खेड्यातली विहीर, दहीहंडी आणि मोनालिसा!

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
19 Sep 2019 - 11:53 pm

पुइक
.
.
.
.
पुइक

चक्क एका शुक्रवारी संध्याकाळी खुद्द कोरेगाव पार्कच्या पाचव्या गल्लीत पार्किंगला जागा मिळाल्याच्या आनंदात मी विजयोन्मादाने २-२ वेळा बटण दाबून गाडी लॉक केली. आज त्या जगन्नियंत्याची माझ्यावर कृपादृष्टी आहे... आज मुझे कोई नहीं रोक सकता.... हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनीने त्या समुद्रा,डळमळू दे तारे .... मला काही फरक पडणार नव्हता... साक्षात नॉर्थ मेन रोडवर पार्किंग! माझ्या चालण्यात आपोआपच एक रुबाब आला....spring in the stride वगैरे जे म्हणतात ते हेच असावं.

त्याच धुंदीत, झोकात, कैफात चालत असतानाच समोरून एक ओळखीचा चेहरा येताना दिसला. मन अचानक २५ वर्षं मागे गेलं. (भलत्या दिशेला विचार नेऊ नका... तसं काही नव्हतं!).. येस... माया मिसच त्या. आमच्या चित्रकलेच्या टीचर. इतक्या वर्षांत चेहरा जरा थकला होता, काही बटा पांढर्‍या झाल्या होत्या पण माया मिसना न ओळखणं शक्यच नव्हतं. आमच्या छोट्याश्या शाळेतली दहा वर्षं... आमच्या मायाळू टीचर्स, अजूनची मैत्री घट्ट टिकवून असलेले मित्र - मैत्रिणी, ५३-५४ नंबर बसचा प्रवास कितीतरी आठवणी क्षणार्धात डोळ्यांसमोर तरळून गेल्या. आता इतक्या वर्षांनंतर त्यांच्या विद्यार्थ्याला असा (म्हणजे व्यवस्थित भांग पाडलेला, शर्ट इन केलेला, चांगले स्वच्छ ब्रॅन्डेड कपडे घातलेला - थोडक्यात यशस्वी) बघून माया मिसना किती आनंद होईल. त्या मला विचारतील...तू कुठे असतोस.. काय करतोस वगैरे. आपण आपला पाढा वाचून दाखवल्यावर त्यांना किती अभिमान वाटेल.... शंभर विचार मनात आले. मनात पुढच्या ५ मिनिटांची स्क्रिप्ट तयार झाली!

"Good evening ma'am... ओळखलंत का मला?"

माया मिस थबकल्या... त्यांनी क्षणभर प्रश्नार्थक नजरेनी माझ्याकडे निरखून पाहिलं. त्यांची उजवी भुवई वर करून बघण्याची सवय अजून तश्शीच होती.

"जे.पी. मॉर्गन ना तू?" एका क्षणात माया मिसनी २५ वर्षांचं अंतर कापलं. धन्य धन्य झालो! २५ वर्षांत न समोर येऊन सुद्धा माझ्या टीचरनी मला झटक्यात ओळखलं होतं. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. माझ्या मनाच्या कोपर्‍यात गेली कित्येक वर्षं पायाचे अंगठे धरून वाकलेला विद्यार्थी यदा कदाचितमधल्या शकुनी सारखा "जीतम जीतम जीतम" म्हणत उड्या मारायला लागला. जिकलंस मित्रा... जिंकलंस. २५ वर्षांनीसुद्धा टीचरच्या लक्षात राहिलास! ऋण फेडलंस शाळेचं!

"विसरला नाहीत मॅम मला"--- मी ऑलमोस्ट सेन्टी झालो होतो... सद्गदित वगैरे काय म्हणतात ते तेच असावं!

"अरे तुला कशी विसरीन राजा"

हे त्यांचे शब्द ऐकले मात्र... पावभाजीच्या तापलेल्या तव्यावर तो कळकट्टशिरोमणी स्वयंपाकी पाणी शिंपडतो तेव्हा जसा चर्र् आवाज येतो ना... तसा माझ्या काळजातून आलेला मला जाणवला. त्यांचा उपरोधानी भरलेला सानुनासिक आवाज हे संभाषण खूप वेगळ्या दिशेला जाणार ह्याची जाणीव करून देत होता. जुन्या खपल्या काढल्या जाणार होत्या... जुन्या जखमा पुन्हा ताज्या होणार होत्या.

