अरिस्टोफेन्सने सांगितलेलं प्रेम

एस.बी's picture
एस.बी in जनातलं, मनातलं
25 Jun 2021 - 2:33 am

आज वटपौर्णिमा सण,फेरे,पातिव्रत्य ,जीवनसाथी वैग्रे वैग्रे वर्ती खूपच चर्वितचर्वण सुरू असणार! आज ह्या भारतीय सणाच्या निमित्ताने मला एक कथा वाचण्यात आलेली होती ती तुम्हा सगळ्यांसमोर मांडावी असं मला वाटतं.
आपली ती तुम्ही नेमी नेमी ऐकता ती सत्यवान सावित्रीची कथा नाहीये ही ! ही कथा आहे प्राचीन ग्रीस देशातली ,त्यांच्या इथल्या कल्पने नुसार देव, मानव, या दोहोंच्या संघर्षाची!

तुम्ही सर्वांनी soulmate,platonic love ,असे अनेक शब्द एकदा तरी ऐकले असतीलच ह्या शब्दांचा एक सारासार अर्थ काढायला गेलं तर अस म्हणता येईल की," असे दोन जीव (दोन जीव हा शब्द पुरुष अन स्त्री असं म्हणण्या पेक्षा जास्त चांगलं वाटतो) जे की विलक्षण आणि अनाकलनीय पद्धतीने एकमेकाकडे आकर्षित होतात, आणि ह्या आकर्षणात,सौंदर्य वय,दर्जा,व्यवसाय, किंवा अन्य कोणतेही भेदभाव करणारे मुद्दे अगदी दुय्यम ठरलेले दिसतात अन अशा वेळी इतर लोकांना त्यांचं एकत्र येणं बऱ्याचदा खटकलेले असते तरी पण त्यांचं एकमेकात गुंतणे हे दिवसेंदिवस वाढतच जाते!"अन मग सगळ्यांना काय त्या दोघांना पण एकच प्रश्न सतत छळत असतो," आपलं नक्की नातं काय आहे???ज्यामुळे आपण इतके एकमेकांकडे आकर्षित होतोय?"

ह्याच प्रश्नाच उत्तर आपल्याला प्राचीन ग्रीस मधल्या अरिस्तोफेनेस या ग्रीक नाटककाराने सांगितलेल्या एका कथेत सापडेल.

तो सांगतो की,"फार फार पूर्वी असा एक काळ होता जेंव्हा मानव आणि देव हे दोघेपण सदेह एकाच सृष्टीत राहत होते. देवाचं वसतीस्थान होतं ऑलिंपस चा पर्वत ( म्हणजे त्यांच्या तिकडचा स्वर्ग बरं) आणि मानव राहत होते पृथ्वीवर ( नेहमी प्रमाणे ) पण ह्या दोन्ही जगांमधून एकमेकांसोबत देवाणघेवाण, दळणवळण सुरळीत चालू होते. मानवांना केवळ ते मानव आहेत म्हणून ऑलिंपस पर्वतावर यायला कसला ही मज्जाव नव्हता.
त्या वेळचे मानव पण आजच्या पेक्षा भिन्न स्वरूपाचे होते
त्यांचे एकूण तीन प्रकार होते
१) सूर्यापासून उत्पन्न झालेले पुरुष प्रधान मानव
२) पृथ्वी पासून उत्पन्न झालेले स्त्री प्रधान मानव
३) चंद्रा पासून उत्पन्न झालेले उभय प्रधान मानव

आणि एवढेच नाही तर त्यावेळचे मानव हे जैव शास्त्रीय पातळीवर पण सद्यस्थिती पेक्षा वेगळे होते
प्रत्येकाला सर्व अवयव दुप्पट होते
पुढे आणि मागे असे २ डोकी
तसेच हात ,पाय आणि इतर सर्व अवयव सुद्धा .
जणू दोन व्यक्ती पाठीला पाठ लावून जोडलेल्या असाव्यात पण शरीर जरी दोन असले तरी आत्मा एकच असायचा, अंतप्रेरणा ,इच्छा,आकांक्षा ,सुख दुःख सर्व एकच असायचं त्यामुळे त्यांच्यात कसला ही गैरमेळ न होता त्या उलट त्यांचं सामर्थ्य हे दुप्पट होत असायचं.

मानवाचं असं तर देवाचं प्रकरण भलतंच होतं, देव म्हणायला सर्वशक्तिमान वगैरे होते पण ते पण बिचारे मनुष्यावर अवलंबून होते. ते कसे तर? तर निर्मितीची शक्ती देवाकडे होती त्यावर मानव अवलंबून होते तर त्या शक्तीचा वापर करून करून देवलोकांची जी काही सामर्थ्य किंवा ऊर्जा घट होत होती ती भरून काढण्यासाठी देवांना मनुष्याकडून होणाऱ्या भक्ती ,प्रार्थना, पूजा वगैरेची गरज भासत असे!
दोघांचं कसं एकमेकांवर अवलंबून सुखाने सुरू होतं सारं,पण हळू हळू मानवांना आपल्या सामर्थ्याची तसेच द्वी शरीराचे फायदे समजू लागले तसे त्यांच्यामध्ये एक नवीन भावना जन्म घेऊ लागली," जरी आपल्याकडे नवनिर्मितीची शक्ती नसली तरी आपल्या भक्ती मुळेच त्यांना ही ताकद मिळत आहे तर आपण त्यांच्यावर स्वारी करून ऑलिंपस जिंकून घेऊयात आणि त्यावर राज्य करूयात!"

ही चर्चा हळूहळू कुजबुज करत ऑलिंपस च्या दरबारात देवांचा राजा झ्युस ज्याला चमकणाऱ्या विजेचा देव म्हणतात त्याच्यापर्यंत पोहोचली. साहजिकच देवांनी ही गोष्ट गंभीरपणे घेतली आणि ह्यावर काय उपाय करायचा ह्यासाठी एक सभा बोलावली मग त्या सभेत एक विचार असा मांडण्यात आला की विजेचा देव झ्युस हा आपली विजेचा कडकडाट करून संपूर्ण मानवजात नष्ट करू शकेल पण त्याला देवांच्या दुसऱ्या गटाने विरोध केला की मानव हे केवळ गर्विष्ठ आणि अहंकाराने उन्मत्त झालेले आहेत त्यासाठी त्यांना एवढी क्रूर शिक्षा देणे अयोग्य राहील!
मग झ्युसने ह्यावर एक उपाय सुचवला की तो त्याच्या विजेचा वापर करून त्यांच्या सामर्थ्याचा स्त्रोत म्हणजे त्यांचं द्वी शरीर एकमेकांपासून वेगळं करेल त्यामुळे ते कमकुवत होतील आणि ऑलिंपस वरती स्वारी करण्याची त्यांची हिंमत होणार नाही.
आणि तसेच झाले झ्युसने एका फटक्यात सारी मानव जात द्वी शरीरा पासून विलग केली त्या वेळी झ्युसने सर्वांना तंबी दिली की जर पुन्हा असं स्वतचं स्थान विसरून जाऊन उन्मत्तपणा दाखवाल तर अजून अर्ध चिरून तुम्हा सगळ्यांना एका पायावर उड्या मारत फिरायला लावायला मी मागे पुढे पाहणार नाही!!!!!!

आणि मग हे शरीराने दुभंगलेले मानव आणि त्यांची दुर्दशा पाहून अपोलो नावाच्या देवाला त्यांची दया आली मग त्याने सर्व दुभंगित मानवांची शरीरावरची कातडी सर्व बाजूंनी गुंडाळून त्याची एका ठिकाणी गाठ बांधली आणि त्याचेच फलस्वरुप म्हणून मानवाला बेंबीच्या ठिकाणी खोलगट असा खड्डा त्यांचं धारिष्ट्य आणि त्याची भोगावी लागलेली शिक्षा या दोन्हींची आठवण म्हणून मिळाला.
तरी पण हे दुभंगलेले मानव फार दुःखी जीवन जगू लागले ...
सर्व गोष्टी त्यांना एकमेकांच्या साहाय्याने करायची सवय होती त्यांना त्यांच्या मूळ द्वी स्वरुपी शरीराची सतत कमतरता जाणवत असे..मग त्यांचा अविरत शोध सुरूच असे की माझं उर्वरित शरीर कुठे आहे ...?? त्यांचं शरीर जरी झ्युसने ने वेगळं केलं होतं त्या सोबत त्यांचा आत्मा जो की एकच होता तो पण दुभंगला होता आणि हे असं अर्धवट जीवन त्यांना जगता येत नव्हते ...मग त्यांना त्यांचा उर्वरित शरीराचा भाग कधी कुठे त्यांच्या सारखाच विषण्ण पणे शोध घेताना सापडला तर हे अभागी जीव एकमेकाला कडकडून मिठी मारून ,तहान भूक विसरून ,निपचित पणे पडून राहू लागले ! एकाच वेड्या आशेने की अपोलो किंवा इतर कोणता दयाळू देव त्यांना पुन्हा एकसंध बनवेल!
लवकरच असे सर्व दुभंगलेले जीव उपासमार आणि निराशेने एक एक करून मरण पावू लागले अन त्यांच्या नैराश्याने तसेच कमी होणाऱ्या संख्ये मुळे ऑलिंपस मधल्या देवांना सुद्धा भक्ती आणि प्रार्थना रुपी मिळणाऱ्या ऊर्जेत विलक्षण घट येऊ लागली अन देवांना सुद्धा वाटायला लागलं की ह्यात नक्कीच काहीतरी बदल केला पाहिजे. मग झ्युसला पण त्यांची दया आल्याने त्याने आपल्या शिक्षेवर एक उपाय काढला.

