आम्हां काय त्याचे ??!

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
16 May 2023 - 12:32 pm

अकरा मे चा दिवस. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता. रिटायर्ड केंद्र सरकार कर्मचारी श्रीमती. राधाबाई, सकाळी अकरा वाजल्यापासून टीव्हीसमोर बसलेल्या होता. त्यांचं असं नेहमीच होतं. क्रिकेट मॅच (त्यात भारत खेळत असला पाहिजे हं मात्र! 'इतर' दोन देशातल्या मॅचमध्ये उनको इंटरेष्ट नहीं ।)

हां ,तर क्रिकेट मॅच -अगदी बाॅल टु बाॅल-,निवडणुकींचे निकाल,(विधानसभा, लोकसभा, अगदी पंचायत समित्यांचे सुद्धा), कोर्टाचे निकाल, असं काही असेल तर राधाबाई पहाटे उठून, लवकर सर्व आटोपून, शुचिर्भूत होऊन,धूतवस्त्र नेसून,सुखासनात टीव्ही समोर बसत. नजर (नासिकाग्रावर नव्हे तर) टीव्हीवर खिळलेली असे! कान टीव्हीच्या आवाजावर एकाग्र झालेले! ध्यानाला बसलेली ,भान हरपलेली एखादी साधकच जणुकाही!

पण बाईंचा धीर हळुहळू सुटत चालला. अकरा वाजता निकाल कळेल या अपेक्षेने बसलेल्या होत्या त्या !

आगोदर घटनापीठ साडेअकरा वाजता बसेल अशी बातमी. मग काय तर कोर्टरुममध्ये खुर्च्या लावताहेत,अशी बातमी. बारा वाजता एकदाचं कोर्ट बसलं. बारानंतर निकाल वाचायला सुरुवात झाली. राधाबाई सरसावून बसल्या तर काय, आधी दिल्ली केसचा निकाल वाचणार म्हणे. किती आवरायची उत्सुकता!

राधाबाईंचं विचारचक्र सुरू झालं. आता बातमी कळेलच. ती मनात साठवून ठेवेन. आपल्या मनासारखा निकाल लागला तर आनंदाची आरोळी ठोकेन. जवळच्यांना ते निकाल ताबडतोब व्हाॅटस्ॲप करेन.

खूप वेळा एखाद्या निर्णायक क्षणी उत्सुकता आणि आनंदाचा अतिरेक होतो. ग्रुपवरचे सगळेच क्षणिक चिडीचूप,नि:शब्द होतात. मोबाईलकडे कुणाचा हातच जात नाही. मोबाईलची रिंग,व्हाॅटस् ॲपच्या मेसेजचं कुंई सुद्धा नको वाटतं. श्वास रोखले जातात. आsssणि जर आपल्या मनाप्रमाणे विराटनं सिंक्सर मारली, किंवा आपला उमेदवार ट्रिमेंडस मताधिक्य मिळवून आघाडीवर असला तर किंचाळणं,टाळ्या, टीव्ही कडे बघून फ्लाईंग किस, शिट्ट्या वगैरे सुरू होतं. शेजारी आवाजाचा त्रास होतोय म्हणून तक्रार करत नाहीत. कारण त्यांच्या घरीही तेच लोकनाट्य सुरू असतं.

आपल्या मनासारखा निकाल लागला तर आपला आनंद पोटात, मनात, शरीरात, आकाशात कुठेच मावेनासा होतो.

हां,तर ... अकरा मे. सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय. बाईंची टीव्हीवर नजर खिळलेली. दिल्ली केसचा निकाल संपला. आता आपला! बाई सरसावून बसल्या एकच्या सुमारास निकाल आला.

शिंदे फडणवीस सरकार अबाधित राहिलं. राधाबाई फडणवीसांच्या मोठ्ठ्या फॅन होत्या. त्यांचं एकट्यानेच बसल्याजागी आनंदानं किंचाळणं थांबल्यावर त्यांना जाणवलं की हे ताबडतोब कुणाशी तरी शेअर केलं पाहिजे. मनात आनंदाच्या फुंकरीने फुगवलेले फुगे हातात धरून त्यांनी एकेकाला फोन करायला सुरुवात केली.

