यामागील भाग:
http://www.misalpav.com/node/48651 :: आवाज बंद सोसायटी - भाग १
http://www.misalpav.com/node/48652 :: आवाज बंद सोसायटी - भाग २
http://www.misalpav.com/node/48658 :: आवाज बंद सोसायटी - भाग ३
http://www.misalpav.com/node/48672 :: आवाज बंद सोसायटी - भाग ४
हा भाग :: आवाज बंद सोसायटी - भाग ४.१
( आवाज बंद सोसायटी - भाग ४ मध्ये सांगितल्याप्रमाणे, तो भाग विस्तृतरित्या लिहायचा होता. काही वैयक्तिक कारणांमुळे तो लिहायचा राहून जात होता. आता ४.१ हा उपभाग ४थ्या भागाला जोडला जाणार आहे. )
आवाज बंद सोसायटी - भाग ४ मध्ये आपण ध्वनी प्रदूषणामुळे इतर सजीवांवर होणारे परिणाम विस्तृतरित्या वाचले. या ४.१ उपभागात ध्वनी प्रदूषणामुळे मानवावर होणारे परिणाम बघणार आहोत.
आवाजाचे प्रदूषण मानवासाठी तसेच इतर सजीवांसाठी कायमच त्रासदायक ठरलेले आहे. अगदी जून्या जमान्यातही आवाजामुळे झोपेच्या होणार्या खोबर्यावर तत्कालीन राजेमंडळींनी काही नियम आणि दंड लागू केलेले होते. इतर प्रदूषणांच्या तुलनेत, आवाजाच्या बाबतीत समाजात अपुरे ज्ञान, जाणीव, जागरूकता नसल्याने तसेच आवाजाप्रती आपला समाज कसा प्रतिसाद देतो याबाबत पुरेशी माहिती - विदा - डेटा नसल्याने आवाजावर नियंत्रण आणणे कठीण बनले आहे. आवाजाच्या परिणामाबाबत आपला समाज तसेच कायदेही, कायदे राबविणार्या संस्था आदी अनभिज्ञ आहेत. "चलता है" ही वृत्ती आपल्या समाजाने टाळली पाहिजे.
परदेशातील अनेक संस्थांनी अवाजवी आवाज, ध्वनी प्रदूषण याबाबत शास्त्रीय अभ्यास केलेला आहे. ध्वनी प्रदूषण व त्यासंबंधाने उद्भवणार्या आजारांमुळे मानवाचे हजारो "अपंगत्व-समायोजित जीवन-वर्षे" ( Disability Adjusted Life Years) वाया गेलेली आहेत. उदाहरणार्थ, युरोपीय देशांतील समाजाची आवाजामुळे सुमारे ९०३००० एकूण वर्षे वाया गेलेली आहे. साध्या भाषेत सांगायचे झाल्यास आवाजाच्या आजारामुळे मानवाचे हजारो वर्षे वाया गेलेली आहेत. रस्त्यावरील वाहतूक यामुळे झोपेचे खोबरे होणे आणि चिडचिडेपणा वाढीस लागणे हा मुख्य आजार असल्याचे अभ्यासात दिसून आलेले आहे. आवाजामुळे दिवसा तीन जणांपैकी एक व्यक्ती चिडचिडी होते आणि पाचपैकी एका व्यक्तीची रात्रीची झोप रात्रीच्या रहदारीमुळे विस्कळीत होते. आवाजाच्या वातावरणात दीर्घकालीन वास्तव्य केल्यास हृदयरोग तसेच हृदयस्नायूमध्ये रक्ताची गुठळी होऊन बसणे (myocardial infarction) हा गंभीर आजार बळावलेला आहे याबाबत अनेक पुरावे उपलब्ध आहेत. अशाप्रकारे ध्वनी प्रदूषण हे पर्यावरणीय उपद्रव ठरते. आवाजामुळे सार्वजनिक आरोग्यास देखील धोका निर्माण केलेला आहे.
