***************************
आज सुटटी होती आणि रक्षाबंधन पण. सकाळी उठणं लवकरच होणार होतं, साहजिकचं होतं घरी पाहूणे येणारे होते, हो बहिण, आत्या येणार होती, आघोळं संपली आणि मग नेहमीसारखा टी. व्ही लावला, बातम्याचं चॅनेल लावलं, ब्रेकिग न्यूज होती, नंरेद्र दाभोलकराचीं पुण्यात गोळ्या घालून सकाळी हत्या केली होती, माझी पहिली प्रतिक्रिया होती, “असं नाय व्हायला पाहिजे होतं”. आणि मग टी. व्ही. वर झळकत होत्या मान्यवराच्या प्रतिक्रिया, दाभोलकरांनी दिलेल्या मुलाखती आणि इतर चित्रण विविध न्यूज चॅनेल दाखवत होते. पुरोगामी महाराष्ट्राच्या नावाने शिमगा सुरु झाला होता, इकडं घरात पाहुणे येणारं म्हणून पु-याचां बेत आखला होता त्यांच्यात मात्र तीळमात्रही फरक पडला नव्हता, तिकडं स्वयंपाकघरात राब-ण्यासाठी ही परग्रहावरची घटना होती, तिकडें पीठ मळण्याचं काम सुरु होतं, “पण असं कसं शक्य आहे आणि अश्या माणसाचं कोण बरं दुश्मन असेल” मला पडलेले प्रश्न चॅनेलवरचे एंकर मांडत होते आणि लगेच सोडवूही पाहत होते. करायचं तर काय? सत्तेत असलेल्या आणि नसलेल्या सगळ्या राजकीय पक्षानीं आपआपल्या सोयीच्यां राजकारणाच्या बाजूने प्रतिक्रिया देणं चालू होतं.
मला दाभोलकर भारी वाटायचे का तर ते देव मानत नाहीत पण एखादया मुदयाचं उदाहरण देताना ते तुकारामांच्या अंभगाचा, ज्ञानेश्वरीचा दाखला दयायचे, त्यांना आता धर्मचिकित्सा करायची होती, त्यांना इथल्या बुवा लोंकाचं दुकान बंद करायचं होतं, त्यांची जी चळवळ होती तिला अजून अपेक्षित अशी दिशा दयायची होती आणि हे सगळं करताना येणारा विरोध हा निव्वळ वैचारिक भूमिका मांडून सोडवला जाईल अशी कदाचित त्यांची भाबडी आशा असावी, ते म्हणत मी पोलीस प्रोटेकशन घेणार नाही, आता इथल्या सरकारने त्यांच्या हत्येचं आपल्यावरचं ओझ कमी करण्यासाठी अंधश्रध्दा निमूर्लनाचा कायदा तातडीने विधानसभेच्या पटलावर मंजूर केला आणि त्यांच्या हत्येची सुई सनातन या हिदुंसाठी काम करण्या-या संस्थेकडे वळवली, आता सरकारही बदलतील उदया कधीतरी खुनीही सापडेल, पण मला दुख याचं झालं की जो माणूसं काहीतरी आजूबाजूला डोळेझाकपणे चाललेलं चुकीचं बदलू पाहत असताना त्याला असं मारुन टाकणं फार बेकार होतं.