"अरे तुला आणि तुझ्या दहिहंडीच्या चित्राला मी आयुष्यात विसरणार नाही - आर्ट्सला वगैरे नाही गेलास ना तू?" - मिसच्या स्वरात कला शाखेविषयी अतीव काळजी दाटून आली होती.

"नाही मॅम... इंजिनियरिंग..." मी पुटपुटलो असेन.

"हा.. मग ठीक आहे. तिथे पट्टी वापरतात ड्रॉइंगमध्ये." मॅम चांगल्याच फॉर्ममध्ये येत होत्या... हे लक्षण माझ्यासाठी ठीक नव्हतं. Theory of machines च्या viva च्या वेळेस पोटात बर्फाची लादी ठेवल्यासारखं वाटलं होतं त्याची आठवण झाली.

"मला आजही वाटतं की तुझी दहीहंडी आणि खेड्यातल्या विहिरीचं memory drawing ही दोन चित्रं पॅरिसला Louvre Museum मध्ये मोनालिसाच्या दोन बाजूंना लावायला हवी होती. जगभरातल्या लोकांना तुझी कला दिसायला हवी होती. तुझी आई ओळखीची आणि उगाच ड्रॉईंगमुळे कोणाचं वर्ष कशाला वाया घालवायचं ह्याच विचारानी तुला कधी ३५ च्या खाली मार्कं दिले नाहीत".... मॅम बोलत असताना मला तर अंगावरचे सूट बूट जाऊन आपण एक ठिगळ लावलेली हाफपॅन्ट आणि कॉलरला किंचित उसवलेला मळका शर्ट घालून मॅमच्या पट्टीचा मार खाण्यासाठी हात पुढे करून उभे आहोत असा भास व्हायला लागला.

"मॅम मला एकदा ६१ मार्कं होते ड्रॉईंगमध्ये" - माझा बॅकफुट डिफेन्सचा प्रयत्न.

"अरे ते ५० मार्कांच्या थिअरी पेपर मध्ये मायकेल अँजेलो आणि विन्सीचं श्राद्ध घालून मिळालेले. एरवी तुला कुठे इतके मार्क पडायला?" - बाईंची मेमरी भलतीच शार्प होती आणि बोलणं भलतं तिखट. हातातल्या पट्टीची कसर त्या जिभेच्या पट्टयानी भरून काढत होत्या. माझ्या चित्रकलेनी त्यांच्या मनावर इतका आघात केला असेल याची मला कल्पना नव्हती.

"आता बरं चाललंय ना... चित्रं वगैरे काढत नाहीस ना आता? मग ठीक आहे!" मिसनी म्हणजे माझ्या चित्रकलेचं भर रस्त्यात वस्त्रहरण केलं. इकडच्या तिकडच्या चार गोष्टी बोलून, नमस्कार करून तिथून गपगुमान सटकलो.

शाळेत कानाखाली खाऊन यावं तसा घरी आलो आणि कार्टा धावत आला.... "बाबा, मी hypercars चा चार्ट बनवतोय. मला Porsche 918 Spyder काढायला मदत कर ना."

माझ्यातला बाप पोराला मदत करायला आतुर होता... पण माझ्यातला हाफचड्डीतला विद्यार्थी मात्र पुन्हा एकदा मान खाली घालून, एक डोळा बारीक करून माया मिसची छडी खाण्यासाठी हात पुढे करून उभा होता!

जे.पी.

कलाविनोदप्रकटनसद्भावनाविरंगुळा

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Sep 2019 - 12:25 am | डॉ सुहास म्हात्रे

=)) मस्तं लिहिलंय !

पिवळा डांबिस's picture

20 Sep 2019 - 5:37 am | पिवळा डांबिस

ह्या गुरुजनांच्या, विशेषतः बाईंलोकांच्या, बरं बारीक लक्षांत असतं!!
पण काय हो, तुमचं दहिहंडीचं चित्र खरंच एकदम 'मोकलाया दाही दिशा' होतं का? :)
जमलं तर चार चित्रं इथेही टाका, आम्हां मिपाकरांना रसग्रहण करायला!!

