भाऊसाहेब पाटणकरांच्या 'दोस्त हो' ह्या गझलसंग्रहातल्या काही चारोळ्या वेचून ठेवतो आहे. हे काही रसग्रहण नाही. त्यांची भाषा इतकी सोपी आहे की नुसती चारोळी वाचली की झालं रसग्रहण. शिवाय आजकाल रसग्रहणाच्या नावाखाली कवितांच्या ओळींचं जे डिसेक्शन करतात लोकं, ते वाचून ते रसग्रहण हे 'सूर्यग्रहणा'सारखं 'ग्रहण' वाटतं. कवितेच्या मूळ ओळींमध्ये जो रस आहे, तो त्या कवितेच्या पंचनाम्यामागे झाकून टाकतात. मराठी कवितांवरचं हे अश्या प्रकारचं रस-ग्रहण केव्हा सुटेल तो सुदिन. तूर्तास (खरं म्हणजे इथे 'सध्या' हा शब्दही चालला असता, पण ग्रहणकाळात आम्हाला 'तूर्तास, अदमासे, साद्यंत, अभ्युत्थान' असले शब्द आठवतात. तर सध्या,) भाऊंच्या ओळी जश्या आहेत तश्याच आपल्यासमोर (तुमच्यासमोर) ठेवत आहे. (आठवून लिहितो आहे, एखादा शब्द चुकीचा लिहिला असेल तर लगेच कळवा. डॉ. बिरुटेंच्या सांगण्यावरून काही बदल केले आहेत).
जाणकारांना सांगण्याची गरज नाही तरीही एक सुचवू इच्छितो (आम्ही पडलो 'सल्लेखोर' स्वभावाचे!) गझल्/चारोळी वाचताना ह्याक्रमाने वाचाव्या- पहिल्या दोन ओळी सलग, मग पुन्हा त्याच ओळी, मग फक्त तिसरी ओळ दोनदा (इथे चौथ्या ओळीविषयी उत्सुकता ताणली गेली नसेल तर उसनी आणावी. अर्थात भाऊंच्या चारोळ्या ती वेळ तुमच्यावर येऊ देणार नाहीत) आणि शेवटी चौथी ओळ (एकदाच. ती कशाला दोनदा वाचायची?). हा प्रयोग खालच्या ओळी वाचताना करून पहा, मजा येईल वाचताना.
दोस्त हो,
पत्रे तिला प्रणयात, आम्ही खूप होती धाडिली
धाडिली होती अशी की, नसतील कोणी धाडिली
धाडिली मजला तिनेही, काय मी सांगू तिचे
सर्व ती माझीच होती, एकही नव्हते तिचे
पत्रात त्या जेव्हा तिचेही, पत्र हाती लागले
वाटले जैसे कुणाचे, गाल हाती लागले
पत्रातही त्या हाय ! तेथे, काय ती लिहिते बघा
माकडा, आरशात अपुला, चेहरा थोडा बघा
सार्थता संबोधनाची, आज ही कळली मला
वैय्यर्थता या यौवनाची, तीही अता कळली मला
नाही तरीही धीर आम्ही, सोडला काही कुठे
ऐसे नव्हे की, माकडाला, माकडी नसते कुठे
प्रतिक्रिया
19 Jan 2008 - 10:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
'विनोद' नावाची ही फार मोठी गझल आहे. आणि त्याची सुरुवात
'चंद्रमा हासे नभी, शांत शीतल चांदणे इथून आहे'. अर्थात गझलेची सुरुवात आपणास आवडलेल्या शेरांपासून केली असे आम्ही समजतो.
आपल्या उत्साहाचे खच्चीकरण करतोय असा कृपया अर्थ घेऊ नये, फार थोड्या शब्दांची अदलाबदल झाली आहे. आपल्याच विनंतीवरुन ते सांगण्याचा मोह होत आहे.
