आधीचे भाग
स्मृतींची चाळता पाने --मुक्काम पोस्ट लालबाग
स्मृतींची चाळता पाने -अनगाव
जून १९५२ मध्ये आईला नाहूर रोड येथील शाळेत बदली मिळाली व मला मो.ह. विद्यालय ठाणे येथे ८ वि मध्ये प्रवेश मिळाला. ही शाळा खूपच मोठी होती त्यामुळे आम्ही नवीन मुली जरा घाबरत होतो , पण लवकरच आमच्या ओळखीपाळखी झाल्या व रीतसर अभ्यासाला वगैरे सुरुवात झाली. इथे इंग्रजी प्रथमच शिकायला मिळणार होते त्यामुळे सकाळी शाळा सुरु होण्या आधी प्रथम १ तास आमचा घेतला जाई व नंतर शाळा सुरु होई.आमचे हेड मास्तर श्री. टिल्लू ,गोरे बाई ,पटवर्धन बाई ,चितळे सर,परांजपे सर हे सर्वजण आपापले विषय छान शिकवत असत त्यामुळे वर्गाचा तास कधी संपत असे समजतच नसे.त्यावेळी ११वी मॅट्रीक होती माझ्या वर्गातील मैत्रिणी म्हणजे कामत,दोंदे,मोकाशी,पाटील अशा मुली होत्या. संस्कृत आणि इंग्रजी हे नवीन विषय होते पण चांगले शिक्षक व कठीण वाटणारे प्रश्न त्यांना वेळोवेळी विचारत गेल्याने सवय होत गेली.मला मराठी व गणित विषय आवडत असत आणि साधारण ५०-६० टक्के मार्क मिळत असत.
मी महिन्याच्या सुट्टीत आम्ही वेगवेगळ्या नातेवाईकांकडे राहायला जात असू. दादरला माझे दोन मामा, मावशी आणि आत्या राहत असत तर मलबार हिल ला एक मोठी आत्या राहत असे.तिचे यजमान पोस्ट ऑफिस मध्ये पोस्ट मास्तर होते. त्यांचे तळमजमल्यावर ऑफिस आणि वरच्या मजल्यावर राहायला जागा होती. जागा म्हणजे ५-६ मोठ्या खोल्या ,हॉल आणि स्वयंपाक घर. माझ्या २ आते बहिणी साधारण माझ्या वयाच्याच होत्या व दोन आतेभाऊ लहान होते. तिथे राहायला गेल्यावर दिवस कसे भुर्रकन उडून जात समजत नसे. अजूनही मलबार हिल पोस्ट ऑफिस तिथे आहे. २-३ वर्षांपूर्वी मी तिकडे जाऊन आले तेव्हा बघितले. तिथेच कमला नेहरू पार्क आहे पण त्यावेळी तिकडे खेळाचे मैदान होते व तेथे आम्ही नेहमी खेळायला जात असू.आता मात्र त्या सर्व भागात खूपच गजबजाट झाला आहे. तेथून खाली पूल उतरून गेले कि बाबुलनाथाचे देऊळ होते. आता तो सर्व भाग ग्रॅण्ट रोड म्हणून ओळखला जातो. त्यावेळी आम्ही ट्राम चे २ अणे तिकीट काढून तिथे जायचो.
आत्याची मलबार हिलची जागा इतकी मोठी होती कि माझ्या एका आते बहिणीचे १९५० साली तिकडेच लग्न झालेले आठवते.त्यावेळी ती २० वर्षाची व ९वी पास झालेली होती. तिचे पती आरे कॉलनी गोरेगाव येथे सुपरवायझर होते व तिथेच त्यांना राहायला घरे होती.तिकडे मोकळ्या जागेमध्ये सिनेमाची शूटिंग होत असत. आरेकॉलनी तेव्हा खूपच प्रसिद्ध होती आणि दुधाच्या बाटल्या भरण्याचे काम कसे चालते ते पाहायला खूप गर्दी होत असे. पुढे या आतेबहीणीला मुलगी झाल्यावर आम्ही तिकडेही राहायला गेलो होतो.
माझे मोठे मामा दादरला कोहिनुर मिलसमोर महम्मद बिल्डिंग मध्ये तर दुसरे मामा गोखले रोडला कृष्ण कृपा बिल्डिंग मध्ये राहत असत. या बिल्डिंग अजूनही आहेत. मावशीही जवळच राहत असे.दुसरी आत्या तुळशीदास चाळीमध्ये दोन खोल्यांच्या घरात राहत असे. छोटे घर होते तरीही आम्ही तिघी तिच्याकडे २-३ दिवस राहायला जायचो.तिची मुलगी व मुलगा लहान होते त्यांना आम्ही खेळवत असू.