त्या काळी जेंव्हा हे मानव द्वी शरीर होते तेंव्हा त्यांचे प्रजनन हे शरीर बाह्य पद्धतीने होत असे. त्यात कोणताही स्पर्श किंवा आसक्ती ,कसली ही जोडून देणारी भावना त्यात नव्हती..
मग झ्युसने यामध्येच बदल घडवायचा ठरवला...
त्याने त्यांच्या लैंगिक क्रिया अंतर्गत स्वरूपाच्या बनवल्या ...त्यासाठी त्याने त्यांच्या शरीराच्या लैंगिक अवयवांच्या रचनेत आवश्यक ते बदल केले...असे बदल केले की ज्यात त्यांना एकमेकांच्या शरीराची आवश्यकता भासेल आणि अंतर्गत स्वरूपाच्या प्रजनन क्रियेमुळे ते काही क्षणासाठी एक शरीर बनू शकतील आणि त्यातून त्यांना सुख,प्रेम, माया, सर्वात महत्वाचं म्हणजे एकमेकांच्या शरीराच्या स्पर्शाने त्यांना होणारी एकात्मतेची जाणीव त्यांना सतत एकमेकाकडे आकर्षित करत राहील!
आणि त्यासोबत झ्युसने अजून एक महत्वाची गोष्ट केली ती म्हणजे त्याने दुभंगलेल्या अवस्थेत असणारा त्यांचा आत्मा खऱ्या अर्थाने विभाजित केला आणि मानव खऱ्या अर्थाने विभाजित झाला आणि असहनिय अशा शारीरिक आणि मानसिक वेदना, हरवलेपण,काहीतरी गमावल्याची भावना ह्या पासून मुक्ती दिल्या बद्दल तो पुन्हा ऑलिंपियन देवतांचा आभारी झाला आणि देवांच्या प्रार्थना आणि भक्तीत पुन्हा पहिल्यासारखी वाढ झाली.

आणि इथूनच सुरू झाली मानवाची "soul mate" नावाची कल्पना! ह्या कथेनुसार असं मानलं जातं किंवा अरिस्तोफेनेस असं सांगतो की
ज्या मानवाला विशिष्ट स्त्री बद्दल असं न सांगता येणारं आकर्षण वाटतं आणि त्याच वेळी त्या स्त्रीला सुद्धा त्याच मानवाचं आकर्षण तेवढ्याच उत्कटतेने जाणवतं ते खरे पाहता पुरातन चंद्र उत्पन्न उभय स्वभावाच्या द्वी शरीराचे दोन वेगळे भाग आहेत!त्यामुळं त्यांना एकमेकांच्या सहवासात अनाकलनीय असं जोडून ठेवणारं, सतत एकमेकांकडे खेचून घेऊ पाहणारं , असं काहीतरी अज्ञात बळ आहे अशी जाणीव सतत होत असते.
आतून कुठून तरी वाटतं असतं की ही एक दैवी योजना आहे ह्याच्या विरोधात जाणे म्हणजे पर्यायाने दैवाचा किंवा त्याने आपल्यासाठी आखलेल्या योजनेचा अपमान होईल!! एवढेच नाही तर दोघांचा अंतरात्मा जो की एकच आहे तो जाणून असतो की विरह आणि अपूर्णता यांचं दुःख किती वेदनादायी असतं ते! त्यामुळं ते दुःख पुन्हा जगून पहायची दोघांची ही तयारी नसते.

