मध्यंतरी एका मैत्रिणीकडे गेले होते. म्हणजे आम्ही तिघी शाळेतल्या मैत्रीणी एका मैत्रिणीच्या घरात एकत्र जमलो होतो.
दुपारी चार ते सहा वाजेपर्यंत गप्पा मारायच्या असा बेत होता. मी त्या मैत्रीणीकडे कुसुमकडे वेळेवर पोहोचले. माझी दुसरी मैत्रीण विजू तीही वेळेवर आली. व्हॉट्सॲप ग्रुप बनून दोन तीन वर्षे झाली असली तरी विजू मला समोरासमोर मात्र शाळेच्या शेवटच्या दिवसानंतर आजच भेटत होती. सुरुवातीलाच आम्ही गळाभेट घेतली.
विजूबरोबर तिचा नवरा होता. कुसुमचा नवराही घरात होताच. आम्ही सगळे स्थानापन्न झालो. माझ्या लक्षात आलं की कुसुमच्या फ्लॅटच्या खिडकीबाहेरून बांधकामाच्या ड्रिलिंग मशीनचा कर्कश्श आवाज येतोय. तो कानाला त्रास देत होता. तिच्या फ्लॅटमधला सिलिंग फॅन चालू होताच पण उकाडा जाणवू नये म्हणून तिने एक टेबल फॅनही लावला होता. त्या फॅनचा घरघर असा मोठा आवाज येत होता. तोही कानावर आदळत होता. मी म्हटलं जाऊ दे. थोड्या वेळाने होईल सवय. शेवटी वयानुसार मोठ्या आवाजाचा त्रास जास्त होत असतोच.
मग आमच्या गप्पा सुरू झाल्या. कुसुमचे मिस्टर खूप उत्साहाने बोलण्यात सहभागी झाले होते. मात्र त्यांच्या आवाजातला दोष माझ्या कानांनी अचूक टिपला होता. ते बोबडे नव्हते पण लोबडे होते. त्यांचे उच्चार सदोष होते आणि आवाजाची पट्टी खूपच वरची होती.
विजूचे मिस्टरही खूप वरच्या पट्टीत बोलत होते. माझी मैत्रीण विजू म्हणजे त्यांची बायको पतिपरायणतेमुळे त्यांचेच अनुकरण करत वरच्या पट्टीत बोलत होती. सोफा थोडा लहान असल्यामुळे ती मला अगदी चिकटून बसली होती. तिचं तोंड माझ्या कानाच्या अगदी जवळ होतं, त्यामुळे तिच्या आवाजाचा घणाघात माझ्या कर्णसंपुटावर होत होता. आमची यजमानीण कुसुमची ध्वनीपातळीही कमी नव्हती. ती अधुनमधून आमच्या साठी पाणी,चहा, खाद्य पदार्थ आणायला आत जात होती,तेवढीच काय ती तिच्या स्वरयंत्राला विश्रांती.
मग आणखी एक विशेष प्रकार सुरू झाला. दोन्ही पुरुष एकमेकांशी उच्चरवात कोणत्या तरी स्वामी की महाराजांच्या चमत्कारांबद्दल बोलू लागले आणि या दोघीही त्याच वेळी समांतर, त्यांच्या जाऊबाई, नणंदा यांच्याबद्दल मोठमोठ्या आवाजात एकमेकींशी बोलू लागल्या एकाच वेळी बांधकामाचा, फॅनचा, आणि या चौघांचा आवाज. एकच ध्वनि कल्लोळ माजला. बरं, ते स्वामी, जाऊबाई आणि नणंद यांना मी दुरूनही ओळखत नव्हते.
मी मध्येच बोलण्याचा प्रयत्न केला. चालू दहशतवाद, महापालिका निवडणुका,वाढता भ्रष्टाचार, यांबद्दल बोलायला सुरुवात केली. एक दोन विनोद सांगितले. पण व्यर्थ.
मला आता डोकं भिरभिरल्यागत वाटायला लागलं. त्या चौघांनाही म्हणे डायबिटीस होता. म्हणून कुसमने त्यांच्याबरोबर मलाही अत्यंत कमी साखरेचा चहा आणून दिला. तो मला पिववेना. थोड्या वेळानं भानावर येऊन ते तिघं माझ्या कडे वळून म्हणाले,"तू काहीच बोलत नाहीयेस."
मला बोलण्याची मिळालेली ती एकमेव संधी मी मुळीच वाया घालवली नाही. मी कुसुमला म्हटलं,कुसुम, ती काचेची स्लायडिंग खिडकी बंद करतेस का? आणि तो टेबल फॅनही प्लीज बंद कर. आवाज थोडा कमी होईल आणि मला जरा ग्लासभर गार पाणी दे. मग मी बोलते."
