कॅलेंडर

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
21 Feb 2023 - 2:03 pm

आपण कुठेही एखादा फाॅर्म भरायला गेलो तर त्यात तारखेचा रकाना असतोच. आपली स्मृती आपल्याला दगा देते आणि आपल्याला नेमकी त्यादिवशीची तारीख आठवत नाही. मग आपण समोर पाहतो. तिथं भिंतीवर कॅलेंडर असतं. ते पाहून आपल्या ला तारीख आठवते,आपण ती लिहितो. कॅलेंडर अर्थात् दिनदर्शिका अशी एक उपयुक्त वस्तू आहे.

दिनदर्शिका ह्या विविध प्रकाशनसंस्थांच्या, विविध भाषांमध्ये उपलब्ध असतात. त्यात तारखांबरोबरच विविध सण, उत्सव,तिथ्या, आणि सर्व धर्मीयांना उपयुक्त माहिती असते.

दिनदर्शिका ही अतिशय उपयुक्त वस्तू तर आहेच पण त्याचबरोबर ती अतिशय इंटरेस्टिंग आणि मनोरंजक वस्तू आहे.

नव्या वर्षाच्या दिनदर्शिकेची मला जाम उत्सुकता असते. ती नोव्हेंबर महिन्यातच शिगेला पोहोचते. ते हातात आलं की माझा वेळ मस्तच जातो. अहो, नवीन वर्षाच्या कॅलेंडरचं ,म्हणजे विशेषत: कालनिर्णयचं मागचं पान उलटा जरा! त्यात भरपूर चांगले लेख, पाककृती, लहान लहान उपयुक्त माहितीच्या टीप्स, राशीभविष्य ("आम्ही नाही विश्वास ठेवत!"असा आव आणून खूप लोक ते चोरुन वाचतात.) असं खूप काही असतं. पूर्वी या पानावर पुलं,वपु, जयवंत दळवी,ह.मो.मराठे यांसारख्या सव्यसाची लेखकांचं लिखाण असायचं. बुद्धीला मेजवानी असायची ती! ही मागची पानं मस्तच असतात.

कॅलेंडरवर जाहिराती ही खूप असतात. त्यांतून नव्या जुन्या उत्पादनांची माहिती कळते.

आता पुढची पानं! किती माहिती असते त्यांत! आपल्याला फक्त आषाढी आणि कार्तिकी एकादशी माहीत असते.(महाशिवरात्रही) पण कॅलेंडरवर पुत्रदा,षट्तिला,जया, विजया, भागवत,आमलकी अशा अनेक एकादशांची नोंद असते. बिरसा मुंडा जयंती,सीतानवमी,नारद जयंती असेही उपेक्षित काहीसे अपरिचित विशेष दिन असतात. काही अर्थ न समजणारेही शब्द असतात. निशीथकाल,वर्षीतपारंभ,आयंबील ओळी,अनंगव्रत, धनिष्ठानवकारंभ,जरस्तोस्तनो दिसो,तिशाबी आव,अदु:खनवमी,कुष्मांडनवमी,इ.इ. त्या त्या धर्म आणि पंथांना अर्थात ते माहीत असतात आणि महत्वाचेही असतात.

काही इतर महत्त्वाचे दिवसही असतात, जे आपण दुर्दैवाने दुर्लक्षित करतो. जागतिक आदिवासी दिन, औद्योगिक सुरक्षा दिन.

विविध धर्मीय महिने लक्षात राहतातच असे नाही. पारशी लोकांचा पतेती माहीत असतो पण शेहरेवार मास,मेहेर मास,आबान मास,अस्पदार्मद मास हे अजिबातच ठाऊक नसतात.

मुस्लिमांचा मोहर्रम मास, रमजान मास माहीत असतो पण रज्जब मास,शाबान मास,ज्यूंचा पिस्पाह,शाबुओथ हे महत्त्वाचे महिने आपल्याला माहीत नसतात.

सोमवती किंवा गटारी अमावस्या आपल्याला माहीत असते. पण कॅलेंडरवर दर्श अमावस्या,मौनी, भावुका अशा अनेक अमावस्या असतात.

सूर्य नक्षत्रात प्रवेश करताना,मोर, हत्ती,बेडूक,घोडा अशी अनेक वाहने वापरतो हे वाचून हसू येते.

