*प्रभावी जलसंवर्धन कसे कराल ?* (Beyond the 'Rainwater Harvesting') भाग - दोन.

सुनिल प्रसादे's picture
सुनिल प्रसादे in जनातलं, मनातलं
19 Aug 2019 - 8:38 pm

*प्रभावी जलसंवर्धन कसे कराल ?*
(Beyond the 'Rainwater Harvesting')

भाग - दोन.
--------------
जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचं संवर्धन
-------------------------------------------------------------

पहिल्या भागात आपण पाणी आणि जमीन ह्यांच्यामध्ये नेमकं काय नातं आहे याचा शोध घेतला. त्या नात्यामध्ये लपलेला सृष्टीचा नियम काय सांगतो हे आपण पाहिलं आणि त्यानुसार एक तंत्र बनवलं. त्या तंत्राच्या साहाय्याने आकाशातून इमारतींच्या छपरावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याला आपल्या मर्जीनुसार कसं वळवायचं हे आपण पाहिलं. आता थेट जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा विचार करू.

इमारतींच्या छपरांवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्यापेक्षा थेट जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचं प्रमाण कितीतरी पटीनं अधिक आहे. वर्तमानात पावसाचं पाणी अडविण्यासाठी आपल्याकडे धरणांव्यतिरिक्त एकही प्रभावशाली साधन किंवा तंत्र आढळत नाही. त्या एकमेव साधनावरचा ताण आता खूपच वाढलेला आहे आणि दुसऱ्या बाजूने त्याची क्षमता कमी होत आहे. त्याचे परिणाम महापुराच्या रूपाने आपण नुकतेच भोगले आहेत. जलसंवर्धनाच्या मार्गानेच धरणांवरचा तो ताण आपण कमी करू शकतो.

जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचं नियोजन हे म्हटलं तर सोपं आणि म्हटलं तर कठीण ह्या स्वरूपाचं आहे. पहिल्या भागात सांगीतलेलंच तंत्र वापरून आपण जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचं केवळ नियंत्रणच नव्हे तर मोठ्या प्रमाणावर अत्यंत प्रभावीपणे संवर्धनदेखील करू शकतो. सपाट जमिनीवर पडलेल्या पावसापेक्षा डोंगर उताराच्या जागेवर पडलेला पाऊस वेगवेगळ्या पद्धतीने आपलं जास्त नुकसान करतो. परंतु आपला सगळ्यात जास्त फायदा करून देण्याची क्षमतादेखील त्याच्यामध्येच आहे. त्याच्यामधली ती क्षमता आपण ओळखायला हवी. त्याला इकडेतिकडे वाहू न देता आपल्याला गोळा करायचं आहे आणि आपल्या मर्जीप्रमाणे वळवायचं आहे. कसं ते पाहूया .....

आपला महाराष्ट्र हा डोंगर दऱ्यांचा प्रदेश आहे. अनेक लोक आणि अनेक संस्था लोकांच्या सहभागाने ह्या डोंगरउतारावर पडलेलं पावसाचं पाणी जमिनीमध्ये जीरावं ह्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यासाठी ते डोंगर उतारावर माथ्यापासून पायथ्यापर्यंत अडीच ते तीन फूट खोलीचे आडवे चर खणतात. उतारावर वाहून येणारं पावसाचं पाणी त्या चरांमध्ये अडकावं, थांबावं आणि हळूहळू जमिनीमध्ये मुरावं अशी त्यामागची योजना असते. परंतु वरून वहात येणारं पाण्याचं प्रमाण पाहता ते सर्व पाणी अडवण्यात आणि जमिनीमध्ये जिरवण्यात ह्या चरांची क्षमता कमी पडते असं आढळून येतं. वरून येणारे पाणी चर भरल्यानंतर ओसंडून खालच्या बाजूला वाहून जाते. म्हणून अशाप्रकारची पध्दत साधारणपणे पावसाचा मुख्य जोर कमी झाल्यानंतरच्या काळात आमलात आणली जाते. परंतु तोपर्यंत पावसाचं बहुतांश पाणी अगोदरच वाहून जाऊन समुद्राला मिळालेलं असतं. ही पध्दत जलसंवर्धनाच्या बाबतीत तेव्हढी परिणामकारक ठरत नाही कारण पहिल्या भागात सांगितल्याप्रमाणे इथेदेखील पाणी जमिनीमध्ये जिरणे ही एक संथगती अशी नैसर्गिक क्रिया आहे. परंतु ह्या पध्दतिचा मूळ आराखडा कायम ठेवून ती पुढीलप्रमाणे काही बदल करून वापरली तर आपण त्यामधून अनेक आश्चर्यकारक परिणाम दीर्घकाळासाठी मिळवू शकतो.