पाणी पिऊन झाल्यावर मी म्हटलं,"अगं, मला वाटलं आपण तिघी भेटल्यावर आपल्या शाळेबद्दल बोलू. तिथल्या आठवणी जाग्या करु. आपल्या आवडत्या सरांबद्दल,बाईंबद्दल, बोलू. किती विषय मनात आहेत. आपल्याला आवडलेल्या कवितांवर बोलू, महारागीट जोशी सरांबद्दल बोलू. कुस्मे, तुझी आणि माझी खूप जवळची मैत्री होती. पण आपल्यात एक निकोप स्पर्धाही होती. कुणाचा नंबर पुढे येतोय याची आपल्याला उत्सुकता असायची. त्यावर आपण बोलू. विजू,तुझे केस खूप लांब होते आणि जाडही . त्यांच्या तू दोन वेण्या घालायचीस. आणि आपण लंगडी खेळायचो. माझी लंगडी चांगली होती आणि तुझी पळती चांगली होती. तुला पकडताना चॅलेंज वाटायचं. आणखी एक मोठीच गंमत म्हणजे शाळेच्या शेवटच्या वर्षात आपलं दोघींचं कडाक्याचं भांडण झालं होतं. आपण दोघी एकमेकींशी बोलत नव्हतो. अबोला असतानाच आपल्या दोघींची शाळा संपली. त्यानंतर आपण समोरासमोर आत्ता पहिल्यांदा भेटतोय. भांडण का झालं होतं, त्याचं कारण काय , काहीही आठवत नाहीये आज. पण आत्ता असं वाटतंय की आपली मैत्री आहे तशीच आहे. मध्ये काही घडलंच नव्हतं. हे सगळं आठवायचं बोलायचं होतं ग मला! पण आपण ते काही बोललोच नाही."
हे सर्व मी थांबून थांबून बोलत राहिले.
"तुम्हांला आठवतं का गं यातलं काही?", मी त्यांना विचारलं. त्यांना काहीच आठवत नव्हतं असं वाटलं. त्यांचे चेहरे निर्विकार होते. माझ्या लक्षात आलं. त्या त्यांचा भूतकाळ ओलांडून केव्हाच बाहेर आल्या होत्या. मीच एकटी उगीच स्मरणरंजनात मग्न होते.
माझं बोलणं संपलं. त्यानंतर सगळेच शांत बसले.
निघताना "आपण तिघी पुन्हा भेटू" असं म्हटलं आम्ही एकमेकींना. पण मला खरं तर त्यात रस वाटत नव्हता. नको नको त्या कर्कश्श आवाजांमुळे आमच्या गप्पांमध्ये रंगच भरला नव्हता. बोलणं राहूनच गेलं..
.....मग मी घरी परतले...
नंतर वाटलं आपल्या न राहवून बोलण्यामुळे सगळे गप्प झाले.आपलं काही चुकलं का?
प्रतिक्रिया
3 May 2025 - 10:17 pm | चित्रगुप्त
खूप छान लिहीले आहे आजी.
माझेही असे काही वेळा झालेले आहे, आणि त्या मित्रांना पुन्हा भेटण्याची उत्सुकता संपून गेलेली आहे.
4 May 2025 - 2:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आजी आवडलं गं लेखन. नेहमीच्याच रसाळ शैलीची गोष्ट. आपल्या घराशेजारी असे बांधकाम चालू असले की, एक नवीनच डोकेदुखी वाढते. सहन करण्याशिवाय काही पर्यायच उरत नाही. माझ्या घराशेजारी असेच एक बांधकाम वर्षभर सुरु होतं. दिवसभर काही नाही, पण रात्री येणारी चोरीची वाळु असावी, रात्री अकरा वाजेपासून तर पहाटे चार वाजेपर्यंत त्या गाड्यांच्या प्रवास सुरु असायचा. काय तो मानसिक त्रास विचारु नका.
आपल्या मैत्रीणींच्या गप्पांचे विषय आणि आपल्या कल्पनेतील विचार यातल्या गोष्टी भारी होत्या. काळ बराच पुढे निघून गेलेला असतो आयुष्यातील अनुभवांनी आपण कुठल्या कुठे गेलेलो असतो. काही काळ ज्यांच्याबरोबर गेला त्या काळातील आठवणींची एक व्हॅल्यु असते. काही रमतात काही नाही तेव्हा हे असं व्हायचंच.
लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे