नमस्कार, मी भाऊ तोरसेकर… तुम्ही बघत आहात || प्रतिपक्ष ||

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in जनातलं, मनातलं
25 Jul 2022 - 1:31 pm

काल सकाळी युट्युबचे एक नोटीफिकेशन आले त्यात ज्येष्ठ पत्रकार आणि राजकिय विश्लेषक श्री. भाऊ तोरसेकरांच्या ‘प्रतिपक्ष’ ह्या युट्युब चॅनल वरील “पाच लाख आणि वीस कोटीची गोष्ट” ह्या व्हिडिओची शिफारस करण्यात आली होती.

शिर्षकावरून विषयाचा काही अंदाज न आल्याने उघडून बघीतला तर अवघ्या सव्वादोन वर्षांच्या वाटचालीत प्रतिपक्ष चॅनलच्या सदस्यसंख्येने (Subscribers) ५ लाखांचा आणि एकुण दर्शन संख्य्येने (Views) २० कोटींचा टप्पा गाठल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानण्यासाठी भाऊंनी हा छोटासा व्हिडीओ तयार केल्याचे लक्षात आले!

युट्युबवर पाच, दहा, पंधरा लाख किंवा त्याहुनही जास्त सबस्क्राइबर्स असणारे युट्युबर्स/चॅनल्स संख्येने कमी नाहीत, पण त्यांवरचा कंटेंट हा बहुतांश इंग्रजी किंवा हिंदी भाषेतला असल्याने त्यांचा प्रेक्षकवर्गही मोठा असतो. परंतु भाऊंच्या ‘प्रतिपक्ष’ ह्या ९८ ते ९९% मराठी* आणि जवळजवळ ‘वन मॅन शो’ टाईपच्या एकखांबी-एकहाती** युट्युब चॅनलने हा पल्ला गाठणे ही गोष्ट खचीतच कौतुकास्पद आहे.
( * लोकाग्रहास्तव काही व्हिडिओज हिंदी भाषेत आहेत. ** आंतरराष्ट्रीय राजकारण/घडामोडींवर भाष्य करणाऱ्या त्यांच्या पत्नी, स्वाती तोरसेकर ह्यांचे काही व्हिडिओज ‘एषा पृथ्वी’ सदरांतर्गत आहेत. )

आभारप्रदर्शनासाठी केलेल्या ‘पाच लाख आणि वीस कोटीची गोष्ट’ व्हिडिओत भाऊंनी ह्या यशाचे श्रेय अनेक घटकांना दिले आहे आणि त्यांच्या काही मर्यादा/तांत्रिक त्रूटी ह्यावरही भाष्य केले असले तरी माझ्यापरीने ह्या यशाचे मूल्यमापन करताना गेल्या काही वर्षांत सुरूवातीला त्यांचा वाचक मग अल्पकालीन प्रेक्षक आणि आता श्रोता अशा झालेल्या माझ्या प्रवासात आलेले काही अनुभव/निरिक्षणे मांडण्यासाठी हा लेखनप्रपंच!

पाच-साडेपाच वर्षांपूर्वी भाऊ तोरसेकर हे नावही मला माहिती नव्हते पण मिपावरच चर्चा प्रतिसादात कोणीतरी ‘जागता पहारा’ ह्या त्यांच्या ब्लॅागवरील एका लेखाची लिंक दिली होती. तो लेख वाचला आणि आवडला म्हणून त्यांचे अन्य लेखही वाचायला सुरूवात केल्यावर मात्र त्यांची सगळीच राजकीय मते, भाष्ये, अंदाज, अडाखे जरी पटत नसले तरी कधी त्यांचा नियमीत वाचक होऊन गेलो ते समजलेच नाही. घरी असो की ॲाफीसमध्ये ब्राऊझरवर कामासाठीच्या टॅब्जच्या जोडीला एका टॅबमध्ये 'मिपा' आणि दुसऱ्या टॅबमध्ये 'जागता पहारा' उघडलेला असायचा. त्यांच्या नव्या ब्लॅागपोस्टची प्रतिक्षा असायची!