ह्या कथेतून काय समजायचं तर "प्रेम " म्हणजे दुसरं काहीएक नसून फक्त पूर्णत्वास नेणारा एक प्रवास आहे ज्यात अर्ध अंतर समोरच्याने चालून यायचं असतं आणि अर्ध अंतर आपण कापायचे असते...मग अशीच कुठेतरी अनपेक्षित वळणावर आपला सामना एकमेकांसोबत होतो..आणि प्रवास थांबवावा असं वाटायला लागतं.तेंव्हा तिथंच थांबायला ज्यांना जमते ते खरे " soul mate"!! बाकी सर्व नुसते भटकत राहणारे अभागी जीव!..
ह्या कथेचं अजून एक बाबीसाठी कौतुक वाटतं ते म्हणजे प्रेम म्हणजे केवळ स्त्री आणि पुरुष असं कल्पना न मांडता ही कथा सांगताना अरिस्तोफेनेस आजच्या काळातली समलिंगी जोडप्यांच्या प्रेमाचं वर्णन करताना बॉय लवर्स आणि लेडी लवर्स असं म्हणून त्यांचं स्पष्टीकरण असं देतो की बॉय लवर्स हे मूळचे अगोदरचे सूर्य उत्पन्न पुरुष प्रधान द्वी शरीरी मानव असल्याने त्यांना त्यांचा विभाजित करण्यात आलेला पुरुष भागच आकर्षित करतो...अन तसेच स्त्री च्या बाबतीत त्या पृथ्वी उत्पन्न द्वी शरीरी मानव असणार असे प्रतिपादन करतो म्हणजे एवढ्या प्राचीन काळात असून पण लैंगिकतेचे आयाम एवढे विस्तारित होते याची जाणीव होते.

Soulmate ह्या शब्दा बरोबर प्लुटोनिक लव्ह अशी पण एक संकल्पना मांडली जाते त्याचे कारण म्हणजे अरिस्तोफेनेस आणि त्याचे इतर सहकारी,मित्र ज्याच्या घरी बसून ही सगळी प्रेमाच्या उत्पत्ती बद्दल चर्चा करत होते ती व्यक्ती म्हणजे थोर विचारवंत प्लेटो हा होय! त्याच्या घरच्या या चर्चेचं पूर्ण वर्णन the symposium म्हणून प्रसिद्ध आहे . प्लेटो तसेच सॉक्रेटिस या दोघांनी पण या चर्चेत प्रेम म्हणजे काय असतं ह्यावर विलक्षण विचार मांडले होते...
त्याबद्दल पुन्हा कधीतरी ..सध्या एवढंच...

-एस.बी

कथाजीवनमानविचारमतविरंगुळा

प्रतिक्रिया

गुल्लू दादा's picture

25 Jun 2021 - 7:40 am | गुल्लू दादा

आवडलं..प्लेटो आणि सॉक्रेटिस विषयी पण वाचायला आवडेल. धन्यवाद.

नवीनच माहिती दिल्याबद्दल आभार. या विषयावरही पाश्चात्य चित्रकारांनी चित्रे रंगवली असतील असे वाटते. ती गूगल वर हुडकण्यासाठी योग्य ते शब्द (इंग्रजी स्पेलिंग) कोणते ?

एस.बी's picture

25 Jun 2021 - 10:06 am | एस.बी

Soulmate mythology by aristophanes किंवा origins ऑफ लव्ह the symposium by plato असा सर्च करा

गॉडजिला's picture

25 Jun 2021 - 11:45 am | गॉडजिला

नाईस।

सौन्दर्य's picture

25 Jun 2021 - 10:47 pm | सौन्दर्य

ग्रीक मायथॉलॉजिवर अनेक कथा वाचल्या पण ही कधी वाचनात आली नाही.
शाळेत असताना 'इको आणि नार्सिसस', 'पँडोराज बॉक्स', वगैरे कथा शिकण्यासाठी होत्या त्याची आठवण झाली.

चौथा कोनाडा's picture

28 Jun 2021 - 6:03 pm | चौथा कोनाडा

अतिशय रोचक अरिस्टोफेन्सचं प्रेम !
+१
प्रथमच वाचण्यात आले !

एस.बी's picture

29 Jun 2021 - 2:50 pm | एस.बी

आपले मनःपूर्वक आभार!

ऑस्सम.

जबरी आहे ग्रीक कथा.

एस.बी's picture

1 Jul 2021 - 11:36 am | एस.बी

धन्यवाद!!!!!!