पत्रे तिला प्रणयात, आम्ही खूप होती धाडिली
धाडिली होती अशी की, नसतील कोणी धाडिली
धाडिली मजला तिनेही, काय मी सांगू तिचे
सर्व ती माझीच होती, एकही नव्हते तिचे
पत्रात त्या जेव्हा तिचेही, पत्र हाती लागले
वाटले जैसे कुणाचे, गाल हाती लागले
पत्रातही त्या हाय ! तेथे, काय ती लिहिते बघा
माकडा, आरशात अपुला, चेहरा थोडा बघा
सार्थता संबोधनाची, आज ही कळली मला
वैय्यर्थता या यौवनाची, तीही अता कळली मला
नाही तरीही धीर आम्ही, सोडला काही कुठे
ऐसे नव्हे की, माकडाला, माकडी नसते कुठे
या गझलेत एकूण १२६ ओळी आहेत. वरील ओळीतील दुरुस्ती केल्यानंतर आम्ही आमचा प्रतिसाद काढून घेऊ !!!!
जिंदादिल- भाऊसाहेब पाटणकर पृ.क्र. २२
जिंदादिल हे माझ्याकडे संग्रही असलेले एकमेव पुस्तक आहे. त्यांचे 'मराठी शायरी, 'मराठी मुशायरा, 'मैफिल, आणि दोस्त हो, या शायरींच्या पुस्तकात जर वरील इतक्याच ओळींची गझल असेल तर ते मला माहित नाही.( चु.भु. दे. घे. )
भाऊसाहेबांच्या शेरोशायरीचा चाहता
प्रा.डॉ. दिलीप बिरुटे
4 Feb 2008 - 8:27 pm | पुष्कर
बिरुटे साहेब,
आपल्यासारखे दर्दी लोक इथे आहेत हे पाहून खूप बरं वाटलं. आपण सांगितलेले बदल मी मूळ लेखनात करण्याचा गेले कित्येक दिवस खूप प्रयत्न केला. पण काही केल्या "संपादन" हा पर्याय मला दिसत नाहिये. तो पूर्वी होता, आणि त्याचा वापर मी यापूर्वी केलेला आहे. आपण आणि तात्यांनीही सांगितल्याप्रमाणे तो पर्याय अजूनही उपलब्ध आहे. पण मग मलाच तो कसा दिसत नाही? मी मला दिसणार्या webpage चा फोटो काढून दाखवायला तयार आहे, पण माझ्याकडे कॅमेरा उपलब्ध नाही.
तो पर्याय सर्वांना उपलब्ध असावा आणि केवळ मलाच नसावा हा काय प्रकार आहे? (इथे मला कोणाला दोष द्यायचा नाही, पण) नक्की तांत्रिक गोची कुठे झाली असेल? कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावं
- पुष्कर
2 Dec 2008 - 1:17 pm | पुष्कर
अनेक दिवसांनंतर पुन्हा 'संपादन' हा पर्याय सापडला. बदल केले आहेत.
14 Oct 2021 - 8:34 am | शिवाजी होळगे
14 Oct 2021 - 8:34 am | शिवाजी होळगे
14 Oct 2021 - 8:35 am | शिवाजी होळगे
14 Oct 2021 - 8:45 am | शिवाजी होळगे
14 Oct 2021 - 8:47 am | शिवाजी होळगे
14 Oct 2021 - 8:47 am | शिवाजी होळगे
14 Oct 2021 - 8:48 am | शिवाजी होळगे
4 Nov 2021 - 9:26 am | पुष्कर
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद! :)
19 Jan 2008 - 10:23 pm | प्रमोद देव
मात्र कविता म्हणून झकास आणि अर्थवाही आहे हे नि:संशय!
20 Jan 2008 - 12:50 am | सुनील
भाऊसाहेबांची चंद्रावर एक कविता होती, किंचित विनोदी. आता आठवत नाही. कुणाच्या लक्षात असेल तर कृपया इथे द्यावी.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
21 Jan 2008 - 10:00 pm | अविनाश ओगले
उपमा तव वदनाला त्याची मी ही दिली असती सुखे
थोडेही जर त्याला येते लाजता तुज सारखे
21 Jan 2008 - 10:07 pm | सुनील
"त्या" कवितेचा गोषवारा साधारणतः असा होता -
हे चंद्रा, तू पुरुषासारखा पुरुष, परंतु यच्चयावत सगळे कवी प्रेयसीच्या मुखाला तुझी उपमा देतात!
