आधीचा भाग-- स्मृतींची चाळता पाने --मुक्काम पोस्ट लालबाग
१९४५ हे वर्ष आमच्यासाठी फार वाईट गेले. मी १९४५ मध्ये माझे वडील अल्पशा आजाराने वारले. मी तेव्हा फक्त ६ वर्षांची होते.मला माझे वडील नीटसे आठवतही नाहीत.माझी मोठी बहीण विमल तेव्हा ९ वर्षांची होती तर आई सुशिलाबाई ३० वर्षांची. माझे धाकटे काका तेव्हा नुकतेच ६० रुपये पगारावर सचिवालयात नोकरीस लागले होते व त्यांचे लग्न झाले नव्हते.आम्ही सगळे एकत्रच राहत होतो.
सुमारे ६०-६५ वर्षांपूर्वी एखाद्या बाईवर असा प्रसंग आला तर तिला शिवणकाम विणकाम करणे किंवा दुसऱ्यांच्या घरी स्वयंपाक वगैरे कामे करणे याशिवाय पर्याय नसे. परंतु धाकट्या दिरावर कुटुंबाची जबाबदारी टाकण्यापेक्षा माझी आई खंबीरपणे उभी राहिली.आईने प्रथम स्वतः: शिकायचे ठरवले आणि खारकर आळी मुलींची शाळा क्र. ४ येथे प्रवेश घेतला. तिला घरच्यांनी पूर्ण पाठिंबा दिला.विशेषतः माझे मामा आजोबा शिक्षक असल्याने त्यांनी तिला अभ्यासात खूप मदत केली व प्रोत्साहन दिले. आई सुद्धा सतत पहिल्या क्रमांकाने सगळे विषय पास होऊन शिक्षकांची शाबासकी मिळवत होती.आईचे वडील कोकणात संगमेश्वर येथे शाळामास्तर होते आणि त्यांचे गानू घराणे अतिशय हुशार होते.तिचे २ भाऊ (माझे दोघे मामा) १९४२ मध्ये बी.ए (ऑनर्स) पास झालेले होते.
तर एकीकडे आईचे शिक्षण चालू होते आणि फेब्रुवारी १९४८ मध्ये काकांचे लग्न पनवेलच्या डोंगरे कुटुंबातील मुलीशी झाले.माझी काकू अतिशय शांत व प्रेमळ स्वभावाची होती आणि मला व विमल ला तिने आपल्या मुलींप्रमाणेच वाढविले.मार्च १९४८ मध्ये माझी आई व्ह.फा. म्हणजे इयत्ता ७वी चांगल्या मार्कानी पास झाली. त्यावेळी या डिग्रीला मान होता व त्यावर मराठी शाळेमध्ये शिक्षिकेची नोकरी मिळत होती. त्यावेळी जिल्हा बोर्ड होते व ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा त्याच्या अधिकारात येत असत. तेथील वरिष्ठ अधिकारी श्री. भट यांच्याकडे काकांच्या मित्राची ओळख होती. त्यामुळे ते दोघे श्री. भट यांना भेटायला गेले व त्यांना आमच्या परिस्थितीची कल्पना दिली. तसेच चांगले गाव मिळाल्यास आई तिकडे नोकरीसाठी जाऊ शकेल असे सांगितले.त्यावेळी माणुसकी होती आणि कठीण परिस्थिती मध्ये जमेल तितकी मदत करावी अशी प्रत्येकाची इच्छा होती. त्याप्रमाणे भिवंडी तालुक्यातील आनगाव येथील मराठी शाळेत माझ्या आईला नोकरी मिळाली आणि मला खाकोटीला घेऊन ती तिथे हजर झाली.
अनगाव हे ३-४ हजार वस्तीचे गाव होते त्यात साधारण १०० ब्राम्हण घरे आणि बाकी सोनार आळी ,सुतार आळी, लोहार आळी व काही आदिवासी पाडे होते.आसपास कवाड शेलार कुडूस अशी गावे व व पुढे २ तासावर वज्रेश्वरी गणेशपुरी आणि पुढे वाडा मोखाडा वगैरे तालुके आहेत.अनगावला स्थायिक होण्यात काकांचे मित्र श्री. रामू सहस्रबुद्धे यांची आम्हाला खूप मदत झाली.ते आईबरोबर अनगावला गेले होते व तिकडचे सरपंच श्री. प्रभाकर लेले यांचे कडे २-३ दिवस राहून सगळी सोय करून दिली.
प्रभाकरदादांचे घर खूपच ऐसपैस म्हणजे पुढेमागे अंगण, झोपाळा, बाग, मोठा दिवाणखाना,माजघर,स्वयंपाकघर असे होते. घरी २ लहान मुले, पत्नी, गडीमाणसे असा बराच राबता होता. एक भाताची गिरणी होती. शिवाय भाजीचा मळा, २-३ गाई म्हशी असलेला गोठा सांभाळायला एक बाई होती. सर्व कुटुंबीय आमच्याशी खूपच प्रेमाने वागत. प्रभाकर दादांच्या ओळखीने श्री. घाणेकर यांच्याकडे राहायची सोय झाली व त्यांच्या घराशेजारची एक मोठी खोली महिना १ रुपया भाड्याने आम्हाला मिळाली. दूध ६ आणे शेर होते तर भाजी ४ आणे किलो. आईचा पगार ७० रुपये व आमचा दोघींचा महिन्याचा खर्च साधारण ५० रुपयात भागत असे. आई शाळेत शिक्षिका असल्याने कधी विद्यार्थी घरची भाजी आणून देत असत तर कधी प्रभाकरदादांच्या शेतातील भाजी मोठ्या आपुलकीने बाईंना पाठविली जाई.आम्ही सुद्धा अंगणात काही वेळ, मिरची,कोथिंबीर वगैरे लावत असू. पावसाळ्यात तर सर्वजणच तोंडली,पडवळ, कारली,फुलझाडे वगैरे आपापल्या परसात लावत असत आणि घरच्या पुरती भाजी मिळत असे. याप्रमाणे आमचा अनगावी मुक्काम सुरु झाला.( क्रमशः)
प्रतिक्रिया
11 Nov 2020 - 2:41 pm | एरन्दोल्कर
छान वाटतय वाचायला. जुना काळ कसा होता हे कळतय.
11 Nov 2020 - 2:58 pm | राजेंद्र मेहेंदळे
पहिला परीच्छेद चुकुन २ वेळा आला आहे. तो गाळता येइल का?
11 Nov 2020 - 7:03 pm | कंजूस
भाग मोठे टाका. फुलस्केप चारपानी किंवा अधिक.
12 Nov 2020 - 12:02 am | विजय१९८१
माझ बालपण पण आनगाव येथे गेले. १९९० ते २००३ .
15 Nov 2020 - 1:55 pm | dadabhau
छान लिहीतोस राजेंद्र...खरं तर आईने सांगितलेलं कदाचित सगळं जसंच्या तसं कागदावर उतरवता नाही येणार...त्यांच्या आवाजात रेकाॅर्डींगही करुन ठेव...
15 Nov 2020 - 1:56 pm | dadabhau
छान लिहीतोस राजेंद्र...खरं तर आईने सांगितलेलं कदाचित सगळं जसंच्या तसं कागदावर उतरवता नाही येणार...त्यांच्या आवाजात रेकाॅर्डींगही करुन ठेव...
20 Nov 2020 - 1:03 pm | राजेंद्र मेहेंदळे
नक्की प्रयत्न करेन.