तो जहाल नास्तिक होता चुकूनही त्याने कधी देवाला नमस्कार केला नव्हता. अंधश्रद्धेच्या विरुद्ध चालणाऱ्या मोहिमेत तो नेहमीच पुढे राहायचा. देवी देवतांची आणि संत महात्म्याची निंदा केल्यामुळे त्याला कधी-कधी मारही खावा लागायचा. पण समाजाच्या हितासाठी एवढे कष्ट तर सहन करावेच लागतात, असे त्याचे मत होते. त्याने स्वतःचे लग्न स्मशानात करण्याचे ठरविले. परिणाम वयाची पस्तीशी उलटली तरी त्याचे लग्न जमले नाही. शेवटी एक हुशार मुलगी त्याच्याशी, त्याच्या अटींवर लग्न करायला तयार झाली. पण त्यासाठी त्याला तिच्या बापाला लग्नापूर्वी हुंडा म्हणून रोख दहा लाख द्यावे लागले.
त्याने लग्नाची जय्यत तयारी सुरू केली. समाजात लग्न संबंधी पसरलेल्या परंपरेंना तडा देण्यासाठी त्याने गुरुजी ऐवजी एका अघोरीला लग्न लावून देण्याचे कार्य सोपविले. अघोरीने त्याचा लग्नाचा मुहूर्त रात्री दोन वाजताचा ठरविला. आघोरीच्या मते त्यावेळी स्मशानातील सर्व भूत-प्रेत जागृत होऊन या लग्नात उपस्थित राहतील. ब्रेकिंग न्यूज देणारे मराठी पत्रकार ही तिथे पोहचले. आघोर लक्षण मुहूर्तावर लग्न पार पडले. लग्नात अग्नी ऐवजी जळत्या चितेच्या भोवती सात प्रदक्षिणा घातल्या गेल्या. लग्नात उपस्थित सर्व अंधश्रद्धा विरोधकांनी चितेवर भाजलेल्या चिकन आणि मटनच्या सोबत देशी दारूवर ताव मारला. त्यांच्या लग्नाची बातमी मिडियात प्रसिद्ध झाली. काही ब्रेकिंग पत्रकारांचे म्हणणे होते त्या लग्नात हडळीनीं हडळाष्टक म्हंटले होते. काहींच्या दावा होता, कवट्या वेताळ आणि तात्त्या विंचू ने प्रत्यक्ष येऊन नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद ही दिला होता. असो.
लग्न झाल्याच्या दुसऱ्या दिवशी त्याला कळले त्याची बायको त्याच्यापेक्षा ही एक पाऊल पुढे होती. ती त्याला म्हणाली दिवसा जागणे आणि रात्री झोपणे ही पण एक अंधश्रद्धा आहे. मी रात्री जागणार आणि दिवसा झोपणार आहे. त्याला वाटले, आपण हा विचार आधी का नाही केला. अंधश्रद्धेच्या पुढच्या मीटिंगमध्ये हा विषय सर्वांसमोर मांडला पाहिजे. दिवसा जागे राहाण्याच्या अंधश्रद्धेचा विरोध हा केलाच पाहिजे. पण बायकोची दुसरी अट त्याला खटकली. बायको म्हणाली आपण हनिमून गोवा ऐवजी स्मशानात साजरा करू. लोक हनिमून रात्री साजरा करतात. आपण शहरातील प्रसिद्ध मोक्षधाम स्मशानात दिवसाच्या वेळी हनिमून साजरा करू. तो तिला म्हणाला मला तुझे विचार पटतात. पण दिवसाच्या वेळी स्मशानात हनिमून साजरा करणे शक्य नाही. एक तर तिथे लोकांची वर्दळ असते आणि समजा एकांत मिळाला तरी तिथले कर्मचारी तिथे असे काही करू देणार नाही. पकडून पोलिसात देतील. त्यावर ती म्हणाली, तुम्ही जर खरे अंधश्रद्धा विरोधक असाल तर तुम्हाला माझी ही अट मान्य करावीच लागेल त्याशिवाय मी तुम्हाला माझ्या अंगाला हातही लावून देणार नाही. आता मात्र त्याची पंचाईत झाली. काय करावे त्याला सुचेनासे झाले. आधीच पस्तीशी उलटून गेलेली होती. तब्बल दहा लाख रुपये तिच्या बापाला दिल्यानंतर ती लग्नाला राजी झाली होती. लग्नाचा सर्व खर्चही त्यानेच उचलला होता. सर्व जमापूंजी त्यात खर्च झाली होती.
