नमस्कार मित्रांनो
माझी आई , श्रीमती सुलेखा ना. मेहेंदळे,सध्या वय वर्षे ८१ , व्यवसाय स्मरणरंजन, फोनवर गप्पा मारणे,स्तोत्रे पोथ्या वगैरे वाचणे आणि काही प्रमाणात लिखाण करणे. तर बरेच दिवस ती लिहीत असलेल्या आठवणीमधील काही पाने मिपावर प्रकाशित करावीत असा माझा विचार चालू होता आणि तो मी तिला बोलूनही दाखविला होता. त्याप्रमाणे मी दर थोडे दिवसांनी तिला विचारत असे आणि झालेले लिखाण चाळून काही सूचना करत असे. सरतेशेवटी आजपर्यंत लिहून झालेल्या आठवणी थोड्या थोड्या प्रकाशित करूया असे ठरवून आज हा पहिला लेख लिहीत आहे.
तसे म्हटले तर सामान्य माणसाच्या आयुष्यात असामान्य असे काय असणार? लहानपण, शिक्षण, नोकरी,लग्न,मुलेबाळे,नातेवाईक, म्हातारपण वगैरे. पण तरीही त्यात येणाऱ्या वास्तू, स्थळे, तो काळ अशा गोष्टी आपल्या जवळच्या ,परिचयातल्या, घरगुती वाटून त्यातून मनाला आनंद मिळतो. याच हेतूने हे साधेसे लिखाण करत आहे. ते तुम्ही गोड मानून घ्याल अशी अपेक्षा.
====================================================
प्रत्येक स्त्रीला , ती वयस्कर झाली तरीही तिचे माहेर सर्वात प्रिय असते. माहेरच्या आठवणींनी तिला खूप आनंद होतो व ती आपल्या लहानपणापासूनच्या आठवणींमध्ये खूपच रमून जाते. "लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा" किंवा "बालपणीचा काळ सुखाचा" असे जे कवीने म्हटले आहे ते आपल्याला फार उशीरा म्हणजे म्हातारपणी समजते.आधीचे सगळे वय संसार ,मुलेबाळे ,त्यांचे करणे, शाळा ,क्लास, स्वतःची नोकरी असे सगळे सांभाळण्यात कधी निघून जाते ते समजतच नाही. एव्हढे होता होता मुलांचे कॉलेज,नोकरी/व्यवसाय, त्यांचे विवाह चांगले जोडीदार बघून करून देणे हे सगळे होते. आता आपली ५०% जबाबदारी संपली असे वाटते. आपली मुले आपापल्या संसारात आनंदाने रमली की मनाला समाधान वाटते व आतापर्यंत केलेल्या कष्टाचे सार्थक झाल्यासारखे वाटते.
मी आज माझा मुलगा ,सून व नातवंडे यांच्याबरोबर राहते.बाकी प्रकृती ठीक आहे पण पाय दुखत असल्याने जास्त फिरू शकत नाही. घरबसल्या जे काही छंद जोपासता येतील त्यातील वाचन हा माझा मुख्य छंद आहे.रोजचे वर्तमानपत्र वाचणे, देवपूजा,पोथीवाचन,जप करणे, टी.व्ही पाहणे यातही बराच वेळ जातो. देवावर माझा खूप विश्वास आहे आणि आज मी जे सुखी समाधानी आयुष्य जगात आहे ती सर्व ईश्वराची कृपा आहे असे मी समजते. दुपारच्या वेळेत कधीकधी मी बालपणीच्या आठवणीत रममाण होते आणि त्या लिहूनही काढते.
माणसाचे मन मोठे चंचल आहे.त्याला काळाचे बंधन नाही.मनाने क्षणात खूप वर्षे मागे जाऊनही त्यात आपल्याला रमता येते. मीही जेव्हा दुपारच्या वेळात मनाने माझ्या बालपणात फेरफटका मारते आणि त्यात रमून जाते तेव्हा मला एक परकरी कला नावाची मुलगी दिसते. माझे धाकटे काका म्हणत त्याप्रमाणे माझे आजी आजोबा वडील दोन काका व दोन आत्या सर्वजण १९०५ साली जयंतीलाल वाडी, लालबाग ठाणे (आजच्या मासुंदा तलावपाळीजवळ) राहायला आले. तीन खोल्यांचे मोठे दोन गाळे, म्हणजे ६ खोल्या फक्त ५ रुपये भाड्याप्रमाणे त्यांनी जयंतीलाल शेटकडून घेतल्या. दोन समोरासमोर चाळी मिळून एकूण बारा ब्राम्हण बिऱ्हाडे राहत होती. सर्वांमध्ये प्रेम, एकोपा व खिसा हलका असला तरी मदत करण्याची इच्छा होती. सर्वजण आनंदाने राहत असत व सगळे सण समारंभ साजरे करत असत.