पुढे एप्रिल २०२० मध्ये पहिल्या लॅाकडाऊन काळात त्यांनी ‘प्रतिपक्ष’ हे युट्युब चॅनल सुरू केल्यावर मात्र त्यांचे ब्लॅागवरील लेखन कमी कमी होत सप्टेंबर २०२० नंतर नविन लेखन येणे बंदच झाले.
नियमितपणे त्यांचे लेख वाचायची सवय झाली असल्याने पुढचे काही दिवस चुकल्या चुकल्यासारखे झाल्यावर काही महिन्यांनी (युट्युबचा वापर राजकीय विश्लेषणाचे व्हिडिओज पहाण्यासाठी करण्याची कल्पनाच सहन होत नव्हती तरीही) नाईलाजाने प्रतिपक्ष चॅनलला भेट देऊन भाऊंचा एक व्हिडिओ पाहिला आणि घोर निराशा झाली!
निकृष्ट सिनेमॅटोग्राफी, कंटाळा येण्याइतपत अतिशय संथगतीतले बोलणे, वारंवार चष्मा काढणे/लावणे, गाल, नाक, कान, डोके खाजवणे, मध्येच रिमोटने AC चालु/बंद करणे अशा प्रेक्षकांना विचलीत करणाऱ्या क्रिया-देहबोली, अनावश्यक गोष्टी काढुन टाकण्यासाठी आवश्यक असलेला व्हिडिओ एडीटींगचा अभाव अशा अनेक कारणांनी अत्यंत निरस वाटल्याने तो पहिलाच व्हिडिओ देखील मी पुर्णपणे पाहु शकलो नव्हतो. मग पुढचे काही महिने प्रतिपक्षच्या वाटेला फिरकलोच नाही!

आता नक्की किती महिने झाले असतील ते आठवत नाही (कदाचीत एखाद वर्षही झाले असेल) पण पुन्हा मिपावरील चर्चेतल्या एका प्रतिसादात कोणीतरी भाऊंचे संथ व्हिडिओ पहायला कंटाळा येत असल्याचा उल्लेख केला आणि त्यावरच्या उप्रतिसादात मिपाकर शाम भागवत ह्यांनी प्लेबॅक स्पीड १.५ करून भाऊंचे व्हिडिओ पहाण्याचा सांगीतलेला उपाय वाचला आणि, अरेच्चा… DIY किंवा तत्सम प्रकारातले जाणीवपुर्वक स्पीड वाढवून अपलोड केलेले कित्येक व्हिडिओज आपण त्यातल्या स्टेप्स नीट समजून घेण्यासाठी प्लेबॅक स्पीड ०.५ वा ०.७५ असा कमी करून पहातोच की, तीच क्रिया भाऊंचे व्हिडिओ पहाताना उलट करण्याची कल्पना आपल्याला सुचली कशी नाही असा विचार करून स्वत:च्याच डोक्यात टपली मारून घेत प्लेबॅक स्पीड वाढवून मोबाईलवर प्रतिपक्ष पहायला सुरूवात केली आणि मी प्रतिपक्षचा नियमीत प्रेक्षक झालो!

त्यानंतर प्रतिपक्षवरचे शंभरेक व्हिडिओज पाहुन झाल्यावर प्रत्येक व्हिडिओत एकच नेपथ्य (बॅकग्राउंड) आणि वर उल्लेखीलेल्या त्यांच्या क्रिया, देहबोली वगैरे वगैरे बघून परत कंटाळा येऊ लागला परंतु ह्यावेळी मी प्रतिपक्ष पासून दुरावलो नाही ह्याचे कारण म्हणजे वेळीच सुचलेले शहाणपण!
त्यावेळच्या त्राग्यात एक विचार मनात चमकून गेला की, आपण प्रतिपक्षवर येतो ते भाऊंचे विश्लेषण ऐकण्यासाठी, त्यांची मते समजून घेण्यासाठी, श्रवणसुखाच्या जोडीने नेत्रसुखाचीही अनुभूती देण्यासाठी भाऊ म्हणजे Aleena Rais Live च्या 'अलीना रईस' (Aleena Rais) किंवा Gravitas Live / Gravitas Plus च्या 'पालकी शर्मा-उपाध्याय' (Palki Sharma-Upadhyay) थोडीच आहेत? तेव्हा भाऊंचे व्हिडिओज आपण बघण्याऐवजी नूसते ऐकु तर शकतो की!