पहिला फोन त्यांनी स्वत:च्या मुलाला केला. त्यानं फोन उचलला नाही. "इन द मीटिंग. प्लीज मेसेज इफ एनिथिंग व्हेरी इंपॉर्टन्ट" असा उलट मेसेज त्यानं केला. बाईंच्या हातातला उत्साहाचा एक फुगा फुटला.

मग त्यांनी एका मैत्रिणीचा फोन फिरवला. आनंदाने कापणाऱ्या आवाजात ती बातमी सांगितली.
तर मैत्रीण म्हणाली,"ओह.ओके.आज होता का निकाल? मला माहीतच नाही! मी आत्ता नेटफ्लिक्सवर मूव्ही बघतेय. व्हेरी इंटरेस्टिंग फिल्म! नंतर सांगते त्याबद्दल. बाय."

मग त्यांनी एका राजकारणात इंटरेस्ट असलेल्या मैत्रीणीला फोन केला. तिनं खूप रिंग वाजल्यावर उचलला. आणि अगदी खर्ज आवाजात म्हणे "पटकन बोल, अगं माझे मामा वारले, आत्ता तिकडेच आहे. बॉडी आता नेताहेत." बाईंनी "ओह सॉरी.. टेक केअर. नंतर बोलू." असं म्हणत फोन कट केला. मरणापुढे न चाले तर्क जाणत्याचा..

मग त्यांनी विचार करून आपल्या ऑफिसातल्या (अजून निवृत्त न झालेल्या) एका कलीगला फोन केला. तो म्हणाला की, त्यात काय विशेष? हे नाहीतर ते. जाऊ दे मी खविसाच्या केबीनमध्ये आहे. बोलू नंतर." खवीस म्हणजे त्यांचा बॉस.

त्यांनी चिकाटी न सोडता आणखी एका मैत्रिणीला फोन केला, बराच वेळ रिंग वाजल्यानंतर तिनं फोन उचलला. बरळत्या आवाजात ती म्हणाली,"आत्ता झोपलीय बाय."

बाईंनी मग ब्रेक घेतला. दोन तास त्या शांत बसल्या. त्यांनी एकटीनंच आनंदाचे पेरु खाल्ले. पाच वाजता त्यांनी म्हटलं, सगळ्यांच्या दुपारच्या झोपा, चहापाणी झालं असेल,आता परत नवीन उत्साहाने फोन करावेत. मग एका मैत्रिणीला फोन केला. ती म्हणाली,"अगं मी पुण्यात आहे. एका लग्नाला. आता थोड्याच वेळात सीमांत पूजन आहे. उद्या सकाळी लग्न. इतकी गडबड आणि घाई की काही विचारू नकोस. इतके नातेवाईक भेटताहेत. एका क्षणाची फुरसत नाही. उद्या रिसेप्शन करुन आम्ही निघणार. "हे" पण आलेत."

आता "हे" पुराण सुरू होण्यापूर्वी बाईच घाईघाईने आटोपते घेत म्हणाल्या, "बोलू नंतर".

मग त्यांनी वहिनीला फोन केला. ती म्हणाली,"चांगली बातमी दिलीत वन्सं. मी इथं सकाळीच आलीय वास्तुशांतीला. दिवसभर इथंच होते. घरी गेल्यावर बातम्या बघेन. आम्हांला इथं काहीच माहिती नाही. मी सांगते इथं सगळ्यांना."

मग एक जुना मित्र आठवला. तो तरी उत्साहाने दीर्घ चर्चा करेल अशा खात्रीने त्याला फोन लावला.
"अरे, कळलं का? सरकार टिकलं. अबाधित.."

तिकडून,"हॅलो,हॅssssलो. हॅलो... आवाज ब्रेक होतोय तुझा."

"अरे सरकारबद्दल निकाल होता ना. बातमी नाही का बघितलीस?", बाई वैतागल्या.

"काहीही ऐकू येत नाहीये इथं हॉटेलवर रेंजच नाहीये. महाबळेश्वरला आलोय.. काय?कसला निकाल? हॅलो हॅssssलो."