....
....
....
नेहमी तारकांच्या गरड्यात असतोस, तरीही रोहिणीला त्याचे अजिबातच वैषम्य वाटत नाही. कारण .........
संपूर्ण माहित आहे काय? असल्यास कृपया द्यावी!
(भाऊसाहेबांचा पंखा) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
7 Feb 2008 - 10:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खेळू नको बेधुंद ऐसा, चंद्रा अरे, तारांसवे
घे जरा लक्षात आहे, रोहिणीही तुजसवे
पृथ्वीवरी असतास जर का, छंद तू हा घेतला
खास तुझिया रोहिणीने,डायव्होर्स असता घेतला
-भाऊसाहेब पाटणकर
11 Feb 2014 - 9:24 am | सुनील
नाही. ह्या त्या ओळी नव्हेत. बरीच शोधाशोध करावी लागेलसे दिसते!
असो. सहा वर्षांनी प्रतिसाद दिल्याबद्दल क्षमस्व! ;)
20 Jan 2008 - 4:10 am | ऋषिकेश
वा पुष्कर,
अतिशय धन्यवाद!!! फार मस्त प्रकल्प सुरु करताय :) शुभेच्छा आनि अभिनंदन!
पुढील गझलेच्या प्रतिक्षेत :)
-ऋषिकेश
20 Jan 2008 - 9:57 am | विसोबा खेचर
म्हणतो..!
तात्या.
4 Feb 2008 - 8:35 pm | llपुण्याचे पेशवेll
एक मला आवडलेला शेर द्यायचा मोह आवरत नाही. भाऊसाहेब म्हणतात.
"दोस्तहो मैफील आपुली रंगण्या जर का हवी..
आम्हा नको सौजन्य तुमचे 'जिंदादिली' नुसती हवी"
पुण्याचे पेशवे
4 Feb 2008 - 8:38 pm | पुष्कर
क्या बात है पेशवे,
-आपला
(जिंदादिल) बाळाजी विश्वनाथ भट
5 Feb 2008 - 10:34 am | रिकामटेकडा
सांगेल काही भव्य, ऐसि शायरी माझी नव्हे
तो कविंचा मान, तितुकी पायरी मझी नव्हे |१|
आम्ही अरे साध्याच, अपुल्या जीवना सम्मानितो
सम्मानितो हासू, तसे या आसवा सम्मानितो |२|
जाणतो अंति ,अम्हाला मातीच आहे व्हायचे
नाहीतरी दुनियेत, दुसरे काय असते व्हायचे |३|
मानतो देवासही, ना मानतो ऐसे नव्हे
मानतो इतुकेच की, तो आमुचा कोणी नव्हे|४|
आहो असे बेधुंद, आमुची धुंदही साधी नव्हे
मेलो तरी वाटेल मेला, दुसरा कुणी आम्ही नव्हे|५|
13 Apr 2014 - 4:30 pm | वेल्लाभट
क्लास !!!!!!
6 Feb 2008 - 8:45 pm | llपुण्याचे पेशवेll
या ओळी मला फार आवडतात....
"आहो असे बेधुंद, आमुची धुंदही साधी नव्हे
मेलो तरी वाटेल मेला, दुसरा कुणी आम्ही नव्हे"
पुण्याचे पेशवे
7 Feb 2008 - 9:38 pm | llपुण्याचे पेशवेll
याविषयी थोडेसे.
"जे न देखे रवि ते देखे कवि" या थाटात शायर सूर्याला म्हणतो
"भास्करा कीव मजला येऊ लागते आधि मधि,
रात्र प्रणयाची तू रे पाहीली आहे कधि?"
(वरील शेराचे शब्द नक्की आठवत नाहीत. कोणास स्मरले तर सुधारणा सुचवावी)
यावर भास्कर जो स्वतःच तेजाचे, बाणेदार पणाचे प्रतिक आहे तो उत्तर देतो पहा काय ते
"मला ही या शायराची कीव येऊ लागते,
याच्या म्हणे प्रणयास याला रात्र यावी लागते"
-भाऊसाहेबांचा पंखा (फॅन:) )
डॅनी.