अजून एका व्यक्तीचं त्याचं दिवशी निधन झालं, जयंत साळगांवकर, ही ही बातमी घरच्याच्यां कानावर पडली त्याबाबतीतही प्रतिक्रिया शून्य, जेवणाचा घरात घमघमाट सुटला होता, हे जे आपल्या घरात कालनिर्णय लावलयं ते हयाचयं….. “हो मग” तरीसुदधा घरच्यांची प्रतिक्रिया थंडच होती, त्यांची सगळी उत्सुकता रक्षाबंधनाच्या सणाकडे लागून राहिली होती, इकडे जयंत साळगांवकराच्या निवासस्थानी ‘ही’ राजकारणी लोकांची गर्दी होती, त्यांच्या ही प्रतिक्रिया टी.व्ही.वर दाखवत होते, माझ्यासाठी ते उदयोजक असण्यापेक्षा ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आणि त्यांनी केलेली भाकित आणि त्यांसाठी राजकारणी त्यांच्याशी ठेवून असलेल्या संबधासाठी लक्षात होते, “हया न्यूजचॅनेलवालाच्या पाठून रडत बसून आपल्याला काय भेटणार हाय” घरच्यांची प्रतिक्रिया, घरात आता थोडयावेळात चमचमीत जेवण वाढलं जाणारं होतं आणि त्यांची सगळी तयारी जवळजवळ होत आली होती. “इथं आमच्यावर वाईट प्रसंग आल्यावर कुठे असते ही मिडिया” घराच्यांनी आपली तुणतुणी चालू केली. मला मात्र या दोन्ही व्यक्ती बदल प्रचंड आकर्षण होतं, एकतर दोघांचा विषय दोन वेगवेगळया ध्रुवांवरचा. दोघं ही आपल्याआपल्या मतावरं ठाम असलेलें, एकापासून राजकारणी जवळीक साधून असलेले तर दुस-यापासून जितकं दूर अंतर राखता येईल असे, एकाने ज्योतिषशास्त्राचं सगळं ज्ञान प्राप्त केलं होत त्यांना “ज्योतिर्भास्कर”ची उपाधी दिली गेली आणि दुस-याला ज्योतिषशास्त्रा म्हणजे एकूणच थोताडं वाटायचं म्हणजे ते म्हणयाचे की ज्योतिष हे निव्वळ मनोरंजन असून त्याला कुठलाचं वैज्ञानिक आधार नाहीयं.
साला त्या अख्या दिवसात वाटत होत की दाभोलकरांचा खून नाही व्हायला पाहिजे होता, मस्त जेवण खाऊन सगळे नातेवाईक रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपवून आता आपआपल्या घरी जायला निघाले होते, दिवसभर टीव्हीवरच्या बातम्या बघत असताना आलेल्या एका नातेवाईकाने आपलं मत माडलं “या दाभोलकरने पण अति केलं, सत्यनारायणाच्या पूजेला विरोध करत होता मागे, असं केल्यावर अजून काय होणार, वरुन पोलिस प्रोटेकशन नाकारल्यावर”, अजून एक भावना “पण यांच्यापेक्षा एखादया राजकारण्याला मारायला पाहिजे होत”, मला वाद घालायचा नव्हता, मी आपलं निमूटपणे ऐकून घेतलं, मला आता उदया काय पेपरात छापून येतं यांची उत्सुकता होती, इतरवेळी फुकट वाचायचा न्यूजपेपर अशावेळी लोक मुददामून विकत घेतात, मी पण दुस-या दिवशीचा लोकसत्ता मुददाम विकत घेतला, असं काही घडलं की संपादकीय लिहताना संपादकाची कस लागते…, लोकसत्ताची हेडलाईन होती “कालनिर्णय आणि कालनिर्दय” … अगदी समर्पक…
***************************
मला आता कळत नव्हतं जे काही ते गुरु महाराज सांगू पाहत होते, ते सतत मर्फी लॉचा उल्लेख करत होते, आपण राहतो इथं भारतात, सांगतायेताय कुणातरी परदेशी माणसाचं म्हणणं आणि त्यातंही सतत प्रत्येक गोष्टीत देव असल्याची उदाहरण दयाचीय त्यांची पदधत म्हणजे देव म्हणजे कॉम्पुटर, देव म्हणजे झाड, देव म्हणजे बॅक, देव म्हणजे हे, देव म्हणजे ते, म्हणजे काय तर देव सगळीकडे आहे हे, तरी म्हणजे मी त्यांची विशेष अशी प्रवचन ऐकली नव्हती फक्त काही दूरदर्शनवर सहयाद्री वहिनीच्या उपग्रह क्रेंद्रावर दर रविवारी त्यांचा प्रवचनाचा कार्यक्रम असायाचा, पण तो काही तितकासा ऐकण्यात नव्हता, पण आजूबाजूची लोकं बैठकीला या गुरुच्या कार्यक्रमाला जातात ऐवढं ऐकून होतो, एकदा गावावरुन येत असताना त्यांच्या एका भक्ताने मला ते पुस्तक विकले, त्या पुस्तकात पानापानावर देव म्हणजे काय आणि तो कश्याकश्यात असतो यांचे नाना त-हेचे दाखले होते, शिवाय मर्फी यांचे काही लॉ लिहिले होते, हे संगळ वाचत असतानाच वय पंधरा सोळाच्या आसपास होतं, म्हणजे आपण ज्या शंकर-गणपतीला पुजतो, पाया पडतो त्याला हा मर्फी पुजत नाही तो तिकडे कुठल्यातरी देशात राहतो आणि तरीदेखील या गुरुमहाराजानां हा मर्फी भारी वाटतो, असं कसं शक्य आहे, एवढं असूनसुदधा गुरुमहाराज असं जरादेखील म्हणत नसतं की तुम्ही देवाला पाया पडणं बंद करा वैगेरे वैगेरे, ते काय म्हणत ते पार डोक्यावरुन जाई, सारखं आपलं परमार्थ, संसार, आचरण, आचार-विचारांच्या गोष्टी सांगत, पण त्यांच्या एकूण सगळया हया प्रकरणामुळे एक गोष्ट मनात रुतली ती म्हणजे ज्याला आपण पाया पडतोय, ज्यांची मनोभावे प्रार्थना करतोय तो देव नव्हे! आपण आपल्याला खूश ठेवण्यासाठी हे सगळं करतोय, हळूहळू कळायला लागलं की पाप पुण्य असं काही नाही, सगळं झूट असतं, आपण आपल्याला वागायचं तसं वागू शकतो, आपल्याला शिक्षा देणारा कोणीही नाही, आणि तरीदेखील आपण विवेकाने आपल्या नैतिक तत्वावर जगू शकतो, आपल्या आजूबाजूची लोक देवाला पाया देखील पडतात आणि तेवढं वाईटही वागतात, त्यांना तीर्थक्षेत्र ही पापक्षालनाची क्रेंद्र वाटतात, आपलं तसं होत नाहीय हे बाकी भारी होतं, ज्या गुरुमहाराजानीं अनेकांना वाईटकडून चांगल्याकडे नेण्याचं काम केलं मात्र त्यांनी एका माणसांच्या आतलं देवाबदलचं अस्तित्वच नष्ट करुन टाकलं तो म्हणजे मी, आता मला ती माणसं आवडू लागली जे सांगायची की सारासार विचार करा, तुमच्या बुदधीला पटेल तेच मान्य करा, अशी सांगणारी माणसं मी शोधू लागलो, त्यात जी काहीजण भेटली ती माणसं आवडू लागली, मी अशाच माणसाच्यां शोधात होतो, लोकांना यांनी पटवून दयायला पाहिजे आणि लोकांनी ही या अश्या सारासार विवेकी विचार करण्या-या लोकांचं ऐकून देवाला सतत आळवणं, प्रथा, पंरपंरा, रुढी सोडून दिल्या पाहिजे, परमेश्वरी सेवेत स्वतःला असं गुंतवणं देणं सोडून दिलं पाहिजे, लोकांनी आता या अश्या विवेकी लोकांना आपले हिरो घोषित करायला पाहिजे, “असं कसं शक्य आहे?”, असे प्रश्न लोकांना यांच्या प्रबोधनातून पडू लागले पाहिजेत, लोकांच माहित नाही पण मला दाभोलकराच्या रुपाने तो हिरो सापडला, अंधश्रध्देवर तुटून पडणारे एक नंबर वाटायचे, हे संगळ खोटयं, लोकांना असं फसवणं बंद करा अन धर्माची नासाडी थांबवा, लोकांच्या अंगात येणं काय, लिबूं पिळणं काय, भानामती करणं कायं, संगळ संगळ थोतांड आहे, हे सगळं लोकांना कळायला पाहिजे, आणि हे असं संगळ सागंणारी काही लोकं आहेत इथं आणि त्यांची तर संघटना आहे हे ऐकून भारी वाटायचं तरी या सगळ्यात प्रत्यक्ष सहभाग झिरो…….
***************************
तुम्ही जिवतं आहात म्हणजे नक्की काय आहात, हे चंद्राचं आकर्षण इथल्या समुद्राच्या पाण्याला कसं होतं, त्यांची भरती आहोटी यांच्यावर कशी अवलंबून, हा जो दिवस-रात्रीचा खेळ चालवला जातो, त्यासाठीची ही वंसुधरा गोल कशी काय फिरते, आणि ती त्या सूर्यांभोवतीच का फिरते, या बदलचं कुतूहूल वाढायला लागलं, शाळेत भूगोलाच्या पाठातंराची घोकपटटीने घात केला, सगळं पुन्हा नव्याने समजून घेतलं, हळू हळू कळायला लागलं की माणसांसारखचं ग्रह ता-याचं आयुष्य असतं, म्हणजे आपली पृथ्वी पण एक दिवशी नष्ट होणार, जी गोष्ट तयार आहे ती अर्थात कुणीतरी बनवली असणारं म्हणजे तो अस्तित्वात असणारं, मग एके दिवशी अलकेमिस्ट वाचलं, त्याच्यातं लिहलयं की या जगाला, पृथ्वीला एक आत्मा आहे जो तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करु शकतो फक्त तुम्ही ती मनापासून मागायला हवी, हे काय आहे, ही कोणती ताकद आहे, ही शक्ती कोण आहे, आणि एवढं सगळं असून देखील त्यानें आपल्याला एवढी ताकद कशी प्रदान केली की आपण त्यांच्याबददल बोलू शकू, इथली अजून एक थेअरी अशी की ऊर्जा कधीच नष्ट होत नाही ती रुपांतरित होत असते, मग आपल्या अस्तित्वाचं काय, आपण मेल्यावर निर्जीव होऊ, मग आपण सजीव कसे झालो, आपण खरचं डार्विनने मांडलेला उत्क्रांतीवादाचा सिद्धांत आहोत की कुणीतरी आपल्याला इथं अलगद सोडून दिलयं, की जसं मागे नेटफिल्कसवर बघितलेल्या एका ‘कॉसमॉस’ या विषयावरच्या डायुक्मेटरींतल्या थेअरी सारखं सगळं बिगंबॅग थेअरीपासून सुरु झालयं, सगळं एका कणापासून, हिंदु वेद पुराण हेच सांगतात, पण ते वाचायचे कुणी, आणि त्याचें दाखले दयायचे कुणी, ते सहजगत्या, सहजसोप्या शब्दात सांगायचे कुणी, बदलत्या काळानुसार आता इथपर्यंत येऊन ठेपलेला हिदुंधर्म त्या रहस्याच्या शोधात निघालेल्या विज्ञानाच्या सोबत स्वतःला राखू शकेल का? की तो ही मग तोकडा वाटू लागेल, सगळा शोध स्वःत्वावर येऊ लागतो, शाळेत असताना गोपाळ गणेश आगरकर भारी वाटायचे, पण आई जेव्हा परीक्षा असताना देवाचा अंगारा लावायची तेव्हा त्या आगरकरच्या संदर्भ स्पष्टीकरणानाचें पैकीच्या पैकी मार्क भेटूनसुदधा शून्य गुण होते हे कळायला फार उशीर झाला.
