अनुवादित पुस्तकं

पाटिल's picture
पाटिल in जनातलं, मनातलं
11 Jul 2021 - 10:52 pm

वाचनाच्या मर्यादेत, मला आवडलेल्या आणि आठवतायत तशा क्रमाने काही अनुवादित पुस्तकांची यादी करतो आहे.
हा उद्योग करण्याचा हेतू असा की फार पूर्वी माझ्याबाबतीत प्रॉब्लेम असा झाला होता की मराठीतलं जे जे वाचायला पाहिजे होतं, ते आता वाचून झालेलं आहे, असं वाटण्याचा एक काळ आला होता.. आणि मग त्यातून 'अजून किती काळ तेच तेच वाचून मन रिझवून घ्यायचं', असा वैतागही..‌

पण मग डायरेक्ट इंग्रजी क्लासिक्सकडं जायचं तर त्यात एक प्रकारची 'दचक' होती की ती पल्लेदार भाषा आपल्याला झेपतेय की नाही वगैरे.. कारण त्यापूर्वी एकदा असंच चुकून दोस्तोव्हस्कीला इंग्रजीतून हात घालून, होता नव्हता तेवढा आत्मविश्वास खच्ची करून घेतलेला होता, हे एक बॅकमाईंडला होतं...

तर मग तडजोड म्हणून अनुवादित पुस्तकांकडं सरकत गेलो..

पण दुर्दैवानं त्याच सुमारास झालं असं की..
डिटेक्टीव्ह/थ्रिलर टाईपच्या कादंबऱ्या ज्यातले नायक हमखास तैलबुद्धीचे वकील, पत्रकार वगैरे असतात आणि एफबीआय-सीआयएवाले एकजात बिनकामाचे, फुकटपगारखाऊ वगैरे असतात.. आणि जगभरातील भाबड्या मानवजातीला, अटळ विनाशापासून वाचवण्याची जबाबदारी, लेखकाने शेवटी एखाद्या अज्ञात जागी राहणाऱ्या नायकांवरच नेऊन टाकलेली असते वगैरे..

हे कमी म्हणून की काय, पाच-सहाशे वर्षांपूर्वींची मढी उकरत, उदाहरणार्थ रोम वगैरे शहरांतली भुयारे धुंडाळत कुठलीतरी गूढ कोडी सोडवत बसणाऱ्या..

तसेच भरल्या पोटी जगभर उंडारत उंडारत हरप्रकारची मजा मारणाऱ्या आणि पुन्हा तो सगळा सेक्शुअल मसाला 'आत्मशोधा'च्या नावाखाली दणकावून छापणाऱ्या वगैरे..

असल्या इंग्रजीतल्या कादंबऱ्यांचा उकिरडा उपसून, तो मराठीत आणून फेकायची जबरदस्त लाट आली होती, तिच्या तडाख्यात मी आपसूकच सापडलो होतो..!

पण नंतर मग असंच कधीतरी गटांगळ्या खात खात किनाऱ्याला लागल्यावर लक्षात आलं की आपल्याला 'गि-हाईक' बनवण्यात आलेलं आहे, त्याचंही दु:ख समजा एक वेळ सहन केलं तरीही, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये फुकटचा वेळ जाऊन पैशांचीही बरबादी झालेली, हे त्याहून वाईट..

आणि म्हणून विचार केला की, त्यावेळी माझा जो प्रॉब्लेम होता, सेम तशाच प्रॉब्लेममधून कुणी जात असेल, आणि शोधाशोध करत असेल, तर त्यांच्यासाठी आपल्याकडच्या शहाण्या लोकांनी, जगभरातल्या काही दर्जेदार पुस्तकांचे मराठीमध्ये सुंदर अनुवाद करून ठेवलेले आहेत...
ज्यातलं एखादं वाचून समजा एखाद्या वाचकाला, काहीतरी सणसणीत वाचल्याचा आनंद वैयक्तिक पातळीवर मिळाला तर चांगलंच आहे की.. म्हणून ही यादी;

वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड- गॅब्रिएल गार्सिया मार्केझ (अनु.केशव सद्रे)

सीन्स फ्रॉम प्रोव्हिन्शियल लाईफ- जे. एम कोएत्झी
(अनु. 'गावातील जीवनदृश्ये',अवधूत डोंगरे)

मादाम बोवारी- गुस्ताव फ्लॉबेर
(अनु. जयंत धुपकर)

द सेन्स ऑफ ॲन एंडींग- ज्यूलियन बार्न्स
(अनु. विलास साळुंखे)

कवीचे अखेरचे दिवस आणि निरागस इरेंदिरा-
गॅब्रिएल गार्सिया मार्केझ (अनु. रंगनाथ पठारे)

व्हेन वुई वेअर ऑरफन्स- काझुऒ इशिगुरो
(अनु.सुश्रुत कुलकर्णी)

रिमेन्स ऑफ द डे- काझुऒ इशिगुरो
(अनु. आश्लेषा गोरे)

क्रॉक ऑफ गोल्ड —जेम्स स्टीफन्स
(अनु.- 'सोन्याचे मडके'—जी ए कुलकर्णी)

द लॉर्ड ऑफ फ्लाईज-- विल्यम गोल्डींग
(अनु. जी ए कुलकर्णी)

शेविंग ऑफ शॅगपट- जॉर्ज मेरेडीथ
(अनु. 'एक अरबी कहाणी', जी ए कुलकर्णी)

द लाईट इन द फॉरेस्ट- कॉनराड रिक्टर
(अनु. 'रानातील प्रकाश, जी ए कुलकर्णी)

'गाव', 'शिवार'- कॉनराड रिक्टर (अनु. जी ए कुलकर्णी)

द फांऊटनहेड- आयन रॅंड (अनु. मुग्धा कर्णिक)
ॲटलास श्रग्ड- आयन रॅंड (अनु. मुग्धा कर्णिक)

द सेकंड सेक्स- सिमॉन द बोव्हुआर
(अनु. करुणा गोखले)

शब्द- जॉं पॉल सार्त्र (अनु. वा.द.दिवेकर)

द चिप्स आर डाऊन - जॉं पॉल सार्त्र
(अनु. 'तेथे चल राणी', वसंत कानेटकर)

मेटॅमॉर्फोसिस-- फ्रांझ काफ्का
(अनु. 'पिसुक', जयंत कुलकर्णी)

द ट्रायल- फ्रांझ काफ्का
(अनु. 'महाभियोग', जयंत कुलकर्णी)

निवडक काफ्का- अनु./संपादन नीती बडवे

ॲनिमल फार्म- जॉर्ज ऑरवेल (अनु. तुषार बापट)
नाईंटीन एटी फोर- जॉर्ज ऑरवेल (अनु. अशोक पाध्ये)

डार्कनेस ॲट नून-ऑर्थर कोसलर
(अनु.- 'भरदुपारच्या अंधारात'- वसंतराव नारगोलकर)

द ग्रेप्स ऑफ रॅथ- जॉन स्टाईनबेक
(अनु. मिलिंद चंपानेरकर)

मून इज डाऊन-- जॉन स्टाईनबेक
(अनु. गणेश जोशी)

अ टेल ऑफ टू सिटीज- चार्ल्स डिकन्स
(अनु. सुशील परभृत)

ब्लाईंडनेस-- जुझे सारामागु
(अनु. भास्कर भोळे)

माय नेम इज रेड-- ओरहान पामुक
(अनु. गणेश विसपुते)

द टाईम्स ऑफ असासीन्स - हेन्री मिलर
(अनु-'विनाशवेळा'- महेश एलकुंचवार)

द बुक थीफ - मार्कस झुसॅक
(अनु.'पुस्तकचोर', विनीता कुलकर्णी)

मॅन्स सर्च फॉर मिनींग- डॉ. व्हिक्टर फ्रॅंकल
(अनु.-'अर्थाच्या शोधात', डॉ. विजया बापट)

शांताराम- ग्रेगरी रॉबर्ट्स (अनु. अपर्णा वेलणकर)

सोल मांउटेन- गाओ झिंगजियान (अनु. मधु साबणे)

द प्रॉफेट- खलील जिब्रान (अनु. जे के जाधव)

रिल्केची दहा पत्रे - अनिल कुसुरकर

२१ व्या शतकासाठी २१ धडे- युवाल नोआ हरारी
(अनु. सुनील तांबे)

अ न्यू अर्थ - एकहार्ट टॉल
(अनु. 'एक अवनी नवी', नीलिमा जोशी)

द कॅचर इन द राय- जे डी सॅलिंजर (अनु. संजय जोशी)

कॉन्वेक्स्ट ऑफ हॅपिनेस- बर्ट्रांड रसेल
(अनु. करुणा गोखले, 'सुखी माणसाचा सदरा')

अनपॉप्युलर एस्सेज- बर्ट्रांड रसेल
(अनु. करुणा गोखले, 'नाही लोकप्रिय तरीही')

रीयुनियन- फ्रेड उल्मान (अनु. मुग्धा कर्णिक)

आफ्टर दि क्वेक- हारुकी मुराकामी
(अनु. निशिकांत ठकार) कथासंग्रह

लस्ट फॉर लाईफ- आयर्विंग स्टोन (अनु. माधवी पुरंदरे)

रावण आणि एडी, दि एक्स्ट्राज- किरण नगरकर
(अनु. रेखा सबनीस)

ककल्ड- किरण नगरकर
(अनु.- 'प्रतिस्पर्धी', रेखा सबनीस)

द ब्लाइंड लेडी'ज डिसेंडंट्स-अनीस सलीम
('आंधळ्या बाईचे वंशज', अनु. श्यामल चितळे)

व्हॅनिटी बाग- अनीस सलीम
(अनु. योगिनी वेंगुर्लेकर)

गुंटेरचा हिवाळा- ख्वान मॅन्युएल मार्कोस (अनु. मनोज पाठक)

द ब्लाइंड असॅसिन- मार्गारेट ॲटवूड (अनु. चारुता नानिवडेकर)

वॉल्डन- हेन्री डेव्हिड थोरो (अनु.जयंत कुलकर्णी)

द व्हाईट फॅन्ग- जॅक लंडन ('लांडगा', अनु. अनंत सामंत)

रिबेल सुलतान्स- मनु पिल्लई (अनु.तृप्ती कुलकर्णी)

