिकाशेठ, त्रिवार वंदन!

काश! हे सगळे भाग मी जायच्या आधि वाचले असते.
जे अनुभवले तेच सगळे वाचताना अगदी रियाध आणि खोबारला असल्या सारखे वाटले.

- (काफिर्) सोकाजी

रुपी's picture

27 Jul 2011 - 10:31 pm | रुपी

अतिशय सुरेख लेखमाला! खूप आवडली!
पहिल्या भागात टाकलेल्या पुलंच्या वाक्याची गरज नाही. या लेखमालेवर पुस्तक प्रकाशित करायला सांगणार्‍या सर्वांशी सहमत आहे.

एक शंका / कुतुहलः तुम्ही तिसर्‍या भागात लिहिलं आहे की कुठलंही धार्मिक साहित्य न्यायचं नाही. मग गणपती / आरती वगैरे कसं काय?

रूट's picture

12 Dec 2011 - 6:42 pm | रूट

बिका,

तुमची "माझं खोबार..." ही लेखमाला अतिशय आवडली आहे.
प्रत्येक भाग वाचताना जरा देखील उत्साह कमी झाला नाही.
प्रत्येक भाग वाचताना चित्र डोळ्यांसमोर उभ रहात होतं.

...तर सौदीत कुमारी राहणार नाहीत ह्या लेखा मधे सोकाजीरावत्रिलोकेकरांनी दिलेल्या प्रतिसादामुळे हा लेख वाचायला मिळाला.

- खुप-खुप धन्यवाद.

अवांतरः माझा 'मिपा' वर पहिला प्रतिसाद .... :) , २ वर्षे वाचनमात्र होतो. अशुद्ध लेखन शुद्ध करण्यास 'मिपा'करांकडुन मदतीची अपेक्षा आहे.

रूट's picture

12 Dec 2011 - 6:45 pm | रूट

"...तर सौदीत कुमारी राहणार नाहीत" ह्या लेखाची लिंक वरील प्रतिसादात दिसत नाही.... :(

विलासराव's picture

13 Dec 2011 - 1:03 am | विलासराव

बिपिनदा आज आत्ता आणी एकाच बैठकीत ही संपुर्ण लेखमाला वाचुन काढली. अतिशय आवडली. आजपर्यंत न वाचल्याबद्दल खेदही वाटला.
तुमचं खोबार मनात घर करुन गेलं.
कधी जायचा योग आलाच तर नेहमीप्रमाणे आपले मार्गदर्शन मिळेल अशी आशाही आहेच.

आबा's picture

31 May 2012 - 5:22 pm | आबा

सुपर्ब...
सॉरी, पण हा धागा वर आणल्या शिवाय राहवत नाहीये !

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Jun 2012 - 2:17 pm | बिपिन कार्यकर्ते

समस्त वाचकांचे परत एकदा आभार! :)

मी मिपाकर नसताना ही लेखमाला वाचल्या गेली होती- निव्वळ अप्रतिम. आमच्या समस्त मित्रमंडळींना फार्वर्ड केल्ती.

शिल्पा ब's picture

26 Jun 2012 - 1:03 pm | शिल्पा ब

माझं आवडलेली लेखमाला.

मन१'s picture

30 Jun 2012 - 5:57 pm | मन१

मालिका अजूनही चालली असती तरी कंटाळा आला नसता.
"सौदी अरेबिया इज द सेकंड बेस्ट प्लेस इन द वर्ल्ड." दुसरा हैराण. "व्हिच इज द बेस्ट प्लेस देन?" पहिला म्हणतो... "रेस्ट ऑफ द वर्ल्ड" !!!!!
हे क्लासच.

आनंदी गोपाळ's picture

9 Aug 2012 - 9:48 pm | आनंदी गोपाळ

लिंक मिळाली.
संपूर्ण वाचून काढली. सुंदर आहे.
पण बरंचसं चिंतन राहून गेल्यासारखं वाटतं आहे... समहाऊ अजून काहीतरी व्यक्त व्ह्यायचं होतं असं वाटतंय.

