परवा गप्पांच्या ओघात विषय पूर्वी, शाळा-कॉलेजात असताना पाहिलेल्या जाहिरातींकडे वळला. जाहीरातींची उजळणी करुन विषय मालिका...त्यांची शीर्षकगीतं..त्यातील कलाकार असा प्रवास करत करत चित्रपटांपर्यंत आला. चित्रपटांचंही दळण व्यवस्थित दळून झाल्यावर एका क्षणी विषय अचानक शैक्षणिक, शास्त्रीय कार्यक्रमांकडे वळला आणि मग थेट कंट्रीवाईड क्लासरुम पासून टर्निंग पॉईंटपर्यंत आठवणींना उजाळा देत देत विषय नॅशनल जिऑग्राफिक, डिस्कव्हरी पर्यंत येऊन पोचला. केबल नव्हता तेव्हा रविवारी लागणार्या National Geographic सिरीजवर समाधान मानलेलं असायचं. (अवांतर १) मग नंतर विषय आपसूकच माझ्या आवडत्या वाईल्ड लाईफ, नेचर डॉक्युमेंट्रीजपर्यंत आला. तेव्हा लख्खकन एक आठवण झाली.....लहानपणीच्या रंगीत विश्वात एका वेगळ्या दुनियेची सैर घडवून आणणारा...निसर्गाकडे डोळे उघडून बघा सांगणारा, बाबांचं बोट धरुन इरॉसला पाहिलेला एक छान चित्रपट आठवला.
तो चित्रपट, इतक्या काळानंतर (कमीत कमी वीस वर्षांनंतर) पहायच्या आलेल्या उर्मीने लगेच blockbuster videosकडून मागवला. नामीब, प्री-नामीब, कलहारी वाळवंट आणि कुबांगो नामक नदी या त्रिकुटातील वन्यजीवनाचं रौद्र, थरारक, रंजक, कधीकधी मजेदार आणि प्रसंगी कारुण्यमय चित्रण ज्या विलक्षण प्रकारे केलं गेलंय ते पाहिलं की थक्क व्हायला होतं. चित्रपटाची सुरुवातच वाळूचा एकेक कण सुटा असणार्या आणि मैलोगणती पसरलेल्या लालसर करड्या नामीब वाळवंटात होते. हे आहे Red Namib. तो रखरखाट पाहून तिथे असं काय वन्यजीवन असणारे असं वाटेस्तोवर त्या वाळूवर चिमुकल्या दोन, तीन किंवा जास्त पायांनी उमटत गेलेली नक्षी दिसते आणि मागोमाग त्या पाऊलखुणांचे मालक हळूहळू दर्शन देतात. मुंगीपासून सापापर्यंतची विविध प्रजा तिथे नांदत असते आणि त्याच पार्श्वभूमीवर अक्षरं उमटतात ’Animals are beautiful people'!
हा चित्रपट (खरं तर डॉक्युमेंट्री) मनात घर करुन रहायला वन्यजीवांचं विस्मयजनक चित्रण इतकं एकच कारण नाही. तसं असतं तर अजून कैक वाईल्ड लाईफ़वर आधारित उत्तमोत्तम चित्रपट/लघुपट आहेत जे लक्षात रहायला हवे होते. पण यात मला आवडलं ते चित्रीकरणाबरोबरच, प्रसंगांना साजेसं असं पार्श्वसंगीत. दिग्दर्शक Jamie Uys यांनी चक्क क्लासिकल ट्रॅक्स वापरलेत. काही जागी ते इतके चपखल वाटतात..उदाहरणार्थ, रखरखीत वाळवंटात पावसाच्या आगमनाने जेव्हा अगणित तर्हेच्या फुलांचं नंदनवन फुलतं तेव्हा मागे ऐकू येणार्या त्या आननंददायी सुरावटींनी आपलंही मन उचंबळून येतं. (तसं नंतर वाटलं होतं साऊंड ऑफ म्युझिक बघताना) तसंच चित्रपटाच्या शेवटीही पावसाने आनंदित झालेले पशुपक्षी त्यांच्या परीने तो आनंद दर्शवतात तेव्हाचं संगीत खरोखर साजेसं असंच आहे. वन्यजीवनातील मजेशीर घडामोडीही चित्रपटात तितक्याच रंजक दाखवल्या आहेत आणि साथीला narratorची मार्मिक, गंमतीशीर माहिती. उदाहरणार्थ, टोकदार काट्यांनी मढलेल्या साळींदराच्या बीळाचं तोंड हे एकावेळी एकच साळींदर आत शिरु शकेल एव्हढंच असतं खरंतर. पण हे त्यांना कळलं तर ना! मग दोन साळींदरं एकदमच एकत्र आत शिरु बघतात आणि मग काय धड ना आत धड ना बाहेर पडता येत! तेव्हा कानावर शब्द पडतात ’Porcupines should know better than anyone...not to enter in the house at the same time!' अजून एक प्रसंग. ’आधीच मर्कट त्यात मद्य प्याला’ अशी काहीशी आपली एक म्हण आहे. पण ती खरी ठरत असली तर? ’मरुला’ नावाच्या झाडाची आंबलेली फळे जेव्हा माकडं आणि इतरही प्राणी खातात तेव्हा त्याच्या ’गुणधर्माने(!) झिंग चढलेली बबून्स बघून ही म्हण खरी ठरतेय असं म्हणावसं वाटतंच. (अवांतर २)