बाकी तुम्हाला काय बोलू, मी देखील चित्रकलेचा दोर फार पूर्वीच कापून टाकला आहे.
माझ्या अख्ख्या आयुष्यात मी नापास झालेली एकमेव परीक्षा: टिळक विद्यापीठाची एलेमेंन्टरी ड्रॉईंग! :)

जे.पी.मॉर्गन's picture

20 Sep 2019 - 10:48 am | जे.पी.मॉर्गन

पण काय हो, तुमचं दहिहंडीचं चित्र खरंच एकदम 'मोकलाया दाही दिशा' होतं का? :)

काय सांगू सायबा.... मलाही त्या चित्राच्या आठवणीनं भडभडून येतं. जे जे बिनसू शकतं ते ते त्या चित्रात बिनसलं होतं.

जमलं तर चार चित्रं इथेही टाका, आम्हां मिपाकरांना रसग्रहण करायला!!

निश्चितच आवडलं असतं ती चित्रं टाकायला पण घरच्यांनी जादू टोणा केलेली बाहुली घरातून टाकावी तशी ती चित्रं माझ्या डोळ्यांदेखत रद्दीत टाकली हो!

अजिंठा एलोराच्या कलाकारांचा शोध घेणाऱ्या एखाद्याच्या हाती लागली तर तोच माझा शोध घेत येईल ह्याची खात्री आहे

झिंगाट's picture

20 Sep 2019 - 11:13 am | झिंगाट
झिंगाट's picture

20 Sep 2019 - 11:14 am | झिंगाट
झिंगाट's picture

20 Sep 2019 - 11:14 am | झिंगाट
झिंगाट's picture

20 Sep 2019 - 11:17 am | झिंगाट

माझं पण अगदी सेम. अख्ख्या शैक्षणिक आयुष्यात फक्त एका परीक्षेत नापास झालो....
कहर म्हणजे तो निकाल जाहीर केलेला आमच्या गणिताच्या सरांनी. ते मला शिकवता असल्यापासून म्हणजे आठवी, नववीत गणितात माझा एकही मार्क ते कापू शकले नव्हते. निकाल सांगितल्यावर ते खुदकन हसलेले आजही आठवतात मला:)

तुषार काळभोर's picture

20 Sep 2019 - 7:55 am | तुषार काळभोर

आमच्या शाळेत चित्रकलेत नापास करायची प्रथा नव्हती म्हणून नववीपर्यंत ढकलत आलो.
सुदैवाने इलेक्ट्रॉनिक्स असल्याने पहिलं वर्ष फक्त drawing होतं.

तुम्ही 'ती' चित्रं टाकली असती तर आम्हाला सद्गदित होण्याची संधी मिळाली असती. आणि आमच्या चित्रकलेचा न्यूनगंड जर कमी झाला असता. बघा स्मरणकुपीतुन तसं चित्र बनवता येईल का..
बाकी दहीहंडी ते पोर्षे ९१८ स्पायडर म्हणजे प्रगती आहे !

1

विजुभाऊ's picture

20 Sep 2019 - 8:17 am | विजुभाऊ

पिडा काकाशी सहमत.
ड्रॉईंग च जरा वर्णन करा की.
अगदी "पुर्षा शीडी सरळ काढ की . ती तिरडी वाटतेय" असे नव्हते ना?

जे.पी.मॉर्गन's picture

20 Sep 2019 - 11:49 am | जे.पी.मॉर्गन

चित्रकलेच्या बाबतीत आमचे प्रयत्न म्हणजे बायकोच्या शब्दांत "मसणात मढ पोचवण्याची" कामं होती. जे काढलंय ते असं आहे... ती शिडी वाटतेय की तिरडी ते तुमचं तुम्ही बघून घ्या हाच attitude.

