आधीचे भाग-
स्मृतींची चाळता पाने --मुक्काम पोस्ट लालबाग
स्मृतींची चाळता पाने -अनगाव
स्मृतींची चाळता पाने -अनगाव2
स्मृतींची चाळता पाने --ठाणे आणि नातीगोती
स्मृतींची चाळता पाने --ठाणे आणि आठवणी
माझी मोठी बहीण १९५२ मध्ये एस.एस.सी. चांगल्या मार्कांनी पास झाली. टी शाळेत पहिली अली होती. सर्व विषयात ७० टक्क्यांच्या वर मार्क असल्याने रुईया कॉलेजला तिला फी माफी मिळाली आणि तिचे पुढील शिक्षण सुरु झाले.ती अतिशय मेहेनती असल्याने कॉलेजच्या लायब्ररीची पुस्तके मिळवून आणि अभ्यास करून तिने चांगल्या प्रकारे शिक्षण सुरु ठेवले. परंतु पुढे १९५७ मध्ये तिला रिझर्व बॅंकेत नोकरी लागली आणि कॉलेज पूर्ण दिवसभर असल्याने आणि नोकरीची जास्त गरज असल्याने तिला सोडावे लागले. पण पुढे लग्न झाल्यावर तिने बाहेरून परीक्षा देऊन डिग्री पूर्ण केलीच.
सन १९५७ मध्ये मी ११वी मॅट्रीक ५५ टक्के मार्क मिळवून पास झाले. मलाही कॉलेजला जायची इच्छा
तर होती पण घराच्या परिस्थितीमुळे नोकरी करणे आवश्यक होते.त्यामुळे प्रथम नोकरी शोधायला सुरुवात केली आणि एस.एन.डी.टी. महिला युनिव्हर्सिटीचा ३ वर्षांचा अभ्यासक्रम करण्यासाठी क्लास लावला. हा क्लास शनिवार/रविवार असे आणि आम्ही १०-१२ मुली क्लासला होतो. इथेही सर चांगले शिकवत असत. त्यावेळी इंग्लिश टायपिंग ची सक्ती होती त्यामुळे मी टायपिंग क्लास लावला आणि ६-८ महिन्यात ३०-४० स्पीडची परीक्षा पास करून एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मध्ये नावनोंदणी केली. मग हळूहळू नोकरीसाठी कॉल येऊ लागले.१९५८ मध्ये ठाण्याला सार्वजनिक बांधकाम विभागात (पी.डब्लू. डी ) काही जागांसाठी मुलाखती घेण्यात येत होत्या त्यात १०-१२ जणांमध्ये माझा नंबर लागला आणि मला नोकरी मिळाली. ११-६ अशी वेळ होती आणि ठाण्यातच ऑफिस होते. यथवाश १९६२ मध्ये मीही डिग्री पूर्ण केली.
आमच्या चाळीतील एक आठवण म्हणजे आमच्या १२ घरांपैकी फक्त पेंडसेकाकांकडे रेडिओ होता आणि दर बुधवारी अमीन सयानीचा बिनाका गीतमाला कार्यक्रम ऐकायला आम्ही ५-६ जण त्यांच्याकडे ८-९ वाजेपर्यंत जात असू. रेडिओ सिलोनवर लागणार हा कार्यक्रम अत्यंत श्रवणीय असे व त्यात लागणारी गाणी एकदम लोकप्रिय होत. तसेच अमीन सयानींचा आवाज आणि कॉमेंट्री ऐकायलाही मस्त वाटे. त्यावेळी राज कपूर चे सिनेमे खूप गाजलेले होते त्यामुळे श्री ४२०,आवारा, जिस देश मी गंगा बेहेती है यांची गाणी तसेच दिलीपकुमार ,वैजयंती माला यांचे मधुमती, नया दौर किंवा देवानंद चे सिनेमे यांची गाणी ऐकायला फारच मजा येई. त्या गाण्यांची अवीट गोडी आताच्या गाण्यात कुठली मिळायला?
