आज गुरूवार. दत्ताचा वार.
दिवसभर बसून होतो. मधूनच पावसाची सर यायची. तात्पुरता आडोसा शोधायला लागायचा. समोरच्या दुकानाच्या पायर्यांवर गर्दी व्हायची. अंग ओले झाल्याने बसवत नव्हते. तरीपण पाच वाजेपर्यंत बसून राहीलो. घरी जाणार्यांची गर्दी संध्याकाळीच होते. घरी जाता जाता दत्ताला हात जोडून, पैसे टाकून ते पुण्य कमवत होते.
कंटाळलो कंटाळलो अन मग तेथून उठलो. बँकेत अकाऊंटला नेटबँकींगने पैसे ट्रान्सफर केले. थोडे पैसे गावी आयएमपीएसने पाठवले. खर्चासाठी अर्जंट पाहीजे म्हणत होती. ओले अंग अन थंडीच्या उतार्यासाठी समोरच्या शॉपमधून बाटली घेतली. अन स्विगीवरून ऑर्डर मागवली. ते पार्सल पॉईंटपर्यंत तंगड्या तोडत जा अन पार्सल आणा नसत्या झंजटी. नकोच ते. अन पार्सल पॉइंटात त्याच त्या चारदोन भाज्या असतात. त्यापेक्षा ऑनलाईन फुड ऑर्डर केली तर वेगवेगळे हॉटेल असतात. वेगवेगळ्या चवी असतात. पेफोनवरून किंवा पेटीएम वरून ऑर्डर केली तर कधी कधी कॅशबॅकही मिळते.
उद्या शुक्रवार. देवीचा वार. महिलांकडून काही कमाईच्या अपेक्षा नाहीत. तरीपण जावेच लागेल. पोटासाठी करावेच लागेल.
पण शनिवार मस्त. देवखुळे भक्त रांगा लावून पैसे देतात. बक्कळ कमाई. अंघोळ न करताच गेलं पाहीजे. जास्तीत जास्त गबाळं दिसलं तर कमाई चांगली मिळते. पहिला नंबर लावायला पाहीजे.
मग रविवारी आराम. गावी गेलं पाहीजे.
प्रतिक्रिया
12 Sep 2019 - 10:01 pm | टिवटिव
बैलाचा डोळाच फोडला तुम्ही..... :)
13 Sep 2019 - 9:33 am | वामन देशमुख
मूर्तीभंजन व पाषाणभेद!
13 Sep 2019 - 7:59 pm | जॉनविक्क
13 Sep 2019 - 10:11 pm | नावातकायआहे
क्लास....!!!!
14 Sep 2019 - 9:32 am | सुचिता१
उत्तम!!!
14 Sep 2019 - 11:02 am | नाखु
भक्तीचा बाजार उठला.