माझ्या दोन्ही आत्या सुगरण होत्या. त्यावेळी हॉटेलमध्ये फारशी गर्दी नसे आणि काही लोकांना परवडत पण नसे. माझ्या आत्या घरीच ओली भेळ,सामोसे,बटाटेवडे इत्यादी छानपैकी करत असत. कधी कधी वाटीमध्ये लावून इडलीसुद्धा करत असत तर ताटामध्ये वाफवून ढोकळा केला जाई. त्यावेळी ह्या पदार्थांचे अप्रूप होते आणि खायची मजाही काही वेगळीच होती.
उन्हाळ्याच्या सुट्टीत खूप सारेजण जमले की पॉट आईस्क्रीम चा कार्यक्रम होई.आत्याचे यजमान खूप हौशी होते आणि सगळ्यांना घरी बोलावून ते स्वतः आईस्क्रीम बनवत. त्यावेळी आम्ही लहान मुले त्यांना हॅण्डल फिरवायला मदत करत असू. हॅण्डल जरी जड असले तरी नंतर मिळणाऱ्या आईस्क्रीमच्या आशेने सगळेजण आळीपाळीने फिरवत.आंबा ,पिस्ता असे फ्लेवर असत.
पुर्वीचा दादरचा भाग मला अजून आठवतो. आत्तासारखी गर्दी नव्हती. मी मावशीबरोबर मार्केटमध्ये जात असे. त्यावेळी रानडे रोडला आझाद आईस्क्रीम हाऊसमध्ये २ रुपयाला आईस्क्रीम मिळे तसेच रानडे रोडलाच मामा काणे यांचे बटाटा वाडा व भजी स्पेशल दुकान होते. कापडाचे शहाडे आठवले यांचे दुकान, प्रदीप,प्रकाश स्टोर्स आणि पुढे प्लाझा कोहिनुर सिनेमा होते. तिथे आम्ही काही मराठी सिनेमे पहिले होते. मोरूची मावशी हा सिनेमा मला आठवतो ज्यात मावशीची भूमिका प्रसिद्ध विनोदी अभिनेते दामू अण्णा मालवणकर यांनी केली होती. प्लाझा तेव्हा व्ही. शांताराम यांच्या मालकीचे होते व त्यांचे डॉ. कोटणीस की अमर कहाणी ,दहेज असे सिनेमे तिथे लागत असत. दादरचा टिळक ब्रिज अजून तसाच आहे.
मामांकडे असताना आम्ही मुले,आई व मामी शिवाजी पार्क किंवा दादर चौपाटीवर फिरायला जात असू. चौपाटीवर गर्दी नसे व स्वच्छता होती. भेळ वगैरे मिळत नसे पण चणे दाणे मिळत. आम्ही भावंडे वाळूमध्ये किल्ला करत असू किंवा पाण्यात जाऊन शंख शिंपले गोळा करत असू. सायंकाळी उशिरापर्यंत थांबले की सूर्यास्त बघायला मजा वाटत असे आणि तिथेच बसून राहावेसे वाटे, पण मामी आणि आई घरी जाण्याबद्दल ओरडत असत त्यामुळे नाईलाजाने उठावे लागे.
आजही दादरला फिरताना ते सर्व दुकाने रस्ते आठवतात.कबुतरखाना,डिसिल्व्हा हायस्कुल,फुल बाजार, प्रभादेवी मंदिर,दादर टी टी, स्टेशनाजवळचे स्वामी नारायण मंदिर वगैरे.
माझी मामेबहीण माझ्यापेक्षा २ वर्षांने मोठी होती पण दादरमध्ये राहिल्याने बरीच चुणचुणीत होती. त्यामुळे ती मला दादर टी टीला अंबा भुवनामध्ये घेऊन जाई व तिथे आम्ही इडली डोसा खात असू.अजूनही ते हॉटेल आहे. शिवाय उसाचा रस,भेळ पाणीपुरी इत्यादी खाण्यासाठी मामीला विचारून आम्ही जात असू.कधी कधी आमची फेरी माटुंगा भाजी मार्केट ,शितलादेवी मंदिर ,माहीम पर्यंत जाई. तिथे जायला बस असे पण मला बसमध्ये चढायला जमत नसे व भीती वाटे.पण मामेबहीण मला हात धरून सगळीकडे नेत असे.
मामी व मावशीकडे गेले की आम्हा बहिणींना बांगड्या,डूल,गळ्यातल्या माळा,रिबिनी इत्यादी मिळत असे तसेच कधी कधी फ्रॉक साठी कापड मिळे. आमच्या पेक्षा त्यांची परिस्थिती जरा बरी होती त्यामुळे त्या आम्हाला सर्व प्रेमाने घेऊन देत.आज हि सर्व माणसे काळाच्या पडद्या आड गेली आहेत पण त्यांची माया व जिव्हाळा आठवून मन अस्वस्थ होते आणि डोळ्यात पाणी येते. अशी माणसे देवाने आम्हाला नातेवाईक म्हणुन दिली याबद्दल मी त्याची खूप आभारी आहे. आजच्या काळात अशी मायेची माणसे मिळणे खरेच कठीण आहे.