तारा नोकरी लागल्यावर थोडे आर्थिक स्वातंत्र्य आले आणि मी मैत्रिणींबरोबर कधी कधी सिनेमा बघायला जाऊ लागले. त्यावेळी लेडीज क्लासचे तिकीट फक्त १० अणे होते आणि ऑफिसच्या शिपायाला चहा पाजला कि त्या बदल्यात तो तिकिटे काढून आणून देत असे. त्यावेळी दर्जेदार मराठी चित्रपटही पहिले जसे की राजा परांजपे यांचे जगाच्या पाठीवर, हा माझा मार्ग एकला (ज्यात सचिन पिळगावकरने प्रथम काम केले. तेव्हा तो ५-६ वर्षाचा असेल). कधीकधी आई व काकूला सुद्धा बरोबर घेऊन जात असे व सिनेमा दाखवत असे.
माला पहिला पगार १०० रुपये मिळाला तेव्हा मला झालेला आनंद शब्दात वर्णन करणे शक्य नाही.स्वात; कष्ट करून मिळवलेल्या पैशाचे मोल काही औरच. मी प्रथम देवापुढे पगार ठेवला आणि मग आईच्या पाय पडून तिच्या हातात पगार सोपवला. नंतर आईला व काकूला मी आणि बहिणीने जाऊन नऊवारी साडी आणली जी त्यावेळी २०-२५ रुपयाला मिळे. सोन्याचा भाव १२० रुपये तोळा होता तर एच.एम.टी. चे लेडीज घड्याळ १०० रुपयाला मिळत असे. मी परीक्षेला जाताना शेजारच्या मुलीचे घड्याळ लावून जात असे त्यामुळे पुढच्या पगारात घड्याळ घेण्याचे ठरवले. त्याप्रमाणे पुढच्या महिन्यात बहिणीने माटुंगा गांधी मार्केट मध्ये जाऊन आम्हा दोघींना लेडीज घड्याळ आणले. तेव्हा गांधी मार्केट आणि व्ही.टी.चे मोठे मार्केट प्रसिद्ध होते. पाचवारी साडी तिथे १५-२० रुपयात मिळत असे त्यामुळे बहीण कधीकधी तिथून आम्हाला साड्या आणत असे. रेडिओच्या आवडीमुळे पुढच्या पगारात एच.एम.वी. चा रेडिओसुद्धा घेतला. त्यावेळी मंगळवार शुक्रवार दुपारी वनिता मंडळ, सकाळी भक्ती गीते,संध्याकाळी टेकाडे भावजी वगैरे श्रुतिका लागत असत.सोमवारी रात्री १० ला आपली आवड लागत असे तर इतर वेळी नाटके वगैरे लागत असत. बिनाका गीतमाला तर आम्ही न चुकता ऐकत असू. विविध भारतीला हिंदी गाणी लागत असत.
पुढे माझ्या मोठ्या बहिणीचा १९६० मार्च मध्ये विवाह झाला आणि ती माटुंगा येथे राहायला लागली. तिचे यजमान एका मोठ्या औषध निर्मात्या कंपनीत कामाला होते आणि तिचे सासरचे कुटुंब मोठे होते. लहान दीर, नणंदा,सासू,सासरे सर्वजण एकत्र राहत असत. सासूबाई स्वभावाने खूप प्रेमळ होत्या. १९६२ मध्ये तिला पहिली मुलगी झाली आणि आमच्या व तिच्या कुटुंबातील पहिलेच बाळ असल्याने सर्वांनी तिचे खूपच लाड केले. मी त्यावेळी सकाळी ९-१० पर्यंत परेरा नावाच्या एका बाईकडे शिवण क्लासला जात होते त्यामुळे माझ्या भाचीला मी हौसेने छान छान फॅशनचे फ्रॉक शिवत असे तसेच डिझाईनची दुपटी शिवत असे. त्यामुळे बहिणीच्या सासूबाईंनी खुश होऊन माझ्या भाचीच्या बारशाला मला साडी भेट दिली. मी जेव्हा जेव्हा सुट्टीच्या दिवशी बहिणीला आणि भाचीला भेटायला जय तेव्हा तेव्हा तिच्या सासूबाई मला २ दिवस राहण्याचा आग्रह करत असत. आज माझी बहीण व तिचे यजमान नव्वदीच्या जवळ आहेत आणि दादरला शांत जीवन जगत आहेत तर त्यांची मुले चांगली शिकून स्थायिक झाली आहेत.