पुण्याचे पेशवे
2 Dec 2008 - 2:35 pm | परिकथेतील राजकुमार
नुसतेच ना दुनियेत तुमच्या, आलो आम्ही गेलो आम्ही
भगवन तुझ्या दुनियेस काही, देऊनी गेलो आम्ही
शायरी तुला अर्पून गेलो, माझे सर्वस्व ती
दुनिया तुला विसरेल भगवन, ना आम्हा विसरेल ती
भाउसाहेब म्हणजे असामान्य व्यक्तिमत्व :)
एके ठिकाणी ते म्हणतात ...
तू तरी या अप्सरांच्या नादी असा लागू नको
सांगूच का मृत्यो तुला मी का असा म्हणतो नको?
दुर्दशा आमुच्यापरी ऐसी जरी आली तुला
कुठवरी रडशील वेड्या, मरणही नाही तुला...
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
3 Dec 2008 - 3:48 pm | अनंत छंदी
मराठी गझलांवर एक धागा हवाच होता, ती उणीव या धाग्याने भरून निघाली आहे. आता सुरेश भटांच्या गझलांवरही चर्चा घडू द्या! एकूण मराठी गझलेचा प्रवास या विषयावर चर्चा होणे गरजेचे आहे. बिरुटे सर आपल्याकडून मराठी गझलेच्या प्रवासावर अभ्यासपूर्ण लेख येण्याची अपेक्षा आहे.
3 Dec 2008 - 7:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरुटे सर आपल्याकडून मराठी गझलेच्या प्रवासावर अभ्यासपूर्ण लेख येण्याची अपेक्षा आहे.
मराठी गझलांवर काथ्याकूट करता येईल, जसे की 'मराठीतील गझल काल आज आणि उद्या' त्यात वाचक म्हणून मलाही सहभागी होता येईल. मात्र गझलेसाठी आवश्यक असलेला मिसरा, मतला, काफिया,रदीफ,मक्ता यांचा किंवा गझलेवर हुकुमत गाजवून लेख लिहिता येईल इतका असा अभ्यास माझा नाही, त्यामुळे आपल्याला अपेक्षीत असलेला लेख आमच्याकडून घडेल याची शक्यता दिसत नाही. :( असे असले तरी नवोदितांच्या गझलेवर आणि सुरेश भटांच्या गझलांवर इथे लेखन आणि चर्चा चालूच असते त्याचबरोबर मिपावर गझल आणि गझलांच्या अभ्यासावर लिहिणारी बरीच जाणकार मंडळी असल्यामुळे कधीतरी या विषयावरही उत्तम लेख नक्की येईल.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे !
दिलीप बिरुटे
3 Dec 2008 - 9:53 pm | संदीप चित्रे
चंद्रमा हासे नभी शांत शीतल चांदणे
अमुच्या मात्र कपाळी अमृतांजन लावणे
लावण्या ते तसा नसतो कधी नाराज मी
हाय पण दैवा तेही आहे आमुच्याच हाती लावणे..
------
योग्य शब्दरचना नीट आठवत नाहीये... चूभूद्याघ्या... योग्य तिथे सुधारणा सुचवाव्या
3 Dec 2008 - 9:55 pm | सुनील
भाउसाहेबांचे खालील शेर माझ्या फार आवडीचे आहेत -
खेळलो इश्कात सार्या, धुंद आम्ही खेळलो
लोळलो मस्तीत, नाही पायी कुणाच्या लोळलो
अस्मिता इश्कात सार्या केव्हाच नाही विसरलो
आली तशीही वेळ, तेव्हा इश्क सारा विसरलो.
अवांतर - भाउसाहेब दृष्टीने अधू होते, हे खरे का?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
3 Dec 2008 - 11:37 pm | llपुण्याचे पेशवेll
दृष्टीने अधू होते किंवा नाही माहीत नाही.. पण नसावे कारण पेशाने वकील होते.