प्रसाद गोडबोले's picture

23 Feb 2013 - 1:30 pm | प्रसाद गोडबोले

मस्त लेखन ! थोडक्यात सौदी ची सफर झाली ! किमान तोंडओळख तरी झाली !

( अवांतर : लवकरच आम्हाला " माझं रियाध " अशी सीरीज लिहायला लागेल अशी चिन्हे आहेत :) त्यामुळे आपल्या लेखनाचा विषेश फायदा झाले असे म्हणुन थांबतो )

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Feb 2013 - 4:41 pm | बिपिन कार्यकर्ते

धन्यवाद!

तिथे मात्र (तिथल्या) राष्ट्रपित्यासंदर्भात प्रश्न उपस्थित करू नका हं! न रहेगा (राष्ट्र)काका न रहेगी (राष्ट्र)काकू अशातली गत व्हायची! ;)

बॅटमॅन's picture

23 Feb 2013 - 5:01 pm | बॅटमॅन

=)) =))

काय बेक्कार मारलाय !!!

प्रसाद गोडबोले's picture

26 Feb 2013 - 1:31 am | प्रसाद गोडबोले

पॉइंट टेकन :)

क्रान्ति's picture

23 Feb 2013 - 4:11 pm | क्रान्ति

जितक्या वेळी वाचावी तितक्या वेळी नवी वाटणारी उत्कृष्ट लेखमाला!

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Feb 2013 - 4:41 pm | बिपिन कार्यकर्ते

!

Look who is talking!!!! :)

खरच आहे..
जितक्या वेळी वाचावी तितक्या वेळी नवी वाटणारी उत्कृष्ट लेखमाला!
मी तर गेलि सहा वर्श्य सौदित जुबैलला नौकरि करत आहे.
पन आताचे सौदि बदलत आहे.
लिहायला खुप आहे पन मराठि...

मुक्त विहारि's picture

6 Jan 2015 - 4:33 pm | मुक्त विहारि

परत परत वाचावेसे वाटतात.

आम्हाला उंटात पण रस नाही आणि शेळ्या हाकण्यात तर अजिबातच नाही...

सस्नेह's picture

6 Jan 2015 - 5:11 pm | सस्नेह

*smile*

मुवि, उत्खननाबद्द्ल आभार्स !!

आतिवास's picture

6 Jan 2015 - 11:53 pm | आतिवास

हे सदस्य सध्या इथं लिहित नाहीत का? का?

मुक्त विहारि's picture

7 Jan 2015 - 10:34 am | मुक्त विहारि

बिकांनी परत एकदा कळफलकावर काहीतरी टंकावे, अशा अपेक्षेत...

सखी's picture

7 Jan 2015 - 7:52 pm | सखी

तीव्र सहमत.
काही लेख वाचुन काटा आला होता हे आठवले. इच्छुकांसाठी इथे http://www.misalpav.com/user/322/authored त्यांचे लेखन आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Jan 2015 - 9:18 pm | बिपिन कार्यकर्ते

धन्यवाद, मुवि आणि सखी. तुमची इच्छा लवकरच पूर्ण होवो.

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Jan 2015 - 9:17 pm | बिपिन कार्यकर्ते

या 'का'चं उत्तर मलाही मिळालेलं नाहीये अजून! :(

श्रीगुरुजी's picture

19 Oct 2015 - 1:40 pm | श्रीगुरुजी

लेखन आवडलंं. डॉक्टर दळवी नावाच्या एक महिला डॉक्टर व तिचे पती गेली २५-३० वर्षे सौदीत आहेत. त्यांचं "सोन्याची पाऊले" किंवा अशाच काहीतरी नावाचं एक पुस्तक वाचलं होतं. त्यात अगदी असेच अनुभव लिहिले आहेत.

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Oct 2015 - 2:05 pm | बिपिन कार्यकर्ते

'सोन्याच्या धुराचे ठसके' .. हेच बहुधा तुम्ही म्हणताय ते.