नाही म्हणायला चित्रपटात काही ठिकाणी animationचा आधार घेतलाय हे स्पष्ट दिसतं. कदाचित त्या घटनेचं चित्रिकरण काही कारणाने घेता आलं नसेल. उदा. वाळवंटातल्या त्या कुठल्याश्या एका झाडाच्या (झाडाचं नाव विसरले) बिया ते झाड खूप जपून ठेवतं आणि जसा पाऊस येतो तशी ती फुलं/फांद्या उकलून त्यातल्या बिया बाहेर फेकल्या जातात. या बिया ऍनिमेटेड असल्याचं सहज दिसतं. किंवा पुढेही एके ठिकाणी एक बबून उत्सुकतेपोटी एका बीळात हात घालतं. त्या हात घातल्यानंतरचं बीळाच्या आतल्या भागाचं चित्रण ही animatedच आहे.
पण असं असलं तरीही हे अपवादात्मक प्रसंग सोडता सबंध लघुपटात काहीही मुद्दाम घडवून आणलेलं वाटत नाही. किंवा काहीतरी घाईघाईत चित्रिकरण करुन प्रेक्षकांच्या माथी फिल्म मारली आहे असंही वाटत नाही. (तब्बल ४ वर्षे लागली हा लघुपट बनायला असं कुठेसं वाचल्याचं स्मरतं). क्रौर्य, प्रेम, कारुण्य, दु:ख, संघर्ष, अपार कष्ट इत्यादी विविध छटा दिसणार्या वन्यजीवनात इतरही किती आश्चर्यकारक घटक आहेत हे बघून खरोखर निसर्ग किती महान आहे याची खात्री पटते. प्राण्यापक्ष्यांच्या natural adaptability साठी भक्ष्य पकडण्यासाठी किंवा भक्ष्य होण्यापासून वाचण्यासाठी निसर्गाने त्यांना काय काय क्लृप्त्या दिल्यात हे बघणं खूपच मनोरंजक आहे. गॅकोनामक एक पालीसारखा प्राणी खाणारा 'sidewinder' नावाचा वाळवंटी साप स्वत:ला वाळूमध्ये चक्क पूर्णपणे गाडून घेतो. आपल्या शेपटीचं टोक तेव्ह्ढं दिसेलसं वर ठेवतो. आता ते टोक हे गवत आहे असं समजून मुंगी तिथे येते....narrator सांगतो,,’now snakes don't eat ants but geckos do and snakes eat geckos..'आणि शेवटी जीवो जीवस्य जीवनम या न्यायाने sidewinderची भोजनाची सोय होते. शॅमिलिओन...शाळेत बर्याचदां घोकलेलं नाव...या साहेबांचे डोळे स्वतंत्ररीत्या काम करतात. एकाच वेळी दोन्ही डोळे वेगेवेगळ्या गोष्टी लीलया बघत असतात..narrator म्हणतो ’He must be the only creature in the world whose left eye doesn't know what his right eye is doing!' :)
मला या चित्रपटातला सर्वात भावलेला (खरं तर डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग आहे हा) प्रसंग आहे पेलिकन पक्ष्यांचा. कुबांगो नदीच्या कृपेने भर प्री-नामीब वाळवंटात चक्क एक तळं आणि तळ्याभोवताली जंगल तयार होतं. पण निसर्गाच्या नियमानुसार सूर्याची दाहकता कमाल मर्यादा गाठते आणि तळं ठार शुष्क होतं. तेव्हा यात वस्तीला असलेले पेलिकन पक्षी सरळ आपल्या पिल्लांना वार्यावर सोडून स्थलांतर करतात! उडू न शकणारी ती बिचारी पिल्लं ओळीने चालत रहातात..त्या विस्तीर्ण वाळवंटात...मृगजळाच्या मागे! निसर्गाच्या या क्रूर खेळापुढे मग चित्त्याची शिकारही कमी क्रूर वाटते!.