पुण्याचे पेशवे
15 Sep 2011 - 9:59 am | विश्वास कल्याणकर
भीती तिला प्रणयात कोणी पाहील याची वाटते
येवूनही स्वप्नी माझ्या हेच तिजला वाटते
म्हणते कशी कैसी तरी स्वप्नात ह्या आले तुझ्या
सारेच पण आहेत बाई भोवती जागे तुझ्या
जाणते सर्वांस यांना मी ही नव्हते साधी तशी
स्वप्नातही येतील मेले मी जशी आले तशी
भेटण्या जेव्हा तिच्या स्वप्नात मी गेलो तिथे
स्वप्नातही अपुल्या स्वत:च्या हाय ती नव्हती तिथे
त्रास ऐशा अप्सरेला हाच असतो सारखा
नेतो तिला उचलून जो तो आपुल्याच स्वप्नी सारखा
ऐकिले दुसर्या कुणाच्या स्वप्नात ती आहे तिथे
बोलाविले नव्हते तरीही धावुनी गेलो तिथे
आता तरी दुर्दैव वाटे नकीच माझे संपले
पोचण्या आधीच ते ही स्वप्न सारे संपले
- भाऊसाहेब पाटणकर
4 Dec 2008 - 12:17 am | बन्ड्या
मला आवडलेली अजून एक
जातो तिथे उपदेश आम्हा सांगतो कुणीतरी
किर्तने सारीकडे ..सारीकडे ज्ञानेश्वरी
काळ्जी आमच्या हिताची एवढी घेवू नका
जावू सुखे नरकात तेथे तरी येवू नका.
भाऊसाहेबांचा फॅन
...बन्ड्या
4 Jan 2009 - 12:22 pm | परिकथेतील राजकुमार
स्टार माझा वरील व्हिडिओ आता आंतरजालावर देखिल उपलब्ध झाला आहे, तो येथे उपल्ब्ध आहे.
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
5 Jan 2009 - 7:02 pm | नितीनमहाजन
हे वर्ष भाऊसाहेब पाटणकर यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे.
पेशाने वकील असलेल्या भाऊसाहेबांनी डोळे साथ देत नाहीत म्हणून वकिली बंद केली व त्यानंतर योगायोगाने ते शायरीकडे वळले. उर्दू शायरी वाचून त्यांच्या व आपल्या संस्कृतीतील फरक व त्याला अनुसरून उर्दू शायरीला आपण मराठी जन देत असलेला प्रतिसाद यातील फरक त्यांच्या लक्षात आला. अस्सल मराठी शायरी कशी असू शकते / कशी असावी याचा वास्तुपाठ भाऊसाहेबांनी घालून दिला.
उर्दू प्रियकर आपल्या प्रेयसीच्या मागे लाळ्घोटेपणा करीत फिरत असलेला शायरीमधे रंगवलेला असलो. तिची खुशामत करणे या शिवाय त्याला दुसरे काही सुचतच नाही.
उदा. "जो तुमको हो पसंद व्ही बात करेंगे, तुम दिनको अगर रात कहो तो रात कहेंगें".
तिने 'हो' म्हणावे यासाठी काहिही करायला तो तयार असतो. विचार करा हे आपल्याला कितपत पटते ते.
भाऊसाहेब म्हणतात:
कुसुमे स्वये हासून ना म्हणती ना ये,
पाऊल ना टाकू तिथे बाग ती आमची नव्हे
या बागेत फुललेल्या फुलांनी आम्हाला आमंत्रण दिले पाहिजे अन्यथा आम्ही येणार नाही (गेले उडत, काही गरज नाही आम्हाला.).
हा जो एक आत्मसम्मान आपण अपेक्षितो तो आपल्या संस्कृतीमधला आहे. पुढे ते म्हणतातः
भ्रमरापरी सौंदर्यवेडे असू जरी आम्ही,
इश्कात ना कधी भिक्षुकी केली आम्ही.
अस्मिता इश्कात सार्या केव्हाच ना विसरलो
आली तशीही वेळ तेव्हा इश्क सारा विसरलो.