वातावरणातील आवाजामुळे हृदयरोग व रक्तवाहिन्यासंबंधी आजार, संज्ञानात्मक दोष - (cognitive impairment - एखादी नवीन गोष्ट न शिकणे, लक्षात न ठेवणे, संज्ञानात्मक कमजोरी, एकाग्रतेचा अभाव किंवा निर्णय घेण्यास त्रास होणे), झोपेतील व्यत्यय आणि टिनिटस (कानात सतत आवाज ऐकू येणे), अकाली येणारे श्रवणदोष, आवाजाच्या एखाद्या तरंगाचा, फ्रीक्वेन्सीमुळे त्रास होणे, चिडचिडेपणा वाढीस लागणे इत्यादी आजार बळावू शकतात. दुर्दैवाने या गंभीर असणार्या आरोग्य समस्यांचे मूळ कारण अवाजवी आवाज सतत ऐकणे असू शकते हेच आपल्या नागरीकांना मान्य नसते किंवा ते त्याबाबत अजाण असतात. आवाजामुळे होणार्या मानसिक-सामाजिक प्रभावांबरोबरच, सार्वजनिक आरोग्यावर परिणाम होतो हे चिंताजनक आहे. आवाजामूळे मानवाच्या शरिरावर परिणाम होवून बळावळार्या आजारांची आपण माहिती घेवूया.
१) झोपेचा त्रास:
आवाजामुळे झोपेचे खोबरे झालेले तुमच्यापैकी बर्याच जणांनी अनुभवले असेल. झोपेचा त्रास ही तक्रार सर्वसामान्यपणे ज्या व्यक्ती ध्वनी प्रदूषण अनुभवतात त्यांत पहायला मिळते. त्याचा त्यांच्या आरोग्य आणि जीवनाच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम होऊ शकतो. कोणताही सजीव झोपेतही आवाज ओळखतो. आवाजामुळे झोपेच्या रचनेत बदल घडतात, हृदयाचे ठोके वाढतात. हे नैसर्गिक असले तरी असे वारंवर घडले तर आरोग्याचा प्रश्न निर्माण होवू शकतो. अशाने झोप अपुरी होवून झोपेत शरीराची झीज भरून निघत नाही. अभ्यासातून असे दिसून आले आहे की आवाजाचा झोपेवर लगोलग परिणाम होतो. झोप लागण्याच्या अवस्थेत ती व्यक्ती उत्तेजनात्मक प्रतिसाद, झोपेच्या टप्प्यातील बदल, जागृत अवस्था, शरीराच्या हालचाली, संपूर्ण जागे राहण्याचा वेळ वाढणे, प्रतिसाद देणे अशा अनुभवातून जाते. पुरेशी झोप झाली नाही तर त्या पश्चात इतर परिणामही त्या व्यक्तीवर होतच असतात जसे - दिवसा झोप येणे, आळसात दिवस जाणे, कामात उत्साह नसणे इत्यादी. अपुर्या झोपेचे व्यक्तीपरत्वे दीर्घकालीन परिणाम असू शकतात. झोपेचा त्रास, इलेक्ट्रो-फिजिओलॉजिकल किंवा सर्वेक्षण प्रश्नावलीचा उपयोग करून, स्वत: चा अहवाल देऊन मोजला जाऊ शकतो. या अभ्यासामध्ये "स्वत: नोंदवलेला झोपेचा त्रास" हा सर्वात सहज मोजता येणारा परिणाम सूचक आहे, कारण इलेक्ट्रो-फिजियोलॉजिकल मोजमापासाठी मोठ्या प्रमाणात नमुने घेणे महाग आणि अवघड आहे आणि तसे करण्यामध्ये अवास्तव उत्तरे मिळू शकतात. झोपेच्या आवाजाचा त्रास होणे या समस्येच्या अभ्यासामध्ये संशोधकांना अनेक अडथडे येवू शकतात. ज्या व्यक्तींवर संशोधन करायचे आहे त्यांची संख्या तसेच त्यांच्या आसपास असलेल्या विमानतळ, वाहतूकीचे रस्ते, वाहने व त्यांचा गोंगाट यामध्ये भरपूर तफावत आढळते. त्या कारणांमुळे ठोस कारणमिमांसा करणे थोडे अवघड होते. तरीदेखील जो काही अभ्यासाद्वारे डाटा समोर येत आहे त्यामुळे आवाजामुळे झोपेची समस्या गंभीर होत आहे हे समजते.