बाईंनी चिडून फोन बंद केला.

शेवटचा एक मित्र. त्याच्याऐवजी त्याच्या बायकोनं फोन उचलला. ," बातमी?आनंदाची बातमी? तो बाथरूममध्ये आहे. फ्रेश होतोय. ए,कसला तरी निकाल लागलाय. बाहेर ये लवकर." शेवटचं वाक्य नवऱ्याला उद्देशून.

मी कुणाला सांगू ही आनंदाची बातमी! सूनबाई घरीच पण तरी कामावर. तिची झूम मीटिंग चालू. नातू भर दुपारी क्रिकेट खेळायला गेलेला!

तापलेला टीव्ही तसाच चालू ठेवून बाई तीच तीच बातमी पुन्हा पाहात बसल्या.

शेवटी संध्याकाळच्या स्वयंपाकाची बाई आली. हक्काचा श्रोता आला. बाईंनी तिला ती बातमी आनंदानं सांगितली. ती शांतपणे म्हणाली,"अहो बाई, कुणी का येईना! आम्हांला काही देणं नाही. घेणं नाही. आमच्या आयुष्यात काय फरक पडतो? आम्हांला काय त्याचं?"

बाई स्तब्ध झाल्या.

"चहा घेणार?" या तिच्या प्रश्नाकडे बाईंचं लक्षच नव्हतं.

त्यांना वाटलं.. "खरंच. यांना काय फरक पडतो आणि मलाही काय फरक पडतो??"

बाई आता बातम्यांऐवजी फक्त मालिका बघतात.

साहित्यिकसमाजजीवनमानप्रकटनविचार

प्रतिक्रिया

नेहमीप्रमाणेच मस्त लिहिलंय आजी 👍

कुणी का येईना! आम्हांला काही देणं नाही. घेणं नाही. आमच्या आयुष्यात काय फरक पडतो? आम्हांला काय त्याचं?

+१ 😀

प्रकाश घाटपांडे's picture

16 May 2023 - 6:04 pm | प्रकाश घाटपांडे

राधा बाई निकाल काही का लागेना आपल्या पेन्शनला काही फरक पडत नाही हो!

राजेंद्र मेहेंदळे's picture

16 May 2023 - 7:38 pm | राजेंद्र मेहेंदळे

कथा वाचताना हसायला येत होते, पण त्याला असलेली कारुण्याची झालरही सतत टोचत होती. सगळ्या पेन्शनरांचा हाच प्रॉब्लेम आहे. सगळे जग धावतेय, आणि आपण तिथेच. मी ही काही वर्षात या अवस्थेला पोहोचेन. अशा वेळी काय करावे? काय क्रावे?काय क्रावे?

कर्नलतपस्वी's picture

17 May 2023 - 8:35 am | कर्नलतपस्वी

ज़रूरी नाही.

कितीतरी अशा गोष्टी आहेत ज्यात निखळ आनंद मिळू शकतो.

राजकारण,क्रिकेट, सिरीयल यात आजिबात रस नाही. टि व्ही सहसा बघतच नाही.

बाल्कनीतून फुलणारी फुले,सकाळची निसर्ग भ्रमंती,दुपार ओ टी टी वर, वामकुक्षी,संध्याकाळी सोसायटीतील कट्ट्यावर समवयस्क, तरूण,लहान मुले, यांच्याबरोबर वेळेचा सदुपयोग,रात्री आठ तास झोप. मराठी पुस्तके व मिपा,कायप्पा सारखी सोमी आहेतच.

अकरा वर्ष झाली रिटायर्ड फलंदाज आहे.

वृद्ध देखणा चेहरा माझा
बिगुल मुखातून वाजे
पराभवाच्या पर्वा मध्ये
जसे उजळती राजे

मी माझ्यावेळेला धावलो पण आता जग धावतयं म्हणून दु:खी होत नाही.

No regrets.