मार्च १९६४ मध्ये माझा विवाह झाला आणि मी कल्याणला आले. आमचे कल्याणला ५-६ खोल्यांचे मोठे घर होते आणि मी ,यजमान व सासूबाई असे तिघेजण राहत होतो. माझे मोठे दीर आणि जाऊबाई अंधेरी येथे नोकरी निमित्ताने राहत असत.माझे सासरे लग्न होण्याआधीच वारले होते.त्यांना मी पहिले नाही. ते भिक्षुक होते आणि दशग्रंथी ब्राम्हण होते. सासूबाई सांगत त्याप्रमाणे आमच्या कडे वारंवार जेवायला विद्यार्थी येत असत. त्यावेळी गरीब विद्यार्थी लोकांकडे वार लावून जेवत असत आणि शिकत असत.त्यावेळी पोळ्या करण्याची पद्धत नव्हती परंतु शेतावरून भात भरपूर येत असे त्यामुळे आमटी भाताला कमी नव्हती. सासरे गरिबीत शिकले होते त्यामुळे गरीब मुलांना जेऊ घालणे किंवा शिक्षणाला मदत करणे आपले काम असल्यासारखे करीत.त्यावेळी त्यांना महिना २०० रुपये पर्यंत दक्षिणा मिळे त्यावर घर चाले. काही गरीब लोक मुलाच्या मुंजीसाठी पैसे नाहीत म्हणल्यास फुकट मुंज लावून देत असत. आमचे अंबरनाथ येथे २ खोल्यांचे २ गाळे होते त्यात एक बाई शाळा chalawit
असत. त्यांच्याकडून सासरेबुवांनी कधीही भाडे घेतले नाही कारण माझ्या जागेत विद्यादानाचे काम होते आहे हेच त्यांना समाधान वाटे. पैशाची जरूर असूनही अशा काही गोष्टी त्यांनी पाळल्या. आपल्या मुलांनाही ते सांगत की मी तुमच्यासाठी पैसे ठेऊ शकलो नाही तरी पुण्य ठेवून जाईन.तेच पुण्य आज आमच्या उपयोगी पडते आहे.
तर आता माझा कल्याण ठाणे असा रेल्वे प्रवास चालू झाला. तोवर माझी सा.बां.विभागातून जिल्हा परिषदेत बदली झाली होती.कल्याणमधील काही जणी आमच्या जी.प.मध्येच पण वेगवेगळ्या विभागात कामाला होत्या. आम्ही गाडीने एकत्रच प्रवास करत असू . संध्याकाळी गाडीने परत येताना दारात बसून गप्पा मारत असू. त्यावेळी गाडीला आजच्यासारखी गर्दी नसल्याने ते शक्य होई. संध्याकाळी स्टेशनपासून घरापर्यंत चालत येणे आणि येताना भाजी, फळे, मुलांसाठी खाऊ आणणे हा नेहमीचाच कार्यक्रम असे. शिवाय कधीतरी रविवारी एकेकीच्या घरी जमणे आणि गप्पा टप्पा करणे होत असे.
१९६५ मध्ये मला पहिली मुलगी झाली. माझ्या सासूबाईंची ती खूपच लाडकी होती आणि तिला त्या दिवसभर सांभाळत असत. तसेच १९६८ आणि १९७२ मध्ये दोन मुली झाल्या त्यांना सासूबाई सांभाळत. माझी आईसुद्धा नातींना बघायला कधी कधी येत असे आणि त्यांचे लाड करत असे. आमचे घर मोठे असल्याने शेजार पाजार ची लहान मुले नेहमीच आमच्या घरात खेळायला येत असत. त्यावेळी आमच्याकडे एक आजीबाई दिवसभर कामाला येत असे. ती मुलांना सांभाळणे, घरातील केर ,लादी,भांडी अशी कामे करणे वगैरे करत असे. आमच्याकडेच दुपारी जेवत असे. जणू घरातीलच एक सदस्य असल्याप्रमाणे तिला आम्ही वागवत असू. संध्याकाळी वाडेघरला तुच्या घरी जात असे.
कल्याणात बालक मंदिर ,ओक हायस्कुल ,सुभेदार वाडा, शारदा मंदिर, अभिनव विद्यालय अशा चांगल्या शाळा होत्या. त्यातील बालक मंदिर ही पहिली ते चौथी आणि ओक हायस्कुल दहावी पर्यंत आमच्या घरापासून जवळ होत्या. त्यामुळे कधी मी मुलींना शाळेत सोडत असे आणि आजीबाई आणत असे तर कधी कधी मुली मैत्रिणींबरोबर शाळेत जात असत.