***************************
पण आता काहीतरी नवीन खुणावत होतं, मागे एक जण भेटला होता, तो मांसाहारी होता आता शाकाहारी झाला, का विचारलं? तर सुरवातीला नकार दिला पण नंतर कारण एकूण आवाक झालो म्हणाला की मांसाहारी मध्ये त्यां जीवाचा आत्मा असतो आणि एखादयाचा आत्मा आपल्या शरीरात घेणं हे चांगल नाही, तो म्हणायाचा की आपल्या एकूण जगासारखे म्हणजे ब्रम्हांडासारखे सात आहेत, त्यांच्या वरती एक ठिकाण आहे तिथं पाप पुण्याचा न्याय निवाडा होतो, तो म्हणायाचा पण मला पटायचं नाय, हे सगळं ऐकायला भारी वाटायचं म्हणून निवातं ऐकत बसायचो, कधी कधी वाटायचं, एखादयानं खरचं प्रयत्न केला आपली सारी जिंदगी बरबाद करत जर या जगाच्या असण्याचं रहस्य मिळवलं तर काय होईल, आपण कोण आहोत, आपल्याला कुणी आणि का इथं आणलं यांची उत्तर त्याला सापडली तर तो खरचं तो ते रहस्य जगासमोर आणेल का, असा अनुभव येण्यालाचं साक्षात्कार म्हणतात का? आणि जर ते कळालं तर आपण तितकंच समरसतेने आयुष्याशी वाटाघाटी करण्यास प्रयत्नशील राहू का?
***************************
इथं हजारो वर्ष गेलीत कशाचा काही पत्ता नाही, चालयं…… चालयं…… आणि कशी अचानक युरोप मध्ये प्रबोधनाची लाट सुरु काय होते, अचानक जग बदलू काय लागतं, सगळ्या जगाला औदयौगिक क्रांतीचा चसका काय लागतो, आता इथं येऊन ठेपलेलं जग, हे कोणतरी घडवून तर आणत नसेल ना, म्हणजे कुठेतरी काय तरी लपवून ठेवायचं, आणि आपणचं काही माणसं पाठवून त्यांना शोधायला लावयचं, सगळी काही त्यांच्या सांगण्यावरुन, काही कळत नाही……..
***************************
या दोन माणसांच्या विचारानीं पार माझ्या डोक्याचां पार भुगा केलाय, कधी कधी वाटायचं दाभोलकर बरोबर बोलतायत, पण तरीदेखील काही प्रश्न अनुत्तरीत राहयचे, त्यांची उत्तर सहजासहजी सापडायची नाहीत म्हणजे देव नाहीतर आपल्याला इथं कुणी आणलं, गीतेत लिहलयं की सगळं काही भगवतं करतो म्हणून वैगेरे वैगेरे, आपला या जगाचा कोणीतरी कर्ता असेलच की, मग तो कोण, त्यासाठी मग विज्ञानात डोकावून बघायचो पण त्यांची उत्तर ही थेअरी वर आधारित अशीच, म्हणजे त्यांत ही काही ठोस सापडायचं नाही, मग वाटायचं काही लोकं कशी शास्त्रांच्या आधारावर कसं हे सगळं मांडतात, म्हणजे पुढे काही घडणार हे अगोदर मनुष्याला माहित असतं का, तर काही लोकं म्हणायचे की हो आम्हाला माहिती आहे, महाराष्ट्रात असेच काही लोकं होते, लोकातं त्यांचा आदर होता, विशेषतः राजकारणात, कारण त्यांनी एकास ग्वाही देत सांगितल होतं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तू होशील म्हणून, मग काय प्रत्येक जण त्यांच्याकडे सल्लासाठी, भविष्यासाठी जाऊ लागले, आणि असंही नाही की हा त्यांचा पोटापाण्याचा धंदा होता, तुमच्या आमच्या घरात दिसणारं कॅलेडर कालनिर्णय यांचच, यांचा ज्योतिषशास्त्रांचा गाढा अभ्यास होता, पण तरीदेखील कर्तृत्वाला त्यांनी कधी कमी लेखलं नाही, पण ते दैववादी होते, आजूबाजूला इतका सगळा भष्ट्राचार बोकाळला असताना यातूंन मार्ग काय यांवर त्यांच उत्तर की आपण सगळयांनी मिळून प्रार्थना केल्यावर नक्की बदल होईल, सत्ता बदलेल, फक्त लोकांनी प्रार्थना करणं सोडलं नाही पाहिजे…..धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे….. तो अवतरेल ….