मी नोकरी करत असताना कॅलेंडर हातात पडलं की आधी सुट्ट्या बघायची. आमचा पाच दिवसांचा आठवडा होता. शनिवारी आणि रविवारी सुट्टी असायची. त्याला जोडून कोणते सण, उत्सव, तिथ्या येताहेत ते बघायची. मग मधेच एखादी कॅज्युअल किंवा रिस्ट्रिक्टेड हाॅलीडे टाकून ओळीने सलग सुट्ट्या किती दिवस मिळताहेत हे पाहायची आम्ही सगळ्याच मैत्रीणी बघायचो. लंच अवरमधे चर्चा करायचो. आनंदित व्हायचो. पिकनिकचे बेत आखायचो.

आता रिटायर झाल्यावर मी रविवारी कोणते महाएपिसोड आहेत ते बघते.

पण अजूनही कॅलेंडर माझा मित्र आहे.

मांडणीसमाजप्रकटनविचार

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

21 Feb 2023 - 3:00 pm | चांदणे संदीप

छान लेख!
मी सुद्धा कॅलेंडर हातात पडतासरशी आधी मागचं वाचण्यायोग्य सगळं वाचून घेतो. पूर्ण वर्षभराच भविष्यही पाहून घेतो. ;)

सं - दी - प

चित्रगुप्त's picture

21 Feb 2023 - 11:51 pm | चित्रगुप्त

खरंच, एवढं काहीबाही कालनिर्णयात असतं हे आजच समजलं.
बाकी कालनिर्णय आणल्यावर "अरे वा, खूप काही आहे वाचण्यासारखे, वाचले पाहिजे सावकाशीने केंव्हातरी" असं म्हणत ते एकदा भिंतीवर लटकवलं की एकदम पुढल्या वर्षी त्याच्यावरच नवीन टांगत तेच वाक्य दरवर्षी म्हणणारे जे महाभाग असतात त्यापैकी आम्ही एक. आता तर कालनिर्णय वा कोणतेच कॅलेंडर घरात नाही. (अरसिक किती हा मेला)
आजींना अजून त्यात गोडी आहे हे थोरच.

अनिकेत वैद्य's picture

22 Feb 2023 - 10:34 am | अनिकेत वैद्य

नवीन दिनदर्शिका हातात आल्यावर आपला, आवडत्या व्यक्तीचा, वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस कोणत्या वारी येतोय ते पाहून त्याप्रमाणे नियोजन करणे हा अजून एक विरंगुळा.

बाकी वर्षभर दुधाचे, पेपरचे खाडे मांडून ठेवणे हा अजून एक उपयोग.

आंबट गोड's picture

22 Feb 2023 - 12:06 pm | आंबट गोड

मला ही कॅलेंडर खूप आवडतं.
त्याकडे पहात बराच वेळ घालविता येतो. शिवाय डॉक्टरांची अपॉईंटमेंट, बाईला उधार दिलेले पैसे, सासूबाईंच्या गोळ्या जर हळू हळू कमी करत न्यायच्या असतील तर ती नोंद, लग्नाला जायचे असल्यास त्या तारखेवर नोंद, टोचलेली (आणि तिथे ठेवली असली तरच हमखास सापडणारी) सुई, चतुर्थी चा चंद्रोदय, घरातल्यांचे वाढदिवस, काही रिमाईंडर्स.... कॅलेंडरला कित्ती काम असतं! घरातला एक मेंबरच आहे तो!

Trump's picture

22 Feb 2023 - 1:46 pm | Trump

पुर्वी दिनदर्शिका म्हणजे कालनिर्णयच होती. गेल्या काही वर्षात महालक्षमी, दाते पंचांग चांगलेच परिचीत झाले आहे. पुर्वी कालनिर्णयच्या पाठीमागचे लेख वाचायला मजा वाटायची. हल्ली तसले लेख दिसत नाहीत.

मदनबाण's picture

22 Feb 2023 - 10:49 pm | मदनबाण

आजी छान लिहलं आहेस बघ ! :)
नोकरीवाला माणूस फक्त कॅलेंडरवरचे लाल चौकोन लक्षात ठेवतो. :- वपु

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Gudilo Badilo Full VideoSong |DJ Duvvada Jagannadham ||

टर्मीनेटर's picture

23 Feb 2023 - 3:35 pm | टर्मीनेटर

नेहमीप्रमाणेच छान लेख आजी 👍