चित्रपटातला हा किंवा इतरही अनेक प्रसंग एकापेक्षा एक आहेत. आज तब्बल वीस वर्षांनीही हा चित्रपट तितकाच आनंद देतो हेच त्याचं मोठं यश आहे. मग भलेही टेक्निकली आजच्या डॉक्युमेंट्रीज इतका सरस नसेलही आणि कदाचित बालपणीतल्या सर्वच गोष्टींच्या आठवणी जश्या जास्त जवळच्या वाटतात त्याचप्रमाणे या चित्रपटालाही माझ्या बालपणीच्या काळाची एक अदृश्य झालर आहे, त्यामुळे म्हणा हा चित्रपट माझ्या काही ’अनफर्गेटेबल्स’मध्ये मोडतो आणि तो पाहून मिळणार्या आनंदासाठी पुन:पुन्हा नव्वद मिनीटे खर्चायची माझी अवश्य तयारी आहे!
अवांतर १: वर NGचा विषय निघालाच आहे म्हणून...तेव्हा दूरदर्शनवरील त्या सिरीजमध्ये एकदा एक अजब विषय होता. आपल्या दृष्टीआड असलेली अद्भुत दुनिया! उदा. तळ्यात पावसाचा एखादा थेंब पडणे....आपल्याला वरवर इतकीच क्रिया दिसते...पण आपल्या डोळ्य़ांपेक्षा अनेक पटींनी जास्त ताकद असलेल्या सूक्ष्मदर्शकाने किंवा अशाच कसल्या तरी आयुधाने पाहिलं तर तो थेंब पडल्यावर त्याच्या भोवताली बराच हल्लकल्लोळ माजलेला असतो....पाण्याच्या लाटा काय उसळतात..कारंजी काय उडतात...फारच रंजक, मनोहर आणि अदभुत होता तो भाग! कधी पहायला मिळेल ते पुन्हा?! असो.
अवांतर २: या चित्रपटात अगदी हत्तीसुद्धा ही फळं खाऊन झिंगतात असं दाखवलंय पण ही बाब वादग्रस्त आहे... जाणकारांच्या मते हत्तीच्या इतरत्र अवाढव्य खाण्याने आणि पाणी पिण्याने त्या फळांचा मादक अंश निश्चितच कमी होतो आणि त्यामुळे त्याची नशा चढून हत्ती झिंगणे हे शक्य नसावं.
प्रतिक्रिया
15 Nov 2008 - 1:17 pm | मनिष
वर्षा, सुरेखच परिचय करून दिलास ह्या लघुपटाचा. बघायला नक्कीच आवदेल, भारतात कुठे मिळू शकेल ह्याची डी. व्ही. डी. ?
16 Nov 2008 - 9:05 am | विसोबा खेचर
वर्षा, सुरेखच परिचय करून दिलास ह्या लघुपटाचा. बघायला नक्कीच आवदेल,
हेच म्हणतो...
तात्या.
15 Nov 2008 - 1:50 pm | स्वाती दिनेश
मस्त! पाहिला आहे हा लघुपट,माझ्याही आठवणी ताज्या केल्यास वर्षा.
स्वाती
15 Nov 2008 - 3:06 pm | सहज
हा माहीतीपट नितांत सुंदर होता. ह्याच दिग्दर्शकाचा गॉड्स मस्ट बी क्रेझी देखील सुंदर चित्रपट.
लेख आवडला. धन्यवाद वर्षाताई.
15 Nov 2008 - 7:19 pm | वेताळ
ह्याचे नाव व कुठे उपलब्द होईल? जरा माहिती द्या.
वेताळ
15 Nov 2008 - 10:41 pm | वर्षा
चित्रपटाचं नाव 'Animals are beautiful people'
मला आठवतंय त्यानुसार मी पाहिला होता लहानपणी तेव्हा त्याचं नाव 'Beautiful people' इतकंच होतं
भारतात हा लघुपट कुठे मिळेल कल्पना नाही. मी इथे (अमेरिकेत) Blockbuster videosकडून मागवला होता. तसा Amazon.comवरही उपलब्ध आहेच.
17 Nov 2008 - 4:19 pm | मदनबाण
लहानपणी तेव्हा त्याचं नाव 'Beautiful people' इतकंच होतं
हेच नाव होत...आता एव्हढ आठवत नाही पण रेती मागे फेकणारा किडा मस्त होता....
मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर
15 Nov 2008 - 11:05 pm | बिपिन कार्यकर्ते
एका सुंदर चित्रपटाची आठवण ताजी केल्या बद्दल धन्यवाद. लहानपणी अर्धवट पाहिला होता. आता युट्यूब वर काही क्लिप्स आहेत तेवढ्याच पाहिल्या. पूर्ण बघायचा आहेच.
बिपिन कार्यकर्ते
15 Nov 2008 - 11:22 pm | यशोधरा
शोधते आता ऍमेझॉनवर..
17 Nov 2008 - 1:32 pm | दत्ता काळे
मी अनेक वेळा हा लघुपट बघितला आहे. मला हा लघुपट अतिशय आवडतो. ह्यामध्ये दुष्काळात जेव्हा जंगलातलं पाणी संपलेलं असतं, तेव्हा आदिवासी बबुनच्या मदतीने पाण्याचा शोध घेतात, कारण प्राण्यांना नक्की माहित असतं, की जंगलात थोडफार शिल्लक असलेल पाण्याच ठिकाण नक्की कुठे आहे - हा एक प्रसंग फारच सुंदर दाखवलाय.
17 Nov 2008 - 11:10 pm | वर्षा
होहो, हा प्रसंग अप्रतिम आहे. (याच प्रसंगात बबून त्या बिळात हात घालते तेव्हाच्या काही सेकंदांच्या चित्रिकरणासाठी एनिमेशनचा आधार घेतलाय पण त्या प्रसंगापुढे ते एव्हढं खुपत नाही)
17 Nov 2008 - 4:08 pm | राघव
वाहवा.. सुंदर लेख!
आता शोधावे लागेल, लघुपट कुठे मिळतो ते.
अवांतरः
तसे मिपावर असे कामाला लावणारे बरेच विषय असतात..
मागे पुस्तकांबद्दल माहिती गोळा होत होती, मग छंदोबद्ध कविता सुरु झाल्यात, आता हा लघुपट!
जरा इकडे-तिकडे हलु देत नाहीत. :)
(मिपाचा फ्यॅन)मुमुक्षु
17 Nov 2008 - 5:27 pm | लिखाळ
मस्त ! हा चित्रपट खरंच सुंदर आहे. मी लहानपणी पाहिला आहे आणि गेल्या आठवड्यात परत एकदा पाहिला.
तुम्ही दिलेली संगीत आणि नॅरेशनला दिलेली दाद अगदी योग्यच आहे. फार सुंदर चित्रपट आहे.
अवांतर २ बद्दल - तो एन जी सीचा भाग मलासुद्धा आठवतो आहे. जगात होणार्या या रोजच्या घटना सेकंदाच्या सुक्ष्म भागात घडताना स्पष्टपणे टिपणार्या कॅमेर्यांच्या सहाय्याने दाखवलेल्या होत्या. फार उत्तम भाग होता तो.
-- लिखाळ.
17 Nov 2008 - 11:16 pm | भाग्यश्री
मी नाही पाहीला हा चित्रपट.. आता मागवते ब्लॉकबस्टर मधून..
सांगितल्या बद्दल धन्यवाद गं वर्षा! वर्णन वाचून कधी पाहतीय मी पिक्चर असं झालं! :)
http://bhagyashreee.blogspot.com/
18 Nov 2008 - 12:04 am | वर्षा
यानिमित्ताने सगळ्यांनी तुम्हाला आवडलेल्या अश्या वाईल्ड लाईफ/नेचर संबंधित चित्रपट/लघुपट/सिरीयल्स सुचवाव्यात. शिवाय पुस्तकंही. मला शिकारकथा आवडतात. निसर्गसेवकचा अभिजात हा माझा पर्यावरणविषयक आवडता अंक आहे. शिवाय चितमपल्लींची पुस्तकंही आवडली आहेत. तुमचीही आवड सांगा.
18 Nov 2008 - 11:21 am | अभिरत भिरभि-या
’Animals are beautiful people'! आता बघायला हवा
18 Nov 2008 - 4:36 pm | संताजी धनाजी
खालिल दुव्यावर जरा माहीतीपण मिळेल.
http://www.imdb.com/title/tt0071143
मी पण हा पिक्चर लहानपणी पाहिला होता. त्यानंतर एकदम काही दिवसांपुर्वी पाहिला. फार मजा आली :)
माझ्याकडे हा पिक्चर आहे. मी पुण्यात कोथरुड मध्ये रहातो. हवा असल्यास सांगावे :)
- संताजी धनाजी