खेळलो इश्कात बेधुंद आम्ही खेळलो
लोळलो मस्तीत, नाही पायी कुणाच्या लोळलो.
रडलो इश्कात जेव्हा आम्हा रडावे वाटले
तेव्हा नव्हे, इश्कास जेव्हा आम्ही रडावे वाटले
आसूंवरी अधिकार असेल ज्याला साधला
नुसताच नाही इश्क त्याला मोक्ष आहे साधला.
शायर सूर्याला विचारतो:
भास्करा आम्हा दयाही येते तुझी अधिमधी
पाहिली आहेस का रे कधी रात्र प्रणयाची कधी?
तो सूर्यही काही कमी वस्ताद नाही
तो शायराला उत्तर देतो:
आम्हासही या शायराची कीव येऊ लागते
याच्या म्हणे प्रणयास याला रात्र यावी लागते!!
भाऊसाहेबांची ही गजल मला फार आवडते. नाजुकता यापेक्षा नाजूक असू शकतच नाही:
नाजुकता ऐसी आम्ही पाहिली नाही कधी
नजरही तिच्यावरी टाकिली नाही कधी
भय मज नाजुकतेचे इतुके होते वाटले
भार या नजरेतला सोसेल नव्हते वाटले
टाकिसी हळुवार अपुली नाजुक इतुकी पाउले
टपकती हलकेच जैसी पारिजातकाची फुले
नाजुकता जाणून आम्ही आधीच होती बिछविली
पायतळी केव्हाच तुझिया विकल ह्रदये आमची
इतुका तरी स्पर्श ह्रदया होईल ऐसे वाटले
इतुकेतरी सौभाग्य उदया येईल ऐसे वाटले
कल्पना पण नाजुकतेची केव्हाच ना आली कधी
तुडवून गेली आम्हा, ना कळे गेली कधी
15 Sep 2011 - 5:18 pm | शाहिर
धागा वर कढल्यआ बदल आभर
15 Sep 2011 - 6:03 pm | अविनाशकुलकर्णी
असा धोका दिला
हाय ! तु आहे तरीही आम्हा असा धोका दिला
सांग ना मृत्यो, तुला आहे कधी का मी दिला
जन्मांतरी ज्या ज्या क्षणी , मी दुत तुमचा पाहीला
हातचे टाकून आलो , मी स्वार्थ नाही पाहिला
दोष ना देऊ जरी का आहेस आम्हा विसरलास
देवेंद्रही नादात ह्यांच्या इमान आहे विसरला
अप्सरांना त्याच आम्ही,आदाब केला शेवटी
मृत्युवरही हाय माझ्या, त्यांचीच सत्ता शेवटी
………भाऊसाहेब पाटणकर
.......................................
हंसतील ना कुसुमे जरी ना जरी म्हणतील ये
पाऊल ना टाकू तिथे,बाग ती अमुची नव्हे
भ्रमरापरी सौंदर्य वेडॆ आहो जरी ऐसे अम्ही
इष्कातही नाही कुठे भिक्षुकी केली अम्ही.
...............................
भीड मज बाई कुणाची, मोडवत नाही कधी
सुचवता कोणी कसेही,नाहीच ना म्हणवे कधी
एकदा सांगून बघते, " हे बघा ऐका जरा "
सांगते खुश्शाल मग मी " काय वाट्टेल ते करा "
16 Sep 2011 - 12:20 am | दैत्य
ओरिजिनल पोस्ट आणि बाकी सगळेच प्रतिसाद सुपरलाईक!
16 Sep 2011 - 1:21 pm | पांथस्थ
भाऊसाहेबांचा एक मिश्कील शेर (बर्याच वर्षापूर्वी वाचला आहे तेव्हा शब्द थोडे मागे पुढे झाल्याची शक्यता आहे. माफी असावी.) -
वार्धक्य जरी खुणावते मला वरच्या वरी
मी ही असा बेरकी त्याला चोरुन करतो शायरी
भाऊसाहेबांच्या जिंदादिलीला सलाम....
