क्वाएट प्लीज... लेडीज अँड जेंटलमेन!

Primary tabs

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
11 Jul 2020 - 6:16 pm

चंदा आए, तारे आए,
आनेवाले सारे आये
आए तुम्ही संग ना...
आन मिलो सजना|

जुलै महिन्याचा दुसरा आठवडा .... दुपारची वेळ.... बाहेर रिमझिमणारा पाऊस.... हातात मोठा मग भरून वाफाळता चहा आणि ही अप्रतीम ठुमरी. जुन्या आठवणींची हुरहुर लावणारी. ह्यावेळी खरोखरच एका सजणीने झुरवलं. तिच्या आठवणीने जीव वेडापिसा झालाय. तिचं आणि माझं नातं अगदी मी वयात येतानापासूनचं - त्याहीपेक्षा किंचित आधीचंच. हिरवळीवरून - पांढर्‍या शुभ्र पेहरावात ओंजळीने मोती उधळीत येणारी ती. तिच्या त्या निळ्या डोळ्यांना, सोनेरी केसांना, तिच्या तारुण्याने मुसमुसलेल्या अंगकांतीला, स्ट्रॉबेरीचा रंग ल्यालेल्या गालांना चिरतारुण्याचं वरदान. ती जेव्हा यायची तेव्हा रात्र जागवायची, मदहोष करून जायची, अपार आनंद देऊन जायची आणि पंधरा दिवसांनी जाताना आठवणींचा ठेवा देऊन जायची - पुढच्या वर्षी पुन्हा येण्याचं आश्वासन देतच.

टिप्पिकल ब्रिटिश आहे ती. SW19 Church Road, London. अगदी तिकडची सदाशिव पेठच म्हणा ना. त्यामुळे ती वेळेची पक्की. जूनच्या शेवटच्या सोमवारी येते आणि जुलैच्या दुसर्‍या रविवारपर्यंत राहते. पण ह्या वर्षी ती आलीच नाही. येणार तरी कशी म्हणा - परिस्थितीच अशी. पण ती अशी दगा देणारी नाही हो. ती पुढच्या वर्षी नक्की येईल पुन्हा बेहोष करायला तिचा १४४ वा वाढदिवस साजरा करायला. तिची वाट बघण्यात एक वर्ष सहज सरून जाईल.

तीच हो - क्रिकेटबाहेरचं तुमचं - आमचं पहिलं प्रेम - "विंबल्डन!"

Wimbledon Logo

ह्या ब्रिटिश लोकांना एक जाम चांगली सवय आहे. एखाद्या खेळाला जन्म द्यायचा. त्याचं पालन-पोषण करायचं, त्याच्यावर चांगले संस्कार करायचे, त्याला छान धष्ट-पुष्ट बनवायचा आणि मग जगातल्या इतर देशांनी हुकुमत गाजवण्यासाठी त्याला सोडून द्यायचं. बघा ना - क्रिकेट, फुटबॉल, रग्बी ही मुलं आणि त्यांची लाडाची लेक टेनिस!

९ जुलै १८७७ रोजी लंडनच्या विम्बल्डन उपनगरातल्या हिरवळीवर २२ (ह्यातला एक आला नाही - म्हणजे २१) स्पर्धकांचा सहभाग असलेली ही स्पर्धा हॅरो स्कूलचा माजी विद्यार्थी स्पेन्सर गोरने केम्ब्रिजचा माजी विद्यार्थी असलेल्या विल्यम मार्शलला ६-१, ६-२, ६-४ असं सरळ सेट्समध्ये हरवून जिंकली आणि तब्बल २५ गिनीजची (१ गिनी म्हणजे १ पाऊंड १ शिलिंग) महागडी ट्रॉफी जिंकली. त्यावेळी डॉ. हेन्री जोन्सनी घालून दिलेले बरेचसे नियम आजही अस्तित्वात आहेत. १८८४ साली महिलांची पहिली स्पर्धा मॉड विल्सनने जिंकली आणि एका अद्भुत प्रवासाला सुरुवात झाली जो गेली १४२ वर्षं चालू आहे.