रसेलचे निवडक लेख- भा. ज. कविमंडन

द स्टोरी ऑफ वेस्टर्न फिलॉसॉफी- विल ड्युरांट
(अनु. 'पाश्चात्य तत्वज्ञानाची कहाणी' अनु. साने गुरुजी)

डॉन क्विझोट(भाग १,२)- सरव्हॅंटीस
(अनु. दा. न. शिखरे)

आणि खालच्या मूळच्या रशियन कादंबऱ्या, ज्या दीडशे वर्षे मुरलेल्या व्होडक्यासारख्या जालीम असल्यामुळे, हळूहळू बेताबेतानं, निवांतपणे एकेक घोट रिचवत रिचवत वाचण्यासाठी आहेत... उदाहरणार्थ..

ॲना कॅरेनिना- लिओ टॉलस्टॉय
(अनु. कवली ललितागौरी)

ब्रदर्स करमाझोव- दोस्तोव्हस्की
(अनु.- करमाझफ बंधु', खंड १,२, भाऊ धर्माधिकारी')

द गॅंबलर - दोस्तोव्हस्की ('जुगारी'-अनु. जयंत दिक्षित)

नोट्स फ्रॉम अंडरग्राऊंड - दोस्तोव्हस्की
(अनु.अनिल आंबीकर 'भूमिगताची टिपणे')

क्राइम ॲंड पनिशमेंट- दोस्तोव्हस्की
('गुन्हा आणि प्रायश्चित्त', अनु.- काशिनाथ कोनकर)

द हाऊस ऑफ डेड्स- दोस्तोव्हस्की(अनु. 'मेलेल्यांची गढी',अनु.- विश्राम गुप्ते)

डॉ. झिवागो- बोरिस पास्तरनाक (अनु. आशा कर्दळे)

ॲंड क्वाएट फ्लोज द डॉन- मिखाईल शोलोखोव्ह
('डॉन संथ वाहतेच आहे',भाग१,२- अनु. नरेंद्र सिंदकर)

आणि शेवटी जाताजाता, हिंदीतून मराठीच्या अंगणात आलेली उदाहरणादाखल दोन :

हाक आणि प्रतिसाद- निदा फाझली
(अनु. इब्राहिम अफगाण)
राग दरबारी— श्रीलाल शुक्ल
(अनु. श्रीपाद जोशी)

वाङ्मयसाहित्यिकमतशिफारस

प्रतिक्रिया

कॉमी's picture

11 Jul 2021 - 11:08 pm | कॉमी

विस्तृत यादी, छानच.
(आफ्टर द क्वेक माझे खूप आवडते पुस्तक आहे.)

काही वाढ-
शेरलॉक होम्स कथा- भालबा केळकर आणि गजानन क्षीरसागर दोन्ही मस्त. (क्षीरसागर संपूर्ण आहे.)
चौघीजणी- (लिटल वुमन आणि गुड वाईव्हज- लुईसा मी अल्कॉट)- शांता शेळके
बर्टनचे अनुवादित अरेबियन नाईट्स- गौरी देशपांडे

चौघीजणी' बद्दल ऐकलं आहे बरंच.. आता बघायला पाहिजे.. अरेबियन नाईट्स चे अनुवाद पाहिले होते एकदा अक्षरधारा मध्ये, पण ते सगळे दहा-बारा खंड एकाच वेळी घ्यायला लागतील असं त्यांनी सांगितलं, म्हणून राहून गेलं ते.. तुम्ही सुचविलेली पुस्तकं विश लिस्ट मध्ये टाकतोय..
यादीत भर टाकल्याबद्दल धन्यवाद.. :-)

बास्करविल सारखी नोवेल्स त्यात सामाविष्ट नाहीत

कॉमी's picture

12 Jul 2021 - 1:47 pm | कॉमी

होय, बरोबर.

गॉडजिला's picture

11 Jul 2021 - 11:09 pm | गॉडजिला

आणी लिस्टही चांगली दिली आहे...

मादाम बोवारी- गुस्ताव फ्लॉबेर
(अनु. जयंत धुपकर)

हे आवडते पुस्तके आहे. ह्यावर शाहरुख खान दीप साही ह्यांचा माया मेमसाब हा जबरदस्त चित्रपट येऊन गेलाय. हटके आहे आणि दीपा आणि शाहरुख दोघांनीही ह्यांत अनावृत्त सीन्स केले आहेत.

सगळेच बिचारीची मजा घेतात :( फक्त शारुक न्हवे

हा चित्रपट पाहिल्यावर मी दीपा साहिचे बरेच चित्रपट बघून काढले ज्यात शारुकचा ओ डार्लिंग ये हे इंडिया, अन जॅकीचा आर या पार मस्त वाटले इतरही अनेक चित्रपटात दीपा छान दिसली आहे पण चित्रपट डावे नितंब या केटेगारीतील असल्याने मला तसे भावले न्हवते... पण दीपाने दिल जित लिया था हे नक्की

कंजूस's picture

12 Jul 2021 - 5:14 am | कंजूस

पण मूळ पुस्तकंच / किंवा इंग्रजी अनुवाद वाचणार. तेच बरे नसेल तर अनुवाद काय कामाचा.