17 Sep 2011 - 9:59 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भाऊसाहेब म्हणतात-
'' पाहिली असती जरी का, लैला तशी कोठे आम्ही
शायरी नक्कीच काही, निर्मिली असती आम्ही
दैन्य पण अमुचे असे की, मीच सारे व्हायचे
मीच लैला व्हायचे अन् मीच मजनू व्हायचे''
-दिलीप बिरुटे
17 Sep 2011 - 10:23 am | नगरीनिरंजन
फार भारी! आधी वाचली होती तरी पुन्हा वाचून मजा आली.
23 Sep 2011 - 10:40 am | लई भारी
सुरेख धागा!
व. पुं च भाउसाहेबांच्या शायरीवर एक छान पुस्तक आहे. त्यावेळीच ह्या विलक्षण कलाकाराची ओळख झाली. अप्रतिम रचना आहेत!
9 Mar 2012 - 8:51 am | विश्वास कल्याणकर
व पुं ची भाउसाहेबांच्या शायरीवर रसग्रहणाची ऑडीयो कैसेट देखील होती. ती ऐकुनच मी भाउसाहेबांच्या शायरी कडे आकर्षीत झालो. त्याची सी.डी आता झाली आहे का. कारण ती कैसेट आता खराब झाली आहे.
23 Sep 2011 - 10:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च्यायला, ............................
भाऊसाहेब म्हणतात-
विसरावया हवेच तुला, विसरायचे कसे ?
नयनात येत नीर तया, रोकायचे कसे ?
वाटे नको कुणास व्यथा, माझी कळावया
गाली हसू , परंतु बळे, आणायचे कसे ?
-दिलीप बिरुटे
9 Mar 2012 - 9:06 am | चौकटराजा
मृत्यू बद्दल ईश्वरा बद्द्ल भाउसाहेब काय म्हणतात यावर कोणी प्रकाश टाकू शकेल काय?
सांग वा सांगू नको काल झाले काय ते
सैल होण्या अम्बाडा काही और व्हावे लागते
30 Sep 2021 - 4:28 pm | कर्नलतपस्वी
जन्मातही नव्हते कधी मी, तोंड माझे लपविले
मेल्यावरी संपूर्ण त्यांनी, वस्त्रात मजला झाकले
आला असा संताप मजला, काहीच पण करता न ये
होती आम्हा जाणीव की, मी मेलो, आता बोलू नये
कफ़न माझे दूर करुनी, पाहिले मी बाजूला
एकही आसू कुणाच्या, डोळ्यात ना मी पाहिला
बघुनि हे, माझेच आसू धावले गालावरी
जन्मभर हासून मी, रडलो असा मेल्यावरी
मरता आम्ही, शोकार्णवी बुडतील सारे वाटले
श्रद्धांजली तर जागजागी देतील होते वाटले
थोडे जरी का दु:ख माझे, असता कुणाला वाटले
जळण्यातही सरणात मजला, काहीच नसते वाटले
ऐसे जरी संतोष तेव्हा मानीला इतुकाच मी
कळलेच ना तेव्हा कुणा कफ़नात जे रडलो आम्ही
त्यांचेच हे उपकार ज्यांनी, झाकले होते मला
झाकती प्रेतास का ते तेव्हा कुठे कळले मला
लाभला एकांत जेव्हा, सरणात त्या माझ्या मला
रोखता आलाच नाही, पूर अश्रूंचा मला
जेव्हा चिता ही आसवांनी, माझी विझाया लागली
चिंता कसा जळणार आता, ह्याचीच वाटू लागली।
कवी - भाऊसाहेब पाटणकर
जो खऱ्या अर्थानं जगला
त्याला मृत्यू पण कळला
3 Oct 2021 - 8:09 am | पुष्कर
इतक्या वर्षांनी ही पोस्ट शोधून काढून प्रतिसाद दिल्याबद्दल अने आभार, कर्नलतपस्वी. शायरी तर छानच आहे ती, प्रश्नच नाही.
10 Feb 2014 - 3:54 pm | अनुप ढेरे
मस्तं धागा !
