आवाज बंद सोसायटी - भाग ५

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
4 Nov 2021 - 6:43 am

यामागील भाग:
http://www.misalpav.com/node/48651 :: आवाज बंद सोसायटी - भाग १
http://www.misalpav.com/node/48652 :: आवाज बंद सोसायटी - भाग २
http://www.misalpav.com/node/48658 :: आवाज बंद सोसायटी - भाग ३
http://www.misalpav.com/node/48672 :: आवाज बंद सोसायटी - भाग ४
https://www.misalpav.com/node/49072 :: आवाज बंद सोसायटी - भाग ४.१

हा भागः आवाज बंद सोसायटी - भाग ५

वाहनांमुळे होणारे आवाजाचे प्रदूषण आणि त्याबद्दलचे विवेचन

ध्वनी प्रदूषणाच्या प्रकारांमधले वाहनांमुळे होणारे आवाजाचे प्रदूषण हा शहरवासीयांसाठी गंभीर प्रकार आहे. जंगलातून जाणार्‍या महामार्गांवरून धावणार्‍या वाहनांमुळे होणारे आवाजाचे प्रदूषण जंगलातील वन्यप्राण्यांसाठी हानीकारक आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरेशी नसल्याने आपल्याकडे मोटरसायकलींचे प्रमाण जास्त आहे. तरूण युवक बुलेट मोटरसायकलच्या सायलेंसरला जास्त आवाजात बदलतात. आता या बदललेल्या मोठ्या आवाजाच्या सायलेंसरला सायलेंसर हे नाव देणे जरा विनोदीच प्रकार म्हणावा लागेल. तर ही तरूण मंडळी जास्त आवाजाचे सायलेंसर असलेल्या मोटरसायकली मुद्दाम रेस करत चालवतात, अनेकदा आपसात स्पर्धा लावत मोटरसायकली शहरातून पळवतात.

मोटरसायकलीत आणि चारचाकी, ट्रक, लक्झरी बसेस यांत आणखी केला जाणारा लक्षणीय बदल म्हणजे त्यांच्या हॉर्न मध्ये करण्यात येणारा बदल होय. बर्‍याचदा अनेक जण आपल्या वाहनातील कंपनीने बसवलेले हॉर्न काढून टाकून मोठ्याने वाजणारे हॉर्न बसवतात. एकाचवेळी चार चार स्पिकर्स असलेले हॉर्न बसवणारे देखील आहेत. घरोघरी दूध देणारे विक्रेते, शाळेची वाहतून करणारे आपले वाहन वेगळे आवाज करून आपल्या ग्राहकाला समजावे म्हणून इतर वाहनांपेक्षा निराळे हॉर्न बसवतात. रस्त्यात कोणतीही ट्राफीक नसतांना आपल्या केवळ आपल्या ग्राहकाला तसेच शालेय विद्यार्थ्यांना आपले वाहन आले हे समजण्यासाठी ते नागरी वस्तीत वाहनाचा हॉर्न मोठ्याने वाजवतात. यामुळे शांततेचा भंग होवून आवाजाचे प्रदूषण होते. चारचाकी, ट्रक हे निरनिराळ्या सुरांत, गाणे म्हणणारे हॉर्न वाजवतात. चारचाकी कार, ट्रक मध्ये रिवर्स गिअर टाकला की विशिष्ठ आवाजाचा रिव्हर्स हॉर्न वाजेल अशी व्यवस्था केलेली असते जी बेकायदेशीर आहे. एकाच लयीत वाजणारे हे हॉर्न सोसायटीमध्ये ध्वनी प्रदूषण करतात. अनेकदा अशा बदललेल्या हॉर्नमुळे, सायलेंसरमुळे आपण ध्वनीप्रदूषण निर्माण करतो आहोत हे वाहनधारकांच्या गावीही नसते.