ॲना कॅरेनिना-कंटाळवाणे वाटले होते.
ककोल्ड चांगले आहे.
रावणा आणि एडी पहिला भाग चांगला आहे. एक्सट्रा फार लांबवल्यासारखा वाटला.
२१ व्या शतकासाठी २१ धडे आणि अगोदरचे पुस्तक मानवाचा इतिहास कंटाळवाणे वाटले पण इंडिका हे दुसऱ्या एका लेखकाचे चांगले वाटले.
काईट रनर कुणी अनुवादले का? ते आवडलेले।
( माझी आवड)

काईट रनर नक्कीच अनुवादलेलं आहे. पाहिलं आहे. अनुवादकाचे नाव माहीत नाही.

मी पण इंग्रजीत वाचतो बऱ्याचदा पण काही अनुवाद जास्त छान वाटतात. खास करून जुन्या वळणाची इंग्रजी फार नाटकी वाटते. ती अनुवादित असली की बरी वाटते.

कंजूस's picture

12 Jul 2021 - 5:20 am | कंजूस

मूळ पुस्तकात कधीकधी उत्तम चित्रे असतात ,ती अनुवादक घेतात का?/ घेतली आहेत का?

माझा आवडता लेखक विल्यम डर्लिंपल. त्याच्या व्हाईट मुघल्स, लास्ट मुघल या पुस्तकांत चित्रे आहेत. ती म्युझिअममधून मिळवली आहेत. ती रंगीत चित्रे घेतली नाहीत अनुवादांत तर गंमत जाईल.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

12 Jul 2021 - 9:03 am | रावसाहेब चिंगभूतकर

डेझर्टर हे विजय देवधरांनी अनुवादित केलेले पुस्तक माझे आवडते पुस्तक. दुसरे आवडते म्हणजे रवींद्र गुर्जरांनी अनुवाद केलेले पॅपिलॉन (या पुस्तकात एक चूक मला नुकतीच सापडली. Splitting the money चे भाषांतर नोटांचे तुकडे करून वाटून घेतले असे केले आहे. असो.). ज्या अनुवादनात चुका असतात तो अनुवादक आणि ते पुस्तक माझ्या मनातून पूर्ण उतरते. काही काही पुस्तके घाईघाईत पाट्या टाकल्यासारखी अनुवादित केलेली आढळतात. अर्थात बरेच वाचक इंग्रजी वाचण्यासाठी असमर्थ असल्यामुळे त्यांना हे कळतच नाही, पण तरी वाचताना खडा आल्यासारखं वाटून वाचक गोंधळात पडतातच.

चौथा कोनाडा's picture

12 Jul 2021 - 9:32 am | चौथा कोनाडा

रवींद्र गुर्जर अनुवादित पॅपिलॉन मला देखील खुप आवडलेलं !

Bhakti's picture

12 Jul 2021 - 11:19 am | Bhakti

वाह
छान सांगितले.
मी फक्त चारचौघी आणि पॅपिलॉन वाचलंय,तेही नीट आठवत नाही.
आठवतं फक्त एकच 'द दा विंची कोड' मग Dan Brown चे.
अजून एक toxin / poise वाचलं होतं..चांगल होते.
मस्त यादी आहे.

प्रचेतस's picture

12 Jul 2021 - 11:28 am | प्रचेतस

लेखाचा सुर डिटेक्टिव्ह, थ्रिलर प्रकारच्या कादंबर्‍यांना तुच्छ लेखण्याकडे दिसतोय. वास्तविक इंग्रजी साहित्यात अशा प्रकारच्या कादंबर्‍यांनी मोलाची भर घातलेली आहे. डॅन ब्राऊनचे दा विन्ची कोड, एन्जल्स अ‍ॅण्ड डिमन्स, फ्रेडरिक फोरसिथची द फिस्ट ऑफ गॉड, द निगोशियेटर. जेफ्री आर्चरची केन अ‍ॅण्ड अ‍ॅबल, द प्रिझनर ऑफ द बर्थ, सिडने शेल्डनचे द मास्टर ऑफ द गेम, ब्लडलाइन, अ‍ॅलिस्टर मॅक्लिनच्या द गन्स ऑफ नॅव्हरोन, व्हेअर इगल्स डेअर ह्यांच्या इतर आणि इतरही अनेक लेखकांच्या कादंबर्‍यांना वाचकांबरोबरच समिक्षकांची उदंड लोकप्रियता मिळालेली आहे. अगाथा ख्रिस्ती, सर आर्थर कॉनन डॉईल हे तर आज अभिजात गणले जातात.
ब्रॅम स्टोकरची ड्रॅक्युला, मेरी शेलीची फ्रॅन्केनस्टाईन, एमिली ब्रॉन्टेची वुदरिंग हाईट्स ह्या थ्रिलर/हॉरर कादंबर्‍या आज अभिजात कादंबर्‍या म्हणून समजल्या जातात.

डिटेक्टिव्ह/थ्रिलर कादंबर्‍यांचे सरसकटीकरण करुन त्यांना उकिरडा म्हणून हिणवणे योग्य नव्हे. काही जणांना आयर्न रॅंडचे ठोकळे रटाळ वाटू शकतील किंवा किरण नगरकरांच्या कादंबर्‍या अगम्य वाटू शकतात.