10 Feb 2014 - 7:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपावर कविता आणि गझलेचे लेखन करणारे सीमाभागातील साहित्य चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते अविनाश ओगलेंची आठवण झाली. :(
-दिलीप बिरुटे
12 Feb 2014 - 7:19 pm | युगंधर
शायरी ऐकून माझी सांगेल जो कि आता पुरे.
तो रातीच्या चुंबनाहि सांगेल कि आता पुरे?
3 Oct 2021 - 8:14 am | पुष्कर
दुसर्या ओळीत 'तो रतीच्या चुंबनाही' असे आहे, बहुधा टंकोचित्रित (टायपोग्राफिक) चुकीने राती झालेले असावे. काय जबरदस्त ओळ आहे ती!
12 Feb 2014 - 7:22 pm | युगंधर
http://www.youtube.com/watch?v=m3lARoLYyg4
11 Apr 2014 - 6:05 pm | शुचि
विलक्षण धागा. रसिकांसाठी मेजवानीच आहे. ज्या ज्या कोणी ओळी/कविता उधृत केल्या त्या सर्वांचे आभार.
उफ्फ!! क्या बात है!
12 Apr 2014 - 4:38 pm | रुमानी
अतिशय सुरेख धागा.
13 Apr 2014 - 9:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नुसती जशी डोक्यात आली चुंबनाची कल्पना.
गोर्या तिच्या गालावरी, उमटल्या सा-या खुणा.
-दिलीप बिरुटे
13 Apr 2014 - 10:54 am | अनुप ढेरे
व्वा! मस्तं!
14 Apr 2014 - 6:50 pm | शुचि
क्या नज़ाकत है की आरीज़ उनके नीले पड गये, हमने तो बोसा लिया था ख्वाब मे तस्वीर का ~अमीर मीनाई
आरीज = गाल
बोसा = चुंबन
16 Apr 2014 - 9:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खल्लास..... शेर आवडला.....!!!!
बोसा आणि आरिज चा अर्थ सांगितल्य़ामुळे शेर पोहोचला Thanks!!!
-दिलीप बिरुटे
16 Apr 2014 - 7:25 am | स्पंदना
काय नाव आहे भाउसाहेब पाटणकरांच्या गझल संग्रहाच?
16 Apr 2014 - 3:00 pm | रुमानी
जिंदादिली हे नाव आहे गझल संग्रहाच .:)
@शुचि...मस्त शेर !
16 Apr 2014 - 11:13 pm | शुचि
आहाहा नावही शोभेलसं आहे. धन्यवाद श्रुती.
18 Apr 2014 - 8:16 pm | nasatiuthathev
विशेष माहिती पूर्ण लेख ......
भाऊ साहेबांबद्दल एवढी माहिती पहिल्यांदाच कळली...
प्रतिसादातला खालील शेर विशेष आवडला
21 Apr 2014 - 1:34 am | बोबो
फारच छान. वपुंच्या एका पुस्तकात लेख आहे भाऊसाहेबांच्या शायरीवर… मला आवडते त्यांची शायरी…
14 Oct 2021 - 8:51 am | शिवाजी होळगे
14 Oct 2021 - 5:39 pm | चौथा कोनाडा
झकास धागा.
भाऊसाहेब पाटणकरांची किर्ती आणि शेरोसायरी बर्याच ऐकण्यात आली, पण युगंधर यांनी दिलेल्या लिंकमुळे साक्षात त्यांच्या तोंडून शायरी ऐकता आली.
मला आठवतंय त्या प्रमाणे भाऊसाहेब पाटणकर हे तसे दुर्लक्षितच होते पण वपुंनी त्यांच्यावर लेख लिहिला तेव्हा रसिक त्यांच्या प्रतिभेशी परिचित झाले.
असेच विमल लिमये यांच्या बद्दल " घर असावे घरा सारखे, नकोत नुसती नाती" ही घराघरात आणि मनामनात पोहोचलेली कविता हि विमल लिमये यांची आहे हे शोधून काढले आणि जगाला त्यांच्या प्रतिभेचा परिचय करुन दिला !
19 Oct 2021 - 6:23 am | पुष्कर
धन्यवाद
14 Oct 2021 - 6:26 pm | नीलस्वप्निल
धन्यवाद !