आता आपल्या भारतातही आपल्या भारतीय संगीत वाद्यांचे ध्वनी वाहनांच्या भोंग्यासाठी (हॉर्नसाठी) वापरण्याचा कायदा येवू घातला आहे. भारत देशात अनेकविध वाद्ये वाजवली जातात. अनेक राग, सुरावटी, गायनशैली, घराणे आदींची समृद्ध परंपरा आपल्या देशात आहे. प्रत्येक राज्यागणीक भारतात त्यात अनेक प्रकार पडतात. अशा विविधतेने नटलेल्या वाद्यांचे जर हॉर्न बनवले गेले अन ते वाहनांनी वाजवले तर रस्त्याने चालणार्‍यांचा तसेच आजूबाजूच्या वाहनचालकांचा गोंधळ होईलच व त्यातून अपघात देखील होवू शकतात. वास्तवीक पाहता वाहनांच्या भोंग्याचा आवाज एकसारखा, एकसमान, तसेच एकाच परिमाणाचा असायला हवा. तसेही पॉवर हॉर्न किंवा प्रेशर हॉर्नवर बंदी आहेच. असे झालेच तर संगीतमय हॉर्न असणारा भारत देश हा केवळ एकच असेल.

दुसरे असे की, एका राज्यात असे संगीतमय हॉर्न असलेले वाहन दुसर्‍या राज्यात गेले तर तेथल्या स्थानिकांना कसे कळणार की हा हॉर्न आहे की गाडीतले संगीत वाजत आहे की शेजारच्या दुकानात असले गाणे वाजते आहे ते? वाहनांचे हॉर्न कशाप्रकारचे असावेत याबाबत पद्धतशीर अभ्यास आधीच झाला आहे. वाहनांच्या हॉर्नच्या आवाजाचा खुद्द तो हॉर्न वाजवणारा चालक, त्याचे शेजारील वाहने, पादचारी तसेच रस्त्यातील इतर नागरीक इत्यादींच्या मनोकायीक परिणाम होतच असतो. विकसीत देशात वाहनांच्या हॉर्न वाजवण्याचा सवयी, त्यांचे होणारे परिणाम याबाबत अनेक पद्धतीने अभ्यास झालेला आहे त्याचा उपयोग आपल्या येथील शासनाने करून घेतला पाहिजे.

अशा रितीने नवे हॉर्न आले तर त्यांचा रस्त्यावरील वाहतूकीवर, पादचार्‍यांवर कसा परिणाम होईल याचा शास्त्रीय अभ्यास होवूनच अशा प्रकारचे निर्णय घेणे अपेक्षित असतांना केवळ काहीतरी नवे करण्याच्या हेतूने आपण शास्त्रीय विचारसरणीचा विचार करत नाही हे केव्हा लक्षात येणार?

आपल्याकडे डीजेल इंजीन असलेल्या रिक्षा मालवाहतूक तसेच प्रवासी वाहतूक करतात. त्यात काही ब्रांडच्या रिक्षा जास्त आवाज करतात. उदाहरणार्थ अ‍ॅपे रिक्षा. या असल्या रिक्षांची इंजीने धडधडत तसेच रस्त्याने काळा धुर करत एकाच वेळी ध्वनी तसेच वायू प्रदूषण करत रस्त्याने धावत असतात. दिल्ली, मुंबई सारख्या शहरात या असल्या डीजल रिक्षांना मुख्य शहरातून प्रवास करण्याची परवानगी जरी नसली तरी शहरांच्या उपनगरातून, खेडेगावातून या रिक्षा धावतच असतात. या रिक्षांच्या मागे जर तुम्ही एखादे किलोमिटर जर तुम्ही जाल तर तुमचे देखील कान किटतील इतका उबग आणणारा किळसवाणा आवाज या रिक्षांमधून येत असतो. सरकारदरबारी या रिक्षांना आवाजाच्या परिक्षेतून कसे पास केले जाते हा एक संशोधनाचा मुद्दा आहे.

आपल्या माहितीसाठी वाहनातल्या हॉर्नबद्दल खाली एक निवेदन दिले आहे. ते निवेदन अशा बेकायदेशीररित्या बदल केलेल्या वाहनधारकांना आपण देऊ शकतो.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मोटार रिव्हर्स हॉर्नला नाही म्हणा!