दीर्घकालीन उपयोग आणि श्रम, खर्च इत्यादींची पुनरावृत्ती टाळण्याच्या दृष्टीने चरांच्या ऐवजी त्या जागेवर उतारावरून येणारं पाणी अडविण्यासाठी जमिनीच्या वर एक ते दीड फूट येईल इतक्या उंचीचं वर्तुळाकार पक्कं बांधकाम करून घ्यावं. एका वर्तुळाकार बांधकामामध्ये त्याच्या वरच्या बाजूला असलेल्या एक ते पाच हजार चौ. फू. जमिनीमधले पाणी गोळा होईल अशा हिशोबाने बांधकाम करावं. वरच्या बाजूला मिळणारं क्षेत्र जास्त असेल तर तेथील पाणी गोळा करण्यासाठी एकापेक्षा अधिक ठिकाणी बांधकामं करावं. त्या त्या ठिकाणचं पर्जन्यमान आणि भौगोलिक परिस्थिती ह्यांचा विचार करून आपण त्यामध्ये आवश्यक तो बदल करावा. अशाप्रकारचं बांधकाम डोंगराच्या माथ्यापासून पायथ्यापर्यंत जिथे जिथे पाणी गोळा होऊ शकेल अशा सपाटीच्या (समतल नव्हे) जागेच्या खालच्या बाजूला करून घ्यावं. डोंगरातील वेडेवाकडे उतार आणि तयार झालेल्या लहान मोठ्या घळी ह्यांचा विचार आपण तात्पुरता बाजूला ठेऊ. उतारावरून वाहून आलेलं पावसाचं पाणी आपण केलेल्या वर्तुळाकार बांधकामाच्या सर्वात खालच्या भागामध्ये गोळा होईल. पाणी गोळा होण्याच्या ठिकाणी पाणी बाहेर पडण्यासाठी पाण्याच्या प्रमाणानुसार एक चार किंवा सहा इंची पीव्हीसी पाईपचा तुकडा बसवावा. जेणेकरून गोळा झालेलं पाणी त्यामधून डोंगराच्या खालच्या बाजूला बाहेर पडेल आणि बांधकामावर ताण येणार नाही. ज्या ठिकाणी चर खणलेले असतील किंवा चरांचाच वापर करायचा आहे त्या ठिकाणी चरातलं पाणी बाहेर पडण्यासाठी चरांमध्येदेखील वरच्या बाजूला पाण्यात बुडेल असा पाईप बसवता येईल. पाईपमधून बाहेर पडलेलं पाणी खाली वाहून जाऊ नये याकरता पाणी पडण्याच्या ठिकाणी 4'×4'×4' अशा लांबी रुंदी खोलीचा एक खड्डा तयार करावा. त्या खड्डयाची चार फुटाची खोली ही उताराच्या बाजूला असलेल्या जमीनपातळीपासून मोजावी. त्यानंतर खड्डयाच्या वरच्या बाजूच्या जमीनीच्यावर किमान सहा सात इंच येईल असं समपातळी बांधकाम करून त्या खड्डयाचं एका जलकुंडात रूपांतर करून घ्यावं. बांधकाम समपातळीत येण्यासाठी जलकुंडाच्या खालच्या बाजूला बांधकामाची उंची जास्त येईल. जलकुंडाचं बांधकाम केवळ जमिनीच्या वरच करायचं असून जलकुंडाच्या आतल्या बाजू आणि तळ पूर्णपणे मोकळे ठेवायचे आहेत. उतारावरून वाहून येणारं सर्व पाणी एक ठिकाणी गोळा होऊन पाईपमधून त्या जलकुंडात पडेल आणि जेव्हढ्या जास्त प्रमाणात पडेल तेव्हढ्या जास्त प्रमाणात जमिनीत प्रभावीपणे जिरत जाईल. जमिनीवर वाहणाऱ्या पाण्याचं प्रमाण कमी होऊन ते जमिनीच्या उदरात शिरून भुजलपातळी वाढवण्यास मोठी मदत करेल त्याचबरोबर डोंगरावरची माती वाहून जाण्यास आपोआपच प्रतिबंध होईल. डोंगरउतारावर शक्य होईल त्या सर्व ठिकाणी अशाप्रकारचे बांधकाम करून जमिनीचे पुनर्भरण करणारी केंद्र आपण तयार केली तर भूजल पातळी वाढवणारी ती एक मोठी व्यवस्था तयार होऊ शकेल आणि सध्या वाहून जाऊन समुद्राला मिळणाऱ्या पावसाच्या बऱ्याचशा पाण्याचं संवर्धन आपण पहिल्या पावसापासूनदेखील करू शकू. पाईपमधून बाहेर पडलेलं पाणी तशाच पाईप लाइनने आपण आपल्या मर्जीनुसार इतरत्रही नेऊ शकतो.