सौंदाळा's picture

12 Jul 2021 - 12:24 pm | सौंदाळा

+१
पुर्वी मिपावर वाचलेली सुशि आणि जीए यांची तुलना आठवली.
जीए वाचणारे प्रगल्भ, दर्दी वाचक आणि सुशि वाचणारे उथळ वगैरे असा चर्चेचा सुर होता

गॉडजिला's picture

13 Jul 2021 - 12:12 am | गॉडजिला

जीए वाचणारे प्रगल्भ, दर्दी वाचक आणि सुशि वाचणारे उथळ वगैरे असा चर्चेचा सुर होता

तसं नाहीये... खरं तर जीए समजू शकणारे प्रगल्भ, दर्दी वाचक वगैरे असतात... सुशीना समजून घेण्याची वेळ येण्यासाठी DNAमधे समजूतदारपणा संथ करणारे बदल आवश्यक आहेत असे प्रांजळ मत आहे.

रंगीला रतन's picture

13 Jul 2021 - 2:06 am | रंगीला रतन

जीए वाचणारे प्रगल्भ, दर्दी वाचक
त्यात चुकीचं काहीच नाही. वाचायला घेताच सरदर्दी सुरू होइल असे लेखन वाचायची प्रगल्भता दाखवतात ते दर्दी वाचक.
नोबेल विजेते,गुरूदेव वगैरे वगैरे रविंद्रनाथ टागोरांच्या लेवलचे दुसरे पकाउ लेखक जीए असे माझे प्रांजळ मत.

सुशि वाचणारे उथळ
इथे उथळ शब्द जींदादिल अशा अर्थी अभिप्रेत असावा.
क्युंकी मुर्दादिल क्या खाक सुशि पढेंगे.

गॉडजिला's picture

13 Jul 2021 - 9:07 am | गॉडजिला

वाचकांचे वर्गीकरण ?

गॉडजिला's picture

13 Jul 2021 - 9:10 am | गॉडजिला

केवळ खन्दा सुशींचा चाहताच म्हणू शकतो

Bhakti's picture

13 Jul 2021 - 9:49 am | Bhakti

नोबेल विजेते,गुरूदेव वगैरे वगैरे रविंद्रनाथ टागोर पकाउ लेखक
असे वाक्य​ शोकांतिका वाटली... :(

रावसाहेब चिंगभूतकर's picture

13 Jul 2021 - 10:33 am | रावसाहेब चिंगभूतकर

मला जी ए आणि सु शि दोघेही (काही प्रमाणात आवडतात). माझी यत्ता कंची?

गॉडजिला's picture

13 Jul 2021 - 2:45 pm | गॉडजिला

दुर्दैव तुमचे आहे त्या यत्तेतच अडकून राहणार ;)

असं बंगाली लेखकच म्हणतात. पण असं बोललं तर लगेच या़ंंना पोटदुखी आहे हा शेराही मिळतो.
जिएंनी किती उचललं ?

गॉडजिला's picture

13 Jul 2021 - 6:24 pm | गॉडजिला

जिएंनी किती उचललं ?

माहीत नाही काही मोजके लिखाण सोडून इतर काही वाचले नाही, टागोरांबाबत विधानात थोडेफार नक्की तथ्य भासते

रवींद्रनाथांची गोरा हि अत्यंत सुरेख कादंबरी आहे. जरूर वाचा.

गन्स ऑफ नॅव्हरोन, वुदरींग हाईट्स आणि फोरसिथची पुस्तकं हे काही सन्माननीय अपवाद आहेत.. _/\_
इतर ज्या लेखकांचा तुम्ही उल्लेख केलेला आहे, त्यांची पुस्तकं एकदा वाचून झाल्यावर पुन्हा पुन्हा वाचण्यासारखं त्यात काही आहे, असं मला वाटलं नाही.. अर्थात ही यादी माझ्या आवडी निवडींवर बेतलेली असल्यामुळे त्यात प्लस मायनस असं असणारच आहे...
शिवाय डीटेक्टीव्ह/थ्रिलरच नाही तर आणखी बऱ्याच प्रकारची पुस्तकं आहेत, जी मला एकेकाळी आवडायची पण आता नाहीत आवडत... आणि ह्या आवडण्या/ न आवडण्याला काही इलाज नसतो.. :-)
असं असलं तरीही, उकीरडा हा शब्द थोडा जास्तच झालेला आहे, आणि मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो.. लिहिण्याच्या ओघात ते होऊन गेलं... तसा काही उद्देश नव्हता माझा.. :-))

सिडने शेल्डनचे माझे सगळ्यात आवडले पुस्तक म्हणजे इफ टुमॉरो कम्स.. :-)

सहमत.
पण अनुवादित पुस्तकांची यादी आहे. ओके.

-----------
वाचनीय पुस्तके ( थोडक्यात गाभ्यासह) यादी असा लेख कुणी सुरू करा.
इंडिया टुडे, टाइम्स आणि इंडिअन एक्सप्रेस मध्ये बुक रिव्यू वाचून मला पुस्तक निवडायला सोपे जाते. मध्यंतरी ब्याटमनने रिव्यू केलेले द हॉर्स वाचायला घेतले. आवडले.