२) श्रवणदोष:
संपुर्ण जगात श्रवणदोषाने बाधीत व्यक्तीपैकी २०% भारतीय असतात यावरून आपल्या देशातील श्रवणदोषाचे गांभिर्य लक्षात यावे. कानामध्ये निरनिराळ्या कारणाने दोष निर्माण होणे, कानाच्या कोणत्याही भागाला इजा होणे, घाव बसणे, कानातून पू येणे, जंतूसंसर्ग होणे, कान फुटणे हे कानाचे दोष आहेत. पण कमी ऐकू येणे किंवा अजिबातच ऐकू न येणे हे श्रवणदोषात मोडते. श्रवणशक्ती कमी होवून ऐकू न येण्याच्या समस्येला बहिरेपण असे म्हटले जाते. आवाजाच्या प्रदूषणामुळे श्रवणदोष निर्माण होवू शकतात. एखाद्या यंत्रावर काम करण्यामुळे तेथून येणार्या आवाजामुळे तेथील कामगारांच्या कानामध्ये ऐकण्याच्या समस्या येतात. वाहन चालवण्यार्या वाहनचालकांमध्ये श्रवणदोष निर्माण होवून चिडचिड होवू शकते. अकारण ऐकलेल्या सततच्या आवाजामुळे बधीरत्व येवू शकते. श्रवणदोषामुळे केवळ कमी ऐकू येते असे नाही तर त्या बाधीत व्यक्तीच्या बोलण्यातही बाधा येते. ऐकू न आल्याने बोलणे देखील बिघडते. भाषा विषयक विकास खुंटतो. अनुवंशिक श्रवणदोषाशिवाय आजूबाजूच्या वातावरणात असलेल्या मोठ्या आवाजामुळे निर्माण होणारे कर्णबधिरत्व परिस्थितीजन्य असते. निरनिराळे औषधोपचार, शस्त्रक्रिया, कानात ऐकू येणारे यंत्र बसवणे इत्यादी उपाययोजना करून काही प्रमाणात श्रवणदोष घालविता येतात.
३) हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग:
गरजेचा नसलेला आवाज हा कुणालाही नकोसा वाटतो. हा अनुभव आपणा सर्वांनी कधी ना कधी घेतलेला असतोच. असला आवाज आपल्या नेहमीच्या जगण्यावर परिणाम करत असतो. यामुळे एखाद्या व्यक्तीच्या एकाग्रतेमध्ये, संवादामध्ये, विश्रांती तसेच झोप यामध्ये अडथळे येत असतात. सार्वजनिक आरोग्यावर परिणाम करणार्या या आवाजामुळे इतर आजारांबरोबरच हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी जे दुष:परिणाम समोर येत आहेत ते जास्त गंभीर आहेत. अलीकडील काही वर्षांत रस्त्यांवरील वाहतूक व रहदारी आणि विमानाचा आवाज यामुळे आजूबाजूच्या रहिवासींमध्ये उच्च रक्तदाब , हृदयरोग इत्यादी आजार वाढलेले आहेत. रस्ते वाहतुकीच्या आवाजामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो, ज्यात हृदयस्नायूमध्ये रक्ताची गुठळी होऊन बसणे (myocardial infarction)हा धोका असल्याचे दिसून आले आहे. रस्ते वाहतुकीचा आवाज आणि विमानांचा आवाज या दोन्हीमुळे उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. सजीवांचा मेंदूतील श्रवण प्रणाली आवाज, ध्वनी, गोंगाट आदींचे फरक लक्षात घेवून सतत त्या माहितीचे विश्लेषण करत असतो. सततच्या मोठ्या आवाजाच्या तणावाचा परिणाम शरीरातील जैवीक संस्थेवर होत असतो. आवाज हा एक अविशिष्ट तणाव मानला जातो ज्यामुळे दीर्घकाळात आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. साथीच्या रोगांच्या अभ्यासानुसार आवाजाची पातळी जास्त असते अशा रस्ता किंवा हवाई वाहतुक इत्यादी सेवा देणार्या उद्योगात काम करणार्या लोकांमध्ये उच्च रक्तदाब आणि रक्ताची गुठळी होणे (मायोकार्डियल इन्फ्रक्शनसह) हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा उच्च धोका जास्त असतो.