अशाप्रकारच्या जमिनीचं पुनर्भरण करणाऱ्या जलकुंडांबरोबरच डोंगरमाथ्यावरच्या घळींमध्ये किंवा डोंगरमाथ्याजवळ जिथून उताराला सुरवात होते तिथे तिथे सोयीस्कर ठिकाणी डोंगरमाथ्यावर पडणारं पावसाचं पाणी गोळा करुन पुढे पाठवणारी ( पाणी जिरवणारी नव्हेत) जलकुंड म्हणजेच water transmission centers जर आपण बांधली तर एव्हढ्या उंचीवर गोळा होणारं पाणी आपण अत्यंत कमी खर्चात खूप लांबवर गरजेच्या ठिकाणी पाईपने सहजपणे नेऊ शकू. अशाप्रकारची व्यवस्था जर मोठ्या प्रमाणावर आमलात आणली तर पावसाचं कमी प्रमाण असलेल्या प्रदेशात सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये पडलेल्या पावसाचं अतिरिक्त पाणी कायमस्वरूपी वळवता येऊ शकेल आणि सांगली कोल्हापूरसारखे महापूरदेखील टाळता येऊ शकतील. अशाप्रकारची water transmission centers जर आपण राज्यभरच्या आपल्या सर्व डोंगररांगांमध्ये तयार केली तर अत्यंत कमी खर्चात केवळ नैसर्गिक तंत्राच्या (gravity force) साहाय्याने आपल्या राज्याची सर्व जमीन जलमय करण्यासाठी आपल्याला फार प्रयास पडणार नाहीत आणि पिण्याच्या पाण्याबरोबरच उद्योग, शेती, माती, पाणी आणि जंगलं ह्यांच्याबाबतच्या बऱ्याच समस्या सोडवण्यात आपल्याला यश मिळू शकेल.

मोठ्या प्रमाणावर Water transmission centers उभारणे आणि त्यातलं पाणी पाईपमधून आपल्याला हव्या त्या ठिकाणी नेणं हे शासकीय पातळीवरचं काम आहे. त्यांचं काम ते करतीलच, परंतु आपल्या गरजेसाठी गावांमध्ये व्यक्तिगत आणि सामूहिक पातळीवर अशाप्रकारची कामं व्हायला हवीत. अशी छोटी छोटी मॉडेल्स जर जागोजागी तयार झाली तर शासनालादेखील त्याचा विचार करावा लागेल. आतापर्यंत आपण डोंगर उतारावरच्या पाण्याची चर्चा केली असली तरी प्रत्येकाच्या शिवारात असलेल्या उताराच्या जमिनीवरदेखील ठिकठिकाणी अशा पद्धतीने पाणी अडवून जलसंवर्धन होऊ शकतं. त्यासाठी मोठया उताराचीच आवश्यकता आहे असं नाही. पावसाच्या पाण्याचं संवर्धन करताना आपण किती लाख लिटर पाणी जमिनीच्या उदरात सोडलं ते मोजायला विसरू नका. स्थानिक पर्जन्यमान आणि जेव्हढ्या जमिनीवरचं पाणी आपण गोळा करणार आहोत त्या जमिनीचं क्षेत्रफळ ह्या दोन गोष्टींच्या सहाय्याने ते मोजता येतं हे सर्वांनाच माहीत आहे.

शासनाने मांडलेला विचार जनतेने स्वीकारणे हा पायंडा आता शक्य आहे तिथे आपण बदलायला हवा. आपल्या गरजेच्या गोष्टी आपण पुढाकार घेऊन करायला हव्यात. जनता जे मोठ्या प्रमाणावर करते आहे त्याला प्रोत्साहन देण्याचा विचार शासनाला करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण व्हायला हवी. अन्यथा हिमालयातून गंगा पृथ्वीवर आणणाऱ्या *भगिरथालाही* अचंबित करणाऱ्या चार हजार फूट उंचीचा सह्याद्री ओलांडून कोकणातलं पाणी मराठवाड्याला पोहोचवण्यासारख्या योजनांची कलेवरं पहात हळहळण्यापालिकडे आपल्या हातात काहीच राहणार नाही.

सुनिल प्रसादे.
दापोली.
8554883272 (WA)

दि. 19 ऑगस्ट, 2019.

अधिक माहिती- https://www.facebook.com/profile.php?id=100001449118448

#PagoliWachawaAbhiyan
#RainwaterHarvesting

समाजप्रकटनविचारलेखमाहिती

प्रतिक्रिया

प्रमोद देर्देकर's picture

19 Aug 2019 - 10:07 pm | प्रमोद देर्देकर

तुम्ही सर्व ठिकाणी फे. बु. चा पत्ता देत आहात. पण ज्याचे खाते नाही त्याला पाहता येत नाही तेव्हा सगळे व्हीडीओ तू नळी वर टाकावे आणि इथे पत्ता द्यावा.

जलसंवर्धनाच्या मार्गानेच धरणांवरचा तो ताण आपण कमी करू शकतो.

जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचं नियोजन हे म्हटलं तर सोपं आणि म्हटलं तर कठीण ह्या स्वरूपाचं आहे.

खरं आहे.
पुढे जे उपाय दिले आहेत -खड्डे करणे, पाईप टाकणे वगैरे खर्चाचे आहेत. पटले तर स्थानिक संस्था हे काम करतील.