चौथा कोनाडा's picture

12 Jul 2021 - 12:25 pm | चौथा कोनाडा

द रेल्वे मॅन ( एरीक लोमॅक्स) ही उदय बुवा अनुवादित कांदबरीबद्दल नुकतीच माहिती मिळाली.

https://www.mehtapublishinghouse.com/book-details/THE-RAILWAY-MAN/3324.aspx

मलाया-सियामच्या निबिड जंगलात जपान्यांनी बलाढ्य ब्रिटिश सैन्याला शह दिला. अतिशय दुष्टप्राप्य खडतर अशा रेल्वे मार्गाच्या उभारणीचा चंग जपानी सैन्याने बांधला व त्यासाठी तब्बल २,००,००० दोस्त राष्ट्रांच्या ब्रिटिश, ऑस्ट्रेलियन व कॅनेडियन सैनिकांना युद्धबंदी बनवून त्यांच्याकडून हया रेल्वेमार्गाची उभारणी केली. वैयक्तिक पातळीवर ही अमानुषता अनुभवलेल्या एका सैनिकाची ही प्रथमपुरुषी कहाणी, परंतु एका विशिष्ट कालखंडाच्या इतिहासाचे दर्शन घडविणारी अद्भुत कथा.

चौथा कोनाडा's picture

12 Jul 2021 - 1:05 pm | चौथा कोनाडा

ssfsfsdfs

टर्मीनेटर's picture

12 Jul 2021 - 5:56 pm | टर्मीनेटर

हे पुस्तक वाचण्यात येईल!
काही वर्षांपूर्वी ह्यावर आधारित सिनेमा आला होता तो बघितल्याचे पुसटसे आठवतंय.

चौथा कोनाडा's picture

17 Jul 2021 - 8:29 pm | चौथा कोनाडा

टर्मीनेटर, त्या सिनेमा संदर्भात काही तपशील मिळाले तर जरूर पोस्टावे.
मी शोधले पण सापडले नाहीत !

सुमो's picture

18 Jul 2021 - 10:39 am | सुमो

पोस्टरच मेहता पब्लिशिंगने पुस्तकाचं मुखपृष्ठ म्हणून वापरलंय.

कॉलिन फर्थ आणि निकोल किडमन अभिनित हा सिनेमा इंटरनेट आर्काइव्हज वर बघण्या / डा लो करण्यासाठी उपलब्ध आहे.

टर्मीनेटर's picture

19 Jul 2021 - 3:16 pm | टर्मीनेटर

युट्युबवर ट्रेलर आहे.

https://youtu.be/px04904hm88

IMDB ची लिंक.

https://m.imdb.com/title/tt2058107/?ref_=ext_shr_lnk

टोरंटवर हिंदी डब्ड त्यावेळी मिळाला होता, आता आहे की नाही ते बघावे लागेल.

विजुभाऊ's picture

12 Jul 2021 - 4:53 pm | विजुभाऊ

"थ्री कप्स ऑफ टी" हे ग्रेग मोर्टेनसन लिखीत पुस्तक मेहता प्रकाशनाचे अनुवादीत उपलब्ध केले आहे.
खरोखरच वाचनीय आहे.
शिक्षणामुळे काय चमत्कार घडतो हे अनुभवण्यासारखे आहे.

टर्मीनेटर's picture

12 Jul 2021 - 6:18 pm | टर्मीनेटर

छान आहे यादी, ह्यातली फार थोडी पुस्तके वाचली आहेत!
हॅमिश मॅकडोनाल्ड यांच्या अंबानी & सन्स ह्या इंग्रजी पुस्तकाचा मराठीत अनुवाद कोणी केलाय त्यांचे नाव आता विसरलो पण उठसूट रिलायन्स आणि अंबानींना शिव्या घालणाऱ्यांनी नक्की वाचावे असे हे पुस्तक आहे.
समोर वाडीयांसारखा तुलनेने महाबलाढ्य प्रस्थापित प्रतिस्पर्धी, गोएंकांसारखा माध्यमातील मातब्बर विरोधक, सरकारची विचित्र उद्योगविषयक धोरणे, लायसन्स राज आणि भ्रष्ट बाबुशाही अशा प्रतिकूल परिस्थितीवर आपल्या जिद्दीने व अक्कलहुषारीने मात करुन आपला व्यवसाय भरभराटीला आणणाऱ्या धीरूभाई अंबानींची यशोगाथा वाचण्या सारखी आहे.

