व्यक्तिचित्रं लिहिण्याची मला फार खोड किंवा गती नाही. फार जगावेगळ्या, अफलातून किंवा प्रसिद्ध, नामवंत व्यक्तींशी माझा जवळचा संबंध आलेला नाही. तरीही मनात काही व्यक्तींनी कधी काळी राज्य केलं होतं, त्यांच्याविषयीच्या आठवणी, अनुभव लिहिण्याचा हा छोटासा प्रयत्न. आधी आजोबांबद्दल लिहिलं होतं. आता हे एका (कधीकाळच्या) मित्राबद्दल.
-------
काही माणसांचं वैशिष्ट्यच असं असतं, की ती थेट काळजात घुसतात. सर्वार्थानं ती परिपूर्ण असतात, किंवा आदर्श असतात असं मुळीच नाही. पण त्यांच्यातला एखादाच गुण एवढा जोरकस असतो, की रूढ अर्थानं असलेले इतर दुर्गुण त्यापुढे झक् मारतात!
राजा रेवाळे हा आमचा असाच एक कॉलेजमधला मित्र. अकरावीत प्रवेश घेतल्यापासून सगळं जगच बदललं होतं. एकतर शाळेतली शिस्त, नियमित अभ्यास, घरच्यांचा धाक, कायमचं लक्ष, या सगळ्यातून स्वातंत्र्याचा अनुभव घेत होतो. परिणाम व्हायचा तोच झाला. शाळेत दहावीपर्यंत कधी स्वाध्यायात सुद्धा नापास झालेल्या मला अकरावीतल्या पहिल्याच चाचणी परीक्षेत पंचवीसपैकी एक, दोन असे गुण मिळायला लागले. अकरावी कशीबशी काढली आणि बारावीत चक्क नापास झालो. पुन्हा बारावी परीक्षा द्यायची ठरवली, तीपण सगळे विषय घेऊन. मी मेडिकलला वगैरे जाणार, अशी आशा घरच्यांना आणि मला तेव्हाही होती! म्हणूनच "ग्रुप'मध्ये चांगली टक्केवारी मिळवण्यासाठी सगळे विषय घेऊन पुन्हा बसण्याची खुमखुमी होती.
वाईटातून काही चांगलं होत असतं म्हणतात. राजा रेवाळेचा आणि माझा परिचय याच वर्षी झाला. आधी केवळ चेहरा ओळखीचा होता, पण थेट संबंध आला नव्हता. तोही असाच बारावीत पहिल्या वर्षी गटांगळी खाऊन माझ्या जोडीला पुन्हा सर्व विषय घेऊन बारावीला बसला होता. मग आम्ही दीडशहाण्या रिपीटर्सची टीमच जमली! सगळे विषय आम्हाला आधीच कळलेत, आता फक्त उरलेय ती उजळणी, असाच आमचा पवित्रा असायचा. त्यामुळं वर्गात पुन्हा तेच विषय "समजून' घेण्याची आम्हाला काहीच गरज नव्हती! मग कुठे कॉलेजच्या गेटबाहेर उभं राहून पोरींची टवाळी कर, कधी ग्राऊंडवर टाइमपास कर, असे उद्योग चालायचे.
पुलंच्या "रावसाहेब'मध्ये सगळ्यात जास्त दंगा रावसाहेबांचा असे, तसाच दंगा आमच्या ग्रुपमध्ये "राजा' करायचा. त्याची विनोदबुद्धी आणि हजरजबाबीपणा अफाट होता. विनोदाला फार काही दर्जाबिर्जा होता, असं नव्हे. पण कॉलेजातल्या टिंगलटवाळ्यांमध्ये तो अव्वल होता. वर्गात कधीमधी चुकून बसलोच, तर सर काहीतरी शिकवत असताना राजाच्या एखाद्या कॉमेंटवरून जी खुसपूस व्हायची, ती सरांच्या नजरेतून न सुटणारी असायची. मग एकेकाला वर्गाच्या बाहेर तरी जावं लागायचं, किंवा ओरडा खायला लागायचा. बरं, एवढं करून हा नामानिराळाच राहायचा.
