(वाचन वेळ - ४ मिनिटे)
इसवी सन सतरावे शतक. स्थळ महाराष्ट्र. या राज्यात माणसे जन्म घेत होती, गुलाम म्हणून जगत होती आणि जनावरांसारखी दुर्लक्षित मरत होती. परंतु नियतीला आपले सामर्थ्य दाखवायचा मोह झाला आणि १९ फेब्रुवारी १६३० या दिवशी श्रीमंत शहाजीराजे भोसले आणि जिजाबाई यांच्या पोटी शिवाजीचा जन्म झाला. काय म्हणालात? छत्रपती शिवाजी म्हणू? नाही. जन्माला आले ते बाळ केवळ शिवाजी होते.
शिवाजी शहाजी भोसले या सामान्य मनुष्याने सिंहासनाधीश्वर छत्रपती होण्यापर्यंतच्या संघर्षाकडे नजर टाकली तरी अंगातल्या वाहत्या रक्ताची, धडधडणाऱ्या हृदयाची आणि पावला खालच्या पवित्र मातीची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. इतिहासाने सिकंदर, अशोक, अकबर ते नेपोलियन असे अनेक महान राजे पाहिले. पण वर्तमानात ना अशोक-भक्त दिसतात ना नेपोलियन-भक्त. या उलट शिवभक्तांच्या अस्तित्वाला आज राष्ट्रांच्या सीमांचे ही बंधन उरले नाही. याचे कारण शिवरायांच्या वैयक्तिक चारित्र्याची उंची आणि हिऱ्यासमान अगणित पैलूंनी सजलेले शिवरायांचे व्यक्तिमत्त्व. शिवाजीचा पराभव हेच ज्याने जीवन ध्येय मानले त्या आलमगीर औरंगजेबाला सुद्धा कधी शिवरायांच्या चारित्र्यावर शंका घ्यायची संधी मिळाली नाही. याउलट स्वतःच्या सरदारांनी कधी शिवाजीच्या चारित्र्यावर बोट ठेवले तर तिथे छत्रपतींची वकीली स्वतः औरंगजेबाने केली याला इतिहास साक्ष आहे. मध्ययुगीन महाराष्ट्रातील स्वत्वाचे नामोनिशाण मिटलेल्या समाजात वणवा पेटावा तशी स्वाभिमानाची आग कशी पेटली याचे उत्तर कुणी शिवरायांच्या राजकारणात शोधेल, कुणी समाजकारणात, कुणी युद्धनितीत तर कुणी शौर्यात. शेवटी शिवरायांच्या एकमेवाद्वितीय कर्तृत्वाचे एकच उत्तर देता येते- शिवाजी!
सन १६७४ मध्ये अभिषेक-अलंकृत छत्रपती होण्यापूर्वी शिवाजीने जो लढा उभा केला त्यामागची प्रेरणा समजून घेतल्याशिवाय शिवचरित्राचे मर्म उलगडणे अवघड आहे. शिवाजी म्हणजे स्वतःला रयतेचा सेवक मानणारा आद्य राज्यकर्ता. हा जाणता राजा कुठल्या एका प्रदेशाचा नव्हे तर प्रजेचा होता. त्या प्रजेचा प्रदेश परकीयांच्या जोखडातून सोडवण्यासाठी उभा राहिला तो स्वराज्याचा संघर्ष. उत्तरेस मोगल, पश्चिमेला इंग्रज-पोर्तुगीज, दक्षिणेला आदिलशाही, पूर्वेला निजामशाही अशा कैक पटींनी बलशाली शत्रूंच्या चौकटी समोर बुद्धी शाबूत असल्यास वर पाहायची हिंमत होऊ नये तिथे एका मराठी सरदाराचा मुलगा स्वराज्याचे स्वप्न पाहतो हीच मुळात अद्भुत गोष्ट आहे. आणि याउपर ते स्वराज्य सत्यात उतरविणे हे तर त्याहून अविश्वसनीय. शिवाजी म्हणजे स्वाभिमानाचा समानार्थ. शिवाजी म्हणजे नैसर्गिक न्यायाचे मूर्तस्वरूप. ज्याचे जे हक्काचे आहे ते त्याला जातीपातीचा विचार न करता केवळ मानवी गुणांच्या आधारावर मिळवून देणारे स्वराज्य संस्थापक शिवराय म्हणजे समाजसुधारक राजा. आपण प्रातःसंध्या ज्या देवांना पुजतो त्यांच्या मंदिरांचा विटाळ होत असताना भावनेला काबूत ठेवून उचित प्रसंगी त्याच शत्रूचा कोथळा बाहेर काढणारा शूर नरवीर