राजेंद्र मेहेंदळे's picture

17 May 2023 - 11:28 am | राजेंद्र मेहेंदळे

असं पाहिजे बघा!! तुमची शिकवणी लावतो आता :)

चांदणे संदीप's picture

16 May 2023 - 7:47 pm | चांदणे संदीप

बिच्चा-या राधाबाई! कित्ती वाईट्ट लोक्स असतात जगात. ऐकून घेणा-यांची संख्या दिवसेंदिवस रोडावत चालली आहे. ऐकून घेतलं तरी आपल्याला अपेक्षित प्रतिसाद येईलच असे नाही. कित्ती कठीण जिंदगानी.

सं - दी - प

सरिता बांदेकर's picture

16 May 2023 - 9:29 pm | सरिता बांदेकर

माझं नेहमीच होतं असं.राजकारणामध्ये कुणाला स्वारस्य नसतं,अगदी माझ्या नवऱयाला सुद्धा.
माझ्या आजूबाजूचे पेपर पण वाचत नाहीत.
मग असेच प्रतिसाद मिळतात.
तुम्ही खूप छान लिहीलं आहे.
मला माझ्या आयुष्यातला,डायरीत लिहीलेला एक दिवस मी वाचतेय असं वाटलं.
लिहीत रहा.

सिरुसेरि's picture

17 May 2023 - 3:34 pm | सिरुसेरि

छान लेख . सिंहासन चित्रपटातला पत्रकार दिगु आठवला .

टर्मीनेटर-"नेहमीप्रमाणे मस्त लिहिलंय"हा तुमचा अभिप्राय वाचून आनंद झाला.
प्रकाश घाटपांडे -खरंय तुमचं. धन्यवाद.
राजेंद्र मेहेंदळे -"कारुण्याची झालर असलेलं लिखाण, सगळ्या पेन्शनरांचा हाच प्राॅब्लेम" हे तुम्ही खरं बोललात.
कर्नल तपस्वी -तुमचा दृष्टिकोण अत्यंत सकारात्मक आहे. तुमचं उत्तरही तर्कशुद्ध, समर्पक. तुमचं रुटीन अनुकरणीय आहे.

चांदणे संदीप- राधाबाईंबद्दलची तुम्हाला वाटणारी सहानुभूती तुमच्या उत्तरातून प्रगट होतेय.

सरिता बांदेकर -"माझ्याच आयुष्यातल्या डायरीतला एक दिवस मी वाचतेय असं मला वाटलं."खूप खूप धन्यवाद सरिताताई.

सिरुसेरि- तुम्हांला "सिंहासन"चित्रपटातला दिगू आठवला...... मला पण.

सर्वच अभिप्राय देणाऱ्यांचे मन:पूर्वक आभार.

मुक्त विहारि's picture

10 Jun 2023 - 12:06 pm | मुक्त विहारि

लेख आवडला ...

बबन ताम्बे's picture

10 Jun 2023 - 2:06 pm | बबन ताम्बे

अगदी वास्तव रेखाटले आहे.

मागच्या ऑगस्टपासून असंच होतंय . अजूनही अध्यक्षांचा निकाल बाकीच आहे. पण आता त्यांनी तारीखच दिली नाहीय. पुढच्या वर्षीची कॅलेंडरं पण फुटपाथवर विकायला येतील. पण आपण आशावादी असावं.

विवेकपटाईत's picture

11 Jun 2023 - 9:21 am | विवेकपटाईत

90% मध्यम आणि उच्च मध्यमवर्गीय परिवारातील अधिकांश सदस्यांना राजकारणात रस नाही. दिल्लीत मोठ्या प्रमाणावर सरकारी कर्मचारी आणि पेंशनर मतदार राहतात. पण याच दिल्लीत मतदान 50% ही होत नाही. अधिकार मतदान कधीच करत नाही. दुसरीकडे शांतीपूर्ण मतदाता ऐंशी टक्क्यांपेक्षा कमी मतदान कधीच करत नाही. त्यांना दीर्घकालीन फायदा माहित आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Jun 2023 - 10:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निकालाची उत्सुकता होतीच. पहिल्या काही ब्रेकींग न्युजवरुन एकतर्फी निकाल
लागतोय असे वाटले, मग डकवर्थ लूईस नुसार ते ठरविण्यात आलं. सगळं भारी होतं.

-दिलीप बिरुटे