एक मजेशीर आठवण म्हणजे आम्ही मलबार हिल ला आत्याकडे भाऊबीजेला जमायचो तेव्हा आत्याच्या ४ मुली, दुसऱ्या आत्याच्या ३ मुली व पुतणी ,आम्ही दोघी व काकांच्या २ मुली अशा १२ जणी मिळून दोन्ही आत्याच्या मिळून ४ मुलांना ओवाळायचो.सगळ्या मुलींना १ बंदा रुपया भाऊबीज मिळे. प्रत्येकी ४ रुपये भाऊबीज आम्हाला खूपच वाटत असे आणि आता यामध्ये काय विकत घेता येईल याचे बेत करायला मजा येत असे.
आताच्या पिढीतील मुलांना नातेवाईकांकडे जायला फारसे आवडत नाही आणि मोबाईल टी.व्ही. वर खेळण्यातच त्यांचा वेळ जातो.शिवाय घरोघरी १ किंवा २ मुले असल्याने हळूहळू मामा मामी आत्या मावशी काका ही नाती कमी होत चालली आहेत. ते मायेचे संबंध त्यांना कसे कळणार ?त्यांचे बोलणे कधीतरी फोनवरच होते. फारतर एखाद्या समारंभाच्या निमित्ताने भेट होते तेवढेच संबंध राहतात. कालाय तस्मै नमः(क्रमश:)
प्रतिक्रिया
4 Dec 2020 - 6:02 pm | कंजूस
खरंय.
स्मृतींची पाने आवडली आहेत.
4 Dec 2020 - 6:32 pm | Rajesh188
जुनी मुंबई खरोखर चांगली होती.
स्वच्छ,सुंदर अशी.
आता काळानुसार बदल झालाय पण तरी सुद्धा जो मुंबई मध्ये राहिला आहे त्याला मुंबई सोडून जावं असे वाटतं. नाही
4 Dec 2020 - 6:53 pm | चौकटराजा
आताच्या पिढीतील मुलांना नातेवाईकांकडे जायला फारसे आवडत नाही आणि मोबाईल टी.व्ही. वर खेळण्यातच त्यांचा वेळ जातो.शिवाय घरोघरी १ किंवा २ मुले असल्याने हळूहळू मामा मामी आत्या मावशी काका ही नाती कमी होत चालली आहेत. ते मायेचे संबंध त्यांना कसे कळणार ? चला म्हणजे ही व्यथा फक्त माझी नाही तर आमच्या पिढीचीच आहे !
शाळेत बाईंची गुरुजीन्ची आडनावे चितळे , पटवर्धन असत ! कायच्या काय सांगताय ! आजचा नातू म्हणेल !
15 Dec 2020 - 9:12 pm | MipaPremiYogesh
शाळेत बाईंची गुरुजीन्ची आडनावे चितळे , पटवर्धन असत ! कायच्या काय सांगताय ! आजचा नातू म्हणेल !
---> अगदी अगदी चौराकाका :) बरोबर आहे
5 Dec 2020 - 12:25 am | सुखीमाणूस
खुप श्रीमन्ती नाही पण दैन्य, दुख पण नाही.
असे आयुष्य लाभणे खरच आनन्ददायि आहे.
या वयोगटातील लोकानी सभोवताली वेगाने झालेले बदल पचवले. थोडक्यात समाधानी राहीले.
त्याना काही बदल पचवणे जड जाते पण स्वीकारतात. माझे वडील याच वयोगटातले असल्यामुळे अश्या आठवणी ते पण सान्गत असतात.
पुढच्या भागाची वाट बघते आहे.
5 Dec 2020 - 9:30 am | टर्मीनेटर
वाचनीय स्मृतींची पाने 👌
आधीचे भागही वाचले होते, पण दिवाळी अंकाच्या धामधुमीत प्रतिसाद देता आले नव्हते!
छान लिहिताय, पुढील लेखनास शुभेच्छा 👍
7 Dec 2020 - 12:43 pm | सिरुसेरि
जुन्या काळातील मुंबईचे दर्शन घडवणारे सुरेख स्मॄती लेखन . देव आनंदच्या " टॅक्सी ड्रायव्हर " , "सीआयडी" या चित्रपटांची आठवण झाली .
8 Dec 2020 - 7:44 pm | राजेंद्र मेहेंदळे
सर्व वाचकांचे धन्यवाद!!
8 Dec 2020 - 10:57 pm | सौंदाळा
हे राहूनच गेलं होतं
सर्व भाग एका दमात वाचून काढले.
पुभाप्र.
15 Dec 2020 - 9:12 pm | MipaPremiYogesh
वाह खूप मस्त वाटत आहे वाचायला हे सगळे
16 Dec 2020 - 10:16 am | प्राची अश्विनी
खूप छान चाललीय मालिका. अशा आठवणींमधून त्या काळात फेरफटका मारायला खूप आवडतं.
12 Jan 2021 - 1:30 pm | मुक्त विहारि
सहमत आहे
15 Jan 2021 - 9:36 pm | नीळा
नाहुर रोड ची शाळा माझ्या घराजवळच आहे