प्रिय नागरिक, जय हिंद!

असे निदर्शनास आले आहे की आपले वाहन रजि. क्र. ________________‌‌‌‌‌‌‌‌____ यास "रिव्हर्स हॉर्न" बसविलेला आहे आणि तो हॉर्न रिव्हर्स गिअरसोबत किंवा दरवाजा उघड बंद करतांना आपोआप वाजवला जातो आहे.

पुढील काही कायदे आपणास निदर्शनास आणू इच्छितो:

* मोटर वाहन कायदा १९८८, १९०(२) असे सांगतो की "एखादा व्यक्ती सार्वजनीक ठिकाणी वाहन चालवत असेल आणि आवाज व हवेचे प्रदूषण करून रस्ता सुरक्षीततेचे उल्लंघन होत असेल तर हा गुन्हा आहे आणि त्यासाठी रु. १०००/- आणि त्यानंतरच्या गुन्ह्यांसाठी रु. २०००/- प्रत्येक वेळी असा दंड आहे."

* केंद्रिय मोटर वाहन कायदा नियम क्र. ११९ (२) यान्वयेदेखील रिव्हर्स हॉर्नला बंदी आहे. हा नियम असे सांगतो की "कोणत्याही वाहनास अनेकविध आवाज काढणारे किंवा अनावश्यक, कठोर, मोठ्याने किंवा धक्कादायक, उच्च दाबाचे, गोंगाट उत्पन्न होईल असे हॉर्न बसवू नये. यात रिव्हर्स हॉर्नचे आवाजही येतात. अशा गुन्ह्यासाठी रु. ५००/- प्रत्येक वेळी असा दंड आहे.

* महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या अनुसार एन्हारमेंट प्रोटेक्शन कायदा १९८६ नुसार पोलीस रिव्हर्स हॉर्न विरूद्ध एफ. आय. आर. दाखल करून घेवू शकतात.

* मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिका (क्र. ८५, २००७) अनूसार असे हॉर्न जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

* नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल (गव्हर्नमेंट ऑफ इंडीया) यांनी जी वाहने आवाजाचे प्रदूषण करतात त्यांना व्हीप जारी केला आहे आणि जी वाहने प्रेशर हॉर्न वापरातात किंवा सायलेन्सरच्या आवाजाने प्रदूषण करतात त्यांना रू. ५०००/- पर्यंत दंड लागू केला आहे.

वाहतूक पोलीस सर्व ठिकाणी उपस्थित राहू शकत नसल्याने सामान्य नागरीक अशा आवाज करणार्‍या वाहनांचा रजि. क्रमांक आरटीओ / ट्रॅफिक पोलिसांना कळवू शकतात आणि कारवाई करण्यास सांगू शकतात.

तरी कायद्याचे पालन करण्यासाठी आणि सार्वजनिक शांतता राखण्यासाठी आपल्या वाहनात बसवलेला रिव्हर्स हॉर्न / की लॉक हॉर्न त्वरीत काढून टाकण्याची आपणास विनंती करण्यात येत आहे.

आपले नम्र

(तुमच्या संस्थेचे नाव)
सार्वजनिक हितसंबंध राखणेसाठी प्रसिद्ध
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

समाजजीवनमानप्रकटनलेखमाहितीआरोग्य

प्रतिक्रिया

क्रमशः आहे लेखमाला.
क्रमशः

प्रकाश घाटपांडे's picture

4 Nov 2021 - 9:04 am | प्रकाश घाटपांडे

एक चांगला दस्ताऐवज तयार होतो आहे

सर टोबी's picture

4 Nov 2021 - 9:34 am | सर टोबी

गाड्यांना लावलेले चोरी प्रतिबंधक हॉर्न. हे रात्रीच्या कोणत्याही वेळेस अचानक कर्कश्य वाजायला लागतात आणि संबंधित व्यक्ती (म्हणजे कारचा मालक) घटना स्थळावर पोहोचणारी सर्वात शेवटची व्यक्ती असते.