मी शप्पथ एकदा रुमालाच्या design मध्ये कोपऱ्यात एक छोटं फूल काढून "मला कोरेच रुमाल आवडतात" असं सुद्धा सांगितलं आहे।

अनिंद्य's picture

20 Sep 2019 - 10:13 am | अनिंद्य

खुसखुशीत :-))

अनिंद्य's picture

20 Sep 2019 - 10:13 am | अनिंद्य

खुसखुशीत :-))

उपेक्षित's picture

20 Sep 2019 - 10:42 am | उपेक्षित

जबरी झालंय :)))

सतिश गावडे's picture

20 Sep 2019 - 10:56 am | सतिश गावडे

काल्पनिक असेल तर उगाच ओढून ताणून विनोद केला आहे आणि सत्य घटना असेल तर मॅडम धन्य आहेत. :)

जॉनविक्क's picture

20 Sep 2019 - 1:42 pm | जॉनविक्क

सहमत.

नावातकायआहे's picture

20 Sep 2019 - 11:00 am | नावातकायआहे

:)))

पिडाकाका, विजुभाऊ - सगळी जुनी लोकं गावली, मेजवानी आहे आज. :-)

रच्याकाने - माझा इम्पोस्टर सिंड्रोम घडवण्यात शिक्षकांचा मोठा हात आहे असे मला बर्‍याच वेळा वाटते.

श्वेता२४'s picture

20 Sep 2019 - 12:13 pm | श्वेता२४

खुसखुशीत लेक. वाचताना बऱ्याचदा हसू आवरत नव्हतं.

गड्डा झब्बू's picture

20 Sep 2019 - 12:30 pm | गड्डा झब्बू

झक्कास लिहिलय.

दुर्गविहारी's picture

20 Sep 2019 - 6:58 pm | दुर्गविहारी

मस्त लिहीलयं. या दिवाळी अंकाचा विषय रसग्रहण आहे, तुमच्या चित्रांचे रसग्रहण लिहा. ;-)

यशोधरा's picture

20 Sep 2019 - 7:11 pm | यशोधरा

दिवाळी अंकात फक्त रसग्रहणात्मक लिहायचं आहे, असं नाही. इतर लेखनही देता येईल. आवाहनामध्येही तसं स्पष्ट केलंय. :)

योगी९००'s picture

20 Sep 2019 - 8:08 pm | योगी९००

एकदम मस्त लिहीलेय. वाचताना मजा आली. तुमच्या चित्राचा फारच धसका घेतलेला दिसतोय तुमच्या चित्रकलेच्या मिसने...

वेलकम मधल्या अनिलकपूरला तुमच्याकडूनच चित्रकलेची प्रेरणा मिळाली असावी. बाकी ती चित्रे पहायला मिळाली असती तर धन्या झालो असतो.

सस्नेह's picture

20 Sep 2019 - 8:24 pm | सस्नेह

हहपु =))

गामा पैलवान's picture

20 Sep 2019 - 11:52 pm | गामा पैलवान

जेपी,

अस्मादिकांची चित्रकला खरंतर विचित्रकलाच होती. एके दिवशी ड्रॉईंगच्या मास्तरांनी विषय वर्णन करून सांगितला. म्हणाले तुमच्याकडे गणपती आलेत. उंदीर प्रसादाचा मोदक घेऊन पळतोय. त्याच्या मागे मांजर लागलंय. आणि मांजर कुठेतरी धडपडू नये म्हणून तिच्या मागे तुम्ही पळताय. तब्बल पाच मिनिटं वर्णन केलं व म्हणाले की काढा चित्रं आता. दोन तास (चार पिरीयड) होते चित्रं काढायला.

च्यायला, हे सालं असलं काही झेपणारं होतं थोडंच आपल्याला! मी जे काही काढलं त्यात उंदीर बेडकासारखा दिसंत होता. मांजर उंदरासारखं, आणि मी? जाउदे. नको त्या भीषण आठवणी!! सर्वत्र काळा रंग भरून राहिला होता. गणपतीची मूर्ती जेमतेम काढली. शेवटी त्या गणरायानेच तारलं. त्याच्या जोरावर चित्रं पास झालं.

बाकी, आमच्या जीवशास्त्रातल्या आकृत्यांची हीच गत व्हायची. बारावीच्या वर्षी प्रयोगवहीतल्या आकृत्या मित्राकडून काढवून घेतल्या. मित्रालाच हौस होती. म्हंटलं नेकी और पूछपूछ?

अभियांत्रिकीस आल्यावर इंजिनियरिंग ड्रॉईंगचा शाळेतल्या चित्रकलेशी सुतराम संबंध नाही हे पाहून हायसं वाटल्याचं आठवतं.

