अव्यक्त स्पंदने

तेजल दळवी's picture
तेजल दळवी in जनातलं, मनातलं
19 Aug 2020 - 10:11 pm

...आणि मलाच माझी दया आली... इतका जीव लावतो आपण काही माणसांना .. त्यांच्या वागण्यात जरा जरी बदल झाला तरी कळवळून येत मनात..
कधीकधी स्वतःला त्यांच्या जागी ठेवून विचार करायला लागतो आपण.. त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करतो ...पण त्रास काही संपत नाही.. असं का वागवस वाटलं असेल त्या व्यक्तीला माझ्याशी हे काही केल्या उमगत नाही..

मग अशावेळी काही हक्काची माणसं आठवतात ... जी कायम सोबत असतात सावलीसारखी ...या अशा काळात त्यांची जास्त आठवण येते..
कधीकधी वाटत खूप गृहीत धरतो आपण त्यांना.. तुम्ही खूप महत्वाचे आहात हे सांगायचंच राहून जातं बऱ्याचदा.. ही माणसं रक्ताच्या नात्यांनी बांधलेली नसतात.. पण तरी कधीच साथ सोडत नाहीत... आपला श्वास बनून राहतात..

नवे बंध जोडायच्या नादात आपण मात्र या जवळच्या धाग्यांना गृहीत धरत जातो.. जे शाश्वत आहे त्याची किंमत उरत नाही असं नाही पण त्यांची सवय होऊन जाते ...
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर निस्वार्थीपणे साथ निभावणारी ही माणसं इतकी हक्काची बनून जातात की ती दुखावली जातील ही शंकाच कधी मनाला शिवत नाही.. छोट्या रोपट्यांना रोज पाणी द्यायची गरज असते पण डेरेदार वृक्षांना आपण रोज पाणी घालत नाही.. त्यांची मूळच एवढी खोलवर रुजलेली असतात की आपण स्वतःहून पाणी द्यायची गरज संपते.. ती स्वतःहूनच पाण्याच्या दिशेने वाढतात.. तसंच काहीस असतं या नात्यांचं ...

नात्यांबद्दलचे कटू अनुभव येऊ लागले की पावलं आपोआप या डेरेदार वृक्षांकडे वळतात ... त्यांच्या सावलीत नुसतं बसलं तरी शांत वाटत.. त्या मौनात पण एक सुख असतं ... अशी माणसं दुर्मिळ असतात .... त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही..किंबहुना कोणी घ्यायचा प्रयत्न सुद्धा करू नये..

ही अशी माणसं आपल्या घरातलीच बनून जातात... सगळं सहज सोप्पं करून ठेवतात... एखाद्या मैफिलीच्या सुरवातीला तानपुरा आधीच जुळलेला असावा इतकं सहज..

मनात अनेक विचारांची गर्दी वाढायला लागली की अशा माणसांकडे आपण सगळं भडाभडा बोलून मोकळे होतो.. कारण ही माणसं आपल्याला judge करत नाहीत .. कधी कधी वाटत ही अशी माणसं आयुष्यात नसती तर गुदमरून गेलो असतो आपण आपल्याच विचारांच्या डोहात ... कोणाच्या प्रेमात पडल्यावर पण ज्यांच्याकडे आधी कबुली दिली जाते अशी ही माणसं ...interview मधून बाहेर आल्यावर पहिला फोन ज्यांना केला जातो ती ही माणसं ... आजारी असल्यावर ज्यांचा आवाज ऐकावासा वाटतो ती ही माणसं ... काहीही लिहिलं तरी त्यांनी आधी वाचावं असं वाटतं ती ही माणसं.. किंवा नुसतं कुठेतरी जाऊन शांत बसावसं वाटलं तरी सोबत यायला तयार असणारी ही माणसं...

या अशा सवयीच्या लोकांना आज मनापासून thank you म्हणायचंय.. तुम्ही नसतात तर कदाचित नात्यांवरचा विश्वास उडाला असता.. तुम्ही नसतात तर प्रेमात पडण्याची भावना एवढी special नसती.. तुम्ही नसतात तर पावसात भिजणं फक्त एक कटकट असती.. तुम्ही नसतात तर आयुष्याचं चित्र तर रंगीत असलं असतं पण ते रंगीत चित्र बघण्यासाठी हवी असणारी सोबत , ते चित्र निरखणारे सुंदर डोळे मात्र नसते ... मग त्या अशा रंगीत चित्राचा तरी काय उपयोग..
खरंच तुमच्यामुळे आयुष्यातल्या खूप तडजोडी सुसह्य झाल्यायत... रंगीबेरंगी काचा प्रत्येक जण वेचतो आयुष्यात पण त्यांना जोडून त्यांचे सुंदर patterns बनवणारा kaleidoscope खूप कमी जणांकडे असतो.. माझ्यासाठी तो kaleidoscope बनलात तुम्ही..

तुमच्याबद्दल काय लिहावं आणि किती लिहावं ते कधी समजत नाही. कारण हे अपरिमित आहे... ज्याला स्पष्ट सुरवात नाही आणि शेवट तर नाहीच नाही..

मांडणीवाङ्मयविचारलेखअनुभव