***************************
दाभोलकरांच्या मागण्या मान्य करणं, त्यांच्या आजूबाजूला असणं म्हणजे जनतेतं आपली लोकप्रियता घटवून घेणं असा साधारण राजकारणाऱ्यांचा समज होता , दाभोळकरविरोधकच म्हणणं साधारण असं होतं “इथल्या हिंदूच्या सवयीविषयी त्यांना उगाचच उचंबळा यायचा, यांना बाकीचे धर्म दिसत नाही, यांना ज्या काही सुधारणा करायच्यायात त्या फक्त हिदुं धर्मात, अरे पण का, आधीच इथल्या बहुसंख्यक समूहाचे हाल काय आहेत हे माहित असूनही का असं विचार माथी मारत आपल्या मनासारखचं वागायचं, आमचा धर्म सहिष्णू म्हणून तुम्ही आपल्याच लोकांना जाब विचारणार, तुम्हाला बाकीच्या धर्मातल्या दुरुस्त्या कराव्याशा वाटत नाही का”,” थोडक्यात हा माणूस आपलं ऐकणाऱ्यातला नाही, “बाबा कधीतरी म्हणणं की मी चुकलो पण नाही साला सगळी पुस्तक वाचून बसलाय, कसल्या चर्चा करणार हा, नुसतं आपलं तेवढचं खरं करणार, लोकांना नास्तिक बनावयचयं तर सगळ्याचं धर्मातल्याना बनवं, तुला मशिनरी दिसतं नाही, तुला मदरसे दिसत नाही, उठूसूठ येऊन सत्यनारायणाच्या पूजेवर तुझा का आक्षेप, कुणीतरी धर्मातरितं झालेल्या लोकांना धर्मात आणलं तर लगेच तुझ्या पोटात शूळ उपटलं काय?, तुझ्यासारखी धर्मातली लोक जर धर्माचीच मारणार असतील तर पाहिलं तुला संपवलेलं बरं”, “आणि इथला सगळ्या समाजाला आपल्या बाजूने झुकवण्या इतपत तू काही मोठा नाही आहेस, पण एकदा का तुझा आवाज बंद केला की किमान तसं करण्याची कोणी हिंमत तरी नाही करणार”,
***************************
ही अशीच लोक मग इतिहासाची पुनरावृत्ती करायला मदत करतात, असाच नाही हा देश गुलाम झाला, साला काडीचही आपलं स्वत्व ठेवत नाही, राजकारणी तरी काय करतील त्यांना जनेतच्या मताची किंमत अन त्यांना आपला उत्साह दाखवण्यासाठी असे देवधर्माचे सण-संभारभ मोठया प्रमाणावर लोकांकडून वर्गणी काढून करावे लागतात, इथल्या धर्माला बाजारी रुप आलयं आणि त्याला समाजमान्यता असते, जे आवाज ओरडतील त्यांचा आवाज दाबला तरी जाईल नाहीतर एक असं उदाहरण तयार ठेवायचं जे अश्याप्रकारे आवाज उठवण्यास हिमंतच दाखवणार नाही, जे चालयं ते चालू दया…. उन्माद होतोयं होऊ दया…. बाकी जग जसं धावतयं तस काही आपल्याला उगाच धावयची गरज नाही विज्ञान तंत्रज्ञान आजूबाजूचं जग यात इथला आपला धर्म लोप पावता नये किमान तो काळास सुसंगतच असायला हवा, आणि हिंदु धर्म ती ताकद ठेवत असताना असं एखादयाला संपवण्यात काय साध्य झालं, एवढया मोठया देशात इतक्या समस्या असताना त्यावर उपाय म्हणून हे एखादयाला असं सपवणं, असलं काहीतरी करत बसणं कितपत पटतयं, बाकी दरवेळी सारासार विचार बाजूला सारत खूप सारी सोशल टाळकी आपली अक्कल पाजळतातच भुकत असतात हल्ली सोशल मिडियावर…..