४) चिडचिड, राग, क्रोध, त्रास, वैताग, उपद्रव, नैराश्य:
परिपूर्ण आरोग्य असणे म्हणजे केवळ रोग किंवा अशक्तपणा नसणे नसून संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कल्याणाची स्थिती सर्व समाजाला प्राप्त होणे परिपूर्ण आरोग्याचे द्योतक आहे. म्हणूनच, वातावरणात होणार्या आवाजामुळे होणारी चिडचिड, त्रास हा सामाजिक आरोग्यावरील संकट मानले पाहिजे. आवाजामुळे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतात हे आता पुराव्याने जवळपास सिद्ध झालेले आहे. म्हणूनच, वातावरणातील आवाज केवळ उपद्रवाचे कारण नव्हे तर सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणाच्या आरोग्यासाठी देखील चिंताजनक मानला पाहिजे. वातावरणातील अवाजवी आवाजाची परिणीती ध्वनीप्रदूषणामुळे होणार्या त्रासात होते. अशा त्रासामुळे चिडचिड, राग, क्रोध, त्रास, वैताग, उपद्रव, नैराश्य इत्यादी मानसिक आजार होवू शकतात. आवाजामुळे होणारी चिडचिड आरोग्यावर विपरीत परिणाम करते. आवाजाने चिडलेल्या लोकांना राग, निराशा, असंतोष, माघार, असहाय्यता, नैराश्य, चिंता, विचलित होणे, मानसिक आंदोलने किंवा थकवा अशा विविध नकारात्मक प्रतिसादांचा अनुभव येऊ शकतो. शिवाय, थकवा, पोटाची अस्वस्थता आणि तणाव यांसारख्या तणावाशी संबंधित मनोसामाजिक लक्षणे आवाजाच्या संपर्कात येण्याशी तसेच आवाजाने होणार्या चिडचिडीपणाशी संबंधित असल्याचे आढळले आहे. आवाजाशी संबंधित तीव्र प्रकारच्या चिडचिडेपणा हा वातावरणातील आवाजाच्या संपर्कात असलेल्या मानवसमुहाच्या जगण्याच्या शैलीवर आणि समाधानावर परिणाम करणारा एक वैध पर्यावरणीय मुद्दा मानला पाहिजे असे काही सार्वजनिक आरोग्य तज्ञांना वाटते.
५) मुलांमध्ये संज्ञानात्मक दोष Cognitive impairment (एखादी नवीन गोष्ट न शिकणे, लक्षात न ठेवणे, संज्ञानात्मक कमजोरी, एकाग्रतेचा अभाव किंवा निर्णय घेण्यास त्रास होणे):
मुलांच्या शिकण्यावर आणि स्मरणशक्तीवर आवाजाचा नकारात्मक परिणाम होतो. आवाजाशी संपर्क असताना व आवाजाचा संपर्क थांबल्यानंतरही शालेय वयाच्या मुलांमध्ये संज्ञानात्मक क्षमतेत घट होतच असते असा अभ्यास प्रायोगिक आणि साथीच्या रोगांच्या अभ्यासकांनी केला आहे. २० वर्षांपेक्षा जास्त अभ्यासानुसार मुलांमधील वाचन आणि स्मरणशक्तीवरील ध्वनीचा नकारात्मक परिणाम दिसून आला आहे. तीव्र आवजाचा तेवढ्याच तीव्रतेने लहान मुलांवर परिणाम होतो. वाचन, आकलन, स्मरणशक्ती आणि लक्ष देणे तसेच भाषेचा समावेश असलेली कामे आवाजामुळे प्रभावित होतात. शालेय शिक्षणाच्या वयात जर असे दुष्परीणाम झाले तर मुलांच्या बौद्धीक आणि भावनात्मक विकासात बिघाड होऊ शकतो व त्याचा गंभीर परिणाम त्यांच्या पुढील जीवनावर होऊ शकतो. १९९२ मध्ये जर्मनीमधल्या म्यूनिच येथील जुने विमानतळ बंद करून नवीन जागी त्याचे स्थलांतर झाले. त्याकाळी त्या भागातील वय वर्षे ९ ते १० मधल्या शालेय मुलांचा अभ्यास करण्यात आला. स्थानांतरणापूर्वी, उच्च आवाजाचा संपर्क असणार्या मुलांमध्ये दीर्घकालीन स्मरणशक्ती आणि वाचन आकलनातील कमतरता आढळून आली. विमानतळ स्थलांतरीत झाल्यानंतर काही कालावधीनंतर त्या मुलांमधील अशी कमतरता भरून निघाली ही चांगली गोष्ट देखील लक्षात आली. जरी जुन्या जागी असलेल्या मुलांमध्ये दोन वर्षांनंतर ही समस्या कमी झाली असली तरी नव्या विमानतळाजवळ असलेल्या मुलांमध्ये आवाजामुळे अशी समस्या जाणवायला सुरूवात झाली होती.