माझे बालमित्र म्हणजे चाळीतील समवयस्क अरुण,शशी ,शरद,सुधा,विजया, अशी सर्व मुले शाळेत एकत्र जात असू. आमचे शाळा म्हणजे जुना मुंबई रस्ता येतील दगडी शाळा क्र. २ होय. बाहेरून शाळेचे चौकोनी दगड छान दिसत म्हणून तिला तसे नाव पडले.आजचे गडकरी रंगायतन जवळ ही शाळा आहे. मराठी इयत्ता १ली ते ७वी पर्यंत वर्ग तिथे भरत असत. आमचे शिक्षक श्री पाटील ,सौ. मोकाशी व शिंदे आम्हाला विविध विषय छान शिकवत असत.विशेषतः मराठी कविता चालीवर म्हणायला फार छान शिकवत त्यामुळे आजही त्यातील काही माझ्या तोंडपाठ आहेत.
आमचे मालक जयंतीलाल ठाणावाला यांचा मोठा बंगला होता.बंगल्या मागे खूप झाडे, फुलझाडे , कढीपत्ता ,तुळस वगैरे होती. एक माळी राखणदार म्हणून होता तो आम्हाला कधी कधी फुले देत असे.आवारात एक मोठे दिवाळीचे झाड होते त्याखाली दरवर्षी दिवाळी नंतर आवळीभोजनाचा कार्यक्रम असे.त्यात झाडाखालीच स्वयंपाक करून पत्रावळीवर वाढून सर्व मुले व बायका जेवत. कधी भात पिठले असा साधाच बेत असे तरीही फार मजा येई. काही वर्षांनी मागील बाजूस अजून २ चाळी बांधल्या त्यामुळे बिऱ्हाडे अजूनच वाढली. चाळीत सगळे सण समारंभ साजरे होताच असत त्यात अजून भर पडली. गणेशोत्सवात ८-१० दिवस आधीपासून सर्व मुले जागरण करून सजावट वगैरे करत .दहा दिवस रोज रात्री वेगवेगळे कार्यक्रम असत. त्यात मुलांचे व मुलींचे वेगळे नाटक , विविध स्पर्धा,संध्याकाळी मोठी आरती होत असे. प्रत्येक जन एक एक दिवस स्वखुशीने प्रसाद आणत असत.
मालक गुजराथी होते तरी त्यांच्या घरीही १० दिवस गणपती असे. त्यांची सर्व मंडळी आणि मुले आमच्यात येत असत. त्यांचा गणपती सजवलेल्या पालखीमधून आणत व खूप मोठी आरास असे. चित्रे, खेळणी देखावे म्हणून ठेवलेले असत. ठाणे शहरातील खुपजण गर्दी करून त्यांचा गणपती पाहायला येत. ते आमचेही कार्यक्रम बघायला थांबत पण खुप मोकळी जागा असल्याने कधी अडचण झाली नाही.
जयंतीलाल शेट च्या वडिलांनी ठाण्यात गुजराथी शाळाही काढली होती जी अजूनही चालू आहे. त्यांची तुर्भे येथे मिठागरे होती व भाजीपालाही खूप लावलेला होता.दरवर्षी ऋषी पंचमीला ते सर्वांना मीठ व भाजी देत असत.तसेच इतरावेळीही जास्तीची भाजी सगळ्यांना वाटत असत. दरवर्षी गणपतीमध्ये त्यांच्या कडे १५-२० ताटांवर चुन्याने रांगोळी काढून देण्याचे काम माझी आई करत असे. तिला सर्व बायका मदत करत पण माझ्या आईला जसे जमत असे तसे सर्वांना जमत नसे. आई बारीक काडीला कापूस गुंडाळून छान सुबक रांगोळी काढून गणपती यायच्या आधीच तयार करून देई.
असे दिवस आनंदात चालले होते. पण कधी कधी देवाच्या मनात काय असते कोणास ठाऊक? बसलेली घडी बिघडवणे आणि बिघडलेली पुन्हा बसवणे हाच त्याचा खेळ. त्याप्रमाणे लवकरच काळाने कूस बदलली आणि दुसरा अंक सुरु झाला.(क्रमशः)
प्रतिक्रिया
8 Nov 2020 - 6:31 pm | कंजूस
हे सर्व लिहून ठेवल्याने त्या काळचे समाजजीवन कळेल.
9 Nov 2020 - 1:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आठवणी वाचतोय. लिहित राहा.
-दिलीप बिरुटे
10 Nov 2020 - 7:58 pm | शशिकांत ओक
जपायच्या नाही तर कोणी? आपला उपक्रम स्तुत्य आहे. जरूर सादर करत रहा...
10 Nov 2020 - 7:59 pm | राजेंद्र मेहेंदळे
सर्व वाचकांचे धन्यवाद