आता तुमच्या मनात प्रश्न येईल पुढे काय झाले असेल. अखेर दोन चार दिवस विचार करून त्याने हात जोडून तिला विनंती केली, काही दुसरा उपाय आहे का. ती म्हणाली हो आहे. तुला इतरांसारखे अंधश्रद्ध बनावे लागेल. आपण पुन्हा देव ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न करू. खर्चाची चिंता करू नको. तू आधीच दहा लाख माझ्या बापाला दिले आहेत. त्यातच सर्व होईल. लग्नानंतर आपण आधी घराण्याच्या कुलदेवीचे दर्शन घेऊ आणि मग हनिमूनला गोव्याला जाऊ. काम वासना ही निसर्गाने माणसाला दिलेली अमूल्य देणगी आहे. हक्काची बायको मिळाल्यानंतर स्वाभाविकच होते त्याची कामवासना ही भयंकर भडकलेली होती. बायकोची अट मान्य करण्याशिवाय त्याच्यापाशी दुसरा मार्ग नव्हता. मोठ्या प्रयत्नांनी आणि दहा लाख हुंडा देऊन मिळालेली बायको गमावणे तेही फक्त एका विचारधारेसाठी, कदापि उचित नाही, एवढे कळण्या लायक बुध्दी ही त्याच्यापाशी होती. बायकोच्या इच्छेला मान देत त्याने देव ब्राह्मणांच्या साक्षीने पुन्हा लग्न केले. अंधश्रद्धा विरोधकांनी त्याच्या कृत्याची निंदा केली आणि त्याला संस्थेतून बाहेर काढले. पण त्याला त्याची पर्वा नव्हती. बायकोला खुश ठेवण्यासाठी तो रोज सकाळी उठून स्नान संध्या आणि देवाची पूजा करतो. अभक्ष्य खाणे आणि पिणे ही त्याला सोडावे लागले. एक मात्र खरं, रात्री बायकोच्या हाताने केशर मिश्रित सुगंधीत दूध प्राशन करण्याचा आनंद तो घेतो. .....
प्रतिक्रिया
5 Aug 2023 - 11:30 am | टर्मीनेटर
कथानायकाची झालेली केविलवाणी अवस्था बघून एक हिंदी शेर आठवला...
असो, कल्पनाविलास मात्र आवडला 👍
5 Aug 2023 - 2:20 pm | अहिरावण
ही अवस्था बहुतेक तथाकथित डाव्या विचारांच्या दळभद्री लोकांची होत असते.
5 Aug 2023 - 2:26 pm | वामन देशमुख
कथा, कल्पना, शैली तिन्ही आवडले!
5 Aug 2023 - 3:20 pm | कर्नलतपस्वी
बरेली की होगी जो उल्टे बांस बरेली ले गयी.
कधी कधी द्राविडी प्राणायाम करावा लागतो.
आवडली.
5 Aug 2023 - 4:24 pm | चित्रगुप्त
मस्त आहे कवि... म्हणजे कल्पनाविलास हो.
हे 'अघोरी' असे उपलब्ध असतात का ? कुठे ? जुन्या साहित्यात 'चांडाळ' असायचे, ते हल्ली असतात का ? की फक्त 'चांडाळ -चौकडी' या शब्दातच राहिलेले आहेत ?
7 Aug 2023 - 6:07 pm | चौथा कोनाडा
हा .. हा .. हा ..
लई भारी कव्हरेज !
8 Aug 2023 - 8:53 am | विवेकपटाईत
धन्यवाद