आ.न.,
-गा.पै.

जे.पी.मॉर्गन's picture

22 Sep 2019 - 8:27 am | जे.पी.मॉर्गन

गणपती आलेत. उंदीर प्रसादाचा मोदक घेऊन पळतोय. त्याच्या मागे मांजर लागलंय. आणि मांजर कुठेतरी धडपडू नये म्हणून तिच्या मागे तुम्ही पळताय. तब्बल पाच मिनिटं वर्णन केलं व म्हणाले की काढा चित्रं आता

अहो हा चित्राचा विषय आहे की चेष्टा??? आम्ही ह्या गोष्टीवर नाटक केलं असतं. चित्र काढणं केवळ अशक्य!

मस्त लेहिले आहे. मज्जा आली वाचायला. धन्यवाद.

छबिलदासमध्ये आम्हाला मेलगे नावाचे सर होते. कळकट दाढी वाढवले आणि केस अस्ताव्यस्त ठेवणारे. त्यांचे प्रेतयात्रेवर फार प्रेम. वर्षातले पहिले चित्र ते प्रेतयात्रेचे काढायला सांगत. मात्र ते फारच सुस्वभावी होते. त्यांनी कधीच कोणालाही त्रास दिला नाही. आता त्यांची थोरवी कळतेय.

"मेलं - गे" म्हणून प्रेतयात्रेच आकर्षण असेल :-D

बाकी एलिमेंटरी किंवा इंटर्मिजीएट साठी आम्ही खिजगणतीतही नसायचो.

सुबोध खरे's picture

21 Sep 2019 - 10:16 am | सुबोध खरे

कोणत्याही कलेने आमच्या कडे मेहर नजर केली नाही. मग त्यात सुवाच्य अक्षर सुद्धा आले. गायन वादन चित्रकला हस्तकला अशा कोणत्याच कलेशी माझे नाते जुळलेच नाही.
सुदैवाने आमच्या शाळेत अशा कलांना फक्त श्रेणी असे त्यामुळे त्यात फक्त "पास" एवढ्या श्रेणीत राहूनहि माझा पहिला दुसरं नंबर कधी चुकला नाही.

बाकी पुढे जीवशास्त्र विषयात प्रत्येक चित्राला "नावे सढळ हस्ते आणि विविध रंगात" देत असल्याने तोही प्रश्न आला नाही.

माझ्या भावाची चित्रकला चांगली असल्याने त्याला दोनदा कॅम्लिनची कसली तरी बक्षिसे मिळाली होती. आणि त्याने एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या परीक्षा हि यशस्वीपणे दिल्या होत्या. त्याची हस्तकला उत्तम आहे. काहीही शिक्षण न घेता पेटी किंवा तत्सम वाद्ये त्याला वाजवता येतात. नकला चांगल्या करतो "असंबद्ध" भाषण करण्यात त्याला रुईया कॉलेजात पहिले पारितोषिकही मिळाले होते.( दोन वाक्यांचा एकमेकांशी काहीही संबंध न येत सलग ५ मिनिटे बोलणे हि अतिशय अवघड गोष्ट आहे. मुद्दाम करून पहा)

सुदैवाने आमच्या आईवडिलांनी माझी तुलना भावाशी कधीच केल्याचे आठवत नाही. त्यामुळे अशा बाबतीत न्यूनगंड येण्याचा संबंध आला नाही.

(हि तुलना न झाल्याचा फायदा अनेक वर्षांनी वैद्यकीय व्यवसायात समुपदेशन करताना जाणवला.)

गामा पैलवान's picture

21 Sep 2019 - 2:41 pm | गामा पैलवान

खरे डॉक्टर,

अहो पाच मिनिटं खूप झाली. मी चक्ष्वैसत्यं पाहिलेला विक्रम फक्त ९० सेकंदांचा आहे.

आ.न.,
-गा.पै.

शित्रेउमेश's picture

26 Sep 2019 - 1:03 pm | शित्रेउमेश

भारी...
एक तर तुमच्या माया मिस ची मेमरी भन्नाट आहे, नाही तर तुमचं दही-हंडी वाल चित्र बघायला पाहीजे....