***************************
आता एकदा ज्योतिषशास्त्रानुसार भाकित खरी ठरु लागली की मग सगळ्याच पक्षातल्या लोकांची रांग लागते मग येत ते धागे, गंडे, उपवास, मंत्र सगळं काही, एक शास्त्र म्हणून असेल त्यांना ज्ञान, परत त्यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली, आता खूप चांगली वट त्यांची राजकारणी लोकांत सुरु झाली, आजूबाजूचं काही सुदधा बदलायचं असेल तर काही करायची गरज नाही फक्त इच्छा व्यक्त करा की ते नक्की होईल, कसं शक्य आहे हे विचारु नका पण नक्की होईल…..
***************************
मला हे सगळं बजबजपुरी बघून वाटतं की आपल्याला निसर्गाने जे काही बनवलयं त्यांच्या काही नियंत्रण नाहीय, त्याने फक्त बनवलयं, आपण त्यांच्याकडून बनलेली एक चूक आहोत, कलयुग वैगरे ठीक आहे, पण जे काही सध्या जगतोय त्यावरुनतरी असचं वाटतयं…. WE ARE ANOTHER FREAK OF THIS NASTY WORLD……
***************************
विचारांची लढाई विचारांनी लढाईची, माणूस मारला म्हणजे विचार संपत नसतो वैगेरे वैगेरे ठीक वाटतं, बोलायला, ऐकायला पण वास्तव हे बोचणारं असतं, ते नागडं सत्य मांडत…दाभोलकरांनाचा खून नाही व्हायला पाहिजे होता असं सारखं वाटतं……
***************************
-लेखनवाला
( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online, must be shared in totality . )
प्रतिक्रिया
26 Jul 2020 - 6:39 pm | Gk
छान
27 Jul 2020 - 1:17 am | Rajesh188
दाबोळकर किंवा नास्तिक लोक जे सांगत आहेत ते सर्वांना माहीत आहे ते काहीच नवीन सांगत नाहीत.
सृष्टी ची निर्मिती आणि सजीव उत्पत्ती फक्त दाभोलकर आणि नास्तिक लोकच शिकलेत आणि बाकी लोकांना काहीच माहीत नाही असे नाही.
आम्ही हिंदू आहोत ( इथे मुस्लिम,ख्रिस्त , जैन पण चालतील फक्त बौध्द सोडून सर्व) आमची स्वतःची वेगळी परंपरा आम्हाला हवी आहे,स्वतःची वेगळी ओळख हवी आहे,sanskruti havi aahe.ritirivaj have aahet san have आहेत.
विज्ञान शी आमची जुनी दोस्ती आहे त्या मुळे प्रतेक सणात विज्ञान आहे दाभोलकर नी ते शिकवावे एवढ खराब दिवस आलेले नाहीत.
झाड, सूर्य,जमीन,पाणी,आग ह्या शिवाय जगणे मुश्किल आहे त्या मुळे त्यांचे उपकार आमच्यावर आहेत म्हणून त्यांची पूजा केली जाते.
मुळात दाभोलकर जे सांगत आहेत ते खूप पूर्वी पासून अनेक संत सांगत आलेत संताचा हेतू साफ होता म्हणून लोक त्यांचा मान ठेवायचे.
आताचे नास्तिक हे एकतर नास्तिक धर्माचे प्रतिनिधी आहेत(जो धर्म ईश्वर मनात नाही)किंवा त्यांचे कोणी तरी प्रायोजक आहेत हे सुद्धा लोकांना माहीत आहे.
समाज सुधारणा हा हेतू नाही हे पण माहीत आहे.
27 Jul 2020 - 3:56 pm | प्रकाश घाटपांडे
म्हणजे? दाभोलकरांचा समाज सुधारणा हा हेतु नव्हता असे म्हणायचे आहे का? विचारांची मतभिन्नता समजू शकते.
27 Jul 2020 - 5:00 pm | चौकस२१२
"समाज सुधारणा हा हेतू नाही हे पण माहीत आहे."