Spencer Gore

विम्बल्डन आणि श्वेतवस्त्र हे एक अतूट समीकरणा आहे. आणि आताच्या रंगीबेरंगी, झगमगाटाच्या जमान्यात तर त्या "विम्बल्डन ग्रीन" रंगाच्या पार्श्वभूमीवरच्या त्या पांढर्‍या कपड्यांचा राजेशाही रुबाब अजूनच उठून दिसतो. टेनिस हा आधीच वैयक्तिक खेळ. प्रत्येक खेळाडू हा त्याच्या खेळातूनच नाही तर त्याच्या पोशाखातून सुद्धा आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न करत असतो. ते दोन आठवडे सगळं जग २५६ सर्वोत्कृष्ट टेनिसपटूच नाही तर २५६ उमद्या, तरुण, "सेक्सी" व्यक्तिमत्वांचं कौशल्य, त्यांची ताकद, त्यांची नजाकत आणि त्यांची वृत्ती - प्रवृत्ती देखील बघत असतं. फॅशन आणि मार्केटिंगसाठी ह्यापेक्षा उत्तम संधी ती कोणती? पण विम्बल्डन आणि ग्लॅमर किंवा फॅशन हे समीकरण रूढ झालं ते बर्‍याच अंशी सुझॅन लेंग्लेन ह्या फ्रेंच खेळाडूमुळे तब्बल शंभर वर्षांपूर्वी १९२० च्या दशकात. सुझॅन कोर्टवर एखाद्या बॅले नर्तकीसारखी विहार करायची आणि तिच्या फॅशन सेन्सनी तेव्हाच्या युरोपियन स्त्रियांना (आणि अर्थातच पुरुषांना सुद्धा) वेड लावलं होतं. तेव्हापासूनच ग्लॅमर आणि फॅशन हे विम्बल्डनचे टेनिस इतकाच अविभाज्य भाग बनले. आणि पुढे हेच ग्लॅमर विम्बल्डनची ओळख बनली.

Suzzanne Lenglen

विम्बल्डनच्या कोर्टवर तर कित्येक खेळाडूंनी न भूतो न भविष्यति अशी कामगिरी केलेली आहे. टेनिसच्या प्रतिभेचं अचाट, अद्भुत दर्शन घडवलेलं आहे. १८८० च्या दशकातल्या अर्नेस्ट आणि विल्यम हे रेनशॉ बंधू आणि हर्बर्ट लॉफर्ड ह्यापासून ते रॉड लेव्हर - रॉय एमरसन, मार्गारेट कोर्ट - बिली जीन-किंग, बोर्ग - मॅकेन्रो, नवरातिलोवा - एव्हर्ट, बेकर - एडबर्ग, स्टेफी ग्राफ - मोनिका सेलेस, सॅम्प्रास - अगासी, फेडरर - नदाल अश्या कितीतरी थरारक लढती दिल्या आहेत.

१९८० चा बोर्ग - मॅकेन्रो सामन्याचा श्वास रोखून धरायला लावणारा टायब्रेकर असो वा बेकर - एडबर्गची १९८९ मधला तो उत्कंठावर्धक अंतिम सामना. २००५ ची व्हीनस विल्यम्स विरुद्ध लिंडसे डेव्हनपोर्ट लढत असो वा प्राण कंठाशी आणणारा २००८ चं फेडरर - नदाल चं जीवघेणं द्वंद्व - विम्बल्डनच्या त्या हिरवळीवर टेनिस झळाळून उठतं!

Wimbledon Championship Points

गेल्या १४३ वर्षांत जगात कितीतरी उलथापालथ झाली. देश होत्याचे नव्हते झाले, नवे देश निर्माण झाले. खुद्द ब्रिटिशांचं साम्राज्य त्यांच्या बेटापुरतं उरलं. माणूस चंद्रावर गेला, मंगळावर उतरायची स्वप्नं बघायला लागला. पण विम्बल्डनच्या काही रूढी - परंपरा अजूनही बदललेल्या नाहीत. मला तर विम्बल्डनच्या प्रथांमध्ये पुण्याच्या गणेशोत्सवाच्या परंपरांइतकंच पावित्र्य दिसतं.

कितीही खर्चिक असलं तरी विम्बल्डन ग्रासकोर्टवरच खेळली जाते.
२०११ पासून स्पर्धेचं 3D telecast होत असलं तरी १८७७ पासूनच सर्व खेळाडूंना प्रामुख्यानी पांढरा पोशाख घालण्याचं बंधन कायम आहे.
बाकी स्पर्धा Men's किंवा Women's असतात - विम्बल्डनला मात्र Gentlemen's and Ladies' स्पर्धा होतात.
१९२० मध्ये उभारलेलं सेंटर कोर्ट पाडून नवं अद्ययावत स्टेडियम उभारण्यापेक्षा, जास्त खर्च करून सुद्धा कमी सोयी असलेल्या जुन्याच स्टेडियमवर Retractable roof टाकणं पसंत केलं गेलं.

Wimbledon Roof

आपल्याकडे जशी मोदकांशिवाय गणेशचतुर्थी अशक्य तसं स्ट्रॉबेरी विथ क्रीमशिवाय विम्बल्डन अपूर्ण. ही लोकं त्या दोन आठवड्यात जवळपास ३० टन स्ट्रॉबेरी आणि ८ हजार लिटर क्रीम फस्त करतात.
स्पर्धेचा पहिला रविवार हा rest day असतो. पुण्यात १-४ दुकानं बंद असतात तसंच.
आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे - आपल्याकडे विसर्जनाला एरवी कोणी काहीही थिल्लरपणा करत असेल पण कसब्याच्या गणपतीसमोर मात्र भाविक मनोभावे हात जोडूनच उभा राहतो. तसंच - सामन्याच्या वेळी काहीही दंगा चालू असेल, पण chair umpire नी नुसतं Quiet please..... Ladies and Gentlemen म्हणायचा अवकाश... तो प्रेक्षक हातची घडी तोंडावर बोट ठेवून शांत बसतात!