सायंकाळी मी मुलींना शुभम करोति वगैरे शिकवत असे व नंतर गोष्टी वाचून दाखवत असे. त्यावेळेपासून सगळ्यांना वाचनाची आवड आहे. शाळेत सर्व शिक्षक चांगले शिकवत असत व आठवीनंतर त्यांना नानिवडेकर सरांच्या क्लासला घातले तिथेही फार छान शिकवत असत. गणित, इंग्लिश,सायन्स,संस्कृत हे विषय शिकवत असत आणि फक्त २५ रुपये फी होती. शिक्षक चांगले असल्याने आम्हाला फार काळजी नव्हती. घर मोठे असल्याने मुली आपापल्या मैत्रिणींबरोबर एकेक खोलीत बसून अभ्यास करत असत आणि चांगल्या मार्कांनी पास होत असत. तसेच माझ्या सर्वात लहान मुलाला अभ्यास करायला लावत असत. १९७६ मध्ये आमच्या घराच्या मागच्या अंगणात माझ्या यजमानांनी एक दोन खोल्यांचे घर बांधले व जुन्या घराला ते जोडून घेतले. त्यामुळे घर अजूनच मोठे झाले.
१९८० मध्ये माझ्या सासूबाई दीर्घ आजारात वारल्या तोवर सगळे असेच चालू होते.(क्रमश:)
प्रतिक्रिया
24 Dec 2020 - 12:02 am | कानडाऊ योगेशु
ब्लॅक अॅण्ड व्हाईट मराठी चित्रपट पाहत आहोत असा फिल आला. त्या पिढीचा नसुन सुद्धा नोस्टॅल्जिक व्ह्यायला झाले.
त्या काळातील सामाजिक स्थित्यंतराच्या नोंदीच आहेत ह्या.
ह्या सर्व चांगल्या आठवणींचे स्मरणरंजन आहे आणि त्याबद्दल काही तक्रार नाही.
पण त्याकाळात झालेल्या कुळकायदा/घरकायदा वगैरेचे परिणाम कुटुंबाला काही भोगावे लागले का? ह्याबद्दलही वाचण्याची उत्सुकता आहे.
24 Dec 2020 - 6:41 pm | आनन्दा
छान लिहिलेय
24 Dec 2020 - 8:01 pm | सुबोध खरे
फार छान आठवणी लिहिल्या आहेत.
एका दमात सर्व लेख वाचून काढले
काही गोष्टी आमच्या आई वडिलांकडून ऐकल्या आहेत तर काही स्वतः अनुभवलेल्या आहेत त्यामुळे वाचताना त्याच्याशी कुठे तरी नाते जुळल्यासारखे वाटते
24 Dec 2020 - 9:23 pm | चौकटराजा
१९६५ तर १९७० तळेगाव ते पुणे रेलवे तिकीट ६५ पैसे , मिसळ २५ पैसे
१९७० ते १९८० मिसळ ५० पैसे ,इडली सांबार ४५ पैसे , मसाला डोसा ६५ पैसे ,राहुल थिएटर तिकीट दर दीड रुपया , दोन रुपये ( ड्रेस सर्कल ) ३ रो बाल्कनी
१९७८ वाई पुणे एस टी भाडे ५ रुपये .सरकारी नोकराचा तृतीय श्रेणी पगार ३३० रु. १९७६ महिन्याची दोन वेळचे जेवणे एकूण ५० रु. वाई पाचगणी एस टी भाडे ५० पैसे
25 Dec 2020 - 4:01 pm | सिरुसेरि
त्या काळातील सामाजिक परिस्थितीचे यथायोग्य वर्णन . पायाभुत शिक्षण घेउन समाजामधे आर्थिक स्वावलंबन मिळवण्याची जागरुकता या काळामधेच निर्माण झालेली दिसते आहे .
14 Jan 2021 - 7:10 pm | राजेंद्र मेहेंदळे
सर्व वाचकांना धन्यवाद
14 Jan 2021 - 8:08 pm | मुक्त विहारि
छान लिहीत आहात
14 Jan 2021 - 8:39 pm | चौथा कोनाडा
नोस्टॅल्जिक करणारे सुंदर लेखन. ओघ आणि शैली मस्तच आहे !