ambani

Nitin Palkar's picture

12 Jul 2021 - 10:03 pm | Nitin Palkar

मी वाचलेले (आणि लक्षात असलेले) काही अनुवाद:
चिपर बाय द डझन - फ्रँक बंकर गिलब्रेथ (ज्यू) अनु मंगला निगुडकर
लव मेडिसीन अँड miracle - बरनी सिगल अनू. डॉ. शुभदा राठी (हे पुस्तक तीस वर्षांपूर्वी इंग्रजी वाचले होते अलीकडे काही वर्षांपूर्वी अनुवाद वाचला ).
'गाव', 'शिवार'- (अनु. जी ए कुलकर्णी) या आधीचे कॉनराड रिक्टरचेच 'रान' (अनु. जी ए कुलकर्णी) ही तिन्ही पुस्तके अफलातून आहेत .
'द इयरलिंग' चा राम पटवरधनांनी केलेला 'पाडस' हा अनुवाद . भा. रा. भागवतांनी केलेले ज्युल व्हर्न चे अनुवाद.
'born free ' 'लिविंग फ्री' आणि 'forever फ्री' या जॉय Adomson च्या पुस्तकांचे अनुवाद साप डले नाहीत (इंग्रजीतूनच वाचली) पण तिच्या 'पिपा द चित्ता'या पुस्तकाचा मराठी अनुवाद वाचला.
जीम corbet च्या अनेक पुस्तकांचे अनुवाद पैकी एकाचा अनुवाद सुभाष bhende नी केल्याचे आठवते.
टारझनचे सर्व भाग बहुतेक कृष्ण कुमारी शेरतूकडे यांनी अनुवाद केलेल. इंद्रजाल कॉमिक्स ची खूपशी कॉमिक्स (मराठी)
विजय देवधरांची अनेक पुस्तके.

तुषार काळभोर's picture

12 Jul 2021 - 11:04 pm | तुषार काळभोर

इंग्रजीतून भाषांतरित मराठी पुस्तके वाचायला आवडत नाही.

प्रचेतस यांच्या प्रतिसादाशी सहमत.
डॅन ब्राऊन आणि सिडने शेल्डन हे माझे आवडते लेखक. दोघांची झाडून सगळी पुस्तके वाचली आहेत. डिजिटल फॉर्ट्रेस, दा विंची कोड, एंजल्स अँड डेमंस तर अनेकदा. तसेच समग्र शेरलॉक होम्स सुद्धा अनेकदा वाचलंय. त्यातली व्हिक्टोरियन इंग्रजी भाषा एकदम भारी वाटते वाचायला. (तसं इंग्रजी मॅट्रिक्स रीलोडेड मधला आर्किटेक्ट बोलतो. :D)
हॅरी पॉटर ची पुस्तके आणि चित्रपट तोंडपाठ होईपर्यंत पारायणे केलीत.
मागच्या महिन्यात प्रचेतस यांच्याच सुचवणीवरून आधी लॉर्ड of द रिंग्ज चित्रपट पाहिले, नंतर पुस्तक वाचलं.
आता हॉबिट पहायचं व वाचायचं आहे.
मायकल क्रायटन यांची ज्युरासिक पार्क आणि प्रे ही पुस्तके आवडली होती. पुस्तके चांगली आहेतच. पण स्टीवन स्पीलबर्ग यांनी पिक्चर इतका भव्य बनवला आहे की हे चांगलं पुस्तक सुद्धा फिके वाटते.
रॉबर्ट कुक यांची काही मेडिकल थ्रिलर वाचली आहेत. कोमा, ब्रेन, फीवर, ब्लाइंड साईट. ब्लाइंड साईट छान आहे. बरीच वाचायची राहिली आहेत.

नॉन फिक्शन फारसे आवडत नाही. मात्र मित्तल यांनी आर्सेलर विकत घेतली त्याची कहाणी सांगणारे कोल्ड स्टील आवडले होते.

हो हो हेच नाव आठवत नव्हतं​ रॉबर्ट कुक!

मी पण. इंग्लिश मध्येच वाचतो.

पण पाडस आणि चौघीजणी वैगेरे अनुवाद फारच छान, मराठीत वाचणे पर्वणी आहे.

सौन्दर्य's picture

12 Jul 2021 - 11:07 pm | सौन्दर्य

नॉट विदाउट माय डॉटर - मूळ लेखिका बेट्टी मेहमूदी, मराठी भाषान्तर लीना सोहोनी. हे देखील उत्तम पुस्तक आहे. ह्या कथेसारखीच 'काबुलीवाल्याची बायको' ही कथा आहे पण ह्या दोन्ही कथेतील महत्त्वाचा फरक म्हणजे बेट्टी मेहमूदी आपल्या जीवावर खेळून आपल्या मुलीला घेऊन इराण मधून निसटली तर काबुलीवाल्याची बायको आपल्या मुलीला अफगाणिस्तानतच ठेऊनच बांगलादेशला परतते.

गॉडजिला's picture

13 Jul 2021 - 9:13 am | गॉडजिला

कादंबऱ्यांचा उकिरडा उपसून,

हा शब्दप्रयोग फार आवडला अन तो वास्तवही आहे... काही मोजके वाचनीय सोडले अन आपण वाहवत गेलो की मग आपण कादंबऱ्यांचा उकिरडा उपसत आहोत हे समजायला फार वेळ अन पैसा निघून गेलेला असतो

रावसाहेब चिंगभूतकर's picture

13 Jul 2021 - 10:30 am | रावसाहेब चिंगभूतकर

लॉर्ड ऑफ द फ्लाईज चं जीएं नी केलेलं भाषांतर फार लहानपणी वाचलं होतं. सध्या ते शोधतोय, पण कुठे मिळत नाहीये (म्हणजे फ्री ऑनलाइन मिळत नाहीये). पण विकत घ्यायचे म्हटले तरी अगदी बुकगंगा वर पण त्याचे नाव दिसत नाही.