‘भिक नको पण कुत्रं आवर’ ह्या म्हणीच्या धर्तीवर ‘पैसे घे पण जाहिराती आवर’ असं म्हणायची वेळ युट्युबने आणली होती/आहेच. जाहिरातींच्या भडीमारा पासुन मुक्ती मिळवण्यासाठी YouTube Premium चे सबस्क्रिप्शन घेतले होते त्यामुळे युट्युबचे ॲप मिनीमाईज करून इतर ॲप्स वापरत असताना किंवा फोन लॅाक करूनही बॅकग्राउंडला व्हिडीओ प्ले होत असल्याने हा उपाय चांगलाच कामी आला आणि मी प्रतिपक्षचा प्रेक्षक न रहाता श्रोता झालो. त्याचा आणखिन एक फायदा म्हणजे माझा स्क्रिन टाईम कमी झाल्याने डोळ्यांनाही थोडा आराम मिळू लागला. YouTube Premium चे सबस्क्रिप्शन संपल्यावर भाच्याच्या सुचनेवरून गेले काही महिने YouTube Vanced वर युट्युब (सर्व प्रिमीयम फिचर्स चकटफु वापरत 😀) बघत असल्याने हाच नित्यक्रम अद्यापही कायम आहे!

असो, ह्या लेखाचा उद्देश भाऊंवर किंवा त्यांच्या ‘प्रतिपक्ष’ चॅनलवर टिका करण्याचा नक्कीच नाही. काही त्रूटी/ कमतरतांचा उल्लेख भाऊंनी स्वत: ह्या आणि त्यांच्या अन्य व्हिडिओज मध्ये प्रांजळपणे केलेला आहेच, पण त्यांचा एक चाहता वाचक, प्रेक्षक आणि श्रोता ह्या नात्याने माझी काही निरिक्षणे, काही गोष्टींमुळे होणारा रसभंग व तो दुर करण्यासाठी केलेले उपाय ह्यांचा गोषवारा माझ्याप्रमाणेच मिपावर असलेले भाऊ तोरसेकरांचे अनेक चाहते, वाचक, प्रेक्षक आणि श्रोते तसेच अशा सर्वांसाठी ह्या छोटेखानी लेखातुन मांडला आहे.

सोशल मिडिया वरील भाऊंच्या चॅनलचे हे यश मेनस्ट्रीम मिडियाचा घटता प्रभाव तर दर्शवतेच पण त्याच बरोबर अत्यंत कमी/मर्यादित संसाधनांचा, तंत्रज्ञानाचा वापर करत, कुठलाही चमचमाट, झगमगाट न करता केवळ चांगल्या कंटेंटच्या जोरावर तयार केलेले अनौपचारीक असे व्हिडिओज बनवुनही असे घवघवीत यश मिळवता येते ह्याचेही उत्तम उदाहरण आहे!

इतक्या कमी वेळात ‘प्रतिपक्ष’ ला मिळालेल्या ह्या यशाबद्दल भाऊंचे हार्दिक अभिनंदन! सध्या त्यांच्या मागे दिसणाऱ्या Silver YouTube Creator Award च्या जागी लवकरात लवकर १० लाख सबस्क्राइबर्स चा टप्पा गाठल्यावर मिळणारे Gold YouTube Creator Award बघायला मिळो अशा शुभेच्छा आणि त्यांना उत्तम आरोग्य आणि दिर्घायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना 🙏

मांडणीशुभेच्छाअभिनंदनलेखअनुभव

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

6 Mar 2023 - 9:45 pm | श्रीगुरुजी

भाऊंच्या चित्रफीति पूर्वी अधूनमधून पहात होतो. आता क्वचितच पाहतो. त्यांच्या काही ठाम समजूती आहेत व त्या चुकीच्या असल्या तरीही त्या समजुतींना ते घट्ट चिकटून आहेत आणि वारंवार तेच तेच सांगत राहतात. पूर्वी त्यांची काही भाकिते बरोबर आली असतील, पण नंतरची बरीचशी भाकिते चुकली आहेत. त्यांना जे आदर्श वाटतात, ते काही चुकीचे निर्णय घेतात हेच त्यांना मान्य नाही. तेच तेच दळण सुरू असते. त्यामुळे आता फारसे पहात नाही.