राजाला उगाच डिवचणं आणि त्याच्याकडून शब्दांचा यथेच्छ मार खाणं, हे भाग्याचं लक्षण होतं. काही जण मात्र नकळत त्याच्या शेपटीवर पाय द्यायचे आणि मग आठ दिवस त्यांना तोंड दाखवायला जागा उरायची नाही. त्याच्या व्यक्तिमत्त्वाविषयी ऐकून असलेल्या एका नवख्या पोरानं असंच एकदा राजाला डिवचलं...."काय राजा, लग्न केलंस म्हणे!'
एखाद्यानं काहीतरी थातूरमातूर उत्तर दिलं असतं.
राजा लगेचच म्हणाला. "म्हंजे काय? तुला माहित नाही? पोरगं पण झालं! घरी ये, "खरवस' खायला!'
आता, एखाद्याला हा विनोद अश्लील, दर्जाहीन वगैरे वाटू शकेल. पण त्यावेळी आम्ही गडबडा लोळलो होतो.
मुलींशी बोलण्याची त्या काळात चोरी होती. कॉलेजात असलो, तरी आमचे मुला-मुलींचे ग्रुप वगैरे नव्हते. ग्रुप म्हणजे एकतर मुलांचा, किंवा मुलींचा. वेगवेगळा. एखादा मुलगा गॅलरीत मुलीशी बोलताना दिसला, की त्या प्रक्रियेला आमच्या शब्दकोषात "गूळ पाडणे' असं नाव होतं. मग एखादा मुलगा जास्तच चिकटलेला दिसला, की आम्ही त्याच्या समोरच्या गॅलरीत किंवा काही अंतर राखून जवळ उभे राहून पाठीवरून गुळाची पोती भरून नेल्याची ऍक्शन करायचो. तो तिच्याशी गुलुगुलू करून परत आला, की राजा त्याला हळूच म्हणायचा. "जपून रे! डायबेटिस होईल!' नवखा असला, तर त्या बिचाऱ्याला काहीच कळायचं नाही.
"नेचर क्लब'च्या नावाखाली आम्ही भटकंतीला जायचो, तेव्हा गणपतीपुळ्याच्या एका ट्रेकदरम्यान तो नदी पार करताना खोल पाण्यात जाऊन बुडायला लागला होता. दोघातिघांनी हात दिल्यावर सावरला. तेव्हाची त्याची अवस्थाही पाहण्यासारखी होती. नंतर स्वतःवरच विनोद वगैरे करून त्यानं त्या घटनेचंही बरंच भांडवल केलं.
कॉलेजच्या गॅदरिंगलाही हवालदाराचं सोंग आणून त्यानं धुमाकूळ घातला होता. मी त्या वेळी "बाई' झालो होतो आणि राजाच्या जोडीनं हास्याचे फवारे उडविण्याचा अल्पसा प्रयत्न केला होता.
नंतर टी.वाय.पर्यंत आम्ही एकत्र होतो, पण आमचे विषय वेगवेगळे होते. कधीतरी ट्रेकला एकत्र भेटायचो किंवा कॉलेजच्या मधल्या सुटीतही. तेवढ्यापुरती मजा यायची. पण बारावीएवढी धमाल नंतर कधी केली नाही.
कॉलेजातली मैत्री वर्ष संपता संपता कशी संपते, ते कधीच कळत नाही. मीदेखील रत्नागिरीतून शिक्षणासाठी (?) पुण्यात आलो आणि राजाशी काहीच संपर्क राहिला नाही. आता तर तो काय करतो, याचाही मला पत्ता नाही. रत्नागिरीत गेल्यावर शोधून काढणं अवघड नाही, हे जेवढं खरं, तेवढंच जुन्या गोड आठवणींना आता वरकरणीच्या औपचारिक गाठीभेटींची पुटं चढवलेली पाहवत नाहीत, हेही!
प्रतिक्रिया
17 Feb 2009 - 7:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
छान जमलं आहे व्यक्तीचित्रं आणि शेवटचा परिच्छेद खूपच आवडला. थोड्याबहुत फरकाने अनेक मित्र-मैत्रीणी असेच दूर आहेत आणि आता आहेत त्या आठवणी बदलाव्यात असं वाटत नाही.
अदिती
17 Feb 2009 - 8:23 pm | प्रकाश घाटपांडे
छ्या! बाबा अगदी माझ्या मनातल वाक्य चोरल या आदितीने. आता मी काय प्रतिसाद देउ :/ :-/ :confused:
प्रकाश घाटपांडे
17 Feb 2009 - 7:52 pm | लिखाळ
अरे वा ! छान.