लॉर्ड ऑफ फ्लाईजचा अनुवाद खूप जुना आहे.. बहुदा तो आऊट ऑफ प्रिंट असणार.. मला लायब्ररीमध्ये मिळाला होता..

रावसाहेब चिंगभूतकर's picture

13 Jul 2021 - 11:13 am | रावसाहेब चिंगभूतकर

सध्या स्कॅन करून अपलोड करणारे सज्जन लोक ही आहेत, पण बहुधा हे पुस्तक सुद्धा फार जणांना ठाऊक नसावे.

अमर विश्वास's picture

13 Jul 2021 - 10:44 am | अमर विश्वास

विजय देवधर आणि लीना सोहोनी ही अनुवादित पुस्तकातील दोन महत्वाची नवे

फ्रेडरिक फोरसिथ , सिडने शेल्डन, रॉबर्ट कुक यांच्या अनेक कादंबऱ्या मराठीत आणण्याचे काम यांनी केलय

गॉडजिला's picture

13 Jul 2021 - 11:43 am | गॉडजिला

त्याचे पोपिलोंन बरेच पॉप्युलर आहे हे त्याचे यश मानायचे की अपयश तेच समजले नाही कधी

रावसाहेब चिंगभूतकर's picture

13 Jul 2021 - 12:45 pm | रावसाहेब चिंगभूतकर

कळलं नाही. थापाड्या म्हणजे?

त्याने विविध लोकांच्या विविध गोष्टी एकत्र करून स्वताची कथा रचली

रावसाहेब चिंगभूतकर's picture

13 Jul 2021 - 5:24 pm | रावसाहेब चिंगभूतकर

हे माहीत नव्हतं, पण असेल तर खूप दुर्दैव.

गॉडजिला's picture

13 Jul 2021 - 5:54 pm | गॉडजिला

Even I was heartbroken

राघव's picture

13 Jul 2021 - 6:02 pm | राघव

ओह.. :-(
त्याचा पुढला भागही त्यानं लिहिला होता बहुदा.. नाव आठवत नाहीये.

गॉडजिला's picture

13 Jul 2021 - 6:10 pm | गॉडजिला

अनुवादकाची त्यात पपी बदल्याचा विचार सोडून दे फलाना फलाना तुला स्त्री खूप सुखी ठेवेल इथेच रहा अशी काही वाक्यरचना वाचल्याचे स्मरते. मला काहींच त्या वाक्याचा अर्थ समजायचा नाही... तसही बदल्यासाठी इतकी साहसे पळापळ केल्यावर पपी त्याच्या अन्यायाचा बदला न घेताच सेटल होतो हे जाणून कपाळावर हात ठेवला होता...

Nitin Palkar's picture

7 Aug 2021 - 7:51 pm | Nitin Palkar

पुस्तक वाचल्याबरोबर लक्षात येतं, चार आनेकी मुरगी, बार आनेका मसाला..

वा हे खुप उपयोगी पडेल. सध्या मी स्टोरी टेल अ‌ॅप वरुन पुस्तके वाचत असते. किचनची कामे उरकताना ते बर पडत.
चारचौघी मी अधी वाचल आहे. मला आवडलेल. छानच आहे.

राघव's picture

13 Jul 2021 - 6:01 pm | राघव

माझीही थोडीशी भरः
"दु:ख पर्वताएवढे": भा रा भागवतांनी केलेला विक्टर ह्युगोच्या ला मिझरेबल्सचा अनुवाद.
"मला निसटलंच पाहिजे!": श्रीकांत लागू यांनी केलेला स्लावोमीर राविझच्या द लाँग वॉक चा अनुवाद

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Jul 2021 - 2:49 pm | ज्ञानोबाचे पैजार

अनुवादित पुस्तकांच्या यादीत एस भैरप्पा यांच्या उमा कुलकर्णी यांनी अनुवादीत केलेल्या पुस्तकांचा उल्लेख जरुर असला पाहिजे
यादीत सगळ्यात पहिले आणि महत्वाचे पुस्तक म्हणजे "आवरण"

त्या नंतर या यादीत त्यांच्या "पर्व", "तंतू", "मंद्र", "वंशवृक्ष ", "सार्थ" या कादंबर्‍या येतात.

वर उल्लेख झालेल्या पुस्तकांशिवाय मॅक्स्झिम गॉर्की यांचे "आई" , चार्लस डिकिन्स यांचे "टेल ऑफ टू सिटीज"

पैजारबुवा,

तुषार काळभोर's picture

19 Jul 2021 - 3:44 pm | तुषार काळभोर

दोन्ही एकदम भारी.
विशेष म्हणजे उमा.कुलकर्णी यांनीदेखील भाषांतर असल्याचं जाणवू न देता लिहिलंय.

साबु's picture

1 Aug 2021 - 7:43 pm | साबु

वल्लि उर्फ प्रचेतसशी सहमत. मल आवडलेले अनुवाद : पपिलोन, डेझर्टेर, कोमा, सेवेन्थ सिक्रेट, फिस्ट ओफ गौड, सेकन्ड लेडि,कन्टेजन.