६) कर्णनाद - टिनिटस (कानात सतत आवाज ऐकू येणे) Tinnitus:
आजूबाजूला कोणताही आवाज नसतांना सतत एखाद्याच्या कानात बारीक गुणगुण, खरखर, कुजबुज, शिट्टी, घंटी वाजल्यासारखा, एखाद्या मोटरची घरघर, रातकिड्याची किरकिर इत्यादी बारीक आवाज येत असेल तर ती व्यक्ती टिनीटस या आजाराची शिकार असू शकते. असे कर्णनाद असलेले आवाज केवळ त्या आजाराने बाधीत व्यक्तीलाच येत असतात. आवाज बाह्य ध्वनी स्रोताच्या अनुपस्थितीत आवाजाची संवेदना म्हणून
कर्णनाद-टिनिटसची व्याख्या केली जाते. अंतर्कर्णामधल्या कर्णशंकू (Cochlea)असलेल्या नलीकेत बारीक केसांच्या झुबक्यासारख्या लोमकोशिकांची रचना असते. बाह्य आवाजामुळे, वयोमानामुळे या लोमकोशिका काही प्रमाणात खराब झाल्या तर कर्णनाद या आजाराची सुरूवात होते. अनेक डॉक्टर कर्णनाद-टिनिटसला आजार नव्हे तर श्रवण प्रणालीतील समस्येचे लक्षण मानतात. हा आजार कमी न होता वाढत जातो. ऐकू येणार्या गुणगुण, घंटी वाजण्याची त्रीव्रता वाढत जाते. जास्त मोठ्या आवाजाच्या संपर्कात आल्यामुळे, डोके व मान यांना इजा झाल्यास, कानात जंतूंचे संक्रमण व वयोमानानुसार कर्णनाद - टिनिटस आजार उद्भवतो. जी मुले सतत हेडफोन लावून गाणी वगैरे ऐकत असतात अशांमध्येही कर्णनाद - टिनिटस या आजाराचे लक्षण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. आवाजामुळे श्रवणदोष निर्माण झालेल्या ५०% ते ९०% व्यक्तींमध्ये कर्णनाद - टिनिटस आजार दिसून येतो. काही लोकांमध्ये टिनिटसमुळे झोपेचा त्रास, संज्ञानात्मक परिणाम (एखादी नवीन गोष्ट न शिकणे, लक्षात न ठेवणे), चिंता, मानसिक त्रास, नैराश्य, संप्रेषण समस्या, नैराश्य, चिडचिडेपणा, तणाव, काम करण्यास असमर्थता, कार्यक्षमता कमी होणे आणि सामाजिक जीवनातील मर्यादित सहभाग कमी होणे इत्यादी प्रकार घडू शकतात. श्रवणशक्ती कमी (बधीरता) होण्यासह आणि कर्णनादाचा त्रास होणे या समस्या बर्याचदा एकत्र होवू शकतात. अत्यधिक, प्रमाणापेक्षा जास्त असलेल्याआवाजाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस कर्णनाद - टिनिटसचा अनुभव येऊ शकतो. या आजारावरील उपायात शस्त्रक्रिया सांगितली जाते पण शक्यतो तिचा उपयोग होत नाही.
भाग ४.१ समाप्त.
(क्रमश:)
प्रतिक्रिया
4 Aug 2021 - 12:20 am | गॉडजिला
Befriend peace, not silence...
4 Aug 2021 - 9:29 am | कुमार१
चांगला लेख.
4 Aug 2021 - 9:37 am | प्रकाश घाटपांडे
उत्तम लेखमाला चालू आहे. जाहिरातींचे आवाज हे नेहमी हाय पिच व हाय लेव्हल रेकॉर्डिंग चे का असतात? जाहिरात आली की टीव्हीचा आवाज एकदम वाढतो. टीव्ही एका विशिष्ट आवाजाच्या लेव्हल नी चालू राहिल अशी काही सोय असते का?
28 Oct 2021 - 9:27 pm | मुक्त विहारि
वाखूसा