अजून वाचतोय...या पुस्तकाने भूरळ पाडली, गारुड केलं जणू, मंत्रमुग्ध झालो.
---------------------------------------
डोंगरवाटा
लेखक : शेखर राजेशिर्के
प्रकाशन: सृजनरंग प्रकाशन
मुद्रक : प्रमोद घोसाळकर
संपादक : श्रीरंग पटवर्धन
मुद्रीतशोधन : उदय शेवडे
किंमत : रु.900
असं म्हणतात कि वीरांचे पोवाडे,वीरांनीच गावेत... त्याच न्यायाने, ह्या पुस्तकाचा परीचय लिहीण्याआधी पात्रता निकष ( क्लालीफीकेशन राऊंड ) पास करणे मला आवश्यक वाटले, म्हणून कनकेश्वर (अलीबाग) ट्रेक केला, काल पुण्यात पहाटे वेताळटेकडी वर जाऊन आलो. झाडांकडे पाहत होतो, पहाटेचा आकाशातला लालीमा पहात होतो, मनात डोंगरवाटा या पुस्तकाचाच विचार होता. फाल्गुनातल्या निष्पर्ण झाडांकडे पहावत नव्हते,
'झाडांचे झाले खराटे,
आकाशी रंगांचे फराटे '
असे चित्र होते.
---------------------------------------------
माझ्यामते डोंगरमाथा हे पुस्तक, सोफ्यावर लोळणारे समजू शकणार नाहीत,
त्यांनी केलेले तरल वर्णन, शब्दांची चपखल निवड, निसर्गाशी कृतज्ञ भावनांचे रंग, रंगांधळे लोक समजू शकणार नाहीत म्हणून आधी ते मन असणे गरजेचे आहे.
पायपीट करुन शरीरावरचा / मनावरचा मेद (फॅट) जाळून chiselled jaw चेहरा करण्याची आपली तयारी आहे का ? तसा चेहरा होणे व शीडशीडीत शरीर होणे ही डोंगरवाटा तुडवणा-यांसाठी निसर्गाची 'रिटर्न-गिफ्ट' आहे !
------------------------------------
अप्रतिम फोटोग्राफी : सुंदर फोटोंनी पुस्तक सजले आहे, ते प्रत्यक्ष पहाण्यासारखेच आहेत त्यावर मी काहीही बोलणार नाही.
------------------------------------------
पुढील उतारा डोंगरवाटा पुस्तकातून घेतला आहे.
" सह्याद्रीत फिरताना ज्या अनेक रावळांनी रात्री अपरात्री आसरा दिला, ज्या उंबरठ्यांनी खाऊ पिऊ घातले, सह्याद्रीच्या ज्या अनेक लेकरांनी डोंगर वाटा सुकर केल्या, न विसरता येणारे निर्व्याज प्रेम दिले, निखळ आनंद दिला, शुद्ध निस्वार्थी निरागस मानसिकतेचे दर्शन दिले, त्यापैकी बऱ्याच जणांना आयुष्यात पुन्हा कधीही भेटता आले नाही त्याची खरोखरीच खंत वाटते. ही खंत त्या सोनेरी क्षणांभवती घट्ट विणून ठेवलेली आहे. ती वीणच आता सध्याच्या विचित्र विश्वात आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलवत असते. अशा त्या सर्व प्रेमळ मैत्रीला त्या उंबरठ्यांना त्या गावकऱ्यांना त्या राहुळांना, त्या सर्व वाघ्या कुत्र्यांना, त्या धबधब्यांना, त्या ओढ्यांना, त्या नद्यांना, त्या पक्षांना, त्या जंगलांना, त्या जंगलात, अवचित दर्शन देणाऱ्या प्राण्यांना, त्या सोनकीच्या कारवीच्या फुलांना, त्या असंख्य रानफुलांच्या सड्यांना व त्यांच्या सुगंधाला त्या गडकोटांना त्या कातळाकड्यातील अमृततुल्य थंडगार पाण्याला त्या मुसळधार पावसाला त्या निसरड्या रानवाटांना त्या गच्च धूकटाला, त्या भन्नाट बोचऱ्या थंडी वाऱ्याला, त्या चुलीतल्या ओल्या लाकडांना त्या झोंबणाऱ्या धुराला. त्या संपूर्ण राकट प्रेमळ अशा नितांत सुंदर निसर्गाला तिथपर्यंत पोहोचवणाऱ्या एसटीला, मायबाप सह्याद्रीला व अर्थातच डोंगरवाटांना हे पुस्तक अत्यंत आदर व विनयपूर्वक अर्पण."
शेखर राजेशिर्के
----------------------------------------------
my comment,
'प्यार तेरी पहली नजर
को सलाम....' लिहीणा-या आनंद बक्षींना फिल्मफेअर मिळते मग एवढे भावपूर्व,
हृदयातून लिहीणा-याला काय मिळाले पाहिजे (?!) आपली दाद च सर्वस्व आहे.
पुस्तक विकत घेऊन / वाचून कसे वाटले, कायकाय आवडले ते तरी प्लीज सांगाल का?
------------------------------------------------
पुढील उतारा डोंगरवाटा पुस्तकातून घेतला आहे.
" 24. साहसी मोहीम करंगळीवरची
वेरूळचे कैलास लेणे हे जसे मानवनिर्मित आक्रीत तसेच माहुलीतील सुळके हे निसर्गनिर्मित आक्रीतच आहे. अगदी एखादं दोन किलोमीटर लांबीचा कातळ खंड निसर्गाने वरून कोरायला घेतला आहे. सतत चालत असलेली ही अदाकारी लक्षावधी वर्षांपासून ची आहे. परंतु ही अदाकारी पाहायला वाट बरीच वाकडी करावी लागते. शारीरिक क्षमतेचा कस लागतोच पण मानसिक जाणीवाही जिवंत ठेवाव्या लागतात. वेरुळचे कैलास लेणे हे आधी कळस मग पाया अशा जगावेगळ्या तंत्राद्वारे निर्माण केलेले आहे. वरून नको तो खडक कोरून शिल्लक राहिलेल्या कातळात स्वर्गातील सौंदर्य निर्माण केले आहे अगदी तेच कार्य निसर्गाने माहुरी परिसरात हाती घेतले आहे. "
शेखर राजेशिर्के
---------------------------------------------------------
वाचलेच पाहीजे असे पुस्तक, हे पुस्तक आपल्याला जाणीवेच्या / अनूभवाच्या चलनात श्रीमंत बनवते
प्रतिक्रिया
25 Mar 2024 - 9:42 pm | कंजूस
चांगलं लिहिलंय. पण किंमत फार वाटतेय. रंगीत चित्रांमुळे किंमत वाढली असेल.
...
बाकी वर्णनातला निसर्ग आणि गावजीवन अनुभवायचे असेल तर सुट्टीचे दिवस टाळावे लागतात.
26 Mar 2024 - 9:07 pm | बाजीगर
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
लेखकांना कळवतो.
बघू काही मध्यममार्ग ते सुचवतात का.