-- लिखाळ.
17 Feb 2009 - 7:53 pm | शंकरराव
मस्त ....
17 Feb 2009 - 7:54 pm | सर्वसाक्षी
एखादा मित्र अचानक आठवतो खरा. नशिबात असेल तर भेटही होते. अनेकदा गाडीतल्या सहप्रवाशागत आपण कुणाबरोबर तरी आपले सुखदु:खाचे क्षण एकत्र भोगतो आणि अचानक आपापल्या स्थानकावर उतरुन निघुन जातो. पुन्हा न भेटण्यासाठी.
सुरेख कथन
17 Feb 2009 - 8:01 pm | टिउ
जमलंय...बारावीचा निकाल काय लागला (की पुन्हा निकाल लागला) ते लिहीलं नाहीत!
17 Feb 2009 - 8:11 pm | आपला अभिजित
(दुसर्या) बारावीविषयी राहिलंच!
पण हे आत्मकथन नव्हतं, तर मित्राचं व्यक्तिचित्रण होतं. त्यामुळे त्यावर भर दिला.
असो.
दुसर्या बारावीत जेमतेम ५०% च गुण मिळाले. शिक्शान शिक्शान भिकेचं लक्शान' हे वचन तोपर्यंत आत्मसात केलं होतं. त्यामुळे फार काही आशा नव्हतीच. पास झालो, हेच नशीब!
हां, पण महाराष्ट्राने, देशाने, जगाने एक महान, निष्णात डॉक्टर गमावला, हे शल्य राहील, त्याला इलाज नाही!
17 Feb 2009 - 8:16 pm | लिखाळ
>> हां, पण महाराष्ट्राने, देशाने, जगाने एक महान, निष्णात डॉक्टर गमावला, हे शल्य राहील, त्याला इलाज नाही!<<
टोचणार्या शल्यांवर मानसशात्रांतली पिएचडी करुन डॉक्टर बना ! :)
-- (पर्यायसूचक 'शल्य'चिकित्सक) लिखाळ.
17 Feb 2009 - 8:28 pm | छोटा डॉन
>>टोचणार्या शल्यांवर मानसशात्रांतली पिएचडी करुन डॉक्टर बना !
+१, लिखाळरावांशी सहमत आहे ...
त्याला काय अभ्यास वगैरे भानगडी नसतात असे ऐकुन आहे, थोडे "अगम्य आणि अतर्क्य" बोलायला शिकले की झालेच ...!
बाकीची पॉलिशिंग कालेजात करता येईल ;)
( अर्थातच ह्.घ्या. )
बाकी लेख मस्त जमला आहे ह्यात शंका नाहीच.
आयुष्यात बरेच असे दोस्त दुरावले जातात, कळत अथवा नकळतपने. पण त्यालाही इलाज नाही ...!
ज्यांच्याबरोबर एकेकाळी सर्व लज्जा खुंटिला तांगुन धुमाकुल घातला असतो त्यांना आज भेटल्यावर साधे "स्मितहास्य" देताना अवघडल्यासारखे होते.
------
प्रा. डॉ. डॉन्या वाळिंबे.
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
17 Feb 2009 - 9:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
>>टोचणार्या शल्यांवर मानसशात्रांतली पिएचडी करुन डॉक्टर बना !
+१, लिखाळरावांशी सहमत आहे ...
त्याला काय अभ्यास वगैरे भानगडी नसतात असे ऐकुन आहे, थोडे "अगम्य आणि अतर्क्य" बोलायला शिकले की झालेच ...!
अगदी ... फक्त थोडं आधीच्या लोकांनी केलेलं काम वाचून आपण 'लिटरेचर रिव्ह्यू'च्या नावावर खपवायचं. थोडा आपल्या (न केलेल्या) कष्टांबद्दल मेहेनतीने लिहायचं. आणि झालंच मग काम! "मेंदू थकेल एवढं करून, तर निष्कर्ष लिहून टाकायचा" (वाक्य पेठकर काकांच्या वाक्यावर आधारित).
मधे बिपिनने एक कविता टाकली होती. तसंच काहीसं मित्र-मैत्रीणींबरोबरही होतं. एखादाच कोणी मित्र (मैत्रीणही) रहातो जो अनेक वर्षांनी भेटला तरीही कालच भेटल्यासारख्या गप्पागोष्टी होतात; आणि शब्दांशिवायही तसाच संवाद होतो.
अदिती
17 Feb 2009 - 9:23 pm | आपला अभिजित
मित्राबाबत एक चांगली इंग्रजी कविता मिळाली होती. मित्राने तिचे मराठीत रूपांतर केले आणि मी मराठीतच `वाट' लावली!!
इथे केवळ संदर्भासाठी...
बिनचेहर्याच्या अफाट शहरात
होता मला एक जीवलग मित्र
जणू हरवलेल्या माणसांमधलं
माझं रंगभरलं हिरवं चित्र
तो मला आवडायचा अन
मीही, त्याला आवडायचो फार
चर्चा, मस्करी, थट्टेला
पूर यायचा अपार...
पण हळूहळू दिवस सरले...
पाहता पाहता वर्षही सरलं...
माझ्या मित्राचं मी तोंडही नाही पाहिलं
हे तेव्हा कुठे मला आठवलं!
आम्ही आता नव्हतो नवथर पोरं कालची
कसल्याशा ओझ्यांनी होती पाठ आमची वाकली
नाव, पैसा आणि प्रतिष्ठा यांचा होता खेळ
खेळता खेळता नुरला मित्रासाठी वेळ...
पण आता केला निश्चय
अन ठरवलं मनाशी ठाम
उद्य करू फोन त्याला अन सांगू,
`मला तुझी दोस्ता याद येते जाम'
पण `उद्या' आला अन `उद्या' गेला
आमच्यातला दुरावा वाढतच गेला...
एके दिवशी अचानक तार आली..
तार होती, की मित्राला देवाज्ञा झाली!
कसलं आयुष्य, कसली स्पर्धा,
कसली शर्यत अन कसलं काय...
पाहता पाहता मैत्र संपलं,
हाती माझ्या उरलं काय...
बिनचेहर्यांच्या या अफाट शहरात
आता कुठला दोस्त, कुठली दोस्ती...
मित्र गमावलेल्या चेहर्यांची
गर्दी माझ्या सभोवती...
- श्रीपाद (स्वयंस्फूर्त.)
-----------------
तुंबलेल्या कोंदट खोलीत
होता एक `जवळचा' मित्र
त्याच्याविना विचारत नव्हतं
मला काळं कुत्रं
एकाच खोलीतलं जिणं
अन एकाच ग्लासातलं पिणं,
आसपासच्या जगाशी
आम्हाला देणं ना घेणं
घरून आलेला `पॉकेटमनी'
अर्धा महिनाच पुरायचा
उधार-उसनवार्यांनी
उरला महिना काढायचा
समोरच्या टुमदार बंगल्यातली
`गोरटेली' दोघांना आवडायची
तिच्या स्वप्नांतच आमची
एकेक रात्र सरायची..
माझेच कपडे, परफ्यूम वापरून
साल्यानं तिला पटवलं
आपलं `खोटं नाणं' तिच्या
बापाच्या बंकेत वटवलं
उद्या भेटतो सांगून
तो गेला तो गेलाच!
माझ्या जिवावर जगून
माझ्यासाठी `मेलाच!'
`उद्या' आला
आणि`उद्या' गेला
पण माझा `जवळचा' मित्र
कधीच नाही भेटला
कधी जातो आमच्या अड्ड्यासमोरून
त्याच्या आलिशान मोटारीतून
अन बघतो तुच्छतेनं
काळ्या काचांपलीकडून
त्याच जुन्या कोंदट खोलीत
आता मी एकटाच राहतोय
बंगलेवाल्या पोरींकडे
आता `वेगळ्या' नजरेनं पाहतोय...
- अभिजित (आगाऊपणे स्वयंस्फूर्त.)
17 Feb 2009 - 9:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मूळ कविता सुंदरच आणि आगाऊ स्वयंस्फूर्ती एक लंबर.
अदिती
17 Feb 2009 - 10:30 pm | विसोबा खेचर
अभिजितराव,
येऊ द्या अशीच उत्तमोत्तम व्यक्तिचित्र!
आपला,
(व्यक्तिचित्रप्रेमी) तात्या.
18 Feb 2009 - 5:31 am | सहज
जुन्या मित्रांच्या आठवणी ताज्या करुन गेला.
गेल्या शनिवारीच लहानपणच्या एका मित्राची भेट झाल्याने जरा सुसह्य.