सध्याची जी "बँड वॅगन" ( टोकाचे नास्तिक, अर्बन नक्साल, तथाकथित पूर्वगामी कलाकार आणि पत्रकार ) यांचं मानाने दाभोकर हेतूने प्रामाणिक वाटतात ..मला नाही वाटत कि दाभोल्कारांवर हा आरोप करता येईल.. त्यांच्या मुलाखती पहा, "अंधश्रद्धा निर्मूलनाचे " सारखे पुस्तक वाचा .. ते प्रामाणिक पणे कार्य करीत होते...हा हे मान्य कि त्यांच्या चालवली ने एका धर्मवीर जास्त लक्ष्य केंद्रित केलं ..
बरं दुसरे असे कि कोणत्याही धर्मातील/ समाजातील रूढींना "असे का" हा प्रश विचारायला अगदी नास्तिक असावे लागते ...टोकालाच कशाला जायला पाहिजे प्रत्येक वेळी...
उदाहरणार्थ "पूजा केल्याने किंवा ना केल्याने काही होत नाही" हा तर्क पटत असला तरी समजा एखाद्या समाजाला त्याने समाधान मिळत असेल, फार अवडंबर नसेल तर उगाच विरोध करू नये... सध्याचे जास्त कडवे झालेले पुरोगामी जेव्हा असा विरोध करतात आणि मग प्रा राम पुनियानी सारखे "प्राध्यपपक " जेव्हा काय काय तारे तोडतात ते पहाहुन मात्र धार्मिक नसलेला हिंदू सुद्धा वैतागतो आणि पटत नसून सुद्धा अनिस च्या चांगलया कार्याला विरोध करू लागतो... नुकसान अनिस चेच होते ..
27 Jul 2020 - 5:34 am | सोत्रि
मनाची द्विधावस्था आणि खळबळ अतिशय पारदर्शी होऊन आलीय लेखनात. ‘बेंबट्या’ होत असताना पडणारे प्रश्न रास्त आणि परखड आहेत.
गौतम बुद्ध!
- (आस्तिक-नास्तिक ह्या फंदात न पडणारा) सोकाजी
27 Jul 2020 - 3:53 pm | प्रकाश घाटपांडे
http://www.misalpav.com/node/8889
अंनिस व धर्मश्रद्धा
या डॉ दाभोलकरांचा गरज विवेकी धर्मजागराची या सकाळ मधील लेखावर चर्चा
27 Jul 2020 - 7:55 pm | Rajesh188
बदल हळू हळू होतो पण कोणी ती गती वाढवण्यासाठी आक्रमक भूमिका घेत असेल तर ती भूमिका संशयास्पद वाटते.
राज्य घटना ही राज्यकारभार कसा असावा ह्याचे नियम आहेत लोकांनी त्यांचे वैयक्तिक आयुष्य कसं जगावे ह्याचा राज्य घटनेशी काही संबंध नाही.
आपला देश धर्मनिरपेक्ष आहे .म्हणजे सर्व धर्मांना एकच कायदा लागू असावा.
धर्म बघून कायदा काम करणार नाही .
राज्य घटना विज्ञान वादी दृष्टिकोन वाढवा असे निर्देश देते ह्याचा अर्थ लोकांच्या सणा. वर बंदी घाला,देव नाही हे शाळेत शिकवा,हे सांगत नाही . पण तसा अर्थ घेवून घटनेच्या त्या निर्देश चा वेगळाच अर्थ काढून हिंदू धर्म कमजोर करण्यासाठी प्लॅनिंग करणे आणि तसे विचार व्यक्त कारणे हे घटनेशी प्रतारणा च आहे.
27 Jul 2020 - 8:00 pm | प्रमोद देर्देकर
मनाची द्विधावस्था आणि खळबळ अतिशय पारदर्शी होऊन आलीय लेखनात>>>
+१.
फक्त मला हे असं शब्दात मांडता येत नाही एव्हढंच.
लाखो वर्ष झाली आपण कुठुन आलो या राहाटगाडग्यात आणि कुठे जाणार आहोत कोणालच माहिते नाही. सगळं कोणी निर्माण केले , कशाला केले, हेतु काय अशा
प्रश्नांना आयुष्यात एकदा तरी प्रत्येक माणुस सामोरा जातोच जातो.