आजच्या सातत्यानी बदलणार्‍या जगात काही गोष्टी आपण रुचिपालट म्हणून का होईना - जपायला हव्यात. प्रत्येक रूढी - परंपरेला शास्त्र-संमत कारण असायची गरज नाही. "आमच्यात असं करतात" हे कारण काही अभिमानास्पद रूढी जपायला पुरेसं असतं. ऑलिम्पिक्सच्या वेळी ज्योत लावणं, मेलबर्नची बॉक्सिंग डे टेस्ट, न्यूझीलंड "All Blacks" रग्बी टीमचं Haka नृत्य ह्यांसारखीच विम्बल्डन ही केवळ ब्रिटिश किंवा टेनिसची नाही तर उभ्या खेळजगताची परंपरा आहे. ती आहे तशीच जपली गेली पाहिजे.

ह्या वर्षी नाही झाली म्हणून काय झालं? पुढच्या वर्षी तिचा १४४ वा वाढदिवस साजरा करायला पुन्हा जुलैचा दुसरा आठवडा असेल, रिमझिम पाऊस असेल, वाफाळता चहा असेल आणि आपणही असूच की!

- जे पी मॉर्गन

बाकी स्पर्धा Men's किंवा Women's असतात - विम्बल्डनला मात्र Gentlemen's and Ladies' स्पर्धा होतात.

क्रीडाप्रकटनसद्भावनाआस्वादमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

शेखरमोघे's picture

11 Jul 2020 - 7:50 pm | शेखरमोघे

वा, वा, सुन्दर!! अगदी मोदक आणि "पुनरागमनायच" सकट!!

शेखरमोघे's picture

11 Jul 2020 - 7:50 pm | शेखरमोघे

वा, वा, सुन्दर!! अगदी मोदक आणि "पुनरागमनायच" सकट!!

शा वि कु's picture

11 Jul 2020 - 7:59 pm | शा वि कु

लेख मस्त.

मूकवाचक's picture

13 Jul 2020 - 2:05 pm | मूकवाचक

मस्त लेख!

श्वेता२४'s picture

11 Jul 2020 - 7:59 pm | श्वेता२४

टेनिसमधील फारसं कळत नाही पण तुमचा लेख त्यातल्या माहितीमुळे व लिखाणाच्या ओघवत्या शैलीमुळे खूप आवडला

अनिंद्य's picture

12 Jul 2020 - 7:25 pm | अनिंद्य

झकास !

सुपर्ब, जेपी इस बॅक वीथ बँग!

- (जेप्याचा पंखा ) सोकाजी

राघव's picture

12 Jul 2020 - 11:55 pm | राघव

अगदी असंच म्हणतो! :-)

जे.पी.मॉर्गन's picture

14 Jul 2020 - 9:39 pm | जे.पी.मॉर्गन

धन्यू सोत्रि, राघव आणि सगळ्यांनाच!

जे. पी. मॉर्गन

चौथा कोनाडा's picture

13 Jul 2020 - 1:26 pm | चौथा कोनाडा

व्वा, सुंदर लेख ! एकेक नर्म पंच भारी आहेत!
विम्बल्डन आणखि माहीती मिळाली, पुढील भागाच्या प्रतिक्षेत !

कुमार१'s picture

13 Jul 2020 - 2:01 pm | कुमार१
१९८० चा बोर्ग - मॅकेन्रो सामन्याचा श्वास रोखून धरायला लावणारा टायब्रेकर असो

मस्त आठवणी आहेत त्या !

बेकार तरुण's picture

13 Jul 2020 - 2:06 pm | बेकार तरुण

मस्त लेख

मदनबाण's picture

13 Jul 2020 - 9:10 pm | मदनबाण

जेपी क्लासिक ! केवळ या लेखासाठी आणि विम्बल्डनच्या प्रेमामुळे लॉगिन झालो ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Times Of Music Season 1 Episode 2 - Mithoon & Viju Shah

चांदणे संदीप's picture

14 Jul 2020 - 9:25 am | चांदणे संदीप

शीर्षकावरून अंदाज आलेलाच होता. आणि आपण सामान्य भारतीयांचं क्रिकेटनंतरचं टेनिस त्यातही विम्बल्डन हे दुसरं प्रेम आहे हे खरे.
लेख प्रचंड आवडला.

सं - दी - प

वीणा३'s picture

15 Jul 2020 - 1:39 am | वीणा३

मस्त लेख !!!

सुमो's picture

15 Jul 2020 - 4:49 am | सुमो

आवडला.