शिवराय. स्त्रीला 'लुटीचा माल' न मानता स्त्रीला माणूसपण बहाल करणारा राजा शिवबा म्हणजे भारतातील पहिला स्त्रीवादी युगपुरुष! १६६५ च्या पुरंदरच्या तहात तोवर रक्त सांडून जे स्वराज्य रचले होते ते सारे जयसिंहाच्या हवाली करून नंतर अवघ्या नऊ वर्षांत दुप्पट साम्राज्य स्थापन करत राज्याभिषेक करणारा युगप्रवर्तक राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सबंध भारतभर इस्लामी आणि ख्रिस्ती आक्रमक तलवारीच्या बळावर धर्मपरिवर्तनात गुंतलेले असताना सर्वधर्मसहिष्णुतेला स्वराज्य-धर्म बनवणारा मानवतावादी धर्मराज म्हणजे शिवराय. आजवर उत्क्रांतीचे विविध टप्पे गाठत मनुष्याने महानतेचे जे काही गुणविशेष शोधून काढले आहेत त्यांचा सारांश म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज! शिवाजी म्हणजे जीव देऊन त्यागाचा परमोच्च आविष्कार नव्हे, शिवाजी म्हणजे स्थैर्यशील न्याय्य राज्याचा अट्टाहास. ज्यांनी शिवाजीला मिटवायचा विडा उचलला त्यांच्या तुटलेल्या चार बोटांनाही इतिहासाचे अमरत्व प्राप्त करून देणारा कीर्तीवंत राजा. 'इंग्रजांचा भारतातील मूळ उद्देश व्यापार नाही' हे जाणणारा पहिला भारतीय राज्यकर्ता म्हणजे राजकार्य-धुरंधर शिवाजी महाराज. इतिहासाची जाण, वर्तमानात सजगता आणि भविष्याबद्दल दूरदृष्टी असेल तरच शिवसृष्टी साकार होऊ शकते ही शिकवण देणारा प्रजाप्रिय 'श्रीमंत योगी'. स्वतःच्या मृत्यूनंतरही जिने औरंगजेब बादशाहला सत्तावीस वर्षे दमवले आणि शेवटी ह्याच मातीत निजविले ती दिव्य प्रेरणा म्हणजे शिवाजी.
शिवाजी महाराज देव नाही. आणि शिवाजी केवळ मनुष्य होता यावर विश्वास बसत नाही. मावळ्यांनाही शिवरायांच्या हयातीत हा प्रश्न पडत असेल. त्याचं उत्तरही मावळ्यांनीच दिलंय. शिवाजी मंत्र आहे. तो सत्याचा मंत्र आहे, अन्यायाची चीड आहे, लढाईची प्रेरणा आहे आणि विवेकाची ढाल आहे. या मंत्राच्या नुसत्या जपाने काम भागत नाही. तो आचरणात आणावा लागतो. मग असा मनुष्य मानवी मोहाच्या बंधनातून मुक्त होऊन देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सज्ज होतो. त्याची अंतःप्रेरणा स्वराज्य आणि सुराज्य यांचा ध्यास घेते. तो गुलामी पेक्षा बलिदानाचे उदात्तीकरण करत नाही तर गुलामीलाच मारून टाकतो. जगातील अत्यंत खडतर परंतु महानतम अशा 'शिवमार्गा'वर चालण्यासाठी आई भवानी आपल्याला आशीर्वाद देवो हीच प्रार्थना.
हर हर महादेव!
छत्रपती शिवाजी महाराज की जय!
प्रतिक्रिया
19 Feb 2022 - 9:12 pm | मुक्त विहारि
हिंदू कधीच मुसलमान तरी झाले असते किंवा छत्रपती संभाजी महाराज यांच्या सारखे, हालहाल होऊन मृत तरी पावले असते ...
अर्थात, उदारमतवादी हिंदूंना ही गोष्ट पटणार नाही आणि त्यांना पटवून द्यायची गरज पण नाही...
देवगिरी येथील हिंदूंचे काय झाले? पृथ्वीराज चौहान यांचे काय झाले? राजस्थान मधील हिंदूंचे काय झाले? लचित बडफुकनच्या काळांत काय झाले? कर्णावती येथील स्त्रीयांचे काय झाले?जोहार म्हणजे काय?
हे असे मुलभूत प्रश्र्न, उदारमतवादी हिंदूंना पडत नाहीत ...